Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 04, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » काव्यधारा » कविता » Archive through February 04, 2007 « Previous Next »

Jayavi
Saturday, February 03, 2007 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कळले कधीच नाही

माझा कुणा म्हणू मी
कळले कधीच नाही
का जाहले तुझी मी
कळले कधीच नाही

माझाच वाटला तू
कित्येकदा तसा तू
होतास दूर का तू
कित्येकदा परंतु

सर्वस्व मानिले मी
सखया मनी तुला रे
गेलास सहज कैसा
तोडून पाश सारे

रमते अजून मी रे
स्वप्नात त्या दिसांच्या
जगते अजून मी रे
प्रीतीत का जुन्या त्या

मज रीत या जगाची
कळली कधीच नाही
माझा कुणा म्हणू मी
कळले कधीच नाही

जयश्री



Shyamli
Saturday, February 03, 2007 - 12:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा धन्यवाद,नाही ऐकल हे गाण पण शोधुन ऐकेन नक्की

माणिक खुप छान उतरलीये ही कविता,
लीहीत रहा,शुभेच्छा

आईग, जयु

जयु मला ह्याला चाल सुचलीये चक्क.
पाठ्वते तुला


Manas6
Saturday, February 03, 2007 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


उरले हतबल शरीर .... फरफटणार्‍या सावल्या
वेदना तर कळपाने दंश करायला धावल्या
..वा माणिक, बहोत खुब!!!


Manas6
Saturday, February 03, 2007 - 10:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा जयश्री, प्रत्येक शब्द मनाच्या गाभर्‍यातून आलेला आहे हे तुझी कविता वाचताना जाणवते.. अतिशय अकृत्रिम!

Pkarandikar50
Sunday, February 04, 2007 - 12:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राम राम मण्डळी. फारा दिवसांनी भेटतोय. आणि मुख्य म्हणजे तोण्ड उघडतोय. मध्यन्तरी आपल्या बिनिच्या फलन्दाजांचा जसे की वैभव, सारन्ग ई.- सेहवाग झाला होता. धावाच निघत नव्हत्या त्यांच्या. अधून मधून काही चमकदार फटके पण नन्तर प्रदीर्घ वाट पहायला लावण.काही नवोदितांच्या ज्या काही कविता येत होत्या, त्या अनुल्लेखनीय वाटत होत्या. टिप्पणी करावस वाटाव अस फारस काही येतच नव्हत. काय लिहिणार? दुसर कारण म्हणजे भरकटलेल्या चर्चा, हेत्वारोप, खुलासे, प्रतिखुलासे ई.ई. खर सांगतो, रागावू नका मण्डळी, वीट आला होता अगदी. अलीकडे वैभवची वृन्दावन आणि संघमित्राची गाव वाचल्यावर जरा हायस वाटल. असच जरा कसदार काहीतरी देत चला ना मित्रांनो!
बापू


Manas6
Sunday, February 04, 2007 - 12:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंद्र-तारे खूप झाले...!

चंद्र-तारे खूप झाले;
आता 'कोसळलेल्या उल्कांवर' लिही!
पाने-फुले नेहमीचीच;
आता 'उन्मळलेल्या मुळांवर' लिही!

प्रेमभंग नित्याचा;
आता 'रोजच्या' विनयभंगावर लिही!
तुलसी-महात्म्य पुरे ;
आता 'बाटवलेल्या गंगांवर' लिही!

हिरवा मळा छानच;
आता काटेरी कुंपणावर लिही!
भाटगिरी सोडून अता
- राजाच्या माजोरेपणावर लिही!

माझे, मी , खूप आता,
आतल्या 'कमी'पणावर लिही!
आणि सिरीयल्सचा 'आत्मा' असलेल्या,
छद्मीपणावर लिही!

जीवघेणे कटाक्ष बस;
-रोजच्या 'जीव देण्यावर' लिही!
अन हुंडा घे‌उनही 'सावित्रीचा',
'जीव घेण्यावर' लिही!

'कर्माचे ओझे' जाणतो;
-अता पुस्तकांच्या ओझ्यावर लिही!
आणि सौभाग्य लेणे विस्कटणाऱ्या,
कर्जाच्या बोज्यावर लिही!

हिरवा‌ईचे वर्णन 'वाचले' रे,
'न वाचणाऱ्या' वनरा‌ईवर लिही!
नि आपण स्वत:लाच लोटतोय,ना वेड्या ;
त्या भयाण खा‌ईवर लिही!

-मानस६



Mankya
Sunday, February 04, 2007 - 2:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया, श्यामली, मानस खुप खुप आभार !

जया ... साध्या शब्दात फार प्रभावी !
मानस ... भावना छानच उतरल्यात !

माणिक !


Meenu
Sunday, February 04, 2007 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानस मस्त.. आवडलं रे ..
बापु तुम्ही येऊन लिहुन गेलात आणि कविता नाही ..?
असो तुम्ही म्हणताहात त्याप्रमाणे नक्की प्रयत्न करीन ..


Dineshvs
Sunday, February 04, 2007 - 8:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयु तुझी कविता, तु बहुतेक गुणगुणतच लिहितेस.
तुझ्या कविताना, एक अंगभुत लय असते.


Sanghamitra
Sunday, February 04, 2007 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुलस्ती पुन्हा एकदा षट्कार.
तेवढं जरा वाक्यं नीट तोडायचं बघा की राव. :-)
जया लय छान आहे गं कवितेची.
मानस एकदम मान्य. आणि कविता पण छान झालीय.
चांगल्या, ठीक आणि वाईट कवितांवर (तशाच) प्रतिक्रिया देणार्‍या सगळ्यांचे आभार.
बापू तुम्ही नोंद घेतलीत छान वाटलं. येत जा वाचत जा आणि लिहीत जा.


Meenu
Sunday, February 04, 2007 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपले लाडके कवी आणि गज़लकार वैभव जोशी यांनी काल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गज़ल सादर केली. आणि गज़ल सादरीकरणाला सुरुवात करण्याचा मानही त्यांचाच होता. तसेच आज नागपुर सकाळमधे त्यांचा फोटोही पहायला मिळेल.

वैभवचे मनःपुर्वक अभिनंदन आणि अर्थात पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही ..!!!


Hems
Sunday, February 04, 2007 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा ! अभिनंदन वैभव !
क्षिप्रा सुद्धा सहभागी होणार होती ना ?
मीनू तुही होतीस का ? वृत्तांत लिहा आमच्यासाठी उपस्थितांनी.


Ashwini
Sunday, February 04, 2007 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देणार्‍या सगळ्यांचे आभार.

वैभव, अभिनंदन. आणखी काय लिहू? सगळं तर आधीच लिहून झालय...
:-)

Swaroop
Sunday, February 04, 2007 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव जोशी... तुमचे मनापासुन अभिनंदन!

आज बर्‍याच दिवसांनी लिहतोय इकडे.... पण वाचत मात्र नियमित असतो बरं का!

"प्रवास"

कधीकाळी गच्च भरुन निघालेली एसटी
जशी रस्त्यावरच्या एखाद्या
बाजारपेठी गावी पुर्ण मोकळी होते...
पण केवळ बोर्ड लावलाय म्हणुन
एखाद्या आडगावच्या भोज्ज्याला
जाउन शिवण्यासाठी
रिकामीरिकामी धावत रहाते...
तसा चाललाय माझा प्रवास

सुखदु:खाच्या वाड्या वस्त्या
पार करुन झाल्यात सार्‍या...
मानापमानाचे घाट आणि
नात्यागोत्याचे पूलही
बरेच मागे पडलेत आता...
आणि भावभावनांचे प्रवासीही
उतरुन गेलेत कधीचेच...

तरीही मुक्कामाच्या गावी
पोचण्याच्या कर्तव्यापायी
चालूच आहे वणवण
निर्जन, निर्मनुष्य रस्त्त्यांवरुन....



Dineshvs
Sunday, February 04, 2007 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिनंदन वैभव. यापुढेहि असेच भाग्य तुझ्या कविताना मिळो.

Swaatee_ambole
Sunday, February 04, 2007 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिनंदन, वैभव!!! अशीच यशाची नवनवीन क्षितिजे पादाक्रांत करत तुझा पुढील काव्यप्रवास होवो! शुभेच्छा!! :-)

Chinnu
Sunday, February 04, 2007 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव अभिनंदन! मीनु लिंक असेल तर देशिल प्लीज.
स्वरूप कविता मस्त. मानस, चंद्र तारे सहीच.


Pulasti
Sunday, February 04, 2007 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिनंदन वैभव!!
स्वरूप - "प्रवास" चटका लावून गेली.
मानस, माणिक, जया - छानच कविता आहेत!
संघमित्रा, पुढच्या वेळी वाक्यं तोडण्याबाबत काळजी घेईन. नीट वाटलं नाही तर पोस्ट करण्याआधी तुला विचारीन :-)

Swaatee_ambole
Sunday, February 04, 2007 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही खास वैभवसाठी.. :-)

कविता

आम्ही सगळेच ओळखतो की तिला..
एकदा सहज बघणाराही विसरू शकणार नाही इतकी सुंदर आहे ती..
आणि तितकीच लहरीसुद्धा..
कधी हाताला धरून, जवळ बसवून,
आपण होऊन तिचं एखादं गुपित सांगेल
तर कधी साधी ओळखसुद्धा दाखवणार नाही..
पण इथल्या सगळ्यांना एक गोष्ट माहीत आहे,
तिचं ' त्याच्या'बरोबर प्रकरण आहे..
उगीच नाही ती त्याच्यासोबत असताना अशी बहरून येत..
आम्ही हाका मारून दमलो तरी एकेकदा ढुंकून न बघणारी ती
त्याच्या दाराशी कायम तिष्ठत उभी असते म्हणे!!
त्याच्या जागी दुसरं कुणी असतं ना, तर आम्ही खरंच वैतागलो असतो!!
पण जोडी अशी शोभते त्यांची!
तुम्हाला नाही वाटत? :-)


Peshawa
Sunday, February 04, 2007 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


संत भेटला मला
ज्याचा गाढा अभ्यास होता
लाळेलाही त्याच्या
अध्यात्माचा गंध होता

कसे असावे असणे?
वाकून विचारता झालो...

छंद असावा आकार असावा
पहाताच तुजला त्यानी
वहावा ! उद्गार ओकावा...
ते तुझे डुलणे लयीत असावे
रंग रुपाने तुझ्या
नियमांचे दिव्य वस्त्र ओढावे
वत्सा तु तु नसावे
तु कुणाच्या व्याखेत ओतलेले मेण असावे
हे असे असेच असणे असावे...

संत भेटला मला
अस्ण्याचा अर्थ ज्याचा
माझ्या इतकाच निरर्थक होता
गळणार्या अध्यात्माला त्याचा
कसल्याशा भुकेचा वास होता
















 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators