Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 01, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » ललित » बोच » Archive through June 01, 2006 « Previous Next »

Abhi_
Wednesday, May 31, 2006 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" अरे! पाट्या?? ओळखलंस का मला? "

लक्ष्मीरस्त्यावरच्या गर्दीतून वाट शोधत मी माझ्याच तंद्रीत चाललो होतो. अन अनपेक्षितपणे कोणीतरी माझ्या खांद्यावर हात टाकून मला थांबवले. मी त्याच्याकडे थोड्या नाराजीनेच पाहिले. खरंतर मला टिळक स्मारकला " आयुष्यावर बोलू काही " चा प्रयोग गाठायचा होता. बाईकने ऐनवेळेस धोका दिल्यामुळे चालत चाललो होतो अन हा कोणी अनामिक इसम माझी वाट अडवून दत्त म्हणून उभा होता.

" काय ओळखलंस का? "
"...."

मी अजूनही संभ्रमावस्थेत होतो. एकतर मला उशीर होत होता आणि हा इसम मला इथे कोडी घालत होता.

" किती वर्षांनी भेटतोय लेका. तेसुद्धा पुण्यात, असे अचानक... "

त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद लपत नव्हता. त्याच्या बोलण्याच्या लकबीवरून तो सातार्‍याकडील असावा असा अदमास मी मनात बांधत होतो. पण तो कोण हे काही आठवत नव्हते. मी थोड्याशा रुक्षपणेच त्याला ओळखले नसल्याचे कबूल केले. माझी अजून परीक्षा न बघता त्याने स्वतःची ओळख करुन दिली.

" अरे मी मनोज नाईक.. शाळेत आठवी पर्यंत आपण बरोबर होतो... "

त्याने नांव सांगताक्षणी माझ्या डोक्यात प्रकाश पडला, अंगावर नकळत काटा आला. मला एकदम सोळा-सतरा वर्षांपूर्वीचा 'मन्या' आठवला.

मनोज नाईक.. किडकिडीत शरीरयष्टी, कायमच वाढलेले थोडेसे कुरळे केस, रंग काळसर सावळा, वरचे दोन दात थोडे पुढे आलेले.

तसं आम्ही दोनच वर्षे एका वर्गात होतो. पाचव्या इयत्तेत मन्या आमच्या वर्गात आला. कोणी त्याची विशेष दखल घ्यावी असे कोणतेच गुण त्याच्यात नव्हते. सातवीत गेल्यानंतर शाळेत वारंवार गैरहजर राहण्यावरुन त्याला आमच्या वर्गशिक्षकांनी एकदा सर्वांसमोर ताकीद दिली होती. त्याचा राग मनात धरुन तो भर वर्गातून निघून गेला होता. आमच्या वर्गशिक्षकांसह आम्हा सर्वांनाच तो मोठा धक्का होता. मुख्याधापकांनी त्याला ताकीद देऊन पुन्हा वर्गात बसायची परवानगी दिली होती. पण त्यानंतर दमदाटी, किरकोळ भांडणे, मारामार्‍या यावरुन मन्या सगळ्यांच्याच परिचयाचा झाला. शाळेतली वरच्या वर्गातली मुले सुद्धा त्याला वचकून असत. आम्हाला तर वर्गात बर्‍याचदा त्याची दादागिरी सहन करायला लागायची. पुढे आठवीत गेल्यावर गुणक्रमानुसार त्याची तुकडी बदलली आणि आम्हाला थोडं हायसं वाटलं होतं. पण आठवीची शाळा सुरु झाल्यावर थोड्याच दिवसांत शहर पोलीसांनी त्याला एका गुन्ह्यात संशयीत आरोपी म्हणून पकडलं आणि त्याची शाळेतून कायमची हाकालपट्टी झाली. त्याच्या घराच्या आसपास राहणार्‍या काही मुलांकडून त्याला नंतर रिमांड होम मध्ये ठेवल्याचे समजले. त्यानंतर मन्याचा आणि आमचा कधी संबंधच आला नाही. कालांतराने तो आमच्या विस्मृतीतसुद्धा गेला. मन्या बालगुन्हेगार कसा बनला? त्याच्या घरची background काय होती हे प्रश्न आम्हाला कधी पडलेच नाहीत. आणि आज तोच मन्या माझ्यासमोर उभा होता.

" आता तरी ओळख लागली का? "
" हो. " मी थोड्याशा तुटकपणे म्हणालो.
" अरे वा! नशीब आमचं. तुम्ही पुढे बसणारी मुलं. त्यात तू तर तबला वाजवण्यामुळे शाळेत famous . काही बदल नाही झाला रे तुझ्या चेहर्‍यात. लगेच ओळखलं बघ मी तुला एवढ्या गर्दीतसुद्धा "

तो उत्साहाने बोलत होता आणि मी कसंनुसं हासल्यासारखं करत होतो.

" मग अजून तबल बिबला वाजवतोस ना? काय करतोस सध्या? तसं तुझ्याकडे पाहून तरी मोठा साहेब असशील असं वाटतंय. लग्नबिग्न झालंय की नाही? "

त्याची प्रश्नांची सरबत्ती सुरूच होती. माझ्या कपाळावर आता सूक्ष्म आठ्या उमटायला सुरुवात झाली होती. पण तरी त्याच्या एखाद्यातरी प्रश्नाचे उत्तर देणे मला भाग होते म्हणून शक्य तेवढा कोरडा स्वर ठेवत मी त्याला उत्तरे देत होतो.

" अरे तबला ना चालु आहे आपलं जमेल तसं. बाकी व्यापात तसा वेळच मिळत नाही म्हणा... "
" अरे मी भोसरीला एका छोट्या कंपनीत फिटर म्हणून कामाला आहे. निगडीला दोन खोल्या घेतल्यात भाड्याने. मी बायको आणि छोटी मुलगी राहतो तिथे. सहा महिन्यांपुर्वी आई वारल्यापासून अण्णाही माझ्याकडेच असतात. "

खरंतर त्याच्या कुटुंबीयांबद्दल मला कधीच माहिती नव्हती. पण उत्साहाच्याभरात हे त्याच्या लक्षातही आले नव्हते. तो बोलतच होता.

" आठवीत शाळा सुटली. रिमांडहोममध्ये गेलो. तिथेही शिकण्यात रस नव्हताच. तिथेही उनाडक्याच जास्त करायचो. पण नशिब चांगले म्हणून काजरेकर सर भेटले आणि मी करत असलेली चूक समजली. ठरवलं की आपणपण चांगला माणूस व्हायचं. अरे आपल्या शाळेतही खूप चांगले शिक्षक होते जे मला तेंव्हा समजवायचे पण कसली मस्ती चढली होती मला कुणास ठावूक. पण काजरेकर सरांनी आयुष्याला दिशा दिली. त्यांच्याच सांगण्यावरून मग फिटरचा कोर्स केला. "

तो सांगत असलेल्या कुठल्याही गोष्टीचा मला संदर्भ लागत नव्हता. ना मला त्यात रस होता. मला आता त्याचा राग यायला लागला होता. त्याने पुन्हा संभाषणाची गाडी पुढे रेटली.

" अरे तू काय करतोस हे सांगितलेच नाहीस. कुठे राहतोस? आणि लग्नाची गोष्टही अगदी सोईस्कर टाळलीस की रे सांगायची.. ए तुला वेळ असेल तर चल ना कुठेतरी कटिंग मारूयात. "

त्याच्या अश्या सलगीच्या बोलण्याचा मला खूप राग आला होता. त्या तिरीमिरीतच मला त्याच्यातले आणि माझ्यातले अंतर दाखवून द्यायची असुरी इच्छा झाली. मी जरा तोर्‍यातच सांगितले " मी एका software कंपनीत आहे कामाला. आणि कोथरूडला माझा स्वतःचा मोठा फ्लॅट आहे. "

तेवढ्यात माझा सेलफोन वाजला. त्याला दाबायची अजून एक संधी साधत मी मोठ्या दिमाखात माझा महागडा सेलफोन काढून त्याच्या समोर नाचवत बोललो. आणि तीच सबब मला आत्ता वेळ नाही पुन्हा जाऊ कधीतरी चहा प्यायला म्हणून ठोकून दिली.

या सर्वाच्या त्याच्या चेहर्‍यावर थोडा परीणाम झालेला दिसला. थोडसं ओशाळवाणं हासून त्याने त्याचा मोबाईल खिशातून काढला.

" अरे तुझा नंबर सांग ना. स्टोअर करुन ठेवतो. भेटू पुन्हा कधीतरी निवांत. "

मी त्याला नंबर दिला, वर खिशातून माझे visiting card पण दिले. त्याने त्याचा नंबर घेण्याचा आग्रह केला. मी त्याला मला missed call द्यायला सांगितले व बोललो की नंतर save करतो. त्याने लगेचच माझ्या नंबरवर रिंग केली. मी त्याकडे दुर्लक्ष करत विजयी मुद्रेने तिथून काढता पाय घेतला. थोडे पुढे गेल्यावर त्याचा नंबरही delete करुन टाकला.

कार्यक्रमाला पोचायला थोडा उशीरच झाला होता. त्यामुळे शिव्या घालायच्या निमित्ताने 'मन्याच' माझ्या मनात होता. एकाहून एक सरस गाणी सादर होत होती पण अचानक भेटलेला 'मन्या' माझ्या मनात ठाण मांडुन बसला होता.

कार्यक्रमानंतर तंद्रीतच घरी आलो पण मन्या काही पाठ सोडत नव्हता. अंथरुणावर पडूनही मी तोच विचार करत होतो. आणि अचानक मी भानावर आलो. का वागलो मी असा? तो तर माझ्याशी वाईट वागला नाही. भूतकाळातला मन्या आणि आजचा मन्या यात जमिन अस्मानाचा फरक होता. तसं आठवलं तर शाळेत असतानासुद्धा त्याने माझे वैयक्तिक काहीच नुकसान केले नव्हते. आणि आता तर ती शक्यताही नव्हती. आज अचानक भेटल्यावरही भले मी त्याला ओळखले नाही पण त्याने मला ओळखले म्हणजे त्याने त्या आठवणींचे धागे अजून मजबूत पकडून ठेवले आहेत. माझ्याशी बोलून त्याला त्याच्या आठवणी ताज्या करायच्या असतील. मी तबला वाजवायचो याचा त्याला किती आदर होता. मी सध्या काय करतो हे त्याने केवळ उपचारापुरतेच विचारले. त्याला त्याच्याशी काहीच देणे घेणे नव्हते. त्याला केवळ त्याचा एक जुना वर्गमित्र हवा होता. चार शब्द बोलायला. अन मी कसा वागलो त्याच्याशी?

कमी शिक्षण असूनही स्वतःच्या पायावर उभा असलेला, संसारात रमलेला, वडिलांना सांभाळण्याची जाण ठेवणारा, रस्त्यात अचानक भेटूनही मला चहा पिऊयात असा शिष्टाचार दाखवणारा मन्या मला माझ्यापेक्षा जास्त सुसंस्कृत वाटला. माझ्या बेगडी सुसंस्कृतपणाची मलाच लाज वाटली. का मी त्याचा नंबर तत्परतेने delete केला? कदाचीत मी त्याला कधीच कॉल नसता केला. पण असे कितीतरी नंबर माझ्या सेलमध्ये जागा अडवून बसले असतील. मग या एका नंबरने असा किती फरक पडला असता?

आज माझा नंबर त्याच्याकडे आहे. त्याचा माझ्याकडे नाही. माझ्याशी संबंध ठेवायचे की नाही हे आता तो ठरवणार.. त्याला मी पराभूत करायला गेलो पण खरा पराभूत मीच आहे.. तो जिंकल्याचे किंवा मी हरल्याचे दुःख नाही, पण काहितरी हरवल्याची बोच मात्र कायम राहील....


Jaaaswand
Wednesday, May 31, 2006 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही रे अभी :-)

एक सांग तू अभिनव मराठी चा आहेस का


Sampada_oke
Wednesday, May 31, 2006 - 10:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभि, अगदी हृदयस्पर्शी लिहिलंयंस रे. वाममार्ग सोडून परत मुख्य प्रवाहात सामील होऊ इच्छिणार्‍या लोकांचा माणुसकीवरचा विश्वास आपल्या वागणुकीमुळे उडत असेल का? काहीवेळा गरज नसताना सुद्धा आपण अगदी तटस्थपणे, तुटकपणे वागतो ना. खरंच आत्मपरिक्षण करायला लावलंस.

Ninavi
Wednesday, May 31, 2006 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभी, वाचायला सुरुवात केली तेव्हा पुलंच्या बबडूची आठवण झाली. पण नंतर वेगळी कलाटणी दिल्येस. ' असं होऊ नये, पण होतं खरं आपल्याही हातून!' असं जाणवलं. तेच तुझ्या या छोटेखानी ललित चं यश.

Dineshvs
Wednesday, May 31, 2006 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपदा ने लिहिल्याप्रमाणे खुप प्रामाणिकपणे लिहुन, आमच्यासमोर आरसा धरलास, अभि

Arch
Wednesday, May 31, 2006 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभि, छानच लिहिल आहेस. आपण उगाचच आपल्याला मोठ्ठ समजतो आणि तेसुध्दा कोणापुढे? आणि मग आपली आपल्यालाच लाज वाटते. पण म्हणून आपण बदलतो का? - हो फ़क्त तेवढ्या क्षणापुरते.

Moodi
Wednesday, May 31, 2006 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोळे पाणावले वाचतानां, तुझ्या या लेखातुन खुप काही शिकायला मिळाले.

Hems
Wednesday, May 31, 2006 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त अभि ! अगदी मनापासून .. आणि म्हणूनच आरस्पानी !

Madhura
Wednesday, May 31, 2006 - 8:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

abhi mastach lihile ahe.

Smi_dod
Thursday, June 01, 2006 - 12:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा अभि सुंदर लिहिलेस.. किती लोकांना अशी चुट्पुट वाटत असेल?..तुझ्या सारखे लोक हि आहेत जे दुसर्‍यांचा विचार करतात... छान आणि ओघवत लिहिलस.. पु.ल. च्या बबडुची आठवण झाली..

Devdattag
Thursday, June 01, 2006 - 12:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभि, टू गुड रे..
व्यवस्थित.. अगदी स्वच्छ


Kmayuresh2002
Thursday, June 01, 2006 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभि सहीच रे... माणुस म्हणुन कुठल्या गोष्टींची जाण आपण ठेवली पाहीजे ते छान समजावुन सांगितलयस रे

Maudee
Thursday, June 01, 2006 - 1:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच....
अश्या छोट्याछोट्या गोष्टी आपल्याही नकळत कधी कधी घडत असतात. ति चुकूनका होईना घडली गेली याची जाणीव असणं मह्त्वाचं.कित्येक माणसं समोरच्याचा असा अपमान करतात आणि त्यांच्या लक्षातही येत नाही की आपण चुकीचं वागतोय.
:-)


Badbadi
Thursday, June 01, 2006 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभि.. छान च...
या लेखामुळे एक वेगळा अभिजीत समोर आला माझ्या...


Meenu
Thursday, June 01, 2006 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय लिहु तुझा मित्र तुला परत मिळो इतकच ..... कारण आता तो भेटला कि तुला छान गप्पा मारता येतील त्याच्याशी या नव्या जाणीवेमुळे

Vaibhav_joshi
Thursday, June 01, 2006 - 2:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभी ...
माझ्याकडून हे बर्‍याचदा झालंय ... आता होणार नाही ... प्रॉमिस ....
आणि हां थॅन्क्स ... विचारात पाडल्याबद्दल


Giriraj
Thursday, June 01, 2006 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा! अभि,मी हे आधीच वाचलंय!
पण तू इकडे टाकल्यामुळे आता वैभव मला टाळणार नाही असे वाटतेय...



Gs1
Thursday, June 01, 2006 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अभी, प्रामाणिक कथन आवडलं.






Jyotip
Thursday, June 01, 2006 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभि खुपच सुंदर लिहील आहेस...

Kandapohe
Thursday, June 01, 2006 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभ्या, बोच मी आधी पण वाचले होते. तरी अभिप्राय देतो. सही लिहीले आहेस. प्रत्येकावर कधी ना कधी ही वेळ येतेच. यातूनच शिकून पुढच्या वेळी ती चूक सुधारणे महत्वाचे. :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators