Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 24, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » कथा कादंबरी » रेशीमधागे » Archive through December 24, 2006 « Previous Next »

Supermom
Wednesday, December 20, 2006 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खोलीच्या खिडकीतून सूर्यकिरणं डोळ्यांवर आली तशी मला जाग आली.त्रासिक चेहेर्‍यानंच मी डोळ्यांवर आडवा हात धरला.काल रात्री उशिरा झोप लागल्यानं आज जास्त वेळ झोपायचा बेत होत खरा,पण आता कसली झोप लागणार?
शेजारी झोपलेल्या नवर्‍याकडे बघून मला नेहेमीसारखंच आश्चर्य वाटलं. ऊन चेहेर्‍यावर येऊ दे,नाहीतर कानाशी ढोल वाजू दे,याला कसं काही होत नाही? मुलं लहान असतानाही रात्री कामावरून उशिरा आलेला विशाल सकाळी त्यांच्या किलबिलीनं हसतच जागा होत असे. कधी चिडचिड नाही की वैतागणं नाही. त्याच्या सुखी माणसाच्या सदर्‍याचं मला सदैव नवल वाटायचं.
ब्रश करावं म्हणून मी बाथरूमकडे वळले अन एकदम धसकून जाऊन बाहेर आले. मिता घरी आली की नाही काल रात्री?आपल्याला नेमकी काल किती गाढ झोप लागली.
मिताच्या खोलीकडे जायला जिन्याच्या दोन पायर्‍या चढले अन वरून जयचा प्रसन्न आवाज ऐकू आला,
'गुड मॉर्निंग ममा.'
सहा फ़ूट उंचीच्या,हसतमुख,राजबिंड्या लेकाकडे बघता बघता माझ्याही नकळत माझ्या चेहेर्‍यावर हास्य पसरलं.दिसायला अगदी माझ्यासारखा, पण स्वभाव मात्र वडिलांसारखा आर्जवी अन गोड.
'अरे,मिता......'
'आलीय ती ममा, रात्रीच आलीय. चल,तू ये ब्रश करून. तुझ्या आवडीचा मस्त कोको बनवतो मी.'
'किती वाजता आली रे?' मला हुश्श झालं तरी विचारलंच.
'आली लवकरच. ये तू ममा पटकन. खूप दिवसात बाहेर ब्रेकफ़ास्ट नाही केला आपण.'
बहिणीवर पांघरूण घालायचा हा त्याचा स्वभाव नेहेमीचाच. अगदी लहानपणी सुद्धा खट्याळ मिताच्या खोड्या अन तिला शिक्षेपासून वाचवायची त्याची धडपड असायचीच.
मी बाहेर आले तोवर विशालही उठला होता. बापलेकांनी मिळून टेबल एकदम मस्त सजवलं होत.मिता मात्र अजूनही वरच असावी. गरम कोकोचे घुटके घेताना मला एकदम बरं वाटायला लागलं.
'आता ठीक वाटतंय ना आई?'
ही जयची आणखी एक सवय.खूप लाडात आला की ममाची आई व्हायची.
'बरं न वाटायला काय झालं? डॉक्टर लेकानं दिलेली गोळी घेतल्यावर बरं वाटायलाच हवं' विशाल हसून म्हणाला.
जयच्या डॉक्टरकीचा उल्लेख ऐकल्यावर पुन्हा मला खुदकन हसू आलं. कोण म्हणेल माझा लेक एवढा कार्डियालॉजिस्ट आहे? अजूनही आंघोळ करून आला की लाडात येऊन ...' आई, केस दे ना पुसून.' म्हणतो.
जयच्या हसर्‍या चेहेर्‍याकडे बघताना मी अचानक गंभीर झाले.
'जय,देशमुखांकडचा फोन आला होता काल. या वीकएंडला येऊ दे का मुलीला घेऊन?'
जयचा चेहेरा मात्र तेवढाच हसरा.

'ममा, आता कुठे एम डी झालोय ग. अजून लग्नाला वेळ आहे माझ्या. अन मी अन बाबा या शनिवारी न्यूयॉर्क चा बेत ठरवतोय. खूप दिवसात गेलोच नाहीय.'
'खूप दिवसात म्हणजे तीन महिन्यात.' मी आता परत वैतागले.
'मला मुळीच जमणार नाहीय.खूप कामं आहेत घरची.तुम्ही तिघं जा. तेवढीच मिता पण खूश होईल आई बरोबर नाही म्हणून.'
'काहीतरीच काय बोलतेस प्रिया?' विशालचा आवाज दुखावलेला.


Maku
Thursday, December 21, 2006 - 1:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

supermom मस्त लिहिले आहे . लवकर पुधचे पन लिहि.

R_joshi
Thursday, December 21, 2006 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम पुढची कथाहि लवकर पोस्ट करा वाचायला आवडेल:-)

Sakhi_d
Thursday, December 21, 2006 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच supermom छान लिहीले आहे.... पुढचा भाग लवकर येवु दे.....



Supermom
Thursday, December 21, 2006 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'काहीतरीच काय बोलले मी? मी काहीही सांगितलेलं, बोललेलं तिला आवडत नाहीच. काल नुसतं विचारलं,मार्क बरोबर जातेयस का म्हणून, तर केवढा राग आला तिला? मला म्हणाली, 'आई,तू सतत पाळतीवरच असतेस. व्हाय कांट यू बी लाईक डॅडी?

'अग,पण काय झालं गेली तर? अन मी विचारलंय तिला.तिनं मला सांगितलय की तो चांगला मित्र आहे तिचा.'
'छान, म्हणजे आईला नुसतं हे सांगायला काय होत होतं तिला? सगळं तुझ्याशीच मन मोकळं करणार.मी जणू तिची सावत्र आई आहे.' संतापातिरेकानं माझ्या डोळ्यात पाणीच आलं.

'जाऊ दे ना ममा. आता ती मोठी होतेय. अन ऐक माझं, तू पण चल न्यूयॉर्कला. मी अन बाबा अगदी तुझ्या शॉपिंगलापण बरोबर येऊ. सतत तुझ्याच बरोबर राहू.मग तर झालं ना? प्लीज ममा.'

'अन हो, ड्रायव्हिंग पण तू कर तुला आवडतं तसं. मी काही सूचना करणार नाही नेहेमीसारख्या." विशालचा मिश्किल स्वर.
बरं बरं' मला न रहावून हसू फ़ुटलंच.

'तुम्ही दोघेही लोणी लावण्यात भलते हुशार आहात बाकी.'

'आता कसं छान वाटलं बघ ममा. तू हसलीस की आम्हाला कसं प्रसन्न वाटतं.'
'आम्हीच काय, सारं घरच उजळून निघतं बघ तू खुशीत असलीस की.'

त्या दोघांकडे कृतककोपानं बघत मी टेबलावरचा सरंजाम आवरू लागले.विशाल अन जय बाहेर यार्ड मधे नवीन झाडं कोणती आणायची याचा खल करायला गेले.
तेवढ्यात जिन्यावर धाड धाड पावलं वाजली.महाराणी उठलेल्या दिसतात.

चक्क नीटनेटक्या कपड्यांमधे बाईसाहेब उगवल्या.
'हाय ममा.कशी आहेस?'
'ठीक आहे मी आता.घे नाश्ता कर.'
'नको ममा. आज भूक नाहीय. अन टेनिस खेळून झाल्यावर मार्कच्या घरी जायचंय.तिथे खाणं होईलच.त्याची आई मेक्सिकन फ़ूड इतकं छान बनवते ना.'

पुन्हा मार्क. मला आता रागावर नियंत्रण ठेवणं कठीण जाऊ लागलं होतं.
'घरी किती वाजता येणार आहेस?'
'ओह नो, नॉट अगेन.'
मिता पुटपुटली ते मला ऐकू गेलंच.
'व्हॉट डू यू मीन, मिता? साध्या प्रश्नाला साधं उत्तर देता येत नाही का? का अशी मागच्या जन्मीची वैरीण असल्यासारखी वागतेस सतत?'

मी संतापाने थरथरू लागले होते.माझा चढलेला आवाज ऐकून विशाल अन जय धावतच आत आले. जयनं माझ्याभोवती हात घालून मला जवळ घेतलं.
'ममा, शांत हो बरं आधी. चल,पड तू पुन्हा. मी अन बाबा बसतो तुझ्याजवळ. मिता, गो टू युवर रूम.'
'मी तशीही बाहेरच निघालेय.सारखं ऐकायचा मलाही कंटाळा आलाय.'
'नॉट अ वर्ड मिता.' विशालनं दटावलं.
मला झोप लागेपर्यंत दोघेही माझ्याजवळ बसले होते.



Jhuluuk
Friday, December 22, 2006 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहिल्या दोन भागातच मन जिंकले आहे. आई आणि teen age मुलीची ह्रदयस्पर्शी कथा आहे असे वाटते :-)

Supermom
Friday, December 22, 2006 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर्‍याच वेळाने मला जाग आली. उठून बाहेरच्या खोलीत आले तर सारं घर शांत शांत होतं.विशाल त्याच्या खोलीत कॉम्प्युटरवर काम करत होता.जयच्या खोलीचं दार बंद होतं. मिता अजून घरी आलेली नव्हती.

स्वैपाकघरात गेले तर टेबलवर लेमन राईस अन माझ्या आवडीचं पुडिंग झाकून ठेवलेलं होतं. सगळीकडे चकाचक. डिशवॉशरचा लयबद्ध आवाज हलकेच येत होता.मला अगदी भरून आलं. बापलेकांनी मिळून माझं सारं काम उरकून टाकलं होतं.

किचनच्या खिडकीजवळ उभी राहिले. बाहेरची बाग अगदी रंगीबेरंगी गालिच्यासारखी फ़ुलली होती. ही झाडं आणायची कोणती हे विशाल अन जय ठरवीत. पण लावायची कशी हे मिता सांगत असे. लहानपणापासून तिला कलासक्त दृष्टीचं जणू वरदानच लाभलं होतं. अगदी लहान असतानाही किती बक्षिसं जिंकायची ती. चित्रकला,रंगकाम सारंच तिच्या फ़ार आवडीचं.

खिडकीजवळ उभी राहून बाहेर बघता बघता मिताचं सारं लहानपण अन गेल्या सहा महिन्यातलं तिचं वागणं याचा चित्रपटच माझ्या डोळ्यासमोरून सरकू लागला.
बाहुलीसारखी नाजूक अन गोड माझी लेक. तिच्या त्या लहानखुर्‍या बांध्याला तिचे मोठेमोठे डोळे जरा विसंगतच दिसत. सुरुवातीपासूनच अतिशय धीट अन स्वतंत्र वृत्तीची. जयपेक्षा सहा वर्षांनी लहान. अन घरातही लहान म्हणून सार्‍यांचीच लाडकी. एक काळ असा होता की मिताचं आईशिवाय पानही हलत नसे. तिला विशाल गमतीने ममाचं शेपूटच म्हणत असे.
या सहा महिन्यात मात्र ती पार बदलली होती.सतत वादावादी होत असे आमची.
वयात येणारी मुलगी म्हणजे पदरातला निखारा.' असं माझी आजी म्हणायची त्याची मला आठवण आली.

खरंच, कुठे गेले होते आमच्या दोघींमधले ते रेशीमधागे?

अन आजीच्या आठवणीबरोबर अचानक तिचं अजून एक वाक्य एखाद्या अग्निशलाकेसारखं मनात चमकून गेलं,
'एखाद्याचं काही चुकत असेल तर आधी आपल्या वर्तनात, मनातही डोकावून बघावं. कदाचित आपलंही काही चुकत असेल.........'
हा विचार मनात येताच मी कमालीची अस्वस्थ झाले.
खरंच, आपणही किती बदललोय गेल्या वर्षभरात? सततची चिडचिड अन त्रागा याशिवाय एक दिवसही जात नाही आपला.
वाढत्या वयाबरोबर अन तब्येतीच्या सततच्या तक्रारींमुळे कशी हतबल झाल्यासारखी वागत होते मी?
खरंतर जयने सार्‍या टेस्ट्स करायला लावल्या होत्या. सारंकाही नॉर्मल आलं होतं. शेवटी त्याने सांगितलंही होतं,

'ममा, या वयात हार्मोन्सच्या बदलांमुळे होतं असं. नथिंग टू वरी. '

विशालनंही कित्येकदा सांगून झालं होतं,
'तुझं मन रमवायला शीक प्रिया कुठेतरी. अग,अजून काही इतके म्हातारे नाही झालो आपण.'
अन मग त्याच्या खास आवाजात तो मोठ्याने गाणं म्हणत असे,'तू अभीतक है हसी, और मै जवान.....'

मनावरचं सावट जरा दूर होऊ लागलं, तशी मी उठले. जेवायची वेळ झाली होती.
जयला बोलावण्यासाठी त्याच्या खोलीच्या दारावर टकटक करणार,तोच त्याचा दबलेला आवाज ऐकू आला. अनाहूतपणे माझी पावलं थबकली.

'नो नो डिअर, शी विल लाईक यू. डोंट वरी.'



Supermom
Friday, December 22, 2006 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ध्यानीमनी नसताना आकाशातून विजेचा लोळ अंगावर कोसळावा तसं झालं माझं.

जय, माझा लाडका जय? नक्कीच तो कुणातरी मुलीशी बोलत होता. त्याच्या ओळखीच्या सगळ्या भारतीय मुली माझ्याही परिचयातल्या होत्या.काही अमेरिकन मैत्रिणीही घरी येत. पण भारतीय मुलींशी तो बहुधा हिन्दीतून बोलत असे. नक्कीच ही इथलीच मुलगी होती.पण कोण? मागच्या वेळी घरी आली ती लिन्डा तर नव्हे?
विचारांच्या आवर्तात मी पुन्हा गरगरू लागले होते.

नवीन लग्न होऊन मी अन विशाल अमेरिकेत आलो, अन इथल्या जीवनाशी जुळवून घेता घेता इतकी वर्षं कशी भुर्रकन उडून गेली ते लक्षातही आलं नाही. मुलांचा जन्मही इथलाच. पण दोघेही मराठी, हिंदी अगदी उत्तम बोलत. जय डॉक्टर झाला अन मिताचंही कॉलेज सुरू झालं होतं आता. जयसाठी बर्‍याच लोकांनी आडवळणानं चौकशीही सुरू केली होती. पण ते सारे आमच्या नेहेमीच्या ग्रुप मधलेच होते. त्यातली देशमुखांची मंजिरी तर मला एकदम पसंत होती.ती अन तिची आई आम्ही मैत्रिणीच होतो.

सुनेची अन जावयाची जी कल्पना माझ्या मनात होती ती अस्सल मराठमोळ्या रूपातलीच होती. इतकंच काय पण या वेळी भारतभेटीवर गेलो तेव्हा सुरेख अंजिरी रंगाचा शालू अन एक नवीन पद्धतीच्या दागिन्यांचा सेटही मी विकत आणला होता. हो,
लग्न इथेच झालं तरी सुनेची हौस मौज करायचीच होती मला.

पण आता त्या सार्‍या स्वप्नांना सुरुंग लागला होता. मिताची मार्कशी असलेली वाढती मैत्री अन आता जयचं हे गुपित.......
थकून जाऊन मी मागे वळले.
तेवढ्यात विशाल त्याच्या खोलीतून बाहेर आला. डोळ्यात साचणारं पाणी मी प्रयासाने परतवून लावलं.
'चल प्रिया.जेवूया का? ये, मी जयलाही बोलावतो.'
माझा चेहेरा बघून त्यानं विचारलंच,
'काय ग? अजूनही बरं नाही का वाटत?'
'नाही. बरं आहे आता.'
मी उसना आव आणून म्हणाले.
जेवतानाही मी गप्पगप्पच होते. जयचे नेहेमी प्रमाणे विनोद सुरू होते.
मिता दोन वाजता उगवली.
माझा मूड बघून तिनंही विशेष बोलणं वाढवलं नाही.
रात्री विशालच्या कुशीत मात्र माझा बांध फ़ुटला.
सारंकाही नेहेमीच्याच शांतपणाने ऐकून घेतलं त्याने. अन मग हळुवार पणे तो मला समजावू लागला,
' प्रिया, अजून त्याने आपल्याला काहीच सांगितलं नाहीय. अन खरं बोलायचं तर इथेच ते दोघे घडले, वाढले. त्यांच्या दृष्टीने हे सारं अगदी साहजिकच आहे राणी. शेवटी काय, आपल्याला त्यांचं सुख महत्वाचं. तू जितकं या गोष्टी सहजपणे घेशील तितकं तुझं मन आनंदी राहील. पंख फ़ुटले की पाखरं घरट्यातून उडूनच जाणार.जगाचा नियमच आहे हा.'
विशाल मला बराच वेळ समजावत होता.

त्याच्या समजावण्याने माझं मन अगदी नाही तरी थोडं शांत झालं.

सकाळी ब्रेकफ़ास्टच्या टेबलवर जयनंच विषयाला तोंड फ़ोडलं.

'ममा,बाबा, आज हॉस्पिटलहून येताना एका मैत्रिणीला घरी आणायचं म्हणतोय मी.'
नुसतीच मैत्रीण का खास मैत्रीण?' मिता चिवचिवली.

जयच्या कानाच्या पाळ्या लाल झालेल्या आम्हा दोघांच्या नजरेतून सुटल्या नाहीत.
'
'अरे, लाजतोस काय लेका मुलीसारखा? माझ्याकडे बघ, त्या काळातसुद्धा तुझ्या आईला बघून घरी आल्यावर 'लग्न करीन तर हिच्याशीच.' असं ठासून सांगितलं होतं मी.' विशालने जयची फ़िरकी घेतली.

'अरे, पण कोण,नाव काय, काही सांगशील तरी?' मला आता रहावेना.
'ममा, वी विल टॉक इन द इविनिन्ग.' मला आधीच उशीर झालाय.'
जय घाईघाईत उठलाच.
सारे आपापल्या कामावर निघून गेले अन घर पुन्हा शांत झालं.

अस्वस्थ मनाने मी बागेत बसून राहिले.



Kmayuresh2002
Friday, December 22, 2006 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम,छान चालु आहे कथा.. पुढचा भाग लवकर येऊ देत

Manishalimaye
Friday, December 22, 2006 - 10:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान वाटतंय. पुढच येऊ देत लवकरच.

R_joshi
Saturday, December 23, 2006 - 12:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम कथा चांगलीच रंगात आली आहे. पुढचे भागहि लवकर येऊ देत:-)

Nandini2911
Saturday, December 23, 2006 - 2:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदम मस्त.. वाचताना खरंच खूप मजा येतेय..

Supermom
Saturday, December 23, 2006 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बागेत बसल्याबसल्या माझं मन वारंवार भूतकाळाची उजळणी करत होतं.

इथल्या संस्कृतीत आपली पाळंमुळं रुजवताना भारताशी आपले बंधही किती घट्ट ठेवले होते आपण इतके वर्षं. दसरा दिवाळी, संक्रांत सारे सण कसे उत्साहाने साजरे करत आलो आपण. मुलांनाही तेच शिकवलं.म्हणून तर जय नि मिता दोघेही किती आवडीने दिवाळीला लवकर उठतात,अगदी उटणं सुद्धा न कुरकुरता लावून घेतात. आपले सारे भारतीय पदार्थ अतिशय आवडीने खातात.

संस्कृत श्लोक, स्तोत्रे, सारं येतं दोघांना. मुलांविषयीच्या अभिमानाने मन कसं फ़ुलून आलं.


पण लगेच दुसरं मन हळूच म्हणालं, या सगळ्याबरोबर ख्रिसमस साजरा करायला तूच शिकवलंस ना दोघांना? मुलांना आवडतं म्हणून ख्रिसमस ट्री कोण आणत होतं दर वर्षी?सांता क्लॉज़ बघायला मॉलमधे आठवणीनं नेऊन, त्याच्याबरोबर फ़ोटो कोण काढत होतं दरवर्षी? हलोवीनच्या वेळी वेगवेगळे पोशाख घालून, चॉकलेट्स गोळा करायला जाताना तू सुद्धा तितकीच उत्साही होतीस ना?
इथल्या वातावरणात वाढताना मुलं कुठे मागे पडू नयेत म्हणूनही तेवढीच धडपड केलीस ना तू? दोन्ही संस्कृतींमधलं चांगलं तुझ्या मुलांनी उचललंय असं भारतातले नातेवाईक दर वेळी म्हणतात तेव्हा तुझं मन कसं मोहरून येतं ना?

मग आज जयची पत्नी म्हणून येणारी मुलगी परदेशी आहे म्हणून एवढा का धक्का बसावा तुला?मुलांचं सुख ते आपलं सुख असं म्हणणारी तू,इतकी का अस्वस्थ होतेस? ऊठ, घरी येणार्‍या सुनेचं लेकीसारखं स्वागत करशील, तिच्याशी आपुलकीने वागशील, तर ह्या सीमारेषा केव्हाच नाहीशा होतील. अन जय अन मिता तर जीव की प्राण आहेत तुझे. मग त्यांच्या साठी काहीही करायची तयारी हवी तुझी.'

माझ्या आतल्या मनानंच माझ्याशी असा सुसंवाद साधला अन गेल्या कित्येक महिन्यात नसेल, एवढ्या चपळाईने उठले मी.

घरात येऊन,सजावटीवर एक हात फ़िरवला.
जयला आवडणार्‍या सुरळीच्या वड्या करून ठेवल्या. मिताचा आवडता केशर बेदाण्याचा शिरा करायलाही विसरले नाही मी. सारा सरंजाम नीट मांडून ठेवून मी सगळ्यांची आतुरतेने वाट बघू लागले.
सगळ्यात आधी आली ती मिता.
माझ्याकडे बघून ती दोन क्षण दारातच थबकली.
'ममा,किती दिवसांनी ही चंदेरी साडी नेसलीस तू. खूप बरं वाटतंय ग तुझ्याकडे बघून.'


मी काहीतरी हसून बोलणार तोच समोरच्या काचेच्या दारातून मला जयची गाडी येऊन थांबलेली दिसली. जय खाली उतरला अन तेवढ्यात गाडीचं दुसरं दार उघडलं.
आश्चर्याचा इतका धक्का मला मुळीच अपेक्षित नव्हता.


Supermom
Saturday, December 23, 2006 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतेज सावळ्या वर्णाची,लांबसडक केसांची वेणी घातलेली एक गोड मुलगी गाडीतून उतरली. चेहर्‍यामोहर्‍यानं ती अर्थातच भारतीय आहे हे सहज कळत होतं. अंगावरच्या जांभळ्या कांजिवरम साडीत अन मोजक्याच दागिन्यांत ती विलक्षण सुरेख दिसत होती.

माझ्याइतकाच धक्का मिताला बसलेला दिसत होता. त्याअर्थी नेहेमीसारखी ती जयला सामील नसावी.

दोघं पायर्‍या चढून वर आले अन माझ्या लक्षात आलं की इतके भावस्पर्शी डोळेही आपण कुठेच पाहिले नाहीत. अगदी आपल्या मितापेक्षाही सुरेख आहेत हिचे डोळे.

'आई, मिता, ही लावण्या. माझ्या हॉस्पिटलमधे दोन महिन्यांपूर्वीच नर्स म्हणून काम सुरू केलय हिने. laavanyaa, this is my mom and my darling little sister.'

दोन भुवयांच्या मधे,कुंकवाच्या खाली छोटासा भस्माचा ठिपका होता, त्यावरून अन नावावरून ही सुंदरी मद्रदेशीय आहे हे माझ्या लगेच लक्षात आलं.

तेवढ्यात विशालही घरी आला. एका कटाक्षातच त्याने जयला पसंतीची पावती दिली. जयने काही सांगायची गरज नव्हतीच. त्याचं एकंदर वागणं अन तिचा सलज्ज चेहराच सारंकाही सांगत होता.तिला हिन्दी मात्र मुळीच येत नव्हतं. त्यामुले जय तिच्याशी इंग्लिशमधेच बोलत होता.म्हणून माझा गैरसमज झाला होता तर.
खाणंपिणं, हास्यविनोद झाल्यावर, तिच्या आईवडिलांचा फ़ोन नंबर घेतल्यावर, ती निघाली. तोच मी तिला थांबायची खूण केली.
घरात जाऊन, मी माझं कपाट उघडलं, अन तो अंजिरी शालू कुंकू लावून तिच्या हातात ठेवला. मितानं जयकडे बघून मजेत डोळे मिचकावले.

लावण्याला सोडून आल्याबरोबर जय माझ्या गळ्यात पडला.

'ममा, कशी आहे माझी पसंती? तू रागावली तर नाहीस ना ग? म्हणून मी देशमुखांकडचं टाळत होतो.'

'अरे सोन्या, अगदी तुला साजेशीच आहे मुलगी. पण आधी का नाही सांगितलस रे?' माझा स्वर किंचित दुखावलेला जयच्या लक्षात आला होता.

'ममा, गेल्या दोन महिन्यात खूपदा तुला सांगावसं वाटलं ग, पण तू सतत इतकी रागावलेली असायचीस, इतकी अपसेट असायचीस की तुझी तब्येत बिघडायचीच खूप भीती वाटायची.'

त्याच्या डोक्यावरून हात फ़िरवत मी हसले,
'हो रे राजा, खरंच असं झालं होतं. मला काय होतंय तेच कळत नव्हतं रे मला. आता मात्र तुझ्या लग्नाच्या तयारीसाठी सज्ज व्हायला हवं मला.
खूप खरेदी करायचीय,एकदा भारतात जाऊन यायचंय.......'
मी स्वप्नात हरवून गेले. माझ्या लाडक्या जयचं लग्न...'

विशाल माझ्या परत आलेल्या मूडकडे, माझ्या सळसळत्या उत्साहाकडे अनिमिष नेत्रांनी बघत होता.

जिना चढणार्‍या मिताला मी हलकेच हाक मारली,
मिता.....'
तिनं थबकून मागे वळून पाहिलं.

'या आठवड्यात मार्कलाही घेऊन ये बेटा घरी. आम्हालाही भेटू दे तुझ्या स्पेशल मित्राला...'

एक क्षणभरच मिताच्या चेहर्‍यावर आश्चर्य दिसलं, अन पुढच्या क्षणी धावत येऊन तिनं मला घट्ट मिठी मारली.

मायलेकींच्या डोळ्यातल्या पाण्यात इतक्या दिवसांचा दुरावा पार वाहून गेला होता.

माझ्या संसाराचे रेशीमधागे पुन्हा विणल्या गेले होते.


समाप्त.


Swapna_nadkarni
Saturday, December 23, 2006 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Amazing supermom.. khup aavadali hi katha.. I love the way you write ur stories...

Marathi_manoos
Saturday, December 23, 2006 - 8:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Wow...Supermom mindblowing.....U r truly Supermom

Supermom
Saturday, December 23, 2006 - 9:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व मित्रमैत्रिणींनो,
मनापासून आभार.


Jayavi
Saturday, December 23, 2006 - 11:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Supermom....... Just too good! अगं इतकं सुरेख वर्णन केलं आहेस ना. मला तर हे सगळं खरंच घडतय असं वाटत होतं. किती ओघवतं लिहिलं आहेस गं! फ़ार छान लिहितेस तू.... तुझ्या लेखनाला खूप खूप शुभेच्छा :-)

Srk
Sunday, December 24, 2006 - 12:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम, खुप खुप आवडलं.

Athak
Sunday, December 24, 2006 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Super simply Super सुपरमॉम , एकदम आवडेश , परदेशात असतांना या धक्क्यांना सामोर जाव लागत अन सुखद असतील तर अहा ... छानच लिहीलेस




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators