Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 25, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » ललित » thanksgiving या निमित्ताने... » Archive through November 25, 2006 « Previous Next »

Nalini
Thursday, November 23, 2006 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी Thanksgiving बद्दल ऐकुन होते पण तो साजरा कसा करतात हे पहायचा योग आजतागयात आला नव्हता. ईथे म्हणजे व्हियन्नात तो साजरा करताना कधी पाहिला नाही. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी तर कॅनडात ऑक्टोबरच्या दुसर्‍या सोमवारी साजरा होणारा thankgiving आज आमच्यकडेही साजरा होणार आहे. एक अमेरिकन मुलगा काही महिन्यापुर्वीच PhD करण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये आलाय. त्यानेच हा कार्यक्रम आयोजित केलाय, आज संध्याकाळी.
Thanksgiving कश्यासाठी? तर देवाचे, निसर्गाचे, पालकांचे, आप्तांचे, मित्र मैत्रिणींचे, ज्या गोष्टींनी आपल्याला वर्षभरात आनंद दिलाय त्यांचे आभार मानन्यासाठी.

thanksgiving च्या निमित्ताने...

आज २३ तारीख आणि उद्या २४. ह्या दोन तारखांनी माझे विश्वच बदलुन टाकलेय. गेल्या सहा महिन्यांपासुन ह्या दोन्ही तारखांना अगदी विचलित होऊन जाते. मन कशातच लागत नाही. डोळे सारखे भरुन येतात. भुतकाळात जाऊ नको म्हटल तरी मन दिवसातुन हजारदा हे दोन दिवस जगुन येतात. २३ मेला सांध्याकाळी अगदी कठोर निर्णय घेतला होता. निर्णय पोरापोरांचाच होता. मी, माझा मोठा भाऊ अनिल आणि माझी मोठी चुलत बहिण डॉ. शालिनी ह्यांचा. तसा हा निर्णय घेताना सोबत एक मामा, २ मामी, लहानी भावजय हे सगळेच होते. आम्ही घेऊ तो निर्णय त्यांना मान्य होता. संध्याकाळी ५ ते ६ च्या सुमारास एका कागदावर मी सही केली त्यानंतर अनिलभाऊने. सही करताना कोण जाणे कुठुन एवढे बळ आले होते? हात थोडा सुद्धा कापला नाही की मन डगमगले नाही. डोळ्याच्या पापण्याही ओलावल्या नाहित.
जिने नऊ महिने पोटात वाढवलं, हे जग दाखवलं तिचाच शेवट सही करुन नक्की केला होता. किती निर्दयी बनले होते मी तेव्हा. ताईला (आई म्हटले जायचे तिची ओळख करुन देताना, ही माझी आई असे सांगताना. तिला आम्ही लहानपणापासुन ताई म्हणायचो. सगळेच ताई म्हणायचे म्हणुन आम्हीही म्हणायचो.) २३ तारखेला सकाळी cardiac attack आला. सगळच सुरळीत सुरु होते. सकाळचे houseman राऊंडला येऊन गेलेले. IV सुरुच होते. मला लघवीला जायचेय म्हणुन ते तिने काढुन घेतले. जाऊन आली. मामीला सलायनच्या बाटलीकडे ईशारा करुन म्हणे सिस्टरला बोलाव ना हे सलायन लावायला. त्याच क्षणी तिला attack आलेला. शेजारीच एक डॉक्टर पेशंट होते. त्यांचा नवराही डॉक्टर. त्यांना लागलीच कळाले तसे ते म्हणाले डॉक्टरांना बोलवा ताबडतोब. डॉक्टर आले आणि तिचि रवानगी ICU मध्ये केली.
हा सगळा प्रकार घडला तेव्हा मी शालुताईकडे होते. तिथेच आम्हाला फोनवर निरोप मिळाला. हातापायातले बळच गेले. बसची वाट न बघता रिक्षा करुन हॉस्पिटल मध्ये पोहचले. जाताना माझ्या संतोषीमातेला सांगितले सगळे तुझ्या हवाली आहे. ताई तुझी निस्सिम भक्त आहे. तिचा तुझ्यावर खुप विश्वास आहे. एकतर तिला ठणठणीत बरं कर किंवा ह्या देहातुन मुक्ती दे. ताई फारच सेवा करायची देवीची. आंबट हि खायचे सोडले होते तिने. सगळेच म्हणायचे की ताई पुढच्या वेळी दर्शनाला जाताल तर आंबट सोडुनच या. तर म्हणायची की फक्त नलुताई परत येईस्तोवर धरेण आता. ती एकदा परत आली की सोडेन मी नक्की.

ICU मध्ये जाऊन तिला पाहिले. कुठलीच हालचाल नाही. स्पर्श कळत नव्हता. तिला कितीतरी हाका मारल्या. एकाही हाकेला ओ दिली नाही तिने. तिला ventilation वर ठेवले होते. प्राणवायु दिला जात होता. थोड्याच वेळात डॉकटरांनी सांगितले की तुम्ही ठरवा की काय करायचे. पेशन्ट कोमात आहे. जोवर ventilation आणि Oxygen सुरु आहे तोवरच पेशन्ट आहे. तुम्ही म्हणत असाल तर आपण आणखी आठ-एक दिवस वाट पाहु आणि जर तुम्ही म्हणालात तर ventilation काढुन तुमच्या ताब्यात देतो.
शालुताई आली. एकदा ताईला पाहुन आली. तिचे आजचे रेपोर्ट पाहिले. मला म्हणाली म्हटल तर ताई आहे आणि म्हटलं तर नाही. आपण घरी फोने करु. आपल्याला आज निर्णय घ्यावा लागेल. संध्याकाळी अनिलभाऊ आला. मामा आमच्या सोबतच होते. घरी चर्चा करुन साधारण आमचा निर्णय कळवला होता. तिघेही आत गेलो आणि डॉक्टरला सांगितले की ventilitaion काढावी हि आमची ईच्छा आहे. आम्ही पेशन्ट घरी न नेता डेडबॉडी नेऊ ईच्छितो.
....................................................................
मला अनिलभाऊचा फोन आलेला नली तु एकदा भारतात येऊन जा. ताईला भेटुन जा. जयपण म्हटला ये जाऊन. जय आजारीच होता. पायाला प्लास्टर होते त्याच्या. प्रोफेसरांनी आणि त्यांच्या बायकोने त्याची काळजी आम्ही घेऊ म्हणुन सांगितले. मग मी तिकिट शोधण्यापासुन तयारी सुरु केली. तिकिट मिळाले आणि दोने दिवसातच भारताच्या प्रवासाला निघाले. ईकडे कोणालाच माहित नव्हते कि मी येणार म्हणुन. ताईसाठी तर ते सर्वात मोठे सरप्राईज ठरणार होते. मुंबईला उतरले आणि तिथुन तशीच पुण्याला दवाखान्यात गेले. मामी खालीच पायरिशी बसलेल्या होत्या. मला पाहुन काय बोलावे तेच सुचेना त्यांना. तशीच पळत ताईकडे गेले. जरा डोळा लागला होता तिचा. मी हात पाय धुतले आणि तिच्या हातावर हात ठेवला तर तिने लगेच डोळे उघडले. काय बोलणार? दोघीही शांत होतो. बोलत होत्या त्या फक्त तिच्या डोळ्यातल्या अश्रुधारा आणि त्यांच्याशी संवाद साधत होते माझ्या तोंडावरचे उसने हासु. माझ्या डोळ्यांना आणि मनाला सक्त ताकिद दिली होती की ताईसमोर बिलकुल हळवे व्हायचे नाही. तिचे डोळे पुसले, शांत केले. मग तिच्याशी बोलायला सुरवात केली. तिची चौकशी करुन झाल्यावर माझी सगळी माहिती दिली. ईकडे काय असते, कसे असते ते सगळे सांगुन झाले.
किती खुष होती ती. तिची नलुताई आता महिनाभर तिच्या जवळ रहाणार होती. डॉक्टरला, सिस्टरला, येणार्‍या जाणार्‍या सगळ्यांना सांगायची की ही माझी मुलगी. परदेशातुन आलीय. माझ्या सामना कडे हात करुन दाखवायची. तिला स्पष्ट बोलता यायचे नाही कारण तिच्या एका बाजुचे दात काढले होते. डाव्या गालाला जखम अजुन तशीच होती. अस्पष्ट उच्चार आणि त्याला सोबत हातवारे असा तिचा सगळ्यांशी संवाद व्हायचा.
दोन्- तिन दिवस तिचे रिपोर्ट केईएम मध्ये नेण्या आणन्यात गेले. तिथे तिच्या रक्ताच्या काही चाचण्या कराव्या लागल्या. त्याचदरम्यान दिनेशदादासोबत जाऊन कुंदाकाकुंची भेट घेतली. त्यांच्याशी बोलुन जरा मना उभारी आली. ताई नक्कीच बरी होईल हा विश्वास वाढला.
गिरी, सुभाष, प्रिया, क्षिप्रा, आरती, जीएस ह्या सगळ्यांचा खुप मोठा आधार होता. जय, चंपक, दिनेशदादा फोनने सारखे संपर्कात होते.

हा आजचा दिवस, २३ मेचा आजही सगळेच सोबत होते. सोनवणे साहेब येऊन भेटुन गेले. सुंजुकाका म्हणजेच जगदिश कदम हे आजींसोबत येऊन भेटुन गेले. आजीने तर म्हटले अग अगदी योग्य निर्णय घेतलाय तुम्ही. ताईची मावशी, मावस भाऊ, बहिणी सगळे दवाखान्यात जमले होते.
मी तर सारखे जाऊन पहायचे, तिला हलवुन पहायचे. कित्ती हाका मारल्या, वाटायचं आत्ता ओ म्हणेल. गिरी, सुभाष, आरती, क्षिप्रा दहा साडेदहा पर्यंत आमच्या सोबत होते. जीएस तर अडिच्-तीन पर्यंत होता. ही काळरात्र सांपायचे नाव घेत नव्हती. कधी एकदा सकाळ होईल असे वाटायचे. सकाळपर्यंत वेड्यासारखे जाऊन पहायचो आहे का अजुन? तिने जन्माला घालताना किती यातना सहन केल्या होत्या आणि मी कृतघ्न ती गेलीय का आहे हे पहायला जात होते. रात्रिपासुन एक अँब्युलन्स उभी करुन ठेवली होती.
२४ मेला सकाळी डॉक्टरांना कल्पना दिली की आम्ही आता पेशन्ट घरी नेतोय. त्यांनी रितसर पेशन्ट आमच्या ताब्यात दिले. Oxyagen लावुन देण्याची व्यवस्था करुन दिली. आम्ही सगळेच म्हणजे मी, शालुताई, अनिलभाऊ, मामा, २ मामी, स्वती तिच्या सोबत घरी निघालो होतो. निघताना फोन करुन कल्पना दिली. मी सासु सासर्‍यांनाही कल्पना दिली की तुम्ही घरी येऊन थांबा. मला सारखे वाटायचे की इंद्रनिल घरीच आहे म्हणुन ताईला घरी जायचे असणार. सगळ्यात लहाना तो म्हणुन त्याच्यात जरासा जास्तच जीव होता तिचा. पुणे, शिरुर, सुपे, नगर मागे पडत होते. राहुरीची वेस ओलांडली. आता कितिसे अंतर राहिले अर्ध्या पाऊण तासात घरी पोहचु. विद्यापिठ नुकतेच मागे पडलेनपडले तोच तिने शेवटचा श्वास सोडला. शालुताईला वाटले हे फक्त तिला एकटिलाच कळाले पण नाही त्या शेवटच्या श्वासाच्या साक्षीदार आम्ही दोघी होतो. दोघींनी सोबतच घड्याळात पाहिले. दुपारचे २ वाजलेले. एकमेकींकडे पाहिले. डोळ्यांनीच बोललो आता घरी जाईस्तोवर गप्प रहायचे.

मामा आईच्या उशालाच बसलेला. १० मिनिटात त्याने आमच्याकडे पाहुन ओळखले की ताई गेलीय. त्याने मुक राहुनच विचारले आणि आम्ही हो म्हणुन सांगितले. त्याच्या डोळ्यातल्या पाण्याने सगळ्यांनाच कळुन चुकले. रडायचे नाही म्हणुन सगळ्यांना तंबी दिली. घरी फोन करुन कल्पना दिली. अनिलभाऊ पुढे बसलेला. तो सारखा मागे वळुन पहायचा गाडिमध्ये आईचे पोट हलताना त्याला दिसायचे आणि पुन्हा पुढे पहायचा. थोड्यावेळात त्यालाही शंका आली. पण मी म्हटले काही नाही पोहचु ना आता १० मिनिटात घरी. परंतु आमचे सारखे फोन सुरु आहेत हे पाहुन तो काय ते ओळखला.
गाडी घरासमोर उभी राहिली. इंद्रनिल ताईची वाटच पहात होता. पण त्याला काय माहित की ताई आता त्याला पहाणार नव्हती. ताईला हे असे पाहुन त्याने तर हंबरडाच फोडला. एकीकडे काकू, एकीकडे सासूबाई माझ्या गळ्यात पडल्या. मला त्यांना सगळ्यांना शांत करायचे होते. इंद्रनिल कडे, अनिलभाऊ कडे, वडिलांकडे पहायचे होते. काहिही झाले तरी मला रडुन चालणार नव्हते. आईला घरात नेऊन शालुताईला मदत केली.
तासाभरात घर, अंगण सगळ्या नातेवाईकांनी भरुन गेले. अंत्यविधी त्याच दिवशी करायचा होता. ति सगळी तयारी झाली. मी मात्र आईला डोळ्यात, मनात होता होइल तेव्हढे साठवुन घेत होते.

आई सवाष्ण गेली. किती तिचे कोडकौतुक केले. हिरवी साडी, हिरवा चुडा, कपाळभर मळवट. तोंडात पानाचा विडा. माहेरची साडी नेसली, भावांकडुन निर्‍या घालुन घेतल्या. तिचा गोरा वर्ण अगदि खुलुन आला होता. ओटीच भरायची होती तर बेलापुरहुन संतोषीमातेच्या मंदिरातल्या मावशी आल्या. त्या कधीच कुणाच्या अंत्यविधीला जात नाहीत त्यांना आईसाठी यावे लागले. काय हो नलुच्या आई आज ओटी भरायला बोलावलत ना? म्हणुन त्या आईकडे पहात रडत राहिल्या. मी होता होईल तेवढी दुर पळू पहात होते. मला तर पुढचं काहिच पहावत नव्हत. आज ती तिचे राहिलेले सगळे लाड, कोडकौतुक करुन घेत होती.
सरण रचले गेले त्यावर आईला ठवले आणि एवढावेळ रोखुन ठेवलेला माझा बांध सुटला. आता आई किमान दिसतेय यानंतर दिसणार ही नाही. तिथे असणार्‍यांना एकच समाधान होते ते म्हणजे तिची नलुताई ह्या क्षणाला तिच्या सोबत होती.
मला फार काळ रहाता येणार नसल्याने बाराव्याच दिवशी ब्राम्हणांच्या परवानगीने नाशिकला रामकुंडात अस्थी विसर्जन केले. दहा दिवस तर सारखे भेटणारे येत होते.दहाव्याच्या दिवशी कावळ्यांने पिंड शिवायला उशिर केला तेव्हा तिने मला शब्दात बांधुन घेतले की तिच्या लेकरांना आईची माया कधीच उणी पडुन देणार नाही.

देवा, माझी आई घेऊन गेलास. तिला परत माझ्या घरट्यात पाठवशील का?

मला आई राहिली नाही असे मी नाही म्हणु शकणार कारण त्याबाबतीत मी कृष्णापेक्षा नशिबवान आहे कारण कृष्णाला जन्म देणारी देवकी आणि सांभाळणारी यशोदा ह्या दोन माता होत्या. मला तिन आहेत. जन्म देणारी मिराबाई, वयाच्या तिसर्‍या वर्षापासुन सांभाळ करणारी माझी काकु, हिराबाई आणि लग्न झाल्यापासुन मायेचे प्रेम देणारी माझी सासु, रमाबाई.

आज thanksgiving च्या निमित्ताने मला सर्वांचेच आभार मानायचेत. संतोषीमातेचे, तिने आईला सगळ्या वेदानांतुन मुक्ती दिली. आईचे आणि बाबंचे, त्यांनी हे विश्व दाखवले. काका(हयात नाहित) आणि काकुचे, त्यांनी नेहमिच चांगले संस्कार घातले. सासु आणि सासरे, हे माझे हक्काचे प्रेमाचे गोदाम आहे जिथे भरभरुन प्रेम मिळते. मामा, मामींचे त्यांनी आईची खुप सेवा केली.
चंपक, दिनेशदादा, भाग्या, सानिका, सुजाता, लोपा, गिरी, आरती, सुभाष, क्षिप्रा, जीएस, प्रिया, कुंदाकाकु ह्यांनी मोलाचा आधार दिला.
शालुताई, मालुताई, शिल्पा ह्यांनी आई दवाखान्यात असताना तिची काळजी घेतली.
रागाताई, पमाताईचे ह्या नेहमीच आम्हा लहान भावंडांची काळजी घेत असतात.
बाई आणि दादा, माझे आजोळचे आजी आजोबा, ह्यांनी काय दिलय हे शब्दात सांगणे कठिणच आहे.
प्रोफेसर, त्यांची बायको आणि कोझिमा, हे नेहमीच भरभरुन प्रेम देत असतात. आम्ही भारतापासुन दुर आहोत ह्याची आठवणच कधी येऊ देत नाहित.
डॉ. राजन पटेल आणि सौ रुचिता पटेल म्हणजेच आमचे राजन अंकल आणि रुचिता आंटी, डोळे उघडावे आणि ह्यांना पहावे. आई, वडिलांच्याच रुपात समोर उभे असतात.
जयचे, तो नेहमीच माझ्या पाठीशी उभा आहे.
देवाची, निसर्गाची समस्त प्राणीमात्राची तर मी अखंड ऋणी आहे.
तुम्हा सर्वांचे आणि मायबोलिचे, माझे मन मोकळे करण्याची संधी दिलीत म्हणुन.

ह्या लिखाणात काही चुका झाल्या असल्यास सांभाळुन घ्या कारण हे सगळे लिहिपर्यंत मला स्क्रिन घुसर दिसत होते.



Mrinmayee
Thursday, November 23, 2006 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सगळे लिहिपर्यंत मला स्क्रिन घुसर दिसत होते.... नलु वाचतानाही!


Lopamudraa
Thursday, November 23, 2006 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलीनी मलाही... धुसरच दिसले.. ... !!!

Dineshvs
Thursday, November 23, 2006 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वतःला आवर्जुन माझी धाकली बहिण म्हणणार्‍या नलिनीचे, एका दिवसात ताईत रुपांतर होताना, मी प्रत्यक्ष पाहिले.
मोठी झालीस तु आता.


Prady
Thursday, November 23, 2006 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलू काय लिहू. शब्दच नाहीत ग.

Zelam
Thursday, November 23, 2006 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी काय लिहू?
डोळ्यातून पाणी काढलंस


Savani
Thursday, November 23, 2006 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलू.. .. काही लिहिताच येत नाहिये:-( कीबोर्ड वरची अक्षरं दिसत नाहीयेत.

Anupama
Thursday, November 23, 2006 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी, रडवलस मला. काळजी घे!

Badbadi
Thursday, November 23, 2006 - 10:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी, ..... काय लिहू...

Psg
Friday, November 24, 2006 - 12:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी.... .. .. ....

Manishalimaye
Friday, November 24, 2006 - 12:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनि......
नाही लिहिता येत आता काही....


Varsha11
Friday, November 24, 2006 - 1:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी........
खरच खुप छान लिहिले आहेस. शेवटी शेवटी स्क्रिन वरचे दिसतच नव्हते. डोळे भरुन आलेत.


Rupali_rahul
Friday, November 24, 2006 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलीनी..... डोळे भरुन आले हे वाचताना अगदी...

Marathi_premi
Friday, November 24, 2006 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी कसं शब्दबध्द केलस ग सगळं..... तुझ्यासाठी काही शब्दच सुचत नाहीयत

Mepunekar
Friday, November 24, 2006 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी, हे वाचताना पण डोळे भरुन आले..काही सुचत नाही पुढे लिहायला..

Athak
Friday, November 24, 2006 - 12:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी खरच शब्द सुचत नाही .... खुप धीराने तु हे शब्दबध्द केलस .

Giriraj
Friday, November 24, 2006 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिने हे जितक्या धीराने शब्दबद्ध केले त्यापेक्षा जास्त धीराने ती या सगळ्या प्रसंगाला सामोरी गेली. मला दवाखान्यात जास्त वेळ राहीले की चक्कर येतात म्हणून अगदी आवर्जून बाहेर उभे राहून बोलणारी नलीनी माझ्यापेक्षा लहान आहे हे शक्यच वाटत नाही. इतक्या सगळ्या ताणातही मझ्यासाठी म्हणून अगदि न विसरता CD घेऊन आलीच पण अगदी आईला घेऊन जायच्या आधी आठव्णीने माझ्याकडे त्या देऊनही गेली. मला आश्चर्य वाटतं,इतका धीर,इतका समंजसपणा कुठून आणतात या पोरी?

Nilyakulkarni
Friday, November 24, 2006 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी शब्दात कसे बांधलेस ग हे सारे
वाचतानाच डोळे भरलेत
बस एवढेच लिहु शकतो आता


Megha16
Friday, November 24, 2006 - 7:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी,
काय प्रतिक्रिया देवु तुझ्या लेखाला.... माझ्या कडे शब्द नाहीत.


Shyamli
Saturday, November 25, 2006 - 1:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.. .. .. .. .. .. .. .. .. ..




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators