Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 20, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » ललित » चि. नलिनीस पत्रं » Archive through March 20, 2006 « Previous Next »

Dineshvs
Thursday, March 16, 2006 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री

चि. सौ. नलिनीस
अनेक आशिर्वाद.

तुझा आणि भरतचा आग्रह मला मोडता आला नाही, म्हणुन तुझ्या घरी गेलो होतो. आपल्याकडे माहेरवाशीणीसाठी माघारी पाठवायची रित आहे, तुम्ही दोघानी माझ्यासाठी जवळ जवळ तशीच तयारी केली होतीत, शिवाय माझी खास सरबराई करण्याची योजना आखली होतीत, त्यावरुन आपले थोडे रुसवे फुगवेहि झाले होते, पण आता ते सगळे मी विसरुन गेलो बरं का.

तर मी रात्रीच गोव्याहुन निघालो होतो. आमची डिरेवर साहेब एवढे चांगले निघाले कि त्यानी पुण्यात २ तास आधीच गाडी आणली. म्हणजे पहाटे साडेचारलाच मी पुण्यात होतो. अर्थात त्यावेळी समस्त पुणेकर गाढ झोपेत होते. ( संबंधितानी टोमण्याची दखल घ्यावी हो ) मग हेपये, गाडी बेगीन हाडली तर किदे जातां ते, असे म्हणत डायवर साहेबानी साडेसहा पर्यंत पुण्यातच गाडी थांबवुन ठेवली होती.

त्या पुर्वी मी मुद्दाम रात्री जागुन पोर्णिमेच्या रात्रीचा करुळ म्हणजे गगनबावड्याच्या घाट बघुन घेतला होता.
सकाळी नगरचे रेल्वे स्टेशन आले तशी आपल्या सुभाषची आठवण झाली, त्याला फोन केला तर, त्याने घरी यायचा आग्रह केली, नंतर बघु म्हणालो.
नगर जिल्ह्याचे रुप आता फ़ारच पालटले आहे. नद्या कोरड्या दिसल्या तरी कालव्यात पाणी होते. चिकु, पेरु च्या बागा बघुन छान वाटले. चिकु आता देशातहि होवु लागला म्हणायचा. पुर्वी डहाणु घोलवड भागातच तो होत असे. चिकुचे कलम एका वेगळ्याच झाडावर करावे लागते. त्यामुळे ते दत्तक प्रकरणच असते.

वाटेत सारखी तुमच्या भागाची आणि कोकणाची तुलना करत होतो.
कडु निंबाला बहर आलाय. हिरव्या साडीला पिवळी किनार गं, रानी लिंबास आला बहार गं, असे एक जुने गाणे होते. या बहरामुळे त्या झाडाचा नेहमीचा हिरवेगारपणा लोप पावला होता. आमच्या कोकणात फ़ार नाही कडुनिंब. ईथे दुसर्‍याच एका झाडाला कडुनिंब समजतात.
तुमच्या बाभळी पण नाहीत आमच्याकडे फ़ारश्या. आता बाभळी शेंगांवर आहेत. अजुन तिला बहर यायचाय. पण तुमच्याकडे बाभळ बहुत करुन पिवळीच असते. आमच्याकडे मात्र दुरंगी म्हणजे गुलाबी व पिवळी अशी फ़ुले येणारी असते. शिवाय तुमच्याकडे बांधावर ती लावतात, तर आमच्याकडे शोभेसाठी लावतात.
आणि खास करुन शिरिष खुप दिसला. त्याचा हिरवागार रंग आणि सोनसळी शेंगा एकमेकाना शोभा देत होते. सोन्या पाचुचा जडावाचा नगच जणु, त्याची हिरवी केसाळ फ़ुले मात्र, शोधावी लागत होती.
तसा ईथला पर्जन्य वृक्ष आणि तो भाऊ भाऊ, पण याची पाने काळसर हिरवी तर त्याची, पोपटी पिवळी. याची फ़ुले फ़ुलाबी तर त्याची हिरवी. याच्या शेंगा काळ्या तर त्याच्या सोनसळी. शिवाय याच्या शेंगांच्या चिकटपणामुळे खालचा रस्ता घाण होतो.
आणि आमच्याकडे असला तर एरंड शक्यतो हिरव्या फ़ळांचा तर तुमच्याकडे लाल फ़ळांचा देखील. याची गर खाताना काजुगरासारखे लागतात. पण मग मात्र पोटाचे जे होते ते होते. तरिही थाई आणि चिनी जेवणात तो वापरतात.
आमच्याकडे रुई जास्त आणि मंदार कमी तर तुमच्याकडे मंदार जास्त. तोहि या दिवसात पांढर्‍या चांदण्यानी बहरला. आमची रुई फ़क्त निळी तर तुमच्याकडे गुलाबी रुई बघितली. तरवड टणटणी तर होत्याच, पण आमच्याकडे वनखात्याने लावलेल्या, वेड्या बाभळीपेक्षा आणि सुबाभळीपेक्षा त्या परवडल्या.
तुमच्याकडे कॉंगेस गवत मात्र फ़ार गं, आता पुर्वी ईतके नाही तरी अजुन त्याचा ऊपद्रव आहेच. आमच्याकडे मात्र नाही गं ते.

हि सगळी शोभा बघण्यात शिरडी कधी आले ते कळलेच नाही. अंघोळ दर्शन आटपले तर ती. सर्जेराव मला न्यायला हजर होतेच. वाटेत त्यांच्याशी खुप गप्पा मारल्या. तु जरि प्रत्येक वळणासकट पत्ता सांगितला होतास तरी, मला एकट्याने जाणे जरा कठीणच गेले असते, ते आता कबुल करतो.
घरी जय भेटला. ती. सौ. आई बाबा होते. पुरणपोळीचा आस्वाद घेतला. मळ्यात गेलो.

अजुन बरेच लिहायचे आहे. परत लिहिनच.
तुझ्या ती. सौ. आईला भेटता आले नाही. भरतच्या घराजवळुन गेलो तरी त्याचेहि घर घेता आले नाही. पण अजुन खुप लिहिणार आहे.
जय आज ऊद्या पोहोचेलच, त्याच्याजवळ छोटीशी भेट पाठवली आहे. तुला आवडेल अशी आशा आहे.
जय पोहोचला कि कळव, म्हणजे परत लिहिन.

कळावे, लोभ आहेच तो तसाच रहावा.
तुझा,
दिनेशदादा


Lopamudraa
Thursday, March 16, 2006 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nahamee saarakhe sundar varnan!! ajun thode mothe have hote , lavkar sampalyaasaarakhe vaatale!!!

Chinnu
Thursday, March 16, 2006 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जय लवकर पोहचु दे, म्हणजे तुम्ही परत लिहाल! खरच वाचत रहावेसे वाटते!

Deepanjali
Thursday, March 16, 2006 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे कोणाला पत्र लिहिलय ,
इथे ??????


Giriraj
Friday, March 17, 2006 - 12:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DJ ,हे पत्र दिनेश यांनी एक मायबोलीकरीण 'नलिनी' हीस गोव्याहून इथे लिहिले आहे. यात उल्लेखिलेला भरत म्हणजे चम्प्या असून,सुभाष म्हणजे cool आहे!तसेच जय म्हणजे नलिनीचा भर्तार आहे!

पत्रलेखन हा प्रकार वापरून छानच प्रवासवर्णन केले आहे!


Moodi
Friday, March 17, 2006 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश मस्त लिहीता हो. एकदम जिव्हाळ्याचे वर्णन. तुम्ही लिहीत रहा, आजुबाजूला काय आहे हा विचार करु नका. चांगली माणसे भेटायला माणुसकीचे नाते पण लागतात ना या कोरड्या जगात!!

Charu_ag
Friday, March 17, 2006 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, खरचं, किती आपुलकीन वर्णन केलय! सुंदर.

Milindaa
Friday, March 17, 2006 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरीराज ? नैना ?

पत्रलेखन हा प्रकार वापरून छानच प्रवासवर्णन केले आहे! <<<
आणि लेखनाचा प्रकार पण सांगितलास हे तर फारच चांगले केलेस हो

Dineshvs
Friday, March 17, 2006 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री

चि. सौ. नलिनीस,
सप्रेम नमस्कार,
बघ तु अजुन वाचले नाहीस, आणि बाकि सगळ्यानी वाचले.
तुमच्या घरी जवळ जवळ दुपारी २ वाजतो पोहोचलो. तर तुझ्या सासुबाईनी जेवणाचीच तयारी चालवली होती. हा तुमचा खास देशावरचा पाहुणचार बरं का. आमच्या कोकणात, जेऊन आलात कि जाऊन जेवणार आहात, असेच विचारतात. ( पुणे पण कोकणात येते का गं )
तर पुरणपोळी, तुमच्या पद्धतीची कटाची आमटी, तुप घालुन दुध, कुरड्या, मिरचीची भजी असा छान बेत होता. खरे म्हणजे सगळ्यांची जेवणे झालीच होती. पण सर्जेरावाना मी अग्रह केला आणि ते माझ्याबरोबर दोन घास खायला बसले. तुला मुद्दाम सांगायला हवे, कि जय आग्रह करुन वाढत होता.
मग आम्ही दोघे मळ्यात गेलो. कांदा, ऊस, गहु सगळे होते शेतात. मळा हा खास तिकडचा शब्द वाटतं.
कोल्हापुरात वाफा, नाहितर बिभा म्हणतात.
मला जाणवलेला एक खास फरक म्हणजे, सभोवार नजर फिरवली, तर कुठे ऊंदरा एवढी पण टेकडी नाहि दिसली. आमच्याकडे, क्षितिजाला करवतीसारखे कापुन असतात हे डोंगरोबा.
तुमच्याकडे मळ्यात नारळाचे पण झाड दिसले. अगदी बुटके. हि सिंगापुरी जात. पुर्वी देशावर नारळ दिसायचेच नाहीत. माझी मावशी म्हणते, म्हणुन देवाला नारळ बोलायचे. आता तर कोल्हापुरात, गणपतिच्या मुर्ती एवढे नारळाचे ढिग लागतात.
आणि विहिरीत सुगरणीचे खोपे पण होते, हे खोपे पण आमच्याकडे दिसत नाहीत. आफ़्रिकेत असेच खोपे बघितले, पण ते चेंडुसारखे गोल गरगरीत. आपल्या सुगरणीची कलाकुसर नाही. आता सुगरण हे नाव स्त्रीलिंगी म्हणजे अन्यायच गं. खरे तर नरच सगळी मेहनत घेतो. तिला पसंत पडले तर त्याचा घरोबा होणार.
धनश्री छान बोलत होती. तिने तुमच्या लाल्याचा पण फोटो काढायला लावला. जयने मुद्दाम सगळ्यांची ओळख करुन दिली.

मी तिकडे होतो ना, तर आपल्या सुभाषचे सारखे फ़ोन येत होते, त्याचे गाव म्हणे तिथुन फारच जवळ होते. त्याने जयलाच गळ घातली, माझे पार्सल पोहोचवायची.
वाटेत तर फारच मजा केली, पण ते पुढच्या पत्रात.
आता हे तरी वाचायला सवड मिळणार आहे का तुला.
पण सवडीने उत्तर लिही.
कळावे,
तुझाच,
दिनेशदादा


Champak
Friday, March 17, 2006 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती जय ला आणायला air port वर गेली हे :-)

Megha16
Friday, March 17, 2006 - 12:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश दा
वा किती सुंदर वर्णन केल आहे तुम्ही नगरच
तुमच पत्र वाचल आणी नगरच रेल्वे स्टेशन माझ गाव (सारोळा,अस्तगाव), बाभळी, आमच शेतातल घर,मळा,शेंवती,अस्टर ची फुले, लिंबुची बाग,घराच्या पाठी मागे पाण्या चा बोर, तिथे आम्ही लहन पनी खुप खेळायचो, तळ, आमचा मोती किती आठवणी जाग्या झाल्या.
दिनेश दा जमल तर शिर्डी च पण वर्णन करा. तुम्ही केलेल वर्णन वाचुन शिर्डी ला जाउन आल्या सारख वाटेल एकदम.

मला वाटतय की आज नलु ताई ला काही वेळ मिळ्णार नाही बहुतेक पत्र वाचायला.
मेघा.


Giriraj
Saturday, March 18, 2006 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोन ही नैना?तुझ्या ओळखितली आहे का?सुटेबल आहे का?

मामा ठाकूर,कुथे आहात तुम्ही?



Dineshvs
Saturday, March 18, 2006 - 10:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री

चि. नलिनीस,
सप्रेम नमस्कार,
आता हा म्हणजे कळसंच झाला हं. आता लोकाना दाखवण्यासाठी तरी मला तुझ्यावर रागावण्याचं नाटक करावं लागेल.
सुभाषचे फोन सारखे येतच होते. तुझ्या सासुबाईनी तुझ्यासाठी भेट बांधायला घेतली होती. अगदी सागरगोट्यांपासुन सगळे मागितले होतेस म्हणे.
या सागरगोट्यांवरुन आठवले. आम्ही एका लग्नाच्या निमित्ताने, जामनगरला गेलो होतो. गाव तसे वाळवंटच आहे. आणि त्या गावात बघण्यासारखे काय तर म्हणे, स्मशाण. खोटं नाही, खरेच. मग आमच्या मित्रानी आम्हाला तिथे पोहोचवण्याची व्यवस्था केली. म्हणजे गाडी करुन दिली. आम्हाला तिथे सोडुन गाडीवान गेला.
आहे खरे तिथले स्मशाण देखणे. म्हणजे सुंदर शिल्पं वैगरे आहेत. पण आम्हाला कंटाळा आलो. म्हणुन आम्ही बाहेर येऊन टाईमपास करु लागलो. तिथे एक हातगाडीवाला रिबीनी, बांगड्या वैगरे विकत होता, त्याला पीडु लागलो. त्याचाहि वेळ जात नव्हता बहुदा. तेवढ्यात मला सागरगोट्याचा वेल दिसला. बर्याच शेंगा लागल्या होत्या. आम्ही ते काढायच्या मागे लागलो. बरिच झटापट केली, पण काहि मिळाले नाही. तेंव्हा तो गाडीवान म्हणाला, माझ्याकडे आहेत सागरगोटे घ्या. आता त्याला टाळणे शक्यच नव्हते. शहरी मानसिकतेतुन आम्ही त्याला किती पैसे असे विचारले, तर तो म्हणाला, मी दिवसभर ईथेच तर असतो. खाली पडतात ते गोळा करतो. त्याचे कसले पैसे. आमचा नक्षा त्याने एका क्षणात ऊतरवला बघ.
तर तुझ्या सासुबाईनी माझ्यासाठी पण ज्वारी बाजरीच्या थैल्या बांधल्या. बॅगेत जागा आहे का असे त्या विचारत होत्या, तेवढ्यात सर्जेरावानी त्या माझ्या बॅगेत पॅक पण करुन टाकल्या.
सुभाष आणि जयचे काय बोलणे झाले मला कळले नाही, पण जय मला सोडायला निघाला. सगळ्याना नमस्कार करुन निघालो.
तुला का संकोच वाटत होता बरं. एवढी साधीभोळी, मोठ्या मनाची माणसं रोज रोज कुठे भेटतात गं.

हे ईथेच, दहा मिनिटावर असे सांगत जयला बराच मोठा टप्पा गाठावा लागला माझ्यासाठी. मी बसने जातो सांगुन पाहिलं तर तो ऐकतच नव्हता.
मी नेहमी टिव्हीवरचे शेतकी कार्यक्रम बघतो, तेंव्हा ते संशोधन बघुन मन खुष होते. पण जय म्हणाला त्याप्रमाणे ते संशोधन, खर्या शेतकर्यांपर्यंत पोहोचतच नाही. किंवा असे म्हणु हवे तर कि शेतकर्यांचे खरे प्रॉब्लेम्स, संशोधकाना कळत नाही. डॉ. कमला सोहोनी यानी हि खंत जाहिरपणे व्यक्त केली होती. त्यांची अनेक संशोधने पुस्तकातच राहिली.
वाटेत श्रीरामपुर लागलं. माझ्या लेखनातील गुरु, डॉ डहाणुकर यांचे शेत होते तिथे. मी त्याना काहि ऑर्नामेंटल मक्याचे बियाणे दिले होते, ती कणसे बघायला मला त्या बोलवणार होत्या. पण ती वेळच आली नाही कधी.

आपल्या आरतीचे पण हे गाव. ती पण गेली अनेक वर्षे माझ्या मागे लागलीय. पण दोघांच्या वेळा जुळत नव्हत्या. आणि यावेळी तिथे पोहोचलो, तर ती नव्हती. तरि तिला खबर लागलीच, तिने फोन करुन विचारलेच मला. पण रेंज नसल्यामुळे बोलणे तुटले.
अगदी बराच मोठा पल्ला पार केल्यावर आम्ही सुभाषच्या गावाला पोहोचलो. तो वाटेतच भेटला. आधी भेट झाली नव्हती तरी जयने त्याला बरोबर ओळखले.
मला जयचा वेळ घेतल्याबद्दल संकोच वाटत होता. पण सुभाषने त्याला पण घरी यायची गळ घातली. आणि जयने पण केवळ दहा मिनिटावर असणार्या त्याच्या घरी, दोन मिनिटे यायची तयारी दाखवली.
त्याच्या घरची मजा, पुढच्या वेळी.
जसा तुझा आहे, तसा माझाहि लोभ आहेच.
हे कळावे.
तुझाच,
दिनेशदादा


Giriraj
Sunday, March 19, 2006 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

-- -- -- -- -- --

Nalini
Sunday, March 19, 2006 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ति. दिनेशदादास
नलिनीचा सप्रेम नमस्कार,

पत्रास उत्तर देण्यास खुपच उशिर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. आणि हो मी जय पोहचल्यानंतर आणि त्याच्या सोबत आलेल्या बॅगा खाली केल्यानंतरच पत्र लिहायचे ठरविले होते म्हणुन आज लिहित आहे.
जयचा प्रवास अगदी सुरक्षित आणि सुखकर(होणारच, हवाई सुंदर्‍य खुपच सुंदर होत्या म्हणे) झाला.
तु पाठविलेला सगळा खाऊ मिळाला. आता सध्या ते संपविण्याचे काम सुरु आहे. नाटकांच्या तसेच गाण्यांच्या पण CD मिळाल्या. विशेष म्हणजे तु दिलेल्या फूलांच्या तसेच विविध भाज्यांच्या बियापण व्यस्थित पोहचल्या. कित्ती मजा आता आम्हालाही बागेतल्या ताज्या भाज्या खायला मिळणार.
तु घरी पोहचणार हे माहीत असल्याने तुझी वाट पहाणे एक दिवस आधिच सुरु झाले होते. तुला भेटण्याची सर्वांना खुपच उत्सुकता होती. तु पोहचला त्यादिवशी मी घरी फोन केला होता तर कळाले की तु आणि जय सुभाषकडे गेलात म्हणुन. मग मी रात्रि पुन्हा फोन केला होता जेणेकरुन तुझ्याशी बोलणे होऊ शकेल पण जयने सांगितले की तु परत गेलास पण म्हणुन. मी खुपच नाराज झाले कि तु मुक्कामाला नाही थांबलास. किती धावती भेट होति तुझी? मला तर वाटले की उगिचच तुझी धावपळ करवली.
सांगायचेच रहिले की भारत रुसलाय बरं का तुझ्यावर. तु उभयतांना आशिर्वाद द्यायला दिवाळीत जाणार आहेस असे सांग़ुन त्याची त्याची तात्पुरती समजुत काढलीय. सासुबाई तर तुला भेटुन खुप खुश झाल्या, पण तुझा पाहुणचार जास्त वेळ करता आला नाही असही त्या म्हणाल्या.
त्यांच्या बद्दल बोलायचे झाले तर एवढेच सांगु शकेन की त्या सक्षात अन्नपुर्णा आहेत. एकाच चुलीवर एकाच वेळी मांसाहार करणार्‍यांसाठी खास मटणाचा बेत आणि न खाणार्‍यांसाठी पुरणपोळीचा घाट घालणे त्यांनाच जमु शकते.
ज्या संबंधित पुणेकराने गाढ निद्रेच्या आधिन झाल्याने तुझ्या सोबत घरी जाण्याचा बेत हाणुन पाडला त्यानेच मला मेसेज पाठविला होता की तब्येत जरा बरी नाही, त्यामुळे मी जाऊ शकलो नाही. होना रे गिरी?
दिनेशदादा, तु जे प्रवासाचे वर्णन केलेस ते वाचुन तर मी घरी असल्याचाच भास होतोय.
नेहमी प्रमाणेच तु फुलांचे आणि सभोवतालचे सुरेख वर्णन केलेस. तु जे कॉंग्रेस गवताबद्दल बोललास ते असे आहे की आपल्या इंदिरा गांधींनी ते गव्हासोबत आयातच केले म्हटल्यावर ते जपायला हवे असे धोरण बहुतांचे दिसतेय. :-)

डॉ. डहाणुकरांचे शेत हे माझ्या मामाच्या शेताच्या अगदी जवळ आहे. तु म्हणतोस तसेच माझी माणसे साधीभोळी, निरागस, मनमिळाऊ आहेत. परंतु गावी अजुनही शहरी सुविधा पोहचल्या नाहित ना म्हणुन तसे वाटले. अर्थात तुझे मत नाही रे पण बरेच लोक गावाकडच्या लोकांना गावंढळ म्हणुन त्यांची अवहेलना करतात. गावी अजुनही मैलोनमैल प्रवासासाठी सायकलच वापरतात, पण लोक त्यांच्याकडे प्रवासाचे इतर साधने नाहीत म्हणुन टर उडवतात. मायबोलिवरच कुठेतरी वाचल्याचे आठवते की सायकल दुधवाले भैय्या वापरतात.
जय म्हणतोय की तुला भेटुन खुप आनंद झाला. तुला वेळ मिळेल तसा सुगरणीच्या खोप्याचा आणि कांद्याच्या गोंड्यांचा फोटो पाठवुन दे. मी भारतात येईन तेव्हा माहेरपणाला गोव्याला येणार आहे. त्यावेळी मात्र तुला आठवडाभराची सुट्टी कढावी लागेल बरं का!
आजच्या पत्रास पुर्णविराम देण्यास तुझी परवानगी घेते.
तुझा आशिर्वाद असाच आमच्या पाठीशी राहो.

तुझी धाकली बहिण,
नलिनी.



Shyamli
Sunday, March 19, 2006 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश दा.....
ह्यासाठीच थांबले होते....
नलिनीची वाट बघत होते....
प्रवास वर्णन.... आम्ही काय बोलावे.....सगळच डोळ्यापुढे ऊभ केलय...


Megha16
Sunday, March 19, 2006 - 11:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश दा, आणी नलीनी,
तुमच दोघाच पत्र लेखनाची शैली खुप मस्त आहे.
छान वाटत वाचायला.
मेघा


Moodi
Monday, March 20, 2006 - 3:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी मराठीत एक म्हण आहे बघ. जीत्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. तसेच अशा लोकांकडे लक्ष न देता आपण पुढे जायचे. काही खोंडांमध्ये बायका पण असतात बरं. उधळलेल्या म्हशी...

Dineshvs
Monday, March 20, 2006 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री

चि. नलिनीस,
सप्रेम नमस्कार,
आज तुझे उत्तर आलेय, म्हणुन आणखी सविस्तर लिहायला हुरुप आला. माझ्या पायाला भिंगरी, कायमची. त्यामुळे ईच्छा असुनहि जास्त वेळ थांबता आले नाही. पण अगदीच न जाण्यापेक्षा हे बरं ना.
हा गिर्‍या आहे ना, त्याच्यावर असे अधुन मधुन रागवावेच लागते, तरच तो सरळ वागतो. अति लाड केल्यामुळे दोक्यावर चढुन बसायचा नाहितर.
त्याची डोकेदुखी आता आम्हा सगळ्यांची डोकेदुखी झालीय. त्याची डोकेदुखी काय आणि भारतचे रागावणे काय, यावर ऊपाय एकच. लवकरात लवकर दोघाना ऊजवुन टाकायला हवेय. ( म्हणजे त्याना कळेल, खरी डोकेदुखी आणि खरा राग काय असतो ते. )
जय बरोबर जाताना शेतात हारवेस्टर दिसला. हे एवढे अगडबंब यंत्र आपल्याकडे बघुन छान वाटले. जय म्हणाला अगदी छोट्या शेतकर्‍यालाहि हे यंत्र आता भाड्याने घेता येते. चांगली गोष्ट आहे हि.
वाटेत कवठाची झाडे पण खुप दिसली. या दिवसात फळानी लगडली आहेत. चांदण्या रात्री हे झाड किती छान दिसते. हि फळे अंधारात थोडीफार चमकत असतात. पण हेहि झाड कोकणात नाही, ते फळहि ईथे कुणाला माहित नाहीत.
पण आमचे रातांबे म्हणजेच कोकम तुमच्याकडे नाही, शिवाय ईंदिरा संतानी, लेकुरवाळा म्हणुन गौरवलेला फणसहि तिकडे नाही. बिमली नाही.
मी फारच आमचं तुमचं करतोय का गं ? पण हे असच असायला हवं नाही का, ईथे येशील तेंव्हा काय बघायचे, हे तर ठरवता येईल ना तुला.

हं तर मी सांगत होतो, सुभाषच्या गावाबद्दल. त्याचे गाव मुख्य रस्त्यापासुन नऊ किलोमीटर आत होते. आधीच मी जयचा महत्वाचा वेळ खाल्ला होता, शिवाय त्याला भेटायला त्याचे मित्र पण घरी येऊन थांबलेले होते. पण तो दोन मिनिटे यायला तयार झाला.

मुंबईच्या बाहेर गेलो ना कि या काळवेळाचे संदर्भच बदलुन जातात. मुंबईत भेटायची वेळ ठरवताना, प्लॅटफ़ॉर्म नंबर एक वर ईंडिकेटरखाली अकरा पंचवीस ला भेट आपण अकरा सत्तावीसची कल्याण लोकल पकडु, असे ठरवले जाते.
पुण्यात तु मला दहा साडेदहाला अप्पा बळवंत चौकात भेट असे सांगितले जाते. त्या हिशोबाने मला वाटतं तुमच्याकडे ये कि दुपारी सवडीने, असे सांगत असावेत. वर्ध्याला तर भेटु पुढच्या महिन्यात, कधीतरी, असे सांगतात.

तर सुभाषने जरी दहा मिनिटे सांगितले होते, तरी जायला आम्हाला अर्धा पाऊण तास लागला. ( बघ माझ्या तोंडात पण तशी भाषा यायला लागली. ) दोन्ही बाजुला, ऊस, मका, गहु यांची शेते झुलत होती. गव्हाचे शेत बघुन ऊगाचच अंगावर शहारे आल्यासारखे वाटत होते. गव्हाच्या ओंब्या कश्या ताठ ऊभ्या असतात. भाताच्या मात्र नेहमी खाली झुकलेल्या.
पुर्वी टिव्हीवर द पॅसेज टु ईंडिया, द असेंट ऑफ़ मॅन अश्या छान सिरियल्स दाखवत असत. त्यातले काहि अजुन आठवतय. आपण जे गहु खातो, ते वाण पुर्णपणे मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेय. असा टप्पोरा पौष्टिक दाणा, जगभरातल्या अनेक देशांतील लोकांचे मुख्य अन्न आहे, पण गव्हाचे जे मुळ नैसर्गिक वाण आहे, ते आजच्या गव्हापेक्षा खुपच वेगळे असते. ते वार्‍याने सहज ऊडुन जाऊ शकते. आणि त्याचा प्रसार होतो. आपल्या गव्हाला मात्र मानवी मदतीशिवाय प्रसार आणि पुनुरुत्पादन शक्यच नाही, बटाट्याचे पण तसेच आहे.

गव्हाचे हे शेत दिसतेहि भरगच्च. बहिणाबाईच्या,

टाया वाजवती पाने, दंग देवाच्या भजनी,
करती रं कारोन्या, होवु द्या आबादानी

या ओळी आठवल्या. आबादानी आलीच म्हणायची. गव्हाचे पिक कापणीला तयारच होते. बराच टप्पा पार केल्यावर आम्ही सुभाषच्या अप्पाच्या घरी पोहोचलो.

अप्पा, अण्णा, दादा अशी टोपणनावे, हि आपली खासियत. मला लहानपणी चांगली नावे असताना, अश्या नावाने का हाक मारतात, ते कळायचे नाही. प्रत्येक घरात ताई, माई, अक्का आणि दादा, भाऊ, अप्पा असायचेच. माझी आजी म्हणायची, करणी वैगरे करताना खरे नाव लागते, ते कळु नये म्हणुन असे करतात. ते खरे असेलहि, पण आता कळतय कि या संबोधनात किती गोडवा आहे ते.

पुलंनी द ओल्ड मॅन & द सी या पुस्तकाचे, मराठीत एका कोळियाने, असे भाषांतर केलय. त्यात त्या म्हातार्‍या माणसाला जेंव्हा मोठा मासा मिळतो, तेंव्हा तो त्याला Fish अशी हाक मारतो. पुलनी मात्र त्याचे, माश्या रे, असे भाषांतर केलय. बघ ना, किती नेमके संबोधन आहे ते.

तर सुभाषचा अप्पाने, अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले आहे. आणि तरिही पुर्ण विचाराने, तो शेती करतो.
गेल्या गेल्या सुभाषच्या वहिनीने हात पाय धुवायला पाणी दिले. असे हे झाडाखाली, दगडावर हातपाय धुणे, किती आनंदाचे असते. चहा झालाच, पण मग मलाच राहवले नाही, मी जयला परत जायला लावले.

अप्पाच्या घराला लागुनच, गव्हाचे शेत होते. पण ते अजुन तयार झाले नव्हते. ओंब्या हिरव्याच होत्या. चार्‍याचेहि पिक होते, त्याला छान निळी फुले आली होती. अंगणात वासरे, बकर्या चरत होते. अप्पाचा वैभव आणि आदित्य दंगा करत होते.

आजवर आयुष्यभर समुद्राचे सानिध्य लाभले असले तरी, मला नदिचेच आकर्षण वाटते. म्हणुन जेंव्हा सुभाष म्हणाला कि नदिवर जाऊ, तेंव्हा मी एका पायावर तयार झालो. त्याच्या घराजवळुन गोदावरी वाहते. ( मला जरा हे पचायला जड गेले, कारण गोदावरी आणि नासिक अशी अकारण संगति लागली आहे मनात. ) . कोकणातल्या बहुतेक नद्या आता आटु लागल्या आहेत, त्यामुळे भरपुर पाणी असलेली नदि, खुप दिवसानी बघितली. नदिच्या पाण्यात पाय सोडुन बसण्यासारखे सुख नाही. पण वेळ खुप कमी असल्याने, मी मन आवरले.

परत फ़िरलो तर सुभाषच्या वहिनीने, ताटच वाढायला घेतले. तासाभरापुर्वीच तुझ्याघरी पुरणपोळीचे जेवण झाले होते. मला हे असे जेवण जाणारच नव्हते. पण सुभाषचा आग्रह पण मोडता आला नाही. त्याच्या वहिनीनी डाळ बाटीचा बेत केला होता. खुपच चवदार होत्या त्या, पण फार खाऊच शकलो नाही.

मग जरा ओसरीवर टेकलो. त्याचे काका पण बसले होते, त्यानी पण नातवाबरोबर फोटो काढुन घेतला. शेतात फेरी मारली. गव्हात चुकार राई ऊगवली होती. मी पटकन तोंडात टाकली ती. गावरान राईचा फणकारा मस्त डोक्यात शिरला. सुभाषने ते बघितले बहुदा.
आपल्याकडे बायका जेवण शिजवताना किती तल्लीन होतात नाही. मोहरी पण फोडणीत टाकण्यापुर्वी, दोन बोटात कुरवाळली जाते. भाकर्‍या बडवणे, हा नुसता एक शब्दप्रयोग आहे, प्रत्यक्षात बाई, भाकर्‍या थापतेच. आणि हे थापणे, लहानग्याला थोपटण्या ईतकेच प्रेमाचे असते. अन्नाला पुर्णब्रम्ह मानणारी आपली संस्कृति. भात शिजल्यावर आवर्जुन चुलीला घास देतो आपण, आणि मग पाश्चात्य कुक जेंव्हा जिन्नस अक्षरश : फ़ेकतात, तेंव्हा त्यांची किव करावीशी वाटते.

सुभाषचे गाव, माझ्यासारख्या माणसाला कितिही आवडले, तरी तिथल्या रहिवाश्यांचे जीवन कष्टप्रदच आहे. मुख्य रस्त्यापासुन गाव नऊ किलोमीटर आत. वाहतुकिचे कुठलेहि नियमित साधन नाही. बहुतेकाना पायी जाण्याशिवाय पर्याय नाही. रस्ता पण सरकारी नाही, साखर कारखान्यानी ऊस वाहतुकिसाठी केलेला. त्यामुळे त्याचीही दशाच झालेली. घरात वीज नाही. शाळा नाही, बाकि कसल्याच सोयी नाहीत. सरकारने ठरवले कि या जागी पुराचा धोका आहे, म्हणुन सरकार काहि करत नाही. सरकारने आपल्या मर्जीने दुरवर एक गाव वसवुन दिलेय, पण ते शेतापासुन दुर असल्याने तिथे कोणी रहात नाही, असा सगळा तिढा.
पण कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट हि कि, सुभाषच्या वहिनीनी, त्या गावात राहुन सगळी शेतीची कामे, आणि दोन लहान मुले संभाळुन, पदवीपर्यंत शिक्षण पुर्ण केले.

मग सुभाष हळुच म्हणाला, कि त्याच्या आईबाबानी पण बोलावलेय. आता होकार भरण्याशिवाय मला गत्यंतरच नव्हते. मला शिरडीहुन परत ९ वाजताची बस पकडायची आहे, अशी अट घालुन, मी त्याच्या बरोबर निघालो. हे ईथेच असणारे त्याचे गाव, चांगले तासभर प्रवासानंतर आले. शनि शिंगणापुरला त्याचे आईबाबा असतात. देवळापासुन त्यांचे घर जवळच आहे.

खरी तर सुभाषची ओळख अलिकडचीच. केवळ तिसर्‍यांदा आम्ही भेटत होतो. पहिल्या भेटीत तो अबोल वाटला होता. त्याला चिडवण्यासाठी, तु तुझ्या टोपणनावाप्रमाणेच कुल आहेस का, असे विचारले, तर आरती म्हणाली होती, फक्त नगर जिल्ह्याबद्दल काहि वेडेवाकडे बोलले तर त्याला आवडत नाही.
पण एकंदर आवडुन जाईल असा मुलगा आहे तो. ( आता तुला आणखी मुली बघायला लागणार बघ, दोन धाकल्या भावांसाठी. ) .

आम्हाला वाटेत नेवासे लागले. भारतच्या घरी डोकवायची खुप ईच्छा झाली होती, पण अजुन बराच पल्ला गाठायचा होता. पण हे ठिकाण माझ्या खुप आवडीचे आहे.

आयुष्यात देश परदेशातली अनेक देवस्थाने बघितली. पण पैस चा खांब आजहि मनाच्या गाभार्‍यात भरुन राहिला आहे. खरे तर तिथे त्या खांबाशिवाय काहिच नाही, तो खांब वा ते देवालय फ़ार भव्य दिव्य आहे असेहि नाही. दुर्गाबाई भागवतानी त्या खांबावर काय अवकाश तोललेले आहे, त्याचे सुंदर वर्णन केलेय. दुर्गाबाईंचे नाव घ्यायची पण माझी लायकि नाही, पण त्याना जो अनुभव आला, तसाच काहिसा मलाहि आला.

भिंत चालवणे काय किंवा मांडे भाजणे काय, दंतकथा वा सांगोवांगीच्या गोष्टी म्हणुन आपण सोडुन देऊ. पण भावार्थदिपिकेतले काव्यगुण तर अजोडच आहेत ना. प्रत्येक ओवी अनुभवावी, अशीच आहे. मांजरीने पिल्लाला तोंडात धरणे काय, कमळांच्या केसरापासुन निघालेल्या हवेचा डोळ्यांचा बुबुळाना होणारा स्पर्ष काय, आपल्याला हे कधी जाणवले असते का ? . त्यानी सहानुभुति हा शब्द दया या अर्थाने न वापरता, सह अधिक अनुभुति असा वापरलाय. प्रत्येक ओवीत जाणवते ती.

मुक्ताई वयात आली तेंव्हा त्यानीच तिला माऊलीच्या मायेने समजावले होते. आणि त्या लहानग्या नकळत्या वयात अवघ्या समाजाचे माऊलीपद त्याना मिळाले. मी एकदा एका अनवाणी वारकरी बाईला, चप्पल घेऊन देऊ का, असे विचारले होते. ती म्हणाली, बाबा आमच्या पायाला काटा सराटा काय, खडाबी लागु देत न्हाई, माऊली.
त्या चार लेकराना, समाजाकडुन काय मिळाले, केवळ ऊपेक्षा आणि अवहेलना पण त्यांच्या रचनेत कुठेहि त्याबद्दल कटुता नाही.
ते सगळे आठवुन गेले.

सुभाषने सांगितले सुद्धा, कि भारतचे घर जवळच आहे, पण जवळ जवळ सात वाजत आले होते, त्यामुळे जाऊ शकलो नाही. आता दिवाळीत वर्‍हाडी म्हणुन येऊच कि.

सुभाषने भन्नाट गाडी हाकली व तासाभरात आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. त्याच्या आईबाबाना खुप आनंद झाला. हात पाय धुण्यासाठी पाणी गरम करण्यापासुन आदरातिथ्य चालले होते. तिथेहि चहा झालाच. वेळ असता तर, देवगडला गेलो असतो, वैगरे बोलणे चालले होते.

देव असा देवळात भेटतो का ? मला तर विठोबा रखमाईने असे अनेक घरात दर्शन दिलेय आजवर.

शनिमहाराजाना नमस्कार करुन सुभाषने अडवुन ठेवलेल्या गाडीत बसुन शिरडीला निघालो. त्याने पण गाडी भन्नाटच हाकली. तासाभरात शिरडीला पोहोचलो सुद्धा. परत समाधीचे दर्शन घेऊन, मुम्बईच्या गाडीत बसलो.

जय ला एअर पोर्ट वर भेटायला जायचे होते, पण ते जमवु शकलो नाही.

आपला पत्रव्यवहार नेहमीप्रमाणे चालु राहिलच. पण तुझ्या गावाचे आणि तिथल्या माणसांचे कौतुक जाहिररित्या करावेसे वाटले म्हणुन हा खटाटोप.

लोभ आहेच,
तुझाच,
दिनेशदादा



Zelam
Monday, March 20, 2006 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती छान लिहिलय. अगदी अकृत्रिम.

Suniti_in
Monday, March 20, 2006 - 1:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा अहो नगरला नेऊन पोहोचवले तुम्ही तर. पत्र वाचताना अगदी डोळ्यांसमोर सगळी ठिकाणे उभी केली आहेत.
पण फणस, कोकम, नारळ हे बघायला मात्र कोकणात तुमच्याकडेच चक्कर टाकावी लागेल. :-) हो आणि समुद्र सुद्धा.
नालिनी खाऊ संपला का ग? वाट बघतोय इकडे ये बघू.


Megha16
Monday, March 20, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ति.
दिनेश दा, नलु ताई
तुमच दोघाच पत्र वाचली. खुप आंनद झाला. गावाकडची बरीच माहीती कळाली. म्हणुन मला ही थोड लिहावस वाटल.
तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. टिव्ही,पेपर यात शेतकरया साठी बरयाच योजना आपण पाहतो,वाचतो.
पण प्रत्यक्षात या योजन त्यांच्या पर्यत पोचतात की नाही. हे मात्र कोणाला ही माहीत नसत.
आता माझच गाव बघा ना, आज इतकी वर्ष झाली पण अजुन आमच्या गावाल ट्रेन तर नाहीच पण बस ची सुद्धा व्यवशित सोय नाही. माझ गाव अस्तगाव,सारोळा स्टेशन पासुन २-३ किलोमीटर. मुंबई कडुन येणारयांना ट्रेनने आल तर पुना स्टेशनव्रौन एक च गाडी जी की दुपारि अस्ते.सारोळा स्टेशन ला ती पहाटे पहाटे जाते. तिथुन पुढे आम्हाला २-३ किलोमीटर. आम्ही जेव्हा लहन होतो तेव्हा फोन नव्ता त्यामुळे जर घरच्या मंडळी ना आमच पत्र जर वेळेवर पोचल असेल तर मग ते बैल्गाडी घेवुन येणार नाहीतर चालत जाव लागयच. कारण बस ची अजुन सोय नाही. आणी ज्या आहेत त्याही दिवसातुन फक्त २ दा सकळी,संध्याकाळी.त्याही कधी वेळेवर येतील माहीत नाही. अजुन शाळेतील मुले अस्तगाव ते सारोळा हे अटंर सायकल किंवा पायवाट यानेच पुर्ण करतात.
माझ्या गावत तर शाळा पण फक्त ७ वी पर्य्त आहेंअंतर सारोळा १० वी ते १२ वी पर्यत आणी नंतर अहमदनगर ला बस ने तेही कोणाला पुढे शिकण्याची इछा असेल तर. नाहीतर शिक्षन तिथेच बंद.
गावत अजुन ही सगळे जण केद्रात टिव्ही बघायला येतात, ते पण जर लाईट असेल तर आणी फक्त गावतली मडळी च. जे लोक मळ्यात (शेतात) राहतात त्याना तर
नाहीच मिळत बघायला. अजुनही गावत मोजकी २ च किराणा दुकान आहेत. आणी दर आठ्वड्याला बाजर.
डॉकटर ही एकच तोही संध्याकाळी च २-३ तास. एखाद्या दिवशी तोही येत नाही.
तरीही ही लोक अगदी मजेत राहतात.
मला खुप आशर्य वाटत यांच. खुप कमी घरात लाइट च कनेकशन असेल नाहीतर सगळीकडे आकडे टाकुन च लाईट वापरतात.
रोज यांचा दिवस पहटे ४-५ ला सुरु होतो आणी संध्याकाळी ८ वाजता संपतो.
दुसरया दिवशीच्या कामासाठी कारण आपली काम पुढे मागे ढकलु शकतात पण यांची कामे तर ठरलेल्या वेळात यांना पुर्ण करयची असतात.
चला मी ही माझ एक काम पुर्ण केल.
अजुन खुप लिहाय्च आहे, दिनेश दा नलु ताई सारख जमनार नही तरी ही मी
बरया पैकी चांगल प्रयत्न करेन.
खुप काही लिहयच आहे.लवकरच पुढच लिहेन.
चल तर आता पत्र लिहन थांबवते.
चुक भुल झाली असेल तर माफ करा.
पत्र वाचताच reply द्या.
आपली एक गाववाली
मेघा


Bhagya
Monday, March 20, 2006 - 7:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, हा भेदभाव का? बहीण तुला एकच आहे का? माझ्याकडे पण यायला हवे ना?
आणि माझ्या मागच्या ई-मेल चे उत्तर नाहि, आज परत एक लिहिली आहे बघ.
बाकी नलिनी, जे गावाकडच्यांची टर उडवतात ते उडवो. मला तर दिनेशदाने लिहिलेले वर्णन वाचून तुमच्या शेतावर जायची इच्छा होतेय.
इतक्या साध्या आणि निरागस माणसांच्या निष्पाप मनांची साथ मिळायला नशीब हवं ना!


Dineshvs
Monday, March 20, 2006 - 9:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्य, राग समजु शकतो मी, कधी येऊ ते सांग.
काहि फोटो माझ्या बीबीवर पोस्ट केलेत. साईझ कमी केल्याने बरेच डिटेल्स गेलेत. फ़िरभी.


Bhagya
Monday, March 20, 2006 - 11:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, कधी पण ये.
आणि दिवाळीत वर्‍हाडी म्हणून येऊ.....
वा, भरत, आम्हाला पन आवतण दे कि भौ!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators