
नमस्कार मायबोलीकर मंडळी!
आशा!
आशा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो प्रसन्न, हसरा चेहरा, आणि मनात चालू होतं 'सलोना सा सजन है', ' अभी ना जाओ छो़डकर', 'बिते ना बिते ना रैना', किंवा 'झुमका गिरा रे' नाहीतर 'पांडुरंग कांती', 'बुगडी माझी' आणि 'विकत घेतला श्याम'!
आशाने इतक्या विविध प्रकारची, भाषांतली, संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली अनेकविध ढंगी गाणी गायली आहेत की स्तिमित वगैरे होणे सोडा, आपल्याही चेहर्यावर फक्त हसुच येतं.
'या' गाण्यातला 'तो' शब्द फक्त आशाच असा उच्चारू शकते!, 'हे' गाणं आशाने किंचित ऑफबिट उचलल्याने जो एकदा काळजाचा ठोका चुकलेला असतो त्याचा हिशेब कधी लागणे शक्यच नसते. कुठे लांबवलेला श्वास, कुठे घेतलेली ती मुरकी, आणि कुठे सहगायकासोबत जाणवणारे सुरल द्वंद्व. 'हे' गाणं आशाने गायलं असतं तर! 'बाकी गाणी गा रे, पण हे गाणं आशा शिवाय कुणाच्या आवाजात! कल्पनाही नको' असा विचार आपल्या मनात येतोय तोवर आशा तिच्याच गाण्यांची मोडतोड करुन परत जो काही सुरांचा मनोरा बांधते... वर रील्स ही करते! शब्द थिटेच पडतात! ही जी सगळी शब्द सुर आणि तालांची तुम्हाला जाणवलेली जादू आहे, ती आमच्या सोबत वाटुन घ्यायला आणि हा आनंद द्विगुणित करायला हा उपक्रम.
आशाबद्दल अनेक दिग्गजांनी खूप काही लिहिलं- बोललं आहे. पण ही आशा तुम्हाला नक्की कशी दिसते? तिची गाणी ऐकताना तुम्हाला नक्की काय भावते? त्या आठवणी इथे एकमेकांसोबत वाटून घ्यायला हा उपक्रम. आशाने गायलेल्या गाण्यात तुम्हाला काय मिळालं, भावलं, जाणवलं ते आम्हाला याच धाग्यात प्रतिक्रिया लिहून सांगा.
गणपती बाप्पा मोरया!
चांगला उपक्रम. पण 'बिते ना
चांगला उपक्रम. पण 'बिते ना बिते ना रैना' आशाचे नाही.
बिते ना बिते ना रैना - रुदाली
बिते ना बिते ना रैना - रुदाली हे आशाचे आहे.
तुमच्या मनात बहुतेक बिते ना बिताई रैना असावं.
ओह ओके...हे लक्षात नाही आलं.
ओह ओके...हे लक्षात नाही आलं. धन्यवाद.
रुपेरी वाळूत माडांच्या बनात -
रुपेरी वाळूत माडांच्या बनात - कधीही ऐकलं की मूड फ्रेश होतो. यातला आशाचा ‘हाय’ खासच. किंचीत नशिला पण आगाऊ नाही. आणि दोन्ही वेळा उच्चार वेगवेगळा. त्या नुसत्या ‘हाय’साठी गाणं ऐकावं.
'ऋतु हिरवा ऋतु बरवा' अल्बम-
'ऋतु हिरवा ऋतु बरवा' अल्बम- प्रत्येक गाण्याला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. आणि प्रत्येक गाण्याचे ते ते रुपडे, आशाने आपल्या आवाजातून, इतके सुंदर रीत्या वठविले आहे.
ऋतु हिरवा ऋतु बरवा - अक्षरक्षः कार्ल्याच्या डोंगरावर पावसाळ्यात गेल्यासारखे वाटते. आपण डोंगरमाथ्यावर आणि समोर विस्तीर्ण पसरलेले हिरवे सौंदर्य. कुठे लहान खोपटी तर कुठे पाचूची शेते. भरारा वारा आणि आपण ओलेचिंब , देवीचे दर्शन घेउन नंतर सॄष्टीचे आकंठ रसपान करत आहोत असे अगदी असेच वाटते. आशाने इतकं कर्णमधुर गायलेले आहे हे गाणे. मनास प्रफुल्लित करणारा आवाज. शांता शेळके यांच्या कवितेला, आशाच्या आवाजाचे लाभलेले कोंदण.
झीनी झीनी वाजे बीन - बा भ बोरकरांची दिव्य प्रतिभा आणि शब्द.
सौभाग्ये या सुरांत तारा
त्यातुन अचपळ खेळे पारा
अलख निरंजन वाजविणारा
सहजपणात प्रवीण
आज परत ऐकले आणि 'मेंटल हेल्थ डे' घेउन रजा घ्याविशी वाटली. फक्त हा अल्बम ऐकत रहाण्याकरता. निव्वळ जादूई शब्द आणि सूर.
हे काही अभ्यासपूर्ण निरीक्षण
हे काही अभ्यासपूर्ण निरीक्षण वगैरे नाही. गाणी ऐकताना , पाहताना जाणवलेली गोष्ट.
गाण्यात जिथे अभिनय लागतो, तिथे संगीतकाराला आशा लागते.
शंकर जयकिशन आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे आशाची तुलनेने फार कमी गाणी आहेत.
शंकर जयकिशनच्या तीसरी कसम मधली नायिकेची इतर गाणी लताने गायलीत. पण पान खाए सैंया हमारो आशाने.
लक्ष्मीकांत प्यारेलालच्या शिकारमधलं पर्दे में रहने दो आणि आए दिन बहार के मधलं खत लिख दे सांवरिया के नाम बाबू.
शिकारमध्ये आशाची आणखीही गाणी आहेत , पण ती हेलनवर. आए दिन बहार के मधली इतर गाणी लताने गायलीत (सुनो सजना पपीहेने हे यातलंच )
यात लता आशा तुलना करायचा हेतू नाही. पण आशाने चित्रपट सृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी स्वतःची अशी वेगळी शैली निर्माण करण्यासाठी केलेली मेहनत या गाण्यांत दिसते.
तिच्या स्वभावातला मिश्किलपणा तिच्या कार्यक्रमांतल्या निवेदनातूनसुद्धा दिसून येतो. आपले संगीतकार पाश्चात्यांकडून उचलेगिरी करतात याबद्दल " मी इरॉसला अमुक अमुक पिक्चर लागलाय, तो पाहून इन्स्पायर होऊन येते हं," असं म्हणते.
शिकारला शंकर जयकिशनचे संगीत
शिकारला शंकर जयकिशनचे संगीत आहे, लक्ष्मीकांत प्यारेलालचे नाही.
बसेरा चित्रपटात आशाचे गाणे आहे 'आउंगी एक दिन, आज जाऊ'. सुरवात रेखावर होते, अल्लड खेळकर बालेचा मूड आहे मग मधले एक कडवे राखीवर आहे त्यात प्रौढ गृहिणीचा मूड आहे, दोन्ही आशानीच गायली आहेत, राखीवर दोन ओळी झाल्यावर क्षणात टोन बदलून रेखावर जो पकडते तो केवळ अप्रतीम! हे आशाच करू जाणे!
तसंच आओ हुजूर तुमको सितारोंमे ले चलू मधील हरकती! आहाहा! आशाशिवाय दुसर्या कुठल्या आवाजात हे ऐकायची कल्पनाच करवत नाही.
ओ निगाहे मस्ताना मधे आशा फक्त गुणगुणली आहे पण ते humming ही इतके गोड मोहक आहे आणि पडद्यावर नूतनने त्यात बहार आणली आहे!
खातुबा आणि हंगामा हो गया.
खातुबा आणि हंगामा हो गया.
{शिकारला शंकर जयकिशनचे संगीत
{शिकारला शंकर जयकिशनचे संगीत आहे, लक्ष्मीकांत प्यारेलालचे नाही.}
हो. खरंच की!
https://music.youtube.com
https://music.youtube.com/watch?v=XZwi5u6iiS0&list=RDAMVM1pTEPDDRmPQ
ही खरी मंगेशकर घराण्याची गायकी. दीनानाथ मंगेशकर ह्यांचा वारसा.
माझ्या अल्प मतीनुसार पंडित वसंतराव देशपांडे असे गात. उदा, बगळ्यांची माळ फुले...
दोनही गाणी माझ्या अत्यंत आवडीची.
बगळ्यांची माळ फुले इथे आहे.
https://www.youtube.com/watch?v=3SWSEirzky8
ही खरी मंगेशकर घराण्याची
ही खरी मंगेशकर घराण्याची गायकी. दीनानाथ मंगेशकर ह्यांचा वारसा. >> इंटरेस्टिंग. याबाबतीत काहीच माहिती नाही.
या गाण्यात दीनानाथ मंगेशकरांचा वारसा काय आहे हे सांगितलंतर बरं होईल.
आशा एक दोन गाण्यांपुरती नाही.
आशा एक दोन गाण्यांपुरती नाही.
लता आणि आशाबद्दल संमिश्र भावना आहेत. कलाकार मृत्यूनंतरही आपल्यासोबतच राहतात. त्यातही फिल्मशी संबंधित. आपले जवळचे लोक मृत्यूनंतर आपल्याला पुन्हा कधीही भेटत नाहीत. ना त्यांचे व्हिडीओ, फोटो पाहून दु:खी व्हावंसं वाटतं. कलाकारांचं तसं नाही. म्हणुन रुसवे फुगवे हे वेगळ्या पातळीवर असतात.
लता आशाचं पॉलिटिक्स, काहीही किस्से सांगणे,ते सहेतुक असणे या गोष्टींमुळे अढी असतेच. पण कलाकार म्हणून दोघींबदलचा आदर ही स्वतंत्र गोष्ट आहे. मेंदूचे दोन वेगवेगळे कप्पे आहेत हे. एकात व्य्कती म्हणून अॅनालिसीस दुसर्यात कलाकार म्हणून.,
हंगामा हो गया या गाण्यात जो दंगा तिनं घातलाय, तो काळ पाहता ग्रेटच आहे. आता अनेक फिमेल सिंगर्स हे करतात. पण आशाने तो रस्ता निर्माण केलाय. त्या वेळी बायकांनी काय गाणी म्हणावीत, कुठली म्हणावीत यावरून जज्ज केलं जायचं. त्या काळात आशाने गायलेली गाणी हे धाडस तर आहेच. पण ती अजरामर करून ठेवण्याचं सामर्थ्य तिच्यात होतं. सुनिधी चौहान अशी गाणी गाऊ शकते. पण आशाचा आवाज जेव्हढा कानाला गोड आहे त्याला तोड नाही.
तेच खातुबा गाण्याबद्दल. कमाल केलीय यात.
आशाची अशी एक दोन गांंणी काही काळ दरवळतात, मग दुसरी गाणी सोबत करतात. मोठा खजिना आहे. म्हणून नवीन गाणी ऐकायला वेळच मिळत नाही.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=C-ag0VYw8Vo&list=RDC-ag0VYw8Vo&start_rad...
Parvashta Pash Daive
https://www.youtube.com/watch?v=9CByIyG8BO8&list=RD9CByIyG8BO8&start_rad...
Yuvatimana Darun Ran
ऐका. आवाजातील स्पंदने ऐका.
ती ऐकलीत गाणी.
ती ऐकलीत गाणी.
शास्त्रीय गाणी ऐकतो. पण शास्त्रीय संगीताचं ज्ञान नाही. तुमच्यासारख्या जाणकाराला जे समजेल ते मला समजेलच असं नाही.
फिल्मी संगीत हे संगीतकाराचं फिल्ड आहे असं मला वाटतंय.
जब सामने तुम आ जाते हो क्या
दुकाटाआ
जब सामने तुम आ जाते हो क्या
जब सामने तुम आ जाते हो क्या जानिये क्या हो जाता है - खरे तर अगदी कोवळ्या वयातील प्रेमाचे हे गाणे आहे. आशाने काय सुंदर गायले आहे आणि जगजीत सिंग यांचा आवाज. माझे फार आवडते गाणे आहे. तो जो कोरस आहे धुंद करणारा आहे. हे गाणे ऐकताना, ९० चा मंतरलेला काळ परत येतो. अक्षरक्षः कळ येते हृदयात.
आशा आणि जगजीत सिंग निव्वळ जादू
प्लीज ऐकाच.
---------------------
इकडे फ्युनरलला त्या व्यक्तीच्या आवडीचे गाणे लावतात. माझ्या फ्युनरलला मला हे गाणे लावलेले आवडेल.
फार छान लिहितायत सगळेच आशा
फार छान लिहितायत सगळेच आशा ताईंबद्दल
मराठीतील त्यांनी गायलेलं https://www.youtube.com/watch?v=RSlLjXpjK4M
हे गाणं मला फार आवडतं. यातील एक ओळ " लागुनी थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी" यातील शिरशिरी हा शब्दोच्चार आशा ताईंनी असा काही केलाय की क्या कहने... पहाटेच्या गुलाबी थं डीत एक बोचरी वार्याची झुळूक अंगाला स्पर्शुन गेल्यावर जे फिलिंग येतं ते केवळ हा शब्द त्यांच्या आवाजातून ऐकताच त्या जाणीवेची अनुभुती देतं, नक्की ऐका.
जर तुम्हाला ते गाणे आवडत
जर तुम्हाला ते गाणे आवडत असेल तर मग हेही आवडावे.
"केव्हा तरी पहाटे उलटून रात्र..."
https://www.youtube.com/watch?v=su8xRwwaT-w
सुरेश भट. हृदयनाथ, आणि आशा ताई ह्यांचा त्रिवेणी संगम!
आशा भोसले - अदनान सामी चं,
आशा भोसले - अदनान सामी चं, 'क्या हैं, यह उलझ़न क्या हैं' छान गाणं आहे. त्यात आशाचा आवज एकदम निरागस + लडिवाळ लागलाय. विशेषतः एक हुंदका देऊन ती जेव्हा 'प्यार हैं, अच्छा, तो यह प्यार हैं' म्हणते तेव्हा.
बाकी जसं आठवेल तसं लिहीतो.
अठरा भार वनस्पतींची लेखणी आणि
अठरा भार वनस्पतींची लेखणी आणि समुद्र भरला मसीकरुनी तरी आशा ऐकताना मनात जे उचंबळतं, ते सांगून होणार नाही!
'बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा'वरची लखलखती तान असो, 'सखी गं मुरलीमोहन मोही मना'मधली अनवट आवर्तनं, 'जिवलगा, राहिले ले दूर घर माझे'मधली आर्तता, 'देव नाही जेवलेला'मधली व्याकुळता - यांचं गणित मांडणं अशक्य आहे.
ही गाणी त्यानंतर अनेक गायिकांनी गायलेली ऐकली, तांत्रिकदृष्ट्या अचूक, पण त्यांतून तो भाव ऐकू येत नाही मला.
तिच्या गायकीची जादू 'रिव्हर्स इंजिनिअर' करणं अशक्य आहे!
'रात अकेली है' किंवा 'दैया ये मैं कहाँ आ फँसी'सारख्या गाण्यांत आवाजावरचा जो संपूर्ण कन्ट्रोल दिसतो तो अद्भुत आहे!
इतर कोणाच्याही आवाजात जे वेडंवाकडं आणि कर्कश्श किंचाळणं वाटेल ते तिच्या आवाजात सुरेल आणि कर्णमधुर गाणं होतं.
'बैठे हैं क्या उस के पास' किंवा 'कर ले प्यार कर ले के दिन हैं यही' मधला 'बाउन्स' आणि इन्विटेशन तिनेच खुलवावं.
'कुणीतरी बोलवा दाजीबाला' किंवा 'कुटं कुटं जायाचं हनिमुनला' या लावण्या इतर कोणाच्या आवाजात लावण्यवती वाटतील काय?!
लताच्या एका मुलाखतीत तिने पुढच्या जन्मी लता मंगेशकर व्हायला आवडणार नाही असं म्हटलं होतं.
आशाने मात्र आशाच व्हायचंय, पण पुढच्या जन्मी शिक्षण घेऊन वेस्टर्न म्यूझिक वर्ल्डसुद्धा काबीज करायचंय असं उत्तर दिलं होतं.
'प्यासी हूँ मैं, प्यासी रहने दो' हे ती फक्त गायली नाही, हे ती जगली!
>>पण पुढच्या जन्मी शिक्षण
>>पण पुढच्या जन्मी शिक्षण घेऊन वेस्टर्न म्यूझिक वर्ल्डसुद्धा काबीज करायचंय असं उत्तर दिलं होतं. >> काय आठवण काढलीस!
हे परत वाचताना ही अंगावर काटा आला. ही बाई म्हणते की मला इंग्रजी तितकं येत नाही, शिक्षण आणखी घ्यायचं आहे, वेस्टन म्युझिक शिकायचं आहे, ते जग काबिज करणे राहिलंच... माणूस हंबल राहून किती दूरवर बघत आपल्या आत नितळपणे बघू शकतो!
त्या एका वाक्याने वेगळीच आशा दिसलेली.
सलोना सा सजन .. मध्ये जो स चा
सलोना सा सजन .. मध्ये जो स चा जो अनुप्रास आहे, त्यात आशा ते एकामागोमाग तीन स असे काही रेशमी उच्चारते कानात ती फ्रिक्वेंसी रेझोनेट होते आणि काहीतरी हुळहुळायला लागतं, आणि मागोमाग और 'मै' हु येतं. यातलं 'सलोना सा सजन' तर आहेच, पण 'मी' आहे, कदाचित 'मी' पण आहे म्हणूनच कदाचित त्या 'थंडी जलन' मधला सलोना सा सजन हा असा आहे. यातला जो संपूर्ण समर्पण न करता, किंवा कदाचित करुनही मी माझा भाग जपलेला आहे हा भाव गुलाम अलींनी जो काही स्वरातून दाखवला आहे त्याला तोड नाही.
सलोना, सा, सजन हे सगळे आरोहात खालुन थोडे वर गेले तरी ते एकाच स्वरावरुन चालू होतात, आणि तो 'मै' पण त्या स्वराला जवळपास असा खालूनच आहे, हे जेव्हा जाणवलं तेव्हा काटा आलेला. आणि ह्या 'और मै हु' मधला प्रेमाचा, आश्वासकतेचा, कुठे हावी न होता सहजतेचा, एकमेकांवर (म्युच्युअल) परस्परावरील अवलंबून असण्याचा, मी आहेस म्हणून तू आहे, आणि तुझ्यासाठीच मी आहे.. हा भाग गुलाम अली एकाच स्वरावरुन सलोना, सजन आणि मै चालू करुन मुद्दाम दाखवला असेल का असा विचार आला. आशा तो स्वर स्पष्ट दाखवते, असेलही कदाचित.
'सलोना सा' आणि 'तुमुल कोलाहल'
'सलोना सा' आणि 'तुमुल कोलाहल' मी मुद्दाम लिहीलेले नव्हते. मला वाटलेलं 'तुमुल' ... स्वाती लिहील आणि 'सलोना...' अमित.
त्यामुळे आपण आधी धाड घालायला नको. दोन्ही गाणी अविट आहेत अ-वि-ट!!!
आणखी एक आवडतं गाणं म्हणजे
आणखी एक आवडतं गाणं म्हणजे 'नजर लागी राजा तोरे बंगले पर'.
प्रत्येक कडव्यात वेगवेगळ्या रूपांत त्याच्या सान्निध्यात अखंड मोहरत राहायची इच्छा (बदरी असते तर त्याच्या बंगल्यावर बरसत राहिले असते, मोगरा असते तर त्याच्या बंगल्यात दरवळत राहिले असते वगैरे) व्यक्त करते आहे ती. प्रत्येक कडव्यात त्या उपमेला साजेसं व्हेरिएशन घेते चालीत.
इतकं आडवळणाने सांगत राहाते आणि शेवटी अगदी न राहावून म्हटल्यासारखं 'जो मैं होती राजा तुम्हरी दुल्हनिया' गाते - ते इतकं म्हणजे इतकं आर्जवी आहे की ऐकताना काहीतरी हलतं आत. तिचं मनच नाही, तिची व्हल्नरेबिलिटी ती उघड करते आहे तिथे.
>>> यातला जो संपूर्ण समर्पण न
>>> यातला जो संपूर्ण समर्पण न करता, किंवा कदाचित करुनही मी माझा भाग जपलेला आहे हा भाव
मस्त लिहिलंयस - हे नव्हतं मला दिसलं.
छान लिहिताय दोघेही.
छान लिहिताय दोघेही.
नजर लागी राजा तवायफच्या तोंडी आहे सिनेमात.
हो. All the more touching!!
हो. All the more touching!!
)
(तेवढी पडद्यावर नलिनी जयवंत नसती तर...
मोरे कान्हा जो आए पलटके, अबके
मोरे कान्हा जो आए पलटके, अबके होरी मै खेलुंगी डटके ... मधला डटके .. ! हाय!
आणि गारिया मैने रख्खी है रट के... 'रट के' हा शब्द गाण्यात फक्त संत जावेद अख्तरच घालू शकतात. आणि 'शिव्या पाठ करुन ठेवल्या आहेत', हे लटक्या रागात आशाच गाऊ शकते. जीव खल्लास होतो.
उपशास्त्रीय गाण्यात फापट पसारा नसलेले किमान शब्द , पण त्यातुन क्रिस्प अर्थ पोहोचायला हवा त्याच्या काळजाला नख न लावता, वनराज भाटियांची तशीच चाल. आणि चित्रपटांत सरदारी बेगम ते गाणं उभ्या उभ्या पॅसेज मध्ये उत्स्फूर्त गाते तसंच खुल्या उत्फुल्ल आवाजात आशा गाते.
त्या निमित्ताने सरदारी बेगम बघितला नसेल तर बघाच. बघितला असेल तरी परत ही बघूच शकता
>>>>> सरदारी बेगम बघितला नसेल
>>>>> सरदारी बेगम बघितला नसेल तर बघाच.
नोटेड.
>>> सरदारी बेगम
>>> सरदारी बेगम
येस!!
त्यातलंच 'चाहे मार डालो राजा, चाहे काट डालो राजा, हम तो यारी करेंगे, दिलदारी करेंगे'ही मला फार आवडतं!
तोवरच्या लाजर्याबुजर्या, रोमान्सच्या फक्त 'रिसीव्हिंग एन्ड'लाच डांबून ठेवलेल्या फीमेल एक्स्प्रेशनला मोकळेपणा मिळाला तो तिच्या आवाजात.
कधीकधी वाटतं या दोघी पार्श्वगायनात आल्यामुळे संगीतकारांचं अवकाश किती खुलं झालं! कितीही प्रयोग करा - ते लीलया सुरांत उतरवणार! ऑलमोस्ट गणपती आणि व्यासांच्या आख्यायिकेसारखा समसमा संयोग!
Pages