|
Raina
| |
| Tuesday, August 01, 2006 - 11:20 pm: |
| 
|
"माथ्यावरचा आभाळबाबा सवाल आता पुसत नाही पृथ्वी झाली पावलापुरती अल्याड पल्याड दिसत नाही " आज दुपारी, ऑफिस जवळच्या सिग्नलवर एका सायकलीवरची म्हातारी माझ्याकडे पाहून तोंड भरुन बोळकं पसरुन हसत होती.तिला ओळखायला जरा वेळच लागला- मग लक्षात आलं की- ही तर आमच्या हापिसची Cleaning Lady.ही आज्जी किती वर्षाची असेल ह्यावर आमच्या पैजा लागायच्या. शेवटी सगळ्यांचे "पासष्टीच्या आसपास नक्की आहे" हयावर एकमत झालं. एक दिवस एका सहका-याला तिचा खाली पडलेला रेल्वे पास सापडला- त्यावर तिचे वय होते- ७५ वर्ष ! आम्ही अवाक !७५ वर्षाची ही म्हातारी काय खुटखुटीत होती- सुबक खाशी ठेंगणी अशी ही खास जपानी म्हातारी- केसांचा सुरेख बॉब, कडक युनिफार्मात धाड धाड Vaccum Cleaner आपटत सफाई करत असते, आणि येणा-याजाणा-याशी गप्पा मारत असते. माझ्या मनातली ती "चल रे भोपळ्या टुणुक टुणुक" म्हणणारी बेरकी आज्जी तंतोतंत अशीच. हापिसातल्या काही लोकांना ती खूप आपटत काम करते, म्हणुन तिचा राग येतो- मला मात्र ही म्हातारी जाम आवडते. तिच्या बोळकं पसरुन हसण्यामुळे तिच्या चेह-यावरच्या सुरकुत्या तर झळाळुन उठतातच पण आमच्या ही दिवसाला झिलई चढते. या वयात ही बाई येवढं कष्टाचे काम लिलया करते. त्याचं वाईट तर वाटतच पण तिच्या विजिगीषेचे कौतुक ही वाटते. ह्या जरठ नागरिकांची संख्या दिवसेंदिवस जपानमध्ये वाढतेच आहे. जवळजवळ २५% लोक पासष्टीच्या वरचे आहेत जपानमध्ये सध्या. पुरुष सरासरी ७८ वर्ष आणि बायका सरासरी ८५ वर्षापर्यंत जगतात. सध्या जपानमध्ये शंभरी पार केलेले २३००० लोकं आहेत-सर्वात वयोवृद्ध ११४ वर्षांचा. ६०व्या वर्षी हे सेवानिवृत्त होतात आणि त्यानंतर सरासरी २० वर्ष जगतात. मग चरितार्थ चालवायला अशी कामं धरतात. सुरवातीला जपानमध्ये आले तर धक्का बसला होता- ईतके जख्ख म्हणावे असे म्हातारे अंगमेहनतीची कामं उपसताना बघून. ट्रेनमध्येही तीच गोष्ट.पाठीचा कणा पूर्ण बाकदार होवून गुढघ्यापर्यंत वाकलेली म्हातारी, जेव्हा सबवेत भेटते तेव्हा ही आज्जी या वयात उभं राहून, एकटी ट्रेनमधुन प्रवास करते, ह्या दृष्यानी हेलावल्या शिवाय रहात नाही. जपानी लोकांना फारसं काही नसतं-कधी कधी जागा देतात उठून पण कधी कधी समोर अशी जर्राजर्जर झालेली, अस्थिपंजर झालेली म्हातारी उभी असताना देखील स्वत: खुशाल “युसेनसेकी” ( Priority Seats) वर बसून राहिलेली लोकं पाहिली की संताप येतो. नव-याचा ट्रेनमधील-बसण्याची-जागा-योग जबरदस्त आहे. कुठुनही दमुन येत असताना ह्याला बसायला जागा मिळणे आणि समोर कुठलीही ७-८ दशकं पार केलेली आज्जीबाई त्याच्याच समोर येणे- हे नेहमीचे. मग उठुन जागा देणे अपरिहार्यच ! आसपासच्या अशा कित्ती पिकल्या पानांबद्दल सांगू ? उपनिर्दीष्ट cleaning lady , आमच्या बिल्डींगचा Caretaker बुढा, (देवा ! त्याच्या येण्यावरुन सकाळचे आठ वाजलेत, म्हणून खुशाल घड्याळ लावून घ्यावे !), पेपरवाला, शेजारपाजारच्या म्हाता-या आज्ज्या, जपानी सहका-यांचे आई-वडील किंवा सासूसासरे (माझी एक मैत्रिण होती.. तिची उमर अबतक ५६ आणि तिची आई ९० वर्षांची, कोबेचा भयानक भुकंप अनुभवलेली !),डिशवॉशर बसवून द्यायला आलेला फिटर, भाजीवाले! एक ना दोन. टॅक्सीचालक तर ईतके वृद्ध असतात कधी कधी की पोचेपर्यंत धास्ती वाटत राहते. आमच्या शेजारची "मायेदा" आज्जी- ८५ तरी वर्षाची नक्की असेल. आताशा आज्जी खूप थकत चालल्याचे जाणवते. आत्ता आत्ता तिचे केस कापसासारखे पांढरे दिसतात- नाहीतर काही महिन्यांपुर्वीपर्यंत काळे कुळकुळीत डाय करायची. तिला त्या ११६ पाय-यांचा जिना चढता उतरताना पाहिलं की माझ्या पोटात तुटतं. होता होईल तो तिचं सामान उचलणे एवढेच मी करु शकते. एकटीच असते बिचारी- कधी लिफ्ट मध्ये, कधी त्या जिन्यावर, कधी कचरा टाकताना भेटते. मला वेळ असला की गप्पा मारते हवा पाण्याच्या.. आणि कधी मी सकाळच्या घाईत जिवाच्या आकांताने पळत ट्रेन गाठायला चाललेली असते, तेव्हा भेटली की न चुकता- “तु पुढे जा बाई, तुला घाई आहे” “इत्तेराश्शाई” म्हणणारी.. तिला “इत्तेकीमास” म्हणताना क्षणभर मला मी माझ्याच आज्जीला “येते गं” म्हणते आहे असे वाटते ! आमच्याकडे भाच्च्यांनी आल्यावर घर डोक्यावर घेतले मस्तीने. आम्ही मुकाट्याने शेजारच्या आज्जीला आणि खालच्या चिनी बाईला जाउन ‘ओमियागे” (भेट) देउन आलो- "थोडे दिवस आवाज होईल जास्त- मुलं लहान आहेत- मस्ती करतात, उड्या मारतात-जरा आवाजाचा त्रास होईल तुम्हाला" म्हणुन सांगून आलो. आमच्या बरोबर भाची पण होती. तिला बघून आज्जी अगदी खुलली-खेळायला ये म्हणाली.. मग नणंदेला म्हणाली “ह्या तुझ्या वहिनीच्या मागे भलती घाई असते. बिच्चारी कायम भेटते ती घाईघाईतच. “ तिच्याशी जरा शिळोप्याचा गप्पा मारल्या आणि घरी आलो. अशा ह्या एकेक आज्ज्या ! काही ओळखीच्या काही सर्वस्वी अनोळखी. पाहिल्या की वाटते- ह्यांना दीर्घायुष्याचा वर आहे की अभिशाप ? त्या अश्वत्थामाच्या भळभळणा-या चिरवेदनेचा शाप आहे की भीष्माचार्यांचे अटळ भोग आहेत आणि उत्तरायणाचा इंतजार ? म्हातारपण येते म्हणजे ते रुपेरी, तृप्त संध्याराग आळवायसाठी, पैलतटीची आस लागली म्हणुन, जीवनाचा चहु अन्गानी आस्वाद घेउन झाला म्हणून, कालचक्राच्या न्यायाने- आले तर चांगले.. पण अतृप्त , एकाकी, विकारयुक्त आणि विखारयुक्त, परावलम्बी आणि अकाली, दीनवाणे म्हातारपणही येतेच. काही म्हातारे कोतारे प्रेमळ आणि आपुलकीची साय चेह-यावरुन सांडणारे..( ह्या जपानी लहान मुलांचे मिचमिचे डोळे जितके लोभस असतात, तेव्हढेच ह्या म्हाता-यांचे मिचमिचे डोळे लोभस असतात.) आणि काही म्हातारे तितकेच विक्षिप्त, दुसरं बालपण अनुभवताना अतोनात हट्टी आणि हेकेखोर झालेले. कधी भ्रमिष्ट, कधी जगभ्रराचा कडवटपणा अंगोपांगातून मिरवणारे, दिसेल त्यावर खेकसणारे("नंदा प्रधान" मधील एरंडेल डोक्यावर थापणारा म्हातारा उभा राहतो डोळ्यासमोर). आणि काही सर्वस्वी उदासीन- बोरकरांच्या "सुखा नाही चव, लव वठलेली आहे, दु:खा नाही भार, धार बोथटली आहे" ची आठवण करुन देणारे. व्यक्ती तितक्या प्रकृती हे तर खरेच पण आयुष्याचे भोग हे कुठेतरी खुणा ठेवतातच.. नाही का ?..........
|
Karadkar
| |
| Wednesday, August 02, 2006 - 1:08 am: |
| 
|
माझ्या एका मैत्रीणीच्या आईने सकाळ मधे लिहिलेला लेख -- खुप साम्य जाणवले म्हणुन देतेय. http://esakal.com/esakal/08022006/NT00B81756.htm
|
रैना सुपर्ब!!!! क्षणभर एकदम आजुबाजुला वावरणारे वयोवृद्धच आठवले. धन्स त्यांचे दु:ख कदाचित आत्ता जास्त कळेल...
|
रैना, चान्गल लिहिल हेस! अर्थात तस बघण्याची अन समजण्याची "नजर" असण हे ही आवश्यकच! थोडक्यात म्हन्जे एक वेगळीच "नजर" वाटलीस या लेखाने! 
|
Bee
| |
| Wednesday, August 02, 2006 - 4:02 am: |
| 
|
रैना, ह्या ललितपेक्षा मला त्यातील नाना संदर्भच अधिक आवडलेत. ती पहिली कविता सुर्वेंची आहे ना... बोरकरांची ही कविता मस्तच आहे.. मला मात्र खिन्न उदास वगैरे नाही वाटली.
|
Moodi
| |
| Wednesday, August 02, 2006 - 6:11 am: |
| 
|
रैना सुरेख लिहीलसं. आजकाल वृद्ध अन वडीलधार्यांची चौकशी करणे राहीले दूर उलट त्यांना अडगळ समजणारे जास्त आहेत. भारतीय जीवनात हे कमी घडत होते पण आता जास्त घडतांना दिसतेय. पण कदाचीत हा वयाचा होऊ घातलेला बदल पाश्चिमात्य देशात अन अती पूर्व देशात चटकन स्वीकारला गेला त्यामुळे अन पूर्वीपासूनच वेगळे रहाण्याची सवय यामुळे हे लोक एकटेपणातही आपली प्रकृती अन मनस्वास्थ्य टिकवण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. या वयातही उत्साही अन चटपटीत राहून आपली कामे आपणच करतात.
|
Ninavi
| |
| Wednesday, August 02, 2006 - 9:10 am: |
| 
|
छान लिहीलंयस रैना. xxxx
|
Arch
| |
| Wednesday, August 02, 2006 - 10:14 am: |
| 
|
रैना, छानच लिहिल आहेस. मायेदा आजी lift असताना ११६ पायर्या का चढतात ग. तुझ्या लेखवरून जपानमध्ये रहात असल्यासारख वाटत. आम्ही रोमला गेलो असताना असच residential area त राहिलो होतो. त्यामुळे locals , शाळेत जाणारी मुल, shopping ला चाललेल्या बायका म्हणजे अगदी घरगुती रहाणं बघायला मिळाल. सतत बसमधूनच प्रवास केल्यामुळे. Italians आपल्यासारखेच असतात असही वाटल. ए असेच जपानमधले अनुभव लिहित रहा
|
Moodi
| |
| Wednesday, August 02, 2006 - 10:19 am: |
| 
|
इटालीयन्स खूपच मोकळे असतात आर्च. त्यांना आपल्यासारखेच रहाणे, शेजारी जाणे खाणे, पिणे, सहल वगैरे खूप आवडते. माझ्या ओळखीत एक इटालीयन मुलगी होती तिने हेच सर्व सांगीतले. खूप सोशल असतात ते लोक.
|
Mrinmayee
| |
| Wednesday, August 02, 2006 - 10:27 am: |
| 
|
रैना, खूप छान लिहिलंय! आजचा योगायोग पहा. सकाळी रेडीओवर कुणा देशी माणसाचं बोलणं ऐकत होते. तो कलकत्याचा, आता अमेरिकेत. आपल्या गावच्या उन्हाळ्याबद्दल सांगत होता. उकाडा प्रचंड, वीज गेलेली. मग म्हातारी माणसं घराबाहेर येणार. लोक मग त्यांच्याशी गप्पा करणार. इथे अमेरिकेत गरमीनी असेच सगळे हैराण. (वीज जाण्याचा फारसा प्रश्ण नाही!) तरीही सन स्ट्रोक होउन म्हातारी माणसं मरताहेत, एकटी, घरात! तेव्हा घाबरायच कुणाला अधिक, हैराण करणार्या उन्हाला की म्हातारपणच्या एकटेपणाला? हे ऐकलं अन नंतर तुझा लेख. खरच विचार करायला लावणारे विषय!
|
mala he lihilela vachata yet nahi majhya computer var.. kahi settings vagaire badalayala laganar ka ?? please koni sangu shakel ka ?
|
Raina
| |
| Wednesday, August 02, 2006 - 8:44 pm: |
| 
|
मंडळी- प्रतिक्रियांसाठी सगळ्यांचेच खूप धन्यवाद ! Arch अगं बिल्डींगच्या आत लिफ्ट आहे पण बिल्डींगच एका टेकडी वर आहे. तिथे जायचा एक वळसा घालून लांबचा चढाचा रस्ता आहे- पण उगीच कशाला आणखी चाला- म्हणून बरेच लोकं तो ११६ पाय-यांचा जिनाच चढतात. तू लिही ना please ईटलीतले अनुभव ! वाचायला खूप आवडेल. मृणमयी- सध्या तिकडे खूप उन्हाळा आहे का? खरंय- आपल्या ईथे एकुणातच वीज गेली की लोकं बाहेर यायला सुरवात करतात नाही? कराडकर- मैत्रिणीच्या आईचा लेख छान आहे.आवडला. मुडी- अगदी. बहुतेक या लोकांची आधीपासूनच मनाची तयारी होत असावी म्हातारपण एकटं काढण्याची. बी- त्या पहिल्या ओळी कुसुमाग्रजांच्या आहेत बहुतेक. लिंबू, रुपाली, निनावी- धन्यवाद. स्वप्ना- sorry no idea, settings मध्ये काय गडबड असू शकेल याची.
|
Kandapohe
| |
| Wednesday, August 02, 2006 - 11:16 pm: |
| 
|
रैना, सुंदर शैली. खरच इथले वयस्क जपानी बघीतले की अशीच अवस्था होते. खुटखुटीतपणा बघून या लोकांचे अक्षरशः पाय धरावेसे वाटतात. मला फुजीवर ६० च्या पुढचे अनेक वयस्कर (?) लोक भेटले. आनंदाने, न थकता चढत तर होतेच पण वाटेत सिगरेटची थोटकेही उचलत होते. मधे मी एक छोटी डॉक्युमेंटरी बघीतली होती. एक ७० वर्षाची बाई फुजी पर्यटकांकरता बंद झाला की (जेव्हा ऑक्सीजन कमी असतो), फुजीवर चढून तिथल्या हवेचे सॅंपल गोळा करते व त्याचा ग्लोबल वॉर्मींग वरील संशोधनाकरता उपयोग करते.
|
Karadkar
| |
| Wednesday, August 02, 2006 - 11:26 pm: |
| 
|
रैना, अग खुप सॉरी ग तुला सा.गायचे राहुनच गेले. तुझा लेख अप्रतिम झालाय. मल फ़क्त अलिकडे वाचलेले आठवले म्हणुन द्यायचे होते आणि तुझे पण छान लिहिलेय ते सांगायचे होते.
|
Sayonara
| |
| Thursday, August 03, 2006 - 8:04 am: |
| 
|
रैना, नेहमीप्र्माणेच छान लिखाण. ही सगळी अंगमेहनतीची कामं करायला म्हातारी माणसंच जिथेतिथे दिसतात हे अगदी खरं.
|
Avikumar
| |
| Thursday, August 03, 2006 - 1:01 pm: |
| 
|
रैना, खरेच खुप छान लिहिलंयस. दीनवाणे म्हातारपण...आपल्याइथेही थोडयाबहुत प्रमाणात दिसायला सुरुवात झाली आहे. पण एक गोष्ट नक्की, दिनवाणे म्हातारपण फक्त गरिबीमुळेच येते असे नाही. सधन कुटुंबातही विशेषत: जिथे आप्तस्वकीय सोडुन गेले आहेत त्यांचे एकाकी म्हातारपण अधिकच दिनवाने असे मला वाटते.
|
Chafa
| |
| Thursday, August 03, 2006 - 2:41 pm: |
| 
|
नेहमीप्रमाणे छान. शेवटचे चिंतनही मस्त. यात मला व्यक्तिमत्वाचाच भाग जास्त असावा असे वाटते. मागे इथे अमेरिकेत मला वाटतं Jimmy Kimmel Live (late night TV show) वरती एका ८० अधिक वर्षांच्या बाईला बोलावलं होतं. तिने चक्क नुकतेच कॉलेज शिक्षण संपवून डीग्री मिळवली होती!!! काय बाई होती ही! तिच्याकडे पाहून ती ५० वर्षांची वाटत होती आणि तिचं बोलणं, दिसणं, हसणं, विचार, हजरजबाबीपणा, विनोदबुद्धी सगळंच लाजवाब होतं! सहज गंमत म्हणून सांगतो; तिला विचारलं की तुझ्या या चिरतरुणपणाचं रहस्य काय तर ती म्हणाली - "I think it is the glass of wine after every dinner since my late 20s. My father had once told me that drinking too much water will wash you out soon." :-)
|
Paragkan
| |
| Thursday, August 03, 2006 - 5:40 pm: |
| 
|
वाह रैना! लिखाणाची शैली झकास आहे. लेख आवडेश.
|
Chinnu
| |
| Thursday, August 03, 2006 - 5:46 pm: |
| 
|
रैना आवडलं बाई मलापण.
|
रैना, मस्त लिहिले आहे! तिथले वयोमान बरेच मोठे आहे म्हणायचे इथल्यापेक्षा. या वयात अशा ठणठणीत आरोग्यावरून वाटते की ही लोकं सुरूवातीपासूनच जागरूक असावीत आरोग्याविषयी. शिवाय अद्ययावत औषधे, वैद्यकीय सुविधा यांची सहज उपलब्धता हेही कारण असावे.
|
|
|