Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 29, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » पौष » काव्यधारा » मराठी गझल » Archive through December 29, 2006 « Previous Next »

Vaibhav_joshi
Monday, December 25, 2006 - 12:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निर्वाळा


मना केव्हा जमावा रे तुला ताळा ?
जमाखर्चात आहे रोज घोटाळा

कितीदा स्पर्शल्यागत वाटते तुजला
कवेमध्ये कधी येशील आभाळा ?

न चुकता रोज मातीचा सडा पडतो
तरीही रंग मातीचा कसा काळा ?

वळीवाला मला भिजवायचे होते
कशाला पापण्यांनी घातला आळा ?

तिथे सीमेवरी आलासुध्दा मृत्यू
तुम्ही आपापल्या सीमाच सांभाळा

वठूनी जाहली संवत्सरे आता
वड्यावर कावळ्यांची का भरे शाळा ?

जगाला सांगतो की मीच मी आहे
कुणीही देत का नाहीत निर्वाळा ?


Shyamli
Monday, December 25, 2006 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच आहे नेहमीप्रमाणे....
पण मला काहीतरी वेगळी वाटतीये
कळत नाही, काय करणार

काही वेगळा प्रकार आहे का हा?
वृत्त वेगळं, अस काही?????


Sarang23
Tuesday, December 26, 2006 - 1:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, मतला झकास!!!

श्यामली, वृत्त prefect !
लगागागा लगागागा लगागागा... वैभव, लयीत म्हणून पाहिलं... एकदम सही आहे वृत्त!
पण मला एक दोन ठिकाणी तडजोड करावी लागली...

कवेमध्ये: इथे मी म दिर्घ पण उच्चारू शकतो आणि लघू पण... पण तसं कुठे करायचं याचे काही नियम असावेत असे वाटते...
इथे मध्ये मधले म लघु ठेवून उच्चार बरोबर वाटतो, पण तुझ्या वृत्तपुर्तीसाठी तो दिर्घ उच्चारावा लागतो...
आलासुद्धा: प्रथम तू तो जोडशब्द घेतलास तोच खटकतोय... आणि आला सुद्धा केलस तर सु दिर्घ उच्चारावा लागतोय... मुळात सुद्धा चा सु हा दिर्घच असावा. अशी एक तडजोड मी मनोगतवर पण पाहिली होती. मला ती तिथेही पटली नव्हती. :-)
वठूनी: अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भुषण (कुसुमाग्रज)
इथे तूझे जसं खटकतं तसचं वठूनी...

पण या सगळ्या तडजोडी आहेत, यातली एकही ठामपणे चूक म्हणता येणार नाही. किमान मला तरी, कारण मला तसे नियम वाचावे लागतील. एक आठवतो तेवढा सांगतो... जर जोडाक्षरामुळे पुढच्या शब्दावर खरच दाब पडत असेल तर तो दिर्घ धरावा... जसे मृत्यु. इथे मृ वर खरोखरीच काहीही कष्ट न घेता दाब पडतो.
तसेच तुम्ही मधला तु लघु घ्यायचा की गुरु असाही प्रश्न पडू शकतो, पण पुढचा म कसा उच्चारता यावर ते अवलंबून आहे...

आणि अर्थाच्या दृष्टीने गझल अरभाट आहे! सगळे शेर मला एक वेगळाच आनंद देऊन गेले हे नक्की.
गझल वेगळी आहे!!!


Vaibhav_joshi
Tuesday, December 26, 2006 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वप्रथम टाईप करताना ज्या चुका झाल्या आहेत त्या दुरुस्त करतो.

शेर न. ३ असा हवा आहे.

न चुकता रोज रक्ताचा सडा पडतो
तरीही रंग मातीचा कसा काळा ?

तसेच

वठूनी जाहली संवत्सरे आता
वडावर कावळ्यांची का भरे शाळा

असं हवं आहे इथे चुकून वड्याचं तेल वडावर निघालं
:-)

सारंगा ,

तिथे सीमेवरी आलासुद्धा मृत्यू

मध्ये तडजोड आहे हे मान्य. ' सुध्दा " ह्या शब्दात ध्दा वर जोर आलाच पाहिजे नाहीतर ते कानाला खटकतं .. खटकलंही होतं लिहीताना .. सशक्त पर्याय नाही सुचला ..
म्हणजे
तिथे सीमेवरी आला पहा मृत्यू लिहीणं सहज शक्य होतं पण तितकी चीड , तिरस्कार त्या वाक्यात येत नाही .. पण मान्य आहे .. या पुढे नक्कीच काळजी घेईन

" कवेमध्ये ' या शब्दात " मध्ये " वर जोर यायलाच हवा .. नसेल येत तरच ती तडजोड आहे .. मी ती केलेली नाही

" वठूनी " हा शब्दप्रयोग योग्य आहे असं माझं मत आहे .. " अजूनही " च्या ऐवजी " अजूनी " लिहीतात तसंच .. त्याच्बरोबर " अजुनी " हा ही शब्द योग्य आहे कारण असा कुठलाच नियम नाही. त्याहून महत्त्वाच म्हणजे दोन्हीही शब्द कानाला " सुधा " सारखे खटकत नाहीत ( असं माझ मत आहे )

मृत्यू मधला मृ लिहीताना र्‍हस्व हवा आणि उच्चारामुळे दोन मात्रा हे तर आलंच पण त्यू लिहीतानाही दीर्घच आणि उच्चारानेही दीर्घ असायला हवा

तसेच तुम्ही मधला तु लघूच , उच्चारानेही , हवा .. ( हे ही माझं मत )

असो .. बारकाईने गझल वाचल्याबद्दल मनापासून आभारी आहे . यापुढे काय काळजी घ्यायची ते कळलं

श्यामली ... तुझ्या बर्‍याच प्रश्नांना उत्तरं मिळाली असतील असं गृहित धरतो


Sarang23
Tuesday, December 26, 2006 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे तो वड्याचा संदर्भ मी आपला श्राद्धाशी लावला होता रे... आणि तरीही अर्थ छान वाटला...

मृत्यू मधला त्यू दिर्घच हवा. बरोबर... मी वर टायपायला चुकलो.

सुद्धा साठी दुसरा सशक्त शब्द तुला नक्की सापडेल याची मला खात्री आहे...

तुम्ही माझ्या वरच्या post मध्ये तुला असं कुठे दिसलं की मी तुम्ही मधला तु दिर्घ घ्यावा अस लिहिलयं. :-)
तो लघू हवा, पण पुढचा म जर स्पष्ट म्हटला तर मग पंचाईत होते अशी एक गम्मत म्हणून मी ते उदाहरण दिलं. आणि ते मी मृत्यू च्या उदाहरणानंतर लिहिलं आहे, त्या नियमाला पुष्टी द्यायला...(बाकी तुझ्या मताशी मी सहमत)
आणि तुम्ही म्हणाल तसं हे गाणं पण आहेच की...

आता वठूनी बद्दल, आणी अजूनी बद्दल...

इथे वठुनी आणि अजुनी हे बरोबर तर इतर चूक आहेत.

कारण ऊन आणि हून हे प्रत्यय दिर्घ असतात, पण जर तो ऊन, हून मधला न दिर्घ केल तर उनी आणि हुनी असे प्रत्यय लागतात (हे माझं मत)
आणि हो, यापुढे काय काळजी घ्यायची ते कळल. या वाक्याचा रोख कळाला नाही...:-(

मध्ये मध्ये जरा गडबड आहे... आज पाहतो नक्की काय आहे ते. आणि तू पण जाणकारांना विचार...


Vaibhav_joshi
Tuesday, December 26, 2006 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वठुनी , अजुनी च स्पष्टीकरण पटलं सारंगा पण काही आधार मिळाला तर शोधू .. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे ..

यापुढे काय काळजी ...

शेर कितीही चांगला असला तरीही सुध्दा सारखी तडजोड नाही करायची. हे तुझ्यामुळे लक्षात आलं म्हणून म्हटलं तसं .. काही वेगळा अर्थ ध्वनित झाला असेल तर दिलगीर आहे.

एखादी गझल पोस्ट करा ना कुणीतरी


Meenu
Tuesday, December 26, 2006 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पावलं

निघते म्हणले तरी का रेंगाळतात पावलं ..?
तीच ओळ पुनःपुन्हा आळवतात पावलं

तुही त्याच वेळी त्याच जागी पुन्हा ..?
चोराला चोराची म्हणे कळतात पावलं

ते घर पावसानी गेलय कधीच वाहुन
सवयीनं पुन्हा तिकडेच वळतात पावलं

नवी वाट कुठली तरी वाटे चोखाळावी
मळलेली वाट चालुन मळतात पावलं

तुझ्यासवे हसतहसतच होईन पार
नसताना तु आपोआपच गळतात पावलं

प्रथमच ईथे टाकतेय काहीतरी. मात्रा वगैरेंमधे निश्चितच चुका असणार आहेत.


Deepstambh
Tuesday, December 26, 2006 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा मिनू गज़ल???

मात्रा माहित नाही पण भावना छान आहेत.. :-)


Devdattag
Tuesday, December 26, 2006 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव मस्तच आहे
मीनु दीपला अनुमोदन..:-)

माझा इथला दुसरा प्रयत्न

होय हो खोटेच बोला रडले कोणीतरी
तोष थोडा एक तुम्हा जगले कोणीतरी

सूर ऐसा बघ जोगीयाने धरला आगळा
का सतारीवर त्याला छेडले कोणीतरी

खास होता मज ऐसा भरलेला गाव तो
आज रस्त्यावर त्याला फेकले कोणीतरी

बोलतो कोण मला जन्म हलका लाभला
आज पाठीवर माझ्या टेकले कोणीतरी

काल होता रे कशाला 'देव'च भांबावला
दूर पक्षास विणीला वेधले कोणीतरी


Shyamli
Tuesday, December 26, 2006 - 8:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, बर्‍यापैकी मिळाली आहेत उत्तरं काही अर्थ नाहि कळले,
मेल टाकली आहे....


मीनु, देवा वाह....
आता माझही तेच मत
गझल कीती जमली आहे ते गुरुज बोलतील पण कविता
खरचच सुरेख आहेत


Sarang23
Tuesday, December 26, 2006 - 9:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

          भेट

जे जे मनात येई बोलून जायची ती
हळव्या मनास माझ्या तुडवून जायची ती

भेटीत द्यायला मी नेई गुलाब जेंव्हा
पैशांमध्ये मलाही मोजून जायची ती

हातास ओळखीचे गोंदून नाव घेता
लाटेपरी उसळुनी खोडून जायची ती

जी भेट होत होती ती यादगार होती
प्रत्येक श्वास माझा रोखून जायची ती

मी जायचो तरीही विसरून सर्व जेंव्हा
‘चुकले’ म्हणून माफी मागून जायची ती


सारंग


Sarang23
Tuesday, December 26, 2006 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनू, भाव खास!!!
खूप आवडल्या सगळ्याच द्विपदी!!!
खासच!!!

देवा, मला झेपली नाही रे :-(


Devdattag
Tuesday, December 26, 2006 - 10:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगा बहोत खुब रे..
मी मेलतो रे तुला अर्थ..


Vaibhav_joshi
Wednesday, December 27, 2006 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग

ही वाईमध्ये तुला सुचलेली गझल ना ? तेव्हा वेगळी होती का ? खरं सांगू ? पहिल्यांदा वेगवेगळे शेर वाचले तेव्हा काहीतरी खटकलं .. साधारण २०-२५ वेळा वाचल्यानंतर एकदा मी ती गैरमुरद्दफ़ ( एका विषयावरची .. हाच शब्द आहे ना ? ) म्हणून वाचली आणि अर्थ लागत गेले . त्यातही एखादी मुलगी इतकी कठोर हे ही पचायला जडच गेलं .. पण मग म्हटलं का नाही ? म्हणजे हे केवळ आवरण असू शकतं .. वरवर कठोर वाटणारी माणसं आत फारच मृदू असतात अशी बरीच उदाहरणं आहेत .
आणि मग उत्तरं मिळाली म्हणून मस्त वाटलं .. its different ... yeah ! its different

हातास ओळखीचे गोंदून नाव घेता
लाटेपरी उसळुनी खोडून जायची ती

ह्या शेरमधला सानी मिसरा ( खालची ओळ ) सुटसुटीत करता आला असता का ? आणि पूर्ण शेरच नाही कळला .. समजावून सांग

मीनू , देवा , सारंग व श्यामली ने म्हट्ल्याप्रमाणे भाव खरोखर छान आहेत. आणि गझल लिहीण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अभिनंदन . या बीबी ला नवीन गझलकारांची गरज आहे . फक्त आज मी त्यावर लिहू शकत नाहीये . इयरएंड असल्याने गडबड आहे ..

सारंग प्लीज इस्लाह करणार का दोन्ही गझलमध्ये ?

श्यामली निरोप मिळाला पण मेल अजून मिळायची आहे
:-)



Sarang23
Wednesday, December 27, 2006 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा, वैभव धन्यवाद...

अरे गैरमुरद्दफ म्हणजे रदीफ नसलेली.
तुला मुसलसल म्हणायच आहे...
मुसलसल आणि गैरमुसलसल
हो बरोबर... एकाच विषयावर आधारीत आहे...
आणि त्या perticular शेराचा अर्थ सरळ आहे...
हातावर नाव रेखून घेतलच तर ती वाळूतलं नाव लाटेने जसं खोडावं तसं खोडून जायची ती... (उसळणे त्यासाठीच)
हा मुळ अर्थ, पण गझल दुसरा अर्थ पण देते...
प्रत्येक शेर अधिक बहारदार करता येतोच... तुला काही सुचत असेल तर सांग की.

आणि इस्लाह मी काय करणार बाबा... सल्ला म्हण हवं तर...
पण त्यासाठी पहिले बाराखडीचा जोरदार अभ्यास हाच एकमेव पर्याय आहे... तरी वेळ झाला की नक्की टाकतोच...

देवा mail कधी येणार?


Devdattag
Wednesday, December 27, 2006 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव थँक्स
सारंग मेल करून ३ तास झालेत रे..:-)


Ganesh_kulkarni
Wednesday, December 27, 2006 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू,

ग़जल खुप छान आहे



Meenu
Wednesday, December 27, 2006 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद गणेश, दीप, सारंग, वैभव, श्यामली सगळ्यांनाच.

सारंग इस्लाहची वाट पाहु का ..? की फारच हाताबाहेर आहे परीस्थिती मात्रांच्या बाबतीत (ही शक्यता जास्त आहे माझ्या अंदाजाप्रमाणे) ..

गणेश तुमची मेल मिळाली .. धन्यवाद. मेलला री करते वेळ झाला की ..


Sarang23
Thursday, December 28, 2006 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू...
काही गोष्टी in short सांगतो...

१. गझल अवघड स्वराने संपवली तर म्हणायला गोंधळ होतो... मग इथे पावलं ऐवजी पावले घेतले तर? पावलं बोली भाषेत वाटतं आणि पावले थोडस लेखी.
२.
निघते म्हणले तरी का रेंगाळतात पावलं ..?
तीच ओळ पुनःपुन्हा आळवतात पावलं

हा तुझा पहिला शेर बघ
निघते म्हणले तरी का रेंगाळतात पावलं ..?

ललगा ललगा लगा गा गा गालगाल गालगा
११२ ११२ १२ २ २२१२१ २१२ = २६

आणि पुढची ओळ बघ
तीच ओळ पुनःपुन्हा आळवतात पावलं

गाल गाल लगालगा गाललगाल गालगा
२१ २१ १२१२ २११२१ २१२ = २४

सगळ्यात पहिले म्हणजे लय बघ दोन्ही ओळींमध्ये समान आली पाहिजे...
गाता गाता लिहीत गेलं की आपोआप बरोबर गझल येते... म्हणजे मिटर ही सगळ्यात आवश्यक बाब आहे.

तसेच ल गा क्रम समान नाही. (हा लघू गुरू क्रम जमला दोन्ही ओळीत की समजायचं की गझल जमली) म्हणजेच अक्षरगण वृत्त नाही...

आणि खालच्या मिसर्‍यात (गझलेत प्रत्येक ओळीला मिसरा म्हणतात) दोन मात्रा कमी आहेत. म्हणजे मात्रा वृत्तही नाही.

३. पण जमेची बाजू म्हणजे रदीफ काफियाची जाण चांगली आली आहे असे वाटते...

पहिल्या शेरात रेंगाळतात, आळवतात हे काफिये तर पावलं हा रदीफ आहे
म्हणजे ळ आणि व मधला अ ही अलामत आणि तात नी शेवट होणारे पुढचे शब्द हवेत इतर शेरांमध्ये.
आणि तू गझलेच्या व्याकरणानूसार ते वापरले पण आहेत, पण सगळेच ळतात नी end होतात. इथे तू पहिल्या शेरात आळवतात ऐवजी जर अ (अलामत) आणि ळतात असा शब्द वापरलास तर मग आणखीच बहारदार काफिये होतील गझलेत! तसच पहिल्या ओळीत पण केलस की झालं

उदा...

चल येते बोलून गेले तरी न वळती पावले
सोबतीस आतुरलेली तुला न कळती पावले


खरं तर मी तुझ्या शेरापेक्षा वेगळाच शेर तयार केलाय, पण तरी हा शेरच बघू आपण गझलचे तंत्र समजावण्यासाठी...

चल येते बोलुन गेले, तरी न वळती पावले

११ २२ २११ २२ १२ १ ११२ २१२ = २७

सोबतीस आतुरलेली तुला न कळती पावले

२१२१ २११२२ १२ १ ११२ २१२ = २७

२७ मात्रांची गझल (मात्रा वृत्तात) आहे.
आता लघू गुरु क्रम सुरुवातीला सोबतीस या शब्दामुळे चुकला आहे म्हणून गझल अक्षरगण वृत्तात होत नाही हाच शेर जर मी असा लिहीला

चल येते बोलुन गेले, तरी न वळती पावले
चल येतो का म्हणणारी तुला न कळती पावले


आता लघू गुरू क्रम बघ कसा वाटतोय...

लल गागा गा ललगागा लगा ल ललगा गालगा

आणि याच ठेक्यात ही गझल म्हणता येते (यालाच मीटर म्हणतात)
इथे बघ रदीफ पावले झाल्याने म्हणायला सोप्पं जातं आणि कळती, वळती असे काफिये आल्याने पुढचे काफिये clear होतात जसे जळती, हळहळती, मळती, अडखळती... आणि आणखी बरेच... या सेम काफियांमध्ये मी एक गझल टाकलीये

हा जीव असा जळलेला
पण कुणास ना कळलेला


मला वाटतय की तुझे आणि देवाचे बरेच शंका निरसन झाले असेल...



Sati
Friday, December 29, 2006 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरासे

ढगांआडल्या लाघवी चंद्रमाने
लपावे जरासे जरासे दिसावे ॥

मनीमानसी या तुझे रूप राणी
रुतावे जरासे जरासे ठसावे ॥

थरारून जावे असा स्पर्श होता
रुसावे जरासे जरासे हसावे ॥

चढे रात जैशी तसे भान दोघां
असावे जरासे जरासे नसावे ॥

सखे लाजुनी आठवावे पहाटे
उसासे जरासे जरासे विसावे॥





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators