✪ सर्व विद्यार्थ्यांचा "स्वीकार"- Principle of acceptance
✪ विद्यार्थी-केंद्रित मूल्यमापन व परीक्षा पद्धत
✪ मित्र- मैत्रिणींनी दिलेला त्रास आणि आपलेपणा
✪ रम्य ते कॉलेजचे दिवस
✪ "हां यही रस्ता है तेरा!"
✪ कँपसमध्ये जाण्याचा शॉर्ट कट- आठवणीतला ट्रेक!
"कर्वे समाज सेवा संस्थेतलं" पहिलं वर्ष संपत आलं! वीस वर्षं होत आली तरी किती तरी गोष्टी डोळ्यांपुढे तशाच आहेत. आज तो काळसुद्धा मागे पडला आहे. तेव्हा मोबाईल फोन्स अगदी नवीन होते. त्यामुळे ठिकठिकाणी कॉईन बॉक्सेस असायचे. एक रूपया टाकून तीन मिनिट बोलायचं! इंटरनेट नेटकॅफेमध्ये होतं. मोबाईलमध्ये अजून आलं नव्हतं. त्यामुळे फिल्ड वर्कसाठी जाताना- अन्य ठिकाणी फिरताना खूप लोकांना विचारावं लागायचं. अभ्यास आणि शिकवण्याची प्रक्रियासुद्धा अगदी स्वत: करण्याची होती.
हॉस्टेल कॉलेजच्या परिसरातच होतं. मेस किंवा नाश्त्यासाठी मात्र हिंगणे होम कॉलनीत जावं लागायचं. तिथे जाताना- येताना थेट कॉलेजच्या परिसरात येणारा एक शॉर्ट कट होता. चढाव असलेली पायवाट होती! इतर अनेक डोंगर- किल्ले आणि ट्रेक केले तरी त्या पायवाटेची मजा वेगळीच! सकाळच्या वेळी घाई घाईत नाश्ता करून ९ च्या लेक्चरची वेळ गाठावी लागायची. दुपारी १ ते २ च्या वेळेतही घाई घाईत जाऊन जेवावं लागायचं.
(इथे सगळे लेख एकत्र वाचता येतील. विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, सायकलिंग, फिटनेसबद्दलचे लेख वाचता येतील.)
ह्या लेखाचा व्हिडिओ सारांश इथे बघता येईल.
कर्वेमध्ये शिकताना प्रत्येक वेळी आपण अगदी योग्य ठिकाणी आल्याची व योग्य गोष्ट करत असल्याची जाणीव होत होती. अगदी "हां, यही रस्ता है तेरा!" वाटायचं. शिक्षणात त्याआधी इतकं एंजॉय कधी केलं नव्हतं. "मै ऐसा क्युं हूँ" फिशपाँड पडल्यानंतरची ही प्रगती होती! पहिलं वर्ष संपता संपता अनेक गोष्टी बदलल्या! हॉस्टेलच्या मित्रांसोबत घट्ट मैत्री झाली. तिथल्या दादागिरीचीही मजा वाटायला लागली. मीसुद्धा प्रति- दादागिरी शिकलो! प्रत्येकाचं व्यक्तिमत्व, सवयी, आवडी, गमती कळाल्या. त्या काळात माझ्या बेडजवळ लांब केसांचा धोनी आणि काजोलसुद्धा राहायचे! सुरूवातीला मला हॉस्टेलवरच्या गोंधळाचा त्रास व्हायचा. पण हळु हळु मी माझ्या पद्धतीने उत्तर द्यायला शिकलो! संग्राम- प्रवीण हे रूम मेटस आणि बाजूच्याच खोलीतले किशोर- संतोष- प्रभाकर! कमाल दिवस होते ते! आता खरं तर मित्र सोबत नसतील तर हॉस्टेलच्या परिसरात जाण्याची हिंमतच होत नाही! अगदी तो विचार सुद्धा "सुन्या सुन्या मैफिलीत" वाटतो!
मैत्रिणींसोबतही छान गट्टी झाली होती. सईने माझी केलेली गंमत आठवते! लेक्चरला थोडा वेळ होता आणि आम्ही लायब्ररीजवळ थांबलो होतो. तेव्हा तिने माझी बॅग लायब्ररीजवळच्या मुलींच्या वॉशरूममध्ये ठेवली! आणि "आता जाऊन घे" म्हणाली! अशा प्रकारच्या सामाजिक समस्येबद्दल आम्हांला शिकवलंच नव्हतं! कितीही विनंती केली तरी देतच नव्हती! इतर मुलींना तिने आणू दिली नाही. आणि मला धमकी देत होती, "तू गेलास आत तर मी नागमणी मॅडमकडे जातेच आणि तक्रार करते!" खूप वेळ वाट पाहिल्यावर अश्विनीने मला मदत केली! मित्र मैत्रिणींचा असा जिव्हाळा व सोबत आठवून डोळे पाणावतात. एका स्किल लॅबमध्ये एक मैत्रीण "सिग्नाल प्यार का सिग्नाल" गाणं म्हणताना अजूनही आठवते! "हाँ यही रस्ता है तेरा" ह्या गाण्याचा वेगळा अर्थ मुलींच्या हॉस्टेलच्या रस्त्याकडे जाताना आठवायचा!
एप्रिलच्या सुमारास सेकंड यीअर्सचा निरोप समारंभ झाला. अतिशय व्यस्त वेळापत्रकात त्यांना ब्रेक मिळेल असा तो कार्यक्रम झाला! कला गुणांची झलक बघायला मिळाली. निरोप घेताना तेही हळवे झाले होते... बाकी दुसर्या वर्षातली विद्यार्थ्यांची स्थिती बघून हळु हळु पुढचं वर्ष कसं खडतर असेल, हा अंदाज येत होता. फिल्ड वर्कमधलं सबमिशन, मायक्रो स्टडी आणि प्रत्यक्ष रिसर्चचं सबमिशन! १५ फेब्रुवारी ही त्याची डेडलाईन होती. पण सगळ्यांचेच रिसर्च उशीरा होताना दिसत होते. सगळ्यांची वेळापत्रकाची मोठीच लढाई सुरू होती. त्यामानाने आम्ही ठीक होतो. रिसर्चचे ड्राफ्टस- प्रश्नावली इ. फायनल होत होते. फिल्ड वर्क संपून परीक्षेआधीच्या सुट्ट्या सुरू होत्या.
पहिल्या वर्षीची परीक्षा! थिअरीच्या पेपर्सचं दडपण असं आलं नाही. कारण संकल्पना सगळ्या समजल्या होत्या. आणि प्रश्नसुद्धा पाठांतराचे नसून understanding चे असायचे. परीक्षा पद्धती, विद्यार्थ्याचं मूल्यमापन अशा गोष्टींमध्येही फॅकल्टीजनी खूप लक्ष दिलं होतं. नागमणी राव मॅडम कर्वेमध्ये प्राध्यापिका म्हणून आल्यानंतर त्यांनी ह्यामध्ये खूप लक्ष घातलं. दलित आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मूल्यामापनामध्ये काही घटकांमुळे फरक पडतोय, असं त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तशा सुधारणा सुचवल्या होत्या. त्यामुळे परीक्षा पद्धत आणि मूल्यमापन हेसुद्धा विद्यार्थ्यांसाठी योग्य होतं. स्पेलिंगच्या चुका किंवा वाक्य रचना ह्यापेक्षा विषयाचं आकलन, मांडणी, विचार महत्त्वाचे मानले जात होते. मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांचा "स्वीकार" होता. "स्वीकार" अर्थात् acceptance हे समाज कार्यातलं महत्त्वाचं तत्त्व आहे! फिल्ड वर्कची तोंडी परीक्षासुद्धा होती. त्यामध्ये केलेल्या कामाबद्दल स्पष्टता, आत्मविश्वास, निरीक्षणं, कार्यपद्धतीचं आकलन अशा गोष्टी बघितल्या जायच्या.
सगळे पेपर चांगले गेले. फिल्ड वर्क वायवा (तोंडी परीक्षा)सुद्धा चांगली गेली. सेकंड यीअर सुरू होण्याच्या आधी काही दिवस सुट्ट्या होत्या. तेव्हा मग माझ्या संशोधनासाठी लातूरमध्ये घन कचर्यावर काम करणार्या संस्थेमध्ये जाऊन भेट दिली. प्रश्नावलीची पूर्व चाचणी (प्रीटेस्टिंग) केली होती. कचरा गोळा करणार्यांना सुरक्षा, साधनं देण्यासह त्यांचं सक्षमीकरण त्या संस्थेद्वारे केलं जात होतं. शिवाय शहराची अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छता केली जात होती आणि काही वस्तुंचा पुनर्वापर केला जात होता. तेही फिल्ड वर्क छान झालं. त्यानुसार पुढे प्रश्नावली व टूल अंतिम ठरणार होतं.
कॉलेजचं दुसरं वर्ष लवकरच सुरू होणार होतं. रिजल्ट अजून सांगितले नव्हते. प्रीटेस्टचा डेटा मसदेकर मॅडमना दाखवण्यासाठी एकदा सुट्टीच्या दिवशी कॉलेजमध्ये गेलो होतो. तेव्हा माझ्या आवडत्या मॅडम भेटल्या. त्यांनी माझी चौकशी केली आणि मला सांगितलं, “I will be your field work guide!” खूप आनंद झाला ते कळाल्यावर! आणि आपण पास झालो, हेसुद्धा कळालं. आवडत्या फॅकल्टीकडून खूप शिकायला मिळणार, ह्याचा खूप आनंद वाटला. पुढे यथावकाश रिझल्टस लागले. चांगले गुण मिळाले. फिल्ड वर्कमध्ये तसे कमी होते, पण ते अपेक्षित होतं.
जूनमध्ये सिनियर्सच्या ब्लॉक प्लेसमेंट सुरू झाल्या. ही एक महिन्याची सलग प्लेसमेंट असते. त्यामध्ये एका एजन्सीमध्ये पुढच्या स्तराचं फिल्ड वर्क करायचं असतं. त्याशिवाय अनेकांचे कँपस इंटरव्ह्यूजसुद्धा झाले होते. वर्ष बदलताना मुलांच्या रूम्स बदलायच्या. पहिल्या वर्षीचे दुसर्या वर्षी खाली जायचे. पण आमच्या वेळी आम्हांला आहे त्याच रूम्स ठेवू दिल्या गेल्या. त्यामुळे दुसर्या वर्षीही १५ नंबरची खोलीच मिळाली! दरवाज्यासमोर आलं की समोर सिंहगड दिसायचा! कात्रजचा डोंगरही दिसायचा! कधी कधी सकाळच्या वेळी एनडीए परिसरातल्या जवानांच्या फायरिंगच्या सरावाचा आवाजही यायचा. अशा असंख्य आठवणींसह पहिलं वर्षं संपलं!
पुढचा भाग: कर्वेतले दिवस ६: नवीन असाईनमेंटस, नवीन कौशल्यं आणि नवीन चेहरेसुद्धा
-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 21 ऑगस्ट 2026.
सुरूवातीला मला हॉस्टेलवरच्या
तिथल्या दादागिरीचीही मजा वाटायला लागली. मीसुद्धा प्रति- दादागिरी शिकलो! आणि
सुरूवातीला मला हॉस्टेलवरच्या गोंधळाचा त्रास व्हायचा. पण हळु हळु मी माझ्या पद्धतीने उत्तर द्यायला शिकलो! >>
ह्या बद्दल अजून थोडे विस्ताराने लिहिणार का