श्रीज्ञानेश्वरी कथासार - अध्याय २

Submitted by डॉ. कल्पना देशमुख on 10 August, 2026 - 07:28

अध्याय पहिला

मागील अध्यायात युद्धभूमीवर युद्धासाठी जमलेल्या प्रतिपक्षात आपल्याच आप्तांना आणि स्वकीयांना पाहून अर्जुन खूप विरक्त झाला. त्याने धनुष्यबाण टाकून दिले आणि ‘मी युद्ध करणार नाही’ असे श्रीकृष्णाला सांगितले. हे पाहून श्रीकृष्ण आश्चर्यचकित झाले. अर्जुनाचा हा भ्रम दूर केला पाहिजे, असा विचार श्रीकृष्णाने केला. अर्जुनाला त्याच्या स्वत:च्या मूळ स्वरूपाचे ज्ञान सांगितल्याशिवाय त्याचा भ्रम दूर होणार नाही, हे श्रीकृष्णाला माहीत होते.
म्हणून येथे श्रीकृष्ण त्याला त्याच्या मूळ स्वरूपाचे ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
श्रीमद्भगवद्गीतेतील श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवादातील संपूर्ण भाव श्रीज्ञानदेवांनी आपल्या ज्ञानेश्वरीत उलगडले आहेत. म्हणून ज्ञानेश्वरी आपल्यासाठी अधिकाधिक प्रिय होत गेली आहे, असे दिसते.

या अध्यायात मोहामुळे अर्जुनाच्या मनाची झालेली अस्वस्थता दर्शवली आहे. अर्जुनाचे युद्ध न करण्याचे विचार तो श्रीकृष्णाजवळ बोलून दाखवत आहे. अर्जुनाच्या मनात चालू असलेले पुढील विचारचक्र श्रीज्ञानदेवांनी स्पष्ट केले आहे. अर्जुन म्हणतो,
मी पार्थु द्रोणाचा केला । येणें धनुर्वेदु मज दिधला । तेणें उपकारें काय आभारैला । वधी तयातें॥३७॥
मी पार्थ श्रीगुरु द्रोणाचार्यांचा शिष्य आहे, त्यांनी मला धनुर्विद्या शिकवली, त्यांच्या आभाराचे उपकार मानायचे सोडून त्यांचा वध करावा का?

शत्रूपक्षात असलेले सर्व योद्धे माझे नातलग आहेत. त्या माझ्या स्वकीयांमध्ये पूजनीय पितामह भीष्माचार्य आणि आचार्य द्रोणाचार्य हे तर आम्हाला वंदनीय आहेत. त्यांनी दिलेल्या प्रेमामुळे आणि विद्येमुळे आम्ही घडलो. त्यांच्यावर शस्त्र चालवणे म्हणजे मृत्यूपेक्षाही कठीण आहे. ही वेळ आज आमच्यावर आली आहे. पितामहांनी दिलेले प्रेम आणि त्यांनी केलेले आमचे संगोपन यांचा, या युद्धामुळे अनादर होईल. तसेच ज्या श्रीगुरुच्या मार्गदर्शनाने मला विख्यात धनुर्धर बनण्याचे सौख्य प्राप्त झाले, त्यांच्यावर मी शस्त्र कसे चालवू?
पितामह भीष्माचार्य आणि श्रीगुरु द्रोणाचार्य हे शत्रूपक्षात असूनही त्यांच्याबद्दल असलेले अर्जुनाच्या मनातील वरील विचार अत्यंत प्रशंसनीय आहेत. अर्जुनाचे युद्ध न करण्याचे पहिले कारण आप्तस्वकीयांबद्दल असलेली माया आहे. दुसरे कारण म्हणजे मातापित्यासमान असलेल्या श्रेष्ठांबद्दलचा आदर आहे. थोडक्यात अर्जुनाच्या भूमिकेने कुटुंबव्यवस्थेत आपले आचरण कसे असावे, ह्याचे उत्तम उदाहरण आपल्याला दिले आहेच, शिवाय आपल्या कुटुंबात अन्यायकारक प्रसंग ही उपस्थित होऊ शकतात, असे दर्शवले आहे.
अर्जुनाच्या मते, “संतवृंद नमस्कारिजे। कां घडे तरी पूजिजे।”
मातापिता इत्यादींची आणि संतांची सेवा करणे ही आपली परंपरा आहे. असे असताना त्यांच्यावर आपल्या हातांनी शस्त्र चालवणे हे कसे शक्य होईल? एका दृष्टीने अर्जुनाचा हा विचार तर्कसंगत आणि सत्य आहे. अर्जुनाच्या मनात उत्पन्न झालेला हा विचारांचा कल्लोळ जेव्हा जाणवतो, तेव्हा अशा परिस्थितीत एका व्यक्तीचे कर्तव्य काय असायला पाहिजेत, ह्याचाही आपल्याला प्रश्न पडतो. अर्जुनाच्या विचारातील ही द्विधा अवस्था सोडवणे, श्रीकृष्णालाच शक्य झाले असे म्हणावे लागेल. म्हणूनच अशावेळी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातून श्रीमद्भगवद्गीतेची उत्पत्ती झाली. महाभारतातील ह्या अन्यायकारक घडलेल्या प्रसंगाशी जुळणारा थोडा विचार आपल्या नित्यजीवनात केल्यास असे दिसते, की किती सत्य आहे हे! आपल्या घरात आजूबाजूला अनेक जेष्ठ व्यक्ती असतात. त्या घरातील जेष्ठ व्यक्तीच नियमांच्या विरुद्ध वागू लागल्या किंवा आपल्याला शिकवणारे एखादे शिक्षक खूप छान शिकवतात, पण त्यांच्या हातून एखाद्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला तर त्या विद्यार्थ्याने काय करावे? अशाप्रकारे ज्यांना आपण आदरणीय मानतो त्या व्यक्तीच अन्यायाने वागू लागल्या, तर आपण काय करू शकतो, असा प्रश्न सहज आपल्या मनात येईल. आपल्या आयुष्यात छोटेमोठे अन्याय आपल्या आजूबाजूला झालेले आपण पाहातो. अशा वेळी असे प्रसंग पाहून खचून जाऊ नये, तर आपण जे चांगले करू शकतो, ते अवश्य करावे. आपल्या मनाशी एक असा निश्चय करावा की हा अन्याय आहे, पण माझ्या आयुष्यात अन्याय माझ्याद्वारे कोणावरही होणार नाही, अशी चूक माझ्या हातून कधीही होऊ नये, त्यासाठी मी सदैव जागरूक राहीन. एवढ्या या निर्धाराने आणि आचरणाने आपण आपल्या आयुष्याची लढाई जिंकू शकतो. तो काळ वेगळा होता किंवा तो प्रसंगही राजघराण्यात घडला होता, असा विचार करू नये. कोणत्याही काळात आणि कुठेही अन्याय हा अन्यायच असतो. येथे श्रीज्ञानदेवांच्या सविस्तर निरूपणातून हा बोध होतो, की एक म्हणजे स्वत: कोणावरही अन्याय करू नये आणि दुसरे अन्यायाचा प्रतिकार करावा. दैनंदिन जीवन सुद्धा एक प्रकारचे युद्ध आहे. आपले मन आणि आपले कर्म ह्यात सतत संघर्ष होत असतात. योग्य रीतीने केलेल्या कर्मांमुळे जेव्हा मनाला समाधान लाभते, तेव्हा ते कर्म पूर्णत्वाला जाते, अशा कर्मांना न्याय मिळतो. महाभारतात झालेला महान संघर्ष एका राजघराण्यात घडलेला होता. अन्यायाची परिसीमा गाठणारा अन्याय पांडवांवर झाला होता. म्हणून या अन्यायाचे निवारण करण्यासाठी निराकार आत्म्याला आकार घ्यावा लागला.

अर्जुनाच्या मनात उत्पन्न झालेला मायेचा भ्रम घालवून त्याला मायेचे खरे स्वरूप दाखवण्यासाठी श्रीकृष्णाच्या आकारात ईश्वर सज्ज झाले आहेत. पण अतिशय सुज्ञ असलेला अर्जुन जेव्हा श्रीकृष्णाला म्हणाला, ‘देवा, मला सर्व मिळेल, पण मायेचा भ्रम आपल्याशिवाय कोणीही दूर करू शकणार नाही.’
श्रीज्ञानदेवांच्या निरूपणात अर्जुन म्हणतो,
हें सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपनलासे मनीं । तो तुझिया वाक्यावांचुनी । न जाय आणिकें॥६४॥
एथ पृथ्वीतळ आपु होईल । हें महेंद्रपदही पाविजेल । परी मोह हा न फिटेल । मानसींचा॥६५॥

हे देवा, युद्धात आलेल्या त्या सर्व कुळांना पाहून माझ्या मनामध्ये जे दु:ख उत्पन्न झाले आहे, ते आपल्या उपदेशाशिवाय आणखी कशानेही जाणार नाही. येथे संपूर्ण पृथ्वी आमची होईल, महेन्द्रपदही मिळेल, परंतु माझ्या मनातला मोह दूर होणार नाही. तेव्हा श्रीज्ञानदेव म्हणतात, ‘हा मायेचा भ्रम नाही तर अर्जुनाची माया जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे. आपले अहित करणार्‍या स्वकीयांमुळे किंवा सतत कष्ट देणार्‍या आप्तांमुळे आज युद्धाचा प्रसंग आमच्यासमोर आला आहे. त्यांच्यामुळे एवढे कठीण आयुष्य आम्ही जगत आहोत. तरी त्यांना पाहिल्यावर आमच्या मनात माया का उत्पन्न होते? आणि त्यांच्या अनुपस्थितीमुळे दु:ख का होते? हा अर्जुनाच्या मनाला पडलेला अतिशय कठीण प्रश्न आहे.’

‘युद्धात मी त्यांना मारल्यामुळे माझे आप्तस्वकीय मरणार’ याचे अर्जुनाला दु:ख होत होते. आणि दुसरे असे की अंत:करणाला जणू मोहाची मोहिनी घालणार्‍या अशा मायेचे खरे स्वरूप काय आहे, हे त्याला जाणून घ्यायचे होते. श्रीकृष्णाशिवाय हे कोणीही सांगू शकणार नाही, असा त्याच्या मनाचा निश्चय झाला होता. अर्जुनाला स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास होता पण त्याला मायेने जर्जर बनवले होते, त्याला मोहाने ग्रासले होते, म्हणून तो स्वत:ला लाचार समजत होता. युद्धात उभा असलेला एक शूर वीर सुद्धा मायेने बांधल्या जातो, याचे त्यालाच आश्चर्य वाटत होते. त्याला मनातून आप्तस्वकीयांना मारायचे नव्हते आणि त्यांचा अन्यायही त्याला सहन होत नव्हता. अशा द्विधा परिस्थितीत अर्जुन होता. थोडक्यात शस्त्रांपेक्षाही माया एवढी कठीण का आहे, हे त्याला जाणून घ्यायचे होते.

श्रीज्ञानदेव म्हणतात,
हे उपजे आणि नाशे । तें मायावशें दिसे । एर्‍हवीं तत्त्वता वस्तु जें असे । तें अविनाशचि ॥१०५॥
उत्पन्न होणे आणि नाश पावणे हे मायेच्या स्वाधीन आहे. एरवी, तत्त्वत: जी वस्तू आहे ती अविनाशीच आहे.

ईश्वराने सर्वांच्या ठायी जे स्वत:चं एक रूप किंवा एक तत्त्व ठेवलं आहे, त्याला येथे वस्तू म्हटले आहे. ती वस्तू ईश्वराप्रमाणे चेतनामय आहे. त्या चैतन्यालाच आत्मा असेही नाव आहे.अर्जुनाला मायेचे स्वरूप समजावून सांगताना आधी ‘जन्म आणि मृत्यू’ त्याबद्दलचे सर्व ज्ञान सांगणे आवश्यक होते. तसेच मनुष्य म्हणून जन्म घेतल्यावर त्याचे जीवन कसे असावे, त्याचे आचरण कसे असावे, त्याचा आहार कसा असावा, इच्छा म्हणजे काय, या सर्व गोष्टींचे ज्ञान देण्यासाठी क्रमाक्रमाने आता सुरुवात केली आहे. या अफाट विश्वात जेथे चैतन्य आहे तेथे मृत्यूही आहे. त्यात मनुष्य हा एक घटक असून त्याचे अस्तित्त्व कशामुळे आहे, हे सर्व स्पष्ट केले आहे. हे विश्व चैतन्यांनी भरलेले आहे, त्यामुळे ते गतिमान आहे.

श्रीज्ञानदेव म्हणतात,
एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे । परी देहचि हा न नाशे । एकेकासवें ॥१०९॥
तैसींचैतन्याच्या ठायीं । इयें शरीरांतरें होती जाती पाहीं । ऐसें जाणे तया नाहीं । व्यामोहदुःख॥११०॥

‘आपल्या देहाच्या ठिकाणी बाल्यावस्था, यौवनावस्था, वृद्धावस्था अशा अवस्था येतात, तरी देह तोच राहातो. तसे चैतन्याच्या ठिकाणी अनेक शरीरे येत जात राहातात, पण चैतन्य अक्षय्य राहाते. या चैतन्याच्या अक्षय्यत्वाला जाणून घेतल्यावर देहाची काळजी वाटत नाही. सर्वत्र चैतन्य भरलेले असले तरीही प्रकृतीच्या साहाय्याने जन्म घेतलेला जीव जसा विचार करेल, तसे त्याचे इन्द्रिये त्या विषयांनी ग्रासले जातात. विषय सहा मानले असून ते काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे आहेत. त्या विषयांमुळे फक्त दु:ख उत्पन्न होतात, कधीच सुख उत्पन्न होत नाही. त्या दु:खकारक विषयांमुळे अंत:करण ग्रासले जाते आणि इन्द्रिये स्वैर सुटतात. विषयांमध्ये सुख आहे असे क्षणभर वाटते, पण ते खरे सुख नसते. मनात उत्पन्न झालेले विषय कधीच स्थिर राहात नाहीत. एका वाईट भावनेतून अनेक विषयांचा जन्म होतो. त्यामुळे इन्द्रियांना विषयादि मोह आणि क्रोधाकडे जाऊ देऊ नये. जे मनुष्य इन्द्रियांच्या अधीन होऊन राहातात त्यांना विषयांपासून उत्पन्न झालेले कधी सुख तर कधी दु:ख उपभोगावे लागते. जे
मनुष्य इन्द्रियांवर नियन्त्रण मिळवतात ते ईश्वराच्या जवळ असतात.

श्रीज्ञानदेव म्हणतात,
उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे । हें घटिकायंत्र जैसें । परिभ्रमे गा ॥१५९॥
ना तरी उदो अस्तु आपैसें । अखंडित होत जात जैसें । हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥१६०॥

उत्पन्न होते ते नष्ट होते, नष्ट झालेले पुन्हा दिसते, हे घटिकायन्त्राप्रमाणे सतत फिरतच राहाते. ज्याप्रमाणे उदय आणि अस्त अखंडीतपणे आपोआप होत राहातात, त्याप्रमाणे जन्म व मृत्यू या जगात अपरिहार्य आहेत.
श्रीज्ञानदेवांनी येथे मनुष्याच्या जन्माचे आणि मृत्यूचे खरे स्वरूप उलगडवून दाखवले आहे. मनुष्य जेव्हा देह धारण करतो तेव्हा त्याच्या शारीरिक क्रिया या ज्या चैतन्यामुळे घडून येतात, ते चैतन्य सर्वव्यापी आहे आणि ते चैतन्य चराचरात आहे. चैतन्य कोणत्याच साधनांनी नष्ट होत नाही. आपल्या देहातील चैतन्य त्या अक्षय्य चैतन्यात विलीन होते, तेव्हा देहाला मृत्यू आला असे म्हणतात. देहाला भोगावे लागणारे सुखदु:ख हे स्थिर नाहीत. त्या चैतन्याची ज्यांना खरी ओळख पटते, त्यांना देहाची निर्मिती म्हणजे हा मायेचा भ्रम आहे, हे समजते. अर्जुनाला ‘मी मारणारा’ असा जो भ्रम झाला होता तो मायेच्या अधीन गेल्यामुळे झाला होता. जन्म आणि मृत्यू एका मायारचित ईश्वराशिवाय कोणी जाणू शकत नाही. जन्म म्हणजे देहात
चैतन्य स्फुरणे आहे आणि मृत्यू म्हणजे देहातील चैतन्य अखंड चैतन्यात विलीन होणे आहे. यावरून जन्मापूर्वीही चैतन्य होते, जन्म घेणे म्हणजे चैतन्यात राहाणे आहे आणि मृत्यूनंतरही ते अखंड चैतन्य जसेच्या तसे आहे. जे देहात असताना चैतन्याला जाणून घेतात, ते संत असतात. जे चैतन्यालाच आपले जीवन समर्पित करतात, त्यांना संत असे म्हटले जाते.

श्रीज्ञानदेव म्हणतात,
तैसें आदीचि जें नाहीं । तयालागीं तूं रुदसी कायी । तूं अवीट तें पाहीं । चैतन्य एक ॥१६९॥
जयाचि आर्तीचि भोगित । विषयीं त्यजिले संत । जयालागीं विरक्त । वनवासिये ॥१७०॥

मुळापासूनच जे नाही त्यासाठी आपण का रडावे? त्या फक्त एका अविनाशी चैतन्याकडे पाहावे. ज्याच्यासाठी तळमळ सहन करत संतांनी विषयांचा त्याग केला आणि ज्याच्यासाठी विरक्त होऊन वनवास पत्करला.

श्रीज्ञानदेव म्हणतात,
जें सर्वत्र सर्वही देहीं । जया करितांही घातु नाहीं । तें विश्वात्मक तूं पाहीं । चैतन्य एक ॥१७७॥
जे सर्वत्र आणि सर्वांच्या देहात आहे, ज्याचा घात केला तरी घात होत नाही, त्या एका चैतन्याला विश्वात्मक रूपात आपण पाहावे.
ईश्वराला पाहावे असे वाटल्यास, देहात असतानाच आपल्या आणि इतर जिवातील चैतन्य समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे आपली दृष्टी विस्तृत होत जाते. जे जे वाईट आहे त्यांचा त्याग करत राहिल्यास आपल्यात असलेले शुद्ध चैतन्य आपल्याला जाणवू लागते. म्हणून जीवन जगताना मनात थोडेसे धैर्य उत्पन्न करून शांत चित्ताने विचार करण्याची सवय मनाला लावावी. अतिमाया विकार उत्पन्न करते, अतिक्रोध किंवा अतिनिष्ठुरता शत्रूत्व उत्पन्न करते. मनाला वाईट प्रवृत्तींकडे नेणार्‍या अशा दुर्गुणांचा त्याग करावा. घडणार्‍या घटनांमधून फक्त चांगले तेवढे निवडावे, वाईट गोष्टी विचारात घेऊ नये, जे जे वाईट असेल ते ते तिथेच विसरून जावे. वाईट गोष्टींची चर्चा करू नये. वाईट घटना ऐकून घेऊन त्यातून चांगला बोध घेणारा मनुष्य एखादाच असतो. म्हणून आपण वाईट घटनेबद्दल इतरांना प्रतिपादन करताना सुद्धा ते चांगले करून सांगावे. जर ती वाईट घटना इतरांना सांगण्याची आवश्यकता नसेल तर तिथेच ती सोडून द्यावी. वाईट ओळखून वाईटांचा लागलीच त्याग करत गेल्यास हळूहळू आपल्या मनाची स्थिती निश्चल होत जाते. स्थिर असलेल्या मनात चांगले विचार दृढ होऊ शकतात. प्रापंचिक व्यक्तींचा प्रपंच हा मायेवर आधारित असतो. म्हणून त्यात मायेने व्यापले जाऊ नये. आपल्या कर्तव्याचे पालन करणे हा खरा मायेचा अर्थ आहे.

म्हणून श्रीज्ञानदेव म्हणतात,
तैसें आनी आन करितां । नाशु होईल हिता । म्हणऊनि तूं आतां । सावध होई ॥१८५॥
वायांचि व्याकुळ कायी । आपुला निजधर्मु पाहीं । जो आचरितां बाधु नाहीं । कवणें काळीं ॥१८६॥

‘नको त्या ठिकाणी नको ते केल्यावर हिताचा नाश होतो, म्हणून सावध राहून कर्म करावे. विनाकारण व्याकूळ होऊ नये. आपल्या स्वधर्माकडे म्हणजे आपल्या कर्तव्याकडे पाहावे, ज्याचे आचरण केल्यामुळे कोणत्याच काळात बाधा उत्पन्न होत नाही.’ आपला देह नाशवंत आहे पण देहाला चालवणारे चैतन्य अक्षय्य आहे. चराचरात हालचाल घडवून आणणारे चैतन्य सर्व व्यापून आहे. याचे साधे उदाहरण पाहिल्यास असे दिसते, की जेव्हा मनात चांगल्या विचारांचा परिपोष होत राहातो, तेव्हा देहावर एक नवी झळाळी येते. याउलट मनात वाईट विचार येत राहिल्यास देहाचे संतुलन बिघडते. असे हे चराचरात हालचाल घडवून आणणारे चैतन्य तिनही गुणांपासून अलिप्त असून मूळ आहे. चैतन्य फक्त सत्य, पवित्र आणि शुद्धतेला आपल्याकडे खेचते. यावरून चैतन्य म्हणजे शुद्ध सत्य आणि शुद्ध पवित्रता होय, असे दिसते. सत्य आहे म्हणूनच चैतन्य अखंड आहे. या सत्याच्या अखंडतेमुळे चैतन्याची शक्ती प्रकट होत असते. या शक्तीनेच प्रकृतीची हालचाल होते. असत्य चैतन्यासमोर टिकणे शक्य नाही. अखंड असलेल्या या चैतन्याचा कधीच नाश होत नाही. ज्या चैतन्याने हे विश्व रचले आहे, त्या चैतन्याचा ध्यास सदैव आपल्या मनाला असावा, त्यामुळे मन सशक्त होईल. मुळात प्रत्येक उत्पन्न झालेली गोष्ट जर नष्ट होणारच आहे, तर आपला देह सुद्धा एक दिवस नष्ट होणार आहे. म्हणून देहाच्या ठिकाणी आसक्ती ठेवू नये. या देहाचे कधी काय होणार आहे, हा देह कधी आपल्याला सोडून जाणार हे माहीत नाही. मुळात प्रत्येक गोष्ट मायेनी व्याप्त आहे. अशा मायाव्याप्त गोष्टींच्या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारे दुसरी माया करू शकतो? मायेच्या पाशात गोवल्या जाणार्‍या अथवा न गोवल्या जाणार्‍या अशा प्रत्येकांना जन्ममृत्यू अटळ आहेत. या जन्मात एखाद्या गोष्टीवर खूप माया लावली आणि ती गोष्ट पूर्ण न होता तशीच राहून गेली, असे वाटू लागल्यास ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. असे हे चक्र दिवसरात्रीच्या चक्राप्रमाणे चालत राहाते. मायेच्या सहवासाने अनेक विषय आपोआपच उत्पन्न होतात. मायेमुळे वीरवृत्ती नाहीशी होते. दु:खामुळे व्यक्ती दुबळा बनतो. विषयांच्या चक्रातून मानवाची कधीच सुटका होत नाही. म्हणून एका विश्वात्मक चैतन्याचा म्हणजेच ईश्वरी कृपा प्राप्त करण्याचा नेहमी विचार करावा. प्रपंचात राहाणार्‍या साध्या सरळ मनुष्यांसाठी स्वत:चे कर्तव्य प्रामाणिकपणे करणे, यालाचश्रीज्ञानदेवांनी ‘स्वधर्म’ असे म्हटले आहे. जो मनुष्य स्वत:चे कर्म स्वधर्माने किंवा प्रामाणिकपणेकरत नाही, त्याला अनेक संकटे येतात.
हे सांगताना श्रीज्ञानदेव म्हणतात,
ना तरी रणीं शव सांडिजे । तें चौमेरी गिधीं विदारिजे । तैसें स्वधर्महीना अभिभविजे ।महादोषीं ॥२००॥
रानात टाकून दिलेल्या शवाला गिधाडे चारी बाजूने घेरतात, त्याप्रमाणे स्वत:चा धर्म सोडून दिलेल्या मनुष्याला महादोष व्यापून टाकतात. आपल्या स्वधर्माच्या ठिकाणी कधीही खंड पडू देऊ नये. आपले कर्तव्य तन्मयतेने आणि मन लावून करावे. त्याशिवाय कर्तव्य करत असताना फळाची अपेक्षा करू नये. फळाची अपेक्षा करून कर्म करत राहिल्यास त्या कर्मापासून उत्पन्न होणारे गुणदोष भोगावे लागतात.

श्रीज्ञानदेवांनी म्हटले आहे, ‘कर्माधारें राहाटिजे। परी कर्मफळ न निरीक्षिजे।’ त्या भोगामुळे
गुणदोषांचा विचार अंत:करणात सुखदु:ख उत्पन्न करतो. मनुष्य दु:ख सहन करतो पण सुखाचा उत्साह त्याचा घात करतो. जो आपले कर्तव्य निष्ठेने करतो, फळाची अपेक्षा करत नाही तो काम, क्रोध व लोभ या महाभयंकर त्रिपुटीपासून दूर राहातो. आपल्या जीवनात येणारे असे काही प्रसंग असतात, की ते आपण योग्य रीतीने हाताळले तर सर्वांना न्याय मिळतो. स्वत:च्या मर्यादेत राहून, कष्टाने, प्रयत्नाने आणि दुसर्‍यांना सुख लाभावे
या हेतूने कर्म करावेत. काही कर्म आपल्याद्वारेच पूर्ण करणे असे जेव्हा अपेक्षित असते, तेव्हा तो ‘स्वधर्म’ होतो, उदा. त्यावेळी युद्ध करणे हा अर्जुनाचा स्वधर्म होता. आपल्या आयुष्यात येणार्‍या प्रत्येक प्रसंगांना एक संधी समजून त्यांचा सामना केल्यास जीवन जगणे सोपे जाते. कठीण प्रसंग पाहून त्या प्रसंगाला टाळणे हा उपाय होऊ शकत नाही. जसे फळाच्या आशेने केलेले कर्म आपल्या जीवनात दु:ख उत्पन्न करतात, तसे एखादे चांगले कर्म करताना वाईट गोष्टींची मदत घेऊन ते कर्म चांगले कधीच होऊ शकत नाही. कारण चांगल्या गोष्टी वाईटांसोबत केल्यास त्या ही वाईटच ठरतात.

श्रीज्ञानदेव म्हणतात,
अमृतें तरीच मरिजे । जरी विखेंसि सेविजे । तैसा स्वधर्मीं दोषु पाविजे । हेतुकपणें ॥२२४॥
आपणयां उचिता । स्वधर्में राहाटतां । जें पावे तें निवांता । साहोनि जावें ॥२२८॥

विषासोबत सेवन केले तर अमृतानेही मृत्यू येतो. तसे फळाच्या आशेने केलेल्या स्वधर्माने दोष घडतो. आपल्या स्वधर्माला अनुसरून कर्म करताना जे प्रसंग येतील, ते निवांतपणे सहन करावे. स्वधर्माचे आचरण करणे हा ईश्वरप्राप्तीचा एक मार्ग आहे. स्वधर्माचे आचरण करत असताना बुद्धीला चांगल्या गोष्टींचा ध्यास लागतो. तेव्हा अशी बुद्धी सद्‍बुद्धीत परिवर्तीत होते. ज्या बुद्धीमध्ये केवळ ईश्वराचा ध्यास आणि सत्कर्म दडलेले असतात, अशी सद्बुद्धी स्वधर्माच्या आचरणाने मिळते. कारण सतत मन मायेकडे धाव घेते, पण मनाला मायारचित ईश्वराकडे धावण्यासाठी बुद्धीची जोड आवश्यक आहे. अशी बुद्धी ज्ञानाने प्राप्त होऊ शकते.

श्रीज्ञानदेव म्हणतात,
तैसी दुर्लभ जे सद्‍बुद्धि । जिये परमात्माचि अवधि । जैसा गंगेसी उदधि । निरंतर ॥२४१॥
ज्याप्रमाणे गंगेला निरंतर सामावून घेण्यासाठी समुद्र आहे, त्याप्रमाणे जिचा परमात्माच ध्येय आहे, अशी सद्बुद्धी मिळणे दुर्लभ आहे.
वेद हे आपल्या भारतीय संस्कृतीचे धरोहर आहेत. जेव्हा मनुष्य पृथ्वीतलावर आपले अस्तित्त्व टिकवण्याच्या प्रयत्नात होता, तेव्हा वेद त्याच्या मदतीसाठी धावून आले. वेदांमध्ये अनेक प्रकारचे ज्ञान आहे. वेदांनी अनेक कर्मांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. पण काही वैदिक कर्मांमध्ये फळाची इच्छा केली जाते, जसे की विशिष्ट हेतू पूर्तीसाठी केले जाणारे यज्ञ.

तेव्हा श्रीज्ञानदेव म्हणतात,
जरी वेदें बहुत बोलिलें । विविध भेद सूचिले । तर्‍ही आपण हित आपुलें । तेंचि घेपें ॥२६०॥
‘जरी वेद कर्मसूचक असले तरीही शाश्वत आणि सत्याचा विचार करून, त्यातून फक्त उत्कृष्ट सार निवडावे.’

अशाप्रकारे फलरहित कर्माच्या आचरणाने स्वधर्म घडतो आणि स्वधर्मच ज्ञान प्राप्त करून देतो. एखाद्या आवडलेल्या गोष्टीची इच्छा करणे, सतत अपेक्षा करणे, नवनवीन वस्तूंचा उपभोग घेणे, अप्राप्य वस्तूंची कल्पना करणे किंवा निरर्थक स्वप्न पाहाण्याचा मनाचा प्रयत्न असणे, हे सर्व सोडून द्यावेत. मनाला एवढे सशक्त करावे की एखादी घटना घडली तर त्यापासून होणारा आनंद किंवा दु:ख समान वाटले पाहिजेत. आपल्या आयुष्यात आनंददायक घटना घडल्यास सुखांनी फुलून जाऊ नये आणि एखादी वाईट घटना घडल्यास दु:खांनी खचून जाऊ नये.
श्रीज्ञानदेव म्हणतात,
परी कर्मफळीं आस न करावी । आणि कुकर्मीं संगति न व्हावी । हे सत्क्रियाचि आचरावी ।हेतूविण ॥२६६॥
कर्मफलाची आसक्ती धरू नये आणि वाईट कर्मांमध्ये प्रवृत्त होऊ नये, सर्व सत्क्रिया निष्काम बुद्धीने आचरण कराव्यात.
जीवनात येणार्‍या प्रत्येकाच्या सुखदु:खाचा विचार करणारे केवढे हे अगाध ज्ञान श्रीज्ञानदेवांनी आपल्याला दिले आहे. सुखदु:ख चक्राप्रमाणे येतच राहाणार, पण त्यातच मनाला गुंतवून ठेवल्यास जीवन समृद्ध कसे बनेल? आज आपल्या सारख्या सामान्य मनुष्यांसाठी हे विचार अत्यंत उपयुक्त आहेत.

एखाद्या वाईट गोष्टींमुळे बुद्धी भ्रष्ट झाली तर इतर गोष्टी आठवत नाहीत. बुद्धी त्या वाईट गोष्टींचाच पुन्हा पुन्हा विचार करत राहाते. त्यामुळे इतर अनेक चांगल्या गोष्टींचा विचार करणे राहून जाते. असे वारंवार घडत राहिल्यास तो मनुष्य यशापासून दूर जातो. म्हणून मनात राग व द्वेष येऊ देऊ नये. ज्या मनुष्याचे राग आणि द्वेष नाहीसे झालेले असतात, अशा मनुष्याचे मन कोणत्याही परिस्थितीत शांत राहू शकते.
श्रीज्ञानदेव ज्या मनुष्याची बुद्धी स्थिर आहे, त्याची लक्षणे सांगत आहेत,
नाना दुःखीं प्राप्तीं । जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं । आणि सुखाचिया आर्ती । अडपैजेना ॥२९४॥
अर्जुना तयाच्या ठायीं । कामक्रोधु सहजें नाहीं । आणि भयातें नेणें कहीं । परिपूर्ण तो ॥२९५॥
ऐसा जो निरवधि । तो जाण पां स्थिरबुद्धि । जो निरसूनि उपाधि । भेदरहितु ॥२९६॥

ज्याला विविध दु:ख प्राप्त झाले तरी, त्याचे मन उदास होत नाही आणि सुखाच्या प्राप्तीमध्ये गुंतून पडत नाही. त्याच्या ठिकाणी सहजच कामक्रोध नसतात आणि भयाला तो जाणतही नाही, असा तो परिपूर्ण असतो. असा मनुष्य अमर्याद, उपाधीरहित आणि भेदरहित आहे, तो
स्थिरबुद्धी समजावा. म्हणून मन नेहमी परमात्म्याच्या स्वरूपात ठेवावे. मनाला वेगवेगळ्या इच्छा करण्यापासून आटोक्यात आणावे. एका वाईट गोष्टीच्या विचारामुळे अनेक वाईट गोष्टी पुढे येतात. जणू वाईट गोष्टींची शृंखलाच बनवली जाते. ही शृंखला मनुष्याला मनुष्यत्वापासून दूर नेते. म्हणून आपले इन्द्रिय जे जे अनावश्यक इच्छा करतील त्यांना आवरणे गरजेचे आहे. त्या त्या इन्द्रियांचा स्वभावच तसा असतो की त्यांनी तशी इच्छा करावी, जसे की जीभ. पण त्या इच्छांना आटोक्यात ठेवणे बुद्धीला शक्य आहे, इतकेच नव्हे तर ते आपल्या मनाचे कर्तव्य आहे. एक इन्द्रिय दुसर्‍या इन्द्रियांवर अवलंबून असतो. मनात उत्पन्न झालेल्या इच्छांवर आपण नियन्त्रण ठेवू शकलो, की आपली बुद्धी स्थिर होते. स्थिर बुद्धीमुळे मन शांत राहाते. एक महत्त्वाचे म्हणजे प्रपंचाने दाखवलेल्या छोट्या छोट्या संकटांना शांत असलेले मन कधीच दाद देत नाही. म्हणजे आपल्या जीवनात संकटे येत असतात, पण त्यांना सामान्य बनवून जगण्याचे बळ आपल्याला आधीच प्राप्त झालेले असते. असे मजबूत आणि स्थिर मन चैतन्याकडे ओढ घेते.

श्रीज्ञानदेव म्हणतात,
देखें अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता । तेथ रिगणें नाहीं समस्तां । संसारदुःखां ॥३३८॥
‘जेथे मनाला अखंडीत प्रसन्नता लाभते, तेथे कोणत्याच संसारदुःखांचा प्रवेश होत नाही.’

अशा प्रसन्न मनात विरक्ती सहज रूजू शकते. म्हणून श्रीज्ञानदेवांनी “मनाचा समतोलपणा हेच योगाचे सार आहे” असे सांगितले आहे. जेथे मन आणि बुद्धी यांचे ऐक्य असते, तेथे योग दिसतो. म्हणून फक्त एकाच गोष्टीचा ध्यास घेतलेल्या आणि मन स्थिर नसलेल्या अर्जुनाचे मन आधी
शांत करण्याचा प्रयत्न अनेक उपायांनी येथे केला आहे. योगयुक्त होऊन कर्म करणे म्हणजे एखादे कर्म पूर्ण झाले अथवा अपूर्ण राहिले तरी त्यात आनंद अथवा दु:ख मानू नये. सतत येणार्‍या सुखदु:खाप्रमाणे आपले अंत:करण सुद्धा बदलत असते. अशावेळी कर्म करण्याची भावनाच संपुष्टात येऊ शकते. म्हणून जे समोर येईल ते कर्म आपल्या हातून झाले पाहिजे आणि मन मात्र ईश्वर चरणी लीन झालेले असावे. अशा रीतीने बुद्धीचा आश्रय घेऊन मनाचा समतोलपणा साधता येतो. असा बुद्धीचा समतोलपणा साधणार्‍या साधकाला ‘स्थितप्रज्ञ’ असे म्हटले जाते. जो आपल्या जीवनात येणार्‍या सुखाच्या आणि दु:खाच्या प्रसंगांना धैर्याने सामोरा जातो, तोच प्रज्ञायुक्त मनुष्य आत्मज्ञान समजू शकतो.
एखाद्या वेळी चुकूनही विषयांची आठवण काढू नये. मनात थोडेसे जरी विषय राहिले तर बुद्धी गोंधळून जाते आणि तिची विचार करण्याची क्षमता नष्ट होते. म्हणून असे म्हटले आहे की आपले इन्द्रिय आपल्या नियन्त्रणात असावेत, त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे काही नाही. अंतिम ध्येय असलेले आत्मसुख किंवा सर्व प्रकारची दु:खे ओढून आणण्याला कारण फक्त मन आहे. म्हणून बुद्धीने मनावर नियन्त्रण ठेवणारा मनुष्य शांत राहातो.

श्रीज्ञानदेव म्हणतात,
म्हणोनि अयुक्तपण मनाचें । तेंचि सर्वस्व दुःखाचें । या कारणें इंद्रियांचें । दमन निकें ॥३४७॥
‘मनाची चंचलता हेच दु:खाचे कारण आहे. त्यासाठी इन्द्रियांचा निग्रह करणे, हेच योग्य आहे.’ प्रत्येक वेळी आपल्या मनाची स्थिती शांत ठेवणे, त्यापेक्षा दुसरे ब्रह्मसुख नाही. जे या अवस्थेला पोहोचतात ते ब्रह्मसुखाचा अनुभव घेतात. अशाप्रकारे या दुसर्‍या अध्यायात ज्ञानाच्या गोष्टी
ऐकून ज्ञानाने तृप्त झालेला पण युद्धापासून दूर जाऊ इच्छिणारा अर्जुन पुढील तिसर्‍या अध्यायात आपली जिज्ञासा श्रीकृष्णासमोर कशी व्यक्त करतो, ते श्रीज्ञानदेवांच्या निरूपणातून पाहू या.
--------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

किती सोप्या भाषेत लिहिले आहे हे.
आवडतंय.
लिहीत राहा.
इस्कॉन चे भगवद्गीता पुस्तक आहे घरी.
ते वाचायचा प्रयत्न केलेला पण ते सोडून दिले होते.
जमेना ते तेव्हा, कारण relate होत नव्हते.
आता थोडा अनुभव वाढलाय आणि हे तुम्ही लिहिताय ते तर आवडतंय, समजतंय।
तुमची लेखमाला पूर्ण वाचून झाली की एकदा ते पुस्तक परत वाचून पाहीन असे आता वाटतंय.

अतिशय लक्षपूर्वक एक एक शब्द नीट वाचावा असा लेख. वरवर बघून टाकण्याचा हा विषयच नोहे..
वेळ काढून इथे लिहिल्याबद्दल _/\__