Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 18, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » श्रावण » कथा कादंबरी » अंजली देशपांडेची कथा » Archive through August 18, 2006 « Previous Next »

Dineshvs
Wednesday, August 16, 2006 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा मोबाईल नंबर सहसा मी फार कोणाला देत नाही. त्यामुळे तिने माझा नंबर माझ्या कुठल्यातरी मित्राकडुनच मिळवला असावा. पण ते तिलाच विचाराता आले असते, प्रत्यक्ष भेटीत.
तर असाच एका संध्याकाळी मला फोन आला. नावाची वैगरे खात्री करुन झाल्यावर, मला तिने भेटायची ईच्छा दाखवली, माझ्या कुठल्यातरी एका जुन्या कथेबाबत तिला बोलायचे होते. खरे तर मला त्या कथेचे नाव अजिबात आठवत नव्हते. अंजली देशपांडेची कथा, असेच ती म्हणाली.
मला माही वाटत कि असे काहिसे नाव मी कुठल्या कथेला दिले असेल. त्याकाळी नुकतीच कथा वैगरे लिहायला सुरवात केली होती. पहिल्यांदा जसे सगळेच अनुकरण करत असतात, तसाच मीही त्याकाळी प्रसिद्ध होत असलेल्या वामकुक्षी, मासिकातील कथांवर माझ्या कथा रचत होतो. " तिचे काय चुकले ? " , " हा खेळ सावल्यांचा " , राहिले दुर घर माझे " अशी काहिशी नावे असत त्या कथांची, तश्या कथा अजुनहि प्रसिद्ध होत असाव्यात. आता मी मात्र त्या वाचणे सोडुन दिलेय. हिंदी फ़ॉर्म्युला सिनेमाप्रमाणे, त्या बर्‍याच प्रेडिक्टेबल असायच्या. पण माझी कथा, खास करुन तिचा शेवट बहुदा वेगळा होता. अंजली देशपांडे हे नाव मात्र नक्कीच होते, नायिकेचे.
अंजली देशपांडे, नाव अगदी ओळखीचं वाटतय ना ? खरं तर तूमच्याहि ओळखीपाळखीत एखादी तरी अंजली देशपांडे असणारच. पण खुपदा तिच्याविषयी खास असे काहि नसते.
म्हणजे ती व्यवस्थित शिकते बिकते. ती गोरी असते, तिचे केस कुरळे असतात. तिचे योग्य वयात लग्नबिग्न होते, तिची मंगळागौर वैगरे रितसर पार पडते. सासु जराशीच छळते, नणंद अधुन मधुनच टोमणे मारते. तिचे सातव्या महिन्यात ओटिभरणे वैगरे होते. तिला दोन मुले होतात. एक मुलगा आणि एक मुलगी. नोकरी करत असली तर ती मुलांसाठी म्हणुन सोडतेच. तिची मुले बर्‍यापैकी हुषार असतात. ती स्कॉलरशिपच्या परिक्षेला बसतात, चित्रकलेच्याहि परिक्षेला बसतात आणि टिळक विद्यापिठाच्या परिक्षेलादेखील. एकंदर संसारात ती खाऊन पिऊन सुखी असते. ती एकाच नवर्‍याबरोबर मरेस्तोवर संसार करते. नवरा कसाहि असला तरी.
कदाचित तूमच्या ओळखीतल्या अंजली देशपांडेच्या बाबतीत काहितरी वेगळे घडले असेलहि. म्हणजे तिला कदाचित दोन्ही मुलीच झाल्या असतील, किंवा दोन्ही मुलगेच. कदाचित तिने नोकरी सोडलीहि नसेल. पण हेहि तसे नॉर्मलच.
अरे हो, सांगायचे राहिलेच, हे तिचे नाव सासरचे असते. माहेरचे आडनाव, केसातला सुकलेला गजरा जितक्या सहजतेने काढुन फेकावा तसे तिने विसरलेले असते. फेकण्यापुर्वी बायका त्याचा हमखास वास घेतात, तसे तिचे मन क्षणभर हुळहुळले पण असते.
तिचे नाव मात्र तेच राहते, नाही म्हणायला तिच्या नवर्‍याने लग्नात ताम्हणातल्या तांदळावर, अंगठीने काहितरी नाव लिहिलेले असते. तिला मुंडावळ्यांमुळे ते नीट दिसलेले नसते आणि, ताम्हणातले तांदुळ लग्न लावणार्‍या भटजीने दुसर्‍या विधीसाठी मुठीने भसकन उचलल्यामुळे, ते नंतर कुणालाच आठवत नाही. तिचा नवरा, काहि दिवस हळुच त्या नावाने हाक मारतो, पण तिला त्या नावाची सवय होत नाही, कधी. शेवटी वैतागुन तो तिला, अंजलीच म्हणु लागतो. अधुनमधुन तो अंजु म्हणुन बघतो, पण बरं नाही दिसत, सगळ्यांसमोर, या सबबीखाली ती ते टाळते.
तर अशीच कुणीतरी ओळखीतल्या अंजली देशपांडेच्या आयुष्यातल्या एका घटनेवर, माझी कथा बेतलेली असावी. त्या काळी मी माझी कॉपी वैगरे ठेवत नसे, म्हणुन भेटीपुर्वी काहि वाचावे, अशीहि परिस्थिती नव्हती. ईतक्या वर्षानंतर असे काहि घडेल असे वाटलेहि नव्हते.

ठरलेल्या दिवशी, मी जहांगिरमधल्या सामोव्हर मधे बसलो होतो. तिची वाट बघत बसलो होतो, असे म्हणणे एकाचवेळी निर्लज्जपणाचे आणि खोटेपणाचे ठरेल.
बायका सहसा वेळ पाळत नाहीत. म्हणुन ती वेळेवर येईल, अशी अपेक्षाच नव्हती, पण ती वेळेवरच नव्हे तर वेळेआधी पाच मिनिटे आली. माझे फोटो वैगरे लोकानी बघितलेले असल्याने, तिने मला लगेचच ओळखले.मी जरी दरवाज्याकडे तोंड करुन बसलेलो असलो तरी, आत येणार्‍या प्रत्येक बाईकडे रोखुन पाहणे टाळत होतो. कारण बायकाना तसे बघितलेले वराक्रणी तरी आवडत नाही. म्हणुन मी डोळ्यासमोर पुस्तक धरले होते, तरिही येणार्‍या प्रत्येक बाईकडे बघतच होतो. फोनवरच्या आवाजावरुन ती मध्यमवयीन असावी, असा माझा कयास होता.
पण तिने खरेच फार वाट बघायला लावली नाही. माझ्या मनात थोडीफार धाकधुक होती, कारण, तुमच्या त्या अंजली देशपांडेची कथा माझ्याशी संबंधित आहे, असे काहिसे ती फोनवर बोलली होती. मी खरेच काहि वेडेवाकडे लिहिले होते का ते आठवत होतो, पण स्मरणशक्ती दगा देत होती. आणि बहुतेक कथा जरी वास्तवातल्या एखाद्या, सांगीवांगीच्या का होईना, घटनेवर आधारित असल्या, तरी त्या व्यक्तीचा थेट संदर्भ वा सुचन होणार नाही, अशी काळजी घेतली जातेच, मीहि घेतली असणारच.

ती आलीच, आधी समोव्हर ते केवढे, त्यात एकटा बसलेला माणुस म्हणजे मीच असणार ना, तर ती सरळ माझ्याकडेच आली. " नमस्कार, बसलं तर चालेल ना ? " असे विचारत ती बसली देखील.
" हो, हो बसा ना, काय मागवु ? मी विचारले. " तुम्हाला आवडते ते " असे तिचे उत्तर आल्यावर मी नेहमीप्रमाणे समोसा मागवला.
" हं तर बोला. " मी सुरवात करुन दिली. मी तुमच्या लेखनाची चाहती आहे, तुमच्या बहुतेक सगळ्या कथा मी वाचल्या आहेत, वैगरे वैगरे प्रास्ताविक झाल्यावर, ती मुळ मुद्द्याकडे वळली.
" खरे तर ईतकी वर्षे तुमची ती कथा अजुन लक्षात आहे. त्या संदर्भातच तुमच्याशी बोलायचे होते, मला सांगाल का, कि ते सगळे एवढ्या डिटेल्स्मधे तुम्हाला कसे कळले ? " तिने विचारले.

" काय असतं ना, कि कथेचे मुळ वैगरे असे सांगता येत नाही. " मी सावध पवित्रा घेतला.

" ओह सॉरी, तूम्हाला बोलायचे नाही का त्याविषयी. मी तुमची ईच्छा विचारलीच नव्हती. " तिने दिलगिरी व्यक्त केली.

" नाही नाही, तसे नाही, पण कथा अश्या पुर्णपणे वास्तव नसतात. थोडेफार तपशील पदरचे घातलेले असतातच. पण आपण बोलु ना, बोलायला काहिच हरकत नाही. फ़क्त मला काय म्हणायचं होतं, कि कथेतले सगळेच संदर्भ खरे नसतात. " मी बाजु सावरण्याचा प्रयत्न केला.

" पण मी सांगते ना, या कथेतले ९० % तपशील वास्तव होते. मला तर असेहि वाटले कि उरलेले १० % हे केवळ संबंधित व्यक्ती दुखावल्या जाऊ नयेत म्हणुन लिहिले असावेत. आणि तुम्ही हि कथा पुर्णपणे काल्पनिक आहे, असे लिहिलेहि नव्हते. " तिचा रोख आता माझ्या लक्षात येऊ लागला होता.

" तुम्ही म्हणताय तसा उल्लेख, सिनेमा मधे वैगरे केलेला असतो. म्हणजे कुणाहि जिवित वा मृत व्यक्तीशी काहि संबंध नाही, आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा वैगरे वैगरे. कुठयाहि कथेखाली, मी असे लिहिलेले बघितले नाही कधी. शिवाय काय असतं ना, कि कथेचा जीव असतो अगदी छोटासा, त्यात येणार्‍या पात्रांच्या जीवनातले तपशील तर अगदीच त्रोटक, म्हणजे जितके कथेसाठी आवश्यक तितकेच. आता हे तपशील काय, कुणाच्याहि आयुष्यातले असु शकतात, जसे तूमच्या तसेच माझ्यादेखील. " मी खुलासा केला.

" मी ईतकी वर्षे मनात हा सल ठेवला होता, कि ईतके सगळे डिटेल्स तूम्हाला कसे कळले म्हणुन. आणि तूमच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे तुम्ही एका धक्कादायक उल्लेखावर ती कथा संपवलीय. त्या नंतर काय झाले असावे, याचा विचार वाचकांवरच सोपवला होता. " तिने सहजपणे माझ्या कथांचे वैशिष्ठ सांगुन टाकले.

" पण तूम्ही अजुन हे नाही सांगितले, कि तुमच्याशी हि कथा कशी संबंधित आहे, ते " माझी उत्सुकता लपत नव्हती.

" खरे तर तुम्ही लिहिले होते, ते अंजलीचे वर्णन अगदी बरोबर होते. आणि रितसर शिक्षण, लग्न, मुलं वैगरेहि अगदी तसेच. म्हणजे तपशीलात किरकोळ ईकडे तिकडे असेल, पण बाकि सगळेच वास्तव. पण ज्या तर्‍हेने तूम्ही तिच्या नवर्‍याचे आणि नीता जोशीचे प्रेमप्रकरण लिहिले होते, ते जरा अतिशयोक्तीचे होते. " तिने मला आणखीनच गोंधळात टाकले.

" म्हणजे, मी समजलो नाही. जरा आणखी डिटेल्स मधे सांगणार का ? अर्थात तुमची हरकत नसेल तरच. मी जे लिहिले होते, ते बहुतांशी काल्पनिकच होते. " मी माझीही बाजु स्पष्ट करुन टाकली.

" सुनीता जव्हेरीचे, नीता जोशी केलेत, एवढेच काल्पनिक. पण मला तरिही तूम्हाला विचारायचे होते, कि हे तपशील तुम्ही कसे भरता ? मला खरेच ऊत्सुकता आहे, अर्थात तूमची हरकत नसेल तरच हं " ती माझा पिच्छा सोडतच नव्हती.

मी जरा खाकरुन घेतले " काय असतं ना, कि कुठलहि कथाबीज असे तुटकच असते, त्याचा विस्तार करावा लागतो. असलेल्या रिकाम्या जागा भराव्या लागतात. आम्हा लेखक मंडळीना एक छंद असतो. खोड म्हणुया हवं तर. आम्ही कायम कल्पना करत राहतो. कि बाबा हि व्यक्ती, अमुक एका प्रसंगात कशी वागेल. तिच्या तोंडी नेमके काय शब्द असतील. याचा विचार करता करता, मग हळु हळु सगळे सुचत जाते. जणु काहि तेच पात्र स्वतःच्या तोंडाने आमच्या कानात कुजबुजुन जाते. कधी कधी तर, असं वाटतं कि कुणीतरी आपल्या हातुन काहितरी लिहुन घेतय. हे खरे तर सांगायच्या पलिकडचे असते. पण जे हातुन लिहुन होतं ते मात्र त्या पात्राच्या संदर्भात
चपखल बसतं " मी खरेच मनापासुन खुलासा करायचा प्रयत्न केला.

" तूम्ही म्हणताय ते कळतय मला पण पटत नाही. हे सगळे अतिंद्रीय अनुभव बाजुला ठेवु या. मला फक्त हेच म्हणायचे होते कि, कदाचित तुमच्या वैयक्तिक अनुभवांचा वा विचारांचा परिणाम या लेखनावर अवश्य होत असणार नाही का ? " तिने बराचसा प्रॅक्टिकल व्यु घेतला होता.

तरिही मी न समजल्याचा आव आणला, " म्हणजे मी समजलो नाही. "

" म्हणजे तुम्ही असा विचार करत असाल, कि तुम्ही त्या व्यक्तीच्या जागी असता तर कसे वागला असता. किंवा त्या व्यक्तीने कसे वागावे, याचे तूम्ही आडाखे बांधता. मला कबुल आहे, कि तुमचे आडाखे बरेचसे वास्तवाच्या जवळपास जाणारे असतात. पण शेवटी ते आडाखेच असतात. वास्तवाशी थोडीफार फारकत झालेली असते. " आता मलाहि तिचे म्हणणे पटु लागले होते. पण तरिही विचारलेच.

" पण मग त्या कथेच्या शेवटाचे काय. तो तर धक्कादायकच होता ना. त्या वेळी आठवत, खुप वादंग उठला होता त्या कथेवरुन. " आता मला ती कथा आठवु लागली होती.

" अहो शेवट धक्कादायक करणे हिच तर तुमची कला ना. पण खरे सांगु ईथेहि मला तूमचा वैयक्तिक व्ह्यु दिसतो. म्हणजे खुपदा आपल्याला असे वाटत असते, कि आपण या प्रसंगी असे वागायला हवे होते, तसे बोलायला हवे होते. पण ते मनाच्या कमकुवतपणाने म्हणा, वा परिस्थितीच्या रेट्याने म्हणा, तसे वागायचे, बोलायचे धाडस आपल्याला होत नाही. म्हणजे एका अर्थाने तूम्ही तूमच्या सुप्त ईच्छा पात्रावर लादता असे नाही तूम्हाला वाटत ? तूमच्या कथेतील अंजली शेवटी तिच्या नवर्‍याला काय म्हणते, आजहि माझ्या लक्षात आहे. मी ते तूम्हाला आजहि म्हणुन दाखवु शकते. ती म्हणाली होती, तूम्ही आणि तुमच्या ऑफ़िसमधली नीता या दोघांबद्दल मला सगळे समजलेले आहे. कदाचित ते सगळे नसेलहि, पण जितके कळलेय तेवढे मला पुरेसे आहे. यात दोष कुणाचा या वादात मला पडायचे नाही, कारण मला तशी त्याची गरजहि वाटत नाही. आता यातुन मार्ग कसा काढायचा याचाच विचार मी करते. तूम्ही नीतामधे काय बघितले वा तिने तूमच्यात काय बघितले याची मला फ़िकीर नाहीच, शिवाय माझ्यात काय कमी आहे, याचीहि मला आता फ़िकीर नाही.
मी आता फ़िकीर नाही, असे म्हणतेय. कारण काहि दिवस, मीहि, आपण कुठे कमी पडलो, याचा विचार करत होते, मग मी स्वतःला सिद्ध केले. अगदी ठरवुन, जाणुनबुजुन मी एका तरुणाला भुलवले.
मी नेमकी कुठली पातळी गाठली, ते मी सांगणार नाही, पण एक सांगते, फार सोपे होते ते मला, त्यामुळे मला कुणाची ईर्षा वाटत नाही.
यापुढे माझी वागणे कसे असेल हे तूमचे वागणे कसे असेल, यापेक्षा मला काय वाटतेय यावर अवलंबुन असेल;. मी तूम्हाला कुठलाच सवाल करणार नाही आणि अर्थातच कुठलाहि जबाब देणार नाही. " तिने अगदी आवेशात येऊन हे सांगितले. तिचा आवेश बघुन, आजुबाजुच्या काहि नजरा आमच्याकडे रोखल्या गेल्या.
" पण लेखकमहाशय चुकलात हो तुम्ही. अंजली तसे नाही म्हणाली काहि. तिला तसे म्हणावेसेहि वाटले नाही. तुमचे पुर्वग्रह तिने साफ खोटे ठरवले. ती फक्त एवढेच म्हणाली, मला सगळे समजलेय, माझी काहिहि तक्रार नाही, मला ऊलट नीताची किवच वाटते, कारण लग्नाच्या बायकोशी पर्तारणा करणारा माणुस तिच्याशी प्रामाणिक राहिल, हा तिचा विश्वास फार टिकणार नाही. " हे सांगताना तिचा स्वर फारच दुखावला होता.
" आयॅम रियली सॉरी, मला खरेच कल्पना नव्हती तूम्ही या सगळ्यातुन गेला असाल, पण तूम्ही म्हणता तसेच तूम्ही असा काहितरी बोल्ड पवित्रा घ्यायला हवा होता, अंजलीताई. " मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला.

" अंजलीताई ? म्हणजे मी अंजली वाटले तुम्हाला ? पुर्वग्रह, लेखक महाशय पुर्वग्रह. अजुनहि तूम्ही स्वतःच्या कल्पनेतच वावरता आहात का ?" तिने स्वतःला सावरले होते.

" मग तूम्ही कोण आहात ? हि कथा, तूमची आहे म्हणाला होतात ना ? " मी भितभित विचारले.

" बघा परत एककल्ली विचार हि कथा जितकी अंजलीचे तितकी नीताचीहि, असे नाही तूम्हाला वाटत ?" तिने मला पेचात टाकले.

समाप्त




Avikumar
Wednesday, August 16, 2006 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह वाह दिनेशदा. एकदम योग्य ठिकाणी संपवलीत कथा. कारण कथा जिथे संपते तिथुनच पुढे वाचकांच्या विचारांना सुरुवात होते.आणि तुम्हीही कथेचा शेवट एकदम अनपेक्षितच केलात की हो...!!

Meggi
Wednesday, August 16, 2006 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, फ़ार छान. शेवट खरचं खुप वेगळा केलात तुम्ही... मस्त.. आवडली कथा...

Bhramar_vihar
Thursday, August 17, 2006 - 12:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटापासूनच कथा सुरु होते असच म्हणयला हवं. फक्त ती वाचकांच्या मनात आकार घ्यायला सुरुवात करते! छानच दिनेशभाई!

Itsme
Thursday, August 17, 2006 - 1:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, मस्तच ... खुप दिवसांनी निवांतपणे तुमची गोष्ट वाचायला मिळाली :-)

Meenu
Thursday, August 17, 2006 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा दिनेश फारच सुंदर आणि अगदी आटोपशीर. तरीही खिळवुन ठेवणारी

Kmayuresh2002
Thursday, August 17, 2006 - 1:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,सहीच रे.. शेवट जरासा अनपेक्षित पण एकदम योग्य... भ्रमा म्हणतोय तसच खरोखर शेवटापासुन खरी कथा सुरू होतेय...

Rupali_rahul
Thursday, August 17, 2006 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशजी एकदम वेगळी कथा. भ्रमरला अनुमोदन...

Moodi
Thursday, August 17, 2006 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश मस्त! अनपेक्षीत कलाटणी दिलीत.

Anilbhai
Thursday, August 17, 2006 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

O' my god. तिन्ही शेवट अगदी छान. :-)

Prasad_shir
Thursday, August 17, 2006 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा दिनेश

सुरेख कथा!


Paragkan
Thursday, August 17, 2006 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! बर्याच दिवसांनी .... अर्थातच वेगळेपणाचा लौकीक राखून आहे कथा.

Rachana_barve
Thursday, August 17, 2006 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच.. शेवट एक्दम जबरी..

Lalu
Thursday, August 17, 2006 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, आवडली! कथेतल्या तपशीलाबद्दलचे संवाद छान जमलेत.
भाईंची प्रतिक्रिया पण आवडली. :-) ३ शेवट म्हणजे त्या लेखकाच्या कथेचा शेवट, ज्यावर ती कथा आधारली होती त्याचा शेवट आणि दिनेशच्या या कथेचा शेवट का हो भाई?


Chandya
Thursday, August 17, 2006 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, कथा छान लिहिली आहे. शेवटची नाट्यमय कलाटणी आवडली. पण खूप अवांतर गोष्टी आल्यात, उदा. सुरुवातीचे ४-५ परिच्छेद, असे वाटते.

Prajaktad
Thursday, August 17, 2006 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आवडली कथा!
हि कथा वाचुन वपुंची " चोउकटितिल वहिनी " हि कथा आठवली.त्या कथेत पटकथा लेखकाला कथेतली पात्र जिवंत होवुन जाब विचारायला येतात.
(चोउकट कसे लिहायचे?).


Moodi
Thursday, August 17, 2006 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चौकट असे लिही. chaukaT .

Ldhule
Thursday, August 17, 2006 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, कथा आणि कथेचा शेवट दोन्ही आवडले .

Dineshvs
Friday, August 18, 2006 - 2:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर्‍याच दिवसानी कथा लिहिली, सगळ्याना आवडली ते बघुन आनंद झाला. सगळे आपलेच, त्यामुळे आभार कुणाचे मानायचे ?
Chandya हि कथा, त्या लेखकाची पण आहे, त्यामुळे, त्याचे पुर्वग्रह, विचार करण्याची दिशा पण ईथे येणे आवश्यक होते.


Maudee
Friday, August 18, 2006 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, गोष्ट ख़रेच सुंदर आहे.

चंद्या,
मला नाही वाटत की सुरुवातीचे परिच्छेद अवांतर आहेत. ते हवेच होते कारण हे अगदी ख़रय की अंजली देशपांडे या नावाची मुलगी असू शकते.
मी जेव्हा प्रथम हे नाव वाचलं ख़रच उडाले होते. कारण माझ्या ओळख़िची एक अंजली देशपांडे आहे. जर दिनेशजींनी ख़ुलासा केला नसता तर मी तुम्ही अंजली ओळख़ता का हा प्रश्न एविचारलाच असता.
एक मात्र नक्की की सर्व साधारण ंजल देशपांडेच जे वर्णन केलय त्यात मला माहीत असलेली अंजली कुठेच बसत नाहीऽगदी नावापासूनच. तिचं ते माहेरच नाव आहे.:-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators