Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 23, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » ललित » मी जिंकले मी हरले ! लेखिका कुंदा महादेवकर. » Archive through May 23, 2006 « Previous Next »

Dineshvs
Monday, May 22, 2006 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलिकरीण सखीप्रियाने आपल्याला तिच्या काकु म्हणजेच कुंदा महादेवकर यांचा परिचय करुन दिला होता. त्या काकुना भेटायचा योग काल आला. नलिनी आली आहे, तिलाहि त्यांच्याकडुन मार्गदर्शन हवे होते. मग आम्ही दोघे त्यांच्याघरी गेलो. दीडदोन तास गप्पा मारल्या.
त्यानी त्यांचा एक लेख, मायबोलीसाठी माझ्या हातात ठेवला. त्यांच्या परवानगीनेच तुमच्यापुढे ठेवत आहे. त्याना कॉम्प्युटरची तेवढी सवय नसल्याने, मी फ़क्त टाईप करतोय.
तर हा लेख, त्यांच्याच शब्दात. ( लेखनाच्या, शुद्धलेखनाच्या काहि चुका असतील, तर त्याची जबाबदारी पुर्णपणे माझी. बाकि लेखाबद्दल मी काय लिहावे ? )


$&$&$&$&$&

मी जिंकले, मी हरले

१९९३ सालचा जून महिना संपत आला होता. नुकतच लाडक्या लेकीचं लग्न थाटामाटात पार पडलं होतं सोहळा अगदी देखणा झाला होता. आप्तेष्ट, मित्र, मैत्रिणी सर्वानी आवर्जुन ऊपस्थिती लावली होती. मन प्रसन्न होतं. एक सुखद मरगळ आली होती. क्रुतक्रुत्यतेचा एक तवंग सार्‍या घरावर पसरला होता.
नाही म्हणायला एक बोच होती. ह्या सार्‍या समाधानातहि एक काळा ठिपका डोळ्यासमोर नाचत होता. भाचीला बोहल्यावर चढताना पहायला तिचा एकुलता एक सख्खा मामा मात्र हजर नव्हता. हजर राहु शकला नव्हता.

गोपाळ माझा एकुलता एक भाऊ. आम्ही ईन मीन तीन भावंडं. सर्वात मोठी बहिण. तिच्यात आणि माझ्यात वयाचं बरंच अंतर होतं. वयातील फरकामुळे तिचं आम्हा दोन्ही भवंडांवरील प्रेम खुप वात्सल्यपुर्ण असे. तसा तिचा आम्हाला काहिसा धाकहि वाटे. गोपाळ मात्र माझ्यापेक्षा केवळ अडीच वर्षानी मोठा होता. त्यामुळे आम्ही काहिसे बरोबरीचेच होतो.

गोपाळने पुण्यातुन संख्याशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केलं. त्यानंतर तो नोकरीनिम्मित्ताने मुंबईला गेला. एका भारतीय पण परधर्मीय मुलीशी त्याचा प्रेमविवाह झाला. घरातील वडीलधारी मंडळी खरोखरच सुसंस्कृत होती. त्यामुळे मनाविरुद्ध असलं तरी सर्वानी हे हसतमुखाने स्वीकारलं. आमचं एकत्र कुटुंब होतं. आई आणि काकु तश्या लौकिकार्थाने अल्पशिक्षित होत्या. पन त्या दोघी सासवानी सुनेला प्रेमाने आपलसं केलं होतं.

लग्नानंतर म्हणजे साधारणपणे १९६६ मध्ये, जेंव्हा ईथे संगणकाचं नुकतच आगमन होत होतं, तेव्हा काळाची पावलं ओळखुन गोपाळ लंडनला संगणक शिक्षणासाठी गेला. काहि वर्षानी तो कॅनडामधे गेला अन मग तेथेच स्थिरावला. पत्नी आणि दोन मुली असा त्याचा आता परिवार होता. १९९० मध्ये दुर्दैवाने त्याची पत्नी कॅन्सरने गेली. आता मुली मोठ्या झाल्या होत्या. त्यांच्या त्यांच्या विश्वात होत्या. गोपाळ मात्र एकटा पडला. मनानं काहिसा ऊध्वस्त झाला.

गोपाळ दिसायला देखणा, रुबाबदार होता. सडपातळ बांधा, गौरवर्ण, विद्वत्ताप्रचूर बोलणं --- दुसर्‍यावर त्याची सहज छाप पडे. वयानुसार होत असलेले पांढुरके केसहि त्याला अति शोभुन दिसत. सर्वात महत्वाचं म्हणजे गोपाळ पुर्णपणे निर्व्यसनी होता. सिगरेट, दारु आणि तत्सम अन्य व्यसनं त्याला कधीच स्पर्ष करु शकली नाहीत.

तथापि मराठी साहित्य आणि भारतीय संगीत ह्याचं मात्र त्याला जबर व्यसन होतं. पुलं हे तर त्याचं दैवत होतं. समग्र पुलं साहित्य त्याच्या संग्रहि होतं. अब्दुल करीम खानसाहेबांपासुन हिराबाई पर्यंत आणि तलत सकट अनेक कॅसेट्सचा खजिना त्याच्याकडे होता. थोडक्यात, सुमारे दोन तपं भारताबाहेर राहुनहि त्याचेआ भारताशी असलेली नाळ ऊत्तमप्रकारे शाबुत होती. पुण्याशी असलेला मानसिक धागा अतिशय मजबुत आणि चिवट होता.

अश्या ह्या निर्मळ, आरस्पानी माणसाला वयाच्या ऐन पन्नाशीत हृदयविकाराने गाठले. कंजेस्टिव्ह हार्ट डिझीस नामक व्याधी जडली. ह्या आजारात हृदयाची कार्यक्षमता दिवसेंदिवस कमी कमी होत जाते. आता त्याला भारताचा प्रवास झेपणारा नव्हता. डॉक्टरानी मनाई केली होती.

गोपाळला लग्नासाठी येण्याची मनस्वी ईच्छा होती. पण ती तहान तो टेलिफोनच्या ताकावर भागवत होता. आठवड्यातुन तीन चार वेळा तरी त्याचे फोन यायचे. " खरेदी झाली का ? कार्यालय कुठलं ठरवलं ? सासरची मंडळी कशी आहेत ? कार्य अगदी हौशीनं कर. पैश्याची काळजी करु नकोस " एक ना दोन.

लग्नानंतर दहा बारा दिवसानी पुन्हा त्याचा फोन आला. " सारी आवराआवर झाली का ? " मी उत्तरले, " अरे हो, सुप केव्हाच वाजलं. गौरी उटीहुन येऊन सासरी बडोद्याला पण गेली. "
त्यावर तो म्हणाला, " मग आता तु ईकडे ये. मी वाट पाहतोय. "

मी बुचकळ्यात पडले. गोपाळ असा मला तिकडे का बोलावतोय ? काळजाचे ठोके चुकत राहिले !

परिस्थितीचा अंदाजच येईना. मी कॅनडाला कशी जाणार ? मी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापिका होते. कॉलेज सुरु झालं होतं. काय हालचाल करावी तेच कळत नव्हतं सन्याश्याच्या लग्नाला शेंडीपासुन सुरवात. पासपोर्टसाठी आवश्यक ते फ़ॉर्म आणले. आवश्यक असलेली प्रमाणपत्रे जमवित राहिले. ती पोलिस कमिशनारांच्या ऑफ़िसमधे सादर केली. कारण तोपर्यंत पुण्यात पासपोर्ट ऑफ़िस नव्हते. त्यासाठी मुंबईला जावे लागे. धावाधाव करत होते. पण हे सारं दिशाहिन वाटत होतं.

अश्याच एका संध्याकाळी, मी त्याला फोन लावला. आन्सरिंग मशीनने उत्तर दिले, " आम्ही घरात नाही आहोत. निरोप ठेवा. " दुसर्‍या दिवसी पुन्हा फोन लावला. पुन्हा तेच मशिन आणि तेच उत्तर. का कोण जाणे, पण ऊर भरुन आला. ओक्साबोक्सी रडावसं वाटलं. एकुलत्या एका भावाला मला भेटायचय, पण मी काहिही संपर्क साधु शकत नाही. केव्हढं हे भौगोलिक अंतर ! अन हे अंतर पार करण्यासाठी किती असंख्य कायदे, नियम, कागदपत्रं. --- मी अगदी अगतिक झाले होते.

अन कसा कुणास ठाऊक, अर्ध्या तासात भावाच्या मुलीचा, अंजलीचा मला कॅलगरीहुन फोन आला. " कुंदा आत्या, तु लवकर ये. डॅडी तुझी वाट पाहताहेत. " नेहमीच मला एक अडचण भासत असे. भावाच्या मुलीचे ईंग्रजी ऊच्चार समजायला मला जरा वेळ लागे. " कुंदा आत्या " हा एकच शब्द मला स्पष्टपणे कळत असे. मी विचारलं, " डॅडी कसे आहेत ? हॉस्पिटलमध्ये आहेत का ? घरी कधी येणार आहेत ? "

ती उत्तरली, I don't think he will come home. " तिच्या या अमेरिकन ढंगाच्या उच्चारातुन हे दुष्ट शब्द मात्र नेमकेपणे कानावर आदळले. मेंदुपर्यंत जाऊन पोहोचले. भाषा समजणं काहिसं अडचणीचं होतं. पण भावार्थ तर उमजला होता. पायाखालची वाळु सरकत होती.

कशी तरी कामं ऊरकली अन अंथरुणावर पडले. पुरती हताश झाले होते. काय करु ? कॅनडाला कशी पोहोचु ? मी " वेळेवर " पोचू शकेन " हा विचार मनात आला आणि विलक्षण अपराधी वाटलं. आता मात्र ढसाढसा रडायला लाअग्ले. माझ्या व्यवहारी मनानं सुप्त मनाला सणसणीत चपराक दिली. निर्भत्सना करत राहिले. --- मीच --- माझी ! " वेळेवर " म्हणे. लाज कशी नाही वाटली, हा शब्द वापरताना ?

झोप लागणं शक्यच नव्हते. फ़्लॅशबॅक सुरु झाला. आयुष्याची रिळं मागे मागे जायला लागली. स्मृतीची सूत्रं उलगडत राहिली.

मन वढाय वढाय एकदम माहेरच्या गोकुळात गेलं. आठवणींच्या गोपींचा रास बहरात आला. आई, वडील, काका, काकु, आजोबा आणि गोपाळ ! असंख्य क्षण जागे झाले. गोपाळच्या व्यक्तीमत्वाचा कॅलिडोस्कोप फिरत राहिला. लहानपणी भांडणारा गोपाळ, हट्टी गोपाळ, प्रेमळ गोपाळ, हळवा गोपाळ, तापट गोपाळ, जिद्दी गोपाळ. त्याला खुप मित्र नव्हते. मोजकेच पण जिवाभावाचे दोस्त होते. ते आठवत राहिले. हल्ली गोपाळ कॅनडाहुन जेंव्हा येई, तेंव्हा त्याच्या बोलण्यात तिकडच्या काहि स्नेहीसोबत्यांचा उल्लेख असे. अर्थात त्यांचा माझा परिचय असण्याचं कारणच नव्हतं. पण उगाचच नावं आठवत राहिले. कोण कोण बरं. --- हं ! कुणीतरी एक जगन्नाथ वाणी, अजुन कुणीतरी मणेरीकर. . . . . .

--- आणि युरेका ! काहि तरी सुचलं. मनाशी निश्चय केला. उजाडायची वाट पहात पडुन राहिले. अंजलीच्या मला न समजणार्‍या उच्चारामुळे समजुतीत काहि गोंधळ झाला असेल तर ह्या मंडळीची मदत घ्यायचं ठरवलं.

पुणे आणि कॅलगरीत साडेअकरा तासांचा फरक असतो. सकाळी ऊठुन काहि अन्य परिचितांशी साधला आणि जगन्नाथ वाणींचा नंबर मिळवला.

फोन लगेचच लागला. कॅनडास्थित पण एका मराठी भाषक व्यक्तीशी बोलणार होते. मराठी वर्ड्स रिमेंबर करणं त्याना कितपत शक्य होतं कोण जाणे ! सुरवात तर केली. " Can I speak to Mr. Jagannaath Wani ? " Speaking " उत्तर आले.
आता मी सरसावले " मी गोपाळ देशपांड्यांची बहिण " .
" म्हणजे कुंदाताई. हो नं " स्वर खुप आश्वासक वाटला. नेमकि काय परिस्थिती आहे याची मी चौकशी केली. त्यावर ते म्हणाले, " It's matter of days तुम्ही लगेच या. राजाभाऊ तुमची वाट पाहताहेत " गोपाळला तिकडचा मित्रपरिवार राजाभाऊ म्हणुनहि संबोधित असे.
कसं कोण जाणे, आमचे हे संभाषण चालू असताना एकाएकी माझ्यातली शासकीय सेवेतली राजपत्रित अधिकारी जागी झाली. मी त्याना एक विनंती केली. " तुम्ही मला हि सगळी परिस्थिती मला लेखी स्वरुपात अन तेही लगेच पाठवु शकाल ? "
ते म्हणाले, " हो हो लगेच मी तुम्हाला तसं पत्र लिहितो. मला तुमचा फ़ॅक्स नंबर द्या. "
मी शांतपणे उत्तरले, " ईथे आता घरोघरी फोन दिसताहेत. माझ्याकडे फ़ॅक्स मात्र नाही. "

संध्याकाळी एका अपरिचीत व्यक्तीचा फोन आला. " मी गाडगीळ बोलतोय. तुमचं कुणी कॅनडामधे आजारी आहे का ? "
मी बुचकळ्यात पडले. हे गाडगीळ कोण ? आणि त्याना हे कसं माहिती ? मी होकार दिला.
त्यावर उत्तर आलं. " तुमच्या नावे एक फ़ॅक्स आलाय " त्यानी दिलेला पत्ता शोधत गेलो आणि पत्रं घेतले. पत्र जगन्नाथ वाणींचे होते. पत्राच्या लेटरहेडवरुन समजलं कि ते डॉ. वाणी आहेत. कॅलगरी विद्यापिठात संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. पुढच्या महिन्यात डॉ. वाणीनी ( कै. ) कविवर्य वसंत बापटांचा एक कार्यक्रम कॅलगरीत आयोजित केला होता. त्या संदर्भात बापटानी हा फ़ॅक्स नंबर दिला होता. वाणीनी दणकुन त्याच नंबरवर फ़ॅक्स पाठवला होता. पत्रामधे मी तुमच्या बंधुचा एक जवळचा मित्र आहे. तुमचे बंधु अत्यवस्थ असुन तुम्हाला भेटावं अशी त्यांची अंतिम ईच्छा आहे. तुम्ही त्वरित या. आम्ही ईकडे तुमच्या प्रतिक्षेत आहोत. " अश्या आशयाचा मजकुर होता.
आता मीहि जिद्दिला पेटले. मनाशी ठरवले, हि काळाबरोबर झुंज आहे. निकरानं लढायचं. ईच्छाशक्तीच्या तलवारीनं हि लढाई लढायची. बघु कोण जिंकतं ते ?

सर्वात प्रथम त्या पत्राच्या दहा बारा झेरॉक्स प्रती काढल्या. आता हे पत्र म्हणजे अलिबाबाची गुहा उघडणारा मंत्र ठरणार होता. गुहेमधे गोपाळच्या अस्तित्वाचं रत्न माझ्या प्रतिक्षेत होतं. हाताशी वेळ अगदी थोडा होता.
हे पतर घेऊन पोलिस कमिशनरांचं ऑफ़िस गाठलं. त्या कार्यालयातुन आवश्यक कागदपत्रं घेऊन मुंबईत पासपोर्ट ऑफ़िसमधे येऊन धडकले. पासपोर्ट मिळाला. आता व्हिसा ! हि कॅनडियन कॉन्स्युलेटची मंडळी म्हणे पावसाळ्यात मुंबईत येत नाहीत. सर्व कामकाज दिल्लीत चालु राहतं आणि तेहि फ़क्त सोमवार ते शुक्रवार. पासपोर्ट मिळाला तो दिवस गुरुवार होता. आता काय ? मुकाट्यानं शनिवारी संध्याकाळच्या मुंबई राजधानी एक्स्प्रेसची दोन रिझर्वेशन्स केली. गुरुवारी संध्याकाली पुण्यात आले.
शुक्रवारी कॉलेजमधुन रजा मिळवणे, डॉलर्स उपलब्ध करुन घेणे हि कामं उरकली. शनिवारी सकाळी मुंबईला व तेथुन दिल्लीकडे प्रयाण असा प्लॅन केला.

घरातुन बाहेर पडताना, स्वातीचा, गोपाळच्या मोठ्या मुलीचा फोन. " आत्या लवकर ये. " आवंढा गिळला आणि बाहेर पडले.

रविवारी दुपारी दिल्लीत पोहोचले. नुसती धावत सुटले. कसलाहि विचार करायला मानसिक स्वस्थताच नव्हती. पण नाही म्हणलं तरी मनात प्रश्नचिन्ह होतं. " हे सारं काय चाललय ह्यातुन काहि निष्पन्न होणार आहे का ?
कॉन्स्युलेटचं कामकाज सकाळी आठला सुरु होतं. असं समजलं. आम्ही आपले सकाळी सातलाच तिथे गेलो. तर आमच्यापुढे जवळजवळ शंभर एक जण रांगेत ऊभे होते. ईतर आवश्यक कागदपत्रांबरोबर डॉ वाणींचं पत्रहि सादर केल,न. त्यामुळेच कि काय माझी कुणीहि प्रत्यक्ष मुलाखत घेतली नाही. साधारणपणे दुपारी दोन वाजता एक महिन्याचा व्हिसा हातात पडला आणि थेट एअर ईंडियाचं ऑफ़िस गाठलं. पुन्हा डॉ. वाणींचं पत्रं काम करुन गेलं. मुंबईहुन मध्यरात्री सुटणार्‍या मुंबई लंडन विमानात माझी दिल्लीत बसण्याची व्यवस्था झाली.

मध्यरात्री दिल्लीच्या आंतर राष्ट्रीय विमानतळावर " ह्या " नी मला सोडलं. सिक्युरिटीचा आत गेले आणि ब्रम्हांड आठवलं. म्हणजे मी आता खरंच कॅनडाला निघाले होते. गोपाळ ---- आता मात्र थांब हं. ! मी आलेच बघ.
सकाळी ११ ला लंडन आलं. प्रचंड भुक लागली होती. पुढचं विमान एअर कॅनडा या कंपनीचं. हि लंडन कॅलगरी फ़्लाईट दुपारी अडीचला होती. आता मला एक अत्यंत भौतिक शंका छळत होती. एअर ईंडियाच्या विमानातली माझी बॅग एअर कॅनडाच्या विमानात कोण ठेवणार ? त्यासाठी नेमकं काय करावं लागतं ? माझ्या अडाणीपणाची कसलिही लाज न वाटु देता. एअर कॅनडाच्या स्टॉलवर चौकशी केली. माझं तिकिट पाहुन तेथील अधिकार्‍याने समोरच्या कॉम्प्युटरवर काहितरी बोटं चालवली. " तुमची एक ब्राऊन रंगाची बॅग आहे नं ? ती दुसर्‍या विमानात नेण्याची व्यवस्था होईल. डोंट वरी. "

आश्चर्याने वासलेला आ मिटला. आता तो हिथ्रो विमानतळ आणि मी ! उपहार गृहाकडे नजर वळवली. पण जवळचे मोजके डॉलर्स आणि खाद्यपदार्थांच्या किमतीची लेबलं ह्यांचा काहि ताळमेळ बसेना. पाणी प्याले अन एका बाकावर टेकले. प्रचंड संख्येनं आजुबाजुला माणसं वावरत होती. पुरुष, स्त्रिया, लहान मुलं, नाना रंगाची, नाना वंशाची, माणसांचा नुसता महापुर होता. त्या महापुरात मी एका बाकावर एखाद्या निर्जन बेटासारखी होवुन बसले होते. नजर त्या वहत्या जान्समुदायावरुन भितभिरत होती. घड्याळ फारच सावकाश चाललं होतं. पण मन मात्र सतत गोपाळशी संपर्क साधुन होतं. त्याची विनवणि करत होतं, " गोपाळ, घाई करु नकोस हं ! हि मी आलेच बघ. "

अखेरीस एकदाचे दोन वाजत आले. लंडन एअरपोर्टवर असलेल्या शेकडो गेट्सच्या जंजाळातुन एअर कॅनडाच्या गेटपाशी आले. विमानात स्थानापन्न झाले.

विमानात सर्वाना मद्य पुरवलं जात होतं. मी नम्र नकार दिला. " वाईन तरी घ्या " असं तो हवाई सेवक मला सांगत होता. माझी नजर मद्याबरोबर दिल्या जाणार्‍या खारवलेल्या शेंगदाण्याच्या छोट्या पॅकेट्सवर गेली. मला जरा दिलासा वाटला. मी ते दाणे मागितले. " No wine, only peanuts " असे आश्चर्यात पुटपुटत तो मला दाणे देऊन गेला. बुडत्याला काडीचा आधार मिळाला.

सुचनेनुसार घड्याळं मागेपुढे झाली. आता संध्याकाळचे साडेपाच वाजत होते. अन एकदाचं कॅलगरी आलं.

विमानतळावर साडी नेसलेली मी एकमेव स्त्री होते. समोरु एक ऊंच, प्रसन्न व्यक्तीमत्वाचे गृहस्थ आले. " तुम्ही कुंदाताई नं ?
मीहि मराठीत बोलले, " हो तुम्ही जगन्नाथ वाणी नं ? त्यानिही हसुन होकार दिला
त्यांच्या गाडीत बॅग, सामान ठेवले. " आपण सरळ हॉस्पिटलमध्येच जाऊ. " गाडीत टेपवर भक्ती बर्वेच्या ( CBDG) उत्तरा केळकर असावी --- दिनेश ) आवाजातील बहिणाबाई चौधरींची गाणी लावली होती. मला एकदम at home feeling आलं. आमच्या आपल्या जुजबी गप्पा चालल्या होत्या. हॉस्पिटल आलं. लांबलचक कॉरिडॉर्समधुन डॉ. वाणी झपाझप चालले होते. मी त्यांच्याबरोबर पळत होते.
रुमजवळ पोहोचल्यावर दारातुन पाहिलं. खुप गर्दी होती. गोपाळचा मित्रपरिवार, त्यांचे कुटुंबीय, डॉक्टर्स, नर्सेस. --- .
ऑक्सिजन लावला होता. काहि क्षणांचाच मामला होता. सारं बळ एकवटुन मी दरवाज्यातुनच ओरडले. " गोपाळ थांब. मी आलेय " अन काय सांगु, गोपाळ खरोखरच थांबला. यमदुतहि थबकले. काळानं मला जिंकु दिलं होतं. मी जिंकले होते.

" माझी बहिण येईपर्यंत मला कसहि करुन जगवा. त्यासाठी तुम्ही द्याल ती ट्रीटमेंट मी घेईन. " असं गोपाळनं डॉक्टराना सांगितलेलं होतं. त्यामुळे डॉक्टर्स माझी वाट पहात होते. मला बघुन त्यानी सुटकेचा नि : श्वास टाकला. मित्र व त्यांच्या कुटुंबियाना गोपाळ म्हणे खात्रीपुर्वक सांगत होता. " एकदा कुंदा आली नं कि मला काहिच काळजी नाही. " त्यामुळे मी पोहोचल्यावर तेहि सर्वजण निर्धास्त झाले.

रात्रभर मी गोपाळच्या शेजारी बसुन होते. तसा तो काहिच बोलण्याच्या परिस्थितीत नव्हता. --- पण तो " होता " .
मीच त्याच्याशी सारखं बोलत होते. तो काहि प्रतिसाद देतोय का हे आजमावत होते. त्याला मी सारखं विचारत होते, " गोपाळ बोल नं ! काहि सांगायचय का तुला ? " माझ्या वटवटीला तो कंटाळला असावा. मोठ्या कष्टानं तो मराठीत म्हणाला --- " नाहि गं " हे शब्द माझ्या मनाच्या गाभार्‍यात अजुनहि घुमतात. " नाहि गं " --- --- म्हणजे मी आल्याचं त्याला नक्की समजलं होतं. रात्रभर मी त्याच्या चेहर्‍यावरुन, डोक्यावरुन हात फिरवत बसले होते. तो निपचिप पडला होता. पण आमच्या दोन मनांचा सुखसंवाद चालला होता.

सकाळी साडेसातला गोपाळनं माझा निरोप घेतला. नाकात घातलेल्या नळ्या, ऑक्सिजन मास्क काढलं गेलं.
आता मात्र मी हरले होते. कायमची ! डोळ्यातुन पाणी वहात होतं. ते दु : खाश्रु होते आणि आनंदाश्रुहि !


- = - = - = - = कुंदा महादेवकर



Lopamudraa
Monday, May 22, 2006 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

touching...!!!. .. .. .. .. .. ..

Moodi
Monday, May 22, 2006 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश काय बोलाव अन काय लिहाव. इतका अतुट जिव्हाळा फार स्पर्शुन गेला हृदयाला. सखीच्या काकुंचा आत्मविश्वास, प्रेम, जिव्हाळा सगळे काही शब्दा शब्दातुन ओथंबुन वाहते आहे.
माया अन प्रेमाच्याच बळावर त्या आज सगळ्यांमध्ये आपल्या सहवासाचे अन अनुभवाचे बोल ऐकवुन धीर देतायत.

नले तुझ्या आईला म्हणजे आमच्या काकुना पण हीच ताकद मिळू दे. सॉरी ग राहवले नाही असे सगळ्यांसमोर लिहीताना.


Maitreyee
Monday, May 22, 2006 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Touching खरच! आणि पुन्हा एकदा कुन्दाताईंची सकारत्मक वृत्ती, आत्मविश्वास धडाडी सगळं दिसतंय या लेखातून! केवढी हिम्मत आहे त्यांच्यात! gr8!

Mita
Monday, May 22, 2006 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाऊ-बहिणीची माया नेहमीच अशी असते ह्याचा प्रत्यय आला... शब्द नाहीत जे वाटल ते वर्णन करायला.

Shreeya
Monday, May 22, 2006 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनाला खूपच भीडली ही घटना. डोळे पाणावले शेवट वाचताना.
माणसांची इच्छाशक्ती काय चमत्कार करून दाखवते याचे एक उत्तम उदाहरण आहे हे!!
बहीण्-भावाच्या या निस्वार्थी मायेला शतश्: प्रणाम!!!


Sakheepriya
Monday, May 22, 2006 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो.... काकूंची धडाडी आणि इच्छाशक्ती खरंच प्रचंड आहे! हे सगळे प्रसंग त्यांच्याकडून प्रत्यक्ष ऐकताना खरंच खूप भारावून जायला होतं.... ऐकत रहावसं वाटतं!

Thank You दिनेश, एवढ्या promptly post केल्याबद्दल.... मागच्या वेळी काकूंकडून लेख घेतल्यानंतर मी तो इथे टाकायला महिनाभर लावला होता!!! :-p
तुमच्या दिवसात अठ्ठेचाळीस तास असतात का हो??!!

BTW, ज्यांनी वाचला नसेल त्यांच्याकरता काकूंचा आधीचा लेख
इथे आहे.

Megha16
Monday, May 22, 2006 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश दा,
तुमचा हा लेख वाचुन काय लिहाव हेच सुचत नहई. लेख वाचताना च अंगावर एकदम शहारे आले, डोळे पाणवुन गेले.
बहीण भावच अतुट प्रेम आणी त्याछी ती शेवटची भेट खुप छान शब्दात मांडलय तुम्ही.


Seema_
Monday, May 22, 2006 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा ! भावनोत्कट लिहिलय खरच . त्यांचा मागचा लेख ही वाचलेला . तो ही उत्क्रुष्ट होता . जिद्द आणि positive mindset असल्यावर कितीही मोठ्या संकटावर मात करता येते हे पटत दोन्ही लेख वाचल्यावर .


Ninavi
Monday, May 22, 2006 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखीप्रिया, तो आधीचा लेख वाचला तेव्हाच खूप आदर निर्माण झाला होता तुझ्या काकूंबद्दल. ग्रेट आहेत त्या. परिस्थितिचं रडगाणं गाणं सोपं असतं. पण आल्या भोगाला धीराने तोंड देऊन त्याही अनुभवाकडे खेळकरपणे बघू शकणं नाही जमत सगळ्यांनाच.

दिनेशदा, जवळच्या माणसाचा मृत्यू चटका लावणाराच असतो नाही? भावाला एकदा शेवटचं भेटता यावं म्हणून जिवाचं रान करण्यार्‍या काकू आणि त्या एका भेटीसाठी जीव अडकून राहिलेला भाऊ.. सगळंच विलक्षण..

हे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.


Dineshvs
Monday, May 22, 2006 - 9:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखीप्रिया, काकुना हे पोस्ट केलेय एवढा निरोप द्यायचा होता. जमलेच तर त्याना हि लिंक पण द्यायची होती.
४८ तास नसतात गं. पण माझ्यापेक्षाहि कामसु माणसे बघितली आहेत मी. शिवाय काकुनी ज्या विश्वासाने मला हा लेख दिला, त्याकडे बघता मला हे एवढे करायलाच हवे होते.
खरे तर आम्ही काकुंची झोपमोडच केली. नलिनी च्या अखंड धावपळीत हि भेट घडायलाच हवी होती असे मला प्रकर्षाने वाटले. आणि त्या भेटीचे सार्थक झाले.


Bee
Monday, May 22, 2006 - 10:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, कुंदाताई, सखीप्रिया सगळ्यांचे धन्यवाद! कुंदा ताईंना तर hats off!!!!

गोपाळदादांना भावपूर्ण श्रद्धांजली!


Meenu
Tuesday, May 23, 2006 - 12:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच सुंदर आहे हे..दिनेश आम्हि सगळे तुमचे आभारी आहोत हं... काकुंनी अजुन लिहित रहायला हवं..... ज्यांनी अशी उत्कट नाती अनुभवली नाहियेत त्यांना हे कळणं महत्वाचं आहे कि अशी नाती असतात...

Jayavi
Tuesday, May 23, 2006 - 12:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, इतका सुरेख लेख आमच्यापर्यंत पोचवलात.......खरंच, तुमचे खूप खूप आभार!
काकूंबद्दल काय बोलावे....... GREAT WOMAN . खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून.


Smi_dod
Tuesday, May 23, 2006 - 12:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स दिनेश, नात्यातले ईतके सुंदर दर्शन आम्हाला घडवल्या बद्दल.काकु खरोखर ग्रेट आहेत

Yog
Tuesday, May 23, 2006 - 12:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती जिवन्त लेखनशैली आहे.. एखाद्या लघुपटप्रमाणे जणू सर्व डोळ्यापुढे उभ रहात. कुठलाही फ़ाफ़ट पसारा वा भावनातीशयोक्ती न करता, इतका अशक्य प्रसन्ग मोजक्याच शब्दात मान्डण... काय हातोटी आहे काकून्ची आणि तितकाच touching अनुभव.

दिनेश, आभार!



Mukman2004
Tuesday, May 23, 2006 - 2:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय बोलणार डोळे पाणावले..
त्यांच्या जिवाची घालमेल लिखानातुन चक्क अनुभवायला मिळाली


Bhagya
Tuesday, May 23, 2006 - 2:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भावस्पर्शी लिहिलय अगदि.
मायबोलिकरानो, आत्ताच नलिनी शी बोलले. तिने सगळ्यांना
'आई ठीक आहे' असा निरोप दिलाय.


Maudee
Tuesday, May 23, 2006 - 2:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्दच नाहीत लिहायला.....
very touching ...


Princess
Tuesday, May 23, 2006 - 3:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हृदय भरुन आले.... दुःख सगळ्यानाच देतो देव. पण त्या दुःखाला सामोरे जाण्याची ताकद मात्र आपल्यालाच जमवावी लागते. असे लेख पाठवत राहा खुप बळ मिळते त्यातुन.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators