Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 06, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » कथा कादंबरी » २६ ऑक्टोबर, २००५ » Archive through March 06, 2006 « Previous Next »

Shraddhak
Wednesday, March 01, 2006 - 10:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग १ : दिव्या आणि उदयन

सकाळचे ५.३०

गजर झाल्यावर नेहमीप्रमाणे हात लांबवून तिने तो बंद केला. ही तिची रोजची सवय.... साडे पाचचा गजर लावून ठेवला की पाच पाच मिनिटं snooze करत कधीतरी सहा - सव्वा सहाला नीट जाग येते. मूड असेल तर जॉगिंगला बाहेर पडायचं नाहीतर नाही....
माहीत होतं तरी सवयीने तिने शेजारी नजर टाकली. यूडीची रिकामी जागा..... किती दिवस झाले? किती महिने? आपण मोजायचं सोडून दिलं आहे का? तसं म्हटलं तर थोडा विचार केला तर ते आठवेल. मेमध्ये आपल्या वाढदिवसासाठी म्हणून आई बाबा येऊन गेले त्यानंतर लगेच एक दोन दिवसांत नाही का गेला तो US ला? म्हणजे झाले चार पाच महिने... ऑक्टोबर संपत आला.

सकाळचे ५.४०

आज कंटाळा आलाय. ऑफ़िसमध्ये तसंही फारसं काम नाहीये. त्याच त्या रटाळ मीटिंग्स, conf calls , त्याच जाचक deadlines .... बाहेरचं वातावरणही किती उदासवाणं! ढगाळ... मधून मधून प्रचंड कोसळणारा पाऊस. आज जाऊच नये का ऑफ़िसला? तिने मनातल्या मनात आपल्या आजच्या कामांची लिस्ट तपासून पाहिली. एक internal review meeting आहे पण ती कोणी दुसरंदेखील करू शकेल पूर्ण. तिला तिथे असायची गरज नाही. गरज नाही? खरं तर तशी ती कधीच नव्हती का? नसते का? यूडी एकदा त्रस्त होऊन म्हटला होता, " तुला काय वाटतं तू नसशील तर कोलमडून पडणारे तुझा प्रोजेक्ट? अगं, एक छोटंसं प्रॅक्टिकल करून बघ. त्यांना सांग, तू प्रोजेक्ट सोडतेयस आणि खरंच बदल प्रोजेक्ट... बघ महिन्याभराच्या आत तुझ्यासाठी replacement शोधतात की नाही ते? " तिला हे माहीत नव्हतं असं नाही पण नको वाटायचा तो विचारही तिला... तिचं ऑफ़िस, तिचा प्रोजेक्ट, तिचं काम आणि तिचं करीयर! त्यांना नसेल तिची कदाचित, पण तिला नक्कीच त्यांची गरज होती!

सकाळचे ५.५०

आणि यूडीला तिची गरज होती, तिच्या वेळाची गरज होती, त्याचं काय? हा विचार मनात आला तशी ती अजूनच उदास झाली. आज असं का होतंय? यूडीची आठवण येतेय सारखी उठल्यापासून! आज तो फोन करायची देखील शक्यता नाही... दर दहा पंधरा दिवसांनी कशी आहेस हे विचारायला तो कॉल करतो, नाहीतर त्याचा अगदीच नाही आला तर आपण तरी... तेही जेमतेम पाच मिनिटं बोलून ठेवतो फोन आपण! तिला लग्नाआधीचे आणि काही लग्नानंतरच्या नव्या नवलाईचेही दिवस आठवले. किती बोलायचो आपण? आपल्या संसाराबद्दल, अजून न झालेल्या मुलांबद्दल, एकमेकांच्या मनात असलेल्या काळज्या, टेन्शनसबद्दल, कुठेतरी दूर भटकून येण्याबद्दल! पुढे पुढे संवाद कमी कमी होत गेला की काय आपल्या आणि यूडीमधला?
" दिव्या, किती ते कामाला वाहून घेणं? अगं मीदेखील तुझ्याच क्षेत्रात आहे, hectic काम म्हणजे काय ते समजतं मलादेखील. पण तुझं जे चाललंय नं तो निव्वळ वेडेपणा आहे. आपण दोघं गेल्या महिनाभरात कुठे सहज म्हणूनदेखील बाहेर गेलो नाहीओत. आलंय का ध्यानात तुझ्या? "
तो महिनाच तसा होता. नुकताच सुरु झालेला प्रोजेक्ट, PL असल्यामुळे तिच्यावर असलेलं प्रचंड प्रेशर, १४ x ७ असलं काम करत असलेली ती.... ती काही न बोलता फ़क्त हसली होती. " बस्स एवढाच महिना यूडी... पुढच्या महिन्यात schedule येईल नॉर्मलला. " त्याने फक्त हताशपणे मान हलवली.

सकाळचे ६.१०

शांता येण्याची वेळ झालीय जवळपास. उठावं का आतातरी? कॉफ़ी तरी करावी गरमागरम... तेवढंच बरं वाटेल. ती उठली. उठता उठता शेजारच्या रिकाम्या जागेकडे पुन्हा एकदा लक्ष गेलं तशी आत खोलवर कुठेतरी एक बोचरं दुःख जाणवून गेलं. किचनमध्ये एकीकडे कॉफ़ीची तयारी करता करता तिचे कान डोअरबेलचा कानोसा घेत होते. फोनची बेल वाजली.... आत्ता इतक्या सकाळी कोण असेल? तिला नवल वाटलं. आई बाबा? यूडी????? तिने काहीशा अधीरपणे फोन उचलला.
" आज हमारे एरियामे बहुत पानी भर गया है दीदी. कल रात को तीन बजे घर खाली करना पडा. मै काम पे नही आयेगी अभी चार पाच दिन. दीदी, चलेगा ना? " शांताचा फोन. तिचा रडवेला स्वर जाणवला. घर नाहीसं झाल्याची ती असुरक्षितता!
" ठीक है शांता. और कुछ पैसे वगैरे चाहिये, मदद चाहिये तो आके ले जाना मुझसे. "
शांताने ' बरं ' म्हणून फोन ठेवला. ती काहीशी निराश होत किचनकडे वळली. काही सेकंद वाटलं होतं तिला यूडीचा असेल फोन! पण तो कशाला आत्ता फोन करायला? गेल्याच वीकेंडला केला होता त्याने फोन!

सकाळचे ६.३०

तिने आत येऊन किचनची खिडकी उघडली. थंडगार वार्‍याचा एक झोत सपकन आत शिरला. क्षणभर त्या वार्‍याने शिरशिरी आली तिच्या अंगावर.... असं वातावरण अनुभवून तरी किती दिवस होऊन गेले. एकदा यूडी आणि ती नंदी हिल्सला ऐन जुलैमध्ये जाऊन चिंब भिजले होते... तिला आठवलं.
" तू पांढरा टॉप घातलास हे बरं केलंस. " तो तिच्या कानात खट्याळपणे म्हटला होता. " तो भिजला की सही transparent होतो. "
" शी, नालायक! " ती खोटं खोटं चिडून यूडीला मारायला धावली. यूडीने बराच मार खाऊन घेतल्यावर तिला आपलं जॅकेट घालायला दिलं होतं. त्याच्या परफ़्यूमचा त्याला येत असलेला धुंद करणारा वास.

सकाळचे ७.००

केव्हाची कॉफ़ीचा कप हातात धरून ती तशीच बसलीय. हे लक्षात आल्यावर ती चपापली. आज खूपच हरवल्यासारखं वाटतंय... अगदी रिकामं! आज नेहमीची गडबड, घाई काही काही नाही. तिची ती रोजची धावपळ बघून एकदा यूडीने खस्सदिशी तिचा हात खेचून तिला एका जागी बसवलं होतं. " बैस, जरा दोन मिनिटं स्वस्थ बैस. नाश्तादेखील उभ्या उभ्या खातेयस तू. दहा पंधरा मिनिटं इकडे तिकडे झाली तर काही आभाळ कोसळणार नाहीय तिकडे. "
" यूडी.... काय हे? माझी मीटिंग आहे महत्त्वाची. I am already late.... आणि तुझं काय चाललंय हे? " ती त्याच्यावर चरफडत घराबाहेर पडली होती. आत्ता या क्षणी यूडी असता तर त्याला किती चांगलं वाटलं असतं. त्यानेदेखील लगेच सुट्टी घेतली असती कदाचित! आणि घरी मग निवांत दोघं!

सकाळचे ७.३०

मोबाईल वाजला. सुधांशु मिश्रा! तिचा कलीग....
" दिव्या, हाय... ऐक. आज शक्यतो ऑफ़िसमध्ये येऊ नकोस. होसूर रोड कहर झालाय. मी आलोय तीच चूक केलीय. निघणं मुश्किल आहे ऑफ़िसमधून. " तो भराभर बोलत होता.
" नक्की का सुधांशु? पण काही महत्त्वाचं काम निघालं तर? आणि आजची ती review meeting ? "
"Oh, forget about all that." तो बेफिकिरीने चटकन म्हणाला. " आम्ही दोघं तिघं जण पोचलोय इथे! आम्ही करू मॅनेज. "
" बरं. पण काही मदत लागली तर लगेच कॉल कर. घरीच आहे मी. मोबाईल आणि लॅंडलाईन दोन्ही आहेत accessible."
" ठीक आहे. " त्याने फोन ठेवला. पण एकंदरीत त्याचा सूर पाहता तिच्यावाचून त्यांचं काही अडेलसं वाटत नव्हतं.
"See, I had told you!" अचानक यूडीच्या आवाजात हे ऐकू आल्याचा भास झाला तिला! ती स्वतःशीच हसली.

सकाळचे ८.१५

आंघोळ करावी म्हणून ती जराशी अनिच्छेनेच उठली. गीझर चालू करून ती पुन्हा हॉलमध्ये येऊन बसली. गच्चीचा दरवाजा सकाळपासून एकदाही उघडला गेलेला नाही आज. रोज शांता येऊन, तो दरवाजा उघडून सफाई करून जाते. पडदे देखील उघडले नाहीत आज आपण! तिने चटकन उठून पडदे सरकवले आणि दार उघडून ती गच्चीत येऊन उभी राहिली. पाऊस किंचित थांबला होता. पण गच्चीत पाणी साचून तळं झालं होतं. त्या पाण्यात पाय घालवत नव्हता. जोडीला बोचरा, थंड वारा..... तिच्या गुलाबांनी सुद्धा माना टाकल्या आहेत. तसंही त्यांची काळजी घेणारी शांता आज नाही आली. ती करते म्हणून, नाहीतर आपल्याच हौसेने घेतलेली ही झाडं आपण काही जगवू शकलो नसतो. ' स्वतःहून सांभाळ करायची इच्छा नसेल तर कशाला तो सोस झाडांचा! ' यूडी एकदा खोचकपणे बोलला होता तिला! त्या दिवसांत ' इतक्यात मूल हवं की नको? ' हा विषय होता वादाचा!
" तू म्हणत असशील तर घेऊयात चान्स! " आपण एकदा चिडून, तो वाद संपवायच्या इराद्याने बोललो होतो.
" नको, तुझी इच्छा नसेल, तर राहू दे. ते मूल ना मला सुख देईल आणि तुला तर नाहीच नाही. "
आपल्याला तेव्हा फक्त हायसंच वाटलं होतं. आणि त्यानंतर त्याने तो विषय पुन्हा काढला नाही तेव्हा तर अजूनच!

सकाळचे ९.३०

आज किती दिवसांनी शॉवरखाली मनःसोक्त आंघोळ करावीशी वाटली. नुसता टॉवेल गुंडाळून ती बेडरूममध्ये आली आणि कपाट उघडून एखादा ड्रेस शोधू लागली. कपाट उघडताच यूडीच्या कपड्यांमधून तोच एक चिरपरिचित, वेड लावणारा सुगंध आला त्याच्या परफ़्यूमचा! यूडी त्याचे परफ़्यूम्स सहसा बदलत नाही. गेले कित्येक वर्षं हाच परफ़्यूम वापरतो तो! आणि आपल्याला तो आवडतो हे कळल्यानंतर तो बदलायचे नावही काढले नाहीय त्याने! लव्ह मॅरेज असले की लोक इतक्या छोट्या छोट्या गोष्टींची देखील करतात का काळजी? इतकं जपतात का एकमेकांना? मग पुढे, सगळ्याच गोष्टींना अशी ओहोटी लागत जाते का?
तिने यूडीचा एक टीशर्ट घातला. त्याच्या परफ़्यूमचा सुवास रूममध्ये दरवळल्यासारखा झाला.

सकाळचे ११.००

घर आज कसं शांत शांत आहे. दोन्ही फोनदेखील केव्हापासून मुके पडलेयत. सुधांशु किंवा कोणाचाही काहीही फोन नाही, म्हणजे सगळं काही यथास्थित सुरु आहे तर! चला, बरंच आहे म्हणायचं! या निमित्ताने हे जाणवलं हेही नसे थोडके..... यूडी म्हणाला होता.
कसल्यातरी आवेगाने उठून तिने यूडीचा नंबर फिरवला. आपल्याकडे अकरा... म्हणजे त्याच्याकडे रात्रीचे तितकेच की त्याच्यापेक्षा जास्त? तिला हे calculations अजून चटकन जमत नाहीत.
" हॅलो.... मे आय स्पीक टू उदयन? " त्याचा रूमी आहे फोनवर हे कळल्यावर नाही म्हटलं तरी निराश झाली ती.
"Divya, right? udayan is not in town. कोई मेसेज हो तो बता दो. मै दे दूंगा. "
" नाही काही नाही. असंच फोन केला होता. " तिने फोन ठेवला.
कुठे गेला असेल यूडी? बहुधा मित्रांसोबत बाहेर भटकायला कुठेतरी. त्याला आवडतं. लांबवर कुठेतरी जायचं भटकायला... कधीतरी आपल्यासोबतच बाहेर जायला आवडायचं त्याला. नंतर आपण येत नाहीसं पाहून तोही विषय काढेनासा झाला.

विचारांनी तिला गुंगी आल्यासारखी झाली.

दुपारचे १२.१५

किती वेळ झोपलो आपण! अचानक जागी होत तिने घड्याळ बघितलं. पोटात कावळे ओरडतायत. आळसावल्यासारखी ती स्वयंपाकघरात जाते.
" जगातलं सर्वांत सुंदर दृश्य म्हणजे आपल्या आवडत्या माणसासाठी स्वयंपाकात गढलेली सुंदर स्त्री! "
" ए चले काहीही वाक्यं फेकू नकोस. कामं नकोत करायला आणि... हे घे. मला कांदा दे चिरून! "
" एवढं सुंदर वाक्य सांगितलं म्हणून मला रडण्याची शिक्षा का? अन्याय! अन्याय!! "
" काम कर. आटप. नंतर फरशी पुसून घ्यायचीय तुला... आज शांता येणार नाहीय. "
" आई गं... पायात cramp आला. "
" गपे नाटकी... "

स्वयंपाकघरामधून बाहेर नजर टाकली तर ढग फुटल्यागत पाऊस कोसळताना दिसतो. शांताच्या घराची पार वाट लागली असणार. आधीच तो उताराचा रस्ता... सगळीकडून वाहत येणारं पाणी साठतं तिथे! आपण म्हटलंय तिला गरज पडली तर ये म्हणून!
.... बंगलोरमध्ये अशा समस्या येतील असं वाटलं नव्हतं. म्हणजे दहा बारा वर्षांपूर्वी आलो होतो तेव्हा! शांत, हिरवंगार शहर. अजून हिरवाई आहे बर्‍यापैकी तशीच, पण वाहनं बेसुमार वाढत चाललीयत. सुधांशुचे आभार मानायला हवेत. होसूर रोड या पावसाने भयंकर झाला असणार. एरवीच्या परिस्थितीतदेखील जॅम असतो तिथे! आता तर विचारायलाच नको.

क्रमशः


Shraddhak
Wednesday, March 01, 2006 - 11:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुपारचे १.३०

साग्रसंगीत जेवण बनवायचा कंटाळा आला म्हणून बनवलेला fried rice प्लेटमध्ये वाढून घेऊन ती टीव्हीसमोर येऊन बसली. बातम्यांमध्ये तिला फारसा रस वाटेना. एकसारख्या त्याच बातम्या! पावसाने माजवलेला हाहाःकार... पाण्याखाली गेलेली घरं, आक्रोश करणारे लोक! आपण आत्ता या क्षणी घरात सुरक्षित आहोत. आपलं घर, एवढंच काय खालचं पार्किंगदेखील कोरडं आहे. शांता लढत असेल, अशा सगळ्या संकटांशी आत्ता. ती आणि तिची आई, सीताम्मा. शांताचा दारुडा बाप मेला आणि तिचा थोरला भाऊ कुठल्यातरी फालतू मुलांच्या नादाला लागून घर सोडून पळून गेला. या धामधुमीत शांताचं ठरलेलं लग्न मोडलं.
" तुम्हे दुख नही हुआ शांता? " आपण एकदा न राहवून विचारलं होतं. नाही म्हटलं तरी तिनेही त्या दोन पाच महिन्यांत संसाराची स्वप्नं रंगवली असतील की!
भांडी घासणं थांबवून आपल्याकडे बघत शांता समजूतदारपणे हसली होती.
" दीदी, ये नही तो कोई और जगा हो जायेगी शादी. नसीब था मेरा... टूट गई शादी. परसों अम्मा मठ मे गया था. साधू के दर्शन वास्ते! उन्होने बोला इस साल मे हो जायेगी शादी. "
.... एकदा ह्या सगळ्या गोष्टी नशिबाशी जोडून दिल्या की माणूस सुटतो नाही? अमुक झालं, नशीब... तमुक झालं नाही, नशीब... यूडीशी लग्न झालं, नशीब... आणि यूडीपासून आपण आता दुरावत चाललोय, हेही नशीबच!
ती एकदम चमकली. गेले कित्येक दिवस मनाच्या तळाशी गाडून ठेवलेली भीती हीच आहे का?

दुपारचे ३.३०

वेळ संथपणे सरकतोय. एक प्रकारचं गोठलेपण आलंय सगळीकडेच! फोन, मोबाईल सगळं काही शांत, स्तब्ध... काहीतरी सुचल्यासारखी ती आवेगाने कपाटापाशी गेली. कपाटाच्या तळकप्प्यात लग्नाच्या फोटोंचा अल्बम होता. तिने पहिलं पान उलगडलं. कामाच्या व्यापात हा अल्बमदेखील धडपणे पाहिला नाहीय आपण. पहिल्याच पानावर एकमेकांकडे पाहून हसत असलेले ती आणि यूडी. त्याच्या चेहर्‍यावरचं ते निरागस, प्रसन्न हसू आणि जोडीदार म्हणून तो मिळाला या आनंदाने केवळ फुलून आलेली ती! आणि हे दुसरे दोन तीन अल्बम! नैनितालमध्ये घालवलेला तो जादूई वाटणारा एक आठवडा.... प्रचंड energize झाल्यासारखे बंगलोरला परतलो होतो आपण! घर - ऑफ़िस - घर पुन्हा चक्र सुरु झालं आणि आपण अडकत गेलो त्यातच! आपण काय यूडीदेखील... पण तो आपल्यापेक्षा सजग होता म्हणायचा! आपण काम, करीयर यामध्ये झोकून देत गेलो आणि तो हळूहळू अबोल होत गेला.

दुपारचे ४.५०

बर्‍याच वेळानी जाणवलं की आपण रडतोय. कित्येक महिन्यांनी, कित्येक वर्षांनी.... डोळ्यांतून पाणी वाहतंय! आपला नेमका प्रॉब्लेम तरी काय आहे? करीयर आणि संसार याचा न घालता आलेला ताळमेळ? की आपल्याला नक्की काय हवं आहे हेच नीटसं उमगलेलं नसणं? यूडीला तरी समजू शकलोय का पूर्णपणे आपण? आपल्या संसाराबद्दल काही अपेक्षा होत्या, तशाच त्याच्यादेखील होत्या.... कधी समजून घ्यायचा प्रयत्नच केला नाही आपण! या गोष्टीसाठी वेळ नव्हता की आपण दिलाच नाही? द्यावासा वाटला नाही? आपल्या लेखी ते दुय्यम होतं कदाचित.

संध्याकाळचे ५.४५

पुन्हा एकवार कॉफ़ी घ्यावी, म्हणून ती किचनमध्ये गेली. पाऊस अजूनही वेड्यासारखा कोसळतच होता. शहराची हालहवाल काय आहे हे जाणून घेण्यासाठी तिने रेडिओ सिटी लावलं. सगळ्या रस्त्यांवर हाहाःकार माजला होता. सगळे मुख्य रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. ठिकठिकाणी झालेल्या ट्रॅफ़िक जॅम्स चे सतत updates येत होते.

हातात कॉफीचा कप घेऊन ती बाल्कनीत जाऊन बसून राहिली. किती तर वेळ.... तिच्याही नकळत यूडीची आठवण काढत.....

संध्याकाळचे ७.००

अजून एक दिवस मावळला. आजचा पाऊस हा असाच चालू राहिला असता तर उद्यादेखील ऑफ़िसला पोचणं अशक्यप्राय होतं. तिने सुधांशुला फोन लावला.
" तू उद्याची परिस्थिती पहा आणि मगच ये. " त्याने सल्ला दिला.
" तू कुठे आहेस? "
" एक कुठलातरी आडबाजूचा रोड सापडला आहे. आम्ही लोक त्याने जाण्याचा प्रयत्न करतोय. "
" काळजी घे रे. ठेवते. "
.... थोड्या वेळाने पुन्हा फोन वाजला. आई बाबा!
" ..... "
" हो गं... मी ठीक आहे. गेले नाही ऑफ़िसला. "
" ....... "
" नाही असं वागायला मी इतकी जिवावर उदार झालेय का? "
" ......... "
" भरोसा काय नाही? अगं तेवढं कळतं मला. "
" ....... "
" बरं बाबा, ठेवते. आणि काळजी नका करू. असंच राहिलं उद्या तर उद्याही जाणार नाही ऑफ़िसला. प्रॉमिस. "

.... नंतर यूडीच्या आईबाबांचादेखील येऊन गेला फोन. नुकतेच ते कुठल्याशा गावाहून परतले होते. आणि ही बातमी कळताक्षणी त्यांनी आल्या आल्या तिला फोन लावला होता. त्या दोन फोन्समुळे तिला नाही म्हटलं तरी बरंच बरं वाटलं.

रात्रीचे ८.००

' चला जवळ जवळ संपला अजून एक दिवस! ' म्हणून तिला हायसं वाटल्यासारखं झालं. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. तिच्या मैत्रिणीचा फोन.... तिचा दिवस मस्त गेला होता एकूण. ऑफ़िसला कुणीच जाऊ न शकल्याने तिचं अख्खं कुटुंब घरी होतं.
" अगं अनायासे वेळ मिळाला आणि म्हटलं सगळ्या जुन्या ग्रुपला फोन करावेत. केव्हाची फोन घेऊनच बसलेय मी.... रवी ओरडतोय बघ तिकडून! " तिच्या आवाजातून उत्साह ओसंडून वाहत होता.
" रुपाने जॉब बदलला म्हणे पुन्हा.... "
" अगं वर्षभरातच? "
" बघ ना.... तरी मिळतात तिला मनासारख्या जॉब ऑफ़र्स... लकीय ती. "
".............."
" यूडी केव्हा येणारे गं परत? "
" माहीत नाही. प्रोजेक्ट मेंटेनन्स आहे नं... चालेल बरेच दिवस अजून! "
" तुला कंटाळा आला असेल नं अगदी? "
" हं.... "

... तिचा फोन ठेवल्यानंतर तिला आणखीच उदास व्हायला झालं. कुणाचं आयुष्य कसं तर कुणाचं कसं असतं नाही? आपल्याला हा मोकळा मिळालेला दिवस शिक्षा वाटतोय आणि तिला... तिला मात्र अजून एक दोन दिवस ' अशी ' शिक्षा नक्कीच चालेल. घरच्यांबरोबर आनंदात घालवेल ती तो काळ... आपल्याला मात्र ती कल्पना देखील नको वाटतेय.

रात्रीचे ९.३०

सकाळचाच fried rice उरलेला होता म्हणून आणखी काही करायच्या फंदात न पडता तिने तोच गरम करून वाढून घेतला आणि सोबत काहीतरी अजून म्हणून एक सफरचंद घेऊन ती पुन्हा हॉलमध्ये येऊन बसली. यांत्रिकपणे तिने TV चालू केला आणि चॅनल्स बदलत ती एखादा बरासा टाईमपास शोधायला लागली. तेवढ्यात पुन्हा फोन वाजला. काहीशा अनिच्छेनेच तिने शेजारचा फोन उचलला.

" दिव्या.... "
" यूडी??? " तिच्या आवाजात काहीसा अविश्वास, काहीसा आनंद, काहीशी आश्चर्याची भावना, काहिसं सकाळपासूनच्या depressive feelings चं सावट...
" कशी आहेस? आत्ताच आलो आणि बातम्यांतून कळलं बंगलोरची काय हालत झालीय ते. "
" यूडी.... "
" काय झालं गं? ठीक आहेस ना तू? " तिची मनःस्थिती कळायला त्याला दोन सेकंदही लागले नाहीत. " आज गेली नव्हतीस ना ऑफ़िसला? मी पाच मिनिटं प्रचंड घाबरलो होतो. तू हट्ट करून गेली असशील आणि अडकली असशील तर.... होसूर रोडच्या तिथे कुणीतरी वाहून देखील गेला म्हणे! "
" हं... "
" काय झालं दिव्या? बरं वाटत नाहीये का? "
" यूडी.... " आणि इतके दिवस तिने त्याला न विचारलेला, टाळलेला प्रश्न आत्ता विचारला. " तू परत कधी येतोयस? "

........ तासाभरानंतर झोपायला जाताना तिच्या मनातली सगळी अस्वस्थता जणू संपली होती. ' यूडी, आजचा दिवस डायरीत लिहून ठेवायला हवा, नाही? एकमेकांपासून दूर दूर जायला लागलेल्या आपण पुन्हा एकदा एकमेकांच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली तो दिवस म्हणून....... '
.... बाहेर अजूनही पाऊस अविरत कोसळत होता.

क्रमशः


Psg
Thursday, March 02, 2006 - 2:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र, किती छान लिहितेस ग.. आणि नेमक!! खूप आवडल!! लिहत रहा..

Shraddhak
Thursday, March 02, 2006 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग २ : सुदेश आणि राधा

सकाळचे ५.३०

मी हळूच डोळे किलकिले करून इकडे तिकडे बघतो. राधाची आसपास चाहूल लागत नाहीय म्हणजे उठली असेल. तिला बरी लौकर जाग येते रोज! मी तिला चिडवतो देखील... " म्हातार्‍या माणसांना झोप कमी असते म्हणून! " स्वयंपाकघराच्या दिशेने कपबशांचा किणकिणाट ऐकू येतो. वा! आज आमच्यासाठी बेड टी आहे वाटतं. ' दात न घासता घेत जाऊ नकोस रे चहा... कसल्या सवयी ह्या! ' रागावलेली असली आणि तिच्या मनाविरुद्ध बेड टी मागितला की राधा हटकून हे वाक्य बोलते. पण आज ऍनिवर्सरी म्हणून खास सूट दिसते. बरंय!
मी डोक्यावरून ब्लॅंकेट पुन्हा ओढून घेऊन पडून राहतो. राधाची चाहूल घेत.

सकाळचे ५.४०

अपेक्षेप्रमाणे ती आलीच!
" उठ रे... ए... सुदेश. उठ.... " तिने मला उठवायचा आटापिटा सुरु केला. थोडा वेळ तसाच गेल्यावर मी हळूच ब्लॅंकेट बाजूला करून तिच्याकडे बघितलं. बापरे! बाईसाहेबांची आंघोळ देखील झालेली दिसतेय.
" नाटक करत होतास नं? " बेडवर माझ्या शेजारी बसून तिने विचारलं. उत्तरादाखल मी तिला जवळ ओढलं.
" सकाळी सकाळी वाह्यातपणा नको. आधी चहासोबत दोन चार बिस्कीटं खाऊन घे. काल काय ओरडत होतास त्या ट्रॅव्हल एजन्सीवाल्यावर! आता गेले दोन दिवस वेड्यासारखा पाऊस पडतोय ही त्याची चूक आहे का? आणि आपण तरी इतक्या पावसाचे कुठे भटकायला जाणार आहोत? बाकी त्यानंतर ते जे काही न जेवता झोपलास.... कमाल आहे! अरे आता पन्नाशी आली तुझी. जपायला हवं प्रकृतीला. "
" मला काही धाड होत नाही. अगं पन्नाशीला आलो तरी अजून कसा हॅंडसम आहे बघ. नाहीतर तू, वयोमानाप्रमाणे झोप काय कमी झालीय, पावसात बाहेर जायला नको काय वाटतंय.... अगदी आजीबाई! "
" बरं तू आधी काहीतरी खा. नाहीतर तुला ऍसिडिटी व्हायची, मग दिवसभर कुरकुर करत राहशील. "
चहाच्या कपामध्ये बिस्कीट बुडवत मी तिला म्हटलं...
" खरं सांग राधा, राग नाही आला तुला? आपल्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस. आपला एवढा ठरलेला मस्त प्लॅन आणि ऐनवेळी हा पाऊस..... "
उत्तरादाखल ती फक्त समजूतदार हसली. ' ते काय आपल्या हातात आहे का? ' तिने न म्हटलेलं वाक्य मला स्पष्ट ऐकू आलं.

सकाळचे ५.५०

" आपलं लग्न झालं तेव्हा तू काय म्हणायचास ते नाही का आठवत तुला? " ती माझ्याकडे मिष्कीलपणे बघत म्हणाली. मलाही ते आठवल्यावर हसू फुटलं.
" खरंय. अशा प्रसंगाना हिलस्टेशन कशाला? बाहेर पडायचंच नसलं तर.... गुड! म्हणजे आत्ताही तसंच काहीसं करावं अशी अपेक्षा आहे का तुझी? सहीच! " उत्तरादाखल तिने माझ्या पाठीत एक धपका घातला.
" जरा प्रौढ माणसासारखा वागायला शीक पाहू आता. "
" त्याने काय होणारे? तुझ्यासारखा म्हातारा होईन मी मग.... आजोबा टाईप! "
खरं तर हे उगीच चिडवायचं म्हणून.... पन्नाशीतदेखील राधा केवळ तिशी पस्तिशीची दिसते. आमच्या संसारातल्या अनेक चढ उतारांचा, संकटांना तोंड दिल्याच्या कुठल्याच खुणा राधावर नाहीत. ती तशीच आहे... टवटवीत फुलासारखी!
" तू तश्शीच आहेस राधे अजून! " मी तिला जवळ घेत पुटपुटलो. तिच्या ओल्या केसांमधून येणार्‍या सुगंधाने मला धुंदावल्यासारखं झालं.

..... तेवढ्यात फोनची बेल वाजली. "#!@#!##!@##!" फोन करणार्‍याला मी एक जबरदस्त शिवी घातली.

सकाळचे ६.१०

" गपे, आपल्या मुलीच असतील. शिव्या काय देतोस? "
" कळत नाही का त्यांना आई बापाला आजतरी disturb करू नये म्हणून? " माझा प्रश्न अनुत्तरित सोडून राधा लगबगीने फोन घ्यायला गेली. मी निमूटपणे समोरचा चहा संपवू लागलो. बाहेरून राधाचं बोलणं ऐकू येत होतं.
" ........ "
" थॅन्क्स बेटा.... "
" ...... "
" अगं हो जाणार होतो. पण पावसाबद्दल ऐकलंत ना तुम्ही? सगळ्या टूर्स कॅन्सल झाल्या आहेत म्हणे! "
" ...... "
" अगं घरातून देखील बाहेर पाय टाकवत नाहीये. "
" ....... "
" कसलं बाहेर डिनर गं बाई? घरातच आहोत आम्ही. "
" ......... "
" बाबा झोपलेत. पण त्यांनाही सांगते. ठेवते. काळजी घ्या गं दोघीजणी. "
राधा पुन्हा आतमध्ये येऊन बसली. पाहता पाहता चांगला पंचवीस वर्षांचा काळ गेला. मागे वळून बघितलं तर सगळ्या स्वप्नातल्या गोष्टी वाटतात आता. राधाला भेटल्यापासून तो आम्ही लग्न करेपर्यंतचा काळ... कॉलेजमधले ते न विसरता येण्याजोगे दिवस!

सकाळचे ६.३०

" खरंच वाटत नाही रे! बघता बघता पंचवीस वर्षं उलटून गेली. "
" हं... "
" आपल्या दोघांच्या आई बाबांनी किती निक्षून विरोध केला होता लग्नाला! आठवतंय का? "
" माझ्या आई बाबांचं म्हणणं... एवढी ऐश्वर्यात लोळणारी मुलगी आमच्या घराशी कशी जुळवून घेऊ शकेल म्हणून? "
" माझ्याही आई बाबांचं तेच म्हणणं.... जमेल का मला तुझ्या परिस्थितीशी जुळवून घेणं.. "
" पण तू जमवलंस राधे... तुझ्याशिवाय कुणाला नसतं जमलं ते! "
" पुरे पुरे... माझी स्तुती पुरे झाली आता. " राधाच्या चेहर्‍यावर तेच प्रसन्न हसू उमटलं.
" नंतर पण तुझ्या आई बाबांचा तुला सोडून माझ्यावर कसला जबरदस्त विश्वास बसला होता आठवतंय ना? तू बंगलोरला येऊन चक्क UB साठी काम करतोयस ऐकल्यानंतर बाबांनी मला एकदा ' मी तुला कधीही दारू वगैरेची सवय लागू देणार नाही. ' असं वचन द्यायला लावलं होतं. आणि तू एकदा वैतागून त्यांना काय म्हणाला होतास आठवतंय का?
" हो... खि खि खि.... बाबा, अहो मी हातभट्टीवर मजूर म्हणून नाही जातेय.... "
" तो सीनच धमाल होता हं एकूण. दरवाजाशी उभ्या कमालीच्या गोंधळलेल्या आई, त्यांच्यामागे हसू आवरून उभी असलेली मी.. आणि सोफ्यावर समोरासमोर युद्धाच्या पवित्र्यात बसलेले तू आणि बाबा... "
" शेवटी तुझ्यावर विश्वास ठेवूनच त्यांनी परवानगी दिली आठवतंय? "
" हं.... "
" मग आता माझ्या पद्धतीने तुला ' थॅंक्स ' म्हणू का पुन्हा एकदा? "
" झाला का तुझा चावटपणा सुरु पुन्हा.... " राधा डोळे मोठे करत म्हणाली.

सकाळचे ७.००

" राधा, पेपर आला का? "
राधा स्वयंपाकघरातच काहीतरी करत होती; तिने तिथूनच ओरडून सांगितलं.
" सुदेश, बेडरुमची खिडकी उघड आणि बाहेर डोकाव एकदा. कसला भयंकर पाऊस म्हणायचा हा. त्यामुळे पेपर बिपर इल्ला. TV बघ ताज्या बातम्या हव्या असतील तर... "
.... मी काहीशा कुतुहलाने खिडकी उघडली. बापरे! काहीच्या काही हैदोस घातला होता पावसाने! सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. बरं झालं, गाडी विन्याच्या अपार्टमेंट कॉंप्लेक्स मध्ये लावून आलो कालच ते! आपल्या पार्किंगमध्ये पाणी शिरलंच असेल बहुधा.....
राधा मागे येऊन उभी राहिल्याची चाहूल लागली म्हणून मी वळून बघितलं.
" या वर्षी सगळीकडेच आहे नै असली परिस्थिती? "
" हं... "
" आणि असल्या पावसात तू बाहेर भटकणार होतास का? "
" अगं त्यात काय... पाणी चढलं असतं अजून... तर मी तुला अस्सं अलगद उचलून घेतलं असतं. आणि... पुन्हा पन्नास वर्षं, पन्नास वर्षं करू नकोस. जितेंद्र माहिताय ना... तो साठीचा झाला तरी कसला बेफाम डान्स करायचा हिरॉइन्स बरोबर. "
मी राधाला खरोखरच उचलून घेत म्हणालो.

सकाळचे ७.३०

" राधा, भूक लागलीय... नाश्त्याला काय आहे? "
" काल रात्री मी सांगितलं होतं जेवू नकोस म्हणून? "
" चुकलो, माझे आई.... खायला दे काहीतरी. "
" पुन्हा असं करशील का? "
" गपे, लहान मुलांना धाक घालतात तसा नको घालूस मला... ए पण काय आहे नाश्त्याला? "
" बटाटा आणि चीजचं सॅंडविच.... "
" आणि अजून? "
" अजूनही आहे बरंच... एक पाच मिनिटांत तुला हाक मारते. "
" आणि सॅंडविचमध्ये चीज थोऽऽऽडं जास्त घाल नं प्लीज... आजच्याच दिवस. "
राधा खळखळून हसली.
" बरं.... "


Shraddhak
Thursday, March 02, 2006 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सकाळचे ८.१५
टेबल अगदी मनासारखं लागलं होतं. वा! माझ्या आवडीचे सॅंडविच, सुरळीच्या वड्या, कॉफ़ी...
" आता खा शांतपणे आणि एक दीड पर्यंत जरा भूक भूक करू नकोस. आजचा स्पेशल मेन्यू बनवायला वेळ लागणारे मला..... "
" बरं... "
" बाकीचे सॅंडविच बनवून ठेवतेय. ते लागले तर गरम करून खा. " तिच्या चेहर्‍यावर पुन्हा मिष्कील हसू फुटलं. " तू बरं म्हटलास म्हणून ते लगेच खरं मानेन मी असं वाटलं की काय तुला? अरे आता पंचवीस वर्षं झाली... खरं तर त्याहून जास्तच! "
" हो... पंचवीस पेक्षा जास्त, एकमेकांची ओळख झाली त्याला.... पण खरी ओळख केव्हा पटली बरं? "
" ए ऐक ना.... एक गम्मत! " राधा लहान मुलीच्या उत्साहाने म्हणाली. " आज या लग्नाच्या वाढदिवसाला आपण एक करायचं. आत्तापर्यंत जपलेलं एखादं गुपित असेल, काही कन्फेस करायचं असेल ते एकमेकांना सांगायचं. "
" गप गं... काहीतरीच काय? एकमेकांपासून लपवलेलं एखादं गुपित आहे तरी का आता? आणि असलं तरी त्याचं आता काय? "
" असेल... जरा नीट आठवून बघ... जऽऽऽरा प्रयत्न कर... बरं आधी मी सांगते. सांगू? "
" हं... "
" आपलं लग्न ठरलं त्यानंतर अगदी सीमांतपूजनाच्या दिवशी मला सकाळी सकाळी प्रचंड टेन्शन आलं. तुझ्याशी, तुझ्या परिस्थितीशी जुळवून घेणं खरंच कठीण वाटायला लागलं. तुला लग्नाचं विचारलं हीच चूक केली असं वाटायला लागलं. खरं तर लगेच मी आई कडे रडत रडत गेलेही होते, काहीही करा आणि हे लग्न मोडा म्हणून!

नंतर आपला संसार सुरु झाला आणि तुझ्यासोबत प्रत्येक दिवस भरभरून जगताना कुठेतरी त्या दिवशी केलेल्या आततायीपणाची लाज वाटली. खरं तर तुला हे कधी सांगायचं नाही असं ठरवलं होतं. पण आज कबूल केलं एवढंच. फक्त त्याच क्षणी तुझ्यापासून दूर झालं तर बरं असं तीव्रतेनं वाटलं होतं खरं.... "
" हात्तेरेकी... एवढंच ना! मला वाटलं सांगशील, आधी कुणी वेगळाच boyfriend होता आणि त्याच्याशी लग्न करता आलं नाही वगैरे... "
" ए गपे... आणि आता तू सांग चल चटकन. आठवलं का? "
.... खरं तर तिने विषय काढला तेव्हाच ते सगळं आठवलं होतं. आज पंचवीस वर्षांनी राधेची प्रतिक्रिया काय असेल त्यावर? प्रचंड sensitive आहे ती... तिने जर मनाला लावून घेतलं तर? तरीदेखील सांगायचं ठरवलं मी...
" राधा तुला आठवतं, तू मला माझ्यावरच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतरचा काळ? "
" हो चांगलाच आठवतो... तू जवळ जवळ एक महिना लावला होतास ' हो ' म्हणायला.... "
" त्याचं कारण कधी जाणून घेण्याचा विचार आला नाही तुझ्या मनात? "
" सांगितलं होतंस की तू! तुझ्या माझ्यातली आर्थिक तफावत, मी तुझ्यासोबत व्यवस्थित आयुष्य घालवू शकेन की नाही याबद्दल तुला वाटणारी शंका, इत्यादी, इत्यादी. "
" नाही ही फक्त एक बाजू झाली तुला माहीत असलेली... "
" मग आणखी काय? "
" तुला रमा आठवते? आपल्याच ग्रुपमधली... भयंकर महत्त्वाकांक्षी, सर्वांत लोकप्रिय, सुंदर.... "
" हो चांगली आठवते. मग तिचं काय? "
" माझं प्रेम होतं रमावर............. " राधाचा चेहरा बदलेला जाणवला मला... एका क्षणात!
" तू जेव्हा विचारलंस मला लग्नाविषयी तेव्हा रमामध्ये खूप गुंतलो होतो मी! तिलाही मी आवडायचो पण लग्न वगैरे नको होतं तिला तेव्हा लगेचच! इकडे घरून सगळं काही वेळेत उरकून घे, म्हणून प्रेशर होतं सारखं. त्यातून तूही विचारलंस. मी चांगलाच कात्रीत सापडलो होतो. तो पूर्ण महिना मी रमाला समजावण्यात काढला. पण ती आपल्या निश्चयावर ठाम होती. तिला उच्च शिक्षणासाठी म्हणून UK वगैरे ठिकाणी जायचं होतं. तेवढा काळ मला घरच्यांनी थांबू दिलं नसतं.
तेव्हा तुला ' हो ' म्हणायचं ठरवलं मी! भयंकर स्वार्थी मनाने निर्णय घेतला होता मी... रमा तर नव्हती, त्यानंतर second best choice तूच होतीस. खरंच सांगतो, अगदी आपलं लग्न होऊन दोन तीन महिने झाल्यावर देखील त्यात माझी भावनिक गुंतवणूक काहीच नव्हती.
पण हळूहळू तुझ्या त्या प्रेमाने सगळं चित्र बदललं राधे... नंतर रमा मनातून कायमची निघून गेली. आणि आता तर माझ्या मनात कुणी दुसरी व्यक्ती होती तुझ्याशिवाय हेदेखील खरं वाटत नाही माझं मलाच!
तुला सांगणार नव्हतो गं... चुकूनदेखील सांगणार नव्हतो. तुझं मन दुखवलं गेलं तर स्वतःला माफ करू शकणार नव्हतो मी! पण आज तू हे कन्फेशनचं काढलंस.......... "
.... माझं बोलणं अर्ध्यावरच राहिलं. राधा एक शब्दही न बोलता उठून गेली होती.

सकाळचे ९.३०

बराच वेळ होऊन गेलाय. राधा बेडरुममध्ये बसलीय केव्हाची! रडत नसावी कारण काही आवाज तर येत नाहीय. तिला जाऊन समजवावं असं वाटतंय, पण धीर होत नाहीय. देवा... का बोलून टाकलं मी हे? हा भूतकाळ उकरून काढायची मला काही गरज होती का?

दार उघडंच आहे बेडरुमचं! जावं का राधाजवळ? पण समजवणार तरी काय तिला? ज्या विश्वासाने तिने माझा हात धरला होता, त्या विश्वासाला मी तेव्हा पात्र नव्हतो? एखाद्या कळसूत्री भावल्यासारखा जे ती म्हणेल ते करत होतो? मी माझ्यामध्ये इतकी गुंतली असताना माझी भावनिक गुंतवणूक काहीच नव्हती?

पण राधे हे देखील खरंय की तुझ्यासोबतीने एकदा वाटचाल सुरु झाल्यावर हे सगळे mental blocks सहजगत्या नाहीसे होऊन गेले. माझी राधा माझ्या आयुष्याचा, मनाचा एक अविभाज्य भाग बनून गेली.


Shraddhak
Thursday, March 02, 2006 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सकाळचे ११.००
राधा बेडरुममधून बाहेर येऊन किचनमध्ये गेली. चेहरा बराच शांत दिसतोय; पण राधेचं काही सांगता येत नाही. कठीण प्रसंगांतदेखील चेहरा सहज ठेवणं, कुणीही शिकावं राधाकडून! राधे, रागवलीस का माझ्यावर? तसं असेल तर मला सांग गं, पण अशी गप्प राहू नकोस. तुझं असं गप्प बसणं मला सहन नाही होतंय, राधा.
किचनमधून कसले कसले खमंग वास येऊ लागले होते. एरवी एव्हाना माझ्या किचनमध्ये दहा तरी चकरा व्हायच्या, पण आज नाही जाववत आहे तिथे! भूकच मेल्यासारखी झालीय.
मी शांतपणे बाल्कनीत येऊन उभा राहिलो. प्रचंड कोसळतोय पाऊस, जोडीला भयाण वाहणारा वारा. उदास, राखाडी रंगाचं आभाळ... एरवीची वेळ असती तर कुठेतरी निघून तरी गेलो असतो मनातलं वादळ शांत होईपर्यंत. राधाशी पुन्हा बोलायची हिंमत येईपर्यंत.... तिच्यापासून दूर कुठेतरी!
एकाएकी आमचा तो ३५०० स्क्वेअर फुटांचा फ़्लॅट मला छोटा वाटायला लागला.

दुपारचे १२.१५

बाप रे! किती वेळ झोपलो होतो मी? मघाशी बेडरुममध्ये येऊन विचार करत पडलो होतो आणि डोळा लागला. असंच पडून रहावं का? राधाला पुन्हा सामोरं जाण्याची ताकद माझ्यामध्ये आत्ता या क्षणी तरी नाही.
राधा, इतकी वर्षं जसं समजून घेतलंस मला तसंच आत्ताही घे ना! किंवा सांग तरी तुला काय वाटतंय?

.......... मी नुसता आढ्याकडे पाहत तसाच पडून राहिलो.

दुपारचे १.३०

" सुदेश, उठ. जेवायला चल. " किती तरी वेळानंतर आलेला तो राधेचा आवाज! मला थोडंसं बरं वाटलं. पण त्या आवाजात ते प्रेम कुठेच नाहीय उरलेलं एकाएकी. ही माझी कल्पना की सत्यस्थिती? काही कळेनासं झालंय.
मी निमूटपणे जाऊन पानावर बसलो. माझ्या आवडीचे सगळे पदार्थ केले होते तिने! मला एक घासही जाईना पण जेवणाचा...
" राधा.... "
" प्लीज सुदेश... आपण नंतर बोलूयात का यावर? " तिचा तो एकच प्रश्न पण मला पुढे काहीच बोलण्याचं धैर्य झालं नाही.
कसा बसा येऊन मी बेडरूममध्ये पडून राहिलो. काय होणार आहे माझं आता? माझ्या नशिबी राधाला गमावणं आहे की काय?

दुपारचे ३.३०
दुपारी पुन्हा पोरींचा फोन आला. यावेळेस मी फोन घेतला. देवा! किती कठीण आहे आवाजात सहजपणा आणणं....
" ........ "
" थॅंक्स बेटा. कशा आहात तुम्ही दोघी? "
" ......... "
" कुठली गिफ्ट तुमची? नाही मिळाली अजून! "
"............."
" अगं हो हो.... मिळेल. पावसामुळे डिले झालं असेल बघ. "
"............ "
" बरं बरं सांगतो आईला. तुमचं सगळं व्यवस्थित चालूय नं? बरं ठेवतो. "

मला वाटलं राधा आता तरी ' काय म्हणत होत्या माझ्या पोरी? ' म्हणून विचारेल. पण तिने दुर्लक्ष केलं.

दुपारचे ४.५०
" सुदेश, चल. चहा झालाय. " राधाच्या हाकेने मी दचकून भानावर आलो. केव्हाचा इथे मी हॉलमध्ये खिडकीपाशी बसून बाहेरचा पाऊस बघतोय. त्या सततच्या मार्‍याने सगळं काही थिजल्यासारखं झालंय. का हा पाऊस मला माझ्या मनःस्थितीचं प्रतिबिंब दाखवतोय?
मी आज्ञाधारकपणे येऊन बसलो चहा घेण्यासाठी. एवढी मनात खळबळ माजलेली असूनदेखील राधाने तिच्या रोजच्या रूटीनमध्ये जरादेखील फरक केलेला नाही. सगळं काही वरवर पाहता तसंच चाललंय, सुरळित... पण काहीतरी हरवलंय. राधाचा आवाज!

" सुदेश.... " तिच्या आवाजातल्या त्या वेदनेमुळे मी एकदम चमकलो. " का सांगितलंस तू हे मला? " राधा हमसाहमशी रडत होती.

संध्याकाळचे ५.४५

" का? "
" मला नाही माहीत राधे... तुझ्यापासून लपवून ठेवलेली ही एकच गोष्ट होती. जाणून बुजून नव्हे तर तिचे सारे संदर्भ पुसट झाल्यामुळे. माझं आणि रमाचं नातं केव्हाच भूतकाळात जमा झालंय, या क्षणाला माझ्या मनात आणिक कोणीच नाही ही वस्तुस्थिती आहे. त्या काळी मी जसा वागलो त्याची बोचही आता जाणवेनाशी झाली होती, म्हणून फक्त म्हणूनच राधे... नाही सांगितलं हे आजपर्यंत. "
" आपण जेव्हा सप्तपदी चालत होतो, तेव्हा तू नव्हतासच तिथे मनाने... माझ्या गळ्यात जेव्हा तू मंगळसूत्र बांधत होतास तेव्हा आनंदाने मोहरले होते मी पण ते बंधन जाचत होतं तुला.... आणि नंतर आपण उटीला गेलो तेव्हा.... " राधेला हुंदका अनावर झाला. " तेव्हा मनाने आणि शरीरानेदेखील तुझ्याशी एकरुप झाले होते मी आणि तू केवळ....... "
.... राधेचे डोळे भरभरून वाहत होते. तिला जवळ घेऊन शांत करायची हिंमत उरली नव्हती माझ्यात. बेडरुममध्ये येऊन मी बेडवर अंग टाकलं. केव्हातरी झोपी गेलो.


Shraddhak
Thursday, March 02, 2006 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संध्याकाळचे ७.००

" सुदेश........ "
तोच मृदू, संयत आवाज............ राधा!

" झाली का झोप? " राधाने अलगद माझ्या केसांतून हात फिरवला.
" राधा...... नाराज नाहीस नं अजूनदेखील? मला सोडून जाणार नाहीस नं? सहन नाही होतंय गं ती कल्पनादेखील. राधा.... "
" श्शू... गप. उठ आधी आणि काहीतरी खाऊन घे. नीट जेवला नाहीयेस तू सकाळी. चल. "
मी तिच्यामागोमाग किचनमध्ये आलो. राधाने सकाळचं सगळं अन्न पुन्हा गरम करून वाढलं होतं.
" राधा... "
" आधी स्वस्थ जेव पाहू तू. नंतर काय ते बोलू. जेव. " ती माझ्या जवळ बसून राहिली. चेहर्‍यावर तेच आश्वासक हसू फुललं होतं तिच्या!

रात्रीचे ८.००

" राधा, सोडून जाणार नाहीस ना गं मला? " माझ्या नकळत माझा आवाज कातर झाला होता.
" आला होता एक क्षणभर विचार.... इतकी मोठी फसवणूक, माझ्या प्रेमाचा इतका मोठा अपमान! एका क्षणी वाटलं द्यावं सोडून हे सगळं इथंच आणि निघून जावं दूर कुठेतरी.
पण एक सांगू सुदेश, माणूस जसा वयाने, अनुभवाने वाढतो ना तशी तशी त्याची दुसर्‍याला accept करायची क्षमता वाढते. काही वर्षांपूर्वी काही गोष्टी प्रचंड महत्त्वाच्या वाटत असतात त्या तशा वाटेनाशा होतात. मी तुझी उलट आभारी आहे की तू हे मला आपल्या लग्नानंतर लगेच कळू दिलं नाहीस. कदाचित नुकतंच उमलू पाहत असलेलं आपलं नातं तुटलं असतं या धक्क्याने! पण आज परिस्थिती वेगळी आहे, तू आणि मी देखील बदलेलो आहोत.

फक्त एक गोष्ट कायम आहे.......... पंचवीस वर्षांपूर्वी जसा हवा होतास तसाच तू आजही मला तितकाच हवा आहेस... तुझ्या मर्यांदांसकट, तुझ्या सगळ्या भल्याबुर्‍या गोष्टींसकट......... so, be calm and be happy . "

रात्रीचे ९.३०

" घाल नं तो ड्रेस... छान दिसेल तुला.... "
" अरे आत्ता कुठे जाणार आहोत का आपण? "
" तरी काय झालं? घाल.... मगच माझी गिफ्ट देईन. "
" काय आणलं आहेस? " तिच्या आवाजात तीच निरागस उत्सुकता.
" तू आधी ड्रेस घाल. "

......... त्या गर्द निळ्या ड्रेसमध्ये राधा खरोखर अप्रतिम सुंदर दिसतेय. मी अलगद तिच्या बोटांत हिर्‍याची एक अंगठी चढवली. २६ ऑक्टोबर, २००५. ही ऍनिव्हर्सरी कधी विसरणार नाही मी.
" तेव्हा तू विचारलंस म्हणून माझं विचारायचं राहून गेलं. ते आज विचारतो, पुढचे जन्म जर असतील तर माझी बायको व्हायला आवडेल तुला, राधा? "
राधा काही बोलणार इतक्यात पुन्हा फोनची बेल वाजली. " मुली.... " राधा पळाली चटकन!
" फटके द्यायला हवेत कार्ट्यांना........ राधा घेऊ नकोस फोन! "
राधाचं तेच खळाळतं हसू घरभर घुमत राहिलं.

क्रमशः


Meenu
Thursday, March 02, 2006 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती सुंदर लिहिता येतं गं तूला! खरच खूप छान वाटतयं वाचताना

Rajasee
Thursday, March 02, 2006 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shraddhaa, chhhan lihite aahes pudhache vachaychi utsukata aahe. where are u? i tried reaching u but i think ur no. is not working now. I m back.

Somesh
Thursday, March 02, 2006 - 7:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा...!! खरच!! खुप छान.. मजा आली वाचुन...
लेखन शैली छानच..


Ninavi
Thursday, March 02, 2006 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, सुंदरच गं.
... ... ...


Shriramb
Thursday, March 02, 2006 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वाह!
श्रद्धा, तुझी शैली खूपच ओघवती आणि चित्रदर्शी की काय म्हणतात तशी आहे!
मी सीरीयसली सांगतोय की तू चांगल्या पटकथा लिहू शकशील. :-)


Maanus
Thursday, March 02, 2006 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त लिहीले आहेस. !!!

Pama
Thursday, March 02, 2006 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा श्रद्धा..सुरेखच.. excellent!! ..

Megha16
Thursday, March 02, 2006 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा,
एकदम सही यार....
खुप च छान लिहल आहेस तु.
मेघा


Sashal
Thursday, March 02, 2006 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रध्दा मस्त लिहीते आहेस पण फ़क्त एखाद दोन ठिकाणी काळ ( क्रियापदांचा tense ) जूळत नाहिये असं वाटलं ..

Manuswini
Thursday, March 02, 2006 - 8:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

interesting पण ह्या दोन कथाच काही connection आहे का?

वाट बघतेय..


Kandapohe
Thursday, March 02, 2006 - 9:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समाप्तचा बोर्ड लागला की कुणीतरी मला कळवा म्हणजे वाचता येईल. :-)

Rupali_rahul
Friday, March 03, 2006 - 2:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्ध नेहमीप्रमाणे सहिच. ईतक समर्पक, अचुक वर्णन कस जमत तुला...

Ek_mulagi
Friday, March 03, 2006 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान ग श्रध्दा, खुपच छान जमलय.

Manuswini
Friday, March 03, 2006 - 9:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे यार श्रद्धा लिहि ना पुढे

किति ताणायची ती...

राहवले नाही म्हणून ही अशी मागणी

रोज रोज तासाला check करते..
काय बरे असेल ह्या कथेत


Shyamli
Saturday, March 04, 2006 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र लिही ना पुढे....
राहवत नाहिये ग.......


Neelu_n
Saturday, March 04, 2006 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा मस्तच आहेत कथा.
बेंगलोरला पडणार्‍या तुफान पावसाच्या पार्श्वभुमीवर वेगवेगळ्या घरातील नातेसंबंधातील चित्रण एकदम छान केलयस. तु बेंगलोरला असते ना? पावसाचे खुप डिटेल्स तुझे स्वतःचे अनुभव आहेत असे वाटले:-)
पुढे टाक लवकर



Shraddhak
Monday, March 06, 2006 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग ३ : वरुण

सकाळचे ५.३०
किचनमधला लाईट लागलेला पाहिला आणि मी चमकलो. मॉम उठली की काय? इतक्या लौकर? मला लगेच आठवलं डॅड परत येताहेत आज... जवळ जवळ अडीच वर्षांनी. मॉम बहुधा एअरपोर्टवर जात असणारे. येतील की ते घरी सरळ! हिला काय गरज आहे एअरपोर्टवर जायची देव जाणे! उगीचच वैताग... बाहेर पाऊसही चाललाय!

बापरे! नाहीतर ही मलाच म्हणेल तू पण चल सोबत म्हणून! श्या, तिथे वाट पहात राहायचं म्हणजे PITA ! त्यातून डॅड काही लहान नाहीयेत. टॅक्सी घेतील नि येतील.

सकाळचे ५.४०

तेवढ्यात ती माझ्या रूममध्ये आलीच! श्या... हजार वेळा सांगितलंय की माझ्या रूममध्ये अशी नॉक न करता घुसत जाऊ नकोस म्हणून! काय ते जुन्या वेळी होतं तसं वागायचं? प्रायव्हसी नाही मला घरातच. सॅमच्या घरात तर त्याची कामवालीदेखील त्याने परमिशन नाही दिली तर झाडू मारत नाही त्याच्या रूमला.... आणि त्याचे पेरेंट्स अजिबात पाय टाकत नाहीत त्याच्या खोलीत!
" वरुण, उठ ना रे. चलतोस का माझ्याबरोबर? चल, आज डॅड येताहेत. त्यांना किती आनंद होईल तुला एअरपोर्टवर पाहून! "
मी फक्त कूस वळवली. इतका पाऊस पडतोय बाहेर.. कोण बाहेर जाईल अशावेळी?
" नको तू जा. आणि आज मी स्कूल पण बंक मारणारेय. एवढ्या पावसात मला शौक नाही बाहेर जायचा! " मी ब्लॅंकेट पुन्हा डोक्यावरून ओढून घेतलं.
" अरे मला काय हौस आहे म्हणून जातेय का? अडीच वर्षांनी परत येतोय सुनीत.... त्याला बरं वाटेल रे आपण त्याला receive करायला गेलो तर.... "
" तू जा..... मी घरीच थांबणारे. "
माझ्याशी वाद न घालता निघून गेली ती!

सकाळचे ५.५०
खरं तर मॉमसाठी म्हणून जाईनदेखील मी तिच्यासोबत! पण डॅडना रिसिव्ह करायला कशाला जायचं? ते काय करतात आमच्यासाठी? गेले दोन वर्षं US मध्ये मजा करत होते. नुसते डॉलर्स पाठवतात मॉमला... मला काही कमी पडू देऊ नको म्हणतात. माझी आठवण येते तरी का देव जाणे! नुसते नाटकं... मॉम पण जरा चक्रमच आहे. शंभरदा फोनवर रडायची डॅड चा फोन आला की...
आईच्या आवाजाची नक्कल करत... " सुनीत, कधी येणारेस तू परत? तुला कसं कळत नाही रे. वरुण माझी एकटीची जबाबदारी आहे का? मला एकटीला नाही जमत रे त्याला सांभाळायला.. आणि तो मोठा होतोय आता. त्याला तुझ्या सहवासाची देखील गरज आहे..... "
वैताग! मी म्हणजे काय मॉमच्या डोक्यावर ठेवलेलं ओझंच आहे. मला डॅड च्या सहवासाची गरज आहे काय? अजिबात नाही. मला माझे मित्र बास आहेत. डॅडची काय गरज नाही... बोरिंग. येऊन जाऊन विचारणार काय तर वरुण, अभ्यास किती करतोस? वरुण, मॉमला त्रास देत नाहीस ना? वरुण, तुझ्या खिशात सिगरेट कशी सापडली मॉमला?..........

गॉश! त्या दिवशी मॉमनी एवढा हंगामा केला फोनवर! डॅड पण तिकडे भडकले होते. मी जीव तोडून सांगत होतो की मी नाही पीत कारण एकदा ट्राय केल्यावर मला भयंकर ठसका लागला आणि तिचा स्मेल पण आवडला नाही. सॅम पितो कधीतरी चोरून त्याची राहिलीय माझ्या खिशात. ऐकेनातच माझं बोलणं! शेवटी मी निगरगट्टासारखा बसून राहिलो एका जागी. मॉम बोल बोल बोलली. नंतर मला पोटाशी धरून रडत होती. डॅडला ब्लेम करत... ते जर इथे असते तर मी असा वाया जायला लागलो नसतो. श्या, मित्रांची सिगरेट तुमच्या खिशात सापडली तर तुम्ही वाया कसे जाता म्हणे?

सकाळचे ६.१०
" वरुण, येते मी! दार नीट लावून घे. आणि मी थोडं काही खायचं करून ठेवलंय. भूक लागली की खा बेटा. तशी डॅडची फ़्लाईट आठला येतेय. पण आजचा हा पाऊस... वेळही होईल. टेक केअर, बेटा. "
मला एकदम मॉमविषयी दुःख वाटलं. डॅडमुळे तर ती आहेच परेशान, आपण तरी तिला त्रास द्यायला नको. आपली एक अशी मॉमच तर आहे. मी एकदम उठून म्हटलं...
" थांब मॉम... मी येतो. दोन मिन्टं. " त्यावर ती हसली फ़क्त.
" आता जाऊ दे... उशीर झाला आणि एअरपोर्ट रोड जॅम झाला तर वेळेत पोचणार नाही मी. तू थांब घरीच! डॅड आणि मी येतोच लगेच! काही वेळ लागणार नाही. "
" मॉम तू काळजी घे. पाऊस खूपय. मी तुला सारखे कॉल देतो तुझ्या सेलवर. "
मॉम चटकन छत्री घेऊन बाहेर पडली. आमच्या वॉचमनने टॅक्सी आणून दिली होती. चला, ते एक बरं नाहीतर टॅक्सीची वाट पाहताना इतक्या पावसामुळे भिजली असती मॉम!

सकाळचे ६.३०

मला आता झोप येईना! मी उठून बेसिनपाशी गेलो. ब्रश केला. चेहर्‍यावर पाणी मारलं. माझी स्किन ऑईली आहे. नीट नाही धुतला तर कसातरीच दिसतो माझा चेहरा आणि पिम्पल्स चा त्रास पण होतो! खरं तर मला आवडत नाही इतकं चेहर्‍याची काळजी घ्यायला. कारण मुलं थोडीच अशी काळजी वगैरे घेतात. गेल्या वर्षीपर्यंत मॉम म्हणते तसा छान लहान मुलासारखा होता माझा चेहरा.... पण यावर्षीपासून वैताग...
मी व्यवस्थित medicated soap ने चेहरा धुतला. वॉव! माझी हाईट. बेसिनवरच्या आरशात पाहताना मला पुन्हा ते जाणवलं. ५ फ़ूट, आठ इंच... आमच्या वर्गात सगळ्यात उंच आहे मी.


Shraddhak
Monday, March 06, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सकाळचे ७.००
किचनमध्ये येऊन मी मॉमने करून ठेवलेला चहा गरम करून घेतला. खरं तर मला कॉफी आवडते; पण मॉमला तितकी नाही आवडत. मग मलाही कंपल्सरी चहाच प्यावा लागतो. खरं तर बर्‍याच वेळा आम्ही मित्र मिळून बरिस्ता किंवा कॉफी डे ला जातो कॉफी प्यायला. थोडीशी जास्तच कडवट वाटणारी ती कॉफी काय सही लागते! आपण बुवा ठरवलंय, कॉलेजमध्ये जायला लागलं की चहा नाहीच प्यायचा.. मस्तपैकी कॉफी प्यायची! मॉमने नाही केली तर बरिस्तामध्ये जाऊन....
मॉमला निघून बराच वेळ होऊन गेलाय. मी तिला कॉल लावला. मॉम प्रचंड टेन्स वाटली फोनवर.
" वरुण, अरे इथे कोरमंगला - एअरपोर्ट रोडच्या जॉइंटवर प्रचंड जॅम आहे. गेले अर्धा तास टॅक्सी जिथल्या तिथे उभीय. आणि मधून मधून माझं सेलचं नेटवर्क पण जातंय. जर डॅडचा घरी कॉल आला तर त्याला एवढा निरोप सांग. "
" ठीके मॉम... सांगतो. पण तू उगीच टेन्शन घेऊ नकोस. बी काम. "
" ओके बेटा... चहा घेतलास की अजून उठलाच नाहीयेस अंथरुणातून? "
" घेतला गं. चल ठेवतो. "
" बरं. आणि घरात नीट राहा रे. "

ओफ़्फ़ो! मी काय लहान आहे का? ' घरात नीट राहा ' म्हणे! I could take care of myself.

सकाळचे ७.३०

एवढ्या सकाळी उठायची मला काय सवय नाही. स्कूल पण दुपारची असते. मी आरामात उठतो. उठतो म्हणजे मॉम उठवते. तिला खूप काळजीये माझी! मी नीट राहायला हवं, अभ्यास करायला हवा, वगैरे, वगैरे.. त्यामुळे मी जरा कुठे चुकलो की ती चटकन टेन्स होते. मे बी, डॅड कधीच इथे नसतात म्हणून! लहानपणापासून मी डॅडना सारखं देशाबाहेरच असलेलं बघितलंय. मॉम म्हणते, आजकाल स्कूलिन्ग आणि कॉलेज आणि सगळ्याच गोष्टींना खूप पैसे लागतात म्हणून डॅडना खूप पैसे कमावणं गरजेचं आहे.
... मी खिडकीपाशी आलो माझ्या रूमच्या... बाहेर काय सॉलिड पाऊस पडतोय. असल्या पावसात कुठेतरी भटकायला जायला हवं. नंदी हिल्सला तर आम्ही लोक बर्‍याच वेळा गेलोय. पण इतर कुठेतरी... मॉमला कोण समजवणार पण? कुठे जाऊच देत नाही. किती घाबरते मॉम! जरा कुठे यायला उशीर झाला की सेलफोनवर कॉल करते. पहिले पहिले डॅडनी तो फोन पाठवला मला, तर मला खूपच छान वाटलं होतं. मित्रांमध्ये भाव पण खूप खाल्ला होता मी. पण नंतर जेव्हा त्यावर मॉमचे सारखे कॉल्स सुरु झाले तेव्हा नुसता वैताग! आजकाल स्कूलमध्ये तो नवीन रूल केलाय ते बरंय! सेलफोन स्कूल सुरु असताना वापरायचे नाहीत म्हणून! मी तर रिसेस मध्ये पण त्याला ऑन करत नाही. मॉमने विचारलं की खेळायच्या नादात विसरलो असं सांगतो.

सकाळचे ८.१५

भूक लागलीय. ब्रेकफास्टला काय खावं बरं? मॉमने काहीतरी बनवून ठेवलं होतं म्हटलेली... मी किचनमध्ये जातो. आणि नेहमीप्रमाणे मॉमच्या किचनमध्ये मला काहीच सापडत नाही. मॉमला पुन्हा फोन लावला तेव्हा, "The cell you are calling to, is switched off or moved out of coverage area." हे ऐकलं. गेलं वाटतं मॉमच्या फोनचं नेटवर्क. गॉड! हा पाऊस आहे की वैताग! मी पुन्हा किचनमध्ये जाऊन शोधायला लागलो. सापडलं........ यॅक! शेवयांचा उपमा??!! मॉम.... जाऊ दे मी सॅंडविच बनवून घेईन. मला एवढंही न यायला मी मॉम समजते तितका लहान नाही.

सॅंडविच बनवत असताना फोन वाजला. मला वाटलं मॉम किंवा डॅड... पण सॅम होता.

" हाय सॅम... "
" ..... "
" नाही रे, आज स्कूल जाऊ दे खड्ड्यात. एवढ्या भयानक पावसात कोण जाणार? "
" ..... "
" काय पण प्लॅन नाही अजून पण ऐक ना! आज डॅड येतायत. मॉम त्यांना घ्यायला गेलीय एअरपोर्टवर पण पावसामुळे जॅम आहे अन दुपारपर्यंत ते काय येत नाहीत. तू येतोस का पटकन माझ्या घरी. गेम खेळूयात कॉम्पवर नाहीतर TV games ........ सारे घर पे आज अपुनका राज... ये ना! "
" ..... "
" अबे तू पिघल जायेगा क्या बारिश के पानी से? नाटक मत कर... वो पायल बोलेगी तो तू उसके लिये workbooks लेके इससे दुगनी बारिश मे भी जायेगा.... "
" .......... "
" अच्छा पर तू आना.. चल बाय. "

..मी सॅंडविच बनवून घेऊन हॉलमध्ये आलो आणि TV on केला. आज मॉम नाही म्हणून मी ते इंग्लिश मूव्हीचे वगैरे चॅनल्स लावले. एरवी मॉम झोपली आणि मला सुट्टी असली दुसर्‍या दिवशी की मी ते चॅनल्स लावतो रात्री उशिरा... मॉम अर्थात ओरडते की रात्रीपर्यंत जागून TV बघत जाऊ नकोस म्हणून, पण तिचं कोण ऐकतंय? मस्त असतात ते प्रोग्राम्स काही काही वेळा... काय काय दाखवतात. सॅमच्या तर रूममध्ये त्याच्यासाठी छोटा TV आहे. तो तर बिन्धास बघतो असले सगळे प्रोग्राम्स.... मला मात्र मॉमची चाहूल घेत घेत थोडं थोडंच बघायला मिळतं.

पण आज एकापण चॅनलवर तसे काय सीनच नाहीत! मला कंटाळा आला चॅनल बदलून बदलून! मी TV off केला. सॅंडविचची बशी सिंकमध्ये नेऊन टाकली. श्या! अजून मॉमचा काय फोन नाही. घरी राहणं बोरिंग आहे!

मी पुन्हा मॉमला फोन लावला. यावेळेस लागला नशिबाने!

" बेटा... मी एअरपोर्टला पोचलेच आहे जवळजवळ. मी फोन केला एअरपोर्टला आत्ताच ' फ़्लाईट आली का? ' ते विचारायला तर कळलं की डॅडची फ़्लाईट काहीतरी कारणामुळे land करू शकत नाहीय. गॉड! मला टेन्शन आलंय... "
मला कसंतरीच झालं मॉमचा तसला आवाज ऐकून...
" मॉम होईल सगळं ठीक. अगं सगळे trained लोक असतात तुला माहीताय नं? हे असल्या प्रॉब्लेम्सचं त्यांना काय टेन्शन येत नाही... बघ, तू पोचशील नं एअरपोर्टला तोपर्यंत फ़्लाईट लॅंड होत असल्याची announcement पण झाली असेल. " माझ्या नकळत माझा घसा दुखायला लागला.
मॉम थोडंसं हसली फोनवर....
" हो रे... माहीताय... चल ठेवते. तू काही खाल्लंस की नाही, राजा? "
माझ्या डोळ्यांत एकदम पाणी आलं. एवढ्या टेन्शनमध्ये पण मॉमला माझी केव्हढी काळजी होती. आणि मी एवढा नालायक मुलगा असूनदेखील!
"Yes Mom... bye and take care."
... मी फोन ठेवला आणि लहान मुलासारखा रडायला लागलो.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators