|
Shraddhak
| |
| Monday, November 06, 2006 - 5:23 am: |
| 
|
आम्हा तिघींची कथा रोज घराचं कुलूप काढताना मनात येतं; मावळला आजचा अजून एक दिवस. आयुष्याच्या पोतडीत अजून एका दिवसाची भर पडली. बघायला जावेत तर ओंजळीत पडलेले सगळेच दिवस एकसारखेच! एक दुसर्यापासून वेगळा काढता येणार नाही. हं... तसा काढताही येईल म्हणा, काल रमा भेटली होती तिच्याशी खूप दिवसांनी गप्पा झाल्या, परवा दूधवाल्याने दुधाच्या पिशव्या दिल्याच नाहीत त्यामुळे ऑफिसमध्ये जाऊनच दिवसाचा पहिला चहा घेतला, त्याआधीचे दोन दिवस अवेळी पाऊस लागला होता, वगैरे वगैरे.... काहीशा यांत्रिकपणे मी कुलूप उघडते. पुन्हा ते नीट कडीला लावून किल्ली पर्समध्ये ठेवताना मी मागे वळून बघते. आशाकाकी अजूनही कंपाऊंडच्या भिंतीला टेकून माझ्याकडे बघत उभ्या असतात. मी उसनं हसू चेहर्यावर आणत विचारते, " काय हो काकी? थांबलातशा? बोलायचंय का काही? " बोलता बोलता पायर्या उतरून मीही भिंतीपाशी जाऊन उभी राहते. " आज लौकरशी आलीस? " " हं... जरा काम कमी होतं, आणि कंटाळाही आला... घरीच आले मग निघून... विनी येऊन गेली का यायचीय अजून? " " मघा आली होती... मी पाहिलं ना! तासभर होती घरी! गेल्येय पुन्हा कुठंतरी उंडारायला. अनू, कशाला ठेवून घेतल्येस ती ब्याद घरात? " " काकी, अहो मला हौस का आली होती? पण तिच्या आईची अन् माझ्या आईची जुनी मैत्री... तिची ही एकुलती एक मुलगी! हिचं इंजिनीयरिंग चालू आणि नेमकं तिला नवर्यासोबत परदेशी जावं लागलं. या शहरात आहे कोण दुसरं विनीला सांभाळेल असं? होस्टेलवर तिच्या आईचा विश्वास नाही, खरं तर होस्टेलपेक्षा तिचा विनीवर विश्वास नाही. आधीच अगदीच ऐकत नाही ही पोरगी तिचं, आई बाप हजारो मैल दूर गेले म्हटल्यावर हिला रानच मोकळं... " " आत्ताही काय वेगळं चाललंय? तुला तरी जुमानत्ये का ती? तू मात्र मनाची शांती आपल्या हातांनी नष्ट करून टाकल्येस! " काकू थोडा वेळ बोलून घरात गेल्या. घरामध्ये येऊन मी माझ्या खोलीत बेडवर अंग झोकून दिलं. अंगात किंचित कणकण जाणवतेय पण मला उठून औषध घ्यायचं मन होईना. मी तशीच पडून राहिले. रात्र झाली असावी. दरवाज्यापाशी खडखड ऐकू आली तेव्हा दचकून जागी झाले. " कोण आहे? " मी माहीत असून विचारलं. उत्तर आलं नाही. विनीच्या पायांतल्या फ्लोटर्सचा फटक फटक आवाज तेवढा ऐकू आला. तिने दार धाडकन बंद करून घेतलं. एकूण मूड बिघडला होता तर. काय झालं देव जाणे! असला स्वभाव बघितला नव्हता कधी... प्रियामावशीचं बोलणं आठवलं. तिचं मुळात लग्नच उशिरा झालं. आणि लग्नानंतर जवळपास साताठ वर्षांनी एकच मुलगी झाली. विनी.. बराच त्रास झाला प्रियामावशीला हिच्या जन्माच्या वेळी. जगते की मरते अशी अवस्था! नंतर मग विनीला भावंड वगैरेचा विचार सोडूनच दिला तिनं... त्यामुळे हिचे मात्र प्रचंड लाड झाले. नतीजा काय, तर डोक्यावर बसलीय विनी आता! क्रमशः
|
Shraddhak
| |
| Monday, November 06, 2006 - 5:38 am: |
| 
|
पाच एक मिनिटांत दारावर टकटक ऐकू येते. हलकेच! मी दुर्लक्ष करते. असेल काहीतरी काम! मला उठायलाही नको वाटतंय. किंचित थंडी वाजतेय. तापही आला असेल कदाचित. पुन्हा हळूच टकटक होते दारावर. मी झोपेचं सोंग घेऊन पडून राहते. विनी बहुधा आता दार उघडून पायर्यांवर जाऊन बसलीय. तिच्या सेलफोनची नाजूक रिंग मला ऐकू येते. आणि मी दचकलेच! विनी रडतेय की काय? तिचं हुंदके देणं, रडत रडत बोलणं मला अगदी स्पष्ट ऐकू येतंय. पण मला आता बाहेर जाता येणार नाही. कदाचित मला तिचं हे रडणं वगैरे कळू नये, म्हणून विनी मी नक्की झोपलेय ना? याची खात्री करून घ्यायला आली होती. आता मी गेले विचारायला तर तिला आवडणार नाही. तिला नाही आवडत तिने स्वतःहून म्हटलं नसता कुणी तिच्या आयुष्यात डोकावणं. मग तिला मदत करणं वगैरे तर फार दूरची गोष्ट... ....मागेही एकदा विनीच्या हाताला तापलेल्या इस्त्रीचा चटका बसला. पण तोंडातून शब्द नाही. मी तिच्याकडे बघितलं तर खालचा ओठ दातांखाली गच्च आवळून धरलेला आणि डोळ्यांत पाणी... " काय झालं गं? बघू... " मी धावतच तिच्यापाशी गेले. " मी बोलवलंय का तुला मदतीला? " तिचा थंड आवाज ऐकून मी चपापलेच! " अगं.... " माझं वाक्य सोडलंच मी अर्धवट! तिच्या चेहर्यावर अतिशय करारी भाव! " बरंय. " मी माघार घेत म्हणाले. " बर्नॉल हवं असलं तर त्या समोरच्या औषधांच्या कपाटात आहे. ड्रेसिंगचं सामानही आहे जरूरीपुरतं. मदत लागलीच तर सांग. " आवाजात कोरडेपणा आणत मी भराभर बोलले आणि तिथून निघून गेले. विनी हे बाकी खरंच अजब रसायन आहे. तिने एकटीने दिवसभर त्या वेदना सहन केल्या, हात जरा हलवला की आग व्हायची बहुधा, पण पठ्ठीने रडू काही फुटू दिलं नाही. ती अगदी सुरुवातीला प्रियामावशीसोबत माझ्या घरी दाखल झाली तो दिवस मला आठवला. प्रियामावशीला त्याच आठवड्यात फ्लाईट पकडायचं होतं. प्रचंड धांदल चालू होती तिची! माझ्याकडे दोघी पोहोचल्या तेव्हा प्रियामावशी प्रचंड थकली होती... तरी उत्साही दिसत होती आणि विनी फक्त बाजूला निर्विकार उभी होती. एक ना दोन, प्रियामावशीने मला, विनीला हजार सूचना दिल्या. त्या तिने त्याच निर्विकार चेहर्याने ऐकल्या. प्रियामावशी नंतर निघून गेली. गेले दोन वर्षं एकटं राहणार्या मला कुणीतरी सोबत मिळाली, म्हणून प्रचंड आनंद झालेला. मी विनीच्या रूमकडे मोर्चा वळवला. दारावर टकटक करून म्हटलं, " आत येऊ का? " आतून थंड आवाजात उत्तर आलं, " काही तातडीचं काम आहे का? " मी चरकले; पण वाटलं, कपडे बिपडे बदलत असेल. काही सामानसुमान लावत असेल. मी आवाज बदलू न देता म्हटलं, " अगं काही नाही. सहज गप्पा मारायला आले होते तुझ्याशी. तुलाही आज उद्या सुटीच आहे म्हणत होती मावशी. ती, तुझे बाबा परदेशी जाणार, आता लौकर भेटणार नाहीत... वाईट वाटत असेल नं? म्हणून म्हटलं, थोड्या गप्पा माराव्या. " या बोलण्यावर मात्र दार उघडलं गेलं. विनीच्या चेहरा तसाच भावहीन होता. " हे बघ... मला माहीत नाही, तुला आईने काय काय सांगितलंय ते! पण मला कुणीही येऊन माझ्याशी जबरदस्तीने मैत्री केलेली, नसती सहानुभूती दाखवलेली खपत नाही. दुसरी गोष्ट, माझ्या आईच्या वेडगळ हट्टापायी मी इथे राहतेय. त्यापायी मला आधीच वैताग आलाय. असो तिचं एक सोड, तुला एकदाच सांगते. माझ्याशी मैत्री करायच्या भानगडीत पडू नकोस, माझ्या आयुष्यात नाक खुपसू नकोस, मीही तसं करणार नाही. बाकी माझ्याकडून तुला कसलाही त्रास होणार नाही. " संतापाची एक तीव्र लाट माझ्या डोक्यात गेली. वाटलं, लगेच प्रियामावशीला फोन करावा आणि म्हणावं, ही मुलगी मला माझ्या घरात नको. तिरीमिरीतच मी फोनपाशी गेले तेवढ्यात फोनची रिंग वाजली. खसकन मी फोन उचलला. " हॅलो. " " अनू, प्रियामावशी बोलतेय गं. अनू, तुला एक सांगायचं होतं गं... विनी एकुलती एक असल्याने खूपच लाडावलेलीये. फटकन बोलते उलटून... अगदी मलादेखील. तुझी लहान बहीण समजून माफ करत जा तिला. तूही तिला ठेवून घेतलं नाहीस तर पोरगी होस्टेलमध्ये जाईल आणि माझ्या जिवाला तिकडे घोर गं... एवढं करशील ना आपल्या मावशीसाठी? " तिचा आवाज नकळत रडवेला झाला. आता मला बोलायला तोंडच राहिलं नव्हतं. मी होकार दर्शवून फोन ठेवून दिला. ....आत्ताही बराच वेळ झाला, विनी रडतेय. एक मन म्हणतंय की बघावं जाऊन काय झालंय ते! पण आधी घडलेल्या घटना आठवल्या की वाटतं, नकोच ते... उगाच बोलून अपमान का ओढवून घ्यावा मी? आधी काय कमी सहन केलेयत असले प्रसंग? थोड्या वेळाने दार बंद केल्याचा आवाज आला. विनीच्या रूमचंही दार बंद झालं. नंतर सगळी शांतता. झोपली असावी बहुधा! मीही डोळे मिटले. काय झालं असेल? असा विचार करता करता कधीतरी माझा डोळा लागला. क्रमशः
|
Asmaani
| |
| Monday, November 06, 2006 - 8:34 am: |
| 
|
श्रद्धा, मस्त चालू आहे. उत्सुकता वाढलिये. लवकर टाक पुढचं!
|
Shraddhak
| |
| Monday, November 06, 2006 - 8:53 am: |
| 
|
सकाळी जागी झाले ते खिडकीतून आत आलेल्या भक्क सूर्यप्रकाशामुळं. डोळे चोळत बाजूला असलेल्या अलार्म क्लॉकवर नजर टाकली तर ते साडेनऊ वाजल्याचं दाखवत होतं. अजूनही पूर्ण बरं वाटत नाहीये. शरीर अगदीच गळून गेल्यासारखं, डोकं जड, अंगही जास्तच गरम वाटतंय! खूप तीव्रतेनं आईची आठवण आली. मी जेव्हा जेव्हा आजारी पडलेय तेव्हा आईनं किती उस्तवार केलीय माझी. रात्र रात्र माझ्या उशाशी बसून काढणं, मला पेज भरवणं, अंग पुसून देणं.... दोन अडीच वर्षांआधी मी तिच्या घरातून बाहेर पडले तेव्हा तिने घराच्या दाराबरोबर मनाचीही दारं लावून घेतलीयत का? मला अजूनही तिची आठवण येते, अगदी सुरुवातीला इथे राहायला आले तेव्हा तर फारच यायची; तशी तिला कधीच आली नसेल का? काय माहीत? तिचा न् माझा संबंधच उरलेला नाहीय जणू! साईड टेबलवरचा कॉर्डलेस उचलून ऑफिसला फोन लावला. काम तसंही फारसं नव्हतंच. त्यामुळे वंदनाने सुट्टी द्यायला फारशी कटकट केली नाही. फोन बाजूला ठेवून मी पुन्हा डोळे मिटून घेतले. पण आता कुठली झोप लागायला. डोळे सताड उघडून वरच्या पांढर्याफट्ट छताकडे बघत पडून राहिले. विनी कदाचित गेली असेल कॉलेजला किंवा अजून कुठे. काल काय झालं देव जाणे! आता ठीक असावी; नसली तरी मला काही फरक पडत नाही. सव्वादहापर्यंतचा वेळ लोळून काढला. चहा घ्यायची अनिवार इच्छा झाली म्हणून कशीबशी उठले. बाथरूममध्ये जाऊन तोंड धुतलं. माझ्या रूमच्या डाव्या बाजूला पॅसेज आणि पॅसेजच्या टोकाला विनीची रूम. स्वैंपाकघराकडे जाता जाता तिच्या खोलीकडे नजर टाकली आणि चमकलेच! दार चक्क उघडं होतं आणि आतमधली ट्यूबलाईट सुरु होती. विनी सहसा दार उघडं टाकत नाही. तिला मी त्या रूममध्ये डोकावलेलंदेखील चालणार नाही; हे तिनं मला सांगितलेलं आहे. पण मग आत्ता दार उघडं टाकायचं काय कारण? आणि ट्यूबलाईट रात्रभर सुरु आहे की काय? न राहवून मी तिच्या खोलीपाशी गेले. दरवाज्यापाशी थांबून मी किंचित चढ्या आवाजात हाक मारली, " विनी... " आतून उत्तर आलं नाही. मी पुन्हा आवाजाची पट्टी चढवून हाक मारली. " विनीऽ.. " आतून विनीच्या कण्हण्याचा आवाज ऐकू आला. बापरे! हिला काय झालंय आता? रात्रीचं तिचं रडणं आठवलं. करून करून काय, शाब्दिक अपमानच करेल नं... करू दे. धीर एकवटून मी तिच्या खोलीत शिरले. माझ्या घरातली ही खोली मी विनी राहायला लागल्यापासून पहिल्यांदा पाहातेय. एका कोपर्यात अभ्यासाचं टेबल लावलेलं. त्यावर पुस्तकांचा अमानुष पसारा. कुठल्याही कॉलेजला जाणार्या मुलीचा तसा तो असतोच म्हणा! एका ठिकाणी मळके, धुवायला झालेले कपडे काढले होते बहुधा. चुरगळलेल्या, मळकट कपड्यांच्या तिथं ढीगच झालेला. मला आठवलं, दर रविवारी येणार्या सगुणाबाईंना यावेळी विनीनं कपडे दिलेच नाहीयेत धुवायला. विक्षिप्तपणा की काय म्हणायचा हा. इथे खोलीचा उकिरडा करण्यापेक्षा... पुरे! पुरे!! मी मनातच विचार थोपवले. खोलीच्या खिडकीपाशी असलेला भलामोठा पलंग. ब्लॅंकेटमध्ये स्वतःला घट्ट गुंडाळून विनी झोपली होती. चेहरा ती रात्री बरीच रडल्याचं सांगत होता. मी काहीशी घाबरतच पुढे झाले आणि तिचं कपाळ हात लावून बघितलं. चांगलाच चटका बसत होता. बराच ताप भरला होता. माझ्या हाताचा स्पर्श झाल्यावर तिने डोळे उघडले... उघडत नव्हते तरीही! तेवढ्या ग्लानीतही तिनं सगळं बळ एकवटून म्हटलेलं ' या रूममधून बाहेर जा ' मला नीट ऐकू आलं. शी... स्वतःचाच राग आला. का हिने एवढं आपल्याला फटकारूनही आपण हिला मदत करायला जातोय? का आपला स्वभाव एवढा लोचट आहे? मी जायला वळलेही होते, पण पाय निघेना. काहीतरी सुचल्यासारखं मी वळून थंड आवाजात तिला म्हटलं, " बाई विनी, हे घर माझं आहे. मी कुठे यावं, जावं हे तू कोण ठरवणार? आजवर सभ्यपणा म्हणून ऐकलं तुझं आणि लांब राहिले या खोलीपासनं. आता नाही... फार ऐकलं तुझं. " विनीला चीड आली असावी. पण तिच्यात काहीही बोलायचं आणि करायचं त्राण राहिलं नव्हतं. " आणि राहता राहिली तुझी गोष्ट. प्रियामावशी तुला इथे माझ्या भरोशावर सोडून गेलीय. तुझं काही बरंवाईट झालं तर उगा दोष माझ्या माथी यायचा. मी असं करते, आज प्रियामावशीला फोन लावते. तिला सांगते तुला इथनं घेऊन जायला. तोवर तुझ्या तब्येतीची काळजी घेईन. एकदा तुझी आई आली की ती जाणे अन् तू जाणे! " विनीने मुठी आवळून पलिकडच्या भिंतीकडे तोंड फिरवलं. मी उठत म्हटलं, " मी ब्रेकफास्ट आणि कॉफी आणतेय. ते खाऊन घे. आणि तापावरची गोळी देते. ती घे. आणि हो... आज संध्याकाळी प्रियामावशीला फोन करीन. " क्रमशः
|
Interesting सुरुवात. लवकर येऊ दे हां पुढचं.
|
Mrinmayee
| |
| Monday, November 06, 2006 - 4:31 pm: |
| 
|
श्रध्दा, सुरवात छानच झाली. आता पुढचं कधी लिहिणार?
|
श्रध्दा,सुरूवात छान झाली आहे.. जरा वेगळी वाटतेय कथा तुझ्या आधीच्या कथांपेक्षा.. लवकर पूर्ण कर
|
Jo_s
| |
| Tuesday, November 07, 2006 - 12:19 am: |
| 
|
श्रध्दा छानच् लिहीलयस, पुढच वाचायची उत्सुकता ..... लवकर येउदे पुढचं.
|
Meenu
| |
| Tuesday, November 07, 2006 - 1:00 am: |
| 
|
श्र सही जा रही हो .. खुप छान सुरुवात झालीये ..
|
Shraddhak
| |
| Tuesday, November 07, 2006 - 3:15 am: |
| 
|
माझ्या अंगातही अजिबात ताकद नव्हती; तरीही मी पाय ओढत किचनमध्ये गेले. एकीकडे पहिले स्वतःसाठी चहा ठेवला. फ्रीजमधून अंडी काढून ओट्यावर ठेवली आणि ऑम्लेटसाठी यांत्रिकपणे कांदा चिरायला लागले. डोळ्यांतून वाहतंय ते पाणी कांद्यामुळं खचितच नाही. कालपासून बहुधा मी मनाने दुबळी झालेय. त्याचाच दृश्य परिणाम म्हणजे हे असं आजारी पडणं... असं हे का व्हावं माझ्याच आयुष्यात? गेली सहा वर्षं मी जणू एक वेगळीच व्यक्ती म्हणून जगतेय. सहा वर्षांआधीचं माझं आयुष्य नि आताचं आयुष्य... कसला संबंधच जोडता येत नाही. हे असं या शहरात येऊन एकटं राहणं, नकोशा आठवणी येऊ नयेत म्हणून मिळालेल्या नोकरीत दिवसाला शक्य तितका जास्त वेळ काम करायचं, घरी येऊन काहीतरी खाऊन आंबलेल्या शरिराने, थकलेल्या मनाने झोपी जायचं... झोपही बरेचदा प्रसन्न होत नाही माझ्यावर. मग रात्र रात्र जागरण केल्याने चेहरा ओढलेला दिसतो, डोळ्यांखाली काळी वर्तुळं वाढायला लागली आहेत आता. आशाकाकी खूप समजावतात मला. सांगतात, अशी स्वतःची हेळसांड करून घेऊ नकोस. काकींचाच तर आधार आहे मला या शहरात. बाकी कुणी ओळखीचंही नाही. त्या नसत्या तर इथे एकटेपणाने घेरलेली मी पार मोडून गेले असते. मला स्वतःला जितकं सावरता आलंय, त्याचं श्रेय काकींनाच द्यायला हवंय. ... अंडी रूम टेम्परेचरला आली होती. मी ऑम्लेट बनवता बनवता आधी स्वतः चहा घेतला. जरा तरतरी आली. ब्रेकफास्टचा ट्रे घेऊन मी पुन्हा विनीच्या खोलीत गेले तेव्हा ती उठून, तोंड धुवून बसली होती. मी तिथे जाताच तिने म्हटलं, " अनू, आपण एक डील करूयात. मी बरी होईपर्यंत तू जसं म्हणशील तसं करेन पण माझ्या आईला तू ' मी आजारी वगैरे आहे ' असा फोन अजिबात करायचा नाहीस. " ' हे काय नवीनच? ' माझ्या मनात आलं खरं, पण हा सौदा मला जरा अडचणीचा वाटत होता. हिचं आजारी असणं मी लपवून ठेवलं आणि पुढे ते अजून वाढलं तर बोल कुणाला लावेल प्रियामावशी? अर्थातच मला! छ्या, नकोच ते! मी काही बोलणार तोच ते सगळं जाणवल्यासारखी ती म्हणाली, "Don't be stupid, अनू. एवढी मोठी झालीयेस आणि इतक्या साध्या साध्या गोष्टींची कसली गं भीती वाटते तुला? साधा ताप आहे हा. उतरेल एक दोन दिवसांत. " का कोण जाणे, तिचं ते मला मूर्ख ठरवणं मनाला चरचरून झोंबलं. विवेक मला नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणासाठी मूर्ख ठरवायचा, त्यालाही बराच काळ लोटला होता. हे म्हणजे जखमेवरची खपली पुन्हा काढल्यासारखं काहीतरी... माझ्या डोळ्यांत खळ्ळकन पाणी आलं. तिच्याजवळ एक मिनीटही न थांबता मी स्वतःची खोली गाठली. राहून राहून माझ्या मनात हाच प्रश्न ' हे असले प्रसंग माझ्याच वाट्याला का येतायत? आणि आले तरी त्यांना उलट प्रतिकार करायची हिंमत माझ्यामध्ये अजून का नाहीये? आत्ता विनी उर्मटासारखी माझ्याशी बोलली, तेव्हा तिला सणसणीत प्रत्युत्तर करायचा, वेळ आली तर तिला एक फटका द्यायचा मला धीर का झाला नाही? विवेकने एवढं बदलून टाकलंय मला? ' " अनू, अशी का गं झोपल्येस? बरं नाही का? " आशाकाकी आत आल्या होत्या. माझ्या घराच्या लॅचची एक किल्ली त्यांच्याकडेही असते. माझी कामवाली बाई यायची वेळ झाली की त्या घर उघडून स्वतः लक्ष देऊन सगळं काम करून घेतात. त्यांनी जवळ येऊन माझ्या कपाळावर हात ठेवला. " बयो, ताप आहे गं बराच! हाक नाही का मारायचीस पोरी? " म्हणत त्या माझ्या पलंगावर बसल्या. हळुवार हातांनी माझ्या डोक्यावर थोपटू लागल्या. " ती महामाया कुठेय? " " तिलाही ताप आहे. " " हिंड म्हणावं उन्हातान्हात, थंडीत. आजारी पडेल नाहीतर काय? गेल्ये का मग डॉक्टरकडे? " " नाही हो काकी. तिला चालवतही नाहीय. मी तिला तापावरची गोळी आणि ब्रेकफास्ट दिला. झोपली असेल. " एरवी तिच्यासाठी मी काहीही केलं असतं तरी काकींना राग आला असता; पण आजारपण हे त्याला अपवाद असावं. त्या काही बोलल्या नाहीत; फक्त एकदा उठून तिच्या रूममध्ये जाऊन बघून आल्या. " झोपल्येय ती. " " बरं आहे. गोळीने बरं वाटलं तर चांगलंच नाहीतर संध्याकाळी डॉक्टरकडे नेईन. " " अनू, आल्ये आहे तर तुमच्यासाठी स्वयंपाक करून ठेवते. थोडं जेवा तू आणि ती. " मी नको, नको म्हणेस्तोवर काकी स्वयंपाकघरात गेल्याही. थोड्या वेळाने गरम आमटीभाताचा, दुधीभोपळ्याच्या भाजीचा वास यायला लागला, तसं आईची आठवण येऊन पुन्हा माझ्या घशात हुंदका अडकल्यासारखा झाला. क्रमशः
|
Mrinmayee
| |
| Tuesday, November 07, 2006 - 10:05 am: |
| 
|
श्रध्दा, पुन्हा एकदा.. तुझी सोप्या सहज भाषेत लिहिलेली गोष्ट पूर्ण कधी वाचेन असं झालंय. इतकं सहज लिहिलंय की वाचताना डोळ्यासमोर उभे राहाताहेत प्रसंग! लवकर पूर्ण करायला तुला आणखी वेळ मिळो!
|
Shraddhak
| |
| Wednesday, November 08, 2006 - 5:12 am: |
| 
|
मृण्मयी, धन्यवाद. जसा जसा वेळ होईल तशी तशी ही कथा पूर्ण करेन. 
|
Deemdu
| |
| Wednesday, November 08, 2006 - 5:17 am: |
| 
|
बयो, त्या गडावर TP करायचा वेळ वाचवलास तर लग्गेच होईल बघ लिहुन BTW खरच अगदी चांगली चालली आहे कथा म्हणूनच थांबली की उगाच अडकल्या सारख होतय
|
Shraddhak
| |
| Wednesday, November 08, 2006 - 5:23 am: |
| 
|
आशाकाकींनी सगळा स्वयंपाक टेबलावर लावून ठेवला आणि तेवढ्यात मनोहरकाकांची हाक आली. ' ह्यांच्या गोळ्यांची वेळ झाल्येय गं. तू आणि ती दोघी जेवून घ्या. मी येत्ये गं दुपारी पुन्हा सवड झाली की. ' म्हणून त्या लगबगीने निघूनही गेल्या. आशाकाकी. सत्तरीला टेकल्या आहेत आता, पण अंगात उत्साह किती! भराभर कामं चालू असतात अजून. घरकामं तर आहेतच, वर विणकाम, भरतकाम वगैरे चालू असतंच. दुपारी बहुतांश बायका जेव्हा थोडी झोप घ्यायला लवंडतात, तेव्हा काकी त्यांचं भरतकाम, विणकामाचं सामान बाहेर काढून घराबाहेरच्या ओट्यावर काहीनाकाही विणत बसलेल्या दिसतात. काकी दिसायला सुंदर आहेत, साठी उलटून गेली तरी केस फारसे पिकलेले नाहीत, चेहरा सतेज, सडसडीत अंगकाठी... त्यामुळे प्रथमदर्शनी त्या फार तर पन्नाशीच्या वगैरे वाटतात. त्यामुळे त्या जवळपास आजी वयोगटात असूनही त्यांना आजी म्हणावंसं वाटत नाही. त्यांच्या ओळखीपाळखीची सारी जणं जशी त्यांना काकी म्हणतात, तशीच मीही मग काकी म्हणते त्यांना. माझ्या घराला लागूनच त्यांचं घर.. सध्या त्या आणि मनोहरकाका एवढ्या दोनच व्यक्ती त्या घरात राहतात. तीन कर्तीसवरती मुलं आहेत; पण ती नोकरी व्यवसायानिमित्त परगावी, परदेशी... वर्षाकाठी एकदा येतात तेव्हा आशाकाकींचं घर गजबजतं. पुन्हा ते लोक निघून गेले की काकाकाकी आपला नेहमीचा चाकोरीबद्ध दिनक्रम पाळू लागतात. खेद नाही, दुःख नाही, मुलंनातवंडं लांब असल्याचा विषाद नाही. म्हणजे निदान असं मला वाटतं. टेबलावर ठेवलेल्या अन्नाच्या वासाने खूप दिवसांनी भूक लागल्यासारखी झाली. मी विनीच्या खोलीत डोकावलं तेव्हाही ती झोपलीच होती. ब्रेकफास्ट व्यवस्थित केला होता तिने, त्यामुळे मला तिला उठवावंसं वाटलं नाही. एकटीच डायनिंग टेबलाशी बसून जेवण वाढून घेतलं. जेवण झाल्यावर तापावरची गोळी घेऊन मीही माझ्या रूममध्ये येऊन लवंडले. झोप येईना, फक्त त्या गोळीचा प्रभावामुळे प्रचंड ग्लानी आलेली. डोळ्यांवर हात घेऊन पडले तर नजरेसमोर सगळा भूतकाळ उभा राहिल्यासारखा झाला. गेल्या सहा वर्षांतल्या घडामोडी! प्रचंड वेगाने घडलेल्या आणि मला पेलता न आलेल्या. ते सगळं आठवतानाच कधीतरी डोळा लागला असेल. जाग आली तेव्हा उन्हं उतरायला लागली होती. उठले, चूळ भरली. थोडी झोप झाल्यानं बरं वाटत होतं. विनीच्या खोलीत डोकावले. अजूनही झोपेतच होती. मी जवळ जाऊन अंगाला हात लावून बघितला. ताप पुन्हा चढला होता बहुधा. हिला आता डॉक्टरकडे न्यायलाच पाहिजे होतं. मी तिला उठवलं. आता तर ती आणखीच अशक्त झालेली. आशाकाकींना सोबत घेऊन मी तिला क्लिनिकमध्ये घेऊन गेले. ... विनी झोपलीय नुकतीच डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा डोस घेऊन! मी इथे तिच्या उशाशी जरा बसलेय. रात्री पुन्हा अचानक ताप चढला तर... ही काही मला बोलावणार नाही मदतीला. अगदी तिला काही करायचं बळ नसतानाही! राहून राहून तिचं कालचं ऊर फुटून रडणं आठवतं. कुणाचा होता फोन देव जाणे? पहिल्यांदाच विनीला एवढं असहाय्यपणे रडताना पाहिलंय मी! ... घड्याळात दोनचे ठोके पडले. विनीला जाग आली बहुधा. मी विचारलं, " कसं वाटतंय तुला आता? " " तू अजून इथं जागत बसली आहेस? " या विनीच्या प्रश्नात मात्र चीड, तिरस्कार नाही. उलट काहीसं आश्चर्य असल्यासारखं. " हो, कारण डॉक्टर म्हणाले मला.. आजच्या दिवस काळजी घ्या म्हणून. कसं वाटतंय? " " बरं वाटतंय. आता तू जाऊन झोपलीस तरी चालेल. " मी काही न उत्तर देता शेजारी पडलेलं मासिक उचलून वाचायला लागले. थोड्या वेळाने शांततेचा भंग करत विनीने मला विचारलं, " तू एकटी का राहतेस, अनू? " क्रमशः
|
Shraddhak
| |
| Wednesday, November 08, 2006 - 7:12 am: |
| 
|
एखाद्या व्यक्तीशी कुठल्यातरी विषयावर संवाद साधताना तुम्हाला थोडीफार कल्पना असते, समोरची व्यक्ती काय बोलेल किंवा काय प्रश्न विचारेल याची. तुमची उत्तरंही मग काहीशी ठरलेली असतात, मनातले विचार त्या उत्तरांशी सुसंगत असेच चालू असतात. त्यामुळं विनीकडून आलेला तो प्रश्न ऐकल्यावर काही क्षण मला भांबावल्यासारखंच झालं. एकदा इच्छा झाली, तिला सांगावं, माझ्या खाजगी आयुष्यात नाक खुपसू नकोस म्हणून! पण तसं खरोखर बोलून दाखवणारा स्वभाव कुठे होता माझा? बरं उत्तर द्यावं तरी काय? मी का एकटी राहत होते खरंतर? आई बाबांमुळे, विवेकमुळे की परिस्थितीने जी आव्हानं माझ्यासमोर उभी केली त्यांच्याशी मुकाबलाच न करता आल्यामुळे? काही न सुचून शेवटी म्हटलं, " असंच! राहावं लागतंय म्हणून... " तोवर तिलाही बहुधा जाणीव झाली असावी, आपण नको तो प्रश्न विचारला आहे, याची! " सॉरी... " ती पुटपुटली. पुन्हा रूममध्ये शांतता पसरली. तिच्या बाजूला मी निःशब्द बसून राहिले. मघाशी कष्टाने थोपवलेल्या आठवणी आता दुप्पट जोमाने येऊ लागल्या. .... जळगाव हे तसं फार मोठं शहर नाही. भूगोलाच्या पुस्तकाप्रमाणे बघू गेलं तर केळ्यांसाठी प्रसिद्ध आणि आजकाल सोन्याच्या खरेदीसाठी. जळगावला पर्यटकांनी जायचं ते अजिंठा जवळ आहे म्हणून! शहराला काही खास ऐतिहासिक महत्त्व असल्याचंही मला तरी माहीत नाही. त्यामुळे वर दिली तेवढीही ओळख कदाचित पुरी पडावी जळगावची. माझा जन्म तिथलाच! बर्यापैकी मध्यवस्तीत असलेल्या रिंगरोडवर बाबांनी घर बांधलं होतं. मागेपुढे अंगण, आईने हौसेने लावलेली बाग, पाण्याची टंचाई ओळखून मागच्या अंगणात बांधलेला हौद असणारं एकमजली घर. आम्ही चौघी बहिणी आणि त्यातली मी सगळ्यात धाकटी. धाकटी असल्याने आईची विशेष लाडकी. कदाचित आईचंच रंगरूप मी घेतलं होतं म्हणूनही तिला मी आवडत असेन जास्त. आम्हा दोघींना पाहून लोकही आईला म्हणायचे, " सरस्वतीकाकू, तुमची कॉपी वाटते अनू अगदी. तेवढीच देखणी... " ओळखीच्या, नात्यातल्या बायका माझी दृष्ट काढायच्या आणि म्हणायच्या, " इतकी रूपवान आहे अनू. तेवढाच राजबिंडा मुलगा हवा हिला नवरा म्हणून. " होता होता बरेच दिवस, वर्षं गेली. त्या छोट्याश्या, सुरक्षित जगात माझं आयुष्य खरंच मजेत चाललं होतं. बाहेरच्या जगाशी फारशी ओळख नव्हती, ओळख व्हायची गरजही वाटत नव्हती. दहावी, बारावी सायन्स, बीएस्सी... मला पुरे वाटलं मग! नोकरी बिकरी करायच्या फंदात मी पडणार नाही हे मी आईबाबांना अगोदरच सांगितलेलं आणि त्यांच्याही ते मनात नव्हतं बहुधा. माझं बीएस्सी होईपर्यंत मोठ्या तिघींची लग्नं होऊन त्या सुखाने आपापल्या घरी नांदत होत्या. एखादं वर्ष मी फारसं काही न करता काढलं असेल. वाचनालयाची मेंबरशिप होतीच. भाराभार पुस्तकं आणायची, वाचायची, दुपारचा वेळ झोपण्यात घालवायचा, हे मुख्य उद्योग.. आईबाबांनी मग माझ्या लग्नाचंच मनावर घेतलं. मलाही फारसं काही वेगळं वाटलं नाही म्हणा... बरोबरीच्या मैत्रिणींचीही लग्नं ठरत होती, होत होती. तसंच आपलं, एवढा एकच विचार मनात.... चार मैत्रिणींच्या ऐकून मनात काही अपेक्षा ठेवलेल्या. दिसायला देखणा हवा; मला शोभेलसा, पैशाने व्यवस्थित असावा, जरा हौसमौज करता आली तर बरं, परदेशाविषयी कुणाकडून फारसं ऐकलेलं नाही त्यामुळे त्याबद्दल आकर्षणही नसल्यासारखं... विवेकच्या कुटुंबाकडून विचारणा झाली तेव्हा आईबाबांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. माझ्या मावशीच्या सासरच्या पण जरा दूरच्या नात्यात होतं विवेकचं कुटुंब. तसे ओळखीचे लोक... विवेक दिसायला देखणा, उच्चशिक्षित.. कुठलीही खोट काढण्यासारखा नव्हताच! कुठल्याश्या बड्या कंपनीमध्ये तो काम करत होता मुंबईला, घरचे लोक पुण्यात राहायला होते, तिथेही एक बंगला, कुटुंब चांगलं, माणसं बरी... बस्स, एवढी माहिती आणि फोटो बघून आमच्याकडून होकार कळवण्यात आला. लग्न ज्याच्याशी करायचं त्या जोडीदाराच्या निवडीबद्दल आपण नीट विचार करून निर्णय घ्यायचा असतो, हे मला आत्ता उमगलं आहे. तसंच या निर्णयाआधी स्वतःलाही जाणून घेणं महत्त्वाचं असतं आणि मुख्य म्हणजे हा निर्णय पूर्णतः इतरांवर न सोपवणं, हेही... पण तेव्हा... ... तेव्हा विवेककडून होकार यावा असं तीव्रतेनं वाटायला लागलं. आणि तसा तो आलाही. रीतसर साखरपुडा वगैरे झाला आणि मी संसाराची स्वप्नं रंगवू लागले. ... लग्नाआधीचे काही आणि लग्नानंतरचे काही महिने आठवले तर असं वाटतं, काळ तिथंच थांबायला हवा होता. म्हणजे पुढचं सगळं आपसूकच टळलं असतं. पण तसं होतं का कधी? .... " अनू... अनू... " मी कष्टाने डोळे उघडले. अरेच्च्या, खुर्चीत बसल्या बसल्याच मला झोप लागली होती की काय? विनी मला उठवत होती. चेहर्यावरून पुष्कळ बरी वाटत होती. " किती वाजले गं? " मी विचारलं. " पावणेसात.. " मी पुढे होऊन तिचा ताप बघितला. पूर्णपणे उतरला होता. पण अजून तीन चार दिवस तरी तिला आराम करायला सांगितला होता. " मला बरं वाटतंय आता. थॅंक्स. " ती मनापासून म्हणाली. " अगं त्यात काय? " तिच्या बदललेल्या सुरामुळे का होईना, मला तिच्याशी बोलावंसं वाटलं. " पण कुठे बाहेर जाऊ नकोस गं दोन चार दिवस. पूर्ण बरी हो, जरा अंगात ताकद येऊ दे, मग जा. ओके? मी आता थोड्या वेळाने ऑफिसला जाईन. काही लागलं तर मला ऑफिसात फोन कर किंवा आशाकाकींना सांग. " काहीच प्रतिसाद आला नाही, म्हणून मी तिच्याकडे बघितलं तर तिच्या डोळ्यांना पाण्याच्या धारा लागलेल्या... " विनीऽ... " मी एका झटक्यात उठून तिला जवळ घेतलं. " काय झालं? बोल ना... " अनावर होणार्या हुंदक्यांमुळे तोंडून शब्दही फुटत नसताना ती अस्फुट स्वरात म्हणाली, " प्लीज, तू आज सुट्टी घेशील? माझ्यासाठी? मला आत्ता याक्षणी तुझ्या सोबतीची फार गरज आहे गं. प्लीज... प्लीज... " क्रमशः
|
Meggi
| |
| Wednesday, November 08, 2006 - 8:52 am: |
| 
|
श्र, कसलं मस्त लिहिते आहेस. तुझी भाषा नेहमीच खूप ओघवती असते. वाचायला खूप छान वाटतं. पटपट येऊ दे आता पुढची कथा.
|
Chinnu
| |
| Wednesday, November 08, 2006 - 4:35 pm: |
| 
|
श्र, direct ringroad , जळगावला हात घातलास! मला आता दोनही पात्रांची काळजी वाटायला लागली आहे. मलापण ताप येणार बहुतेक! छान चाललीये गोष्ट, येउ पुढचं..
|
श्र, छान लिहीते आहेस! Keep it coming... 
|
Mi_anu
| |
| Wednesday, November 08, 2006 - 11:37 pm: |
| 
|
सुंदर लिखाण. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.
|
खुप वर्षापुर्वी.. ची आहे का ग ही गोष्ट पेपर ला आले होते ते.. चीनु बहुतेक बरोबर म्हणतेय..!!!
|
|
|