Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 06, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » कथा कादंबरी » स्वीकार » Archive through February 06, 2007 « Previous Next »

Psg
Tuesday, February 06, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वीकार


कालपासून अंजली बघत होती.. तेजस शाळेचं काहीतरी घेऊन बसला होता.. काल संध्याकाळी खेळून आला तो त्याच्या खोलीतच होता.. आजही.. नक्की झालंय तरी काय म्हणून अंजली डोकावली.. तर तेजस खाली बसला होता.. workbook उघडं होतं, आणि रंगीत कागद पसरले होते.. तिची चाहूल लागली तशी त्याने तिची नजर चुकवली आणि पसारा आवरायला लागला..
"काय रे, काय करत आहेस?"
"काही नाही"
"मग हे काय आहे? शाळेचं काही आहे का?"
"च्यक"
"मी मदत करू का काही?"
"नको. बाबा करतील.."
अंजलीला थोडं हसू आलं आणि त्याच्याबद्दल खूप मायाही वाटली..
"बाबा कालही उशीरा आले आणि अजून २ दिवस असेच उशीरा येणारेत ते.."
"हो?" तेजसचा आशंकित स्वर.. हे उद्या शाळेत द्यायला हवंच होतं.." मला सांगितलं नाही त्यांनी"
"बरं, आपण त्यांना फोन करूया का? तूच विचार.. चालेल?"
विजयला फोन झाला.. त्यानेच सांगितलं तेजसला की यायला वेळ लागेल.. आता तेजसकडे पर्यायच उरला नाही.. अंजलीनी मग फ़ार प्रश्न विचारले नाहीत.

तिच्या चेहेर्‍यावर तिचे नेहेमीचे स्मित आले..
"तू मला सांगतोस का? मी मदत करते तुला या वेळी. मग next time बाबाच करतील, चालेल?"
"हं.. हा peacock आहे ना त्याचे feathers वेगवेगळ्या colors मधे चिकटवायचे आहेत.. हे color papers आहेत ना त्यानी..मला cut करता येत
नाहियेत हे papers ."
"हो? अरे हे सोप्पं आहे.. आपण करूया.. कोणते colors वापरूया?"
" blue, green aaNi pink ?"
"ए pink ? पण peacock कधी pink असतो का? आपण त्यापेक्षा violet वापरूया?"
"हं चालेल"
असं एकदा ठरल्यानंतर अंजलीनी पटापट कागद कापले आणि तेजसचा peacock एकदम colorful केला.. पूर्ण झाल्यावर तेजसलाही आवडला तो. तिच्याकडे पाहून हसला थोडा आणि नीटपणे ते पुस्तक त्याने दप्तरात ठेवले.

२ महिन्यानंतर आज प्रथमच अंजलीला एका बुरुज थोऽऽडा ढासळल्यासारखा वाटला.. पण सहाजिकच होतं ते.. तेजसला इतका वेळ लागणार होताच.. आणि आज त्याने तिला त्याचं काही करू दिलं म्हणजे उद्याही देईलच अशीही खात्री नव्हती.. आज जेवायला पुन्हा ते दोघच होते. पण काल तेजस टीव्हीसमोरच होता.. आज तिने chance घ्यायचे ठरवले.. पानं dining table वर घेऊन तिने तेजसला हाक मारली.. तोही काही न बोलता table वर बसला.. अंजलीला खूपच बरं वाटलं.. त्याच्याशी शाळेविषयीच बोलत राहिली ती मग, आणि तिच्या प्रश्नांना हो नाही करत तेजसचं चिमणीसारखं जेवण पटकन संपलं..

आवरून तिने विजयला फोन केला.. त्याला यायला अजून थोडा वेळ होता.. सहज ती तेजसच्या खोलीत गेली.. तसाच झोपला होता तो.. पांघरूण घेतलं नव्हतं, दिवा चालू होता.. तिला खूप वाईट वाटलं.. अजून त्याला थोपटून झोपवण्याची परवानगी दिली नव्हती त्यानी.. त्याच्या जवळ गेली ती.. इतका निरागस चेहरा दिसत होता त्याचा.. त्याच्या केसातून हात फ़िरवायचा मोह कष्टाने आवरून तिने त्याच्या अंगावर पांघरूण घातले.. मागे फ़िरली आणि तिची नजर समोरच असलेल्या त्या तिघांच्या फोटोवर गेली.. किती हसरा फोटो होता तो.. विजय, तेजस आणि अपर्णा.. तिनेच हा फोटो विजयला तेजसच्या खोलीत ठेवायला दिला होता.. तेजस अगदी विजयसारखा होता दिसायला.. अपर्णासारखा असता तर कसा दिसला असता? तिला imagine करता येईना.. पण तिच्या चेहेर्‍यावर पुन्हा स्मित आलं आणि ती झोपायला गेली..

अपर्णा जाऊन आता जवळजवळ ८ महिने झाले होते.. आणि ती घरात येऊन २ महिने.. अपर्णा गेल्यानंतर काही महिन्यातच विजयने दुसरं लग्न केले म्हणून त्याच्या घरचे सगळे नाराज होते आणि काहीसे shock मधेही.. विजयचं आणि तिच ऑफिस एकाच कॉम्प्लेक्स मधे होतं. त्याच्या ऑफिस मधली स्वाती तिची मैत्रिण.. अपर्णाचा अचानक accidental मृत्यु झाल्याचं तिच्याकडूनच कळलं होतं तिला.. आणि मग त्या नंतर ३च महिन्यानी स्वातीनी तिला विचारलं होतं विजयशी लग्नाबद्दल्- केवळ एक proposal म्हणून.. सचिन जाऊन ५ वर्ष झाली होती.. तिचे आईवडील, भाऊ योग्य स्थळ आलं तर पहात होतेच. पण या गोष्टी थोड्या नाजूकच. त्यामुळे हळुहळूच चालू होतं सगळं.. व्यवस्थित माहिती कधी मिळत नव्हती, कधी ती व्यक्ती पसंत पडत नव्हती.. विजय बद्दल तो काही problem नव्हता.. पण त्याने ३च महिन्यात पुनर्लग्नाचा विचार करावा याबद्दल आधी आश्चर्य आणि शंका दोन्ही वाटलं तिला.. पण स्वातीनी तिला assure केलं की विजय इतका विचारी आणि चांगला आहे की नक्कीच त्यामागे काही कारण असेल.. तो पुनर्लग्न करायला तयार आहे.. तू सर्वच बाबतीत त्याला सूट आहेस.. एकदा भेट तरी.. बरं कॉम्प्लेक्स एकच असल्यामुळे भेटणही शक्य होतं कधीही.. एकदा भेटून पाहू म्हणून तिने होकार दिला.. स्वाती विजयशीही बोलली होती..

त्याप्रमाणे ते भेटले..विजयचा चेहरा पार उतरला होता आणि ते सहाजिकही होतं. त्याने लगेच क्लीयर केले की त्याला लग्न करायचे आहे ते केवळ त्याच्या मुलासाठी- तेजससाठी.. तेजस ५ वर्षाचा होता फ़क्त. अपर्णाच्या अचानक मृत्युचा परिणाम सर्वात जास्त त्या छोट्या जीवावर झाला होता.. सकाळी आई आहे आणि घरी परत येतो तोवर ती या जगातूनच गेलेली.. हे इतकं मोठं सत्य पचवण्याचं त्याचं वयच नव्हतं! आणि नंतर आलेले नातेवाईकांचे अनुभव- विजयची आई काही वर्षापूर्वी गेली होती, भावाच्या बायकोनी त्याला घरी घेऊन जायला नकार दिला.. त्याच्या मावश्यांकडेही काही ना काही अडचणी होत्या.. तेजसची जबाबदारी पूर्ण वेळ घ्यायला कोणी तयार नव्हतं.. विजय स्वत:च कोलमडून पडलेला.. तेजसला निरपेक्ष प्रेम देणारी माणसच नव्हती.. उत्साहानी सळसळणारा मुलगा अबोल, कुढा झाला होता.. विजयची सावली बनला होता.. त्याच्याकडे पाहून विजयच्या पोटात तुटायचे.. पुनर्लग्नाचा विचार तेव्हाच त्याच्या मनात आला होता.. पण जिथे सख्खे नातेवाईकच पाठ फ़िरवून गेले तिथे एखादी परकी बाई तेजसला आपलं मानेल? इतक्यातच स्वातीने अंजलीबद्दल सांगीतलं.

त्यांची भेट झाल्यावर, एकमेकांशी बोलल्यावर बर्‍याच शंका फ़िटल्या.. दोघांनाही परस्परांबद्दल विश्वास वाटला, कळकळ पटली. प्रश्न होता तो तेजसचाच. त्याला हे समजावून सांगणं, त्याला ते पटणं अवघड होतच.
त्यातून मावश्यांनी कान भरायचं काम केलं होतच. बरोबरची मुलं, त्यांच्या बुध्दीला झेपेल असे त्यांनी लावलेले अर्थ, आणि स्वत: तेजसचे निरनिराळे विचार.. त्याला ही 'नवी आई' अजिबात, मुळीच नको होती.. प्रचंड संशय, राग होता तिच्याबद्दल..

विजय आणि अंजलीची एकमेकांबद्दल खात्री पटल्यावर तो तिला घरी घेऊन आला होता.. तेजसला भेटायला, घर बघायला.. तेजसला कसंबसं समजावलं होतं त्याने.. पण तो खूपसा चिडलेला, खूपसा रुसलेला होता.. अंजली समजू
शकत होती त्याची अवस्था..
"तेजू, ही अंजली.."
"तू माझी नवी आई होणारेस? मला नकोय नवी आई.."
विजय चमकलाच.. त्याने सावरून घ्यायचा प्रयत्न केला.. पण अंजलीनी अडवले त्याला.. तेजसचा राग बाहेर पडू द्यायला हवा होता..
"तेजस, मी तुझी आई व्हायला नाही आले. तुझी आई तीच आहे- अपर्णा.. मी तुझी friend म्हणून आले तर चालेल ना?"
तेजसला काय बोलाव कळेचना.. ही तर आई होणार नाही म्हणते.. मग आता?
"हे बघ, तुझी आई आता नाही आपल्यात, पण तू छोटा आहेस ना अजून, मग तुझ्याकडे पाहणार कोण? बाबा आहेत, पण त्यांना इतकंसं जमत नाही ना? म्हणून मी येणार आहे.. आपण हळुहळू friends होऊ, ओके?"
हे खरं होतं- बाबा करायचे सगळं, पण त्यांना नीट यायचं नाही काही
आईसारखं.. आणि गीताकाकूंचा स्वयंपाक काहीतरीच असायचा.. पण म्हणून..
"मला खूप friends आहेत, तू नकोस मला"
"हो, पण माझ्याइतकी मोठी friend आहे का तुला? नाही ना.. सगळे कसे काकू, मावशी, ताई आहेत की नाही? मीच तुझी एकटी big friend होईन.. तू मला
अंजलीच म्हण हं?"
तेजसचे सगळे defences अंजलीनी खोडून टाकले. तेजसलाही मनातून आवडली ती थोडीथोडी.. पण फ़ार नाही, थोडीच. तसंही बाबा आणणार होतेच तिला घरात..

मग ती घरी यायला लागली आणि स्वत:ला त्या घराशी, तेजसची familiarise करायचा प्रयत्न करायला लागली.. घराचा, विजयचा अंदाज येत होता.. पण तेजस! दगडी भिंत झाला होता.. तिच्यासमोर यायचाच नाही तो, बोलायची, गप्पा मारायची वेळ दूरच.. पण विजय तिला धीर द्यायचा.. त्या दोघांनी असं ठरवलं होतं की विजयनी तिची बाजू त्याच्यासमोर घ्यायची नाही, तिच्याबद्दल तेजसशी काहीच बोलायचं नाही.. म्हणजे त्यांचे संबंध तरी नीट राहतील, आणि तेजस स्वत:च तिला evaluate करू शकेल..

विजय-अंजलीनी रजिस्टर लग्न केले. स्वाती होतीच, विजयचा भाऊ-भावजय, अंजलीचे आई-वडील, भाऊ-भावजय, त्यांची मुलंही होते. विजयची भावजय खुश होती त्यादिवशी.. तेजसची जबाबदारी तिच्यावर येणार नव्हती आता.. नंतर सगळेच बाहेर गेले जेवायला.. तेजस चेहरा पाडून आला.. आई गेलीच, पण बाबाही आता आपले राहिले नाहीत असं उगाचच वाटत होतं त्याला.. पण बाबा तर नेहेमीसारखेच वागत होते. त्या अंजलीच्या भावाच्या मुलांबरोबर खेळायची खूप इच्छा होत होती त्याला, पण आज आपला मूड नाहिये अशी स्वत:ची समजूत घालून तो खुर्चीवरून हललाच नाही.. विजयच्या बाबांना फ़ारसं पसंत नव्हत हे सगळ.. अपर्णाच्या घरचे लोक येणं शक्यच नव्हतं.. एकूण खेळीमेळीत जेवण पार पडलं.. घरी अंजलीचं सामान पाहून तेजसला पुन्हा एकदा खूप उदास वाटलं आणि खूप रडू यायला लागलं. तो एकटाच त्याच्या खोलीत बसला खूप वेळ आणि तिथेच त्याला झोप लागली. उठून बाहेर आला तर अंजली सफ़ाईनी किचनमधे वावरत होती.. विजय तिथेच काहीतरी वाचत होता.. मधूनच गप्पा मारत होते ते दोघं.. किती नॉर्मल वाटत होतं सगळं. काही महिन्यांपूर्वीसारखंच! तो विजयजवळ जाऊन बसला..
"तेजस तुला दूध देऊ?"
"हो"
"तू मला सांगतोस का की कसं आवडतं तुला दूध्- गरम की कोमट, त्यात काय घालू, बरोबर बिस्किट खाणार का.."
"बाबांना महित आहे.. ते देतील.."
"बरं त्यांना सांगूदेत.."
"अरे पण सांग ना तू.. जे विचारतीये ते.."
"का, तुम्ही देत होतात ना मला.. का आता तुम्ही माझं काहीच नाही करणार?"
"असं नाही तेजस. अंजू नवी आहे ना.. तिला आपण नको का सांगायला?"
"मी नाही सांगणार काही.. मला नकोच काही तिचं"
पुन्हा रागावून तेजस बॉल घेऊन खेळायला गेला बाहेर..
विजय आणि अंजली दोघेही हिरमुसले.

संध्याकाळी तेजस घरी आला, तेव्हा मस्त उपम्याचा वास सुटला होता घरात. त्याला खूपच भूक लागली.. आल्या आल्या तो त्याच्या खोलीत शिरला.. विजयला अंजूनी खूण केली..
"तेजस, तुला भूक लागली असेल ना? चल, हातपाय धुवून घे पटकन. मग मी तुला काहीतरी सांगणार आहे.."
तेजसचा चेहरा प्रश्नार्थक झाला, पण त्याने विजयचं ऐकलं. विजयच्या हातात त्या तिघांचा फोटो होता, बागेत काढलेला.. तो त्याने तेजसच्या टेबलवर ठेवला..
"तेजू, रोज संध्याकाळी जसं देवाला नमस्कार करतोस, तसाच आईलाही नमस्कार करायचा.. बेटा, आईलाही वाटतच ना की तेजूनी शहण्यासारखं वागावं.. बाबांवर, अंजूवर रागावू नये.."
"बाबा, सॉरी".. तेजसला रडू आलं.. विजयनी त्याला जवळ घेतलं आणि त्याचेही डोळे पाणावले.. अंजू पहात होती.. ही फोटोची कल्पना तिचीच होती.. कोणत्यातरी निमित्तानी तेजसचा सर्व राग, सर्व confusions बाहेर यावीत, तो नॉर्मल व्हावा त्यासाठीचा प्रयत्न होता तो. अपर्णाची जागा घ्यायला आली नाहिये ती हेही तेजसला समजलं असतं. त्याची insecurity दूर करणं फ़ार महत्त्वाचं होतं सध्या..थोड्या वेळानी दोघंही बाहेर आले. अंजूनी गरम गरम उपमा केला होता आणि गुलाबजाम. तेजस व्यवस्थित जेवला आणि लगेच झोपला..

अंजू वर्तमानात आली. अजूनही तेजस शक्यतो अंजूसमोर येण्याचं टाळायचाच. आला तर कामापुरतं बोलायचा.. अंजूलाही कळलं होतं ते. त्यामुळे विजयच तेजसचं सगळं करायचा.. तेजसचा अभ्यास खूप मागे पडला होता या मधल्या काळात. शाळेत जाऊन टीचर्सना भेटणं, वर्गातल्या मुलांच्या वह्या आणणं, त्या उतरवणं, तो अभ्यास त्याच्याकडून करून घेणं हे सगळं खरंतर अंजूला करायचं होतं, पण तेजस तिला अजून publicly accept करायला तयार नव्हता.. ही आपली 'नवी आई' हे सांगायची लाज वाटत होती त्याला.. पर्यायानी विजयवर फ़ारच ताण येत होता.. तेजसला समजत होतं, पण हट्टीपणा करत होता तो मुद्दाम. मग अंजूनी वेगळा मार्ग निवडला.. गीताकाकू आधी फ़क्त पोळ्या
करायच्या, मधल्या काळात त्यांनी स्वयंपाकाची जबाबदारी घेतली होती, पण पुन्हा अंजूच करायला लागली सगळं. त्यांच्याकडूनच तिला अपर्णाबद्दलही बरीच माहिती कळली, तेजसच्या खाण्यापिण्याचा आवडी कळल्या.. त्याप्रमाणे घरात नवनवीन पदार्थ घडू लागले, तेजसला घरी छान खाऊ मिळायला लागला.. त्याचा खुललेला चेहरा पाहून अंजूलाही बरं वाटायचं. हळुहळू, पण निश्चितपणे तेजस तिला स्वीकारत होता..

"तेजस, तुझे मित्र येत नाहित आपल्याकडे कधी.. बोलाव ना त्यांना खेळायला.. तुझ्याकडे किती games आहेत, मी काहीतरी खायलाही करीन.."
"वरद आणि अनिश येऊदेत? जवळच राहतात ते.. "
"अरे बोलाव ना या रविवारी मग.."
"चालेल. पण तू खायला काय करशील? बटाटेवडे येतात तुला? आणि wafers ?"
"अरे येतात की, चालेल.. आपण केलेच नाहित नाही का? ओके, डन मग.."

तेजसलाही समजत होतं.. मावशीनी सांगीतलं तशी नाहिचे ही अंजू.. आपल्याला काहिच त्रास देत नाही.. उलट सगळं करते नीट.. जेवण तर मस्तच. आणि नवे कपडे, खेळही पहिल्यासारखेच मिळतात. बागेत, बाहेर जातो आपण तेव्हा मस्त वाटतं- बाबा, आपण आणि अंजू- एक family , आधीसारखीच.. आणि ही आल्यानंतर बाबाही काही लांब वगैरे गेले नाहियेत आपल्यापासून.. नेहेमीसारखच बोलतात की आपल्याशी.. उलट थोडे बरे दिसतात. मधूनच शिट्टीवर गाणंही म्हणतात आधीसारखच.. आईची खूप आठवण येते, पण ती नाहीच येणार परत कधी.. अंजू छान आहे मग, ना? कधीकधी वाटतं की तिच्याशी खूप भांडावं, पण तिचं हसू पाहून नको वाटतं. तिचे हात खूप मऊ आहेत ना? मस्त वाटलं तिने त्या दिवशी रस्त्यावर हात धरला तेव्हा.. ती आपला
रागराग करत असती तर अशी छान वागली नसती.. आपले friends पुन्हा यायला लागलेत, आणि मावशी, काकू पण येतात मधून मधून. ते तिच्याकडचे लोक पण चांगले आहेत. आपल्याशी छान वागतात. सगळं पुन्हा आधीसारखं होतय असच वाटतय. तिला नुसतं अंजू म्हणायलाही काहीतरीच वाटतं पण..काय म्हणूया बरं तिला.....?


एक दिवस तेजस शाळेतून घरी आला.. आवरून जेवायला किचन मधे आला. अंजूचा चेहरा वेगळाच दिसत होता..
"तेजू, आज आपापलं जेवशील? सगळं आहे इथे.."
"तुला काय झालंय?"
"जरा बरं वाटत नाहिये सकाळपासून, मी झोपते थोडा वेळ, चालेल?"
रोज ती तेजससाठी थांबायची जेवायला..
"तुला नाही जेवायचं?"
"नाही, भूकच नाही, मी झोपते. तू नीट जेव हं, आणि आवरीन मी सगळं नंतर" इतकं बोलून अंजू खोलीत गेली.
संध्याकाळचे ५ वाजले तरी अंजू झोपलेलीच! आता मात्र तेजस अस्वस्थ झाला. अंजूच्या आसपास वावरण्याची, काहीतरी कामं करायची त्या आवाजांची, त्याच्याशी काहीतरी बोलायची चाहूल असायची रोज.. तिचं मधूनच गुणगुणणे, कधी फोन, टीव्हीचा आवाज.. आज काहीच नव्हतं, सगळं कसं शांत शांत. त्याला दूध प्यायचं होतं, ग्राऊंडला खेळायला जायचं होत., पण ही उठलीच नाही.. तेजस हळूच तिच्या खोलीत आला.. पांघरूण ओढून झोपली होती.. तिचा चेहरा असा काही दिसत होता की तेजसला तिला उठवावसं वाटलं नाही.. त्याने विजयला फोन केला.. विजय तासानी आला घरी..
"अंजू, अगं काय झालं तुला, उठतेस ना? काय होतंय तुला?"
"अं? किती वाजले? आईगं!"
"अगं काय होतंय तुला? ६ वाजून गेले.. दुपारपासून झोपलीच आहेस? तेजसनी फोन केला मला.. ताप आहे वाटतं खूप.. बापरे.. थांब चेक करतो.. क्रोसिन नाही का घेतलीस?"
अंजू काहीच बोलली नाही, पटकन बाथरूम मधे गेली, तिला मोठी उलटी झाली.. आता मात्र विजयही घाबरला.. त्याने तिला कॉफी केली आणि डॉक्टरकडे घेऊन गेला.. अंजूला कसलंतरी infection झालं होतं, त्याचा ताप होता.. आणि उलटीमुळे अशक्तपणा आला होता खूप.. काळजीचं काही कारण नव्हतं, औषध घेऊन आणि पूर्ण विश्रांतीनंतर बरी झाली असती ती.. विजयला हुश्श झालं. घरी येताना तो इडली सांबार घेऊन आला, भात लावला.. अंजूला त्याने जेवायला घातलं आणि गोळ्या देऊन झोपवलं.. एका वर्षात त्याच्या जीवनात किती मोठे बदल झाले होते.. अपर्णाचा तो धक्कादायक मृत्यू, पुनर्लग्न म्हणजे जुगारच होता, पण अंजू तर अक्षरश: Godsent होती.. तेजसची सर्व प्रकारे काळजी घेतली तिनी, एका शब्दाने कधी तक्रार केली नाही, त्याला, आपल्याला, कसं सहजी आपलं म्हणलं.. हिला काही झालं असतं तर....... विजयला ती कल्पनाही सहन होईना.. या सगळ्यात तेजसकडे त्याचं लक्षच गेलं नव्हतं.. तो ग्राऊंडला जाऊन आला आणि घरी एकटाच थांबला होता त्यांची वाट बघत..

तेजस अंजू झोपली होती त्याच खोलीत एका कोपर्‍यात बसला होता तिच्याकडे बघत.. डोळ्यात पाणी..
"तेजू?"
"बाबा.. काय झालंय तिला?"
"अरे ताप आलाय.. डॉक्टर म्हणले की विश्रांती घेतली की बरी होईल.."
"नक्की ना?"
"हो रे, अगदी नक्की"
"म्हणजे ती मरून नाही ना जाणार आता आईसारखी?" तेजस विजयला मिठी मारून रडायला लागला.. आसपास सतत वावरणारी अंजू अशी गलितगात्र पाहिलीच नव्हती त्यानी.. एक प्रचंड insecurity आली त्याला.. आईसारखीच त्याला अंजूची खूपच सवय झाली होती.. ती त्याला सोडून गेली असती तर..
"अरे, नाही बाळ.. हे बघ, माझ्याकडे बघ.. रडू नकोस. नाही, काही होणार नाहिये तिला हं."
"हो बाबा, मी देवाला नमस्कार करताना म्हणलो आहे की अंजूमम्मी मला खूप आवडते, मला, बाबांना हविये ती.. तिलाही तुझ्याकडे बोलावू नकोस आईसारखं.."

अंजूमम्मी!! अंजूला चक्क मम्मी म्हणत होता तेजस.. finally त्याच्या मनातली सगळी किल्मिषं दूर झाली होती, त्यानी तिचा स्वीकार केला असल्याचं indication होतं ते..
"असं काही होणार नाही तेजू.. आपण दोघं मिळून अंजूमम्मीची काळजी घेऊ हं.. मग कशी खडखडीत बरी होईल ती बघ!"
"हो बाबा..बाबा मी शहाण्या मुलासारखा वागीन, त्रास देणार नाही, पण तिला काही नको व्हायला.."
"नाही बेटा.. इतका शहाणा मुलगा आमचा असल्यावर तिला कसं काही होईल?"
दोघांच्याही चेहर्‍यावर एक समाधानी स्मित होतं..
... आणि ग्लानीत असलेल्या अंजूच्याही!!


Swa_26
Tuesday, February 06, 2007 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त कथा, पुनम. short & sweet छान वाटली.
विजय, अंजली आणि तेजस तिघांचीही characters एकदम जिवंत होऊन येतात समोर. weldone ....


Princess
Tuesday, February 06, 2007 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह... काय हृदयस्पर्शी लिहिलय.
too good


Nandini2911
Tuesday, February 06, 2007 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूपच मस्त आणि भावस्पर्शी.... खरंच सगळं चित्र कसं डोळ्यासमोर उभं राहिलं...

Raadhika
Tuesday, February 06, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप छान आहे... very much realistic

Sia
Tuesday, February 06, 2007 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

very touching डोळ्यात पाणी आल ....

D_ani
Tuesday, February 06, 2007 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

True, very touching.
i like your stories, Psg.


Mrinmayee
Tuesday, February 06, 2007 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम, 'स्विकार' मनापासून आवडली. कथेची मांडणी, भाषा सगळंच सहज, सुंदर आहे. नेमक्या शब्दात आणि मनाला भिडणारी!!!

Chinnu
Tuesday, February 06, 2007 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम, खुप खुप खुप छान!

Ashwini
Tuesday, February 06, 2007 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, सुरेख लिहीलं आहेस ग. खरच डोळ्यात पाणी आलं. तुझं लेखन हळूहळू परिपक्व होत चाललय.

Nalini
Tuesday, February 06, 2007 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम, खुपच छान कथा. तू हाताळते ते सगळे विषय खुपच जिव्हाळ्याचे वाटतात, अगदी मनाला भिडणारे.
तुझ्या कथांचे वैशिष्ठ्य म्हणजे, त्या सलग वाचायला मिळतात.


Dineshvs
Tuesday, February 06, 2007 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम, छान आहे कथा.
( सलग कथा लिहायची सक्तीच करायला हवी आता. ) अलिकडे गुरु सिनेमातहि असेच छान नाते, मोजक्या प्रसंगातुन चितारले होते.



Marathi_manoos
Tuesday, February 06, 2007 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Poonam, very touching story

Kedarjoshi
Tuesday, February 06, 2007 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जियो पुनम. मस्त लिहिली आहेस कथा.

(ता.क. ओकारी येत असे वाचल्यावर मला कथा दुसर्या भागाकडे जाते आहे असे वाटले. पण तसे झाले नाही. तिथून पुढे खरच टचींग)


Sunidhee
Tuesday, February 06, 2007 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप छान लिहिलेयस गं...

Chandya
Tuesday, February 06, 2007 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, मस्तच साकारली आहेस कथा. सगळी कथा, संवाद, प्रसंग आटोपशीर, ओघवत्या शैलीत आलंय.

Priyab
Tuesday, February 06, 2007 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम खूप छान लिहिलि आहेस कथा आणि लगेच सम्पवलि त्यामुळे अजुनच चांगले :-)

Runi
Tuesday, February 06, 2007 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा एकदम भावली, short and sweet.
-रुनि


Abcd
Tuesday, February 06, 2007 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच ज़ाली आहे.सगळी पात्र एकदम डोळ्यासमोर उभी राहतात.

Itsme
Tuesday, February 06, 2007 - 11:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम, छान आहे कथा ...




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators