|
प्र :- नमस्कार ! तर आज आपल्या पहिल्या काव्यसंग्रहाचं अनावरण .. उ:- एक मिन.अनावरण? प्रकाशन ना ? तुम्ही हे असं काहीतरी बोलता मग आम्हां कवींना सुचतं काही तरी. प्र.:- ईश्श्य ! फारच बाई शीघ्र तुम्ही . तर आज तुमच्या पहिल्या वाहिल्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त आपण इथे जमलो आहोत उ .:- आपण म्हणजे आपण दोघेच जमलो आहोत . श्रोत्यांना यायला जमलं नाही बहुधा . प्र .:- जमला .. जमला !! उ.:- ? प्र. :- विनोद हो . बाकी कवी लोक गंभीर असतात ह्या समजाला तुम्ही अपवाद दिसताय उ.:- त्यात काय वाद आहे का ? आणि तो वादाचाच मुद्दा आहे नाहीतरी . तुम्ही लोक ज्यांना गंभीर समजता त्या कित्येक कविता विनोदी असतात प्र.:- तुम्ही आडून बोलताय का? की घालून पाडून बोलताय? उ,:- नाही हो , मी घसा फाडून बोलतोय गेली कित्येक वर्षे प्र.:- अरे हो बरं आठवलं .. गेली कित्येक वर्षे म्हणजे तुम्ही नक्की कधीपासून कविता करायला लागलात? उ.:- अगदी लहानपणापासूनच. म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात ना ... अगदी तसं.म्हणजे मी लहानपणी रडताना पण वृत्त धरून रडायचो म्हणे .माझ्या बारशाला बायकांनी पाळणा पण त्याच वृत्तात म्हटला होता . आणि ते ऐकून मी जास्तच वृत्तात रडलो होतो . अर्थात हा वृत्तांत मला नंतर कळला . प्र.:- कमालच आहे . उ.:- मला एखादी गोष्ट उशीरा कळली , ही कमाल? प्र.:- छे छे , तसं नाही हो . तुम्ही अगदी जिनियस आहात हे दिसलं म्हणून. पण मग ही कविता तुमच्या जिन्स मध्येच का? उ.:- असंच काही नाही , कधी कधी सदरयात , कधी लेंग्यात . कागद जपल्याशी मतलब. प्र.:- तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे अनुवांशिक का? असं ! उ.:- नाही . आमच्या घराण्यात कधीच कविता झाल्या नाहीत . पाणउतारे व्हायचे , अजूनही होतात . अलिकडे बायकांतर्फे होतात इतकंच. पण कविता नाहीच. प्र.:- अय्या ! मग आमच्या श्रोत्यांना सांगा बरं तुम्हाला पहिली कविता कशी अन कुठे सुचली ते उ.:- नाही सांगणार प्र.:- ? उ.:- म्हणजे नसलेल्या श्रोत्यांना कुठून सांगू? तुम्हाला सांगतो . माझी पहिली कविता अशी अचानक सुचली आई वांगी चिरत होती आणि ती लय पकडून अचानक शब्द स्फुरू लागले "भूक लागली भूक मला वाढा लवकर चला चला पोळी भाजी येऊ द्या जेवून ढेकर देऊ द्या" असं त्या वांगी चिरण्याच्या खस खस , खस खस ह्या मीटर वर बेस्ड होती ही .घरात मस्त खसखस पिकली होती. प्र.:- फार म्हणजे फारच सुरेख . अगदी वाढलेलं ताट दिसलं समोर . उ.:- सावकाश होवू द्या . प्र.:- ? उ.:- कवितेचं रसग्रहण सावकाश होवू द्या. प्र.:- झालं झालं. आता हात धुवून पुढच्या प्रश्नांच्या मागे लागते. पण मग तुम्ही खरोखर कविता कधीपासून करायला लागलात ? उ.:- (रागाने मूठ आपटून) हाच .. हाच तो मिडिया वाल्यांचा दुटप्पी पणा. तुमचं म्हणणं काय ? ही कविता नव्हती? ते नायगांवकर भाजी वर लिहीतात तुम्ही डोक्यावर घेता प्र.:- भाजीवर लिहीतात? कागदावर ना? ऐकावं ते नवलंच उ.:- "असा कसा हो तुमचा मेंदू चालत नाही बिलकुल " प्र.:- काSSSSSSSय? उ.:- नाही ! तेवढ्यात मला गज़लचा मतला सुचला . दुःख झालं की गज़ल !!! प्र.:- पण सांगा ना प्लीज .. मग तुमचा काव्यप्रवास कुणीकडे गेला उ.:- परसाकडे प्र.:- शी ! आपलं . ईSSSSS उ.:- अहो असं आतून काही बाही होवू लागल्यावर तिकडेच नाही का जाणार? एकांत मिळवण्यासाठी? प्र.:- हां हां. असं होय . पण मग जमलं का? उ.:- हळू हळू जमायला लागलं , अहो किती लहान होतो मी . त्या वयात एकट्याने खिंड लढवायची म्हणजे ... प्र.:- मला तुमचे सगळे संवाद दोन अर्थी वाटतात बाई. उ.:- ते बरंच आहे एकाअर्थी . म्हणजे तुम्हाला कळेल तरी की एका कवितेचे किती अर्थ निघतात. प्र.:- पण मग तुमची कविता नक्की कधी भरात आली? उ.:- पाय धुवून घरात आलो की लगेच .अडीअडचणीला कागद ठेवलेच होते आईने . लिहून काढायचो,दाबून धरलेली कल्पना प्र.:- मग तेव्हाची एखादी कविता होवून जाऊ द्या आमच्या श्रोत्यां.. आपलं माझ्यासाठी... उ.:- "शांतपणे मज बसू द्यायला काय जनांचे जाते? मरणाची ही घाई कसली सांगा तरी मला ते टकटक टकटक दारावरती सदा चालली लोकांची गाठ बसेना लेंग्याच्या नाडीच्या दोन्ही टोकांची" बोला !! प्र.:- धन्य आहे . म्हणजे तुमच्या शब्दांतली तळमळ दिसत्ये मला. मग ह्या हिरयाला पैलू कधी पडले? कुणी पाडले? उ:- अहो आमच्याकडे हिरा हिंग असायचं ना त्यावरून मी एक कविता लिहीली "हिरा हिंग हिरा हिंग वास आणी झिंग अस्तित्वाचा चुरा होता फुटते अवघे बिंग" प्र.:- हे काय? ह्या कवितेला काय अर्थ आहे? उ :- अहो ही "ग्रेस"फुल कविता आहे. प्र.:- गुड . उ.:- गुड नाही , गूढ. त्या हुसैन ला तुमचं चित्र काढायला दिलं तर तो म्हैस काढेल की नाही? तसंच.जे समजत नाही ते उच्च असतं ह्या क्षेत्रात .तर माझी ही कविता ऐकताच वडिलांनी शिकवणीच लावून टाकली. म्हणाले हे टॆलन्ट असं वाया जाता कामा नये . दोन तीन तास तू घराबाहेर गेल्याशिवाय जीवनाचं कोडं सुटणार नाही . प्र.:- सुटले बिचारे उ.:- काय म्हणालात? प्र.:- शब्द एकदाचे मोकाट सुटले बिचारे असं हो . मग ? पैलू पाडणारा कोण जौहरी भेटला ह्या "हिरयाला?" उ.:- पैलू भैरवान . आपलं.. भैरू पैलवान. ते पहाटे आणि संध्याकाळी आखाड्यात घुमायचे अन दिवसभर काय करावं म्हणून कविता शिकवायचे बिचारे .पण त्यामुळे अगदी आपल्या मातीतली कविता होती त्यांची. उदाहरणच द्यायचं झालं तर "लाल लाल मातीत मातीत पैलवान घुमत्याती अंगानं भरल्याती बुध्दीनं सरल्याती" काय घामाघूम व्हायचे म्हणून सांगू? प्र.:- इतकी छोटी कविता शिकवताना? उ.:- छे हो . तालमीत . कविता शिकवताना त्यांचा रुबाब बघण्यालायक असायचा. झोपाळ्यावर बसायचे , शड्डू ..नाही मांडी ठोकून ..तोंडात पान वगैरे . मग असे काव्य तुषार उडायचे , आ हा हा . छडी रोखली रे रोखली की मुलांच्या कविता सुटायच्या. त्यांच्याकडेच मी रियाज़ केला कित्येक वर्षे . प्र.:- रियाSSSSSSSSज़? उ.:- तर . अहो इतकं सोप्पं नाहिये अशी प्रतिभा अंगभूत करणं . आमच्या शिकवणीत एक मुलगी यायची.तिला बघून मला लगेच आतून काही बाही होवू लागायचं. प्र.:- बाई गं ! आता पुन्हा काव्यप्रवास का? उ.:- नाही नाही , "हे" आतून काहीतरी होणं वेगळं असतं , तुम्हाला असं बाहेरून नाही कळणार.मग लगेच शब्द फुटायचे तिला पाहिलं की... "ती येते , ती बसते किती गोड गोड ती हसते पण नाक वाहता, बाबांच्या रुमालाने का पुसते ?" प्र.:- काय प्रतिभा ! उ.:- वासंती , वासंती .. प्र.:- ????? उ.:- वासंती होतं तिचं नाव . पण मग इथे सरांचं मार गं दर्शन व्हायचं. त्यांना वाटायचं मी छचोरपणा करतोय.मग मी मला किती अस्वस्थ होतं प्रतिभेमुळे , वासंती मुळे नव्हे , हे पटवून दिल्यावर.ते दुरुस्ती सुचवायचे. प्र.:- दुरुस्ती? उ.:- हं . म्हणजे ह्याच कवितेची "ती हसते , ती बोलते अवसेची पुनवा होते ती उदास होते डोळे पुसते अवेळी बरखा होते" असं . प्र.:- आईशपथ ! वाह ! काय झालिय अगदी ! उ.:- तर ह्यात पहिलं वाक्य माझं , दुसरं पाडगावकरांचं , तिसरं भटांचं अन चौथं हिंदी पुस्तकातून प्र.:- सांगता काय ? हे असलं ? चौर्यकर्म? उ.:- कोण म्हणतो चोरी? अहो हे असं मास्तरांनी आम्हाला प्रेरित व्हायला शिकवलं. प्र.:- धन्य आहे हो तुमची अन तुमच्या मास्तरांची. मग असं किती वर्षे प्रेरित झालात म्हणे आपण? उ.:- जास्त नाही , मास्तर गेले. प्र.:- अरेरे ! कुस्तीत का? उ.:- नाही . कवितेत . प्र.:- काय म्हणता? असं कवितेत पण जातात? कसं काय? उ.:- अहो एकदा मी त्यांना माझी नवीन कविता ऐकवली "ओ मास्तर ओ मास्तर तुम्ही तालमीत घुमताय खरंतर वर्षाला पाळणा हाल्तोय बायकोने धरलाय मैतर" थांबलेच नाहीत ! प्र.:- खरंच जीवघेणी कविता आहे हो. उ.:- मग? मी इतकी मनापासून ऐकवली की मास्तरांनी फारच मनावर घेतली. प्र.:- "देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो" उ.:- वाह ! मस्त आहे तुमची पण कविता, जरा छोटी आहे, चारोळी म्हणू फारतर प्र. :- चारोळी? तुम्ही हे पण क्षेत्र सोडलं नाही का? पण मला बाई कळंतच नाही चारोळी अन कवितेतला फरक उ.:- अहो एका वाक्यात सांगायचं तर "चारोळी म्हणजे पुढे न सुचलेली कविता" प्र.:- एकंदर तुमची मतं फारच परखड आहेत, असो . पण मग पुढे मास्तर गेल्यामुळे... उ.:- पुढे? ते वर गेले थेट , पुढे बोला. प्र.:- हं , मास्तर गेल्यावर तुमचं फारच अवघड झालं असेल नाही? उ.:- छे छे , बाकी मंडळी मास्तरांना पोचवत होती तोवर मी मास्तरांकडची सगळी पुस्तकं माझ्या घरी पोचवली होती. अजून जपलियत मी . त्यांच्या रुपाने मास्तर अजूनही दुरुस्त्या सुचवतात. प्र.:- मला एक प्रश्न कधीचा विचारायचा आहे उ.:- मला काय माहीत? कधीचाही विचारा हो , कोडी काय घालताय? प्र.:- तसं नाही , आत्तापर्यंत आपण ज्या कविता पाहिल्या त्या फारच प्राथमिक स्वरुपाच्या,तुम्ही चिडू नकात प्लीज , फारतर तुमच्या प्रतिभेची चुणूक म्हणू आपण अश्या होत्या . पण मग अगदी काव्यसंग्रह वगैरे छापण्यासाठी इतक्याSSSSSS कविता लिहीण्याचं महान कार्य कधी पार पाडलंत? उ.:- हं , प्रश्न गंभीर आहे तुमचा , एक विनोद सांगतो . मी जसजसा ती पुस्तकं वाचत गेलो.मला मास्तरांनी लिहीलेल्या कविता आपोआप समजत गेल्या. आणि कविता लिहीणं ह्याचं सुध्दा एक गणित आहे असा मी ताळा केला. प्र.:- गणित आहे? मस्त होता तुमचा विनोद . उ.:- अहो गणितच आहे .असं बघा , बोरकरांचं एक पुस्तक घ्यायचं , चाळ चाळ चाळायचं.बाकीच्या कविता वजा करून एक कविता काढायची "संधिप्रकाशात अजून जो सोने तो माझी लोचने , मिटो द्यावी " आता समीकरणाच्या उजवीकडचे डावीकडे घ्यायचे, म्हणजे सोने , मग ह्यात आपले शब्द मिसळायचे " सोने अवघे सोने हे सोन्यासारखे उन कसे" आता हे "सोना कितना सोना है " ह्या हिंदी गाण्यावर घेतलंय.. आहे का पत्ता? प्र.:- मी हताश आहे उ.:- वाह ! क्या बात है ! प्र.:- तुमच्या उत्तुंग प्रतिभेचा मला हळू हळू अंदाज यायला लागला आहेच. आपण इतक्या कविता कशा लिहू शकता हे आश्चर्यही ओसरते आहे . तुमचे अनेक पैलू आमच्या श्रोत्या.. सर्वांनाच कळावेत अशी कळकळ आहे खरी पण वेळेअभावी ही मुलाखत आपण इथेच संपवत आहोत.अर्थात तुमची(?) पुस्तकं आता येत राहणार ह्यात तिळमात्र शंका नाहिये त्यामुळे वेळोवेळी तुमचं ऐकावच लागेल . तर जाता जाता आपली एखादी कविता होवूनच जाऊ दे , आजचा दिवस तुमचा आहे. उ.:- इथे उपस्थित असलेल्या तुम्ही , तुमचा माईक , हा झीरो चा बल्ब , स्टीलचा न विसळलेला,तांब्या आणि तोंड वेंगाडून बसलेला पेला , ह्या सर्वांचे आभार मानून आत्ताच सुचलेली एक छोटी कविता ऐकवतो. ही मात्र इथे कुठलीच पुस्तकं नसल्याने , माझी स्वतःची आहे . " चांगल्या कवितेचा दिवा.. वादळात आपोआप तेवत राहतो हे कळाल्यापासून सोडून दिलंय मी शब्दांसाठी.. टाळ्यांच्या ओंजळी शोधणं.." प्र.:- अहो......... ही तुमची? आत्ता सुचलेली? उ.:- (खिन्न हसून ) होय. पुढच्यावेळी तरी येईल का हो कुणी? येतो मी. धन्यवाद..
|
वैभव.. अरे एक नंबर रे भो
|
Psg
| |
| Friday, April 07, 2006 - 7:34 am: |
| 
|
क्या बात है!! शालजोडीतले कसे अलगद मारलेत!
|
Gandhar
| |
| Friday, April 07, 2006 - 7:35 am: |
| 
|
>>मी लहानपणी रडताना पण वृत्त धरून रडायचो म्हणे . >>असं त्या वांगी चिरण्याच्या खस खस , खस खस ह्या मीटर वर बेस्ड होती ही . >>ओ मास्तर ओ मास्तर तुम्ही तालमीत घुमताय खरंतर ........... वैभव अशक्य लिहिलंयस रे
|
जबरी लिहिलयंस वैभव. >>>> कागद जपल्याशी मतलब... भन्नाट. 
|
झक्कऽऽऽस रे भो! ... म्हणुनच तर मी झुळुकेवर क्वचितच फिरकतो! कारण तुमच्या टाळ्यान्शिवाय ... नाऽऽही देणाऽर .... कवितेला कुणी ..... ... .. . तुमच्या खान्दा! DDD
|
Anilbhai
| |
| Friday, April 07, 2006 - 8:11 am: |
| 
|
मार गं दर्शन, जिन्स, चारोळी मजा आली रे भो
|
Shyamli
| |
| Friday, April 07, 2006 - 8:18 am: |
| 
|
वैभव कधि रे सुचल हे.... काव्यसंग्रह प्रकाशीत करतोयस म्हणजे नाही मुलाखतिची तयारी झालेली दिसतिये म्हणुन म्हणलं 
|
Charu_ag
| |
| Friday, April 07, 2006 - 8:22 am: |
| 
|
वैभव, जबरी लिहीलयस रे.
|
Nalini
| |
| Friday, April 07, 2006 - 8:23 am: |
| 
|
वैभव, सही.. HHPV श्यामलि, ह्यातले बरेच प्रश्न तुझेच आहेत...
|
Shyamli
| |
| Friday, April 07, 2006 - 8:25 am: |
| 
|
होय नलीनी म्हणुनच मी विचारलय त्याला >>>>>>>वैभव कधि रे सुचल हे...... नलिनि रॉयल्टि मिळायला हरकत नाहि ना! 
|
Ninavi
| |
| Friday, April 07, 2006 - 9:12 am: |
| 
|
वैभव, कोपरापासून नमस्कार रे बाबा तुला!! 
|
Divya
| |
| Friday, April 07, 2006 - 9:31 am: |
| 
|
फ़ारच छान झाली मुलाखत 
|
Aj_onnet
| |
| Friday, April 07, 2006 - 9:36 am: |
| 
|
वैभव, एकदम सही. खूप हसवलस.
|
Moodi
| |
| Friday, April 07, 2006 - 9:40 am: |
| 
|
वैभव एकदम सही अन खासमखास!!!! 
|
Rajkumar
| |
| Friday, April 07, 2006 - 10:05 am: |
| 
|
लय भारी रे वैभवा... मस्त जमलंय.
|
वैभव, खरंच मनापासून.. फारच सुंदर....
|
Junnu
| |
| Friday, April 07, 2006 - 10:57 am: |
| 
|
एकदम सही आहे. hhpv
|
मस्त रे वैभव.. एकदम hhpd 
|
Maanus
| |
| Friday, April 07, 2006 - 12:14 pm: |
| 
|
भाजीवर लिहीतात? कागदावर ना? ऐकावं ते नवलंच >>>> भारी आहे एकदम
|
Polis
| |
| Friday, April 07, 2006 - 1:00 pm: |
| 
|
च्यामारी, येकदम भन्नाट टाळक आहे की..भाऊ, ते " गोली मार भेजे मे " गान्या वरून एखादा " जुळा " भी लिवा की आम्हाला तेव्हडाच टाइमपास!
|
Dineshvs
| |
| Friday, April 07, 2006 - 1:37 pm: |
| 
|
वैभव, आता निनावि, बाई मी कविता करते, असे स्फुट लिहिणार.
|
Ninavi
| |
| Friday, April 07, 2006 - 2:27 pm: |
| 
|
दिनेशदा, मला नाही रे बाबा गद्यात जुगलबंदी करता येत. तिथे कवितांच्या बीबीवर काय ते लिहायला जमतं कधीकधी. (' मी नाही बाई गद्य लिहीत' अशी कविता लिहीन तिथे फारतर.) 
|
आई ग.ऽ.ऽ हसुन पुरेवाट ते पण मी office मधे हसत होते.......... जाम मजा आली सोने अवघे सोने मस्तच मला पण कधी कधी संशय येतो काही नवकवीवर बहुतेक बोरकर -(minus) पाडगावकर +(plus) तांबे = नवकविकर असा प्रकार असेल just kidding हां
|
vaibhav ....... .. .. .. .. ..
|
|
|