तेलुगु पद्धतीचे कैरीचे लोणचे

Submitted by वामन राव on 9 June, 2025 - 02:19
Telugu mango pickle
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 
  1. कैऱ्या - चार किलो
  2. लसण - अर्धा किलो
  3. अद्रक - अर्धा किलो
  4. तिखट - एक किलो
  5. मीठ - एक किलो
  6. मोहरी पूड - ५० ग्राम
  7. जिरे पूड - ५० ग्राम
  8. मेथी पूड - ५० ग्राम
  9. शेंगदाण्याचे तेल - तीन किलो
क्रमवार पाककृती: 

.
नमस्कार मायबोलीकरांनो!

महाराष्ट्रात कैरीचे लोणचे == आंब्याचे लोणचे घालायचे दिवस येऊ घातलेत. त्यानिमित्ताने तेलंगाणा पद्धतीचे कैरीचे लोणचे ही कृती सादर करत आहे. आवड असल्यास नक्की करून पहा.

कृती:

आंब्याच्या फोडी दोन-तीनदा भरपूर पाणी घालून स्वच्छ धुऊन घ्या. कपड्यावर टाकून कोरड्या करून एका स्टीलच्या मोठ्या भांड्यात घाला.

अद्रक-लसणाची पेस्ट करून त्यावर घाला. नीट हलवून चांगले एकत्र करा. त्यावर मीठ, तिखट, मोहरी पूड, जिरे पूड, मेथी पूड घाला. पुन्हा चांगले एकत्र करून घ्या. झाकून ठेवा. शेंगदाण्याचे तेल चांगले गरम करून थंड करून घ्या. थंड तेल वरील मिश्रणात घालून नीट हलवून एकत्र करून घ्या. काचेच्या / चिनीमातीच्या हवाबंद बरण्यांत घालून झाकण लावून ठेवा.

तीन-चार दिवसानंतर, पुढचे वर्षभर खाण्यासाठी लोणचे तयार होईल.

बोनस रेसीपी:

या लोणच्यातील एक किलो वेगळे घेऊन त्यात अंदाजे १०० ग्राम गूळ घाला. अप्रतिम चवीचे आंबट-गोड लोणचे तयार होईल.
.

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 
  • कच्चे आंबे (कैऱ्या) ह्या निबर, गडद हिरव्या सालीच्या, आतून पांढऱ्या, आंबट अश्या बघून घ्याव्यात. मऊ, पिवळट, गोडसर अश्या घेऊ नयेत.
  • लसण हा चांगल्या घट्ट गड्ड्यांचा, तीक्ष्ण चव व वासाचा असा घ्यावा.
  • अद्रक हे चांगल्या प्रतीचे, मोठमोठ्या खांडांचे, तीक्ष्ण चव व वासाचे घ्यावे.
  • तिखट हे लाल रंगाचे, तिखट चवीचे घ्यावे. तेलुगु लोक लोणच्यासाठी Three mangoes हेच तिखट वापरतात; आम्हीही वापरतो.
  • बरण्यांत घातल्यावर नेहमीच लोणच्यावर तेलाचा वर थर असावा. फोडी उघड्या पडू नयेत, नाहीतर लोणचे खराब होऊ शकते.
  • काही महिन्यांनी तेल कमी झाले तर तेल तापवून थंड करून पुन्हा घालावे.
  • वरील साहित्याचे मोजमाप हे, तयार लोणचे चार जणांच्या कुटुंबाला पैपाहुणे, शेजारी-पाजारी यांसहित वर्षभर पुरेल अश्या हिशेबाने दिले आहे. आपापल्या गरजेप्रमाणे त्यात कमी अधिक बदल करावा.
  • फोटोंतील दिसणारे साहित्य प्रमाणात दिलेल्या असेलच असे नाही.
  • सदर पाककृती माझ्या अर्धांगिनीने सिद्ध केली आहे.

विसु: यावर्षी अजून लोणचे घातले नाहीय. बहुधा पुढच्या आठवड्यात घालणे होईल. फोटो मागच्या वर्षीचे आहेत. यावर्षीचे फोटो नंतर टाकीन. कदाचित कुणाला उपयोगी पडेल म्हणून रेसिपि आताच लिहीत आहे.

(पाकृ यापूर्वी इतरत्र प्रकाशित केलेली आहे. इथे लिहिण्यासाठी संपादित केली आहे.)

बाजारातील कैऱ्या
बाजारातील कैऱ्या

फोडून घेतलेल्या कैऱ्या
फोडून घेतलेल्या कैऱ्या

तिखट मीठ मसाला, चार शिंगं कशाला? Wink
तिखट मीठ मसाला

अद्रक लसण पेस्ट घातली
अद्रक लसण पेस्ट घातली

फोडींवर मसाला घातला
फोडींवर मसाला घातला

फोटोसाठी
फोटोसाठी

एकत्र केल्यानंतर
एकत्र केल्यानंतर

तापवून थंड केलेले तेल
तापवून थंड केलेले तेल

एवढे तेल पुरेसे नाही, अजून घालावे लागेल
एवढे तेल पुरेसे नाही, अजून घालावे लागेल

एक रँडम फोटो

एक रँडम फोटो

बरणीत भरायला तयार लोणचे
बरणीत भरायला तयार लोणचे
.
जाता जाता:

  1. मराठवाड्यात, "पहिला पाऊस पडून गेल्यावर आंब्याचे लोणचे घालावे म्हणजे टिकते. उन्हाळ्यात घातले तर उष्णतेने खराब होऊ शकते" असे म्हणतात.
  2. आंध्र-तेलंगाणात, "आंब्याचे लोणचे उन्हाळ्यातच घालावे म्हणजे टिकते. एकदा पावसाळा सुरु झाला की मग दमटपणाने खराब होऊ शकते" असे म्हणतात.

आमच्या घरी दोन्ही ठिकाणांची लोणची टिकतात!

माहितीचा स्रोत: 
निरीक्षण, चर्चा, अनुभव
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Superlike

👌

मस्त.....लिहिलंय आणि फोटो पण.. सही!!
सासूबाई घेऊन आल्या आहेत सेम to सेम लोणचे.. फोटो आणते..
कैरीचे, guntur मिरची चें आणि टोमॅटो चें लोणचे दरवर्षी बनवतात..

मस्त .
एकदम लाळगाळू फोटो आलेत सगळे.+1

@ मृणाली,

guntur मिरची चे आणि टोमॅटो चे लोणचे …

योग्य जागी रेसिपी द्या प्लीज.

@ वामन राव,

तुमच्या पोतडीतून सुद्धा येऊ द्या अशाच झणझणीत रेसिपीज्

वामन राव....
ज ब र द स्त.
रेसिपी आणि फोटो एक नंबर.
आलं लसणामुळे वेगळी चव येत असणार..
लोणच्याचा रंग सुरेख.

भन्नाट फोटो आहे. तेलुगू लोणचे आवडते. स्वतः करत नाही पण बरेचदा प्रिया कंपनीचे ठोक्कू लोणचे आणले जाते.

@मृ >> गुंटूर मिरचीचे लोणचे आगजाळ होत असेल ना? आम्ही गुंटूर ड्राय मिरची आणली आहे फोडणीत एक घातली तरी मस्त तिखट होते सगळे.

एकदम मस्त फोटो आलेत ! रंग ही सुरेख !! एवढे तेल माझ्या हातून कधी पडणार नाही कोणत्याही पदार्थात , त्यामुळे वर्षाचे लोणचे करायची हिंमत होत नाही .

सहीच. तोंडाला पाणी सुटलं.

कैरीच्या लोणच्यात लसूण पहिल्यांदा बघतेय (आलंही), आंध्रचं (तेव्हा तेलंगणा वेगळं नव्हतं) कैरी तककु आणलेले एकदा रेडिमेड, आता त्यात लसूण होती की नाही आठवत नाही, परत आणायला हवं.

सर्व वाचकांचे आणि व्यक्त-अव्यक्त प्रतिसादकांचे आभार.

टीपा आवडल्या लोणच्या इतक्या !

@मंजूताई, धन्स्! मूळ कृतीत core process आणि टीपांत अधिकच तपशील असा फॉरमॅट पाककृतीस समजून घ्यायला सोपा जातो असे मला वाटते.

कैरीचे, guntur मिरची चें आणि टोमॅटो चें लोणचे दरवर्षी बनवतात..

@mrunali.samad, टोमॅटोचे लोणचे मलाही आवडते. आमच्याकडे शक्यतो ते हिवाळ्यात घालतात.

तुमच्या पोतडीतून सुद्धा येऊ द्या अशाच झणझणीत रेसिपीज्

@अनिंद्य, प्रोत्साहनाचे आभार. प्रयत्न नक्की करीन. तेलुगु खाद्यसंस्कृतीवर एक लेखमाला लिहिण्याचा विचार आहे; पाहू किती जमले ते!

आलं लसणामुळे वेगळी चव येत असणार..

@ऋतुराज, हो. चव, वास, पोत, रंग सर्वच वेगळे असते. कैरीची आंबट चव काहीशी diminish होते हे मात्र खरं.

तेलुगू लोणचे आवडते. स्वतः करत नाही पण...

@धनि, एकदा (हवे तर थोड्या प्रमाणात) करून पहा, फारसं काही अवघड नाही!

एवढे तेल माझ्या हातून कधी पडणार नाही कोणत्याही पदार्थात...

@अश्विनी११, हवे तर वाढण्याआधी तेल काढून वाढावे.

शेवटचे वाक्य फारच भारी आहे

'जाता जाता' तर फारच भारी!

@धनवन्ती
@rmd

धन्स्! हो, अनेकांची "लोणचे टिकत नाही" ही तक्रार असते. आमच्या घरी श्रीकृपेने वर्षानुवर्षे लोणची टिकतात!

मतभिन्नतेच्या आदरासहीत -

"लोणच्यात फार तेल घातलेले दिसते", किंवा इन जनरल एखाद्या पाकृ मध्ये "तेल फारच दिसते" असा एक मतप्रवाह असतो. आरोग्य दृष्टीने तेल मर्यादित प्रमाणात सेवन करणे हेच योग्य आहे यात दुमत नाही.

तथापि काही कृती त्या-त्या प्रमाणात साहित्य घातल्याशिवाय यशस्वी होत नाहीत असा अनुभव आहे. विशेषतः आंबा आवळा यांसारखी दीर्घकाळ टिकवण्याची लोणची, त्यावर तेलाचा थर (नुसता तवंग नव्हे! Wink ) नसेल तर टिकणार नाहीत.

तेल नको असेल तर दुसरा उपाय म्हणजे मीठ अधिक प्रमाणात घालणे. त्यानेही लोणची टिकतात. In fact मिठाचे लोणचे तर, जर संक्रांतीपर्यंत टिकले तर पुन्हा कधीही खराब होत नाही!

लोणचं खराब होण्याची शक्यता वाटत असेल तर अर्धा-अर्धा किलोच्या काचेच्या बरण्यांमध्ये लोणचं घालावं. एक संपल्यावरच दुसरी काढावी.

आजचा सुविचार: Wink

"'दीर्घकाळ टिकवण्याची लोणची' त्यांच्या lifecycle च्या कोणत्याही टप्प्यात फ्रिजमध्ये ठेवावी लागणे हे ती लोणची फसल्याचे लक्षण आहे!"

- (लोणचेप्रेमी) वामन राव

अवांतर: वैशाखात अवकाळी पाऊस झाला तर लहानलहान कैऱ्या पडतात त्या सबंध कैऱ्यांचे (कैऱ्या न चिरता) लोणचे देखील घालतात. कुणी try केलेय का?

मस्त कृती आणि फोटो.
माझ्या मैत्रिणीने थोडं कैरीचं लोणचं पाठवलंय. त्यात लसणाच्या अख्ख्या पाकळ्या आहेत. खूपच चवदार लागतंय त्यामुळे.

मस्त पाककृती..
शिवाय मन ललचवणारे आणि जीभेला खवळायला लावणारे फोटोज्.

>>>...त्यात लसणाच्या अख्ख्या पाकळ्या आहेत. खूपच चवदार लागतंय त्यामुळे.

@SharmilaR, +१

लोणची-चटण्यांमध्ये अधूनमधून सापडणाऱ्या लसणाच्या पाकळ्या चावून खायला खरंच छान लागतात!

अवांतर: वैशाखात अवकाळी पाऊस झाला तर लहानलहान कैऱ्या पडतात त्या सबंध कैऱ्यांचे (कैऱ्या न चिरता) लोणचे देखील घालतात. कुणी try केलेय का?
<<
त्याला बाळकैरीचं लोणचं म्हणायचं. मसाल्याच्या वांग्याच्या भाजीसाठी वांग्याला देतो तसे दोन काप देऊन आतली कोय काढून टाकून आत मसाला भरून करतात. कोयीची बाठ धरलेली नसल्याने साध्या विळीवर चिरता येतात.
मसाल्यामधे आलं लसूण नसतं. भरपूर मेथीदाणे असतात. मिरे, लवंग, बडीशोप, मोहरीडाळ, तिखट, मीठ. तेल तिळाचं वापरायचं.

अवांतर : वैशाखात पडणारा वळवाचा पाऊस खानदेशात 'गड धुण्याचा पाऊस' म्हणून ओळखतात. यानंतर सप्तशृंगी देवीची व इतर लोकल यात्रा सुरू होतात. यात्रेआधी देवीचा गड (किल्ला) धुतला जातो. हा पाउस "जर पडला" तर कॅटेगरीत नसतो, तो येतोच.

तेल नको असेल तर दुसरा उपाय म्हणजे मीठ अधिक प्रमाणात घालणे.
<<
अधिक नव्हे, योग्य प्रमाणात. मग तेल शून्य घातले तरी चालते. आजकाल बीपी आहे म्हणत मिठ गरजेपेक्शा कमी घालायची सिस्टीम आहे. असल्या लोणच्यावर ताबडतोब बुरा धरतो. तेल कितीही घातलं तरी.

पण, सगळे मसाले तेलावर परतून घेतले नाहीत तर चव खुलत नाही. तितकं तरी तेल लागतंच. म्हणजे झीरो ऑईल नाही होत.
रेडीमेड मसाला वापरून केलं, तर बिन तेलाचं लोणचं चक्क २-३ वर्षे देखिल टिकतं.

>>
बरण्यांत घातल्यावर नेहमीच लोणच्यावर तेलाचा वर थर असावा. फोडी उघड्या पडू नयेत, नाहीतर लोणचे खराब होऊ शकते.
काही महिन्यांनी तेल कमी झाले तर तेल तापवून थंड करून पुन्हा घालावे.
<<
या दोन्ही वाक्यांशी १०००% असहमत.
मीठ बरोबर घातलं तर लोणच्यावर तेलाचा तवंग गरजेचा नाही.
खारं/बोअर वेल चं पाणी घालून करतात काही ठिकाणी लोणचं.

बाळकैरीचं लोणचं

शब्द आवडला! बाकी त्या लोणच्यात आमच्याकडे सबंध कैऱ्या (न कापता) घालतात. आवळ्याचे एक प्रकारचे लोणचे सुद्धा सबंध आवळ्याचे करतात.‌

---

लोणच्यातील तेला-मिठाच्या प्रमाणाबद्धल तेलंगाना-आंध्रा मध्ये प्रचलित पद्धतीनुसार वर लिहिले आहे. इतर ठिकाणी वेगळ्या पद्धती असू शकतात.‌

Pages

Back to top