कर्वेतले दिवस ११: “पीआरए" साठी दुर्गम गावांचा अभ्यास दौरा

Submitted by मार्गी on 10 October, 2026 - 06:29

✪ रिसर्च जणू जीवनाचं रूपक- प्रत्येकाच्या गोष्टी होणार आहेत
✪ पीआरए- Participatory Rural Appraisal
✪ गावांचा अभ्यास आणि सामाजिक विश्लेषण
✪ आंदर मावळची गावं आणि वाड्या
✪ प्रभात फेरी, थाळी फेरी आणि गांव फेरी
✪ फिल्ड वर्कमध्ये मनासारखे प्रयत्न केल्याचं समाधान

२००८ चा मार्च महिना! थंडीचे दिवस जाऊन उन्हाळा सुरू होण्याचे दिवस. त्याबरोबर ऐन सबमिशनचाही हंगाम आणि हातघाईचे दिवस. हळु हळु एक एक कामं होत गेली. संशोधनाचं कामही हळु हळु सगळ्यांचंच होत गेलं. मला त्या बाबतीत ते अगदी जीवनाचं रूपक वाटलं. संशोधनाचं काम- सगळे टप्पे. अगदी प्रपोझल फायनल होण्यापासून ते, टूल डिझाईन, प्रीटेस्टिंग, डेटा कलेक्शन ते थेट प्रबंध लिहीण्यापर्यंत. हे सगळं जणू जीवनातल्या टप्प्यांसारखं आहे. प्रत्येकाचाच रिसर्च सबमिट होणार आहे. ते ते टप्पे पूर्ण होणार आहेत. स्थिती वेगवेगळी असेल- कुठे असं तर कुठे तसं असेल. फरक असतील. पण गोष्टी होणार आहेत. जेव्हा ही जाणीव झाली तेव्हा हळु हळु तो ताण कमी होत गेला. उशीर होईल, पण सबमिशन्स होतील.

(ब्लॉगवर सगळे लेख एकत्र वाचता येतील. विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, सायकलिंग, फिटनेसबद्दलचे लेख वाचता येतील.)

ह्या लेखाचा व्हिडिओ सारांश इथे बघता येईल.

जानेवारी- फेब्रुवारीप्रमाणे मार्चमध्येही फिल्ड वर्कसाठी फिरण्याची संधी मिळाली. निमित्त होतं आमच्या स्पेशलायझेशनच्या एका अभ्यासाचं. PRA अर्थात् Participatory Rural Appraisal म्हणजे सहभागावर आधारित ग्रामीण मूल्यांकन. हा अभ्यासक्रमातला एक घटक होता. त्यामुळे आमच्या स्पेशलायझेशनच्या विद्यार्थ्यांचे तीन गट केले गेले. माझ्याच फिल्ड वर्क संस्थेच्या तीन ठिकाणी आम्ही गटांमध्ये हा अभ्यास केला. तिथे आम्हांला हा अभ्यास करायचा होता. माझ्या गटामध्ये किशोर बिडवे, प्रवीण चोखंद्रे, प्रभाकर पंडित आणि त्रिवेणी भोंदे होते. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातल्या आंदर मावळ परिसरात मालेगांव, इंगळूण, पिंपरी, मदगेवाडी अशी ही गावं होती. साधारण दोन- तीन दिवस तिथे मुक्काम होते. अगदी आतली दुर्गम गावं आणि डोंगर! मार्चमध्ये काही ठिकाणी लागलेला/ पेटवलेला वणवा दिसला. ह्या अभ्यासाच्या फॉरमॅटनुसार प्रत्येक गावाचं एक प्रकारे मॅपिंग करायचं होतं. त्यासाठी गावात फिरणं‌ (village transact), नकाशा बनवणं, स्टेकहोल्डर ऍनालिसिस, मुख्य संस्था व व्यक्तींसोबत संवाद असे टप्पे होते. आणि हे आम्ही ग्रामस्थांसोबत मिळून करणार होतो. लोकांना कसं बोलतं करायचं आणि कशी माहिती गोळा करायची हे इथे शिकायला मिळालं. त्रिवेणी आणि किशोर लोकांसोबत बोलण्यात पटाईत होते. बरोबर माहिती काढायचे. ते लोकांशी कसा संवाद करतात, कसं लोकांना सोबत घेतात हे मला शिकायला मिळालं. त्याशिवाय इतरही गोष्टी होत्या. लोकांसोबत चर्चा, महिला गटांसोबत बैठक, थाळी फेरी इ. सोबतीला त्या त्या ठिकाणचे संस्थेचे कार्यकर्ते होतेच. सगळा अनुभव छान होता.

ह्या अभ्यासाच्या काही दिवस आधी फिल्ड वर्कचा भाग म्हणून माझ्या संस्थेला एक सर्वेक्षण करायचं होतं. त्याचाही अंतर्भाव ह्या पीआरएच्या प्रक्रियेत केला गेला होता. पण त्या अभ्यासाचं टूल/ प्रश्नावली फार स्पष्ट नव्हती असं माझ्या फिल्ड वर्क गाईडचं मत होतं. त्यामुळे पीआरए प्रक्रियेदरम्यान आम्ही ते सर्वेक्षण केलं तरी त्यात काही उणीवा राहिल्या. काही गावांमध्ये अपेक्षित ती माहिती मिळाली नाही. तेव्हा नंतर माझ्या फिल्ड वर्क दिवसांमध्ये ती माहिती मिळवण्यासाठी मी परत काही गावांमध्ये गेलो. माझ्या गटाची काही गावं आणि काही इतर गटांचीही. त्यासाठी जास्त मेहनत केली आणि शक्य तितकी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. गावांमध्ये तास- दोन तास चालत जाऊन ते प्रवास केले आणि माहिती मिळवली. तो अनुभवसुद्धा खूप वेगळा आला. माझ्या बाजूने शक्य तितके प्रयत्न केले. माझ्या ह्या टर्ममधल्या फिल्ड वर्कमध्ये आर्टिक्युलेशन कदाचित कमी‌ होतं, पण प्रयत्न नक्कीच मी केले. माझ्या फिल्ड वर्क गाईडने प्रयत्नांचं कौतुक केलं.

खूप वेगवेगळे अनुभव देत कर्वेमधले दिवस हळु हळु शेवटच्या टप्प्यावर आले. कॉलेज संपत आलं आणि हळु हळु कँपस इंटरव्ह्यूजचं वारं आलं. काही‌ एजन्सीज कँपसवर इंटरव्ह्यूसाठी येणार असल्याचं कळालं. अशा असंख्य आठवणी आणि भरभरून मिळालेलं शिकणं! मित्र- मैत्रिणींची सोबत आणि त्यांच्यासोबत आणि त्यांच्याकडून शिकलेल्या गोष्टी. शिक्षक- शिक्षिका तर सगळ्याच उत्तम होत्या. कुंभार कच्च्या मडक्याला जसं आतून सावरतो आणि बाहेरून आघात करतो, तसं शिक्षकांचं शिकवणं आणि सोबत करणं.

हॉस्टेलच्या आठवणी तर वेगळ्याच. हॉस्टेलवरची होळी- रंगपंचमी खूप लक्षात आहे. लहानपणी रंगपंचमी हा माझ्यासाठी अतिशय भयानक दिवस असायचा. घरी रंग लावायला मित्र तर यायचेच पण मोठेही खूप रंग लावायचे. तेव्हा मी एका खोलीच्या कोपर्‍यात किंवा घराच्या छतावर लपून बसायचो. पण कर्वेमध्ये राहून रंगपंचमीचाही आनंद घेता आला! मित्रांसोबत हा आनंद घेता आला. शिवाय सगळ्या सबमिशनचं ओझं बाजूला ठेवून "स्विच ऑफ" होता आलं! ब्रेक घेऊन पुढच्या कामांसाठी ताजं होता आलं!

पुढचा भाग: कर्वेतले दिवस १२: कँपस इंटरव्ह्यू, सबमिशन्स आणि परीक्षा

-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 9 ऑक्टोबर 2026.

Group content visibility: 
Public - accessible to all site users