|
रात्रभर प्रवास करून राजी चांगलीच वैतागली होती. लहानपणाच्या आठवणीत हे कळकट्ट चहावाले, मासळी विकणार्या बायका, ऊगीच अघळपघळ करणारे फ़ेरीवाले नक्कीच नवह्ते तिच्या. १८ वर्षाच्या अंधूक आठवणीत फ़क्त गावची ती हिरवी नागमोडी वाट, धुक्यात विरलेले डोंगर, अंगणात झुलणारा पितळी झोपाळा आणि त्यावर बसलेली चापून चोपून हिरवी गार नववारी नेसून केसांचा खोपा घातलेली देखणी काकु इतकेच. काकु कशी त्या झोपाळ्यावर बसून गुणगुणत एकसारखा देखणा जुईचा गजरा गुंफ़ायची आणि हलकेच हात वर घेऊन खोप्यातल्या रत्नजडित फ़ुलात अलगद खोवायची. राजी सगळे खेळ विसरून तिच्याकडे एकटक बघत बसायची. काकु हलकेच पायाने रेटा देत झोका वाढवायची आणि हसत राजीला म्हणायची ”काय बघतेस ग रजनी? चांगले दिसत नाही का हे पातळ मला? ” राजी मानेनेच जोरजोरात नाही म्हणायची. तिला खर तर नाही तु किती सुंदर दिसतेस, जुईचा गजरा तर तुच माळावास वगैरे असे कितीतरी तिला म्हणायचे असे पण तिला काही सुचायचेच नाही. काकु मग खुदकन हसे. पलीकडून मावळणारा लालभडक सुर्याचा गोळा बघून ती लगबगीने माजघरात निघायची. ”अग बाई काका यायची वेळ झाली रजनी तुझे. चल आत हो घरात आणि काही पुस्तके काढून परवाचा वगैरे म्हण. नाहीतर माझ्यावर रागवायची स्वारी ” असे म्हणत ती पदर तोंडावर ठेऊन हसणे लपवायची. राजीला पक्के माहित होते. काका एकवेळ आपल्याला वेळूने मारतील पण काकूला कधी रागावणार नाहीत. राजी तत्परतेने उठून काकुसारखे ऐटदार चालत जायचा प्रयत्न करत तिच्याचसारखी खुरमांडी घालून परवाचा म्हणत बसायची. परवाचा म्हणत डोळ्याच्या कोपर्यातून काकूचा निटनेटका स्वयपाक बघायची. गोल गोल पांढर्या शुभ्र भाकर्यांची परातीत चवड पडायची. काकाच्या पावलाचा आवाज येताच पटकन उठून केसांवरून हात फ़िरवून ती दरवाज्याशी ओठंगून उभी रहायची. काकांचे उपरणे खुंटीला टांगून त्यांच्या हातावर पायावर उन उन पाणी टाकायची. आज इतका उशीर का असे लटकेच रागावून म्हणायची. तिच्या सगळ्याच हालचाली इतक्या मोहक असायच्या. राजीला अशावेळी काकू खुप वेगळी भासायची. काकूसारखे आपले केस लांब दाट नाहीत तिच्यासारखे हात आपले गोरे गोरे नाहीत याची जाणिव परत एकदा प्रकर्षाने व्हाय्ची. राजी काका काकूंकडेच रहायची. आई तर राजीला आठवतच नवह्ती. बाबा पण देवाघरी गेले असे काकानेच एकदा सांगीतले होते. काकु खर तर खूप प्रेमळ होती. पण का कुणास ठाऊक गोरीपान, उंच अतिशय सुंदर काकु राजीला जवळची वाटायचीच नाही त्यापेक्षा तिच्याचसारखे काळे सावळे ओबड धोबड काका तिला कधी कधी वेळूने हतावर मारत असूनही तिला जवळचे वाटायचे. काकु कळवळून तिच्या हातावरच्या व्रणांना हलक्या हाताने तुप लावायची पण राजीचे अश्रु मात्र काका तिला जवळ घेत तेंव्हाच थांबत. क्रमश :
|
”चाय गरम गरम चाय मेमसाब चाय लेंगी क्या ” राजीची तंद्री भंगली. मानेनेच नाही म्हणत तिने खिडकीतून बाहेर नजर टाकली. पावसामुळे झाडी, शेते, घर अंधूक अंधूक दिसत होते. शेतात अजूनही नांगरणीच चालू होती. चला यावेळचा पाऊस चांगला दिसतोय पिक चांगली येणार तिच्या मनात विचार आला आणि तिला स्वत : चेच हसायला आले. खर तर ह्या सगळ्यापासून ती किती दुर गेली होती. १८ वर्षांनी आपण गावी जातोय ह्याचे तिला थोडे वाईट वाटले. खरतर काका गेल्यावर तिला गावची ओढच राहिली नव्हती. काकूलाही फ़ार काही फ़रक पडतोय असे तिला वाटले नाही. तसा काका गेल्याने काकूला फ़ार फ़रक पडलाय असेही तिला जाणवले नाही. हळू हळू तिच्या गावच्या भेटी कमी होत गेल्या. सुरवतीला काकूची तक्रार वजा पत्रे येत पण त्यात ती भेटत नाही पेक्षा पैसे कसे पुरत नाहीत असाच सुर जास्त असायचा. मळ्याची देखभाल करायला मजूर मिळत नाहीत वगैरे, दर महिन्याला राजी ठरावीक रक्कम गावी पाठवायची त्याची फ़क्त पोच काकू पाठवायची. हळू हळू ती पोचही येणे बंद झाले. राजी फ़क्त पैसे पाठवून कर्तव्य पार पाडायची. चुकले का आपले हे.. राजीने हातातले पत्र चाळवले आणि निश्वास सोडून मान मागे टेकून ती परत भुतकाळात शिरली. ”रजनी अग येतेस ना ” काकूची हाक दुसर्यांदा राजीने ऐकली तरी तिने ओ दिली नाही. काकुने तिला राजी कधीच म्हंटले नाही नेहमी रजनी अशीच हाक ती मारे. परत एकदा हाक ऐकल्यावर मात्र ती माडीवरून झपकन पळत आली. ” अग अग मुलीच्या जातीला जरा नाजूकपणा हवा. हे काय पुरुष मंडळीसारख पायर्या उतरतेस तु ” राजी नुसतीच हसली. ”हे पत्र आलय तुला. कुठून आल आहे ग? ” काकुने कुतुहलाने विचारले. राजीला त्या जवळिकेचा थोडा रागच आला. ”काही नाही मी काही colleges चे forms भरले होते त्याच उत्तर आहे ” ”ककांशी बोललीस का तु? आणि हे अस शहरात एकट्या मुलीला काय पाठवायच? मला बाई पटत नाही ” ”उह कशाला काळजी करतेस तु माझी. मी एकदम मस्त राहेन आणि मला कोणी पळवून वगैरे न्यायला तुझ्यासारखी सुंदर थोडीच आहे मी ” ह्यावर काकू खळखळत हसली. राजीला एकदम रागच आला त्या गोष्टीचा. तिचे अजूनही तितकेच दाट असलेले काळेभोर केस आणि अज्जीबात न रापलेलेल्या गुलाबी त्वचेचा रागच आला. काकु मध्ये काकाने सौंदर्याशिवाय काय बघितल खर तर. प्रत्येक वेळी काकाच्य होय ला होय मिळवते. स्वत : ची मते अशी नाहीतच. दिसण नुसत काय कामाच. राजीने मान उडवली आणि ती वर निघून गेली. काकाचा विरोध ती शहरात जायला नव्हताच. तिथे जाऊन राजी अपेक्षेपेक्षा जास्त लवकर रुळली. सुट्टीत एखादवेळी गावी ती यायची तितकेच. काकु अगदी आवर्जून तिच्या भेटीत तिला अवडतात म्हणून गरम मौसुत पुरणपोळ्या करून वाढी. पण राजीला त्यावेळी परत जायची ओढ लागलेली असे. नाही म्हणायला ती सुट्टी वेगळी होती.
|
राजी त्या वेळी आली आणि दरवाज्यातच अनोळखी तरूणाला बघून थांबली. त्याचे पिंगट घारे डोळे रोखून त्याने आपले पांढरे स्वच्च दात दाखवले. राजी भानावर आली. ”आपण? ” म्हणत तिने बग तिथेच खाली ठेवली. अजूनही तिथेच दारातच उभे राहून त्याने सांगीतले "मी शेखर, तु नक्की रजनी असणार, हो ना? ” राजीने मान हलवली. ”मावशी म्हणालीच मला की तु आज येशिल म्हणून. ये ना आत, मावशी SSS बघ रजनी आली आहे ” त्याच्या आगाऊपणाचा राजीला थोडा राग आलाच. पटकन बॅग घेऊन तिने जिना चढायला सुरवात केली. ”आलीस रजनी ये ” काकू हसत म्हणाली. ”भेटलीस वाटते शेखरला तु. शेखर माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा. काही दिवस रहायला आला आहे. काही रीसर्च करतो म्हणे गावावर ” उगीचच काकु हसली. ”रजनी, तुझी हरकत नसेल तर तुझी खोली मी काही दिवस शेखरला दिली आहे. त्याला तिथे जरा एकटेपणा मिळतो. खालची एक खोली रिकामीच आहे तुझी हरकत नाही ना? ” राजी चिडलीच खरतर पण न दाखवता ती नुसते मंद हसत मागे वळली. हातपाय धुवून ती ताटावर येऊन बसली तेंव्हा शेखर समोरच बसला होता. त्याचे डोळे काकुसारखे किती आहेत राजीला परत परत जाणवत होते. मग तिला शेखर आवडेनासाच झाला. गरम गरम भाकरी तिच्या पानात वाढत काकू म्हणाली ”रजनी तुझे काका कामासाठी शेजारगावी गेले आहेत. २ दिवसांनी येतील. तु शेखरला गाव दाखवशील ना? मी आधीच सांगीतल आमची रजनी तुला सगळ दाखवेल. तु इतका आला आहेस तर ती नाही कशाला म्हणेल ” जणू राजीचा होकार आहेच गृहीत धरून काकु बोलत सुटली. शेखर तिच्या प्रत्येक वाक्याला दाद देत होता. मधूनच राजीकडे बघत मंद हसत होता. रजनीला जेवण नीट गेलेच नाही त्या दिवशी. ”तु कविता छान लिहितेस ” ती झोपाळ्यावर बसून शांता शेळकेंचे पावसा आधीचा पाऊस वाचण्यात दंग झाली होती. दचकून तिने मागे वळून बघितले. झोपाळ्यावर रेलून उभे रहात तो नुसताच हसला ” तुला आपल तुम्हाला कस कळल? " ”आहे आमची एक गंमत ” तो डोळे मिचकावून हसला. राजीच्या चेहर्यावर तिचा चढत चाललेला राग स्पष्ट दिसला असावा लगेच सावरून घेत त्याने पुढे म्हंटले ”अग तुझ्याच खोलीत रहातोय ना मी. हे बघ ” म्हणत राजीची एक वही त्याने पुढे केली. ”अस दुसर्याच्या गोष्टी चोरून वाचु नयेत. ” राजीने ती वही हिसकावून घेतली आणि ती आत निघून गेली. वही चाळताना शेखरने त्या वहीत ठेवलेल मोरपिस ती बराचवेळ निरखून बघत होती. राजी ने एक जोरदार आळस दिला. आता मात्र चहाची गरज आहे. ट्रेन ह्या स्टेशनवर अर्धा तास थांबणार होती. राजीने खाली उतरुन पाय मोकळे केले. खमंग वड्यांचा वास पसरला होता. राजीच्या पोटाने उपाशी असल्याची जाणिव आता तिव्रतेनेच करून दिली. राजीने त्या घोळक्यात धक्का बुक्की करत २ वडे कगदात बांधून घेतले. त्या वडेवाल्याकडे एक टोपलीभरून जुइचे गजरे देखिल होते. वडे आणि जुइचा संमिश्र वास गंमतशिर वाटत होता. तिने न रहावून २ गजरे पण बांधून घेतले. मग एक चहाचा वाफ़ाळता कप हातात घेऊन राजी परत आपल्या सीटवर जाऊन बसली. अजून अर्धा तास संपायला अवकाश होता पण गाडी सुटली अचनक तर काय ही लहानपणापासूनची भिती तिला आजही वाटल्याचे बघून गंमत वाटली. तिने वड्याचा पुडा सोडला. बरोबर आलेल्या हिरव्या गार मिरचीबरोबर तिने वड्याचा आस्वाद घेत तिने चहाचे घुटके घ्यायला सुरुवात केली. गाडी सुरु झाल्यावर तिने नाजुक हाताने जुइचा पुडा सोडवला. मुठीत गजरा घेत तिने डोळे मिटून पोटभर वास घेतला. Pअरत एकदा तिला काकूचे काळेभोर लांबसडक केस आठवले. काकुने कधी आपल्यला बोट पण लावले नाही. पण कधी आवर्जून जवळ देखिल घेतले नाही. काकुचा इतका राग आपण का केला हे राजीला निट समजतच नव्हते. काकु तशी तिला सुखात ठेवायची, २ वेळचे भरपेट जेवण, स्वत : ची खोली. सणावाराला नविन कपडे, क्वचित तिला आवडतात म्हणून सुतरफ़ेण्या, पुरणपोळ्या देखिल खाऊ घालायची पण तरी काकु आणि अपल्या मधे एक अदृश्य अंतर राहिले. प्रथम तिच्या दिसण्याचीच राजीला भिती वाटायची. काका कचेरीतून परत आले की राजी पळत जाऊन काकाच्या गळ्याला घट्ट मिठी मारायची पण काकु ला कधी तसे करावेसे राजीला वाटलेच नाही. खूप वर्शांनी मदाम तुसाडचे वॅक्स म्युझीयम बघितले तेंव्हा तिला काकुची आठवण झाली. ती पण त्या पुतळ्यांसारखीच सदैव सुंदर दिसायची. हात लावला तर मोडेल की काय वाटेल अशी सुंदर नाजुक आणि तितकीच अलिप्त. राजीने परत एकदा पत्र उघडले
|
सौ राजनीस अनेक उत्तम आशिर्वाद, काका गेल्यापासून तुझे गावी येणेच झाले नाही. तु वेगवेगळे देश फ़िरतेस त्यामुळे तुला पत्र कुठे पाठवायचे हे देखिल कळत नव्हते. शेवटी तुझ्या मुंबईच्या पत्त्यावर हे पत्र पाठवते आहे. आताशा माझी तब्येत बरी नसते. शेखर येऊन जाऊन असतो. तोच माझी बरीचशी काळजी घेतो. तुझी विचारपुस करत होता. मधे तुझ्या आधीच्या घरी फ़ोन केला होता, तुझ्या यजमानांनी उचलला. तेंव्हा कळले की तु दुसर्या देशात गेली आहेस. त्यांनीच हा पत्ता दिला. तु परत येशिल तेंव्हा गावी नक्की येऊन जाणे. तुझ्या काकांची शेवटची इच्छा होती की तुझ्या नावावर हे घर करून द्यावे. त्याप्रमाणे शेखरने सोय केली आहे. माझे दिवस फ़ार राहिले नाहीत तेंव्हा लवकर येऊन जाणे. शेखरच्या नावावर आपला मळा करण्याचा मानस आहे. तुझे येणे गावी होत नाही तो जवळच रहात असल्याने तो मळ्याची देखभाल करू शकेल. तुझे मत काय आहे हे सांगणे. बाकी सर्व क्षेम, दिनकर रावांना आशिर्वाद सांगणे, तुझी काकु. छोटेसेच पत्र, काकुचे देखणे वळणदार अक्षर, आपला घटस्फ़ोट होऊन ६ वर्षे झाली तरी सौ म्हणून संबोधणे तिने सोडले नाही. लग्नाच्या गाठी वर बांधलेल्या असतात अशा कोर्टाच्या पायर्या चढून कधी सुटतात का त्या. तिला ते मनापासून मान्य नव्हते. पत्र मिळाल्यावर मात्र राजी न रहावून निघालीच. ते दोन्ही जुइचे गजरे तिने परत पुड्यात काळजीपुर्वक बांधले. काकुलाच शोभून दिसतात हे गजरे आपल्या हातात देखिल उपरेच भासतात. राजीला उगीचच वाटून गेले. शेखर अजूनही आपली विचारपुस करतो म्हणे, पत्रात कुठेच शेखरच्या बायकोचा उल्लेख नव्हता. ईतके दिवस तिच्या ते कधी लक्षातही आले नवह्ते. उगीचच राजीचे कुतुहल चाळवले. मुंबईला नोकरीचा अर्ज पाठवला त्या दिवशी काकूने शेखरने लग्नासाठी विचारले आहे हा विषय काढला होता. तेंव्हा शेखरचा विचारही आपण करू शकत नाही आणि लग्न इतक्यात आपल्याला करायचेच नाही असे निर्ढावून सांगीतल्यावर काकु निमुट बसली होती. काकांनीच मग बरेच प्रश्ण विचारले होते. DK शी लग्न ठरवतो आहे म्हंटल्यावर काकांनी DK ची पुढची मागची चौकशी करून मगच ठीक आहे म्हंटले होते. काकूनी लग्न मात्र विधीपुर्वक लाऊन दिले. लग्नातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी तिने मनापासून केल्या होत्या. रुखवतात ठेवलेला मोर देखिल वेळ नाही म्हणत रात्र रात्र तिने मान मोडून भरला होता. पण हे सगळ होताना राजीसाठी ती करते पेक्षा काकूला स्वत : चे कौतुक करवून घेण्यात समाधान होते असेच राजीला भासत गेले. शेखर तसा आपल्याला आवडला होता. त्याच्याबरोबर तेंव्हा केलेल्या मैलोन मैल पायपीटी, गदीमांच्या गाण्यावरच्या चर्चा, काकु कुठे गेली असताना त्याने आपण हुन शिजवलेला पिठल भात. पण जेंव्हा जेंव्हा तिला त्याच्यात काकुचा भास व्हायचा तेंव्हा तेंव्हा ती २ पाऊले मागे सरकायची. ”बाई तुमच स्टेशन आल आता. ” राजी ला TC आठवणीने येऊन सांगीतले. राजीने पायाखाली ठेवलेली बॅग उचलली. आणि ती दारात येऊन उभी राहिली. पावसाचे बारीक शिंतोडे अंगावर घेत तिने मन भरून मातीचा सुगंध घेतला. टिचे धुक्यातले डोंगर अजून तसेच होते. तीची जुनी शाळा देखिल तशीच होती. तांबड्या रंगाची. शाळेत मगच्या बाकावर बसून ती बरेचदा असा कोसळणारा पाऊस आणि त्यात वाट कापत चाललेली ट्रेन बघायची. राजी उतरली. स्टेशनासमोर उभ्या राहिलेल्या रिक्षा मुद्दम वगळुन तिने टांगेवाल्याला हात केला. इतकावेळ प्रवास enjoy केल्यावर तिला अचानक टांग्यातून घराकडे जाण्याचा प्रवास लांबचा वाटू लागला. आतुरतेने तिने ओळखीचे कोणी दिसते का बघायला सुरुवात केली ”सावित्रीबाईंकडे आलात जणू ” ”अं? हो ” गाडीवानाच्या प्रश्णाला तिने उत्तर दिले. ”कोण तुम्ही त्यांच्या? ” ”नातेवाईक ” राजीला गाडीवानाचा रागच आला. टांगा थांबल्यावर तिने पटकन खाली उडी घेतली आणि पैसे त्याच्या हातावर टेकवून ती आत शिरली. उंबर्यावरच शेखर दिसल्यावर तिचे पाय थबकले.
|
Princess
| |
| Wednesday, August 09, 2006 - 1:08 am: |
| 
|
सुरेख लिहितेस रचना... रोज लिहित राहा. खंड पडु देउ नकोस. छान वाटतेय कथा.
|
Raina
| |
| Wednesday, August 09, 2006 - 1:21 am: |
| 
|
रचना, मस्त. सुरवात छान आहे अगदी.
|
रचना, सुरूवात तर छान.. पण कृपया,कथा पूर्ण कर लवकर
|
Lampan
| |
| Wednesday, August 09, 2006 - 5:43 am: |
| 
|
मस्तं वाटतंय वाचताना ..
|
Maitreyee
| |
| Wednesday, August 09, 2006 - 8:06 am: |
| 
|
रचना मस्त लिहितेयस.. वेगळा विषय आणि उत्तम वातावरणनिर्मिती!
|
Chinnu
| |
| Wednesday, August 09, 2006 - 9:10 am: |
| 
|
ह्म्म्म्म, मलाही पहिल्या पावसाचा जुईमिश्रीत सुगंध आला! मस्त लिहिलयं. येवु द्या अजुन.
|
Ninavi
| |
| Wednesday, August 09, 2006 - 9:38 am: |
| 
|
सुंदर लिहीत्येस रचना. चित्रांइतकीच शब्दचित्रही सुरेख रंगवतेस की. 
|
”काकू? ” तिने एकच शब्द कसाबसा उचचारला. आपण अचानक असे हळवे का झालो तिचे तिलाच नवल वाटले. ”वरच्या तुझ्या जुन्या खोलीत आहे. जरा जास्तीच झाल आहे. पण तुला बघून तिला आनंद होईल. ये आत. ” बॅग तिथेच टाकून राजी धावत वर आली. खिडकीसमोरच्या खाटेवर काकु डोळे मिटुन निजली होती. राजी तिथेच खाली मटकन बसली. तिच्या पांढर्या पडलेल्या हातावर हात ठेवत तिने हलकेच हाक मारली. ”काकु ” काकूने डोळे उघडले. आणि राजीकडे बघून तिने हसण्याचा प्रयत्न केला. ”कशी आहेस काकु ” ”बर झाल आलीस. मला थोड उठवून बसव बघू ” राजीने काकूच्या खाली हात घालून तिला उशीला टेकवून बसवले. ”कधी आलीस? ” ”ही काय आत्ताच. लगेच वर आले तुला बघायला. कशी तब्येत आहे आता? ” राजीचा आवाज हळवा झाला होता. ”तब्येतीच काय. आता पिकल पान कधीतरी गळून पडणारच. शेखर ते मागे ठेवलेले कागद घे ” शेखरने न बोलता काकूसमोर कागदाचे भेंडोळे ठेवले. ”ह्यात घराचे कागद आहेत. काढून घे रजनी ” राजीला अचानक तोंडाची चव गेल्यासारखे वाटले. ”अत्ता कशाला काकु. नंतर बघता येईल की. ” ”माझा भरवसा नाही रजनी. घे आत्ताच. शेखर तुच दे तिला ते सगळे कागद. ” शेखरने कागद गोळा करून राजीच्या हातात दिले. काकूने खूण केल्यावर शेखरने बाजूला ठेवलेला एक डबा देखिल राजीच्या हातात दिला. ”हे काय काकु ” राजीचा आवाज नकळत दाटून आला होता. ”काही नाही थोडे माझे दागिने. शेखरच्या बायकोला देण्यासाठी ठेवले होते. पण ती वेळच आली नाही. तु ह्यांचे काहिही करू शकतेस ” राजीला आता तिथे बसवेना, ती कारण सांगून उथली आणि धावत खाली गेली. तिने थोडा उमाळा ओसरल्यावर तो डबा उघडून बघितला. सोन्याच्या चार बांगड्या आणि २ रत्नजडीत फ़ुल. आत इतकेच होते. आत्ता राजीला अचानक जाणिव झाली की काकूच्या अंगाखांद्यावर फ़ारसे दागिने नसायचेच. काळ्या पोतीत ओवलेले काळे माणी, हातात हिरवा चुडा फ़क्त खोप्यात खोचलेली ती रत्नजडीत फ़ुल. त्यातच ती गजरा ओवायची. काकूला कशाचा मोह नव्हताच जणू. ती कधी कशात रमलेली दिसालीच नव्हती. त्या त्या वेळी कदाचीत ती त्या त्या गोष्टीत रमलेली, गुंतलेली दिसायची पण अलगद बाजूला व्हायची. आपण काकूला निट समजूनच घेतले नाही. कदाचित आपण काकासारखे नाहीच आहोत आपला पिंड काकू सारखाच आहे. तीचा नाईलाज होता म्हणून ती घरात राहिली आणि आपण वाट फ़ुटेल तिकडे सगळे सोडून हिंडतो. तु थकली आहेस आता तशी मी देखिल आता थकले आहे काकू. आता मी इथेच रहाणार सगळे पाश सोडून. तुला नव्याने पोटभर भेटणार आहे, पोटभर गप्पा मारणार आहे. नव्याने तुझ्याशी नाळ जोडणार आहे. राजीला अशीच विचारात झोप लागली आणि जाग आली ती एकदम शेखरच्याच हाकेने. ”राजी वरती चल राजनी काकू गेली झोपेतच ” राजीच्या डोळ्यातून अविरत अश्रु वहात होते. हे अस होणारच होत तिला कदाचित माहिती होतच. काही न बोलता ती वर गेली. न बोलता तिने बरोबर आणलेला जुइच्या गजर्यांचा पुडा सोडवला. ईतर कोणाचे काही ऐकून न घेता तिने ती रत्नजडीत फ़ुल काकूच्या विरळ झालेल्या केसात खोवली आणि त्याबरोबर एक गजरा. फ़क्त त्याचीच तिला कदाचित ओढ होती. जुईचा गजरा माळताच खणकन ती रत्नजडीत फ़ुल जमिनीवर घरंगळली. पण तो जुईचा गजरा मात्र तसाच अडकून बसला. त्या स्थितीतही राजीला काकूच्या ओठांवर अस्फ़ुट स्मित पसरले आहे की काय भास होत राहिला समाप्त
|
रचना मस्त लिहीलीयेस कथा. शेवटचा भाग लवकर संपल्या सारख वाटला.
|
Chinnu
| |
| Wednesday, August 09, 2006 - 5:46 pm: |
| 
|
खुप सुंदर लिहिलस रच. शेवटचा भाग जमल्यास दोन पोस्ट मध्ये टाकले असते तर बरे झाले असते. शीर्षक आणि कथा दोन्ही मस्त.
|
Princess
| |
| Thursday, August 10, 2006 - 12:41 am: |
| 
|
छान लिहिलस रचना. पण लवकर संपली असे का वाटतय? मोठी कथा आहे असे वाटताना अचानक THE END झाला.
|
Psg
| |
| Thursday, August 10, 2006 - 12:55 am: |
| 
|
रच, छान लिहिलस.. वातावरणनिर्मिती सुंदर. पण रजनी काकूकडे आल्यावर त्यांच्यात अजून काही संवाद व्हायला हवे होते गं!
|
Bee
| |
| Thursday, August 10, 2006 - 2:02 am: |
| 
|
रचना, अगदी कथाकार झाली आहेस तू आता. एक दोन श्वासात भरभर मी ही कथा वाचून काढली इतका वेग आणि इतकी आतुरता ह्या कथेत तू ओतली आहेस. परिकथेत रमणारी तू असे काही वेगळी लिहिशील असे वाटले नव्हते.
|
रचना, पुर्ण कथानक एकदम डोळ्यापुढे तरळुन गेल... छान कथा...
|
Moodi
| |
| Thursday, August 10, 2006 - 4:08 am: |
| 
|
रचना शेवट जरा हळवा पण खूपच वेगळ्या धाटणीची कथा. फारच सुंदर लिहीतेस तू. प्रत्येकवेळी तुझ्या कथेत एक नाविन्य असते. आणि अगदी हे खरे घडलय असे वाटत रहाते.
|
Meenu
| |
| Thursday, August 10, 2006 - 5:08 am: |
| 
|
वा रचना छान वर्णन सुंदरच .. काटा आला वाचताना ...
|
|
|