Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 06, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » ललित » मराटी पाउल पडते पुढे » Archive through June 06, 2006 « Previous Next »

Raina
Tuesday, June 06, 2006 - 1:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जपानला आल्यावर जे अनेक धक्के बसतात (भुकंपासकट) त्यातिल एक म्हणजे “चालणे” अर्थात “पदयात्रा”. होतं काय, की पुण्यात कायम बुडाखाली दुचाकीवाहनं नाहीतर तिनचाकी रिक्षा- शिवाय आणि दुचाकी वाहन हे पु.ल. म्हणतात त्याप्रमाणे हत्यार चालवणे या अर्थि. आणि रिक्षावाल्यांशी हुज्जत घातली नाही- तर पिंडाला कावळा शिवायची मारमार. तर असो.


जपानात आल्यावर एकाएकी आपल्याला पाय हे अवयवद्वय आहेत आणि ते वाप्रावे लागतात- स्वयंचलित वाहनांशिवाय ही भाजी उचलुन आणता येते हा साक्षात्कार होतो. आणि मग असे अनेक साक्षात्कार क्षणोक्षणी होत राहतात.

आपल्याकडे रस्ता ही दोन खड्ड्यांमधील उरलि सुरली जागा- आणि वाहने चुकवत, पथारीवाल्यांच्या/फेरीवाल्यांच्या शिव्या खात, बखोटीला कशीबशी मारुन मुट्कुन पकडुन आणलेली, नाहीतर सैरावैरा धावणारी कार्टी घेउन जाणा-या माउल्या.. मध्येच गायी, म्हशी, कुत्र, मांजरी, झालंच तर मेंढरं, किंवा मदार-याचे माकड/ किंवा दरवेशाचे अस्वल- हे सर्व प्राणिमात्र- अशी सर्व स्थिरचर सृष्टी मौजुद असते.

म्हणुनच, इथे आल्यावर “पदपथ” (Footpath) ह्या शब्दाचा अर्थ पुरेपुर कळ्ला ! जपान मधे, कुठे चालवं लागत या प्रश्नाचे उत्तर "सगळीकडे" इतकं साध आहे. म्हणजे ठेस्ना पासुन घराकडे, फलाटावर (काही मोठ्या ठेसनांच्या फलाटांवर तर अक्षरश: १-१ कि.मी. चालायला लागते- इप्सितस्थळी पोचण्यासाठी. त्यातून जर भिडु नविन असला आणि जपानिच्या नावाने बोंब असली, तर मग विचारायलाच नको. तोक्यो स्टेशन वर तर १५ लोकांना (इंग्रजीत) पत्ता विचारला की १६ वा मनुष्य पत्ता सांगतो(त्याला इंग्रजी येत असेल तर) नाहीतर बिचारा वाट वाकडी करुन हाताला धरुन रस्ता दाखवायला येतो. सगळ्या, म्हणजे झाडुन सगळ्या Tourist Points वर जबरद्स्त चालायला लागते. मग तुम्ही तुमच्या गाडीने जा नाहितर बस/ट्रेन ने जा- कुठंलही वाहन तुम्हाला फक्त २-३ कि. मि दुर, (त्यांच्या मते) अगदी पाय्थ्याशी नेउन सोडते. मग पुढे तुम्ही आणि तुमचे पाय ! आणि लहान मुलं आणि त्यांच्या बाबागाड्या बरोबर असल्या तर हर हर महादेव !. बर एवढचं नाही, तर प्रत्येक मंदिर/शिंतो Shrine मधे असंख्य पाय-या असतात. मुकाट्याने चढायच्या !

म्हणुन सगळ्या मह्त्वाच्या पर्यट्न स्थळांना भेट दिली तर सर्वात (चालुन चालुन आणि जपानि बोलण्याच्या प्रयत्नाने जेरीला येउन) हैराण झालेले पर्यटक हे एक तर भारतीय नाहीतर सामान्य अमेरिकन असतात. (जाडजुड आणि कायम गाडी ची सवय असलेले)! माझ्या एका जपानी सहकार्याचे असे प्रामाणिक (आणि काहीसे आत्यंतिक) मत आहे, की अमेरिकन लोकं तर कायम गाडि चालवून दमतात आणि श्रमपरिहारासाठी मग McDonald’s वगैरे मधे जाऊन चीज/Beef वगैरे पौष्टिक गोष्टींनी युक्त असा माफक अल्पोपहार करतात. म्हणुनच त्यांचा सरासरी बांधा एवढा मेदयुक्त असतो. म्हणुनच जपान मधे पर्यटकांच्या शारिरिक उद्धारासाटी भरपुर चालायला लावतात. तात्पर्य- चालणे हे येथे, वैकल्पिक नसून अनिवार्य आहे.

पादचारी हा जपान मधे “बिच्चारा” नसून , पादचा-याचा इथे भलताच रुबाब असतो. पादचा-यांसाठीचे signal तोडुन आपले घोडे (खरं म्हणजे गाडी)पुढे दामटवू पाहणारा एकही माई का लाल मला ३ वर्षात दिसला नाहि. जपानी गाड्या गल्लोगल्ली अक्षरश: पादचारी सुखरुप जाइपर्यंत थांबतात. उगीचच “डोळे फुटले का “? “मरायला काय आमचीच गाडी मिळाली का “ वगैरे प्रेमसंवाद येता जाता कानावर पडत नाही, शिवाय आणि हा॔र्न वरचा हात न काढता - त्या मंजुळ आवाजावर आपण आवाज काढुन भांडणार- मायदेशात आणि विशेषत: पुण्यात वाहने फक्त गुरुत्वाकर्षणाचे नियम पाळ्तात(ते सुद्धा नाइलाजास्तवं !)त्यामुळे पुणेरी पादचा-याला, जपानी पादचा-याला मिळ्णा-या ऋजू वागणुकिची सवय होणे अंमळ कठिणचं जाते.

सरतेशेवटी, चालणे ह्याविषयीच्या आपल्या आणि त्यांच्या द्रुष्टीको्णातिल फरक स्पष्ट करायला एक ऊदाहरण वानगीदाखल सांगते-
जपानीच्या तासाला आम्ही सर्वजण”त्सुराइ” म्हणजे- खुप त्रास होणारं/ कट्कटीचं- या अर्थाचा शब्दप्रयोग शिकत होतो. कोणी कोणी काय काय शब्द जुळवून महत्प्रयासानेचं वाक्य तयार केली. तर मी- आमच्या घरासमोर एक ११६ पाय-यांचा जिना आहे- तो रोज चढुन जाणे किती कट्कटीचे आहे- वगैरे वाक्य जुळवली (जपानित)- त्यावर समस्त “गाईजिन” म्हणजे गोरे विदेशी लोकं हळहळले… तु हातात आठवडयाचं जड सामान वगैरे घेउन कशी काय चढतेस बाई ?? ते अपार्ट्मेंट बदल आधी / अरेरे ! दुसरा रस्ता नाही का/ टेकडिवर राहता का- वगैरे सहानुभुतिदर्शक उद्गार आले.(लक्षात घ्या ते सर्व अमेरिकन, क॔नेडियन वगैरे होते). यावर माझ्या जपानी गुरुमाउलीची प्रतिक्रिया मार्मिक होती. ती म्हणाली “त्सुराइ” काय आहे त्यात ? उलट किती “केंकोतेकी” आहे (म्हणजे तब्येतीला चांगले आहे ! रोज सकाळ- दुपार संध्याकाळ जिना चढतेस/ उतरतेस सामान/ बिमान घेउन म्हण्जे- तब्येत चांगली राहील अगदी- पाठीचे / पायाचे विकार होत नाहीत- etc etc…

हे ऐकुन आम्ही सर्वजण पुरते हबकलो !
तात्पर्य “पाउले चालती तोकियोचि वाट”- चांगली बिकट वाट वहिवाट आहे !!

Kandapohe
Tuesday, June 06, 2006 - 2:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना, अगदी अगदी. इथे राहणार्‍यांची व्यथा चांगली मांडली आहेस. पुण्याला कशी पटकन कुठे जायचे तर रिक्षा करता येते हा विचार सतत येतो. :-)

Mrdmahesh
Tuesday, June 06, 2006 - 2:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान... :-) थोडक्यात काय... जपानला जाण्या आधी स्वत:चे वजन करून घेणे अन् आल्यानंतर परत बघणे.. घटलेले असेल नक्कीच.. :-)


Dhani
Tuesday, June 06, 2006 - 2:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे!११६ पायरया... रॆना, यामुळे जपान मध्ये gym कमी असतील ना.

Raina
Tuesday, June 06, 2006 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks KP,तुम्हालाही हा अनुभव नक्की येत असणार- याची खात्रि पटली. :-)

Mahesh- अगदी बरोबर ! जपानला यायच्या आधी आणि नंतर असे gym ची जाहिरात style Ad campaign ! :-)

Dhani- Gyms भरपूर आहेत. सगळेच Apartments अर्थातचं असे नसतात. आमचे नशीब बलवत्तर म्हणुन आम्हाला हे Natural आणि फुकट- Gym मिळाले ! :-)


Bee
Tuesday, June 06, 2006 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना, मजा आली वाचून.. पण ह्या लेखाचे नाव ते 'पाउले चालती तोकियोचि वाट' हे द्यायला हवे होते :-)

Mrdmahesh
Tuesday, June 06, 2006 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'पाउले चालती तोकियोचि वाट' >>
... अन् तुमच्या वजनात घट :-)

Kandapohe
Tuesday, June 06, 2006 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे घर ११ व्या मजल्यावर आहे. छान लिफ्ट आहे. :-)

Sayonara
Tuesday, June 06, 2006 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मजा आली वाचून. आणि ११ वर्ष जपानला काढल्यामुळे तुमची व्यथा पुरेपूर कळली.

Chafa
Tuesday, June 06, 2006 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! छान लिहीलय. आणि तुम्ही पण G B Shaw च्या फॅन का?

Ninavi
Tuesday, June 06, 2006 - 10:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> पुण्यात वाहने फक्त गुरुत्वाकर्षणाचे नियम पाळ्तात(ते सुद्धा नाइलाजास्तवं !)

छान लिहीलंय.

Raina
Tuesday, June 06, 2006 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी- धन्यवाद ! खरय तुमचं !
सायोनारा- बापरे जपानमधे ११ वर्ष ?? तुम्हाला मानंलं ! :-)

केपी- अहो आमच्या mansion (BTW how does one write this in Devnagri? mansion/ hat wagire ??)मधेही लिफ्ट आहे. पण mansion पर्यंत हा ग्रेट जिना !

चाफा- धन्यवाद ! G B Shaw ची Fan आहे- पण तुम्ही कशावरुन म्हणता आहे ते नाही कळलं. फारा वर्षांपुर्वी फर्ग्यूसन मधे शिकलेले St. Joan आठवले. Shaw ची अनेक सुंदर नाटकं सोडुन मला St. Joan आवडतं ते त्या वयात समरसुन शिकवणा-या Mrs. श्रिधरनच्या शब्द अन शब्दामुळे. खरंतर हे म्हणजे पैठणी वगैरे भरजरी साड्या सोडुन साधी सुधी साडी आवडण्यासारखे आहे ! काही असो. आजही St. Joan मधील अनेक सौंदर्यस्थानं मी बसल्या बसल्या सांगु शकते. विषयांतरा बददल क्षमस्व !


Paragkan
Tuesday, June 06, 2006 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह ... लेखन आवडेश.

Sayonara
Tuesday, June 06, 2006 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना, तुम्हांला या आधी कधी जपानच्या बीबीवर नाही बघितलं.

Chafa
Tuesday, June 06, 2006 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही इथे घेतलेल्या नावावरुन तसं वाटलं. शॉच्या " Plays Pleasant " या collection मधल्या ' Arms and the Man ' या नाटकाच्या कथानायिकेचं नावंही Raina आहे ना! असो, पण अंदाज चुकला नाही तर. :-)

Chinnu
Tuesday, June 06, 2006 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा रैना, व्यथा अगदी समर्पक शब्दात मांडलीस. लिहीत जा.

Hems
Tuesday, June 06, 2006 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त लिहिलय. अजून लिहिलत तरी " चालेल " ( नव्हे " पळेल ")!

... आणि ' मॅन्शन ' असं लिहायचं :- ma.cnshan


Dineshvs
Tuesday, June 06, 2006 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना छानच. ईतकी छान शैली असुनहि, तुम्ही नवीन माणसे हात आखडता का घेता ? निदान या बाबतीत तरी माझा आदर्श समोर ठेवायला हरकत नाही.

Raina
Tuesday, June 06, 2006 - 10:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sayonara- मी मायबोली वर नविन आहे. जपान चा BB ? अरे वा ! शोधुन वाचायला हवा !

Chafa -Plays Pleasant मी वाचलं नाहीये - माझं "रैना" हे राष्ट्रभाषेतील आहे ! रैना बिती जाये- मधील रैना ! आता "Arms and the Man "कुठे मिळालं तर नक्की वाचेन.

Chinnu/ Hems/ Dinesh प्रोत्साहना बद्द्ल खरंच धन्यवाद !
Hems. Thanks. I tried to write mansion like you have written- तर ते अस येतंय - म.च्न्शन
Any idea why ?

Dinesh san हात आखड्ता नाही हो- मराठी typing चा वेग कमी आहे !अजुन काय त्या बराह चे आणि माझे विशेष जमले नाही.पण तुमचं रंगीबेरंगी वरचे लेखन वाचून थक्क झाले.मला तेव्हढं आणि तितकं चांगलं लिहायला एक वर्ष लागलं असतं नक्कीच !



Raina
Tuesday, June 06, 2006 - 10:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ninavi- Thanks. Honestly-Thanks to laws of gravity पुण्यातली वाहने जमिनीवर तरी चालतात. ;-)

Paragkan- Thanks !




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators