सागा ऑफ साग - सरसो का साग

Submitted by मीपुणेकर on 2 February, 2021 - 23:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ कप - सरसोची /मोहोरीची पानं ( शेंडे खुडून, अधिक माहिती खाली दिली आहे)
२ कप - पालक ( पालकाचं प्रमाण खरतर सागाच्या निम्मं घेतात, पण सागाची शार्प चव वास याची सवय नसेल तर आधी सागाच्या बरोबरीने पालक घालायचा. हळूहळू आवडीनुसार हे प्रमाण निम्म्यावर आणायचं )
१ वाटी - मेथी पाने ( बथुआच्या ऐवजी मी मेथी वापरली)
१ वाटी - हरभरा पाने, शेंडे खूडून ( हि पाने नसतील तर १ अधिक टोमॅटो)
१ टोमॅटो
१/२ अमेरिकेत मिळतो तो कांदा बारीक चिरुन
२ चहाचे चमचे मक्याचे पीठ
५,६ मोठ्या कळ्या लसूण बारीक चिरुन
१ चमचा धणेपूड
१/२ चमचा जिरपूड
१,२ हिरवी मिरची बारीक चिरुन
१ लाल मिरची मोडून
थोडं आलं चिरून
बारीक चिरलेली कोथिंबीर
फोडणीसाठी १ चमचाभर तूप + तूप जळू नये म्हणून थोडंसं तेल, हिंग, हळद, गूळ

क्रमवार पाककृती: 

सरसो का साग!

गेले २,३ वर्षे घरच्या बागेत मोहोरीची झाड येत राहतात. त्याची बरेचदा भाजी केली जायची, पण ती चवीला ठिकठाक लागायची. कदाचीत सागाच्या तीव्र चवीची सवय व्हायला लागते असं मनाला बजावत परत करत रहायचे. पण या मोसमाला बागेत साग दिसायला लागल्यावर मी बर्‍याच ऑथेंटीक सरसो का साग रेसिपीज यु ट्युब वर बघितल्या. काही पंजावी मैत्रिणींच्या घरचे त्यांच्या आई, सासूच्या हातचे साग खाल्ले होतेच. त्या टीपा आठवून एकत्र असा प्रयत्न करुन बघितला आणि या प्रकारे फायनली घरी एकदम पसंद पडलेले, हीट झालेले हे सरसो का साग!

कृती -
१> २ वाट्या पाणी मोठ्या पातेल्यात गॅसवर ठेवून त्यात बारीक चिरलेला साग, पालक, हरभरा, मेथी, थोडं मीठ घालून झाकण लावून शिजु द्याव्यात. त्यात एक छोटा आल्याचा एक तुकडा पण भाज्या शिजताना घालावा. हे प्रेशर कुकर मध्ये करता येतं, लवकर होतं पण शक्य असेल तर या रेसिपीकरता प्रेशर कुकर न वापरता भाज्या बाहेरचं शिजवा असं सुचवेन.
२> भाज्या नीट शिजेस्तोवर तडक्यासाठी कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, मिरच्या बारीक चिरुन घेणे.
३> भाज्या शिजत असताना, पावभाजी मॅशरने त्या अधून मधून हटून घेत रहायच्या. पाणी जर कमी पडत असेल तर थोडं गरम पाणी घालत रहावं.
४> तडक्यासाठी एका पॅन मध्ये, चमचाभर साजूक तूप घालावे, ते जळू नये म्हणून थोडे तेल त्यात घालावे.
५> तूप गरम झाले कि त्यात जीरे, हिंग, किंचीत हळद घालून बारीक चिरलेला लसूण त्यात छान परतून घ्यावा. मग लाल मिरची परतून , हिरवी मिरची, कांदा घालून परतून घेणे.
६> कांदा जरा गुलाबी परतून झाला कि मक्याचे पीठ, धणे पूड, जिरपूड घालून २,३ मि परतून घ्यायचं.
७> मग त्यात टोमॅटो घालून २ मि. छान परतून घ्यायचं
८> आता शिजलेली , हटून एकजीव झालेली भाजी या तडक्यात घालून वरुन अगदी थोडा चवीपुरता गूळ, चव बघून हवं असल्यास मीठ घालायचं, चिरलेली कोथिंबीर घालून एक वाफ आणायची.
भाजी तय्यार. हि भाजी दुसर्‍या दिवशी मुरल्यावर अजून जास्त चविष्ट लागते Happy

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

१. सरसोची पानं भाजी साठी घेताना फक्त शेंडे खुडून घ्यायचे, म्हणजे वरची ३ पानं, त्या बरोबरचा देठ. बाकी खालची पानं भाजीसाठी वापरत नाहीत. ही टीप शेफ रणवीर ब्रार कडून साभार. त्याच्या भाषेत बाकी के पत्ते गाय भैसोंको खिलाते है Happy
२. मक्याचे पीठ फोडणीत भाजून घेतल्याने जास्त चांगली खमंग चव आली, ही टीप शेफ कुणाल कपूर कडून साभार.
३. हि भाजी चिरल्यावर जो ढिग दिसतो त्यामानाने तयार झाल्यावर बरीच कमी होते.
४. सरसो का साग हे मुरल्यावर, दुसर्‍या दिवशी जास्त छान लागते. त्यामुळे आदल्या दिवशी करून दुसर्‍या दिवशी खायची किंवा दुस र्‍या दिवशी खाण्याकरिता पण उरवायची Happy

माहितीचा स्रोत: 
रणवीर ब्रार, कुणाल कपूर, भरत किचन या चॅनेल्सवर बघून प्रत्येकातून काही ना काही घेऊन, आवडीनुसार काही बदल करून हि रेसिपी केली.
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरी कधी हे प्रकरण केले नाही, बाहेरच खाल्लेय, जेव्हा जेव्हा खाल्ले तेव्हा तेव्हा मकई दी रोटी सोबतच खाल्लेय, आणि जिथे जिथे खाल्लेय तिथे हे बेहद्द आवडलेय Happy

ताट छान दिसतंय आणि फोटोही छान. पूर्वी केली जायची तेव्हा पालक घालूनच केली आहे. कॉर्न फ्लोअर घालायला मात्र अजिबात आवडत नाही. पूर्वी रेसिपी लिहिली आहे इथे.

मी अत्ताच बनवलं सरसोंका साग.
ही रेसिपी वाचुन मनात सरसों का साग घोळत होताच. त्यात काल मावशी कडे जाणं झालं अन तिच्या शेतात बहरलेली मिरच्या, मेथी अन अधे-मधे उगवलेली मोहरी दिसली. मग काय.. मोहरीची ताजी ताजी कोवळी पाने अन मेथीची भाजी खुडून घेतली. मिरचीला लटकलेल्या लाल चुटुक मिरच्या घेतल्या. ओला लसुण तिनेच दिला. हरभर्‍याची कोवळी पाने काही उरली नव्हती.. जून होऊन वाळू लागली होती म्हणुन त्याला कॅन्सल केला. टोमटो अन कांदेही तिनेच दिले. मग काय योग जुळलाच..!! Bw

आज कृती मधे सांगितल्या नुसार साग बनवला.. मक्याची भाकरी बनवण्यासाठी पीठ नव्हतं म्हणुन ज्वारीच्या भाकरीसोबत साग हाणला..! Proud
मीच बनवला म्हणुन मला तो चवीला चांगलाच लागला परंतु घरातल्यांनीही चाटून-पुसुन संपवला Bw

भाजी कसली यम्मी दिसतेय, छान फोटो सर्वच. नजरसुख.

मेहनत खूप आहे मात्र, कौतुक आहे तुमचं.

हल्ली आता दोन वर्षात गेलो नाही कुठे बाहेर जेवायला पण डोंबिवलीजवळ कुशला हॉटेल आहे तिथे मक्केकी रोटी, सरसोका साग दोन्ही जाम टेस्टी असते. कधी गेलो की मागवतो.

DJ...... मस्तच वर्णन. लकी आहात, शेतातल्या सर्व भाज्या ताज्या ताज्या मिळाल्या.

अनु, डिजे, वावे, ऋन्मेष, सोनाली, ब्लॅककॅट, सायो, रम्ड, सिम्स, सनव, सुनिधी, अंजू धन्यवाद!

@सायो, मक्याचे पीठ अगदी थोडे आहे भाजी नीट मिळून येण्याकरीता, परतून घेतल्याने त्याचा असा कच्चा वेगळा स्वाद भाजी खाताना जाणवत नाही. तुझी रेसिपी आत्ता पाहिली, छान आहे.

@ डिजे शेतातली फ्रेश भाजी तोडून आठवणीने हि भाजी करुन पाहिलीत म्हणून विशेष कौतुक. पुढच्या वेळी कराल तेव्हा फोटो काढून आम्हाला पण दाखवा Happy

या विकांताला बागेतल्या भाज्या तोडून परत सरसों का साग केले होते. आज मक्के दी रोटी बरोबर खाल्ले, खरतर मक्के दे (तूप लावलेले) फुलक्यांबरोबर. हे भाज्या तोडतानाचे, आणि फायनल डिशचे फोटो

१>सरसोची पानं -

Saag1.jpg

२> हरभर्‍याची पानं -

Harbhara1.jpg

३> मेथी -

Methi1.jpeg

४>सरसो का साग करण्यासाठी लागणार्‍या भाज्या तोडून तयार -

Bhajya1.jpg

५> सरसों का साग नि मक्के दे फुलके -

Saraso ka Saag with Makke di Roti.jpeg

तोंपासू रेसिपी आहे. सगळे फोटोज भारी.

आमच्याकडे बागेतल्या भाज्या नाहीत. तर दुकानात सरसों मिळेल का?

रायगड सेम पिंच.मलापण हा प्रश्न आहे.

Sprouts /wholefoods सारख्या अमेरिकन दुकानात मस्टर्ड ग्रीन नावाने मिळते ते हेच का?
आमचं इंडियन ग्रोसरी होपलेस आहे, तिथे काही मिळणार नाही.

सागाची पानं अशी नाहिये ओ.
हिरव्या पालेभाज्या घोटून केलेल्या प्रकाराला उत्तरेत “साग” म्हणतात.
सरसों- मोहरीची पानं/राईची पानं
मेथी
पालक
वगैरे.

पारंपारीक पद्धतीत, बुथवा/ बथवा अगदी मस्ट आहे. आणि, सरसों बरोबर बुथवा विकतातच. आमची बिहारी कूक मस्त करायची

@ DJ, मृणाली, अनु, अंजू, अस्मिता, रायगड, क्रिशा धन्यवाद Happy

@रायगड, सनव
हो सरसों ची जुडी ईंग्रो मध्ये मिळेलच, पण ईथे अमेरिकन ग्रोसरी मध्ये पण बघितली आहे, होल फुड्स, स्प्राऊट्स मधे मस्टर्ड ग्रीन्स नावाने. कधी कधी त्या सरसोंच्या जुडीला पुढे फुलांचे/कळ्यांचे तुरे असतात. अर्थात आमच्या ईथे होल फुड्स मध्ये काय डोसा काऊंटर पण असतो, त्यामुळे मस्टर्ड ग्रीन्/सरसो दिसतोच यात नवल नाही Proud ईंग्रो मध्ये मात्र मिळेलच.

@प्रकाश घाटपांडे, तुम्हाला सागाची पानं म्हणजे बहुतेक सरसों /मोहोरीची पानं म्हणायचं असावं. पंजाबकडे साग हे सर्वनाम आहे कोणत्याही घोटून केलेल्या पालेभाजीला. सरसोचं साग, पालकाचं साग ई.

@झंपी, आवडीनुसार, तिथल्या भौगोलीक उपलब्धतेनुसार सरसोच्या सागात बथुआ, मेथी, पालक, शाल्गम, मुळ्याची पानं घातलेला पाहिला चाखला आहे. मला बथुआची उग्र चव वाटली, म्हणून मी तो स्कीप केला. त्या ऐवजी घरी सहजी असणारी मेथी, पालक अशा भाज्या वापरुन रेसिपी केली.
तुम्हाला येत असेल तर किंवा या पंजाबी भाजीची रेसिपी तुमच्या बिहारी कूककडून घेऊन ईथे द्या, ती पण ट्राय करेन. Wink
सध्या बागोमे सरसों कि बहार है, हमको सरसों के साग से प्यार है Happy

अर्थात आमच्या ईथे होल फुड्स मध्ये काय डोसा काऊंटर पण असतो, त्यामुळे मस्टर्ड ग्रीन्/सरसो दिसतोच यात नवल नाही >>
अरे वा! कुठे न्यु जर्सि?
साग भारी दिसतय, आमच्या इथल्या इन्डियन ग्रोसरी मधे घोटाघोटी केलेले ताज साग मिळाल त्यात बथुआ होता बहुतेक घरी आणुन त्यात कान्दा-फोडणि ही स्टेप करायची होती फक्त
तुझा साग पण भारी दिसतोय आता असा करुन बघेल, मधे नुसता बथुआच मिळाला आणि सरसो नव्हता मग बथुआची साग केला.

मीपुणेकर, मी तुम्हाला एक माहिती दिली.
माझी रेसीपी दिली असती पण झेपेल का? तुम्ही तुमच्याकडे जे काही पिकतं, तुम्हाला जे झेपतं , जमतं व पचतं तसेच करून खाल्लेलं बरं , नाही का?
तुम्हाला उगीच उग्र व्हायचं (आणखी).

Pages

Back to top