|
Aj_onnet
| |
| Monday, July 17, 2006 - 10:55 am: |
| 
|
माझा हस्त अन त्याचे अक्षर! हा लेख नक्की कुठे टाकावा हे न उमगल्याने मी तो इथे टाकत आहे. (तुम्ही म्हणाल, टाकावूच आहे! कुठेही टाका! ) हा लेख, 'एक व्यथा', 'हे कधी बदलणार', 'माझे अनुभव' अश्या कोणत्याही 'चालु' bibI वर अन 'बालपण नको रे देवा' या 'आगामी' बिबीवर चालु शकेल असे आमचे मत आहे. काही गोष्टींची सुरूवात कशी होते ते माहीत नाही का होते तेही माहीत नाही पण त्यांचे परिणाम मात्र फार विस्तृत अन खोल होतात. ती गोष्ट मग शाश्वत सत्य बनून राहते! आपल्या हाती बदलण्यासारखे काहीच राहत नाही. अन ह्या महान सत्याची अनुभूती मला वयाच्या पाचव्या वर्षी झाली. त्याचीच ही कथा. नव्हे व्यथा. तर लहान पणी म्हणजे अगदी चार वर्षाचा असतानाच मी काहीतरी गमभन लिहायला शिकलो. अन 'आत्मसुखाय' वगैरे काही माहीत नसल्याने गाफीलपणे त्याचे जाहीर प्रदर्शन करु लागलो. लहान पोर म्हणुन त्याचे थोडेफार कौतुकही झाले. पण त्या पेक्षा जास्त त्या आनंदावर विरजण घालणारे निरपेक्ष मत काही शुद्र मानवांनी दिलेच. की, 'हा फारच वेडंवाकडं अक्षर काढतो.' झालं हीच सुरूवात. तोच तो कृष्णक्षण की ज्याने पुढं माझे बालपण पन्नासदा खाडाखोड करून हातानेच अक्षरे पुसलेल्या पाटीसारखं बट्बटीत करून टाकलं. ते इतके की, पहिल्यांदा मी काढलेला 'श्री' पाहून, बाबांनी परत एकदा माझे admission मराठी शाळेत झालेय का उर्दु हे पडताळुन घेतले होते अन नंतर स्वस्ते श्रीमुखात दिली होती! लोक सुरुवातीला,' अरे सुंदर अक्षर काढावे, असे वेडेवाकडे काढू नये', असे सौम्य शब्दात समजावत. पण नंतर त्यांचा संयम सुटला म्हणा किंवा माझ्याकडून अतिरेक झाला म्हणा, पण ते त्याला समर्पक(माझ्या मते वाट्टेल त्या) उपमा देवु लागले. कुणी उपमा दिली दारु पिवून लटपटत गेलेल्या झुरळाची तर कुणी मुंग्यांच्या रांगेची. जे काही वेडंवाकडं असु शकतं त्या सर्व उपमा मला सहन कराव्या लागल्यात. माझ्या काही मित्रांचे मत असे की मी फार प्रयत्नपुर्वक असे खराब अक्षर काढतो. ते ही एक skill आहे. त्यांचे मत की मी जरा हातचे राखून लिहले तर अक्षर थोडे कमी खराब येईल! लोकांच्या अक्षराबाबत फारच अपेक्षा असत. ते सुवाच्च्य असावे.शिवाय ते सर्व शब्द एका रेषेत असले पाहीजेत. माझ्या एका वाक्यातील शब्द हे senex च्या चढत्या उतरत्या baseline प्रमाणे वर खाली आदळत शेवट गाठायचे. शिवाय लोकांना प्रत्येक शब्द हा सारख्या उंचीचा लागे. तात्पर्य काय. तर एक सुचना पाळली तर लोक अजून दहा करतात! त्यामुळे पहील्या सुचनेविरुद्धच बंड करायचे! अर्थात माझ्या बंडापेक्षा, त्यांचे 'बंड मोडायचे उपाय' फार प्रभावी असायचे! त्यामुळेच लहानपणी, पु लं ना जसे 'असे छान लिहण्यासाठी कोणते औषध घेवू ' वगैरे विचारणारे भेटत असत. तसेच, 'बर्यापैकी' हस्ताक्षर असणार्यांना, 'चांगले अक्षर येण्यासाठी मी कोणती दवा घेवू', असे विचारणारा मीही ह्या ना त्या स्वरूपात नक्कीच भेटला असेन. शाळेत, गणित विषय हा सहाजिकच जास्त आवडीचा. कारण त्यात लिखाण कमीत कमी. मात्र inspection ला धमाल येत असे. का कोण जाणे पन परिक्षक मराठीच्या तासाला मलाच फळ्यावर काहीतरी लिहायला सांगत. पहील्यापहिल्यांदा, त्या तासाला मीच अंग चोरून दिसणार नाही अशा बेताने बसत असे अन मग (माझी महती कळल्यावर) नंतर नंतर शिक्षकच मला योग्य जागी बसवत असत.गणिताला पुढे अन मराठीला अक्षरश लपवत असत. पण तरिही बर्याचवेळा परिक्षक मलाच धरत. एकदा एका परीक्षकांनी मला 'हातच्या काकणाला आरसा कशाला' ह्याच म्हणीचा अर्थ फळ्यावर लिहायला सांगीतला. मी आपली जागीच उभा राहून अर्थ पटकन सांगीतला. गुरुजींनी पण अहो त्याचे अक्षर फारसे चांगले नाही असे सांगून पाहीले. पण त्यांनी फळ्यावर लिहण्याचा आग्रह केल्यावर त्यांना मी त्या म्हणीचा प्रत्यक्ष वापरही करून दाखवला लहानपणी ह्या अश्या बर्याच म्हणी 'हात' चा वापर करुनच यायच्या. पण 'हात दाखवून अवलक्षण' ही म्हण मला शब्दशः पटायची. गणिताला हात वर करून मी मी असे ओरडुनही न लक्ष देणारे परिक्षक आम्हाला मराठीला पहिल्या फटक्यात उठवत असत. मग आमचा, आमच्या सरांचा, कधी मुहूर्त चांगला असला तर मुख्याध्यापकांचाही ह्या चढत्या श्रेणीत सत्कार होत असे. अन परिक्षक गेल्यानंतर परत सरांचे मला उद्देशुन आभाराचे (?) भाषण होत असे. शिव्याशास्त्रातील बहुतेक सर्व महत्त्वाच्या बाबींनी ते परिपूर्ण असल्याने ते इथे द्यायचे मी टाळत आहे. मराठीत माझा परीक्षेत अक्षरशः धुव्वा उडत असे. 'माझ्या हाती विनाश माझा कारण मी' हे संदीप ने लिहण्यापुर्वी त्याला मी नक्कीच कुठेतरी भेटलो असणार! तसे मी निबंध वगैरे छान लिहायचो. मस्त आत्मवृत्त लिहायचो. हृदयद्रावक वगैरे करून! (माझ्या) डोळ्यातून पाणी गळे पण परिक्षकाच्या लेखणीतून (मला मार्क द्यायला )शाई मात्र न गळे. माझ्या आत्म्याने व्यक्त केलेले त्या गरीब आत्म्याचे वृत्त, त्या अक्षररूपी क्षुद्र नियमांच्या कुंपनात बसलेल्या त्या परिक्षकाच्या आत्म्याला कळत नव्हते तेंव्हाच मी ताडले की हे सगळ्यांचा आत्मा समान आहे वगैरे सर्व झुठ आहे. गरिबांच्या दुखाःची भाषा नियमांच्या जंजाळाशिवाय समजणरा कोणी नाही हे मला तेंव्हाच मनापासून पटले. लहानपणी एकदा असेच एक इंद्रधनुष्य पाहून त्या वेळच्या प्रतिभेच्या मानाने फारच छान कविता केली. पण पुन्हा प्रसिद्धी परायण न राहता, कुणा एका वयाने मोठ्या मित्राला दाखविली. त्याने अरे तू चित्रे का काढत नाही असे विचारल्याने मी एकदम हवेत तरंगत त्या इंद्रधनुष्यापर्यंत पोहोचलो. मला वाटले, आपली कविता एकदम चित्रमय असल्याची ती पावती आहे. पण तो आनंद त्याच्या पुढच्या 'अरे चित्राला खाली लिहता आले असते ते इंद्रधनुष्य आहे म्हणुन. आता ह्या कवितेत जर मुद्दलात अक्षरच उमगत नाहीत तर त्या इंद्रधनुष्यतील रंग कुठे उमटायचे' ह्या वाक्याने कोसळला. शिवाय वेडंवाकडं चित्र modern art म्हणुन खपवता येतं अशी सहानुभूतीही त्यानं मला दाखवली. अन माझा भावनांना शब्दाचे बंधन नसते अश्या पोकळ वाक्यांवरचा विश्वास उडाला. अन त्याबरोबरच कविता करायची उर्मीही.तरीपण इथे नाहीतर तिथे 'हात' मारून बघुया, ह्या अपेक्षेने मी चित्रे काढू लागलो.मला लहानपणी चित्रकलेची हौसही बर्यापैकी होती. 'सुर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर 'अश्या थाटाची चित्रे म्हणजे माझ्या हातचा मळ होता. पण तिथेही बरोबर मास्तर आडवे आले. त्यांना अक्षरलेखनाची व मुक्तहस्त चित्रांची फार हौस. माझी सगळीच चित्रे अन अक्षर म्हणजे मुक्त हस्ताची निर्मिती होती पण त्यांच्या मुक्तहस्त चित्राचे कायदेकानू फार वेगळे होते, त्या प्रकाराच्या फक्त नावातच मुक्तता होती!. त्यांना त्या चित्राची एक बाजू एकदम दुसर्या बाजूची प्रतिकृती हवी असायची. अन अर्थात हिथेच गाडं रुतायचं. एक बाजूची वळणे कशी बशी जमायची पण पुन्हा दुसर्या बाजूला तशीच वळणे. हे राम. त्या सर्वशक्तीमान परमेश्वरालाही हे मानवी शरीर बनवताना तितके जमले नाही तर माझे काय? पण आमच्या मास्तरांना ते पटायचे नाही. अर्थात आमचा 'हस्त' त्या कलेच्या ओढीतूनही 'मुक्त' झाला! इंग्रजी भाषेचे मला त्यामुळेच फार कौतुक वाटायचे. अगदी माय मरो अन मावशी उरो सारखं. मराठी पेक्षा त्यात वळणे कमीच. त्यामुळे माझ्या उभ्या आडव्या रेषांनी सजलेल्या त्या मावशी कडे कुणी वाकड्या नजरेने पाहीले नाही. मागे पुण्यातल्या एका पेठेत, मी एक पत्ता शोधत होतो. माझ्या सुवाच्च अक्षरातील पत्ता असलेला कागद मी नाचवत असताना एका सदगृहस्थाने हे मोडी आहे का असे विचारून वर पुढे अर्धा तास पेशवाईतील मोडीचा वापर ह्यावर बौद्धिके घेतली होती. (पेठेचे नाव सांगायला हवेच का? ) मग मी काहितरी वाईटातून चांगले निघेल ह्या अपेक्षेने मोडी शिकायचा घाट घातला अन मग त्यापेक्षा खंडाळ्याचा घाट परवडला हे जाणवले. त्यातली सलग वळने बघून आपण ह्या वळणात मोडून जाऊ हे पटले. अन तोही बेत मोडीत निघाला. बघा मी त्या वाटेकडे न वळुन, भावी इतिहास संशोधकांना अक्षर लावण्या बाबतच्या थोड्या तरी संभ्रमातुन मी वाचवले आहे. वळणाचं पाणि वळणावरच जातं म्हणतात. पण माझ्या अक्षरातील नसलेली वळणे सहीनेही 'सहीसही' अंगिकारली आहेत.माझी सहीही माझीया अक्षराइतुकी दुर्गम आहे हे केवढे मोठे परमभाग्य. कुणी महाभाग त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करेल असे वाटत नाही. अर्थात त्याचे तोटेही आहेत. शाळेत असताना बक्षिसाचा एक चेक जमा करताना, आयुष्यात पहिल्यांदा एक account bank त उघडायचा क्षण आला होता. तेंव्हा माझी मराठीतलीच सही बघून तेथील साहेब म्हणले होते की, ' बाळा, इथे शाळेतल्या सारखी खाडाखोड चालणार नाही, किती खाडाखोड केलीयस. परत कर बघु सही. अन जमत नसेल इंग्रजीतून तर आपली नीट मराठीतून कर.' संगणक मी जेंव्हा पहीला पाहिला. तेंव्हा माझा पहिला आनंद हाच होता की आता सुंदर हस्ताक्षर असणारे अन नसणारे हा भेद नसणार. साम्यवाद साम्यवाद तो हाच! हे मला एकदम पटले. अन भांडवलशाही देशाने केलेली ही साम्यवादाकडे वाटचाल करणारी निर्मिती पाहून हेलावलो. अक्षर चांगले नसल्याने निरक्षरांपेक्षा जास्त न्यूनगंडाचा शाप भोगणार्या तमाम जनतेला तो जणु उशाःप च होता. पुधे encrypting वगैरे शब्द ऐकल्यावर आपल्याला यात नक्की काहितरी करता येईल असे वाटु लागले. पण नंतर ते encrypt केलेले काही नियम वापरून decrypt पण करायला लागते. हे कळल्यावर अशा नियमांच्या बंधनात न अडकणारा माझा हात मी चटकन त्यातून काढून घेतला. आजकाल काही कंपण्यांनी handwriting recognition ची संगणक प्रणाली विकसीत केलीय. तिही मला एकदा test करून पहायचीय. अगदी अलीकडेच 'पुणे टाईम्स' सारख्या महान माहिती पूर्ण वर्तमानपत्रामुळे मला, अक्षरावरून भविष्य सांगणार्या जमातीचा परिचय झाला. मला त्यांना एकदा भेटायचेय. बघुया काय होतेय ते. 'पूणे टाईम्स' वर नजर ठेवून रहा.लवकरच काही अपरिहार्य कारणाने आम्ही हा धंदा बंद करीत आहोत अशी जा. सू. दिसेल. हा इतक्याच वेड्यावाकड्या अक्षराचा धनी आहे हे माझ्या कपाळावरील आठ्यांवरवर इतके स्पष्ट लिहले आहे की काय कुणास ठाउक, पण प्रत्येक जण मला काहीतरी सुचना देवून जातो. अश्या गुरुंच्या संख्येबाबत दत्तमहाराज माझ्या मागच्या वळणावर असतील, बहुधा! (लहानपणीच नाही तर अगदी गाडी चालवायला लागल्यावर पण येणारे जाणारे लोक, अहो, ब्रेक दाबा, सरळ चालवा. अशा मुलभूत सुचना देत. अर्थात माझे गाडी चालवणे हे त्या अक्षराइतकेच बिकट अन वेडेवाकडे आहे की त्यापेक्षा जास्त ह्यावर बर्याच जणात मतभेद आहेत. त्यामुळे त्यावर नंतर लिहीन!) माझ्या अक्षरमोहीमेत मात्र त्या सुचना साध्या 'बोरू' वापरून पहा पासुन ते उजव्या ऐवजी डाव्या हाताने लिहून पहा अश्या माझा 'मोरू' बनविणार्या, पण त्यांच्या मते 'बाळबोध' असत. अर्थात मला हे गुरु प्रत्यक्षाबरोबरच पुस्तकातही भेटत. कधीतरी आम्हाला तो हात नसल्याने पायाने लिहणार्या मुलाचा धडा होता. लिहेनाका बापुडा! पण त्याचेही अक्षर सुंदर असायचे. अन मग तोही आमचा उरलासुरला आत्मविश्वास हिरावून न्यायचा. मला बर्याच जणांनी असे बरेच रामबाण उपाय सुचवले. पण ते रामाच्या बाणासारखे अचूक लक्षावर न आदळता, दिवाळीतल्या बाणासारखे वेडेवाकडे भरकटत गेले. त्यातला पहीला म्हणजे शुद्ध्लेखन वही. त्यामागचा उद्देश अस होता की अक्षर तर सुधारावेच पण विरामचिन्हे अन शुद्ध्लेखनाची सवय व्हावी. आमच्या (निर)उत्साहाची सरांना बहुधा कल्पना होतीच त्यामुळे त्यांनी फक्त पाचच ओळी लिहायला सांगीतल्या होत्या. पाच ओळी म्हणजे पाच मिनिटाचेच काम हे पक्के माहीत असल्याने आम्ही शाळेला निघायच्या आधी फक्त पाच मिनिटे ते काम हाती घ्यायचो. मग काय. सर्वात कमी शब्द असलेल्या त्या पाच ओळी मी आधीच हेरून ठेवलेल्या. मग काय. त्याच copy केल्या की झालं. अर्थात मूळ उद्देशाचं जे काय व्हायचं ते झालंच. घाईत त्या ओळी कश्याबश्या पूर्ण करण्याच्या नादात माझे आधीच अत्यवस्थ असलेले अक्षर अजूनच खालावले. एकदा शिक्षकांनी माझी वही मागितली अन नंतर ते पहिली काही मिनिटे शुद्ध हरपेल इतःपर्यंत हसत होते अन नंतरची काही मिनिटे मला संतापाने (त्याच वहीने) माझी शुद्ध हरपेल इतःपर्यंत बदडत होते. हस्ताक्षर सुधारण्यासाठी हात सोडून सर्व काही बदलून झाले. शाई, पेन कागद, अक्षराचा size , भाषा. तसा एकदा हात बदलायचाही प्रयत्न केला म्हणा. मी डाव्या हाताने लिहायचा प्रयत्न करताना पाहुन बाबांनी तो हात ज्या भागासाठी राखीव आहे. त्याच भागावर प्रहार केला होता असे अंधुकसे आठवते. वेगवेगळ्या शाईच्या बाटल्या ball pen शाईपेन याचा बराच मोठा संग्रह माझ्याकडे जमुन गेला आहे. मी काढलेले मोठे अक्षर पाहुन बाईंनी 'मला अजुन चष्म्याशिवाय वाचता येते'असे सांगून एक त्या अक्षराच्या size च्या प्रमाणात रट्टा ठेवून दिला होता. नंतर एकदा एका कलाकाराने तिळावर, तांदळावर 'श्रीराम' वगैरे लिहले होते. एव्हढ्या सुक्ष्म अक्षरात लिहले असल्याने ते थोडेसे खराब अक्षरही लोक भिंगातून वाचून वा वा छान असे म्हणत होते. मला एकदम ते click झाले. अक्षर लहान काढले की त्यातील चुकाही लहान होतील. अन लोकही ते कौतुकाने वाचतील. (शिवाय वह्याहि कमी लागतील!) असे विचार करून मी तोही प्रयत्न सुरु केला. फरक एव्हढाच पडला, की लोकं त्याला मुंग्यांची रांग न म्हणता, त्यांच्या पिल्लांची रांग म्हणायला लागले. कौतुक वगैरे लांबचीच गोष्ट. मला कुणीतरी वर्तुळ काढायचा प्रयत्न कर म्हणजे अक्षर सुधारेल असे सांगीतले. मग काय मी कंपासने काढायला लागलो पण भराभर पाने भरली. मग त्याने हाताने वर्तुळ काढ असे मार्गदर्शन केल्यावर मला त्यातले काठीण्य कळाले. ती दोन टोके जुळवता जुळवता अन ते spiral रेघोट्या मारता मारत भोवळच यायला लागली. पण पुढे तो छंदच लागला. अगदी जेवतानाही मी ताटात रेघोट्या मारु लागलो. भात कालवताना त्यातुन गोल बोट फिरवत तो पसरवु लागलो. झाले, माउलीने एक्दोनदा सांगून पाहिले. पण शेवटी बाबांनीच गालावर काही रेघोट्या उमटवल्या अन माझे ते रेघोट्यांचे प्रयोग बंद पडले. अर्थात ह्याचे काही फायदे आहेतच. एक म्हणजे कोणी पत्रे किंवा मह्त्त्वाच्या नोंदी लिहायला सांगत नाहीत. माझी एक आत्या सारखी म्हणायची अरे वरचेवर पत्र लिहीत जा म्हणजे खुशाली कळते. मी बर्याचदा कंटाळा करायचो अन ते राहुन जायचे. पण एकदा तिच्या ह्या भुणभुणेला कंटाळून मी लिहलेच पत्र. तिचा बिचारीचा काळजीने काही दिवसातच फोन आला. काय लिहलेय ते समजून घेण्यासाठी! अर्थातच पुन्हा तिने पत्र पाठवायला सांगीतले नाही. त्यातुनच मला एक सवय लागलीय. म्हनजे सगळे मह्त्त्वाचे form capital letters मध्ये भरायचे. आता कुठलाही form मी सुचना न वाचताही भराभर capital letters मध्ये भरतो. अगदी online असला तरी caps lock ON करतो! उजव्या शेजारी डावे असतेच ह्या न्यायाने माझ्य बहिणींचे, मित्रांचे हस्ताक्षर फारच चांगले.. त्यामुळे 'बघ, नाहीतर तू..' हे वाक्य म्हणजे पाचवीलाच पुजलेले. अरे चांगले अक्षर यायला काय लागते. तो माझ्या डाव्या हातचा मळ आहे, असे म्हणणारे माझे मित्र पाहीले की हात फार शिवशिवतात! मी एखादा नव वर्षाचा संकल्प केला तर लोक सांगायचे आधी ते अक्षर सुधार. मि सुट्टीत कोणता वर्ग join करायचा म्हंटला, तरीही आधी अक्षर सुधार! मला शेवटी शेवटी स्वप्नातही तेच दिसायला लागले. एकतर मी सुंदर अक्षर काढतोय अन सर्वांच्या माना खाली आहेत. नाहीतर मी त्या वेड्यावाकड्या अक्षरात फास बसून गुदमरतोय अन बाकीचे अरे आता तरी अक्षर सुधार म्हणुन ओरडताहेत. पुढेपुढे मी माझे हस्ताक्षर इतरांना दाखवायला इतका घाबरायला लागलो की तेंव्हा मला 'कर नाही त्याला डर कशाला' ह्या म्हणीचा खरा अर्थ कळला. इतरांसाठी 'जगन्नाथ' ठरणार्या हाताने मला मात्र ह्या सुंदर अक्षराला डोक्यावर घेणार्या 'जगा'त 'अनाथ' करून ठेवले होते. सुंदर अक्षर हा एक दागिना आहे असे मला आवर्जुन सांगणार्यांच्या सुविचारंच्या भाराखाली दबून मी काही त्यांना चौदावा अलंकार दाखविण्याचा दुर्विचार केला नाही हे एक (त्यांचे) नशिबच! मोत्यासारखे अक्षर असावे असे सांगणार्यांच्या अंगावर मोत्या सारखे भुंकत जावे असे मला वाटायला लागायचे! ह्या सर्वांचा परीणाम एकच झाला की जीवनातले 'ठेविले अनंते तैसेची रहावे' हे तत्व, की जे अनेकांना सुवाच्च अक्षराची हजारो पाने खरडून वा भक्षून कळाले नाही ते मला लवकरच कळले पटले अन मी ते आत्मसात ही केले. आता लोक म्हणतात, ह्याला काही करायचे नसते. निर्लज्ज झालाय, अजिबात अक्षर सुधारायचा प्रयत्न करीत नाही. वगैरे वगैरे. अशावेळी 'ऐकावे जनाचे करावे मनाचे',हीच म्हन उपयोगी पडते हेही मला लहान वयातच उमगलेय. आता माझी भाची रडायला लागली की माझी ताई तिचे रडे थांबावयला 'हात रे ' म्हणुन चापट मारल्यासारखे करते. अन तिचे रडे दूरही पळते तेंव्हा नकळत हा हात माझ्याही अश्या अनेक दुःखांची शिदोरी माझ्या पाठीवर सोडुन गेला आहे याची जाणीव होते. जावू दे, शेवटी काय, तर माझ्या स्वतःच्या हस्ताक्षरास, 'माझा हात अन त्याचे अक्षर' अशी भाषा वापरण्याइत्पत ज्ञान अन विरक्ती मला मिळाली त्या हस्ताक्षरामुळेच. त्यामुळेच अजून फार काही महती न गाता, त्या दिव्य हस्ताक्षरास दोन हातानी नमस्कार करून हा विषय संपावतो! प्रत्येक लिखाणाच्या शेवटी लिहायची सवय लागली आहे म्हणुन लिहतोय! "अक्षरास हसू नये." समाप्त!
|
Aj_onnet
| |
| Monday, July 17, 2006 - 11:02 am: |
| 
|
बरेच जण ह्या अक्षराच्या नियमांपायी, अक्षर-शत्रूही झाले असतील. वा ते सर्व नियम पाळुन भाषाप्रभू ही झाले असतील. तुम्हाला आपले चांगले वाईट अनुभव लिहायचे असतील तर जरूर लिहा. मलाही तेव्हढेच 'समदुःखी' वा 'गुरु' मिळाल्याचा आनंद होईल. mods हा लेख तुम्हाला इथे ललित मध्ये ठीक वाटला नाही तर, तुम्हाला योग्य वाटेल त्या जागी हा लेख हलवू शकता!
|
Moodi
| |
| Monday, July 17, 2006 - 11:09 am: |
| 
|
अजय तुझ्या लेखातील प्रत्येक ओळीला अन प्रत्येक शब्दाला भरभरुन दाद( अक्षर कसे आहे माझे?) वाचतांना खुर्चीवर नीट बसावे लागतय.  अती उत्तम!!!!!!!!!. 
|
Bsk
| |
| Monday, July 17, 2006 - 12:59 pm: |
| 
|
खूपच सही आहे लेख!!! प्रत्येक वाक्याला हसले!!! ( इथे बाकीच्या स्मायली कशा आणायच्या?)
|
Dineshvs
| |
| Monday, July 17, 2006 - 1:33 pm: |
| 
|
म्हणजे हि कला माझ्यापासुन लपवुन ठेवलीस म्हणायची.
|
Chinnu
| |
| Monday, July 17, 2006 - 2:21 pm: |
| 
|
>>मोत्यासारखे अक्षर असावे असे सांगणार्यांच्या अंगावर मोत्या सारखे भुंकत जावे असे मला वाटायला लागायचे! अजय, ditto re . तुझा लेख वाचुन मला खरच अजुन एक समदु:खी भेटल्याचा कितीतरी आनंद झालाय. स्वत:ला या बाबतीत कधीच एकटा नकोस समजु या पुढे!
|
Asami
| |
| Monday, July 17, 2006 - 4:03 pm: |
| 
|
भन्नाट लिहिलयस रे खास जमले आहे
|
'बघ, नाहीतर तू..'>> माझ्या वरही हे वाक्य अनेकदा फेकले गेले आहे. मस्त लिहिलेस.
|
Ninavi
| |
| Monday, July 17, 2006 - 7:56 pm: |
| 
|
>>> दारु पिवून लटपटत गेलेल्या झुरळाची >>> सरांचे मला उद्देशुन आभाराचे (?) भाषण मजेशीर लिहीलंय तुम्ही, अजय. 
|
Himscool
| |
| Tuesday, July 18, 2006 - 12:36 am: |
| 
|
तसे मी निबंध वगैरे छान लिहायचो. मस्त आत्मवृत्त लिहायचो.लेख वाचताना ह्याची प्रचिती आली.. आणि अक्षराच्या बाबतीत मीही बर्याच वेळा शिव्या खाल्ल्या आहेत.. 'काय हे कुत्र्या मांजराचे पाय काढून ठेवले आहेस..'
|
Bee
| |
| Tuesday, July 18, 2006 - 1:59 am: |
| 
|
बर्याच जणांनी हा लेख विनोदी लेख समजवूनच वाचला आहे असे वाटते. खरच रोज आपण लिहितो.. निदान graduate होईपर्यंत तरी वहीपेनाशी आपला संबंध असतो. जर एखाद्याचे अक्षर नीट नसेल तर त्याला काय काय ऐकावे लागले असेल ह्याची कल्पना ह्या लेखावरून करता येते. अजय, अरे माझ्या शाळेत अभिजीत बिडवई नावाचा एक मुलगा होता त्याचे अक्षरही खूप वेडेवाकडे होते. मात्र तो खूप हुशार होता. आता तो MD झाला आहे child specialist म्हणून पुण्यात त्याची चांगली ओळखी होत आहे. खूप छान लिहिला हा लेख.. वेगळ काहीतरी वाचायला मिळाल. एखादा अक्षर नमुना दाखव बघू
|
अजय एकदम सुंदर लेख. हसुन हसुन पुरेवाट झाली. मला माझ्या क्लासच्या ईंग्रजीच्या बाईंनी स्वताजवळ बसविले होते; अक्षर सुधरावे म्हणुन. परंतु शेवटी त्यांच्या अविरत परीश्रमांना फ़ळ आले.
|
Psg
| |
| Tuesday, July 18, 2006 - 2:32 am: |
| 
|
अजय, धमाल लिहिलयस.. too good
|
Lampan
| |
| Tuesday, July 18, 2006 - 2:41 am: |
| 
|
वा वा वा !!! माझ्या आणि सुवाच्य अक्षराची देणगी न लाभलेल्या सर्वांतर्फ़े हे लिहिल्याबद्दल धन्यवाद ... चांगलं अक्षर काढायच्या नादात .. शब्दातलं कुठलतरी अक्षर राहुनच जातं ... span of attention कमी आहे काय करणार ... माझी तर अगदी हॉल तिकीटावरही खाडाखोड झाली होती ... मीही अगदी असच चित्र वगैरे काढायचा प्रयत्न केला होता पण त्यावर मला " तुझी पट्टीनी काढलेली रेघही रस्त्यावरुन बैल ****** गेल्याअसारखी येते " असा शेरा मिळाला होता मग तेही बंद ..
|
लम्पन..... तुझी पट्टीनी काढलेली रेघही........ अजय, मस्त लिहिल हेस, वेगळा पण तसा जिव्हाळ्याचा विषय! माझीही अवस्था काहीशी अशीच हे!
|
अजय सुंदर लिहीले आहेस! लेखात घेतलेले शब्द व त्यावर बेतलेल्या कोट्या ज्या वळणदारपणे केल्या आहेस ते बघता तुझे अक्षर खूपच सफाईदार व वळणदार वाटले. मायबोलीसारख्या सर्वांचे अक्षर एकाच dev2 टॅग मधे तोलणार्या साईटमुळेच आज तुझ्या अक्षरातील सफाई वाचता आली. 
|
माजेशिर लेख.. मलाही बरेच शेरे ऐकायला मिळालेत अक्षरावरुन... वारा आल्यासारखे तुझे अक्षर एकदा इकडे इकदा तिकडे कसे काय जाते असे माझे वडिल मला नेहमी म्हणायचे.. लंपन तुझी ही बाजु माहित नव्हती..
|
Abhi_
| |
| Tuesday, July 18, 2006 - 5:40 am: |
| 
|
अजय, मस्त लिहिलं आहेस रे!!
|
Rajkumar
| |
| Tuesday, July 18, 2006 - 5:47 am: |
| 
|
अजय.. छान लिहीलयंस रे..
|
Bee
| |
| Tuesday, July 18, 2006 - 5:53 am: |
| 
|
अजय, ह्या बीबीचे नाव 'त्याचा हस्त आणि माझे अक्षर' असा तर नको होते?.. कारण तुम्हाला मार पडायचा म्हणून त्याचे हस्त आणि अक्षर तर तुमचेच होते म्हणून माझे अक्षर
|
|
|