|
Sonchafa
| |
| Wednesday, September 06, 2006 - 3:30 am: |
| 
|
र्हुपाली, लुपाली, उपाली, मादाम.........! मी शाळेच्या आवारात पाऊल ठेवले मात्र आणि पाच-पंचवीस डोकी माझ्या दिशेने धावत आली. सगळ्यांनी मला चक्क गराडा घातला.. त्यातल्या चार-पाच जणांनी तर मी त्यांना उचलून घेऊन पापी घेतल्याशिवाय पुढे पाऊलही टाकू दिले नाही. ह्या सगळ्या प्रकाराने आत्तापर्यंत सगळ्या पालकांचे डोळे कोण आले हे बघायला आमच्याकडे वळले. आपली इवली इवली मुले वर्षभर कोणत्या रुपालीचे वर्णन घरी करीत होती हे अनेक पालकांनी पहिल्यांदाच पाहिले. आज माझ्या सगळ्यात आवडत्या शाळेचा वार्षिकोत्सव होता आणि अर्थातच शालेय वर्षातल्या शेवटच्या आठवड्यातला पण खूप महत्वाचा दिवस होता. शाळा कायमची तिथेच असणार होती.. शिक्षक तिथेच असणार होते.. मुले ही पुढच्या वर्गात जाणार होती.. ज्या मुलांचे तिथले शेवटचे वर्ष होते ती फक्त पुढे कॉलेजला गेली तरी त्याच गावात रहाणार होती.. शाळेतला तो माझा शेवटचा दिवस होता. एखाद्या शिक्षकाने शाळा सोडून जाणार्या मुलांना निरोपे देणं हे त्याला काही नवीन नाही. दर वर्षी नवीन मुले हाताखालून जातात.. शिक्षक न चुकता आपले काम करीत त्याच शाळेत अनेक वर्षे काढतात.. जवळपास रहाणार्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या गाठीभेटी अगदी रस्त्यातच का होईना पुढेही होत रहातात. पण माझ्या बाबतीत हे असे घडणार नव्हते. मी वर्ष संपल्यावर तिथून दूर जाणार होते आणि ह्या विद्यार्थ्यांपैकी कोणी मला पुन्हा कधी भेटेल ही शक्यताही गृहीत धरणे कदाचित वेडेपणाचे ठरले असते. माझी Part-time English Assistant ची फ़्रांसमधली नोकरीच केवळ एक वर्षासाठी होती. वर्ष संपल्यावर मला त्या शाळाच काय पण माझे Valenciennes हे गाव आणि तो देशच सोडून परत यायचे होते. दुसरे म्हणजे भाषांतराचे आणि दुभाषाचे काम पूर्वी करणारी मी अशा शिक्षक सहय्यकाच्या भूमिकेत पहिल्यांदा आणि कदचित शेवटच्या वेळेलाच असणार होते. असा हा अनोखा पण बहुतेक एकुलता एक अनुभव असल्याने एक वर्षाच्या सहवासाने जुळलेले ऋणानुबंध मला तसेच कायमसाठी माझ्या फक्त आठवणीत जपून ठेवायचे आहेत ह्याची जाणीव मला सुरुवातीपासूनच होती. English Assistant ची अर्धवेळ नोकरी म्हणजे नेमकं काय तर इंग्लिश च्या शिक्षकाबरोबरच वर्गात राहून मुलांचे उच्चार, व्याकरण ह्यावर लक्ष देणं. मुले नकळत ज्यातून शिकू शकतील असे व्यवसाय शिक्षकाच्या मदतीने बनवून ते मुलांकडून करवून घेणं. त्यांना गाणी शिकवणं.. छोटे छोटे खेळ खेळणं.. ती ती परकीय भाषा आणि अत्थातच फ़्रेंचही चांगल्या प्रकारे बोलू शकणार्या मुलांन्ची निवड फ़्रेंच एंबसी करते आणि त्यांना एका शालेय वर्षासाठी फ़्रांसमध्ये बोलवून घेते. आपल्या देशात हे कौतुक परवडण्यासारखे नाही. माझ्या आठवणीत लहानपणी पाहिलेला फ़ॉरीनर म्हणजे एक तर टी.व्ही वर किंवा एअरपोर्टपासून जवळच रहात असल्याने कधीमधी हौसेने रस्त्यात फिरायला उतरलेला एखादा प्रवासी. मला अजूनही आठवतं की रस्त्यात असा एखादा आगंतुक दिसला की रस्त्यातले पाच-पंचवीस डोळे कसे कौतुकाने त्याच्याकडे वळायचे. परंतु फ़्रांसमधील मुले नशीबवान खरी.. एवढ्या लहान वयात तिथली शिक्षणपद्धती थोडी वेगळी असल्याने परदेशी भषेचे शिक्षण अगदी प्राथमिक शाळे पासून सुरु होते. एक गोष्ट नक्कीच आहे की आपल्या मुलांना मातृभाषा, राष्ट्रीय भाषा आणि अर्थातच इंग्लिश अशा तीन भाषा शाळेत शिकाव्या लागतात. पण फ़्रेंच हीच मातृभाशा आणि राष्ट्रीय भाषा असल्यामुळे त्याशिवाय एक परकीय भाषा शिकणे त्यांना निश्चितच कठीण नाही. आणि अर्थातच आर्थिक दृष्ट्या त्यांना असे असिस्टंट्स बोलवून घेणं हे परवडण्यासारखेही आहे. असिस्टंट आणि शिक्षक दोघेही एकाच वेळेस वर्गात असण्या मागचा उद्देश हाच की नेहेमीचे शिक्षक वर्गात असल्याने मुलांवर थोडी जरब असते आणि असिस्टंट असल्याने मुलांच्या कानावर योग्य उच्चार पडतात. आपल्याला शिकवायला एवढ्या दुरून कोणीतरी आले आहे ह्या जाणीवेने मुलं आणि ओघानंच त्यांचे पालकही सुखावतात. परदेशी भाषा मग ती इंग्लिश, जर्मन, रशियन, स्पॅनिश, इटलियन वा अगदी अरेबिक ह्यापैकी कोणतीही असो, ती शिकण्याची गोडी मुलांच्या मनात लहानपणापासून निर्माण व्हावी ह्या साठी फ़्रेंच सरकार असे प्रयत्न करते ह्याचे कौतुक आहे.. आता परदेशातली शाळा म्हणजे बडे खटले असणार असे कोणालाही वाटले तर ते चूक नाही. श्रीमंत देश, श्रीमंत पालक, उच्च राहाणी आणि सुखी जीवन.. पण प्रत्यक्षात तसे नव्हते. मी मुळात गेले तोच भाग फ़्रांसमधील गरीब मानला जाणारा भाग होता. फ़्रांसच्या उत्तरेला बेल्जिअन बॉर्डरपासून जवळ Valenciennes ह्या छोट्या शहरात मी रहात होते. मी अर्थातच प्राथमिक शाळेतल्या म्हणजेच ८ ते ११ ह्या वयातल्या मुलांना शिकवणार होते. बालमंदीरची दोन वर्शं आणि नंन्तर प्रायमरी ची पाच वर्शे झाल्यावर तिथली मुले साधारणपणे बाराव्या वर्षी कॉलेजला जातात. तर Wallers आणि Bellaing ह्या दोन छोट्या गावांतल्या तीन शाळांमध्ये एका आठवड्यात मला प्रत्येकी चार तास असे एकून बारा तास शिकवायचे होते. सर्व administrative formalities साठी ह्यापैकीच बोस्के ( Ecole du Bosquet) ही शाळा प्रमुख शाळा ठरवण्यात आली होती. त्या शाळेचा मुख्याध्यापक ख्रिस्तोफ हा माणूस म्हणून लाख होता आणि मी नशीबवान की तोच माझा ट्युटर सुद्धा होता. माझ्या रहात्या ठिकाणापासून साधारण पंधरा-वीस कि.मी. वर ही शाळेची दोन छोटीशी बजूबजूला असलेली गावं होती. जवळपासच्या गावातील कोळशाच्या खाणी बंद झाल्या असल्यामुळे बर्याच घरी मुलांच्या पालकांना नोकर्या नव्हत्या.. सुरुवातीला मला ह्या गोष्टींची म्हणावी तशी कल्पना नव्हती पण नंतर जसजसा मुलांशी संबंध यायला लागला तसतसे मी त्यांना अधिकाधिक समजून घेऊ शकले. काही मुले इथेही आधीपासूनच कानफाटी ठरलेली होती. काही मुलं अगदीच अबोल तर काही अतिशय बडबडी. शालेय शिक्षण सक्तीचे असल्याने पालक मुलांना शाळेत पाठवीत असत पण म्हणावा तसा पाठिंबा नसे. बर्याचदा ह्या मुलांचे अभ्यासात लक्ष नसायचे. पालकांच्या शिक्षणाबाबतच्या उदासीनतेमुळे आणि निराशाजनक परिस्थितीमुळे कधी मधी काही मुलांना घरी मारही मिळत असे. मुळातच माझा स्वभाव थोडा मृदु अस्ल्याने काही मुलांनी अभ्यासात लक्ष दिले नाही किंवा वर्गात त्रास दिला तरी मी त्यांना शिक्षा करणे शक्यतो टाळत असे. नाहीतर शाळेत शिक्षा झाली हे कळल्यावर कदचित घरीही त्यांना शिक्षा होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. याउलट मुलाला शिक्षा केली म्हणून धमकी द्यायला पालक एका जर्मन असिस्टंटच्या घरी गेल्याची घटनाही जवळच्याच एका गावात घडलेली होती. त्यामुळे आगीतून फोफाट्यात पडायचे नसेल तर स्वत: शांत राहून शक्य तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण आपले काम करायचे एवढे मी ठरवले होते. माझी ओळख तिथे English Assistant अशी करून दिली गेली असल्याने, माझ्याबरोबर शिकणे हे त्यांच्या नेहेमीच्या शिक्षकांबरोबर शिकण्यापेक्षा वेगळे आहे हे मुलांनी अध्यारुतच धरले होते. त्यामुळे माझ्याबरोबर चाळीस मिनीटे ही दुसरी सुटीच असल्यासारखे एक दोन वर्गांच्या बाबतीत झाले होते. शाळेत शिकवणार्या मुख्य एंग्लिश शिक्षकाबरोबरच मी वर्गात असले पाहीजे ह्या नियमास एका शाळेने कधीच धाब्यावर बसवलेले असल्याने तिथे माझी फारच पंचाईत होत असे. मी स्वत: लहानपणी शाळेत शिक्षकांची टिंगल करण्यात प्रत्यक्ष जरी भाग कधीच घेतला नसला तरी इतर टवाळखोरांच्या दंग्यांनी हैराण झालेले शिक्षक पाहून हसू लपविणे कठीण होत असे हे मला आजही नीट आठवत असल्याने आज स्वत: शिक्षकाच्या भूमिकेत शिरल्यावर ती भूमिका निभावताना येणार्या अडचणी हळू हळू कळायला मात्र लागल्या. मी जरी इंग्लिश शिकवायला गेले होते तरीही भारताचे प्रतिनिधित्व ही एक दुसरी जवाबदरीही माझ्यावर होती. ह्यामुळेच माझे काम केवळ शिकवण्यापुरते मर्यादित न रहाता माझ्या देशाबद्दल मुलांना माहिती करून देणे तसेच भारतासंबन्धी असणारे गैरसमज दूर करणे हेही आवश्यक ठरणार होते. आणि त्यामुळेच दिवाळी, गुढीपाडवा, गणपती असे मराठी सण, मराठी पद्धतीचे पारंपारिक सणाचे जेवण ह्यावरच अक्खा एक तास मी एका वर्गात बोलत असे. अगदी उदाहरणच द्यायचे तर सणाच्या दिवशी केळीच्या पानावर वाढल्या जाणार्या पंगतीही माझ्या बोलण्यातून सुटल्या नाहीत. ख्रिस्तोफ ची ही इच्छाच होती की माझ्या असण्याचा उपयोग मुलांना फक्त अभ्यास शिकणे एवढाच न होता एक परदेशी मुलीशी आणि अर्थातच तिच्या संस्कृतीशी जितका जवळून संबंध येईल तेवढे चांगलं. आणि त्याचमुळे फक्त त्याच्या शाळेत माझा संचार बालमंदीर ते प्रायमरी शाळा असा सर्वत्र होऊ लागला. त्यामुळे मी अगदी पाच सहा वर्षांच्या मुलांशी खेळण्याचीही मजा वर्षभर लुटली. दुर्दैवाने इतर शाळांच्या बाबतीत असे झाले नाही. रोजच्या शाळेबरोबरच माझ्यासाठी रोजचे सहशिक्षक आणि मुलेही बदलत होती. तसेच कोणतीच शाळा खूप श्रीमंत नसली तरी Bellaing ची शाळा त्यातल्यात्यात सगळ्यात चांगली समजली जायची. बोस्के त्याखालोखाल आणि तशी बेताचीच परिस्थिती असणारी शाळा म्हणजे Ecole de Tuilerie. तीनही शाळेत येणार्या मुलांच्या आर्थिक परिस्थितीतली आणि शिक्षकांच्या वागणुकीतली तफावतही अगदी सहजपणे दिसत होती. Bellaing च्या शाळेत मी नेहेमीच इंग्लिश च्या शिक्षकासोबत असे. ती खूषच होती की काही वर्षाम्च्या खंडानंतर शिकवताना काही अडले तरी मी तिच्यासोबत होते. तिथलेच इतर शिक्षकही माझ्याशी ठीकठाक वागत होते परंतु सगळ्यात वाईट वाटले ते एकाच गोष्टीचे तिसर्या शाळेत नऊ महीने काम करूनही बर्याच शिक्षकांनी शेवटपर्यंत मला परकच मानले होते. जी इंग्लिश शिकवायला आली ती आपली भाषाही एवढी चांगली बोलू शकते ह्या बद्दलची असूया मी कितीही दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला तरीही मला ह्याच एका शाळेत कायम जाणवत राहिली. शाळा सुरु झाल्यापासून आपला पहिला सण आला तोच दिवाळीचा मी अर्थातच घरापासून दूर होते. माझ्या मुख्य शाळेत ह्या सणाबद्दल मी माहिती दिली. कंदील, फराळ, रांगोळी आणि फटाके! आणि डिसेम्बर महीन्यात सुरुवातीपासून अचानकपणे बोस्के च्या शाळेत वर्गा-वर्गात अनेक योगर्टचे काचेचे रिकामे पेले दिसायला लागले. कारण विचारल्यावर ख्रिस्तोफ आधी काहीच बोलला नाही.. पण नंतर संध्याकाळी तो म्हणाला “ख्रिसमसची सुटी सुरु होण्यापुर्वी सोळा तारखेला शाळेत ख्रिसमस साजरा करायचा आहे आणि त्यासाठी तयारी चालू आहे. ” मला हे उत्तर ऐकूनही पुरते समजले नाही आणि माझी उत्सुकता अजूनच चाळवली गेली.. जरी त्याने मला पत्ता लागू दिला नाही तरी एका मुलाला रहावले नाही. त्याने मला बाजूला घेतले आणि मला म्हणाला “आपण ना दिवाळी साजरी करणार आहोत ह्या वर्षी ख्रिसमसबरोबरच! ” त्याचे डोळे हे सांगताना असे काही लकाकले की ह्या वर्षी काहीतरी वेगळे होणार आहे ह्याचा आनंद त्याच्या चेहेर्यावर स्पष्ट दिसत होता. खिस्तोफ़ ने जे मला सांगण्याचे टाळले ते मुलांनी त्याला पत्त न लागू देता मला मात्र सांगून टाकले. संध्याकाळी शाळा संपल्यावर काही निवडक मुले घेवून ख्रिस्तोफ़ आणि मी इंटरनेट क्लब चालवणार असे ठरले होते. पण गमतीचा भाग असा की शाळेत कॉम्प्युटरची लॅब तयार असूनही अजून इंटरनेट चालू झाले नव्हते आणि हेच आमच्या पथ्थ्यावर पडले.. ख्रिसमसची तयारी करू ह्या सबबीवर क्लबमधील सगळी मुले शाळेत थांबणार होती आणि मीही थांबणार ह्या माझ्या निर्णयामुळे क्रिस्तोफ़चा नाईलाज झाला आणि तो अडचणीत पडल्याचे माझ्या लक्षात आलं. “मला सगळे कळले आहे. ” मी त्याला सांगून टाकले आणि नंतर ख्रिसमस आणि दिवाळी एकत्र साजरी कशी करायची ह्याचे बेत ठरले. पारदर्शक रंग वापरून हे काचेचे पेले मुलांनी नक्षी काढून सजवले.. जवळजवळ दोनशे-अडीचशे! प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी मी सगळ्या वर्गांना बुट्टी मारून प्रवेशद्वाराशी ठेवण्यासाठी एका फळ्यावर रांगोळी; अर्थातच रंगीत खडूंनी काढली. शाळेचे आवार सजवायची जबाबदारी काही पालकांनी उचलली होती. ख्रिसमस ट्री सजले होते. हळु हळु वेळ होत आली तशी आवार मुलांनी आणि पालकांनी गजबजून गेले. सगळ्या मुलांना आता मला भरतीय साडीत बघून खूप आश्चर्य वाटले. कार्यक्रमाला सुरुवात करताना ख्रिस्तोफ़ने सगळ्यांचे स्वागत केले. “आज ख्रिसमस साजरा करायला रुपाली आपल्याबरोबर आहे पण ह्या वर्षी जेव्हा तिच्या देशात दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण साजरा झाला तेव्हा ती तिच्या घरी नव्हती आणि तिला हा सगळ्यात महत्वाचा सण साजरा करता आला नाही त्यामुळे तिच्यासाठी आपण दिवाळी इथे साजरी करीत आहोत. ” एवढे आपलेपण परक्या देशात अनुभवायला मिळेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. मला त्या क्षणी काय वाटले ते मला शब्दात सांगणे केवळ अशक्य आहे. परदेशात पणत्या कुठून मिळणार म्हणून काचेच्या रंगवलेल्या प्रत्येक पेल्यात मेणबत्ती लावून आज त्यांनी सगले आवार उजळून टाकले होते. एका साध्या, छोट्या गोष्टीतून त्या सार्यांनी माझे मन जिंकले होते. ही शाळा अर्थातच माझी सगळ्यात आवडती शाळा बनली. सुरुवातीला तिथल्या अभ्यासाची पद्धत, तिथले चालणारे वर्ग ह्यांचा अंदाज यावा म्हणून पहिले काही दिवस मी वर्गात राहून केवळ निरिक्षण केले आणि तेव्हाच तीन आठवड्यात साधारण कोणत्या शाळेत कधी आणि किती वेळासाठी जाणार ह्याचे वेळापत्रक बनवले. नंतर हळूहळू मी वर्ग घ्यायला सुरुवात केली. यथावकाश मुलांनाही माझ्या तिथे असण्याची सवय होत गेली. अर्थात Tuilerie मध्ये पहिल्यापासूनच मला एकटीला वर्गात सोडले जाऊ लागले आणि इतर शिक्षकांचे म्हणावे तसे सहकार्य नसल्याने इतर शाळेतल्या मुलांबरोबर यशस्वी ठरलेले व्यवसाय इथे हमखास आपटू लागले. वर्गात विषयांतर कसे करता येईल ह्याच्या खास युक्त्या मुले शोधू लागली आणि मला मात्र दर सोमवारी आणि शुक्रवारी Tuilerie त जायची भिती वाटू लागली. कधी कधी मलाच शिकवता येत नाही अशी माझीही खात्री पटू लागे आणि ह्या शाळेत ही स्थिती असताना दुसर्या शाळेत मात्र मी म्हटलेल्या कवितांचे आणि गाण्यांचे कौतुक होई. तिसर्या शाळेत माझ्या बरोबर नैमा ही इंग्लिश ची शिक्षिका नेहेमीच असे आणि त्यामुळे तिथेहि मला कधी अडचण येत नसे. Bosquet मध्ये मी प्रत्येक वर्गाला इंग्लिश जरी शिकवत नसले तरी त्यांचा वर्गशिक्षक नेहेमी बरोबरच असे; मग ते बालमंदीरात जाऊन इंग्लिश कविता म्हणणे असो किंवा छोट्या मुलांच्या वर्गात पंचतंत्रातल्या गोष्टी सांगणे असो. बोस्के मधले सगळेच शिक्षक रस घेऊन अणि खूप आपुलकीने वागत होते. आणि म्हणूनच तिथे तग धरून रहाणे सोपे गेले. माझ्याच बरोबर एका जर्मन असिस्टंटची नेमणूक ह्याच तिन्ही शाळांमध्ये झाली होती. ती ऑस्ट्रिया ची असूनसुद्धा एकंदरीत ती काही तिथले हवामान आणि परिस्थिती ह्याच्याशी जुळवून घेवू शकली नाही आणि डिसेंबर महिन्यातच ती घरी परत गेली. त्यामुळे जर्मन शिकणार्या मुलांना अचानक पणे तिचा मिळणारा सहवास नाहीसा झाला आणि इतर मुलांच्या बरोबर मी असल्याने त्यांचा हेवा वाटू लागला. ही गोष्ट लवकरच माझ्या लक्षात आली आणि मी मुद्दामहून स्वत: मधल्या सुट्टीत त्यांच्याशी बोलायला जायला सुरुवात केली. मुले कोणत्याही देशातली असोत शेवटी मुलं ती मुलं.. दुसर्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही ही भावना किती त्रासदायक असते ह्याचा अनुभव असल्यामुळेच मी त्यांनाही सामावून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यात थोडीफार यशस्वीही झाले. Tuilerie मधली मार्क आणि स्टिव्हन ही दोन भावंडे नेहेमी लक्षात रहातील.. मार्क चे शाळेतले शेवटचे वर्षे आणि धाकटा स्टिव्हन शाळेच्या पहिल्या वर्षाला.. मार्क आधीपासूनच जर्मन शिकत होता आणि त्यामुळे तो माझ्या वर्गात कधीच नसायचा. स्टिव्हन सुद्धा जर्मन शिकण्याच्या बाबतीत दादाच्या पावलावर पाऊल टाकणार हे तसे ठरलेलच.. कारण कोणती भाषा शिकायची हे ह्या वयात मुलांना कळणे तसे कठीणच आणि त्यामुळे बहुतेक वेळा त्यांचे पालकच ही निवड करीत असतात. खरं तर ह्या स्टिव्हनच्या वर्गात शिकवण्याची माझ्यावर वेळही आली नसती कारण शाळेच्या तिसर्या वर्षापासून हे भाषेचे तास सुरु होतात पण त्या शाळेत मला चार तास भरून काढायला काही वेळ कमी पडत होता आणि त्यामुळे त्यांना मी थोडावेळ गाणी किंवा कविता म्हणून दाखवाव्या असे त्यांच्या शिक्षकाने ठरवले. तिथला पहिला दिवस अजून आठवतो. इंग्लिश मधे आपण आपले नाव कसे सांगायचे ते मी त्यांना शिकवत होते. स्टिव्हन ला मी विचारले “My name is Rupali. What’s your name?” हाताची घडी, चेहेरा हुप्प, चष्म्याच्या वरून माझ्याकडे बघत तो अर्थातच फ़्रेंचमध्ये मला म्हणाला “मला इंग्लिश शिकायचे नाही. मला नाही आवडत. मी नाही बोलणार. ” दोन-तीनदा मी आणि वर्गशिक्षकाने चुचकारून झाले तरी मला जाहीर विरोध दर्शवणारी ती हाताची घडी आणि फुरंगटून बसलेला स्टिव्हन.. कोणीच जागचं हललं नाही.. ह्याचीच पुनरावृत्ती पुढच्या काही वर्गात झाली आणि एक दिवस One, Two, buckle my shoe म्हणत असताना इतर मुलांबरोबर हाही बुटांचे बक्कल लावायला खाली कधी वाकला हे त्याचे त्यालाही कळले नाही. मीही चेहेर्यावर काही आश्चर्य दाखवले नाही. मधल्या सुटीत स्टिव्हन माझ्या जवळ आला “आता परत कधी येणार तू आमच्या वर्गात? ” असे विचारणारा स्टिव्हन हिरमुसला जेव्हा मी त्याला मुद्दामच सांगितले, “नाही रे येणार आता बहुतेक मी.. कारण तुला इंग्लिश शिकायचे नाहीये. तुला आवडत नाही असे म्हणाला होतास तू मग राहूदे. ” “नाही. आता मला आवडते पण ते शिकायला. ” एखाद्या शिक्षकाला आणखी वेगळी पावती कोणती हवी आपल्या केलेल्या कामाची? मार्क ची गोष्ट आणखीच वेगळी.. दर वेळेस शाळेत गेलं की हा आधी येऊन मला हॅलो म्हणून जाणार, माझी चौकशी करणार.. सुटी चालू असेल तर इतर मुलं जरी फुटबॉल किंवा इतर काही खेळण्यात दंग असतिल तरी हा माझ्या बरोबर गप्पा मारणार. शिक्षकांना झेरॉक्स काढून देण्यात मदत लागली तर ती करण्याची जवाबदारी ह्याची असल्याने मला काही मदत हवी आहे का हे विचारणार.. भारताबद्दल, माझ्या घरच्यांबद्दल प्रश्न विचारणार. माझ्या आवडीनिवडी विचारणार. ह्या Tuilerie मधली जर्मन शिकणारी मुलं जेवढी माझ्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करायची तेवढंच माझ्या वर्गातली मुले उदासीन असायची. वर्षाच्या शेवटी शाळेचा वर्षिकोत्सव कधी आहे ह्याबद्दल इतर कोणीही चुकूनही माझ्याशी बोललं नाही, एक तिथली इंग्लिश ची शिक्षिका आणि हा मार्क ह्यांचा अपवाद सोडल्यास! “१७ जूनला रुपाली तू येशील का? मी ट्रंपेट वाजवणार आहे.. ” इति मार्क. “जमलं तर बघीन.. शनिवारी कधी शाळेसाठी आले नाहीये तेव्हा ही बस असते की नाही मला माहित नाही सकाळी शाळेत यायला. बघून ठेवेन बसचे टाईमटेबल आणि सांगेन पुढच्या वेळेस तुला ”, मी म्हटले. शाळेचा मुख्याध्यापक, इतर शिक्षक ह्यांच्यापैकी कोणीच जेव्हा मला काही सांगत नाही तेव्हा मला वाटेल तरी कसं तिथे जावसं? पण काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून मी ही सबब सांगून वेळ मारून नेली. पुढच्या शुक्रवारी मार्क चा पुन्हा तोच प्रश्न. “पाहिलस टाईमटेबल? आहे की नाही बस तुला यायला? ” आता आली का पंचाईत? एका टीचर कडे विषय काढला होता तर म्हणाली होती वर्षिकोत्सवाची तयारी चालू आहे असे पन पठ्ठी म्हणाली नाही, “ १८ये हो तू म्हणून.. १९ पुन्हा आपले मी बसबद्दल माहित नसल्याचे सांगितले. शुक्रवारी ह्या शाळेत मधल्या सुटीच्या आधीचा एक तास घेऊन मी बोस्के मध्ये जायचे तिथल्या दुपारच्या वर्गांमध्ये.. आणि मुळातच माझ्या शहरातून ह्या गावांमध्ये येणारी बस तासाला एकुलती एक असल्याने ह्या एक शाळेतून दुसर्या शाळेत जायच्या वेळेस मला चालतच जावे लागे. मार्क सुटीत जेवायला जाताना त्याच्या घरापर्यंतचे थोडे अंतर आवर्जून माझ्याबरोबर चालत असे. त्या दिवशी मी बरोबर असतानाच तो मला आधी बसस्टॉप वर घेवून गेला. स्वत: बसची वेळ पाहिली आणि त्या वेळेस यायला बस आहे हे पाहून “तू उद्या येणार आहेस सकाळी ” असे त्याने ठरवूनच टाकले. मला काहीच पर्याय न राहिल्याने मी म्हटले सहजच “अरे पण मला कोणी सांगितले नाहीये शाळेत उद्या येण्याबद्दल.. ” “नको सांगू देत ना.. मी सांगतो आहे ना? तू येणार आहेस! ” दुसर्या दिवशी मला कार्यक्रमाच्या हॉल मध्ये पाहून सगळ्यात जास्त आनंद झाला असेल तर तो मार्क ला आणि त्या इंग्लिश च्या शिक्षिकेला, जी आजारी असल्याने गेला आठवडाभर शाळेत येऊ शकली नव्हती. बरीचशी मुलं मी त्यांचा नाच पहायला आले आहे हे पाहून आनंदली पण “मी आग्रह केला म्हणून रुपाली आली आहे ” असे सांगताना मार्क चा चेहेरा वेगळाच खुलला होता. कितीही झाले तरी मुले निरागसच असतात अशी एक आपली समजूत असते परंतु ते नेहेमीच खरे नसावे असे वाटायला लावणारा एक अनुभव तिथेच असताना आला. Tuilerie मध्ये एक मुलगा होता २६ लार्बी नावाचा. आई-वडील मोरोक्कन होते. मला तर वर्गात त्रास द्यायचाच पण मुलांचेही त्यामुळे कामातले लक्ष उडून जायचे. सुट्टीत खेळत असतानाही इतरांबरोबर त्याची सतत भांडणं व्हायची. त्यामुळे सुटीतही शिक्षा व्हायची त्याला कोपर्यात उभं रहाण्याची. त्याच्या वर्गशिक्षिकेनं तर मला सांगून टाकलं होते की त्याने जर मला त्रास दिला तर मी त्याला जरूर वर्गाबाहेर काढावे आणि तिच्या वर्गात परत पाठवून द्यावे. पण मी माझी पुरी सहनशक्ती ताणून ठेवत असे आणि मला त्रास झाला तरी शक्य तेवढं दुर्लक्ष करीत असे. एक दोन वेळा वर्गातून बाहेर काढला, त्याच्या वर्गात परत पाठवला पण रोज रोज तरी त्या वर्गाला का म्हणून त्रास द्या असा विचार करून एक दिवस जेव्हा त्याची मस्ती फारच वाढली तेव्हा त्याला कोपर्यात उभं केलं २६ जरा वेळाने इतरही मुलं खूप मस्ती करायला लागली. वर्गाच्या चार कोपर्यात चार मुलांना उभं केलं.. पण उपयोग नाही. एकमेकांना पडद्याआडून खुणा करीत लार्बी महाशय शिक्षा भोगतायत. शेवटी मी वर्ग थांबवला आणि सगळ्यांना खाली पाठवून दिले.. त्यानंतर शाळेच्या वार्षिकोत्सवाच्या दिवशी हाच लार्बी खेळण्यातल्या अस्वलाची उडवाउडवी करीत होता जेव्हा शालेचे मुख्याध्यापक वार्षिक आढावा घेत होते आणि गावचे मेयर आणि इतर प्रतिष्ठित माणसे तिथेच आमच्या मागे बसून त्याची ही मस्ती बघत होती.. ती मस्ती सहन न होऊन मी ते अस्वल हस्तगत केलं आणि कर्यक्रम संपल्यावरच त्याला परत दिलं. ह्याच सगळ्याचा राग की काय कोण जाणे पण ह्या शाळेचा निरोप घेण्यापूर्वी मी जेव्हा ग्रुपफोटो काढायला सगळ्यांना बोलावले तेव्हा हा एकटाच कितीही बोलवून शेवटपर्यंत आला नाही. खरं तर ह्या आठ वर्षाच्या मुलानं एवढे वाकड्यात शिरायची गरज नव्हती पण कदाचित इतर सगळ्या चांगल्या अनुभवांनी मीच हुरळून जाऊ नये ह्याचसाठी असा एक कडू अनुभव सुद्धा ह्या वास्तव्यात मला त्या वरच्याने दिला. असाच एक प्रसंग ज्यातून एका पालकातली माणुसकी मला दिसून आली. जानेवरीतल्या गारठून टाकणार्या थंडीत, एका संध्याकाळी साडेपाचची बस पकडायला मी पाच मिनिटं कमी असताना शाळेतून निघून बसस्टॉप वर पोहोचले.. आणि जवळजवळ पावणेसहा होऊन गेले तरी बस काही आली नाही. दर तासाला एकदाच येणार्या बसची वेळ होऊन गेल्यावरही तिथे कोणी उभे आहे ह्याचे अश्चर्य वाटून रस्त्यातून जाणार्या एका मुलीने मला विचारले की मी Valenciennes ला जायला उभी आहे का. मी अर्थातच हो म्हटले.. त्यावर ती म्हणाली “अगं आजपासून बस चा रुट बदलला आहे इथून दोन स्टॉप सोडून पुढच्या स्टॉप वर जा.. साडेपाचची बस निघून गेली आहे आता साडेसहाची बस मिळेल तुला. ” मी सकाळी आले तेव्हा बस नेहेमीच्या रुटनेच गेली होती त्यामुळे मला ही शंका काही आली नव्हती. आता तिथल्या फ़लकावर लावलेलं अशा आशयाचे पत्रक मी पाहिले आणि त्या दुसर्या स्टॉप पर्यंत चालत गेले. बस यायला अजून किमान चाळीस मिनिटं होती. रस्त्यावर नाही चिटपाखरूही आणि थंडी तर अगदी जीवघेणी. ख्रिस्तोफ शाळेत एका मिटिंग मध्ये होता नाहीतर त्याला सांगितल्यावर त्याने लगेच सोडले असते मला घरी पण त्याला आज डिस्टर्ब करणं बरं वाटेना. शेवटी देवाचे नाव घेत मी तिथे उभी कारण छोटा स्टॉप असल्याने बसायचीही सोय नव्हती. एक गाडी जाता जाता अचानक माझ्या समोर थांबली. माझ्यासारख्या परदेशी मुलीला पाहून तिथे कोणीही मला रस्ता तर नक्कीच विचारणार नव्हते त्यामुळे कोणी बोलायला आलच तर नक्की काय करावे ह्याचा विचार करीत असतानाच आतून प्रश्न आला. Valenciennes “ला जात्येस का? बस चुकली का तुझी? ” गाडीत नक्की कोण आहे हे नीटसे पाहिलेही नव्हते मी.. तेवढ्यात “घाबरू नकोस मी बोस्केतल्या कीमची आई.. मी सोडते तुला घरी, बस गाडीत. ” असे शब्द कानी आले. मला प्रत्येक शाळेतली किमान शंभर अशी तीन शाळांतली मुलं त्यांच्या नावासकट लक्षात रहाणे कसे शक्य आहे? आणि मुलांना बघून ओळखलेही असतं मी पण त्यांच्या पालकांनाही? विचार करण्याएवढा वेळही नव्हता आणि ते बरंही दिसलं नसतं त्यामुळे मी निमुटपणे गाडीत बसले. विरुद्ध दिशेला चाललेली कीमची आई केवळ मला सोडायला वेळ काढून माझ्या घरी मला पोहोचवायला आली. मी थंडीने एवढी गारठून गेलेली असताना तिने दाखविलेल्या माणुसकीने मला पार भारावून टाकलं. तिचे अनेकदा आभार मानूनही नंतर मला काहीतरी राहून गेल्यासारखे वाटत राहिले. त्या दिवशी सकाळी बातम्या ऐकायला टी.व्ही. लावला आणि शेहेनाईचे सूर कानी पडले. बातम्यांमध्ये सुप्रसिद्ध शहनाईवादक बिस्मिल्लाह खन निवर्तल्याची बातमी ऐकली.. खरेतर हे होणार हे माहीतच होते पण तरीही मन सुन्न झाले क्षणभर.. ती शेहेनाई ऐकताना शाळेतला तो दिवस आठवल २६ भारतीय संगिताबद्दल बोलताना खास भारतीय शेहेनाई ह्या वाद्याची मी एका वर्गात ओळख करून दिली होती. शेहेनाईची सीडी माझ्या मुलांना मी ऐकवली. शेहेनाईचे अपरिचित सूर ऐकून सुरुवातीला ते विचित्र वाटून त्या सात वर्षाच्या मुलांत खसखस पिकली. पण नंतर त्या शेहेनाईचे आणि तिच्या वादकाचे फोटो बघत असताना एकीकडे त्यांचे कान ह्या नव्या आवाजाला सरावले आणि हीच मुलं नंतर गुंग होऊन गेली. जगप्रसिद्ध खानसाहेबांची कोणाला काय ती ओळख करून देणार माझ्यासारखी छोटी माणसं पण मला किमान माझ्या काही मुलांना तरी ही शेहेनाई ऐकवायला मिळाली आणि त्यांना ऐकायला मिळाली ह्याचा आज आनंद होतोय. असाच आनंद होतो ह्या जाणीवेतून की बोस्केतली थोडीच का होईना पण इंटरनेट क्लबच्या निमित्ताने काही मुलं भारताचा झेंडा, भारताचे राष्ट्रीय फूल, फळ, प्राणी, पक्षी, खेळ हे सगळं जाणून घेऊ शकली. आज त्यांना ताजमहाल माहित आहे. गेट वे ऑफ़ इंडिया आणि लाल किल्ला त्यांना ओळखता येतो. आणि ह्याचे अप्रूप वाटते की रुपालीला फ़्रांसमधून तिच्या घरी जायला विमानात किमान नऊ तास एका जागी बसावे लागते. पॅरीस हे नाव ऐकून माहित असणार्या ह्या पिलांना आपल्या देशाची ती राजधानी आहे ह्याची जाणीव होत नाही कारण त्यांची ह्या वयात तो दुसरा एक देश आहे अशी समजूत आहे पण भारताची राजधानी नवी दिल्ली आहे हे त्यांना विचारता क्षणी सांगता येतं. डिसेंबर महिन्यात साडी नेसलेल्या रुपालीने लावलेल्या टिकलीची, बालमंदिरातल्या पाच वर्षाच्या Brandon ने सहा महिन्यांनंतरही ठेवलेली आठवण पाहून माझी आई सुद्धा आश्चर्यचकित झाली जेव्हा तिची टिकली पाहून तिच्याकडे बोट दाखवत तो उद्गारला २६ टिकली! Brandon ची जशी हुषारी तशी लक्षात रहाते ती Charlotte चि निरागसता. रुपाली मुंबईची आहे. तिला फ़्रेंच येत. ती Valenciennes ला रहाते हे सगळे माहित असूनही तिनं मी अच्छा करून वर्गातून बाहेर पडताना एक दिवस मला विचारलं , “ तुझे विमान कुठे ठेवलं आहेस? ” माझ्या चेहेर्यावर भलंमोठं प्रश्नचिंन्ह! “बागेत ठेवतेस का ते नेहेमी? ” हा पुढचा प्रश्न. “विमान नाहीये माझे. ”, मी म्हटले. “मग तू घरी कशी जाणार? ” रुपाली घरी जाते म्हणजे रोज नऊ तास विमानातून प्रवास करून मुंबईला जाऊन दुसर्या दिवशी परत शाळेत तशीच येते अशी त्या बिचारीची समजूत झाली होती हे त्या वेळेस मझ्या उघडकीसं आलं. जून महिन्याच्या चोवीस तारखेला, शनिवारी, बोस्केचा वार्षिकोत्सव होता. मी जरी शनिवारी शाळेत जाणार होते तरी तेवीस तारखेला सगळ्यांचा वर्गात औपचारिक निरोप घेतला कारण त्यानंतर इंग्लिशचे शाळेतले तास संपणार होते. मोठी मुलं पुढच्या वर्षी शाळेत परत येणार का विचारत होती. कागदाच्या चिठोर्यावर आपलं नाव, पत्ता लिहून देत होती.. काही जण माझा पत्ता लिहून मागत होती. बालमंदिरातली मात्र मी परत जाणार हे मानायलाच तयार नव्हती. अनेक वेळा सांगूनही पुढच्या शुक्रवारी भेटूच असं परत परत सांगत होती. “उद्या मी वार्षिकोत्सवासाठी येईन पण आजचा वर्ग शेवटचा. पुढच्या शुक्रवारी तुम्ही शाळेत असाल तेव्हा मी विमानात असेन आणि घरी मुंबईला परत जात असेन. ” असं सांगूनही ह्यांचे आपलं तेच. वर्गात फोटो काढून झाले, पन्नासदा अच्छा करून झालं. शेवटी वर्गशिक्षिकेच्या सांगण्यावरून प्रत्येकानी माझी पापी घेत माझा गाल चिकट करून टाकला आणि आमचे निरोप घेणं संपले. माझा मात्र पाय निघत नव्हता. दुसर्या दिवशी मला पुन्हा शाळेत बघून मी खोटं सांगितले ह्याची त्यांना खात्री पटली. त्यांची समजूत बदलण्याचा मीही प्रयत्न केला नाही कारण मी परत जाणार आहे असे ठासून सांगताना मलाही काही कमी यातना होत नव्हत्या. एकंदरीत मी तिथे असल्याचा त्या लहानग्यांना खूप आनंद आहे ह्यातच मला आनंद होता. वार्षिकोत्सवाच्या कार्यक्रमात ख्रिस्तोफ़ने माझे आभार मानले. मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. माझ्या नावाच्या आरोळ्या मारल्या.. मी स्टेजवर चढून अभिवादन केल्याशिवाय त्यांचे समाधान झालं नाही. आज निरोप घेणं आणखीच कठीण गेलं कारण आजचा दिवस नक्कीच शेवटचा हे माझेही मन मानायला नाखूष होतं. ह्याच अंगणात मी कधी मुलांसोबत बास्केटबॉल खेळले तर कधी कोणाला मारामारी केल्याबद्दल दटावले होते. कधी कोणा रडणार्याची समजूत काढली होती तर कधी कोणाची चेष्टा केल्याबद्दल त्याला दम भरला होता. माझा आणि ह्या शाळेचा सहवास वाटला तरी संपला नव्हता. शाळेचं एक पुस्तक माझ्याचकडे राहिल्याचे लक्षात आल्यामुळे मंगळवारी परत मी शाळेत गेले. परत भेटणार नाही असं सांगूनही परत शाळेत दिसल्यावर काही मुलांनी भूत पाहिल्यासारखा चेहेरा केला आणि बालमंदिरातल्या मुलांनी “रुपाली ह्या पुढे शुक्रवार ऐवजी मंगळवारी येणार आहे ” अशी समजूत करून घेऊन माझे पूर्वी एवढ्याच प्रेमानं स्वागत केलं. जवळजवळ नऊ महिन्यांपुर्वी जेव्हा मी प्रथम शाळेत गेले होते तेव्हा ह्याच चिमुकल्यांनी मझ्याकडे थोड्याशा परक्या, थोड्याशा आश्चर्यचकित आणि बर्याचशा उत्सुक नजरांनी पाहिले होते.. आज नऊ महिन्यांनी मी त्यांना इंग्लिश शिकवणारी पण जणु त्यांची मैत्रीण बनून गेले होते. मला पाहिल्यावर बटरफ़्लाय म्हणजे पापियॉन, कॅट म्हणजे शा, हॉर्स म्हणजे शव्हाल असे मला भेटताक्षणी उजळणी करणारा Theo, मला भेटल्यावर माझ्याशेजारी आधी बसून माझं कानातलं, गळ्यातलं अगदी हातानेही चाचपून छान आहे असे सांगणारी Anaïs, माझ्याच वर्गात माझे लक्ष नाही असं बघून अगदी टिश्यु पेपरवर चित्र काढून देणारी Claire ! कोणाकोणाच्या म्हणून किती आठवणी अजूनही ताज्या आहेत. आज शिक्षक दिन! शाळेत असताना शिक्षकांना त्या दिवसापुरती विश्रांती देऊन अगदी शिपायापासून ते मुख्याध्यापकापर्यंत सगळ्यांची जवाबदारी विद्यार्थांनी पार पाडायची अशी आमच्या शाळेची पद्धत होती. मी कधीही त्या थोड्या वेळासाठीही शिक्षकाच्या भूमिकेत शिरायला गेले नाही. आज एवढ्या वर्षांनी मी तेही धाडस केलं. “मी केलं ” असं म्हणण्यापेक्षा कदाचित माझ्या ह्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडून करवून घेतलं असे म्हणणं जास्त योग्य ठरेल. मला अनेक बरे-वाईट अनुभव देताना मला खूप सारा विचार करायला लावला. मला शिक्षक व्हायची पहिल्यांदाच संधी दिली. त्यांच्यापैकी पुन्हा कोणी मला भेटणार तर नक्कीच नाही. पण त्यांची आठवण मला आहे आणि कायम राहिल. केवळ त्यांच्यामुळेच मी औटघटकेची का होईना पण शिक्षिका म्हणवून घेत्येय ह्याची मला जाणीव आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानून मला ऋणातून मोकळे व्हायचे नाही म्हणूनच आजच्या दिवशी त्यांच्याच आठवणी कायमसाठी शब्दबद्ध केल्या.
|
Moodi
| |
| Wednesday, September 06, 2006 - 4:15 am: |
| 
|
अप्रतीम लिहीलयस रुपाली. शिक्षकदिनानिमीत्तची ही तुझी अनोखी भेट खूप आवडली. अजून लिहीत रहा तुझे फ्रांसमधील अनूभव. 
|
Bee
| |
| Wednesday, September 06, 2006 - 4:17 am: |
| 
|
वा सुंदर वर्णन केले आहेस.. हे तू दिवाळी अंकासाठी राखून ठेवायचं असतं कारण त्यामुळे अंकाला uniqueness येते.. पण आता मग दुसरे काहीतरी लिहायला घे... काय???? :-) तुला ही संधी कशी मिळाली तेही लिहायच असतं...
|
Shyamli
| |
| Wednesday, September 06, 2006 - 4:20 am: |
| 
|
छानच ग रुपाली... अजुन अनुभव वाचायला आवडतील आहे का ग ओळख
|
Lopamudraa
| |
| Wednesday, September 06, 2006 - 4:42 am: |
| 
|
chaan ch lihilay..!!!.. .. .. ..
|
Limbutimbu
| |
| Wednesday, September 06, 2006 - 4:48 am: |
| 
|
सोनचाफा! टूऽऽऽऽऽ गुड! gr8 एका दमात वाचुन काढल! वेगळ्याच विश्वात फिरवुन आणलस! 
|
Mrinmayee
| |
| Wednesday, September 06, 2006 - 11:16 am: |
| 
|
रुपाली, फारच छान लिहीलय. तुझी तिथली दिवाळी आणि एकुणच वास्तव्य माझ्याही कायम कक्षात राहील!
|
Saurabh
| |
| Wednesday, September 06, 2006 - 2:01 pm: |
| 
|
सुंदर! छान लिहिलं आहेस रुपाली!
|
Fulpakhru
| |
| Wednesday, September 06, 2006 - 3:42 pm: |
| 
|
रुपाली छान लिहिले आहेस. अजून लिहीत रहा असच.
|
Asmaani
| |
| Wednesday, September 06, 2006 - 3:45 pm: |
| 
|
खूप छान लिहिले आहेस रुपाली!
|
Sashal
| |
| Wednesday, September 06, 2006 - 5:39 pm: |
| 
|
सुरेख आहे शिक्षकदिनाची भेट .. कौतुक करावं तेव्हढं कमीच वाटतंय, एका परदेशी शिक्षकावर एव्हढं प्रेम करण्यार्या त्या मुलांचं आणि खासकरून रुपाली तुझं ..
|
Arch
| |
| Wednesday, September 06, 2006 - 9:09 pm: |
| 
|
रुपाली, मनापासून आवडला तुझा लेख. दुसरी भाषा अस्खलीत येत असल्यामुळे तुला मुलांची मनं अगदी पूर्णपणे कळली नाही?
|
Shonoo
| |
| Wednesday, September 06, 2006 - 10:58 pm: |
| 
|
रुपाली किती सुरेख लिहिलं आहेस. चाकोरी बाहेरचे हे कार्यक्षेत्र तू कसं निवडलंस, यात तुला काय अडचणी आल्या, कुठे अनपेक्षित मदत मिळाली, इत्यादी पण वाचायला आवडेल. तुझे फ़्रेंच शिकण्याचे अनुभव पण लिही. पहिल्यांदा देशाबाहेर तेही न्यु यॉर्क, कॅलिफ़ोर्निया, सिन्गापूर, लन्डन अशा मुम्बै-पुण्याच्या एक्स्टेंशन मधे न राहता फ़्रांसमधल्या छोट्या शहरात राहण्याच्या अनुभवांबद्दल पण लिही.
|
Kshipra
| |
| Thursday, September 07, 2006 - 1:02 am: |
| 
|
रुपाली, मस्त लिहिल आहेस.
|
Psg
| |
| Thursday, September 07, 2006 - 1:58 am: |
| 
|
मस्त लिहिलं आहेस! वेगळा अनुभव! फोटो असतील तर तेही टाक ना...
|
Raina
| |
| Thursday, September 07, 2006 - 2:48 am: |
| 
|
सोनचाफा- खूप छान लिहीलं आहे. खरच अविस्मरणीय अनुभव.
|
Maudee
| |
| Thursday, September 07, 2006 - 3:45 am: |
| 
|
ख़ूपच सुरेख़ लिहिले अहेस रुपाली.
|
Paankaj
| |
| Thursday, September 07, 2006 - 6:10 am: |
| 
|
Khupach shan rupali.tu link pathavalyamule mala ek shan oghavatya shailitil lekh vachayala milala.
|
Meggi
| |
| Thursday, September 07, 2006 - 9:14 am: |
| 
|
रुपाली, तु खरचं भाग्यवान आहेस कि तुला इतक्या गोड मुलांना शिकवायला मिळालं आणि त्यांचं प्रेम मिळालं. तुझे अजुन काही अनुभव वाचायला आवडतील
|
Hawa_hawai
| |
| Thursday, September 07, 2006 - 1:00 pm: |
| 
|
छान लिहिलं आहेस. दिवाळीचा part सही आहे.
|
|
|