Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 05, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » पौष » काव्यधारा » मराठी गझल » Archive through January 05, 2007 « Previous Next »

Shyamli
Friday, December 29, 2006 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साती,
आत्ताच तिकडे वाचली ही गझल,
बर झालं ईकडेही टाकली ते
खुप खुप सुरेख भाव घेऊन आलीये

सारंग छान माहीती देतोयस तु
मला कधी जमेल का गझल लिहायला



Jayavi
Saturday, December 30, 2006 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साती......... एकदम झकास :-) मनोगतावर पण प्रतिक्रिया टाकलीये :-)

Sarang23
Monday, January 01, 2007 - 11:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साती, भाव छान...
भुजंगप्रयात हे माझं आवडतं वृत्त आहे...!
पण मतला (पहिला शेर जो गझलची जमीन स्पष्ट करतो) delete झालाय का? मला दिसत नाहीये :-(

श्यामली लिहून तर पहा... नक्की येईल!


Daad
Wednesday, January 03, 2007 - 9:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परत एक प्रयत्न... गज़लेच्या वाट्याला जाण्याचा. please चुका सांगारे (आणि गं)!

माझिया हास्यात थोडी वेदनेची झाक आहे
बंद ओठांमागुती व्याकूळलेली हाक आहे

ओठ कुंपण, ओठ बागा, श्वासही गंधाळलेले
टाळण्याची ना मुभा, हा भोगण्याचा धाक आहे

हे असे झाले कसे, तू ऐन बहराची फुलेली
छाटलेले पंख माझे, अंतरी वैशाख आहे

सांग जा, सार्‍या जगाला, 'मी तुझ्या ना लायकीचा,
घेतले हातात जे, ते भस्म नाही राख आहे'

सांग कोणाला जपू मी, तू मला विझवून जा ना
भेटणार्‍या मानवांचा कागदी पोशाख आहे

-- शलाका


Sarang23
Wednesday, January 03, 2007 - 11:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रयत्न सक्षम आहे! दाद उत्तम गझल!
गालगागा X ४ सहीच आहे

पण फक्त एक... पहिल्या दोन्ही शेरांमध्ये हाक झाक धाक आलय, पण पुढे ख ने शेवट होणारे शब्द आहेत.
मराठी व्याकरणाप्रमाणे असे यमक नक्कीच चालतात, जसे की
न आणि ण, प आणि फ, क आणि ख
ग आणि घ, ड आणि ढ, च आणि छ
ज आणि झ, त आणि थ, द आणि ध
ब आणि भ, स श ष, ल आणि ळ

पण इथे न वापरल्यास उत्तम!

लवकरच भल्याभल्यांची सुट्टी करणार आहेस तू हे नक्की!
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!


Sati
Thursday, January 04, 2007 - 1:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, बरोबर पकडलेत. माझी कविता गझलेच्या आकृतीबंधात बसत नाही आहे. तरीच मला काहीतरी कमतरता जाणवत होती पण कळत नव्हतं की नेमकं काय कमी आहे. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!

माझ्या कवितेला जमीन नव्हतीच ती हवेतच तरंगत होती.:-):-) म्हणून तिची रवानगी गझलविभागातून कविता विभागात झाल्यास उत्तम!

मी कविता करताना रदीफ,काफिये, जमीन अलामत काहीच विचार न करता सरळ मनात येईल ते लिहीत जाते त्यामुळे असे होत असेल कदाचित. पण नंतर द्विपदींची आणि शब्दांची जुळवाजुळव करणं फारच बेगडी वाटतं. ते आपसूक झालं तर ठिक नाही तर तिला कविता म्हटलं पाहिजे गझल नाही एवढं मात्र नक्की.


Prasad_shir
Thursday, January 04, 2007 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा इथे तर छान मैफील सजली आहे!

'पहिले प्रयत्न' जे आहेत ते सगळेच उत्तम! दाद, मिनु, देवदत्त आणि साती फक्त पहिल्या दुसर्‍या प्रयत्नावरच थांबू नका ही तुम्हाला विनंती!

वैभव निर्वाळा सुरेख.... सगळेच शेर आवडले...

सारंग भेट छान आहे...


Prasad_shir
Thursday, January 04, 2007 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला सांगतो भगवंता...

तुला सांगतो भगवंता हे असे वागणे असू नये
तुला चेहरा माझा दिसतो, मला तुझा का दिसू नये!

वस्त्र नागडे तेजाचे घे, वा दुलई अंधाराची
तेज-तमाच्या सीमेवरती जिवास उसवत बसू नये!

कशास मानत जावे आपण हुकूम कोण्या दुसर्‍याचे?
डावामधली पाने आपण पुन्हा पुन्हा का पिसू नये?

या विश्वाच्या हास्यमहाली आरसेच बेढब सारे
एकदुज्यांच्या प्रतिबिंबांना उगाच कोणी हसू नये!

रोजप्रमाणे रस्त्यावरती गाठ प्राक्तनाशी पडली
गोड बोलणे ऐकुन त्याचे आजतरी मी फसू नये...

अवचित येता जाग दिसावी रात अनावर पुनवेची
अशा पहाटे दुलई ओढुन प्राणसखीने रुसू नये!

जरी काळजी तुला फुलांची अंतत: बाजार खरा
लिलाव ज्याला असे नकोसा, जमीन त्याने कसू* नये!

वैर तुझे निर्मात्याशी वा वैर तुझे या कवनांशी?
वार करावा थेट उरावर, अभिव्यक्तींना डसू नये...



* 'कसू नये' या काफियासाठी वैभवचे मनापासून आभार!!



Meenu
Thursday, January 04, 2007 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं प्रसाद सहीच .. १, ४, ५ विशेष आवडले मला ..

Sarang23
Thursday, January 04, 2007 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, वाह!!!
काय अप्रतीम कल्पना आहेत एक एक! वा!!
मतला तर झकास!
पण मला प्रतिबिंब तिसरा आणि सहावा हे शेर कहर वाटले! गझल आवडली!


Vaibhav_joshi
Thursday, January 04, 2007 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद ... अप्रतिम गझल .... सगळेच शेर सुंदर आहेत मित्रा .... मज़ा आ गया !!!


शलाका ... सारंग म्हणतो ते बरोबर आहे ... लवकरच झकास गझल लिहीणार तू .. ( म्हणजे पुढचीच !!! )

साती ... सही ... कविता / गझल हे सारंग ने सांगितलं आहेच पण जे काही आहे ते चांगलं आहे ... आवडलं ...


Psg
Thursday, January 04, 2007 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह प्रसाद.. मस्त गझल..

Ganesh_kulkarni
Thursday, January 04, 2007 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


प्रसाद

तुला सांगतो भगवंता...

तुला सांगतो भगवंता हे असे वागणे असू नये
तुला चेहरा माझा दिसतो, मला तुझा का दिसू नये!

वा किती अर्थ आहे ह्यां ओळीत!

ख़ुप,ख़ुप आवडली ग़ज़ल!



Lopamudraa
Thursday, January 04, 2007 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या विश्वाच्या हास्यमहाली आरसेच बेढब सारे
एकदुज्यांच्या प्रतिबिंबांना उगाच कोणी हसू नये!>>>>.वैर तुझे निर्मात्याशी वा वैर तुझे या कवनांशी?
वार करावा थेट उरावर, अभिव्यक्तींना डसू नये...

कुठल कुठल वाक्य घेउ सगळिच गझल अप्रतीम आहे..
प्रसाद, तुझ्या सगळ्या गझल नेहमी खुप छान असतात..


Shyamli
Thursday, January 04, 2007 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद,
महान आहात तुम्ही लोक,
प्रत्येक शेर सुरेखच, शब्द नाहीत बाबा आमच्याकडे कौतुक करायला

बयाच दिवसांनी टाकलीस पण गझल "एवढी गॅप नका घेत जाऊ रे दोन गझल or कवितांमधे"

वैभव,सारंग,स्वाती सगळ्यांनाच आहे बर का हे


Devdattag
Thursday, January 04, 2007 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद वेड आहे.. एक नंबर..:-)

Sarang23
Thursday, January 04, 2007 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, तो add केलेला शेरही छान आहे रे!

Daad
Thursday, January 04, 2007 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, thanks , खरच! हा फरक माहीतच नव्हता. गज़लेचं तंत्र म्हणजे थोडसं electricity बरोबर काम केल्यासारखं काहीच गृहित धरून चालत नाही... नाहीका? बर, नुसतं तंत्र जमून चालत नाही. त्यानंतर मंत्राचा प्रदेश सुरू होतो. पण जमेल कधीतरी. तुमच्या सारखे लिहिणारे, आणि सांगणारे आहेत तेव्हा प्रयत्न करायला हवेत. (आणि तुझं ते 'भल्याभल्यांची सुट्टी..' वगैरे नको रे बाबा)
वैभव, thanks रे.
प्रसाद, अगदी सगळे सगळे शेर अप्रतिम आहेत. जी जाणवते तीच कविता(गज़ल)!! ही नुसती जाणवत नाही तर, जिवाला भिडतेय. तुम्ही वरचेवर लिहीत रहा (इथे).
-- शलाका


Neel_ved
Friday, January 05, 2007 - 12:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, अप्रतिम....
श्यामली म्हणते त्याप्रमाणे इतकी गॅप घेउ नका...


Kmayuresh2002
Friday, January 05, 2007 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद,अप्रतिम गझल आहे रे.. मजा आ गया




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators