कर्वेतले दिवस १३: शेवटचा अभ्यास दौरा आणि "पेरले" गांव

Submitted by मार्गी on 26 November, 2026 - 01:41

✪ कोयनानगरला भेट
✪ आपत्ती व्यवस्थापन- एक महत्त्वाचा विषय
✪ "पेरले" गांव- पेरणी पूर्ण
✪ गंतव्यापेक्षा प्रवासाचा अनुभव समृद्ध करून जातो
✪ Karve Institute- a great co-learning space
✪ उठ गईं यारों की महफील...

२००८ चा एप्रिल महिना. कर्वे इन्स्टिट्युटमधले शेवटचे दिवस! ग्रामीण व नगर समुदाय विकास (युआरसीडी) स्पेशलायजेशनच्या अभ्यासक्रमात आपत्ती व्यवस्थापन हासुद्धा एक घटक होता. आज आपत्ती व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला कळालं आहे. त्या घटकाच्या अनुषंगाने कोयनानगर धरण परिसरात अभ्यास दौरा ठरला. परीक्षांच्या अगदी आधी तो झाला. कोयना धरण परिसरात १९६७ मध्ये आलेला भूकंप, तिथली भौगोलिक परिस्थिती, धरणासारख्या विकास प्रकल्पांची सुरक्षितता व आपत्ती नंतर वेगवेगळ्या कृती व मदत कार्य असा हा विषय होता. आमच्या स्पेशलायजेशनचा फार जवळून संबंध न येणा-या दोन फॅकल्टीज ह्यावेळी आमच्यासोबत होत्या- प्रा. गीता राव आणि प्रा. चित्रलेखा राजुस्कर मॅडम. राजुस्कर मॅडम माझ्या व्यक्तीगत मार्गदर्शिका (individual guide) होत्या. प्रा. गीता राव मॅडमसोबत संवाद करण्याची‌ संधी ह्या वेळी मिळाली. त्यांच्या स्किल लॅब्ज व लेक्चर्स अप्रतिम असायचे. ह्या निमित्ताने आणखी गोष्टींवर चर्चा करता आली.

ह्या लेखाचा व्हिडिओ सारांश इथे बघता येईल.

(ब्लॉगवर सगळे लेख एकत्र वाचता येतील. विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, सायकलिंग, फिटनेसबद्दलचे लेख वाचता येतील.)

कर्वे इन्स्टिट्युटमधल्या MSW अभ्यासक्रमामध्ये अशी मांडणी होती की, अनेक गोष्टी अप्रत्यक्षसुद्धा घडायच्या. जसं विद्यार्थ्यांचं एकमेकांसोबतचं शिकणं आणि सोबत असणं. हे एक प्रकारचं दोन वर्षांचं गट कार्यच होतं. असे अभ्यास दौरे, सोबत केलेल्या वेगवेगळ्या असाईनमेंटस, वस्तीमध्ये जाऊन केलेलं काम आणि एकमेकांना अभ्यासात केलेली मदत. विद्यार्थी खूप वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे असल्यामुळे एकमेकांकडून खूप काही‌ शिकण्यासारखं होतं. कैलास, त्रिवेणी आणि अनेक जण तर फिल्डवर काम करणारेही होते. त्यामुळे सुद्धा असं सतत शिकायला मिळत गेलं. आजच्या भाषेत सांगायचं तर हा अभ्यासक्रम खूप सुंदर अशी co-learning space होता!

कर्वेनगरमधून सकाळी निघून सगळे दुपारपर्यंत कोयनानगर परिसरात पोहचलो. सातारा जिल्हा! तिथला समृद्ध निसर्ग बघायला मिळाला. धरणाची भिंत, धरणाचे दरवाजे व परिसर जवळून बघता आला. १९६७ च्या भूकंपात परिसरात मोठं नुकसान झालं तरी धरणाला काही इजा झाली नव्हती. ह्या भागात नेहमीच छोटे भूकंप होत असतात. परिसर हे बघताना आणि प्रवासातही विकास, पर्यावरण आणि धरण आणि विस्थापितांच्या समस्या अशी मोठी चर्चाही झाली. ह्या विषयावर एकच असं अंतिम नसतं- गोष्टींना अनेक पैलू असतात आणि वेगवेगळ्या बाजू असतात. मावळ परिसरातल्या फिल्ड वर्कमध्येही पवना धरणग्रस्तांची परिस्थिती कळाली होती. विकासाबरोबर पर्यावरण संतुलन व संवेदनशील प्रकारे पुनर्वसन हा मध्यम मार्ग आहे.

परत येताना आमच्या सोबतच्या राहुल जाधवचं गाव वाटेवर होतं. त्याने काही दिवसांपूर्वी त्याचं नाव राहुल जाधवपासून राहुल प्रकाश सुवर्णा असं बदललं होतं. आणखी एक मैत्रीण अनीहा- तिनेही नंतर अनीहा नीरजा राजन असं नाव बदललं. राहुलच्या गावामध्ये धावती भेट दिली. गावाचं नाव होतं "पेरले!" इथे जे पेरले ते नंतर उगवेल! आमची पेरणी पूर्ण होत आल्याचंसुद्धा ते नाव सूचक होतं.

हा अभ्यास दौरा शेवटचा ठरला! सगळ्यांचे रिसर्चही सादर झाले. कँपस इंटरव्ह्यूमध्ये काही जण सिलेक्टसुद्धा झाले. अगदी गमतीची गोष्ट म्हणजे हिंदुस्तान झिंक कंपनीने एचआर एक्झिक्युटीव्ह पदासाठी घेतलेल्या कँपस राउंडमध्ये पूर्ण कॉलेजमधून नेमका मीच पुढच्या राउंडसाठी सिलेक्ट झालो. इतर कोणीही नाही झाले- त्या स्पेशलायजेशनचेसुद्धा! सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. एचआर पद खूप वेगळं होतं. ती दिशाच वेगळी होती. पण मोठी कंपनी व संधी होती. त्यामुळे मी त्याची तयारी करायचं ठरवलं. कंपनी ऍक्ट, फॅक्टरी ऍक्ट अशा गोष्टींसाठी त्या स्पेशलायजेशनच्या राजुस्कर मॅडम व इतर मित्र- मैत्रिणींनी मदत केली!

असे कर्वेचे दिवस हळु हळु संपत गेले. कधी कधी गंतव्य स्थानापेक्षा प्रवास अधिक समृद्ध करणारा असतो. Journey is more enriching than the destination itself. खूप समृद्ध करणारी दोन वर्षं हळु हळु संपायला आली. लवकरच सगळ्यांची भीषण ताटातूट होणार होती. हॉस्टेलचे मित्र- इतर मित्र मैत्रिणी! पुन: असे एकत्र कधी भेटणार, विचारानेच अस्वस्थ होत होतं. राहून राहून ते गाणं आठवत गेलं:

कब, कहाँ सब खो गईं, जितनी भी थीं परछाईयाँ

उठ गई यारों की महफ़िल, हो गई तन्हाईयाँ।

पुढचा भाग: कर्वेतले दिवस १४: "स्वच्छ" सोबत एक महिन्याची ब्लॉक प्लेसमेंट

-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 25 नोव्हेंबर 2026.

Group content visibility: 
Public - accessible to all site users