|
Dineshvs
| |
| Wednesday, March 01, 2006 - 12:03 pm: |
| 
|
" ईज ईट ९८५९८५५८९५८९ " " अं हो हो, कोण पाहिजे तुम्हाला. " " कोणी नाही, म्हणजे तुमच्याशीच बोलायचं होतं " " सॉरी हं, मी ओळखलं नाही तुम्हाला. " " तसा मीहि ओळखत नाही तुम्हाला, पण बोलुया का आपण ? " " अरे अनोळखी माणसाशी काय बोलायचं ? " " बोलल्यावर होईल कि ओळख " " अरे बाबा, हा काहि कुणा तरुण मुलीचा नंबर नाहिय्ये. चांगली पंचावन्न वर्षांची असलेली म्हातारी आहे मी. " " आवाजावरुन वाटत नाही तसं. आवाज छानच आहे तुमचा, तुम्ही नक्कीच गात असणार " " असणार नाही होते, तु तरुण दिसतो आहेस. " " चांगला सव्वीस वर्षांचा घोडा आहे मी. खरे म्हणजे तुमचा नंबर सहज फ़िरवला. कुणीतरी निवडल्यासारखा खास आहे बघा. ९८५९८५५८९५८९. ला सात, अकरा आणि तेरा तिन्ही संख्यानी भाग जातो. आणि या तिन्ही संख्यानी भागल्यावर ९८५०००५८९ असा अंक ऊरतो. तो मात्र बहुतेक प्राईम नंबर आहे. " " ईंजीनीयर दिसतो आहेस. मला नाही रे गणितात एवढे डोके. " " बरं आत्ता ठेवतो, तुमच्या फ़ोनची बॅटरी लो झालेली दिसतेय. रिचार्ज करा. परत फ़ोन केला तर चालेल ना ? छान वाटलं तुमचा आवाज ऐकुन. " " अरे कर कि. पण फ़ार रात्री नको रे. मला झोप लागली कि लवकर जाग येत नाही. आणि ऊठले तर परत झोप येत नाही. साडेनऊ दहाच्या दरम्यान कर. " " हो हो नक्की. आणि हे बघा तुम्हाला काहि बिल येणार नाही. ईनकमिंग फ़्री आहे. बरं ठेवतो आता. " %&%&%&%& " हॅलो, अरे तुच ना. शंभर वर्षं आयुष्य आहे बघ. आत्ताच सगळं आटपलं. आणि तुझ्या फ़ोनची वाट बघत बसले होते. " " माझ्या फ़ोनची ? आनंद आहे. कुणीतरी आपली वाट बघतय, हे फ़ीलिंगच कित्ती छान असतं ना " " अरे मी वाट बघते कारण मी आहे रिकामटेकडी. तुला नाही का कुणी मैत्रिण बित्रिण. ? असणारच म्हणा. दिवसभर तिच्याशी बोलत असशील. मी बघते ना, रेल्वेत, बसमधे एकेक्जण कसे कानातच मोबाईल घालुन बसलेले असतात ते. " " तसं काहि नाही. मैत्रिण नाही असे नाही, पण दिवसभर बोलत नाही मी तिच्याशी. तुमचं जेवण वैगरे झालं का. नसेल तर जेवुन घ्या, मग बोलु. " " अरे या वयात कसले जेवण बिवण. भुकच नसते. काहितरि करुन खाते झालं. रिकाम्या पोटी गोळी घेता येत नाही ना. " " कसली गोळी घेता, डायबेटीसची का ? " " नाही रे झोपेची. सवय लागलीय " " रेस्टिल नाव असेल. हो ना ? " " हो हो, पण तुला कसे रे माहित ? मेडिको आहेस का, तुझं नाव पण नाही विचारलं मी " " नाही नाही मेडिको नाही मी. माझे बाबा पण घेतात ना. नावात काय आहे हो ? हवं ते नाव ठेवा मला. आणि मी तुम्हाला काय म्हणु तेहि सांगा " " अरे हे वय गाठता गाठता, किती नावे झाली रे माझी. चिंगी, सुमे, सुमन, सुमाताई, आई आणि मधे काहिकाळ जयश्री पण. तु काय म्हणशील. ऑफ़िसमधे सुमनच म्हणत होते. तु आपला मावशी म्हण. पण लबाडा तुझं नाव नाही सांगितलस ते. " " अच्छा माझं नाव किशोर. आता खरे नाव काय ते नका विचारु, मावशी " " हे तुझे खरेच नाव असणार रे, आवाजावरुन ओळखु शकते कि मी. खोटे बोलणारे वेगळेच असतात. अरे मला विचारलस, पण तुझं झालं का जेवण " " हे काय निघालोच होतो, अच्छा, ऊद्या परवा करीन फ़ोन. " %&%&%&%& " नमस्कार मावशी, कश्या आहात ? " " आता या वयात असणार तेवढी मजेत आहे रे. काल कुठे बाहेर गेला होतास का " " हो जरा ईमिग्रेशन फ़ॉर्म्स भरत होतो. मग ऊशीर झाला. " " ईमिग्रेशन, का रे म्हणजे तु पण देश सोडुन चाललास का ? " " तु पण म्हणजे ? तुमचं कोणी असतं का फ़ॉरिनला. " " हो ना, गेल्या महिन्यातच तर लेक गेली ना माझी फ़्रान्सला. आता एकटीच असते. " " आता लेक मोठी झाली कि लग्न होणारच कि. एकुलती एक होती का ती ? " " एकुलतीच म्हणायची. पण लग्न होवुन नाही रे गेली. तिच्या बाबांकडे गेलीय. कायमसाठी. " " सॉरी मावशी, ऊगाच तुम्हाला विचारलं " " अरे तु कश्याला वाईट वाटुन घेतोस. हा फ़ोन तिनेच तर घेऊन दिला होता ना जाताना. मी म्हणाले होते पत्रं पाठव. तर म्हणाली, पत्रं बित्रं कसली गावंढळांसारखी. ईमेल केली असती, तर तुला त्यातले काहि कळत नाही, फ़ोन करत जाईन अधुन मधुन. अरे तीन आठवडे झाले, एकदाहि फ़ोन नाही आला. तुझा येतो, तेवढाच विरंगुळा मला. " " पण मावशी गाणं म्हणत होता ना तुम्ही, परत सुर करा ना. रोज तुमचा आवाज ना कसा कानात गुंजन करत राहतो. तुम्ही मैफ़ीलीत वैगरे गात होता का. " " छे रे मैफ़ील कसली. काहि नाटकात केली मी कामे. ऑफ़िसच्या प्रोग्रॅमला वैगरे गात होते. पण नवर्याला आवडत नसे. म्हणजे कधी बोलुन नाही दाखवले, पण आवडहि नाही दाखवली. मग मीहि सोडुन दिले. पुढे एकटीच पडले. मुलीची जबाबदारी पडली, मग सुटलेच सगळे. " " नाही नाही ते काहि नाही, असं गाणं कधी विसरायला होतं का. बघा गुणगुणुन. " " अरे गप रे, तु चेष्टा करतोयस " " नाही खरच, दोन ओळी तरी म्हणा ना " " बरं म्हणते, नन्ही कली सोने चली हवा धीरे आना नींदरानी पंख लिये झुला झुला जाना " " बघा म्हणालो होत ना मी, छान गाता कि. " " बरं रे झोपते आता. तु जेवलास कि नाही ? " " हो घेतोच आता. " %&%&%&%& " हॅलो, अगदी शंभर वर्षं जगणार आहेस बघ, आता तुझा फ़ोन येणार अस,न वाटलच होतं मला. " " म्हणजे मी मनकवडा आहे म्हणायचा. आज काय विशेष. ? " " विशेष नाहि रे, आज जुनी गाणी ऐकता ऐकता गुणगुणत होते. बहुतेक सगळी पाठ आहेत अजुन. मग रेडिओ बंद केला, आणि एकटीच गुणगुणत होते. " " अरे अरे, मी ऐकायला हवा होतो तिथे " " अरे पण तुझे कसे काय. झालं का तुझं ते ईमिग्रेशनचं काम ? " " नाहि झालं मावशी. खुप आशा लावल्या होत्या मी. नाही जमवु शकलो. आत्ता आत्ता बहिणीच्या जबाबदारीतुन मोकळा झालो होतो. तिचं लग्नच जमत नव्हतं. कधी शिक्षण आड यायचं तर कधी वय. शेवटी सहा महिन्यापुर्वी जुळलं. छान फ़ॅमिली आहे. बाबा एकटेच होते, म्हणुन काळजी होती. बहिणीचे सासर गावातच आहे, त्यामुळे तिचे लक्ष राहिलच. " " आणि आई ? " " आई लहानपणीच गेली. सातवीत होतो मी. एका दिवशी सकाळी अचानक विहिरीत प्रेत दिसले. चिठ्ठी नाही कि काहि कारण नाही. अजुनहि कारण माहित नाही आम्हाला. बाबानी त्याचा धसका घेतला. व्ही आर एस घेतली. मग सगळी जबाबदारी माझ्यावरच पडली. जिद्दिने शिक्षण पुर्ण केलं. पण त्याचबरोबर बरच काहि सुटुनहि गेलं हातातुन " " अच्छा म्हणजे प्रेमभंग वैगरे झालेला दिसतोय तुझा. अरे हे बघ तुझी जी कोणी असेल आणि तुला सोडुन गेली असेल ती आपली नव्हती म्हणायची. २६ म्हणजे काहि जास्त नाही रे वय. एवढ्या लहान वयात तु सगळी जबाबदारी पेलतोस हे काय कमी आहे का आणि तु एकटाच राहतोस का रे ? " " हो मी एकटाच आहे. ईथेच शिकलो आणि राहिलो. गावात तशी शिकयची सोय नव्हती. म्हणुन ट्युशन्स केल्या. पार्ट टाईम जॉब्ज केले आणि पुर्ण केले शिक्षण. ईतकी वर्षं नोकरी करतोय पण फ़ारसे सेव्हिंज नाहि होवु शकले. मला काहिहि व्यसनं नाहीत, पण घरची जबाबदारी, बाबांचे आजारपण यात बराच पैसा खर्च झाला. " " एवढा गुणी तु, मग बिनसलं कुठे रे मैत्रिणीशी ? म्हणजे तुला सांगावेसे वाटले तरच सांग रे, आज नको वाटत असेल तर ऊद्या सांग. आज तु जरा डिष्टर्ब्ड दिसतोस. " " नाही मावशी, तुम्हाला नाही सांगायचे तर कुणाला ? पण आज नको ऊद्या सांगतो सगळं. विचार करुन करुन डोकं फ़िरायची वेळ आलीय. बाबांची औषधं पण आणायची आहेत आता. " " ऊद्या कर रे फ़ोन नक्की " %&%&%&%& " मावशी फ़ोन करायला ऊशीर झाला, झोपला होतात का " " अरे हो रे तुझ्या फ़ोनचीच वाट बघत होते, गोळी पण नाही घेतली. सारखं वाटत होतं कालच बोलायला हवं होतं. पण काल तु ईतका ऊदास वाटत होतास. आज तरी बरा आहेस ना ? जेवलास कि नाही ? " " नाहि आज जेवलो नाही. भुकच नाही. थोडं दुध प्यायलोय. मावशी, मी तुमच्याशी खोटं बोललो. मी तुमचा फ़ोन सहज नव्हता फ़िरवला. तुम्ही किशोरीच्या आई ते मला माहित आहे. तुमचा नंबर मीच शोधला होता. माझाहि नंबर असाच काहिसा आहे. किशोरी आणि मी दोघानी अनेक दुकाने पालथी घातली होती. " " अरे पण मला बोलली नाही कधी ती. अर्थात फ़ार बोलायची असे नाही. तिचे बाबा फ़्रान्सला सेटल झालेत, हे कळल्यापासुन माझा दुस्वासच करायची ती. " " मला म्हणायची, तुला माझी आई स्वीकारणार नाही, फ़ार ऑर्थोडॉक्स आहे. जातीबितीचं फ़ार आहे तिला. " " अरे काहितरीच काय, एका मोठ्या ऑफ़िसमधे मी २५ वर्षे नोकरी केली. ऑफ़िसमधे सगळ्या जातीचे लोक आहेत. आम्ही एकत्रच जेवतो. जातबित माझ्या मनातहि कधी आली नाही. आता तुझ्याशी बोलले ईतके वेळा, तुला कधी जाणवलं का ते ? " " नाही मावशी तुम्ही कधीच जाणवु दिलं नाहीत. एकदाहि मला नाकारल्याच जाणवलं नाहीत. तुम्ही म्हणायाचा ना, कि माझ्या फ़ोनची तुम्ही वाट बघता, तेंव्हा खुप बरं वाटायचं मला. लहानपणापासुन हे टाकुन दिल्याचं दुख्ख डसतय मला. गावातले लोक म्हणायचे, तुझ्या आईला तुम्ही नकोसे झालात म्हणुन, तुम्हाला टाकुन गेली ती. किशोरीने पण असेच केले. " " अरे नीट सांग बघु मला सगळे, काय बोलली भवानी ? " " मावशी मला अश्या मुलीच्या प्रेमात वैगरे पडायची चैन परवडणारच नव्हती. मी आणि माझा अभ्यास यातच बुडुन गेलो होतो मी. मावशी पण तुम्हाला झोप तर येत नाही ना. आज मला ऊशीर झाला फ़ोन करायला. करणारच नव्हतो, पण तेवढीच चुटपुट लागुन राहिली असती, तुम्हाला सगळं सांगितलं नसतं तर " " अरे तु सांग बघु सगळं मोकळेपणी, मला काळजी वाटतेय तुझी. " " माझ्या नोट्स मागण्यासाठी ती आधी माझ्याकडे येऊ लागली. खरे तर ती लेक्चरला बसतच नसे. माझ्याकडे आधीच्या वर्षीच्या पण नोट्स नीट ठेवलेल्या होत्या. मी त्या टाईप करुन विकत असे. पण किशोरीकडुन कधी पैसे घेतले नाहीत मी. ती मला जिनियस म्हणायची. मला फ़ॉरीनला जास्त स्कोप आहे असे सारखे म्हणत रहायची. " " होतं खरं तिच्या डोक्यात ते वेड. तिच्या बापाचा पत्ता मिळवला होता तिने. आणि तो मिळाल्यापासुन तर सारख्या ईमेल्स आणि चाट असायच्या त्यांच्या. माझ्याशी बोलणेच टाकले होते तिने. " " मला म्हणायची माझी आई, भारतात आपल्याला लग्न करु देणार नाही. आपण दोघे कुठेतरी फ़ॉरीनला जाऊ. दोघानी प्रयत्न करु. ज्याला आधी चान्स मिळेल त्याने दुसर्यासाठी प्रयत्न करायचा. माझ्या डोक्यात तिने हे वेड भरवुन दिले. पण तिच्या वडीलांबद्दल मला तिने कधीच सांगितले नाही. तिचे प्लॅन्स तिनेच ठरवले. मला फ़क्त दोन दिवस आधी कळवले. तरी म्हणत होती कि तुला बोलावेन म्हणुन. बट शी नेव्हर डिड. गेल्यानंतर मला आठवडाभरात ईमेल केली, कि म्हणे तिच्या बाबानी तिच्यासाठी एक फ़्रेंच मुलगा बघुन ठेवलाय. फ़ोटोवरुन त्याने तिला पसंत केलेय. ते लवकरच लग्न करणार आहेत. मग तिला सिटिझनशिप मिळेल वैगरे. मला शुभेच्छा दिल्या. तुम्हाला फ़ोन करायला सांगितला. समबडी हॅज रीजेक्टेड मी अगेन मावशी. सांगा ना तुम्ही मी ईतका वाईट आहे का ? माझं काय चुकलं ? " " अरे तुझी फ़क्त निवड चुकली. ती तशीच होती, कारण तिचा बाप तसा होता. संधीसाधु. त्यानेहि २५ वर्षांपुर्वी असेच माझ्याच पैश्याने पलायन केले होते. आधी ईटालित होता. मग फ़्रांसला गेला. तिथुनच मला पत्र पाठवत राहिला. आधी आमचेहि ठरले होते, त्याने मला बोलवायचे म्हणुन, पण कधीच तो तसे म्हणाला नाही. दोन वर्षे आलाहि नाही. मग त्यानेच कळवले, कि त्याने तिथे लग्न केले. मी वाट बघणे सोडुन दिले. मला म्हणायचा किशोरीला पाठवुन दे. मी लक्ष दिले नाही. नोकरी तर करतच होते. परत सगळे ऊभे केले. त्याला पैसा पुरवण्यासाठी मंगळसुत्र सोडुन सगळेच विकले होते. पण त्याची पोर त्याच्याच वळणावर गेली. पोटच्या गोळ्यासाठी केलेले कधी काढु नये, पण सगळे फ़ुकट गेले रे. तिलाहि जाण्यासाठी तिकिट मीच काढुन दिले. म्हणुन म्हणते अजिबात वाईट वाटुन घेऊ नकोस. सगळे आयुष्य एका गुडघ्याच्या आधारे काढलय मी. हे असं कुणाच्या आधारे जगणं वैगरे एकदम खोटं असतं. तु काय मनाला लावुन घेतो आहेस ते. कशी रे पिढी तुमची. एवढ्याश्या गोष्टीने कसले हवालदिल होता. सगळे ताबडतोब हवे तुम्हाला. होकार नकार सगळे लगेच. एखादा फ़ोन लागला नाही तर किती निराश होता. अरे आम्ही ट्रंक कॉलसाठी तासंतास वाट बघणार्या पिढीतले. तुम्हाला संयम कधी कुणी शिकवलाच नाही का रे. बाकि सगळं शहाण्यासारखा वागतोस, मग एका संधीसाधु मुलीचे काय मनाला लावुन घेतले आहेस. माझी मरगळ तु कुठल्या कुठे पळवलीस, आणि तु काय असा रडुबाई सारखा बोलतो आहेस. अरे अजुनहि तुझी मावशी समर्थ आहे, तुला आधार द्यायला. ऊद्याच ये ईकडे. येशील ना ? किशोर ऐकतोयस ना ? हॅलो, हॅलो. " The End
|
Moodi
| |
| Wednesday, March 01, 2006 - 12:26 pm: |
| 
|
खुपच हळवे लिहीलय दिनेश तुम्ही, राहवलच नाही एका झटक्यात कथा वाचुन काढली. अन टचकन डोळ्यात पाणी आले. उतरत्या वयातील कुणाचाही एकटेपणा मी सहन नाही करु शकत..
|
Chinnu
| |
| Wednesday, March 01, 2006 - 12:32 pm: |
| 
|
.... .... ... .... I don't have words! केवळ अप्रतिम!!
|
दिनेश खूप सुरेख लिहिल आहे तुम्ही. नुसत्या संवादातून उभी केलीत कथा. आवडली कल्पना
|
Shyamli
| |
| Wednesday, March 01, 2006 - 1:11 pm: |
| 
|
खरच दिनेशदा..... सुंदर मांडलयत......
|
Anilbhai
| |
| Wednesday, March 01, 2006 - 1:32 pm: |
| 
|
वा, खुप touching लिहिलस रे
|
Ekrasik
| |
| Wednesday, March 01, 2006 - 1:39 pm: |
| 
|
दिनेश खूपच सुन्दर लिहिले आहे, आवडली कथा
|
Seema_
| |
| Wednesday, March 01, 2006 - 2:08 pm: |
| 
|
उत्क्रुष्ट आहे कथा ... आतापर्यंतच्या कथामध्ये मला one of the best वाटली .
|
Yog
| |
| Wednesday, March 01, 2006 - 3:20 pm: |
| 
|
दिनेश, नेहेमीप्रमाणेच सुन्दर कथा!! पण यावेळी हाताळणी अधिक आवडली
|
Pama
| |
| Wednesday, March 01, 2006 - 4:10 pm: |
| 
|
दिनेशदा, नुसत्या संवादांतून संपूर्ण कथा उभी करून आणि कथेच्या पूर्णत्वासाठी लागणारे सर्व धागे दोरे उलगडून काही gaps न राहू देता उत्तम लिहिलय. सीमा ला अनुमोदन... one of your best works!
|
सही दिनेश ... you rock
|
Kandapohe
| |
| Wednesday, March 01, 2006 - 8:57 pm: |
| 
|
इनकमिंग फ्री असुन सुद्धा निःशब्द झालो.
|
Ek_mulagi
| |
| Wednesday, March 01, 2006 - 10:13 pm: |
| 
|
सुरेख............... अतिशय सुरेख.खुप आवडली
|
Gs1
| |
| Thursday, March 02, 2006 - 1:22 am: |
| 
|
वेगळी कल्पना, आणि वेगळी हाताळणी, कथा आवडली !
|
Rajkumar
| |
| Thursday, March 02, 2006 - 4:21 am: |
| 
|
अप्रतिम!! .. .. ..
|
छान लिहीली आहे. पण वडील आणि पोरगी अगदी तेच करतात हे जरा खटकल.
|
Somesh
| |
| Thursday, March 02, 2006 - 7:28 am: |
| 
|
Its really touching..... good one!!!
|
Himscool
| |
| Thursday, March 02, 2006 - 8:58 am: |
| 
|
व्यक्त करायला शब्द अपुरे आहेत.
|
Champak
| |
| Thursday, March 02, 2006 - 10:30 am: |
| 
|
Nice one .. .. !
|
Dineshvs
| |
| Thursday, March 02, 2006 - 12:09 pm: |
| 
|
सगळे आपलेच, आभार कसले मानायचे. फ़क्त सव्यासाची ला उत्तर देतो. जसा आत्महत्येला प्रवृत्त करणारा जीन सतो तसाच संधीसाधुपणा करणारी कुटुंबेहि असतात. आईकडुन मुलाकडे आणि वडिलांकडुन मुलीकडे, असा वारसा आलाय. ईथे वडीलानी लग्न झाल्यावर फ़सवणुक केलीय तर मुलीने लग्ना आधी केलीय, हाच फ़रक. असे संधीसाधु लोक आणि कुटुंबेहि भेटतच असतात.
|
Giriraj
| |
| Thursday, March 02, 2006 - 12:38 pm: |
| 
|
सीधा सीधा दिल पे निशाना लगता है! वाह!
|
Arch
| |
| Thursday, March 02, 2006 - 2:06 pm: |
| 
|
दिनेश, तुम्ही छान लिहिता. पण ह्या गोष्टीत काही गोष्टी पटल्या नाहीत. १. तो मुलगा जर त्या मुलिकडून दुखावला गेला असेल तर तिच्या आईशी तो संवाद का साधू इच्छितो? फ़क्त समदुःखी म्हणून? २. त्याने जर इतक्या लहान वयात एवढ दुःख सहन केल असेल आणि एवढ्या जबाबदार्या उचललेल्या असतील तर generally अशी मुल खूप जपून पावल उचलतात.
|
Megha16
| |
| Thursday, March 02, 2006 - 5:47 pm: |
| 
|
दिनेश अप्रतीम खरच या शब्दा शिवाय दुसरा शब्द नाही. खरच खुप छान आहे कथा मनाला स्पर्श करुन गेली कथा.
|
Dineshvs
| |
| Thursday, March 02, 2006 - 9:10 pm: |
| 
|
Arch १. त्या मुलीनेच त्याला तसे सांगितले आहे, म्हणुन तो संवाद साधतोय. ती आईबाबत जे काहि बोलली होती, त्याची शहानिशा त्याला करायची होती, म्हणुन तो फ़ोन करतो. शिवाय एकदा विश्वास वाटल्यावर स्वताची फ़सवणुक त्याला मरण्यापुर्वी नोन्दवावीशी वाटते.तिची आई समदुख्खी आहे हे त्याला संवाद साधल्यानंतरच कळते. शिवाय तो त्याचे मन आणखी कुणापुढे मोकळे करणार ? २. त्या मुलाने जपुनच पावले ऊचलली असणार, पण तरिही तिने त्याच्या मनात जिनियस म्हणुन महत्वाकांक्षा जोपासली, त्याला स्वप्ने दाखवली. त्यामुळे तो वाहवला. ( खरे तर हाहि शब्द चुक आहे. त्याने सर्व जबाबदारी पुर्ण केलीय. ) जर तिला आधी संधी मिळती, तर ती आधीच गेली असती. मग त्याला, मी मोकळा नव्हतो, तिची सोबत करायला, असा विचार करता आला असता. पण ईथे तो मोकळा होता, आणि तरिही ती त्याला सोडुन गेलीय. शिवाय त्याचा हा पहिलाच अनुभव होता, त्याने परत असे धाडस नसते केले वा कोणावर विश्वास हि टाकला नसता. माझ्या विशाल नावाच्या मित्राने, गेल्या वर्षी, याच दिवशी आत्महत्या केली, म्हणुन हि कथा सुचली. त्याच्या आत्महत्येचे कारण मला आजहि माहित नाही.
|
Jo_s
| |
| Thursday, March 02, 2006 - 11:48 pm: |
| 
|
केवळ अप्रतीम, एखाद्या सत्य घटनेवर आहेका? सुधीर
|
|
|