Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 30, 2006

Hitguj » Culture and Society » इतर » न्यू जर्सी एकांकिका स्पर्धा » Archive through May 30, 2006 « Previous Next »

Ninavi
Sunday, May 28, 2006 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ' असाही एक शोले' या भाई आणि विनय ने काम केलेल्या एकांकिकेतली मी टिपलेली काही दृष्यं. कुठे टाकावी ते कळलं नाही म्हणून इथे टाकत्ये. मॉड, तुम्ही सुचवाल तिथे हलवीन.

विनय ( भिक्या) टेबल पुसताना. त्याच्या बायकोने हा फोटो मुद्दाम काढायला लावला.
1

Ninavi
Sunday, May 28, 2006 - 12:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई ( बळवंत अण्णा), हात बांधण्याआधी.
2

Ninavi
Sunday, May 28, 2006 - 12:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रामलाल आणि ठाकुर
3

Ninavi
Sunday, May 28, 2006 - 12:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रामलाल अण्णांचे हात बांधताना.

4

Mrinmayee
Sunday, May 28, 2006 - 2:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फोटो छानच गं निनावि! सौ. विनय यांनी म्हणे खास फोटो काढून घेतला त्यांच्या 'ह्यांचा'! घरी असं काम करतानाचं दृश्य दुर्मिळ असावं!

Arch
Sunday, May 28, 2006 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिलभाई अगदी संजीवकुमारच दिसतायत की

Dineshvs
Monday, May 29, 2006 - 1:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बसंती कहा है भाई ? मूडिने पळवली कि काय तिला ?

Ashwini
Monday, May 29, 2006 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! निनावी, जरा अजून माहिती टाक ना. कुणातर्फे होती स्पर्धा? किती groups आले होते? पारितोषिके कुणाला मिळाली? इ.

Badbadi
Monday, May 29, 2006 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ोटो छान च ग निनावी..
बाकी विनय टेबल किती हसत मुखाने पुसतो आहे.. निदान एकांकिकेत तरी काही वेग़ळं काम घ्यायचत कि विनय.. घरी ठीक आहे.. तिकडे काही choice नसतो


Bee
Monday, May 29, 2006 - 6:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह, चेहर्‍यावरचे हावभाव खूप छान आहेत फ़क्त फोटो थोडे धुसर आलेत. अर्च खरच आपले भाई संजीव कपूरच दिसतात एकदम :-)

Ninavi
Tuesday, May 30, 2006 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

|| श्री ||

मग फोटो आवडले तर सगळ्यांना. A picture speaks better than 1000 words असं म्हणतात. ( कोण म्हणतात कोण जाणे! मॅडच आहेत!) त्या न्यायाने माझं ४००० शब्दांच्या वरताण आधीच लिहून झालंय. पण काय करणार, मला लिहायची हौस आहे आणि तुम्हाला वाचायची.. तेव्हा भोगूया आपल्या हौसेची फळं.

सर्वप्रथम मला हे स्पष्ट केलं पाहिजे की मी दोनपैकी फक्त पहिल्या एकाच दिवशीच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यामुळे दुसर्‍या दिवशीच्या एकांकिका आणि निकाल ( स्पर्धेचा.. प्रेक्षकांचा नव्हे) याबद्दल मी सांगू शकणार नाही. ते काम आपण विनयला सांगू.

त SSSS र या स्पर्धेची आणि त्यापैकी एका एकांकिकेत विनय आणि भाई काम करत असल्याची चर्चा न्यू जर्सीच्या बीबीवर मला वाटतं महिन्याभरापूर्वी सुरू झाली होती. म्हणजे विनयने केली होती. एकांकिकेचा विषय शोलेशी संबंधित आहे हेही सांगून झालं होतं. नेहेमीप्रमाणेच सगळ्याच बीबीकरांनी ( मी NJ कर म्हटलं नाही हे सूज्ञांच्या ध्यानात आलंच असेल. NJ च्या ए. वे. ए. ठि. बद्दल ( प्रसंगी उपरोधिक किंवा इंग्रजीत ज्याला हार्श म्हणतात असं) बोलणारे, पण ए. वे. ए. ठि. ला उपस्थित न रहाणारे सर्व या सदरात मोडतात.. म्हणजे येतात.) सुरुवातीला त्यात बराच रस घेतला होता. कुणीसं बसंतीसाठी निनावी आणि एकांकिकेसाठी प्लवंग अशी नावंही सुचवल्याचं आठवतं. तसंच लालू या आयडीने ( हो, याच आयडीने ती तिच्या जीवनाकडे आणि लोकांच्या एकांकिकांकडे त्रयस्थपणे पहाते म्हणे.) ' किती लोकांना घेऊन येऊ बोला' असं प्रश्न विचारल्याचंही चागलं लक्षात आहे माझ्या. अर्थात या विनोदाला कारुण्याची झालर नंतर लागली. ' माधुरी येणार असेल तर माझा नवरा ( तोच तो.. सांगून गारा पाडणारा) येईल' असं आर्चनेही डिक्लेअर केलं होतं.

यथावकाश या सार्‍यांना गळती लागली. ( इथून झालर लागायला सुरुवात होते.) काही जणांनी येणार नसल्याचं बाणेदारपणे सांगितलं तर काहींनी गुलदस्त्यात ठेवलं. (NJ च्या बीबीवर एक गुलदस्ता आहे. त्यात वेळोवेळी ही अशी भर पडत असते. पण म्हातारीच्या गोष्टीतल्या गाभार्‍यासारखा हा कधीच पूर्ण भरत नाही.) भाई आणि विनयने प्रेक्षक जमवण्यासाठी कधी शोलेत सोफा वापरलाय असं सांगणं तर कधी निनावी ( याही वेळी) लाडू करून आणणार असल्याचं आमिष दाखवणं असे मार्केटिंगचे बरेच प्रयोग केले. पण झालर पक्कीच होत गेली. सरतेशेवटी मायबोलीकरांपैकी फक्त निनावीच काय ती धीराची निघाली.

पण लालूने आयत्या वेळी येणार नाही म्हटल्यावर ( याचा उल्लेख निदान तीन वेळा तरी करणारच असं आधीच ठरवलं होतं.) तिचाही धीर जरा डळमळीत झाला. मग आदल्या दिवशी तिने BOL द्यायच्या निमित्ताने विनयला फोन केला. दुसर्‍या दिवशी विनोदी एकांकिका करायची असल्यामुळे त्याचा आवाज तेव्हा भलताच गंभीर येत होता. कुणीही मायबोलीकर खरंच येत नसल्याचं सांगून पुढे ' काही काळजी करू नको.. सगळं ठीक होईल' असं तो म्हणाला. हा संवाद आहे की स्वगत हे निनावीला कळे ना. पण त्यावर विचार करायच्या मनःस्थितीत ती ही नव्हती.

अखेर शनिवार दि. २७ मे रोजी ' तो' दिवस उजाडला. सकाळी ११ ते १२ अल्पोपहार आणि नोंदणी, त्यानंतर २ एकांकिका, अडीच ते साडेतीन भोजन आणि त्यानंतर ३ एकांकिका असा मसुदा होता. निनावी साडे अकरा वाजता ओल्ड ब्रिज हायस्कूलला पोचली. तिथे प्रमुख प्रवेशदारापाशी शुकशुकाट पाहून मायबोलीकर नसलेले NJ करही तस्सेच की काय? अशी शंका तिला चाटून गेली. पण आल्यासारखं आत जाऊन पाहून येऊ असा विचार तिने केला. आत शिरल्यावर मात्र उजव्या बाजूने मराठी कानावर पडायला लागलं आणि एकदोन सिल्कच्या साड्या आणि झब्बे त्या दिशेने जाताना दिसले. तेव्हा तिचा जीव भांड्यात पडला. तिथे ( सुदैवाने) कॅफेटेरिया होता आणि अल्पोपहार चालू होता. छाया आरण्यके जातीने व्यवस्था बघत होती. निनावीने तिला ' तिकीट कुठे कलेक्ट करायचं' असं उसन्या बेफिकिरीने विचारलं. ( उसनी म्हणजे जी खरी नाही हे पहाणार्‍याला लगेच कळतं तशी.) ती म्हणाली फ्रंट डेस्कला. निनावीला मुख्य एन्ट्रन्सने शिरूनही तो डेस्क दिसला नव्हता. तसं सांगितल्यावर छायाने जे स्मित केलं त्याची तुलना इथल्या दात विचकणार्‍या स्मायलीशीच होऊ शकेल. ' खाऊन घे गं आधी.. तिकिटांचं काय एवढं' असं ती म्हणाल्यावर निनावीने लगेच पडत्या फळाची आज्ञा घेऊन पोहे आणि शेवयांची खीर असा अल्पोपहार केला. मग पुन्हा तो फ्रंट डेस्क कुठे आहे असं विचारल्यावर ' या दारातून बाहेर पड आणि वाट फुटेल तशी जात रहा. साधारण अल्पोपहार पचेल त्या सुमाराला पोचशील तिथवर' असं उत्तर मिळालं. त्यानुसार निनावी वाट फुटेल तशी चालू लागली.

बहुतेक आपण वाट चुकलो असं वाटायला लागणार, इतक्यात समोरून विनय येताना दिसला. त्याने त्याच्या सौं. शी ( योगिनी) निनावीची ओळख करून दिली. ' चला, निदान एकटं बसावं लागणार नाही' याचा आनंद दोघींच्याही चेहेर्‍यावर स्पष्ट दिसत होता. ( ही वेळ लालूमुळे आली हे लक्षात असेलच सूज्ञांच्या.)

कार्यक्रम झक्कीकाकांच्या भाषेत सांगायचं तर १२ म्हणजे बरोब्बर सव्वाबाराला सुरू झाला. पूर्वनियोजित प्रमुख पाहुणे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे काही कारणाने उपस्थित राहू शकले नव्हते. ( त्यावरून ते ही छुपे NJ करच असावेत असा निनावीला संशय आला.) त्यांचा संदेश माधुरी जोशी यांनी वाचून दाखवला. परदेशात राहुनही पुरणपोळी आणि नाटकांची आवड जपणार्‍या ( लाडू पण म्हणाले मला वाटतं) NJ करांचं अभिनंदन करून त्यांनी स्पर्धेसाठी शुबेच्छा दिल्या होत्या. मग आलेले प्रमुख पाहुणे पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा आरंभ केला. आणि आपल्या खुसखुशीत शैलीत श्रोत्यांशी संवाद साधला. आजचा इथला उत्साह बघून पुण्यात पुरुषोत्तम करंडक प्रथम सुरू झाला तेव्हाच्या आठवणी जाग्या झाल्या म्हणाले.

त्यांच्या भाषणानंतर ' असाही एक शोले' या एकांकिकेची अनाउन्समेंट झाली. आणि पडदा उघडला. रंगमंचावर डाव्या हातास टेबलावर एक तिजोरी, समोर चार पाच खुर्च्या आणि उजव्या बाजूच्या टेबलावर एक कॅसेट प्लेअर आणि काही सटरफटर वस्तू असा थाट होता. तो जाहिरात केलेला सोफा कुठे दिसेना. स्टेजवरील ' डायरेक्टरने' भिक्याच्या नावाने शंख करायला सुरुवात केली. आणि विनयची एंट्री झाली. तो सिनेमात रामलाल म्हणून तिजोरी उघडायचं आणि एरवी भिक्या म्हणून टेबल वगैरे पुसायचं काम करतो असं दिसलं. ठाकुर ऊर्फ बळवंत अण्णा उर्फ भाईंची एंट्री ( सोफा नसल्यामुळे) डाव्या विंगेतून झाली. त्यांच्या एंट्रीला जोरदार टाळी पडली. ती निनावीचीच. एकूण कथानक मराठीत शोलेचा रीमेक काढण्याचा खटाटोप, एक दिवस डायरेक्टर नसताना जय आणि वीरूची कामं करणार्‍या नटांनी स्क्रिप्ट बदलल्यामुळे आणि जब्बरसिंगचं काम करणार्‍या नटाला जब्बर डीसेंट्री झाल्यामुळे होणारे विनोद आणि त्या डीसेंट्रीचा ठपका त्या गावी पिकणार्‍या फळावर ठेवल्यामुळे ( त्या निमित्ताने लोकल प्रॉडक्टची जाहिरात होईल म्हणून) खूश झालेले गावकरी.. असं होतं. एक बसंती आणि एक ठाकुरच्या विधवा सुनेचं काम करणारी चढेल नटी अशी स्त्रीपात्रं होती. सगळ्यांचीच कामं चांगली झाली. अपेक्षित ठिकाणी ( च) हशे येत होते. एकूण प्रयोग सक्सेसफुल झाला.

त्यानंतरची एकांकिका ' द लास्ट कॉल' चं स्क्रिप्ट चांगलं होतं. एक मानसशास्त्राचा प्राध्यापक एका मध्यमवयीन माणसाला तो रात्री एकटा घरात असताना फोन करतो आणि केवळ एक मानसशास्त्रीय प्रयोग म्हणून बोलून बोलून घाबरवून त्याचा अप्रत्यक्षपणे खून करतो अशी कथा होती. सादरीकरण ठीकठाक होतं. कथा गंभीर असली तरी फोन, जे त्यातलं जणू प्रमुख पात्रंच होतं, त्याच्या वेळी अवेळी वाजणार्‍या घंटीमुळे माफक विनोदनिर्मितीही झाली. ( कशी ते सादर करणारे मायबोलीकर असते तर सविस्तर सांगितलं असतं.)

मग सादर झालं कै. प्रवीण दळवी यांच्या वादग्रस्त ' मी नथूराम बोलतोय' चं एकांकिकीकरण. हा प्रयोग उत्तम वठला. विशेषतः नथूरामचं काम करणार्‍या अभिनेत्याचं काम छान झालं.

यानंतर भोजनाची सुट्टी झाली. भोजन म्हणजे एक आईस्क्रीमचा स्कूप भरून उपमा, एक बटाटेवडा, एक इडली आणि छोट्या वाटीत दुधी हलवा. म्हणजे पाच खणी डबे खाणारे त्याला अल्पोपहार आणि सकाळच्याला अत्यल्पोपहार म्हणाले असते बहुतेक.

त्यानंतरची एकांकिका ' पत्रावली' ही अंधश्रद्धा या विषयावर होती. संतोषीमातेच्या नावाने येणारी आणि हे पत्रं दहावीस जणांना पाठवल्यास लाभ आणि न पाठवल्यास तळपट होईल असं सांगणारी पत्रं आणि त्यावर निरनिराळ्या वयाच्या आणि परीस्थितीतल्या माणसांच्या होणार्‍या प्रतिक्रिया असं दाखवलं होतं. स्वतः लेखिका आणि दिग्दर्शक यांनीच ही दोनपात्री सादर केली. स्क्रिप्टही छान चुरचुरीत होतं आणि अभिनयही मस्त होता. संवादफेक आणि शारीर अभिनय दोन्हींमधून विनोदनिर्मिती छान साधली त्यांनी.

त्या दिवशींची शेवटची एकांकिका होती ' गुन्हेगार'. निनावीच्या मते ही सर्वात चांगली झाली. ( पण निनावीचं मत कोण विचारतोय? नाही, म्हणजे, दोन्ही दिवस येणार्‍या प्रेक्षकांना त्यांची पसंती दर्शवायला फॉर्म भरायचा होता. निनावी एकच दिवस गेली होती ना, मग ती कसं सांगणार?)

गुन्हेगार मधे उच्च मध्यमवर्गीय स्तरातले तथाकथित सुसंस्कृत लोक आणि त्यांची खरी मानसिकता याचा वेध घेतला होता. बरीच वर्षं फिरतीमुळे महाराष्ट्राबाहेर राहिलेलं एक जोडपं पुण्यात रहायला आलेलं आहे आणि त्यांनी त्यातल्या नवर्‍याचं प्रमोशन सेलेब्रेट करण्यासाठी म्हणून त्यांचे कॉलेजपासूनचे दोन मित्र ( एक सपत्नीक) यांना घरी पार्टीसाठी बोलावलेलं आहे. हे घर छान असलं तरी समोर झोपडपट्टी आहे आणि तिथे जुगार, दारू, बायकांना मारहाण वगैरे प्रकार रोज सर्रास चालतात. त्रास होतो खरा पण करणार काय? त्यात ह्या पार्टीच्या रात्री त्यांना तिथे समोर एका बाईवर बलात्कार होताना दिसतो. आणि ही मंडळी ते दृश्य सहन तर करू शकत नाहीत, पण त्याबाबतीत काही करूही धजत नाहीत. यजमानीण ' आपण पोलिसांना फोन करू या' असं वारंवार सुचवते, पण नवरा ' नको, कोण ते सगळं ओढवून घेणार' म्हणून ते करायला तयार नाही. आणि मग आपली असमर्थता झाकायला सगळे ' कुणी सांगावं नक्की काय प्रकार आहे, कश्यावरून ते नवराबायको नसतील? कश्यावरून ती बाई वेश्याच नसेल?' अशी घृणास्पद चर्चा करत रहातात. शेवटी ती यजमानीण आपणच पोलीसांना फोन करते आणि माझ्यासमोर इथे असा प्रसंग झाला आहे असं सांगून आरोपी म्हणून आपला नवरा आणि त्याcया मित्रांची नावं देते. अशी कथा होती. सादरीकरण आणि अभिनय सुंदरच होता. विशेषतः तो समोर चाललेला प्रकार केवळ आवाजांनी सूचित केला होता, ते ही अतिशय प्रभावी होते. ही एकांकिका सुन्न आणि अंतर्मुख करून गेली. असे मोठे गुन्हे सोडाच पण आपल्या आजूबाजूला काही गैर होताना दिसलं तर आपण त्याबाबत काही करतो का? आणि ते करत नसू तर खरे गुन्हेगार कोण? हे प्रश्न रेंगाळत राहिले.

इथे पहिला दिवस संपला. अश्या एकांकिका स्पर्धा मराठी विश्वतर्फे यंदा प्रथमच घेण्यात आल्यात असं कळलं. प्रथम प्रयत्नाच्या मानाने सगळेच प्रयोग उत्कृष्ट होते. अजून एक म्हणजे संपूर्ण कार्यक्रमात वेळेचं भान अतिशय चोख सांभाळलं गेलं.

दुसर्‍या दिवशी संजय उपाद्ध्यांचं गप्पाष्टक होणार होतं, त्यांनीही शेवटच्या दोन एकांकिकांच्या मधे प्रेक्षकांशी एक दहा मिनिटं गप्पा मारल्या. छान बोलतात ते. त्या निमित्ताने त्याही कार्यक्रमाची झलक बघायला मिळाली. असो.

मग नाटकं बघून ( करायची सवय ना) निनावी खूप दमल्यामुळे वृत्तांत लिहायला उशीर झाला. त्याबद्दल क्षमस्व.

आता सूत्रं विनयकडे देते..


Maitreyee
Tuesday, May 30, 2006 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी सही आहे 'समीक्षा':-)
विशेष म्हणजे इतक्या तुटपुंज्या (भोजनाच्या) शिदोरीवर इतकी ss सगळी नाटकं बारकाईने पहायची म्हणजे असे तसे काम नव्हे :-O
छाया अराणकेंचं स्मित आणि इथला स्मायली

नटाला जब्बर डीसेंट्री झाल्यामुळे होणारे विनोद आणि त्या डीसेंट्रीचा ठपका त्या गावी पिकणार्‍या फळावर ठेवल्यामुळे>>>>>>>अरे देवा हे मी आधी 'ठपका' ऐवजी 'ठिपका' वाचलं होतं!!

Mrinmayee
Tuesday, May 30, 2006 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, तुझा सविस्तर वृत्तांत वाचून खूपच मजा आली. टाळ्या वाजवून दुखणार्‍या हातांनी तु की बोर्ड वापरून (बडवून म्हणायचं होतं) हे सगळं लिहिलंस. कमाल आहे बाई तुझी.
त्यानंतरच्या मैत्रेयीच्या 'ठपका' 'ठिपका' गोंधळामुळे हसून आणखी पुरेवाट!


Kalandar77
Tuesday, May 30, 2006 - 12:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, छान लिहिले आहेस!

>>अर्च खरच आपले भाई संजीव कपूरच दिसतात एकदम :-)

>>भोजन म्हणजे एक आईस्क्रीमचा स्कूप भरून उपमा, एक बटाटेवडा, एक इडली आणि छोट्या वाटीत दुधी हलवा.

संजीव कपूर कूक होता का? तो फ़ार बेताचा स्वयपाक करतो!

Vinaydesai
Tuesday, May 30, 2006 - 1:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता उरलेला वृत्तांत काहीच वेळात विनयकडून.


Ashwini
Tuesday, May 30, 2006 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, मस्त लिहीला आहेस वृत्तांत, एकदम मार्मिक आणि खुमासदार.

>>>अश्या एकांकिका स्पर्धा मराठी विश्वतर्फे यंदा प्रथमच घेण्यात आल्यात असं कळलं.
बर्‍याच वर्षांपूर्वी म्हणजे मी अमेरिकेत प्रथमच आले असताना, मराठी विश्वने अशी स्पर्धा घेतली होती. त्याला ८ groups आले होते. आम्ही Boston च्या दोन एकांकिका घेऊन गेलो होतो. आणि दोन्हींना मिळून ३ बक्षिसे Boston ला मिळाली होती. :-)

Dineshvs
Tuesday, May 30, 2006 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि, छानच लिहिले आहेस.
तुझ्या लाडुंबद्दल विनय लिहिल ना ?


Limbutimbu
Tuesday, May 30, 2006 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, झाकास लिहिल हेस! :-) आता दुसर्‍या दिवसाच येवु दे! :-)

Vinaydesai
Tuesday, May 30, 2006 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


दुसरर्‍या दिवसाची सुरुवात ही अकरा वाजता होती, आणि बर्‍याच लोकांनी आदल्या दिवसाप्रमाणे Planing केल्याने ते वेळेवर पोहोचलेच नाहीत. एकांकिका स्पर्धा सुरू व्हायला दोन तीन मिनिटं असताना देखील प्रेक्षकागारात फक्त तीस चाळीस माणसं होती. मराठीविश्वच्या शिस्तीप्रमाणे हा कार्यक्रम बरोबर अकराला सुरू झाला तर वाटसरूच्या नाटकाचं काय होणार याचा मला विचार पडला.

हो, कारण पहिलंच नाटक लेखक राहुल जोशी (वाटसरू) यांचं होतं. पुढच्या तीन चार मिनिटात बरेच लोक तिथे हजर झाले, आणि नाटकाला बरेच प्रेक्षक असले, तरी मला मात्र वाईट वाटलं ते बर्‍याच लोकांनी स्वतःच्या चुकीमुळे हे नाटक मिस केलं.

'काळ आला होता पण' हे राहूल जोशी यानी लिहिलेलं (हा तिसरा आणि शेवटचा मायबोलीकर या स्पर्धेतला) आणि सौ. मधुवंती नेने यांनी दिग्दर्शित केलेलं. साध्याभोळ्या माणसाच्या घरी एक भुरटा चोर यमदूत म्हणून येतो आणि ती घरची माणसं, त्यांचे शेजारी यांची समज गैरसमज यातून काय काय गोंधळ निर्माण होतो अशी या एकांकिकेची कथा होती. यमदूत, मिसेस राऊत, नवरा संदीप, बायको यांची कामं खरोखरच मस्त झाली. विनोदी नाटक, चांगले कलाकार आणि चांगली कथा यात ही एकांकिका फारच छान रंगली. दुसर्‍या दिवसाची सुरूवात चांगली झाली. पात्रपरिचय आधीच सांगितल्यामुळे मी लगेच जाऊन राहुलला भेटुनही आलो.

यानंतर 'रिक्षावाला' नावाची एक एकांकिका होती. 'सायको' असावं, कारण एक माणूस नेहमी रिक्षावाल्यांवर भडकलेला असतो, आणि हळू हळू तो वेडा होत जातो, इतका की बायको वर त्यांची नजर पडू नये म्हणून तो अगदी दुसरं टोक गाठतो अशी काहीशी कथा. एकंदरीत 'लाऊड' आणि नुसतंच 'लाऊड' असं वाटलं. रिक्षावाल्यांवर ( आणि तेही पुण्यातल्या) आपणा सर्वांचाच राग असला, तरी ती कथा मला समजली नाही आणि पटलीही नाही.

'सदू आणि दादू' चा प्रयोग केला, टोरंटो च्या लोकांनी. पु. लं चं नाटक असल्यामुळे अपेक्षा उंचावल्या, आणि पु. लंच्या विनोदाला हशे आणि टाळ्याही मिळाल्या पण पात्रांचा टोन, आणि टायमिंगचा बराच घोळ होता. कुडाळकर कुडाळवाला वाटत नव्हता, मंदा पण अगदी मंद वाटली. 'सॉक्रेटीस' पण 'सॉक्रेटीस' वाटला नाही, फक्त 'शांता' महाडकर शांता वाटला.

शेवटचा प्रयोग होता तो 'पावसातला पाहुणा'. रत्नाकर मतकरी यांच्या एका कथेवर बेतलेला. तीनच पात्रं, त्यात दोघा पात्रांना फारसे संवाद नाहीत, आणि तरीही अतिशय परिणामकारक आणि नाट्यमय कलाटणी. छान प्रयोग झाला.

आता रिझल्ट किंवा निकाल. तिथे मात्र Oscar झालं. सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री अनुजा जोशी (पत्रावली) आणि कल्याणी फाटक (पावसातला पाहुणा), सर्वोत्कृष्ठ अभिनेता मकरंद भावे (पत्रावली), सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक मकरंद भावे (पत्रावली), Best Ekaa.nkikaa public choice पत्रावली. Best Ekaa.nkikaa परिक्षक choice पावसातला पाहुणा.

ता. क.
१. सौ. नी माझ्याकडून दुसर्‍या दिवशीचं पूर्ण जेवण शिजवून घेतलं, तिला तशा फोटोची जरूरी नव्हती. बडे, टेबल पुसायचं काम मला चांगलं जमतं असं सगळ्यांना माझ्याकडे बघून वाटतं :-(
२. भाई संजीव कपूर दिसल्यामुळे घोटाळा झाला, ते संजीव कुमार होते.. :-)
३. बसंतीका फोटू निकाल्याच नही वाटतं निनावी?
४. आणि लिम्ब्या, निनावी दुसर्‍या दिवशी आलीच नाही तर ती काय लिहीणार?
५. यापुढे कुणी वृत्तांत विचारल्यास 'नुसताच वाचायचा आहे, की कार्यक्रमाला उपस्थीत राहणार आहात?' असा प्रश्न विचारण्यात येईल...



Limbutimbu
Tuesday, May 30, 2006 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, तुम्ही पण छान लिहिल हे! डोळ्यासमोर चित्र उभ रहात अगदी!
आणि हो, ते वाक्य नविन पॅरात लिहायला हव होत! निनावि दुसर्‍या दिवशी नवती ना! :-)
मी आता कलटी!
:-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators