Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 04, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » कथा कादंबरी » मी, अन्या आणि लग्न वगैरे... » Archive through July 04, 2006 « Previous Next »

Shraddhak
Tuesday, June 27, 2006 - 12:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो घरात ज्या पद्धतीने आला ते पाहूनच मला जाणवलं स्वारी अस्वस्थ आहे आज.... पायातले फ़्लोटर्स त्याने भर्रकन काढून कोपर्‍यात भिरकावले. डोक्यावरची कॅप काढून टीपॉयवर फेकली आणि खिडकीपासच्या दिवाणावर धप्पकन येऊन बसत त्याने फ़र्मावलं, " सन, पाणी आण गार. " आणि लगेच माझ्याकडे चमकून पाहात " ओ आणलंच आहेस तू तर पाणी.... " म्हणून पाण्याची बाटली हिसकावून घेत घटाघटा पाणी प्यायला.

" कुठे उनाडक्या करून येतोयस? " मी त्याच्याशेजारी बसत म्हणाले.
" काही specific नाही. असंच मनीषच्या फ़्लॅटवर गेलो होतो. अजितपण आला होता. मग काय TP , गप्पा, टप्पा... दाल रोटीमध्ये जाऊन जेवून आलो. "
" हं म्हणजे तसा नेहमीसारखाच चालला होता तुझा आजचाही दिवस एकूण! मग माशी कुठे शिंकली? "
" तू ते काय म्हणतात तशी ' चाणाक्ष ' आहेस. तुला कसं कळलं माशी वगैरे शिंकलीये ते? "
" अरे अन्या, आता सात वर्षं होतील आपल्याला एकमेकांना ओळखायला लागून... त्यावरून एवढं कळतंच की मला... बोला... "
" एवढंच जर आहे तर गेस मार की! " त्याने आव्हान दिल्यासारखं म्हटलं.
" हात्तिच्या.... त्यात गेस मारायसारखं काय आहे? अविनाशकाकांचा फोन आला असणार आणि बोलता बोलता गाडी त्यांच्या सध्याच्या अति जिव्हाळ्याच्या विषयाकडे सरकली असणार... तू लग्न कधी करतोयस? "

" सन, पाय दाखव तुझे... डोकं ठेवतो. भयंकर अंतर्यामी झाली आहेस. गुरुमैया आप महान है| " म्हणत अन्या नाटकीपणाने माझ्या पायांशी वाकला.

" हं तर ही आजची पंचविसावी वेळ ह्या वादाला तुझ्यात आणि अविनाशकाकांमध्ये तोंड फुटण्याची आणि मुलीचं वर्णन केलं गेलं असेल एखाद्या तर ही दहावी मुलगी! " मी बोटांवर मोजत म्हणाले.
" वा काय चोख हिशोब आहे.... मानलं! इसी खुशी मे कालचे उरलेले गुलाबजाम फ़्रीजमध्ये आहेत ते आण. " तो आरामात बाहेरच्या उन्हाकडे बघत तक्क्याला रेलला.
" खादाडपणा करू नकोस. आज दालरोटी म्हणजे तुम्ही गाजर का हलवा वगैरे हाणलं असणारच आहे. जरा वाढत्या वजनाकडे लक्ष द्या अन्याजी... "
" ए चले, मी कालच वजन केलं M G Road ला एका ठिकाणी लावलेल्या वजन करण्याच्या मशिनवर! गेल्या दोन वर्षांत फक्त दोन किलो वाढलंय वजन. अजूनही माझी चार वर्षांपूर्वीची जीन्स घालता येतेय मला. ( दोन चार इंच ढिली करून. - मी. पण अन्या लक्ष देत नाही.) जे नियमित व्यायाम करत नाहीत त्यांनी असं हेवी खाल्लं तर त्यांचं भराभर वजन वाढतं; हा तुझा सिद्धांत अतिशय चुकीचा आहे. माझी पचनशक्ती उत्तम असल्याने मला तुझ्यासारखी regualar jogging वगैरे करायची गरज नाही. तेव्हा निष्कर्ष काय तर गुलाबजाम आण. "

...त्याच्या हातात चार गुलाबजामांनी भरलेला बाऊल देऊन मी पुन्हा दिवाणावर त्याच्याशेजारी बसले.

" अजून चार गुलाबजाम शिल्लक आहेत. ते हवे असतील तर उठून आतमध्ये जाऊन घेऊन यायचे आणि भांडं नीट सिंकमध्ये घासून जागेवर ठेवायचं. "
" मी का म्हणून भांडं घासू? तुझी बाई कामाला येणार नाहीये का? आणि काल ' तुम्ही जरा लौकरच या. तुमच्याशी गप्पा मारता मारता माझा स्वयंपाक चटकन होईल. ' असं सांगून मला आणि अजितला जवळजवळ निम्मा स्वयंपाक करायला लावलास त्यामुळे या आठवड्याचा आमचा घरकामाचा कोटा पूर्ण झालेला आहे. "

मला माझ्याही नकळत हसू आलं. हा इतक्या ठामपणे घरकामाचा कोटा बिटा शब्द वापरून भांडं घासून ठेवणार नाही म्हणतोय आत्ता आणि प्रत्यक्षात मात्र चटकन आत जाऊन नीट धुवून, जागच्या जागी लावून ठेवेल भांडं.

" हसलीस का? " त्याने संशयाने माझ्याकडे पाहात विचारलं आणि पुन्हा एकदा वॉर्निंग दिल्यासारखा म्हणाला " मी काहीही उचलून, आवरून, घासून घेणार नाहीय. "
" बरं राहिलं... नको करूस. आणि आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया. काय झालं? "
" अगं तसं खास काही नाही. त्यांनी कसल्याशा मंडळात माझं नाव नोंदवलंय, मग रीतसर कुणातरी मुलीच्या वडिलांचा त्यांना फोन आला. मुलगी देखणी, हुशार, गृहकृत्यदक्ष, महत्त्वाकांक्षी, करीयर कडे लक्ष देणारी, पुन्हा घराकडे लक्ष देणारी वगैरे वगैरे आहे.... "
" बाप रे ग्रेटच... इथे मला ऑफिसकडे लक्ष देताना घराकडे पाहायला होत नाही आणि घरी लक्ष द्यायचं म्हटलं तर त्या कामाने दमून जाऊन ऑफिसमध्ये जांभया येतात. थोडक्यात काय, तर उद्या डॅडनी माझं लग्न काढलं तर लिहायला मॅटर कमी पडणार. "
" जाऊ दे ना. तू टेन्शन घेऊ नकोस. मी, अजित, मनीष... आम्ही सगळे मिळून तुझा फेक resume तयार करू. त्यात तू परीसारखी सुंदर, भयंकर हुशार, घरकामात प्रवीण... आहेस असं सगळं लिहू. तेवढ्याने नाही भागलं तर हुंडा पण देऊ. तू काही काळजी करू नकोस. मी आणि अजित onsite trips मध्ये मिळवलेले सगळे पैसे तुझ्या हुंड्यासाठी ठेवू. "

मला एकदम अनावर हसायलाच यायला लागलं. हे दोघे गांजलेल्या चेहर्‍याने, एकही पैसा खर्च न करता माझ्या हुंड्याची तरतूद करतायत, मुलाच्या घरच्यांकडे माझ्या लग्नासाठी बोलणी करतायत; हे दृश्य कल्पना करून पहायला देखील भयंकर विनोदी वाटत होतं.

आधी engineering च्या निमित्ताने आणि नंतर इथेच jobs मिळाल्यामुळे गेले सात आठ वर्षं बंगलोरमध्येच आहे मी. engineering पासून जमलेल्या ग्रुपपैकी जेवढा ग्रुप इथे उरला आहे त्यांच्यासोबत आयुष्य enjoy करायला अजूनही मजा येते. पण आता हळूहळू काहीतरी बदलत चालल्याचं जाणवतं. ग्रुपमधल्या बहुतेक मुलींची लग्नं झाली आहेत, ठरली आहेत.... काहींनी आपापली जमवली, काहींची घरच्यांनी ठरवली. काही मुलांचीही झाली लग्नं. माझ्या अगदी जिवाभावाच्या, ग्रुपमधल्या मंडळींपैकी मोहित, तृप्ती ( ही तर डायरेक्ट देशच सोडून गेलीय) वगैरेंची लग्नं झालीत. मनीषचं ठरलंय, पण त्याची होणारी बायको पूजा सध्या onsite गेल्याने लग्नाची तारीख काढलेली नाहीय. आता अन्याचा नंबर लागलाय. उद्या माझाही?????? छे, मी मनातून ती शक्यता झटकून टाकली. मॉम तर नाहीये, डॅड एकतर भारतभर फिरत असतात, घरी असले तरी त्यांच्या लेखनामध्ये गुंग असतात. माझ्या लग्नाबद्दल कुणी त्यांना विचारलं तर काय बरं म्हणतील डॅड?
' अं? सन्मतीचं लग्न? करू की... काय घाई आहे? नाहीतर तिने तिचा जोडीदार शोधला तरी मला हरकत नाही. नाही शोधला तर मी शोधेनच... पण तिला लग्न करायचं असेल तेव्हाच! काय सन... करायचं आहे का लग्न? ' असं म्हणून माझ्याकडे पाहतील मी त्यांच्या विचारांना दुजोरा द्यावा म्हणून! तात्पर्य काय, मी विषय काढेपर्यंत डॅड माझ्यामागे लग्नाचा भुंगा लावणार नाहीत. ( बरंच झालं की! की नाही????? कोण जाणे!) मॉम असती तर तिनेदेखील हेच केलं असतं म्हणा!

" ए.. कशाचा विचार करतेयस? लगेच मुलगा शोधण्याच्या दृष्टीने आखणी करायला सुरुवात केलीस की काय? "
अन्या म्हटला तशी मी भानावर आले.

" नाही रे, आपल्या ग्रुपबद्दल विचार करत होते. बदलायला लागली नाही रे सगळ्यांची आयुष्यं? "
" हं खरं आहे.... पण हा बदल नको वाटतो कधीकधी. पुन्हा आपल्या कॉलेजच्या दिवसांकडे परतून जाता आलं तर काय धम्माल येईल नाही? "
तो बाहेरच्या उन्हाकडे एकटक पहात म्हटला.

क्रमशः


Meenu
Tuesday, June 27, 2006 - 2:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र छान लिहीलं आहेस नेहमी प्रमाणेच

Lampan
Tuesday, June 27, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारी का काय म्हणतात तसलं
लिहितियेस .. मस्तंच !!


Shraddhak
Tuesday, June 27, 2006 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अन्याची ही ' पुरानी आदत ' आहे. पुराने दिनोंको याद करना| आमच्या कॉलेजच्या पाठीमागे एक माध्यमिक शाळा आहे. रोज नऊ वाजता ती मुलं छान टापटीप युनिफ़ॉर्म्स घालून शाळेमध्ये यायला लागली की अन्या ' यार... ह्यांच्याकडे पाहून पुन्हा शाळेत जावंसं वाटतं. ' म्हणायचा. आठवड्यातून एकदातरी! अजित त्यावर गंभीरपणे ' हं... मलाही तसंच वाटतं. जा.. पण हाफ पॅंट घालून नको. आम्हाला पाहवणार नाही. ' म्हणायचा. आणि पुन्हा अजित अन्याची जुंपायची. एकमेकांचा एक शब्द खाली पडू द्यायचे नाहीत दोघे. आणि ती मजा बघत मी, तृप्ती, मोहित, मनीष यथेच्छ टाईमपास करायचो. अजूनही कधी कधी अजित आणि अन्याची जुगलबंदी रंगते; तेव्हा मात्र मलाही अन्याची ' पुरानी आदत ' लागली की काय असं वाटायला लागतं.

मी अन्याकडे बघितलं. तो अजूनही खिडकीबाहेरच बघत होता. पार हरवून गेल्यासारखा!

" अन्या "
" अं... अरेच्च्या! पुन्हा पुराने दिनोंको याद करना सुरु झालं वाटतं माझं. " तो किंचित हसत म्हणाला.
" हं. पण मजा वाटते रे मलादेखील कधीकधी ते सगळं आठवून! आपल्या कॉलेज campus मध्ये आपण घातलेला धुडगूस, एकदा girls' hostel वर भूत असल्याची अफवा होती तेव्हा तू आणि मनीषने आपल्या सरांना विचारलेला ' सर आम्ही तिथे मुलींच्या रक्षणासाठी राहायला जाऊ का? ' असला भन्नाट प्रश्न ( इथे अन्याचा सुस्कारा), रंगपंचमीला कॅंटीनचं आवार खराब केल्याबद्दल शिक्षा म्हणून आपल्या पूर्ण ग्रुपने रविवारची सुट्टी खर्च करून केलेली सफाई, engineering च्या शेवटच्या वर्षी topper असलेली आणि पुढे मॉडेलिंगकडे वळलेली आपली सगळ्यात फेमस सिनियर भाग्यलक्ष्मी ( अन्याचा उसासा.) सगळं आठवून मलापण तुझ्यासारखं nostalgic व्हायला होतं. "
" खरंच गं सन!!! काय सही दिवस होते ते. एक सालं टेन्शन नव्हतं; धमाल करायचो, मग परीक्षेआधी रात्ररात्र जागून अभ्यास करायचो, वेळ नेहमीच कमी पडायचा मग तयारीला पण फेल होऊ अशी काळजी वाटली नाही, कमी मार्क मिळण्याची देखील काळजी वाटली नाही तेव्हा. जॉब मिळेल न मिळेलचीही फ़िकीर नव्हती. आता जॉबचंच उदाहरण घे, तीन जॉब बदलले मी गेल्या तीन साडेतीन वर्षांत. पुरेशी तयारी असली तरी दर वेळी मनात धाकधूक, होईल ना सगळं नीट म्हणून. "
" हं खरं आहे. कुछ पाने के लिये कुछ खोना भी पडता है. तो हमने क्या खोया है अपने जॉब्ज के लिये? अपने मन का चैन.. असंच ना? "
" अगदीच तसं नाही म्हणता येणार गं. प्रत्येक जॉबमधली सुरुवातीला वाटणारी नव्या गोष्टीबद्दलची भीती संपली की येतं ना मन नॉर्मलला. मग आपण enjoy करायलाच लागतो की आपसूक. "
" मग exactly हाच नियम तू लग्नाला का लावत नाहीस? तुझ्या मनात या relationship बद्दल थोडीफार धाकधूक असलीच तर ती कमी होईलच ना तुझ्या या नियमानुसार? "
" आयला, कुठून कुठे पोहोचतेस तू, सन? आत्ता विषय चालले होते आपल्या कॉलेज लाईफचे आणि जॉबचे. तू मध्येच हे लग्नाचं काय काढलंस परत? "
" अरे माझा मेंदू जात्याच शार्प असल्याने मला तुझा नियम तुझ्या लग्नाबाबतही जसाच्या तसा लागू होतो असं जाणवलं; तेव्हा लगेच मी तुला ते दाखवून दिलं. "

अन्या का कोण जाणे, एकदम गंभीर मूडमध्ये गेला. म्हणजे आज दाल रोटीमधला गाजर का हलवा चवीला तितकासा बरा नसणार.

" गाजर का हलवा अप्रतिम होता. मी दोनदा ऑर्डर करून खाल्ला. त्यामुळे मी खरोखरच गंभीर आहे. हे गांभीर्य गाजरका हलव्याच्या बेकार चवीने आलेलं तात्पुरतं गांभीर्य नाही. "

मला भयंकर हसायला यायला लागलं.
" मला बर्‍यापैकी फ़ेस रीडिंग करता येतं. " अन्याचा तोच गंभीर सूर कायम! मी अक्षरशः दिवाणावर लोळण घेतली. अनावर हसता हसता अचानक जाणवलं, अन्या गप्प झालाय एकदम.. बापरे! माझं हसणं थांबलंच!

" अन्या, काय रे? आज खूपच वादावादी झाली का अविनाशकाकांशी? " अन्याने उत्तर दिलं नाही. तो पुन्हा खिडकीतून बाहेर पहात राहिला. निरुद्देश!

" ए अन्या, बोल ना! काय झालं आज एवढं? " अन्याने कष्टाने नजर माझ्याकडे वळवली.

" अगं आई बाबा इरेलाच पेटलेयत; या वर्षी, आणि याच मुलीशी माझं लग्न व्हावं म्हणून! सून म्हणून ती सर्वार्थाने योग्य वाटली त्यांना. त्यांचा युक्तिवाद बिनतोड आहे गं, engineering झालंय, पुढे शिकायचं नाहीये, चांगला जॉब आणि पगार आहे, वय २५; मग काय हरकत आहे लग्न करायला? "

अविनाशकाका आणि आशाकाकूच्या या बोलण्यात खुसपट काढण्यासारखं खरंतर काही नव्हतंच! खरं तर अन्या आणि काकांमध्ये वादावादी देखील व्हायचं फारसं कारण नव्हतं. काका तसे बरेच विचारी.. सून आणायचीच, हा निर्णय त्यांनी नक्कीच विचार करून घेतला असणार. पण अन्या...

"To be honest San, I am really afraid of commitment."

मी चमकले. हे आजवर बोलला नव्हता अन्या. मला काका आणि अन्यामधल्या सव्विसाव्या वादविवादाची शक्यता दिसायला लागली.

क्रमशः


Meenu
Tuesday, June 27, 2006 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं मस्त चाललय .. कीती छान relationship च वर्णन आहे हे ... खरच असते का ईतकं छान relation ... मला तरी नाही आलाय असा छान अनुभव कधी ...anyways carry on shra... एक सांगायच राहिलं की कथेच नाव एकदम सही particularly " वगैरे "

Prajaktad
Tuesday, June 27, 2006 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र!एकदम ताजी टवटवित कथा... so far अगदी मस्त चाललिय!.

Chinnu
Tuesday, June 27, 2006 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र छान आहे ग. येउ देत पुढच.

Badbadi
Tuesday, June 27, 2006 - 11:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र, gr8 :-) काल च orkut वर एक जुना मित्र भेटला.. आणि आम्ही जवळ जवळ हेच बोलत होतो :-)

Manuswini
Wednesday, June 28, 2006 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाचुन हे असेच वाटले,
हाये ये दिन क्योन ना आये

गेले ते दिवस
ती college ची मस्ती
च्यायला एकदा का college संम्पले न की हे असे पुन्हा मिळत नाही.

श्र,
वाट पहातेय पुढची


Bee
Wednesday, June 28, 2006 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान विषय आहे ह्या कथेचा. वरील दोन भागांप्रमाणे उर्वरीत भाग पण छान येऊ दे. यथार्थ चित्रण करतेस.

Shraddhak
Wednesday, June 28, 2006 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" का रे अन्या? "
" मलाही नक्की नाही गं सांगता येत सन! पण मनात भीती आहे खरी... ज्या व्यक्तीसोबत आयुष्यभर राहायचंय, त्या व्यक्तीला एखाद दोन भेटींमध्ये पारखण्याची कल्पनाच विचित्र वाटतेय मला. अगं मैत्री करताना देखील एकदम एक दोन भेटींमध्येच ' तू माझा जिवाभावाचा मित्र ' असं म्हणायला लागत नाही आपण. मग इथे तर फार कठीण मामला झाला.
बरं आणि भेटींची संख्या वाढवावी, तर प्रत्येक भेटीगणिक वाढणार्‍या इतरांच्या अपेक्षांचं ओझं जाणवायला लागतं. "
" खरंय अन्या.. पण मग ' पहली नजरमे प्यार ' सारखं काही जमतंय का बघावं ना! "
अन्याच्या चेहर्‍यावर आता हसू फुटलं.
" सन, अगं तो सिनेमा आहे का? डोळ्यांना डोळे भिडले की लगेच मनात प्रेमाचे अंकुर.. तिचं लाजणं.. त्याचं हसून तिच्याकडे पाहणं.. तिचं पदराच्या टोकाशी चाळा करणं... व्वा!
अगं गेल्या वेळी घरी गेलो होतो तेव्हा जबरदस्ती एक मुलगी पहायला नेलं होतं मला. मुलगी दिसायला एकदम झकास. म्हटलं डोळ्यांना डोळे भिडले तर व्हायचंही पहली नजर मे प्यार.. पण कसचं काय? त्या मुलीला माझ्यात interest नव्हता वाटतं. एकतर प्रचंड अवघडल्यासारखी बसली होती. ( स्वतःच्याच घरात???? - मी) सारखी खाली नाहीतर इकडे तिकडे पाहात होती. ' तुला मला काही विचारायचं असेल तर जरा बाहेर जाऊया का? ' विचारलं तर नको म्हणाली. मग काय, general गप्पा मारून आम्ही जायला निघालो, आई बाबा जरा पुढे गेले आणि मी बुटाची लेस बांधत मागे थांबलेलो तर मला आतलं बोलणं ऐकायला आलं.

' तो एवढा विचारत होता तर गेली का नाहीस? किमान चार प्रश्न विचारता आले असते. '
' साडीच्या निर्‍या सुटल्यायत, म्हणून. उगीचच्या उगीच घोळ घातलास ना तू साडीचा ऐनवेळी?!!! आजकाल कुणी इतकं बघतं का? आणि तसाही दिसायला अजिबात धड नाहीय तो मुलगा. '

" आयला अन्या, त्या परीने तुझा अगदी निर्दयपणे मनोभंग केला म्हणायचा... "
" सन, जाऊ दे. बर्‍याच भेटी असल्या निरर्थक होणारच यामध्ये. मला वाईट वाटतं त्या अवघडलेपणाचं. त्या मुलीला या सगळ्या समारंभासाठी तिने काय घालावं याचंदेखील स्वातंत्र्य न दिल्याचं. मला तिने पाहताक्षणीच reject केलं होतं. I don't blame her; it's her choice. पण ते कळवायला देखील तिच्या आई वडिलांनी पाच दिवस घेतले. मे बी, तिला समजावायचा प्रयत्न झाला असणार. "
" कदाचित तू किती handsome आहेस ते सांगत असतील! " मी परत अन्याला चिमटा काढला.
" अरे जाने दो. ज्या माणसाला एकदा भाग्यलक्ष्मीने 'You look nice in this shirt...' असं म्हटलंय तो कशाला अशा लोकांच्या शेर्‍यांची पर्वा करेल? वा... काय ती रम्य दुपार. ( अन्याचा फ़्लॅशबॅक सुरु.) अशी भाग्यलक्ष्मी समोरून चालत येतेय. असा मी तिच्याकडे बघत बघत तिच्या दिशेने चालतोय. "
" त्या नादात तू पाय सटकून कॅंटीनसमोर साचलेल्या चिखलयुक्त पाण्यात पडलास. नंतर अजित, मनीषने तुला हात देऊन उठवलं तेव्हा भाग्यलक्ष्मी तुझ्याजवळ येऊन कसंबसं हसू आवरत ते वाक्य म्हणाली होती. " मी तत्परतेने अन्याची रम्य कहाणी पूर्ण केली.

" सन, किती तो दुष्टपणा? पण हे सगळं खरं असलं तरीही मुख्य मुद्दा काय तर " भाग्यलक्ष्मी " मला म्हटली होती तसं... "
" हं तर त्या मुलीला भेटायचा मुद्दा! या असल्या निरर्थक भेटींमुळे, आणि या पद्धती फारशा बदलायची चिन्हं न दिसल्यामुळे arranged marriage मध्ये काही राम नाही म्हणायचंय का तुला? "
" कदाचित हो.. आणि नाहीही. "
" अन्या एक काय ते सांग. हो की नाही? "
" नाही सांगता येत नक्की. कदाचित ही system इतकी प्रचंड आहे की आपल्याला आलेल्या दोन पाच अनुभवांवरून डायरेक्ट अंतिम निष्कर्ष काढू नयेत कोणी... "
" म्हणजे तुला या system बद्दल comfortable वाटतंय बर्‍यापैकी.. "
" नाही सन, चुकलीस. एकदम टोकाचे निष्कर्ष काढू नयेत म्हणजे सरसकट ही system चांगली की वाईट याबद्दल मत बनवून घेऊ नये. एवढंच करावं, की ज्याने त्याने मला ही system सूट होतेय का याचा विचार करावा. "
" मग तू केलास का विचार? "
" कदाचित ही system मला सूट होणारी नाहीये. निदान आत्तातरी तसंच वाटतंय... "
" मग तू स्वतःसाठी मुलगी स्वतःच का शोधत नाहीस? "
" साडेतीन वाजले, कॉफी पिऊयात. "

अन्या अगदी war front वर असेल तरी हे वाक्य बरोबर साडेतीनला न चुकता म्हणेल, हे मला नेहमीच वाटतं.
" तू कर कॉफी... "
" चालेल. "

तो उठून कॉफी करायला आत निघून गेला आणि मी शेजारी टीपॉयवर पडलेलं मासिक चाळायला लागले.

क्रमशः


Chinnu
Wednesday, June 28, 2006 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण मायबोली चाळतेय तुझ्या गोष्टीसाठी!

Asmaani
Wednesday, June 28, 2006 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र, नेहमीप्रमाणेच छान ओघवती कथा. लवकर पूर्ण कर प्लीज!

Mi_anu
Wednesday, June 28, 2006 - 11:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान. एकंदरीत कथा प्रामाणिक आहे. आणि मजेशीर. फक्त पुढचे भाग लवकर येऊदेत.

Meenu
Thursday, June 29, 2006 - 12:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं आम्हालाही छान comfortable वाटतय त्या दोघांना एकमेकांबरोबर वाटतय तितकच .... गडबड करु नकोस take your own time to write the nice story

Fulpakhru
Thursday, June 29, 2006 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chaan, vaachtana college che divas athvle...


Chinnu
Thursday, June 29, 2006 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का ग बाई, आज खाडा?

Bee
Friday, June 30, 2006 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे आज ह्या पोरीनी दांडी मारली.. श्र ह्याची एक punishment म्हणून अजून एक कथा तुला लिहावी लागणार आहे.. विचार कर अशा दांड्या मारत गेलीस तर तुला किती कष्ट पडतील मग.. :-)

Raina
Monday, July 03, 2006 - 11:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र,
सुरेख लिहिलय... पुढच्या भागाची वाट पाहातेय.


Manutai
Tuesday, July 04, 2006 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लेखिकेच्याच प्रेमात असल्याचे ऊघडकीस तर येत नाही छान कथा आहे. क्रुपया पुढे लिहिणे.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators