|
Rar
| |
| Thursday, January 26, 2006 - 7:14 pm: |
| 
|
आज खूप दिवसांनी, नव्हे खूप वर्षांनी असं झालय.... आपल्या आजूबाज़ूला घडणारी एखादी घटना, कुठल्यातरी गाण्यातली एखादीच ओळ, किंवा एखादं पुस्तक कधी कधी आपल्याला मुळापासून ढवळून काढतं. मनाचे खूप वर्ष नकळत किंवा बर्याचदा ' जाणूनबुजून' बंद करून ठेवलेले कप्पे आपल्याला न जुमानता धडाधड उघडायला लागतात. स्वत्:ला ओळखायला लागलेले आपण अचानक आपल्यालाच खूप अनोळखी आणि परके होउन जातो आणि मग उरते नुसतीच अस्वस्थता... खरच. ... आज खूप दिवसांनी, नव्हे खूप वर्षांनी असं झालय. निमित्त एका पुस्तकाचे. नुकतंच कविता महाजन यांच ' ब्र ' हे पुस्तक वाचलं. ' ब्र' म्हणजे ' अवाक्षर'. ' गप्प बस! नाहीतर....' या धमकीला न भिता धाडसानं उच्चारलेला शब्द म्हणजे ' ब्र' ! ह्या पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक ही अस्वस्थता वाढत गेली. पुस्तकातले लहानसहान प्रसंग, मी स्वत्:ला कधीकाळी विचारलेल्या प्रश्णांची परत परत आठवण करून द्यायला लागले. 'अश्याच' काही प्रसंगांची मी ही एकेकाळी साक्षीदार होते म्हणूनही असेल कदाचित... ..... काही वर्षांपूर्वीची गोष्ट. अमेरिकेला येण्यापूर्वीचे भारतातले शेवटचे दोन महिने... Masters चा thesis defense झाल्यानंतर तीन चार दिवसातच आमच्या सरांनी थोडं बिचकतच आमच्यासमोर एक proposal ठेवलं. WHO (World Health Organization) चा एक survey study करायचा होता. महाराष्ट्रातल्या प्रार्थमिक आरोग्य केद्रांमधे (Primary Health Centers) मधे drug utilization कसं होतं याचा study, analysis and report असं काहीसं कामाच स्वरूप होतं. सुरुवात पुणे जिल्ह्यापासून करायची होती. " तुम्हाला कोणाला project मधे interest असेल तर... " सरांचं वाक्य पूर्ण होण्याआधीच आमचं ' होकारार्थी' उत्तर तयार होतं... आणि वेळ कमी असल्यानं लगेचच कामाला सुरुवातदेखील झाली होती. पुणे जिह्यातल्या PHC ची यादी बनवण्यात आली, ST, बसेसची ची वेळापत्रकं पाहिली गेली, एकदा पुणे शहराबाहेर पडलं की कोणते areas एका trip मधे cover करता येतील याचे planning झालं. survey चे forms तयार केले गेले. ... आणि मे महिन्यातल्या एका रणरणत्या दुपारी आम्ही धुरळा उडवणार्या ST मधे बसून पुणे शहराची हद्द ओलांडलीही! या २ महिन्यांच्या भटकंतीमधे पुणे जिल्ह्यातली खूप छोटी छोटी गावं, आदिवासी, कातकरी लोकांच्या वस्त्या, पाडे पाहायला मिळाले नव्हे ' अनुभवायला' मिळाले. यापूर्वी मी नाही म्हणायला कोसबाड, डहाणूला जाउन आले होते. अनुताई वाघांची अदिवासी मुलांसाठी असलेली ' अंगणवाडी' मी पाहिली होती. पण त्यावेळी मी खूप लहान होते. त्यामुळे जाळीतली करवंद आणि बोर्डीचा समुद्र ह्या दोन गोष्टीच मनात घर करून होत्या. बाबांकडून अनेकदा ' जैत रे जैत' च्या shooting चे किस्से ऐकले होते. कर्नाळ्याच्या कातकरी आणि ठाकर लोकांच्या, त्यांच्या राहणीमानाच्या, त्यांच्या देवांविषयी- भुतांविषयी एकूणच निसर्गाविषयी असलेल्या श्रद्धांच्या-अपश्रद्धांच्या गोष्टी ऐकल्या होत्या.पण एकूणच शहरात राहिलेल्या माझ्यासाठी त्या सगळ्या गोष्टी ' पडद्यावरच्या दाखवलेल्या story' इतक्याच परक्या होत्या. माझ्या जाणत्या किंवा विचार करत्या वयात मी शहराच्या सीमा ओलांडून खेड्यांचा तिथल्या वातावरणाचा थोडाफ़ार अनुभव घेतला होता तो वक्तृत्व स्पर्धांच्या निमित्तानं. पण तरीही शहरातून बाहेर पडून खेड्यात जाणं आणि खेड्यातूनही बाहेर पडुन आजूबाजूच्या जंगलात जाणं किंवा पाडे-वस्त्यांवर जाणं ह्या सगळ्यात असलेला ' फ़रक' मला ह्या survey च्या निमित्तानं समजला, जाणवला! (क्रमश : )
|
Rar
| |
| Thursday, January 26, 2006 - 10:17 pm: |
| 
|
वेगवेगळ्या ठिकाणची प्रार्थमिक आरोग्य केंद्र पाहात असताना एक गोष्ट सतत दिसत गेली आणि ती म्हणजे ' सामान्य माणसाच्या जीवाची किंमत फ़ार कमी असते किंबहुना नसतेच! ' गावं वेगळी - वस्त्या वेगळ्या, कुठे डोंगरातली वस्ती तर कुठे सपाटीवरच्या झोपड्या, कुठे बारा महिने दुष्काळ तर कुठे धरणाखाली जमिनी वाहून गेलेल्या! वेगवेगळ्या जाती जमाती, वेगवेगळी बोली भाषा, वेगवेगळ्या रूढी परंपरा... पण सगळ्यांची कथा थोड्याफ़ार फ़रकानं एकच .... कमालीच दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव आणि पदोपदी या गोष्टींचा फ़ायदा उठवणारी लोकं! म्हणजे ' सरकारी खर्चातून दारिद्र्यरेषेखालच्या लोकांना प्रार्थमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं ' इतका साधा आणि सरळ हेतू. पण काही मोजकेच धक्कादायक सुखद अनुभव वगळता एकूणच सगळा विचित्र आणि काहीसा आपल्या आकलनाबाहेरचा कारभार! या सगळ्या पाहणीत जाणवलेला मुख्य प्रश्ण म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या प्रार्थमिक गरजा म्हणतो आपण. पण ' आरोग्य '? त्याचं काय? याबाबत तिथल्या डाॅक्टर किंवा कोणत्यातरी स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना (NGO) विचारलं तर त्यांचं उत्तर असायचं... " जिथे एका जीवाचा जन्मच मुळी कोयत्याने किंवा ब्लेडने नाळ कापून होतो तिथे कसल्या आरोग्याची अपेक्षा करणार? " कितीही वाईट असली तरी हिच वस्तूस्थिती होती आणि हे पाहून हळुहळू कुठेतरी आपल्यालाही हे उत्तर, नव्हे हे वास्तव पटायला तर लागलं नाही ना? अशी भीती वाटायला लागली होती. अनेक गावांत PHC मधल्या डाॅक्टरची ह्या सरकारी दवाखान्याशेजारीच किंवा गावात ' खाजगी practice' असायची. PHC मधे दोन रुपयामधे रुग्णाची (patient) तपासणी आणि औषधोपचार होतात. या ठिकाणी patients च्या रांगाच्या रांगा असायच्या. डाॅक्टर येईल .. आपल्याला तपासेल .. औषध देईल .. आपण बरे होउ या वेड्या आशेवर डाॅक्टरची वाट बघत खोळंबलेल्या फ़ाटक्या, मळक्या कपड्यातल्या, पोटं खपाटीला गेलेल्या बाया-माणसांच्या रांगा! ज्यांचं पोट हातावर आहे, दिवसभर काम केलं नाही तर संध्याकाळी घरात चूल पेटणार नाही अश्या माणसांच्या, त्यांचा एक दिवसाचा रोजगार बुडवून, डाॅक्टरला देव मानून त्याची वाट पाहात बसलेल्या माणसांच्या रांगा ... आणि अशावेळी डाॅक्टर कुठे असायचा? तर गावातल्या किंवा जवळच असणार्या त्याच्या clinic मधे. जिथे त्याला एका patient मागे किमान २० रुपये तरी कमावता येतात अशा त्याच्या दवाखान्यात! डाॅक्टरची वाट पाहात बाळंतपणाच्या कळा सोसणार्या आणि शेवटी तिथेच आवारात झाडाचा आडोसा करून मुलाला जन्म देणार्या बाईची हिंमत आणि जगण्याची(आणि जगवण्याची!) इच्छाशक्ती जास्त... की साप चावल्यानंतर डाॅक्टरची, तपासणीसाठी आणि injection साठी वाट पाहून मरून गेलेल्या माणसाची हिंमत आणि जगण्याची इच्छाशक्ती कमी? हे असलं सगळं पाहून डोकं सुन्न व्हायचं. खूप प्रश्णं पडायचे आणि अस्वस्थ व्हायला व्हायचं. " गर्भनिरोधक गोळ्या (oral contraceptives) कशा घेता, iron च्या गोळ्या घेता का? " या प्रश्णावर लुगडयाचा पदर तोंडावर ठेवून लाजणार्या बाईचं " अहो ताई, गोळ्या उशाखाली ठेवून झोपतो " हे उत्तर ऐकून फ़सकन हसू यायचं आणि नंतर परिस्थितीचं गाभीर्य जाणवून चेहर्यावरचं हसू निघून जायचं. मळक्या, फ़ाटक्या अंगरख्याच्या दुमडलेल्या बाहीतून ही लोक २ रुपयाची तितकीच मळकी,फ़ाटकी नोट काढून द्यायचे आणि अंगठा उठवायचे तेव्हा वाईट वाटायचं.. आणि त्याचबरोबर हातभट्टीच्या शिळ्या दारुचा वास येणारी बाटली औषधासाठी पुढे करायचे तेव्हा ह्याच लोकांचा प्रचंड राग यायचा. झालं ... २ महिने हिंडून, पाहणी करून, data जमा करून, WHO साठी report लिहायच हाती घेतलेलं काम एक दिवस पूर्ण झालं. आणि ही अस्वस्थता, हे प्रश्ण तसेच मनात ठेवून आणि मनाची दारं घट्ट बंद करून PhD करण्यासाठी मी अमेरिकेला आले... (क्रमश : )
|
फारच सुरेख! वर्णनशैली फार बोलकी आणि वास्तवदर्शी आहे. अजुन येऊ द्या...
|
.... .... .... ....
|
Bhagya
| |
| Friday, January 27, 2006 - 12:24 am: |
| 
|
रार, मी तुझ्या रंगीबेरंगी वर दोन प्रश्न विचारलेत ग...
|
Lampan
| |
| Friday, January 27, 2006 - 1:01 am: |
| 
|
ब्र ...................... आणखीन काय लिहिणार ????
|
Kandapohe
| |
| Friday, January 27, 2006 - 2:16 am: |
| 
|
वासतवाचे सुरेख चित्रण. पुढचे लिही.
|
Shyamli
| |
| Friday, January 27, 2006 - 2:24 am: |
| 
|
वास्तव यापुढे आपण काय लीहणार?.................सुंदरच लिहिलयस..........................
|
Zelam
| |
| Friday, January 27, 2006 - 8:27 am: |
| 
|
सुरेख रार. लवकर पुढचं येउदे. वास्तव कधीकधी कल्पनेपेक्षाही भयंकर असतं.
|
Moodi
| |
| Friday, January 27, 2006 - 9:14 am: |
| 
|
रार अगदी अचुक नस दाखवलीस बघ. ग्रामिण भागात हेच दुख्ख आहे की या लोकांचा कमालीच्या दारिद्र्यामुळे अशिक्षीतपणा, मांत्रिक बरे करेल हा विश्वास अन शिक्षण नाही त्यामुळे रोग म्हणजे काय, औषध कशासाठी घ्यायचे हेच याना कळत नाही. समाजातील हेच भीषण वास्तव्य मनाला फार टोचत. 
|
Rar
| |
| Friday, January 27, 2006 - 7:15 pm: |
| 
|
कितीही दवडून किंवा दडपून ठेवली असली तरी मनात कुठेतरी ही अस्वस्थता असणारच... ती बाहेर पडली, जाणवायला लागली ह्या पुस्तकाच्या, ' ब्र ' च्या निमित्तानं! हे पुस्तक म्हणजे ' एक साधारण गृहिणी ते एक पूर्ण वेळ कार्यकर्ती ' असा घडलेला प्रफ़ुल्लाचा प्रवास. खरं तर नवर्यानं म्हणजे साहेबांनी ' टाकलेल्या ' प्रफ़ुल्लाची आदिवासींची फ़ुलाताई कशी झाली याची ही कहाणी! ' महिला सरपंचांवर मोठ्या प्रमाणात येणारे अविश्वासाचे ठराव ' ह्या विषयावर एक स्वयंसेवी संस्थेची कार्यकर्ती (NGO) या नात्यानं प्रफ़ुल्ला survey करायला आदिवासी भागात हिंडायला लागते. या भटकंतीपासून तिची या क्षेत्रातल्या कामाची आणि पर्यायानं या पुस्तकाचीही सुरुवात होते. राजकारणात आदिवासी वगैरे जमातीतील स्त्रीयांसाठी ३३ % जागा राखीव असल्याचा या बायकांना त्यांचे प्रश्ण मांडण्यासाठी नक्कीच काहीतरी फ़ायदा होत असणार असा साधा, सरळ विचार करणारी मी या पुस्तकातल्या कडुबाई, चान्नी, शेवलीबाई, शामीबाई, तारूबाई यांनी सांगीतलेले अनुभव ऐकून चक्क बधिर झाले. ह्या बायकांची नावं फ़क्त वेगळी, बाकी कहाणी एकसारखीच! जिथे एक स्त्री आपल्या बरोबर खुर्चीला खुर्ची लावून बसू शकते हेच मुळी अजून अनेक लोकांना मान्य नाही. आणि ती बाई सुद्धा अशा घरातली की ज्यांच्या अनेक पीढ्यातल्या पुरुषांनी ह्या जमिनदार किंवा सावकार लोकांकडे शेतीची किंवा मजुरीची कामं करण्यात आयुष्य घालवली तर बायकांनी यांच्या घरी ' बाळगी ' म्हणजे पोरं सांभाळायला ' ठेवलेली ' बाई म्हणून! थोडक्यात ज्या ' प्रतिष्ठित ' लोकांचं उष्टमाष्टं खरकटं खावून हे आदिवासी वगैरे जमातीतले लोक जगतात त्या लोकांना आदीवासी बाईचा एक सरपंच म्हणुन विचारही होणंही मान्य नाही.. अशा बाईच्या जोडीनं उपसरपंच किंवा ग्रामसेवक म्हणून काम बघणं ही फ़ार फ़ार दूरची गोष्ट झाली. आणि मग अशा बाईला खुर्चीपासून दूर ठेवण्यासाठी ' कोणत्याही ' मार्गाचा अवलंब... स्त्री सरपंच झाली तरी तिला ग्रामपंचायतीच्या सभेला बंदी, पुरुष उपसरपंच सगळा कारभार बघणार आणि सभेच्या mitues वर घरी register पाठवून ' सरपंच बाईचा ' अंगठा उठवून घेणार. कामाच्या ह्या पद्धतीला कोणी बाईनं प्रतिकार करायचा प्रयत्न केलाच तर त्यावरचे ही ' हुकमी ' उपाय ठरलेले... महाराष्ट्रातल्या बहुतेक आदिवासी जमातींमध्ये ' देजा ' पद्धत आहे. लग्न लावताना मुलीच्या बापाला देण्यासाठी घरातलं एखादं जनावर, धान्य विकून कर्ज काढलेलं असतं. लग्नानंतर हे सगळं ' नुकसान ' सासरी आलेल्या त्या मुलीनं भरून काढावं अशी अपेक्षा असते. आता अशा परिस्थीतीत बाई ' मीटिंग ' ला गेली तर मजूरी कोण करेल? घरातली कामं कोण करेल? पोरं कोण सांभाळेल? अशी एक ना अनेक कारणं आणि त्याबरोबर कोंबडी आणि दारू देउन घरच्यांचे कान फ़ुंकले जातात आणि बाईला घरातूनच विरोध होईल अशी व्यवस्था केली जाते. त्यातूनही एखादी खबीरपणे टिकलीच तर तिच्या चारित्र्याबद्दल संशय घेतला जाईल अशी ' सोय ' केली जाते. किंवा त्याही पुढे जाउन तिच्या नवर्याचा, कमावत्या पोराचा खून करणे किंवा भगताच्या मदतीने तिला ' भुत लागलंय ' असं गावाला पटवून देवून अशा बाईला हद्दपार करणे, तिची नागव्याने गावातून धिंड काढणे किंवा चक्क तिला मारून टाकणे... ह्यातूनही एखादीच बाई हिमतीनं लढलीच तर सरकारी उपाय म्हणजे ' अविश्वासाचा ठराव करून सरपचपद काढून घेणं ' . .... हे सगळं वाचल्यावर वाटायला लागलं की यापैकी कोणत्या ना कोणत्या कारणावरून खुर्ची सोडायला लागलेल्या बायकांना आणि त्यांचे हाल बघितलेल्या इतर बायकांना " निवडणूकीला उभे राहा, स्त्रीयांसाठी राखीव जागा आहेत ... आज स्त्रीया कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत " हे आपण सांगू शकू का? त्यांना पटवून देउ शकू का? 'कशाला बायांना राखीव जागा देता? निदान चार लोकात अब्रूचे धिंडवडे तरी निघाले नसते' असा प्रतिप्रश्ण या बायकांनी विचारलाच कधी तर आपल्याजवळ त्याचं उत्तर आहे का, असेल का? साधा PHC चा २ महिन्यांचा survey करतानासुद्धा ' झापडं ' लावून आजूबाजूला दिसणारं घडणारं नजरेआड करता आलं नव्हतं मलाही..... ह्या पुस्तकाचंही तसंच काहीसं! मूळ पुस्तकाचा विषय जरी ' ग्रामपंचायतीवर निवडुन आलेल्या स्त्रीयांच्या संदर्भात असला ' तरी तो तिथेच आणि तितकाच मर्यादित राहत नाही, मला तर वाटतं राहूच शकला नसता. कारण आपण माणसांनी स्त्री - पुरुष असा कितीही भेद केला, तरी शेवटी गरीबी, दारिद्र्यापुढे स्त्री पुरुष हे सारखेच! (क्रमश : )
|
Dineshvs
| |
| Friday, January 27, 2006 - 8:46 pm: |
| 
|
रार, अश्याहि पुस्तकाना वाचक मिळतो, हे बघुन आपण समाज म्हणुन जिवंत आहोत, याची खात्री पटते. प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे हे पुस्तक. लेखिकेने निव्वळ संशोधन केले नाही तर त्यात स्वताला झोकुन दिलेय.
|
वरल वर्णन वाचल, अन आठवल की मुलीचा जन्म झाला म्हणुन दचकणार्या आइबापान्वर उडवले जाणारे टीकेचे आसुड! भरल्यापोटी, शहरातल्या तुलनेत प्रचन्ड सुरक्षित आणि सुखासीन आयुष्यात लोळत पडताना स्त्रीच्याच काय असन्ख्य प्रकारच्या मुक्तीच्या वल्गना करत उपदेशाचे डोस पाजणे फारच सोपे असते! मात्र वास्तव भीषण असते हे वास्तवात झोकुन देवुन डोळ्यावरची एकतर्फी विचारान्ची झापडे काढल्यावर कळते! झापडे काढण्यास अशी पुस्तके व वरल लिखाण मदत करत! पण काही प्रश्ण उरतातच! खेडोपाडीची सगळीच जनता अडाणी, निःषपाप असते का? त्याना त्यान्च्यातल भलबुर काहीच कळत नाही? की कळुनही काहीजण स्वार्थाकरता तर काहीजण गरीबीमुळे त्याकडे कानाडोळा करतात? असन्ख्य प्रश्ण मनात उभे रहातात आणि एका प्रश्णात समाविष्ट होतात, हे सगळ सुधारणार कधी? रार, तुझ्या लिखाणावरुन सहज सुचल म्हणुन हे लिहिल, तुमच चालुद्या 
|
Arch
| |
| Saturday, January 28, 2006 - 2:09 am: |
| 
|
सध्या मीपण ब्र पुस्तक वाचते आहे. माझ्या ओळखिच्या सगळ्यांना मी ते वाचायला सांगणार आहे. Rar, data collection करताना हे सगळ तू अनुभवलस. मला पुस्तक वाचताना नेहेमी वाटत हा data पैसे allocate करायला वापारतात पण त्यातला खरच ह्या लोकांपर्यत किती पोहोचतो? आधी त्या पुस्तकातल्या सुमेधच कौतुक वाटल ह्या कार्यात झोकून दिल्याबद्दल पण नंतर त्याचा " स्व " बाहेर आलाच. तुलापण त्या प्रफ़ुल्ला सारखेच अनुभव आले का? तुम्ही कुठे रहायचात? कुठे जेवायचात? तुमचा रोजचा कार्यक्रम काय असायचा सगळ जाणून घ्यायला आवडेल. तुझ कौतुक वाटल. आपल्या हातून ह्या लोकांसाठी काहीतरी मदत व्हावी अस नेहेमी वाटत पण नुसत वाटून उपयोग नाही. करण महत्वाच आहे. बघू काय होत ते.
|
Ninavi
| |
| Monday, January 30, 2006 - 10:41 am: |
| 
|
रार, छान लिहीलंयस. हादरवणारं. पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली वाचून. तुझे अनुभवही अजून सविस्तर लिहीशील का?
|
Rar
| |
| Tuesday, January 31, 2006 - 11:37 pm: |
| 
|
PHC च्या survey च्या वेळी जमा केलेल्या data चं पुढे काय झालं? मुंबईला KEM Hospital मधे जाउन २ वेळा डाॅक्टर शरदिनी डहाणूकर मॅडम समोर data आणि analysis present केला आणि report मधे conclusions बरोबर future directions लिहून हाती घेतलेले काम पूर्ण केले... आज हे पुस्तक वाचल्यानंतर वाटायला लागलय ' आपण काम पूर्ण करून आलो की नुसतेच सुरु करून आलो होतो! ' त्या data चं पुढे काय झालं? तो कशासाठी आणि कशाप्रकारे वापरण्यात आला? ह्या अस्वस्थतेपायी का होईना पण अनेक वर्षांनी सरांना e-mail करून हे प्रश्ण विचारावेसे वाटले... हे ही नसे थोडके! काहीतरी positive उत्तर यावं असं मनापासून वाटतय पण खरं सांगते खात्री नाहीये! कारण जगाकडे निरागसपणे पाहायची नजर दुर्दैवानं आता राहिली नाही. वेश्यांच्या मुलांसाठी शाळा चालवणार्या लवाटे आक्का, मुक्तांगणचे अनिल अवचट, मतिमंद मुलांसाठी शाळा चालवणारे पिरंगुटचे केंजळे यांच्यासारख्या लोकांच्या गप्पा, अनुभव ऐकले, वाचले की ' उगाचच विचारांना दिशा वगैरे मिळाल्यासारख ' वाटायच एकेकाळी... असं ' भारावून ' जाण्याच वय सरल्यामुळे किंवा स्वत्:ची limitations लक्षात यायला लागल्यामुळे असेल कदाचित, पण कोणत्याही NGO च्या कारभारावर कितपत विश्वास ठेवावा असे प्रश्ण आता पडतात. याला कारण कदाचित अशा काही संस्थांमधे अपरिहार्य असणारं राजकारण आणि अश्या प्रकारच्या राजकारणामधे मला ' अजिबात नसलेला interest' ! परदेशात असूनही लहानमोठ्या स्वरूपात, कोणत्या ना कोणत्या मार्गानं समाजातल्या ' झगडणार्या ' लोकांसाठी काहीतरी करावं असं नेहेमीच वाटायच, अनेकदा कळत नकळत काही केलंही जायचं. Air conditioned theater मधे बसून folk form चं कौतुक करणारी, लोककला सांभाळायला हव्या वगैरे वगैरे विधानं करणारी लोकं मला खोटी वाटायची, अजूनही वाटतात. पण आज प्रामाणिकपणे कबूल करावसं वाटतंय की हे पुस्तक वाचल्यावर माझ्याच नजरेला ' मी पण कुठेतरी या खोट्या लोकांच्या रांगेत बसलेली ' मला दिसायला लागले. हे असं परदेशी बसून ' रानावनात राहणार्या, काबाडकष्ट करून पोट भरणार्या त्या अशिक्षित, गरीब ' लोकांचा विचार करून त्यांच जगण सुसह्य होणार नाहीये. आपल्याला वाटलं होतं त्यापेक्षा खूप serious problems आहेत, वरवरच्या उपायांनी हे problems solve होणारे नाहीयेत. त्यासाठी ' त्या लोकांत, त्या मातीत ' जायची गरज आहे. हे मला नव्यानं जाणवायला लागलं ते ह्या पुस्तकामुळे! पण खरं सांगायचं तर लोकांना मुक्त करण्याची इच्छा करणारी मी स्वत्: तरी मुक्त आहे का? नोकरी, पैसा, समृद्ध जीवन, एक सुखवस्तू आयुष्य यांच्या विरुद्ध ' ब्र ' काढायची हिंमत माझ्यात तरी आज आहे का? वेगळ्या वाटा निर्माण करायला विचारात आणि आचारात तेवढ सामर्थ्य असावं लागतं. अशा वेगळ्या वाटा निर्माण करणं जाउदे, पण निदान नेहेमीचा चाकोरीतला रस्ता सोडून बाज़ूच्या पायवाटेनं जाण्याइतपत लागणारं ' बळं ' कधीतरी या पावलात यावं अशी एक प्रामाणिक इच्छा मात्र आहे... (समाप्त)
|
Lampan
| |
| Tuesday, January 31, 2006 - 11:57 pm: |
| 
|
अतिशय impressive लेख आहे .. वाचल्यापासुन डोक्याला भुंगा लागला आहे .. नाही नाही म्हणत पुन्हा तिथेच
|
Jo_s
| |
| Wednesday, February 01, 2006 - 12:25 am: |
| 
|
रार, फारच छान, वेगळ्या वाटेने जाण्या साठी शुभेच्छा. पण त्यासाठी पाऊल वाटा कशाला हव्यात, तुम्ही चालू लागलात की त्या आपोआपच तयार होतील, रुळतील. इच्छा असण म्हत्वाचं, जी तुझ्या जवळ आहेच.
|
Meghdhara
| |
| Wednesday, February 01, 2006 - 6:58 am: |
| 
|
रार अतिशय मार्मिक आणि प्रामाणिक लिहीलं आहेस. समाजातल्या कोणत्याही स्तरातील लोकांचं दुःख आपल्याला नुसतं कळून त्यातुन काहीच घडणार नाही.. थॅंक्यू! घराकडे, मुलांच्या अभ्यासांकडे दुर्लक्ष होईल म्हणुन हाती घेतलेलं काम बंद केलं होतं.. रार आज तुझ्यामुळे ते पुन्हा सुरू करावसं वाटू लागलय. सुरू केलं की कळवीनच. पुन्हा एकदा मनापासून थॅंक्यू. मेघा
|
Shyamli
| |
| Wednesday, February 01, 2006 - 7:04 am: |
| 
|
नौकरी पैसा, सम्रुध्द जीवन, ह्यापुढे कुणाची तरी ब्र काढायची हीम्मत....................................... खरच आहे का कुणात? ह्या सगळ्या गोष्ह्टी वाचुन मन ऊदास होत पण...........ईथेच अडकायला होत.
|
Zelam
| |
| Wednesday, February 01, 2006 - 8:58 am: |
| 
|
रार सुरेख लेख आहे, आता पुस्तक जरूर वाचेन मी. पैसा, समृद्धी याविरुद्ध ब्र काढायची हिम्मत माझ्यातही नाही, किंबहुना याच गोष्टींवर concentrate करून आपण दिवस घालवत असतो. ब्र सारखे पुस्तक किंवा तू लिहिला आहेस तसा विचारप्रवर्तक लेख वाचून काहीतरी करावसं वाटतंदेखील. आणि ते वाटणं खोटं नसतं. जोपर्यंत आपण समाजाच्या चौकटीत असतो तोपर्यंत मुक्त नसतोच. पण आपल्या चाकोरीत राहूनदेखील आपण काहीतरी करू शकतो. मग भले ते काही भव्यदिव्य नसेल पण at least दुसर्यांच्या उपयोगी पडणारं असेल आणि त्याने थोडेसे का होईना आत्मिक समधान मिळेल. सामान्य माणसाला नेहमीच समृद्धीची ओढ असते. त्यात चूक काय? आपण आपल्या स्वतःच्या, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी झटलो तर त्यात कानकोंडं व्हायची काय गरज? आपण समृद्ध असू तर इतरानाही समृद्ध करू शकू. शेवटी समृद्धी आणि संस्कृती एकत्र नांदणं महत्वाचं.
|
Bee
| |
| Wednesday, February 01, 2006 - 10:48 am: |
| 
|
ऐरवी खूप hi-fi topic वरच लिखान वाचून वाटायच रारचा class खूप वेगळा आहे. पण आज हे सरळ साधे सच्चेपणाने लिहिलेले वाचून वाटले रार आपल्यामधीलच एक आहे. मी अभय बंगचे दिवाळी अंकात सेवाग्राम ते शोधग्राम हा एक अत्यंत नितांत सुंदर लेख वाचला. त्या लेखाची आठवण झाली. फ़रक इतकाच की त्यांनी कृती करून दाखविली. रार तुला कधीतरी हे बळ नक्की मिळो ही सदिच्छा! रार, साप्ताहीक सकाळ २००२ मधला हा लेख तू अवश्य वाच. त्या लेखातील एक कविता इथे देतो आहे, चिनि कविता आहे पण अनुवाद मात्र English मधे केलेला आहे Go to the people Live among them Love them, learn from them Start with what they know Build upon what they have
|
Champak
| |
| Wednesday, February 01, 2006 - 10:52 am: |
| 
|
अशी अस्वस्थता माणसाला कृती करण्यासाठी प्रेरणा देते असे म्हणतात! The bottom line is... प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायची हिंमत प्रत्येकात असते च असे नाही. कदाचित तो च तर सामान्य आणि असामान्य ह्या दोघां मधील फ़रक असावा!
|
Moodi
| |
| Wednesday, February 01, 2006 - 10:59 am: |
| 
|
हे नुसते पुस्तक नव्हे तर प्रत्येकाच्या अस्वस्थ मनाची तगमग अहे अन ती खोलवर रुतलेली दिसते. पण आपण मोठ्या प्रमाणावर जरी काम करु शकत नसलो तरी नेहेमीच्या जीवनक्रमात येणार्याना तसेच जे खरोखरीच असहाय्य आहेत अशाना मदत करुन त्यांची धडपड कमी करु शकतो.
|
Gautami
| |
| Wednesday, February 01, 2006 - 11:28 am: |
| 
|
rar मस्त लिहलं आहेस. मी पण ते पुस्तक आत्ता नक्की वाचेन. india त अशा अनेक छोटया मोठया संस्था आहेत की ज्या अशा ग्रामीण भागात जाऊन काम करतात. त्याना financial मदत नेहमीच लागत असते. इथे बसून काहीच करू शकत नाही असा विचार करण्यापेक्शा या संस्थाना कशी मदत करता येईल ते पाहिले पाहिजे. आम्ही दर india trip मधे २ संस्थाना अशी मदत देतो. प्रत्येक वेळी नवीन संस्था निवडतो.
|
Hems
| |
| Wednesday, February 01, 2006 - 12:24 pm: |
| 
|
रार , अनेकांना ही अस्वस्थता जाणवत असते .. तुझ्या लेखामुळे माझ्यासारख्या अनेकांच्या मनात ती नक्कीच जागी झाली असेल पुन्हा ! आपण काहीच करत नाही असा स्वतःविरुद्ध ब्र काढायची हिंमत करून दिल्याबद्दल आभार !
|
|
|