विद्यानंद भादुरी

Submitted by रानभुली on 6 September, 2026 - 15:25

हे कुणाचं नाव नाही.

सध्या विद्यानंद बापट भावना दुखावणे वर जी प्रतिक्रिया ( रिअ‍ॅक्शन) देत आहेत त्यामुळं जुनाच विषय वर उफाळून आला. जे कुणी माझ्यासारखेच मानसशास्त्रामध्ये अगदीच साधारण असतील त्यांनी आधी हा बेसिक व्हिडीओ बघावा ही विनंती. इतरांनी स्किप केला तरी चालेल.

https://www.youtube.com/watch?v=7HzzShJEGPI

विद्यानंदजी वारंवार भावना दुखावणे हा प्रकार मोडीत काढताना दिसतात. त्यांच्या आधीही अनेक जण भावना दुखावणे या प्रकाराला विनोदी समजतात. तेव्हांपासून अनेकदा यावर विचार करताना काहीतरी चुकतंय पण काय हे समजत नव्हतं. मी स्वतः भावनाशील आहे. भावना नियंत्रित ठेवणं अवघड जातं. कदाचित माझा इक्यू खूप जास्त असेल. कुणाचा कमी असेल.

ईक्यू बद्दल ऐकलेलं. पण खोलात जाऊन कधी माहिती घेतली नाही. पण आजवरच्या आयुष्यात किती तरी निर्णय चटकन घेताना ते भावनांवर घेतले होते हे आठवतं. उलट खूप विचार केला तर निर्णय घेता येत नाही, कृती करता येत नाही हे लक्षात आलं होतं. पण सर्वांचंच असं असतं का हे माहिती नसल्याने हा विषय ऑप्शन टाकला.

डॉ. नाओमी आइनबर्गर यांच्या बद्दलचा एक व्हिडीओ बघण्यात आला. ज्यात त्यांनी असं संशोधन केलं आहे कि एखाद्याची भावना दुखावली जाते (म्हणजे नेमकं काय हे बापट किंवा जॉर्डन पीटरसन विचारतात ना?) म्हणजे समजा त्याला सोशली रिजेक्ट केलं, बहीष्कृत केलं, किंवा मन दुखावण्यासारखं काही तरी घडतं, तेव्हां त्याच्या मेंदूतील जो भाग उद्दीपित होतो (गुगलून बघा) तोच शरीराला इजा झाल्यावर उद्दीपित होत असतो. म्हणजे शारीरिक इजा झाल्यानंतर "मला दुखलं" हे मेंदूचा जो भाग सांगतो, तोच भाग भावना दुखावल्या किंवा भावनांना इजा पोहोचली हे सांगतो. म्हणजे भाजणे आणि मन दुखणे हे मेंदूच्या दृष्टीने सारखेच असते.

नाओमी आईनबर्गर यांनी टेड टॉक्स वर या संदर्भात व्याख्यान दिलं होतं. हा व्हिडीओ आवर्जून पहा.
https://www.youtube.com/watch?v=NNhk3owF7RQ

टेक्स्ट स्वरूपात त्यांचे लेख बघता येतील.
Edge . org Social Pain :
डॉ. नाओमी आइनबर्गर यांची Edge या प्रसिद्ध वैचारिक मंचावर झालेली एक मुलाखत आहे. यामध्ये त्यांनी अगदी सोप्या इंग्रजीत सामाजिक नकार हा शारीरिक वेदनेसारखा का वाटतो? हे स्पष्ट केले आहे. सोशल रिजेक्शन हे एक उदाहरण म्हणून बघूयात.

https://www.edge.org/conversation/naomi_eisenberger-social-pain#:~:text=...'s%20felt%20the%20pain%20of,something%20that%20really%20is%20a%20painful%20experience.

Is Social Pain Real Pain?
https://www.psychologytoday.com/us/blog/neuroscience-in-everyday-life/20....

एखाद्याने कोट्यवधी रूपयांचा कारखाना टाकला आणि कामगारांच्या भावना समजून न घेता काम करून घ्यायचं ठरवलं तर ते चालणार नाही. पगार दिला म्हणजे भावना दुखावण्याचा हक्क नाही असे समजून काम करवून घेता येणार नाही. मॅनेजमेंटचं शिक्षण मी घेतलेलं नाही. पण भावनांचा विचार करायचं शिक्षण अनुभवाने येत असावं.

विद्यानंद बापट यांचे म्हणने वेगळ्या संदर्भात आहे. त्याची इथे गल्लत व्हायला नको. पण त्यांना जे म्हणायचं आहे त्याची चौकट ते स्पष्ट करत नाहीत. भावना दुखावणे म्हणजे काहीतरी अवैज्ञानिक असं सरसकटीकरण सुद्धा नको. नेमके शब्द सापडत नाहीत पण..

भावनाओं को समझो..
बापटजींनी भावना दुखावणे ही कल्पना मोडीत काढली, तेव्हा त्यांचा रोख मुख्यत्वे समाजकारण, राजकीय किंवा बौद्धिक विरोधाभासातील 'सार्वजनिक किंवा वैचारिक भावना दुखावणे यावर असतो . म्हणजे माझी भावना दुखावली म्हणून दुसऱ्याने विचार मांडू नये या भूमिकेवर. परंतु वैयक्तिक आणि मनोवैज्ञानिक पातळीवर भावना निरर्थक ठरत नाहीत.

नोबेल पारितोषिक विजेते डॅनियल त्यांनी त्यांच्या Thinking, Fast and Slow या प्रसिद्ध संशोधन ग्रंथात मानवी मेंदूचे दोन भाग सांगितले आहेत:

पहिला भाग (Fast, Emotional, Intuitive): हा भाग भावनांवर आधारित पटकन निर्णय घेतो. मानवाचे ९०% दैनंदिन व्यवहार याच प्रणालीने चालतात.

दुसरा भाग (Slow, Logical, Analytical): हा भाग खूप ऊर्जा खर्च करतो आणि आळशी असतो.

फाइंडिंग: मानवी वर्तन, खरेदीचे निर्णय, राजकीय कौल आणि सामाजिक नातेसंबंध हे तर्कशुद्ध विचारांपेक्षा भावनांच्या आधारेच अधिक नियंत्रित होतात.

थोडक्यात काय?
वैयक्तिक जीवनात भावनांना महत्त्व दिलं पाहिजे, त्यांची दखल घेतली पाहिजे...
पण सार्वजनिक, वैज्ञानिक आणि वैचारिक क्षेत्रात निर्णय घेताना भावनांपेक्षा तर्क आणि सत्य यावर वर भर दिला पाहिजे. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोणाचा प्रसार केला पाहिजे. तो होतो का? काय वाटतं?

होत असेल तर छान आहे.
नसेल तर बेसिक काम न करता लोकांच्या भावना दुखावतात यावर शरसंधान करणं योग्य नाही असं मला तरी वाटतं......

मला जे सांगायचं ते पोहोचलं नसेल तर तो लेखनदोष समजावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विद्यानंद बापट यांनी असे म्हटले

मागणी:
सार्वजनिक सणांच्या वेळी होणारा सार्वत्रिक उपद्रव जसे ध्वनी प्रदूषण, वाहतूक अडथळा, खोळंबा ह्यावर बंदी असली पाहिजे. वेळ पडल्यास बळ वापरून हे प्रकार बंद करावेत. ह्यात डीजे बरोबर ढोल ताशेही समाविष्ट केले पाहिजेत. ज्या गोष्टी सक्तीने ऐकाव्या लागतात त्यावर बंदी. त्या गोष्टी बंदिस्त सभागृहात वाजवा जेणेकरून ज्यांना त्या आवडतात त्यांनाच त्या ऐकता आल्या पाहिजेत.
ही आमची परंपरा आहे. गेले १३० वर्षे आम्ही हे करत आहोत हे दावे पटणारे नाहीत. १३० वर्षांपूर्वी लोकसंख्या कितीतरी कमी होती, तंत्रज्ञान खूप मागे होते. विजेवर चालणारी उपकरणे वापरून गगनभेदी आवाज करणे अशक्य होते. वीजच अगदी कमी उपलब्ध होती. उपकरणे तर फारच कमी.

त्यांचे मत एक नास्तिक म्हणून:
धर्म, देव आणि त्यावर आधारित सण हे सगळे काल्पनिक आणि कालबाह्य आहे. हे सगळे बंद व्हावे. पण यासाठी कायदा नाही तर प्रबोधन आवश्यक आहे. दाभोळकर म्हणतात तशी ही शतकांची लढाई आहे. ती अनेक शतके चालेल.
आता ह्यावर धार्मिक हिंदू असे म्हणतात की आमच्या भावना दुखतात.
मग नास्तिकांच्या भावनेचे काय? त्यांच्या लेखी पूर्ण काल्पनिक असणार्या देवाचे इतके स्तोम माजवणे, त्याकरता राक्षसी आवाजात गाणी लावून सर्वांना हैराण करणे ह्याने नस्तिकांच्या भावना दुखावत नाहीत का?

बापटांनी मांडलेले वादग्रस्त विचारः
लष्कर - ए - तोयबा सारखी लष्कर -ए - उत्सवची दहशत निर्माण झाली आहे. काही सण जवळ आलेत हे आठवले की सामान्य पुणेकराच्या मनात धडकी भरते. आता पुढचे काही दिवस नरकवास असल्यासारखा त्रास होणार असे वाटू लागते.

लष्कर -ए - उत्सव म्हटल्यामुळे हिंदुत्ववादी लोकांचे पित्त खवळले. एवढ्या मुद्द्यामुळे बापटांचे सर्व मुद्दे कचर्याच्या टोपलीत फेकण्याच्या लायकीचे ठरतात असे काही लोकांना वाटू लागले. पण सणांची दहशत वाटते हे खोटे नाही.

विद्यानंद बापटांचा लढा बाजूला ठेवा. त्यांची इतर सर्व मतं बाजूला ठेवा. ती मान्य/अमान्य असणे बाजूला ठेवा.

या निमित्ताने भावना दुखावणे अशी काही गोष्ट अस्तित्वात नाही, किंवा हास्यास्पद गोष्ट आहे असा समज होतोय, फक्त त्याबद्दल बोलूयात. भावना का दुखावली हे कारण आणि भावना दुखावणे ही प्रोसेस आणि त्याचं वैज्ञानिक अस्तित्व असे दोन वेगवेगळे भाग करून बघा. कारणांवर चर्चा होऊ शकते, जागृती होऊ शकते हे मला मान्य आहे. दुसरा भाग अस्तित्वात नाही हे बरोबर आहे का?

त्यांच्या अन्य मतांवर अन्य ठिकाणी मत मांडणे शक्य आहे.