Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 27, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » कथा कादंबरी » आम्हा तिघींची कथा » Archive through November 27, 2006 « Previous Next »

Asmaani
Friday, November 10, 2006 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा mam , एव्धी रंगलेली कथा अशी अर्धवट ठेवून गायब होउ नक pls !

Shraddhak
Monday, November 13, 2006 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनी रडत होती आणि मी तिच्याकडे स्तंभित होऊन पहात होते. गेले सहा महिने एकाच घरात राहूनही आत्तापर्यंत आमचा एकमेकींशी, एकमेकींच्या सुखदुःखाशी, आयुष्याशी कसलाही संबंध नव्हत. मला त्याचीच सवय झालेली. एखादे माणूस अचानक त्याचा नेहमीचा स्वभाव सोडून वागायला लागले, तर काय करावे नक्की? मला उत्तरही सुचेना. मी नुसतीच बघतेय तिच्याकडे, तेवढ्यात तिने माझ्याकडे प्रचंड अपेक्षेने बघितले, त्या क्षणी मला नक्की काय करायचे आहे याची जाणीव झाली. मी वंदनाला फोन लावला आणि आणखी चार दिवस सुट्टी हवी आहे, तब्येत खूपच खराब झाली आहे, डॉक्टरांनी आराम करायला सांगितला आहे, वगैरे कारणं सांगून चार दिवसांची सुट्टी मिळवली.

विनी तोपर्यंत बर्‍यापैकी सावरली होती. मी तिच्याशेजारी खुर्चीवर बसून राहिले. मनात अजूनही भीती.. खोलात जाऊन चौकशी करायला लागले, तर हिला पुन्हा राग यायचा एखादेवेळी. तोच ती स्वतःहून म्हणाली,
" तुम्ही एखाद्या व्यक्तीवर जिवापाड प्रेम करता, तोच तुम्हाला सोडून गेला तर कसं वाटतं याची कल्पना आहे तुला? "

मनाने प्रयत्न करून दडपलेली विवेकची आठवण दुप्पट जोराने उफाळून आली आणि माझ्या नकळत माझ्या डोळ्यांतून पाणी वाहायला लागले. लग्न आईवडिलांनी रीतसर स्थळ पाहून, पत्रिका जुळवून करून दिले असले तरी नकळत त्याच्या प्रेमात पडलेच होते की मी! ( पण त्याला ते तितकंसं महत्त्वाचं वाटत नसावं, हेही शेवटी जाणवलंच म्हणा!)

" अनू, तू रडतेयस? " विनीच्या प्रश्नाने मी भानावर आले.
" काही नाही गं... " मी घाईघाईने डोळे पुसले.

" मी पहिल्यांदा जेव्हा इथल्या कॉलेजमध्ये admission घेतली तेव्हा अतिशय अस्थिर होते मनाने. कुणाचंही बोललेलं पटायचं नाही, काय करायचं ते कळायचं नाही, विचारांचा संपूर्ण गुंता झालेला. कुणी हे आई बाबांच्या अतिलाडाचे परिणाम म्हणतील तर कुणी अजून कशाचे! बरं मी अशी विचित्र होते स्वभावाने म्हणून फारसे मित्र मैत्रिणीदेखील नाहीत. त्या काळात मला विक्रमची खूप मदत झाली. त्याने मला समजून घेतलं, वेळोवेळी मोलाचे सल्ले दिले. मला तो दोन वर्षं सीनियर. त्याच्याकडे एक चांगला मित्र म्हणून पाहतानाच कधीतरी त्याच्या प्रेमात पडले मी! त्याला ते तसं बोलून दाखवलंही. त्याचाही कल काहीसा तसाच, पण त्याला आत्ताच कुठलीही कमिटमेंट नको होती. जोवर तो माझ्यासोबत या शहरात होता, तोवर मला या मुद्द्याचं काही वाटलं नाही गं. पण आता तो उच्चशिक्षणासाठी परदेशी चाललाय आणि.... "

बोलता बोलता तिचे डोळे पुन्हा भरून आले. ह्या मुलीने कालपासून स्वतःची असली दशा ह्या अशा कारणाने करून घेतलीय? या असल्या गोष्टीचा इतका बाऊ करून वय वर्षं एकोणीसची ही मुलगी जगण्यात राम न उरल्यागत कालपासून वागतेय??? जिवापाड प्रेम???? काय हा वेडेपणा... अर्थ तरी कळतो का हिला या गोष्टीचा? हिच्या आईने लहानपणापासून थोडा कडकपणा दाखवला असता तर? आजकालची ही पिढी... क्षुल्लक कारण पुरतं ह्यांना एकमेकांच्या प्रेमात पडायला. सुंदर आहे, बसलं प्रेम.. एकदोनदा मदत केली, जडलं प्रेम. आणि मग असल्या तकलादू प्रेमाला तडे गेले की...
बापरे! विनीने सांगितलेल्या गोष्टीवरून कुठल्या कुठे जाऊन पोचले मी! तिला अविचारी, नादान, मूर्ख अशी लेबलं लावून काय मिळवलं असतं मी? हिच्या या अवस्थेच्या मुळाशी असलेलं कारण मला आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यावर हास्यास्पद, क्षुल्लक वाटतंय... पण तिच्या दृष्टीने ते तसं नाहीये. मला कुठूनतरी लांबून आईच्या आवाजातले शब्द ऐकू आले.

" एवढं सगळं विनासायास मिळूनही विवेकला सोडावंसं वाटावं ना तुला? तेही एका क्षुल्लक कारणापायी? काय गं हा अविचार, हा वेडेपणा... " ते कारण कितीही क्षुल्लक वाटलं तरी ते माझ्यालेखी तसं नव्हतं, हे आईला मी परोपरीने पटवून पाहिलं. अखेर तिला पटलं नाही ते नाहीच! आणि परिणाम काय तर, आईबाबांचं माझ्यापासून दुरावणं आणि त्यातून आलेलं हे अपरिहार्य एकटेपण.....

आज माझ्या आईची जागा विनीशी बोलताना मी घेणार होते की काय? काय मिळवलं असतं मी त्यातून?....

क्रमशः


Princess
Monday, November 13, 2006 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, अगदी मस्त लिहितेय. प्रत्येक वेळी वाचताना, आता पुढे काय याची उत्सुकता लागतेय. लवकर लवकर लिही...

Kmayuresh2002
Wednesday, November 15, 2006 - 1:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रदेवी,चला चला... बिगी बिगी कथा पुर्ण करा पाहु:-)

Srk
Wednesday, November 15, 2006 - 3:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रध्दा पुढे काय झालं? लवकर लिही.

Jhuluuk
Wednesday, November 15, 2006 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, फारच छान लिहीत आहात. सगळे posts एका दमात वाचुन काढले. आता पुढे काय होणार याची उत्सुकता लागुन राह्यली आहे...

Malavika
Monday, November 20, 2006 - 9:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा,
पुढे काय झाले? वाट बघत आहोत...


Asmaani
Tuesday, November 21, 2006 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे! लिस्टमधे तर २१ नोव्हें. चे १.४८ am ची पोस्ट दिसते आहे. मग इथे कुठे गेली ती पोस्ट?

Prajaktad
Tuesday, November 21, 2006 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा मस्त लिहतेस अगदी चित्र उभ करतेस बघ!..लिही आता पुधचा भाग!..

अस्मानी! कार्तिक संपुन मार्गशिर्ष सुरु झाला तेव्हा मगच्या महिन्यातल्या अपुर्ण कथा आता या महिन्यात आल्यात...ति वेळ मागिल पोस्ट पुढे टाकल्याची आहे..
admin बरोबर ना!


Milindaa
Tuesday, November 21, 2006 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, तो नवीन बीबी उघडण्याचा संबंध नसावा, कारण तो बीबी जसाच्या तसा इकडे आला आहे

काही पोस्ट्स उडवली गेली असू शकतील.


Shraddhak
Wednesday, November 22, 2006 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहीतरी सुचल्यासारखी मी एकदम उठले.
" चल चटकन... कपडे बदल. आपण बाहेर जाऊया कुठेतरी. " मी काय म्हणतेय ते अजिबातच न कळल्यासारखी ती भांबावून माझ्याकडे बघत राहिली.
" चल गं राणी. ऐक माझं! "
विनीने स्वतःला पूर्णतः माझ्या आज्ञेत ठेवायचं ठरवलं असावं. ती उठली आणि कपडे बदलून आली.
" मला पायी चालवत नाहीये पण! "
जणू बर्‍याच काळाने मी पुन्हा हसले असावे.
" काळजी करू नकोस. चल. सरप्राईज़. "

बाहेर येऊन आम्ही घराला कुलूप घातलं आणि आशाकाकींना मी हाक मारली. त्यांच्याऐवजी मनोहरकाका बाहेर आले.

" नमस्कार काका, काय म्हणताय? "
" मी मजेत आहे हो. तू बोल. "
" काका, तुमची मारूती मला द्याल का आत्ता थोड्या वेळासाठी? "
" घेऊन जा हो. विचारायचेय काय त्यात? आज बर्‍याच दिवसांनी गाडी नेत्येयस? काय विशेष? "
" काही नाही हो. हिला जरा डॉक्टरांकडे नेऊन आणतेय. आधीच अशक्त झालीय. उगीच रिक्षा / बससाठी रखडायला लागलं तर त्रास वाढायचा. "

काकांनी गाडीची चावी आणून दिली. त्यांच्या गॅरेजमधून मी कार बाहेर काढली आणि विनीला आत बसण्याची खूण केली. आमच्या कॉलनीचा काहीसा शांत, निर्जन रोड सोडून आम्ही हमरस्त्याला लागलो, तरी विनीच्या चेहर्‍यावर भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह होतं. मी तिच्या मांडीवर थोपटत म्हटलं,
" घाबरू नकोस, मी तुला डॉक्टरकडे वगैरे नेत नाहीये. तुला काहीही झालेलं नाहीये डॉक्टरकडे जाण्याइतकं. "
" मग आपण कुठे जातोय? "
" बघशीलच आता. फार लांब नाहीये. "
" बाय द वे... बाय द वे... तुला कार चालवता येते? इतक्या सफाईने? " नकळत मला जोरात हसू फुटलं.
" माझ्याकडे पाहून वाटत नाही नं, येत असेल म्हणून? "
" तसं नाही गं. आधी कधीच दिसली नाहीस कार चालवताना. आणि तुझ्याकडेही कार नाहीये सध्यातरी. म्हणून आश्चर्य वाटलं. "
" कार सध्यातरी नाहीये... पण... पण आधी होती. " माझ्या तोंडून कसेतरी हे शब्द बाहेर पडले आणि पुन्हा घशात विवेकच्या आठवणीने आवंढा दाटून आला. ' लायसन्स मिळवलंस की तुला मस्तपैकी डिनरला घेऊन जाईन. ' त्याचं बोलणं आठवलं, मला ड्रायव्हिंगच्या खाचाखोचा समजावून सांगणारा त्याचा तो गंभीर, ऐकत राहावा असा आवाज आठवला....

" अनू? "
" काही नाही विशेष! सांगेन पुन्हा कधीतरी! " मी झटकन डोळे पुसले. पण मनात आलंच, काय सांगणार आहे मी हिला? दोन एकमेकांना अजिबात अनुरूप नसलेल्या व्यक्तींची घातली गेलेली सांगड? की एका व्यक्तीचं त्या नात्यात घुसमटणं? की लग्नानंतर अवघ्या काही वर्षांत लोकांच्या मते एका आदर्श संसाराच्या उडालेल्या ठिकर्‍या????

टेकडी आता उजवीकडे दिसायला लागली होती. मी कार तिकडे वळवली. सगळीकडे नीरव शांतता. वरपर्यंत गाडीसाठी चांगला रस्ता होता. माथ्यावर पोचलो तेव्हा दुपारचा एक वाजला होता. टेकडीच्या माथ्यावर असलेल्या एकुलत्या एका देवळापाशी आता अजिबात गजबज नव्हती. एकप्रकारचं सुस्तावलेपण सगळीकडे पसरलेलं. रस्त्याच्या एका कडेला गाडी नीट लावून मी आणि विनी एका कट्ट्यावर जाऊन बसलो.
खाली दूरपर्यंत पसरलेली शेतं दिसत होती. मधून मधून एखादा झोपड्यांचा पुंजका... काही अंतरावर आमच्या गावच्या नदीनं घेतलेलं ऐटबाज वळण दिसत होतं. आमच्याही आसपास छान दाट झाडी होती. कट्ट्याच्या शेजारीच असलेल्या झाडाने आमच्यावर सावली धरलेली.

" किती बरं वाटतंय इथं! " विनी शांततेचा भंग करत उत्स्फूर्तपणे म्हणाली. " आणि अनू, आजपर्यंत तुझ्याशी मी खूप वाईट वागले त्याबद्दल सॉरी... "
" त्याची गरज नाही गं राणी. " मी हसून म्हटलं.
" छान वाटलं तू राणी म्हणालीस ते.. अगदी लहान बहिणीला म्हणावं तसं म्हणतेस. "

मीच तर लहान.. सगळ्यात धाकटी होते ना! मलाच नाही का म्हणायच्या ' राणी ' सगळ्या बहिणी, आणि आईसुद्धा! माझ्या मनात पुन्हा एकदा सगळं दुःख दाटून आलं.

" अनू, मला सांग. " माझ्या मनातली सगळी खळबळ ओळखल्यासारखी विनी मृदू स्वरात म्हणाली.
" तुला? राणी, लहान आहेस गं खूप! आणि आधीच दुःखी असलेल्या तुझ्यासमोर माझी कथा सांगून तुला आणखी का दुःखी करू मी? "
" मला माहीतेय गं मी लहान आहे खूप.. तरीही सांग ना, ऐकायचंय मला अनू. कालपासून मी पाहतेय, मनात उमटलेल्या विचारांना बाहेर पडू न देता आतल्या आत परतवायला पाहते आहेस तू! "
" काय सांगू ते मलाही सुचत नाहीये गं आता. एका विशिष्ट काळात इतक्या वेगाने कैक घटना घडल्या आयुष्यात की, अगदी माझ्या ताब्यात असल्यासारखं वाटणारं माझं आयुष्य पाहता पाहता बदलून गेलं. मला ओळखतासुद्धा येऊ नये, इतकं वेगळं झालं.

माझा नवरा... विवेक. मुंबईच्या एका बड्या कंपनीत उच्चपदावर काम करणारा, समाजातल्या उच्चभ्रू गटात मोडणारा, देखणा, सोफिस्टिकेटेड. त्याची गाठ बांधली गेली माझ्याशी! का? माहीत नाही. पण बांधली गेली खरी. मग सुरू झाली माझी धडपड, त्याच्या दुनियेत एकजीव होण्याची.. आणि त्याची धडपड, मला भराभर बदलायला लावण्याची.... "

मन केव्हाच भूतकाळात पोचलं होतं.
लग्नाचे सर्व सोपस्कार आटोपून आम्ही पुण्याहून मुंबईला येऊन पोचलो. आणि त्याच्या त्या आलीशान फ़्लॅटमध्ये पाय टाकताक्षणी आमच्यातली तफावत मला लख्खकन जाणवून गेली.


क्रमशः


Chinnu
Wednesday, November 22, 2006 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र, खुप कॉम्प्लिकेटेड गोष्टी पण फार सहजपणे मांडत आहेस. I think, you can easily write big Novels. gr8 talent, u definitely possess! Keep it up.

Daad
Wednesday, November 22, 2006 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, अतिशय सुंदर हातोटी. शब्दचित्र छान उभं करते आहेस. उत्कंठा वाढवण्याचं कसब... absolutely fatastic . पण तुटेपर्यंत ताणू नये बाई ;)
पुढचा भाग लवकर पोस्ट कर...
शलाका


Ramani
Thursday, November 23, 2006 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, खुपच छान गोष्ट चालु आहे. चिन्नु म्हणताहेत ते खरेच आहे.
हि गोष्ट पुर्ण करा लवकर लवकर. उत्कन्ठा शिगेला पोहोचली आहे.


Shraddhak
Thursday, November 23, 2006 - 8:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विवेकच्या उच्चभ्रू राहणीच्या खुणा तिथं ठायीठायी दिसत होत्या. उंची वस्तू, नेटकेपणे केलेली कलापूर्ण मांडणी... असली घरं आजपर्यंत मी फक्त सिनेमात वगैरे बघितली होती. हे... हे माझं घर! मनात खूप आनंद दाटून आला. आणि काहीसं दडपणही! लग्नानंतरच्या नव्या नवलाईचे दिवस होते ते! त्यामुळे आयुष्यात घडलेला मोठा बदल जाणवला नाही चटकन!
हळूहळू नेहमीचा दिनक्रम सुरू झाला. विवेकने स्वतःला पूर्णपणे कामात झोकून द्यायला पुन्हा एकदा सुरुवात केली. आठवडाभर त्याचं झपाटल्यासारखं काम करणं, शनिवार, रविवार मिळत त्यामध्ये कुठल्या ना कुठल्या पार्ट्यांना जाणं... एकीकडे मला बर्‍याच गोष्टी शिकवण्याची प्रक्रियाही चालू होतीच. मला अजूनही आठवतंय, मला ड्रायव्हिंग शिकवण्याचं त्याने ठरवलं तेव्हा, मी त्याला विचारलं होतं, ' आत्ताच काही घाई आहे का हे शिकण्याची? मला आत्ता खरंच कंटाळा आलाय. '

त्यावर त्याने माझ्याकडे काहीशा विचित्र नजरेनेच बघितलं होतं आणि कोरड्या सुरात म्हटलं होतं, ' इथे मी माझं काम, हेक्टिक रूटीन सांभाळून तुला काहीनाकाही शिकवू बघतोय आणि तुला घरबसल्या कंटाळा कसला येतोय नवीन काही शिकण्याचा? '
या उद्गारांनी खरंतर दुखावले गेले होते मी! लग्नानंतरचा सोनेरी काळ मागे पडू लागल्याची जाणीव पहिल्यांदा तेव्हा झाली म्हणायला हरकत नाही. तरी अजून त्याच्या मनाविरुद्ध जायचा धीर होत नव्हता म्हणून किंवा त्याने जे काही सांगितलं ते खरंच आहे, असं वाटल्यामुळे म्हणा, मी निमूटपणे ड्रायव्हिंग शिकू लागले.
पण या प्रसंगाने मनात आलेला तो विचार जाता जाईना. ' मला एवढं भराभर का बदलू पाहतोय हा? काय गरज आहे? मी जशी आहे तशी याला बरी वाटत नाहीये का? ' पण तेव्हा काही त्याला तसं विचारायचं धाडस माझ्याने झालं नाही.
हळूहळू त्या जीवनशैलीचा मला उबग येऊ लागला होता. कुणीतरी दुसर्‍याने आखून दिलेल्या मार्गावरूनच आपलं आयुष्य चाललंय आणि आपल्यालादेखील त्यात बदल, कितीही हवासा वाटला तरी, करता येत नाहीय; ही भावना खूप दुखवणारी असते.
तशातच त्याचं प्रमोशन झालं. त्याच्यासारख्या लायक माणसाला ते मिळणारच होतं म्हणा! त्याचे परदेश दौरेही मग सुरू झाले. कधी कधी त्याला दोन दोन, तीन तीन महिने तिकडं राहायचं असे. त्यामुळे मला त्याच्याबरोबर जावंच लागे. तोही काळ फार काही सुखावह नव्हता. माझ्या पेहरावावर, माझ्या वागण्या बोलण्यावर विवेकची बारीक नजर कायम असायची. त्याच्या आयुष्याची त्याने एक रेखीव चौकट ठरवून घेतली होती आणि त्याची बायको या नात्याने मीही ती शक्य तितक्या लौकर आपलीशी करावी, हा त्याचा हट्ट होता.
तो छोट्या ट्रिप्सना मला न घेता गेला की, मला चक्क बरं वाटायला लागलं. तेवढा काळ मला मुंबईत मन चाहेल तसं राहता यायचं. यातूनच कधीतरी विवेकची अनुपस्थितीच बरी वाटू लागली. खूप अपराधी वाटायचं तेव्हा.
आई बाबा, इतर बहिणींची भेट फारशी होत नसे. आई बाबा तर माझ्या मुंबईतल्या घरी एखाद दोन वेळेसच आले असतील. त्या वैभवाला, थाटमाटाला तेही बुजल्याचं मला जाणवलं होतं. त्यातून विवेकचा आणि त्यांचा फारसा नीट संवाद कधीही झालाच नाही. ते आले तेव्हा त्याने आपल्या रूटीनमध्ये काडीचाही बदल केला नाही. नाही म्हटलं तरी आपल्या घरी आपल्या आईवडिलांना मनमोकळेपणाने राहता आलं नाही, याची बोच कुठेतरी जाणवून गेली. विवेकच्या घरचेदेखील बरेचसे अलिप्त वृत्तीचे. त्यांचं फारसं येणंजाणं नसे. आम्हीही गेलो तर दोन दिवस वगैरेच जात असू. एकंदरीत त्यांची जीवनशैली पूर्णपणे वेगळी होती, ज्या साच्यात मला स्वतःला बसवणं अवघड जात होतं. आईला एकदोनदा मी माझ्या मनातली गोष्ट बोलून दाखवली. तेव्हा तिनं म्हटलं होतं,
" अगं, नशिबाने तुला एवढं वैभव, देखणा नवरा, अध्येमध्ये न पडणारे सासरचे लोक मिळालेयत. लग्नानंतर बदलावंच लागतं मुलीला नवर्‍याशी, सासरी जुळवून घेण्यासाठी. वाईट वाटण्यासारखं आहे काय त्यात? "
आईची फारशी चूक नव्हती. तिचे विचार वेगळ्या प्रकारे घडले गेले होते. पण माझं काय?
एक दिवस मी घरात करमेना म्हणून निरुद्देश शॉपिंग करत भटकत होते. अचानक माझी एक कॉलेजची मैत्रीण भेटली. मला पाहिल्यानंतर तिच्या चेहर्‍यावर उमटलेलं आश्चर्य, ' केवढी बदललीयेस अनू तू ' हे उद्गार, या गोष्टी; माझ्या नवर्‍याबद्दल, लाईफस्टाईलबद्दल तिने ऐकून व्यक्त केलेला आनंद या गोष्टींपेक्षा जास्त तीव्रतेनं जाणवून गेल्या. जेमतेम दीड वर्षांत इतकी अंतर्बाह्य बदलले होते मी? पूर्वीची अनू आणि आताची अनू यात काहीच साम्य नव्हतं?

या प्रसंगानंतर बरेच दिवस काहीतरी विचार करून मी विवेकला एकदा विचारलं,
" विवेक, मी नोकरी करू? " खरं तर नोकरी का करायची हेही माझ्या मनात पुरेसं स्पष्ट नव्हतं; तरीही मनात कुठेतरी नोकरी वगैरे काहीतरी केलं तर मन गुंतलेलं राहील आणि या सगळ्या नैराश्यातून आपण बाहेर पडू, असं मला वाटत होतं. त्याचा स्वर नकळत चिडका झाला.
" तुला काय कमी आहे इथे? आणि तुझी शैक्षणिक पात्रता बघितली तर तुला फुटकळ नोकरीच मिळणार कुठलीतरी. उगीच काहीतरी... "
" विवेक... "
" नाही करायची. माझ्या स्टेटसला धक्का लागेल असं का वागायला पाहतेयस तू, अनू? लोक काय म्हणतील? नवरा एवढा कमावतोय तरी बायको आपली कुठलीतरी फडतूस नोकरी करण्यात वेळ दवडतेय. "
" मग पुढे शिकू? एखादा कोर्स करू का? चांगला कोर्स केला तर नोकरीही मिळेल नं चांगली? " मी पुन्हा स्वतःचं घोडं पुढे दामटलं.
" नाही. " तो अतिशय कोरड्या सुरात आणि ठामपणे म्हणाला. " माझ्या कामानिमित्त आपण बरेच वेळा परदेशी असतो बरेच महिने. आणि तुला सोडून राहायचं असतं एकटं महिनोन् महिने तर मी लग्नच कशाला केलं असतं? "
" तुला स्टेटसचा एवढा विचार आहे आणि स्वतःच्या बायकोचा काहीच विचार नाही का रे? " माझ्या डोळ्यांत नकळत पाणी आलं.
" तुझा विचार आहे ना... म्हणूनच म्हणतोय की, आरामात रहा. उगीच आठ दहा तास स्वतःला शिणवून घ्यायचं काहीएक अडलं नाहीय. आणि तसंही तुझं शिक्षण... "

हळूहळू मला कळायला लागलं, माझी निवड ही केवळ माझ्या सौंदर्यामुळे झाली होती. त्याच्या रुपाला, ऐश्वर्याला साजेशी देखणी बायको त्याला माझ्या रुपाने मिळाली होती. पार्ट्या, गेट - टुगेदर्स, इतर कार्यक्रम यात मिरवता येण्याजोगी गोष्ट होते मी त्याच्यालेखी! राहता राहिला माझ्या व्यक्तिमत्त्वाचा प्रश्न... तर लग्नानंतर कुठल्याही मुलीला नवर्‍याकरता बदलावं लागतंच की! आणि त्याच्या मते, माझ्यासारख्या जरूरीपुरतं शिकलेल्या, कसलीही महत्त्वाकांक्षा नसलेल्या मुलीला तो करू पाहात असलेले बदल स्वागतार्ह वाटायला हवे होते.
एका मर्यादेपर्यंत ते वाटलेही तसेच! पण नंतर सहन होईनासं झालं. विवेकच्या आणि माझ्या संसाराला तडे जायला तेव्हाच सुरुवात झाली.

क्रमशः


Daad
Thursday, November 23, 2006 - 7:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, परत एकदा congrats खूप छान लिहिते आहेस...

Lajo
Thursday, November 23, 2006 - 8:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारच सुंदर लिहीतेस गं श्रद्धा.
पुढची गोष्ट लवकर लिही. फार उत्कंठा लागली आहे पुढे काय होते ते वाचण्याची....


Jhuluuk
Friday, November 24, 2006 - 2:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, कथेमध्ये छान रंग भरत आहात. या वेगाने पुढचे लिखाण चालु ठेवा.


Athak
Friday, November 24, 2006 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रध्दे छान लिहिलेस .. एका दमात वाचुन काढल अन बघतो तर अजुन क्रमश ...
TP मधे टाईम घालवला की असच ... :-)


Srk
Monday, November 27, 2006 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा खुपच छान. चिन्नुला अनुमोदन.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators