"मला माहीत नाही" असे सांगणे हा मूर्खपणा आहे का?

Submitted by राज अज्ञानी on 8 August, 2026 - 07:08

खबरगावने त्यांच्या मीमांसा मालिकेत अजातशत्रू - संजय बेलद्विपुत्त संघर्षावर एक रोचक व्ह्लॉग बनवला आहे ( व्ह्लॉग = व्हिडीओ ब्लॉग). त्या व्हिडीओवरून हा सर्व खटाटोप. लिंक शेवटी दिली आहे.

संजय बेलद्विपुत्त कोण आणि अजातशत्रूंशी काय संघर्ष झाला हे आपण बघूच.
त्याआधी अज्ञेयवाद म्हणजे काय तर मला माहिती नाही हे सांगणे.

सुरूवातीच्या काळात एकदा माझ्या वरिष्ठांनी दटावलं होतं तिने काही तरी विचारलं होतं. त्यावर मी मला माहिती नाही असं उत्तर दिलं होतं.
यावर त्या मॅडमने "नेव्हर से आय डोन्ट नो" असं मला सांगितलं होतं. त्यांच्या टेबलवर काचेखाली तसं एक पोस्टर पण होतं. ते मला दाखवलं होतं. हा अनुभव खूपदा आला. म्हणजे माहीत नाही असं सांगणं हे नकारात्मक मानलं जातं. काहींनी त्याला पर्याय सुचवले जसे कि मी माहिती घेऊन सांगेन. थोडा वेळ द्या, मी या प्रश्नाचं उत्तर देईन.
पण हे पर्याय सुद्धा नाकारले जातात. काही जण त्याला हुषार्‍या समजू लागले. याचा परिणाम असा झाला कि मला माहिती नाही असे म्हणण्याची भीती वाटू लागली.

पण इथे जो संदर्भ आहे तो निश्चित असलेल्या गोष्टीची माहिती असण्या - नसण्याचा आहे. जसे कि तुम्ही एखाद्या एव्हेंटच्या रेकॉर्डिंगला जाणार आहात. तुमचे काम इव्हेंट पार पाडणे एव्हढेच आहे. रेकॉर्डिंग नाही. पण कुणीतरी संबंधित वरिष्ठ तुम्हाला विचारतो कि, "टेक्निशियन्स येणार आहेत का?" या प्रश्नाला मला माहीत नाही हे उत्तर योग्य पण असू शकते पण ते प्रोफेशनल नाही. तुमचं काम फक्त एव्हेंट इतकेच आहे, पण त्यासाठी प्रोअ‍ॅक्टिव्ह राहून तुम्हाला ही माहिती काढणे हा कॉमन सेन्स आहे.

याउलट जे तुमच्या मर्यादेच्या पलिकडे आहे त्याबद्दल तुम्ही असमर्थच असता.
पण जेव्हां तत्वज्ञान आणि तत्वज्ञानासंंबंधी वादविवाद असे स्वरूप असते तेव्हां मला माहीत नाही हे म्हणणे कितपत संयुक्तिक ठरेल?

आज जेव्हां कुठल्याही प्रश्नाला हो किंवा नाही अशी उत्तरे जास्त लोकप्रिय आहेत तीच अजातशत्रूच्या काळात (बुद्धाचा समकालीन सम्राट) प्रचलित होती का?

हल्ली आपल्या आजूबाजूला नजर टाकली किंवा सोशल मीडियावरील चर्चा पाहिल्या, तर एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते. प्रत्येक माणसाकडे प्रत्येक गोष्टीचे ठाम उत्तर तयार आहे. राजकीय सत्ताकारणापासून ते थेट ब्रह्मांडाच्या अंतापर्यंतच्या कोणत्याही क्लिष्ट विषयावर लोक अशा आत्मविश्वासाने बोलतात, जणू काही सर्व ज्ञान त्यांच्याच हातात एकवटले आहे.

पण जरा भूतकाळात डोकावून पाहिले, तर २५०० वर्षांपूर्वी मगधच्या भूमीत एका दार्शनिकाने याच्या अगदी उलट भूमिका घेतली होती. "मला माहिती नाही" (I Don't Know) ही साधी पण प्रामाणिक कबुली देणारा तो विचारवंत होता, नाव संजय बेलट्ठिपुत्त.

मगधचा राजा अजातशत्रूने ज्याला 'महामूर्ख' म्हणून हसण्यावारी नेले, आजच्या या माहिती -अतिसाराच्या (Information Overload) युगात त्याचाच अज्ञानवाद सर्वात प्रामाणिक आणि विवेकवादी ठरतोय का? हा विचार छळतोय.
आता आपण विषयाकडे जाऊयात.

मगधची श्रमण परंपरा आणि अजातशत्रूचा प्रश्न -

बुद्ध आणि महावीरांच्या काळात उत्तर भारतात, विशेषतः मगध देशात, वैचारिक घुसळण चालू होती. लोक घरेदार सोडत, वनांत राहात आणि जगण्या मरण्याच्या गूढ प्रश्नांवर एकत्र येऊन वादविवाद करत. याला तत्कालीन शब्द तर माहिती नाही. पण कदाचित नंतरच्या काळातला असेल किंवा त्याच काळातला असेल वाद रंग किंवा वाद संगोष्टी म्हणत. पाली भाषेत संगिनी हा शब्द आहे. आजच्या भाषेत ज्याला 'मार्केट ऑफ आयडियाज' म्हटले जाते, संस्कृत किंवा मराठीत विचारपीठ, विद्वत सभा , वाद सभा, शास्रार्थ सभा म्हटले जाते. . या काळात सहा प्रमुख श्रमण आचार्य प्रसिद्ध होते:

१. पूरण कश्यप – कर्मफळ नाकारणारे (अक्रियावाद).
२. मख्खली गोसाल – सर्व काही आधीच ठरलेले असते असे मानणारे (नियतीवाद).
३. अजित केसकंबली – शरीर संपले की सर्व संपले असे मानणारे (भौतिकवाद).
४. पकूध कच्चायन – जग सात नित्य तत्त्वांनी बनले आहे असे मानणारे.
५. निगण्ठ नाटपुत्त (भगवान महावीर) – संयम आणि अनेकांतवादाची मांडणी करणारे.
६. संजय बेलट्ठिपुत्त – कोणत्याही एका ठाम निष्कर्षावर न थांबणारे (संशयवाद/अज्ञानवाद).

एका रात्री अजातशत्रूला झोप येत नव्हती. कारणही तसेच होते. आपल्या वडिलांची (बिंबिसार) हत्या करून गादीवर बसलेला अजातशत्रू सर्व श्रमण आचार्यांकडे गेला. किंवा सर्व आचार्यांना त्याने पाचारण केले असेल. पूर्वी अशा वादविवाद सभा भरत असत.

त्याचा प्रश्न अगदी व्यावहारिक होता: "कुंभार भांडी बनवतो, न्हावी केस कापतो, त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ याच जन्मात दिसते; मग या साधू- श्रमण होण्याचे प्रत्यक्ष फळ या जन्मात काय मिळते?"

(हा प्रश्न त्याने का विचारला असेल?
कदाचित त्याला आपल्या अस्वस्थतेचे कारण लपवून ठेवून प्रश्न नाण्यासारखा टॉस करून त्याचे उत्तर साधूंकडून काढून घ्यायचे असेल. आपली समस्या काय आहे हे सांगणे त्याला जमत नसावे.)

पहिल्या पाच आचार्यांनी आपापल्या तत्त्वज्ञानानुसार ठाम उत्तरे दिली. पण जेव्हा तो संजय बेलट्ठिपुत्त यांच्याकडे गेला, तेव्हा संजय यांनी एका वाक्यात उत्तर न देता, चतुष्कोटी (चार शक्यता - आहे, नाही, दोन्ही आहे आणि दोन्ही नाही) चा वापर करत म्हटले:

"जर मला वाटले असते की परलोक आहे, तर मी तसे म्हटले असते. पण मी हेही म्हणत नाही की परलोक आहे, आणि मी हेही म्हणत नाही की तो नाही..."

चतुष्कोटी ही त्या वेळची पद्धत होती. जसे आधी म्हटले कि हो किंवा नाही यावर बिद्वान थांबत नसत. पण अजातशत्रू हा राजा होता. त्याच्याकडे एव्हढा संयम नव्हता. शिवाय त्याच्या समस्येचे उत्तर यात नव्हते. ( हा माझा तर्क आहे.)

अजातशत्रू संतापला. त्याला स्पष्ट उत्तर हवे होते. त्याने संजय यांना तमाम साधूंमध्ये सर्वात मूर्ख आणि भ्रमिष्ट माणूस ठरवले आणि तो निघून गेला. काही जण अजातशत्रूने त्याला महामूर्ख ठरवले असे मानतात. कदाचित तेव्हांपासून मला माहीत नाही असे सांगणे शहाणपणाचे मानले गेले नसावे. नंतर त्यात सुधारणा झाली असेल. पण सर्वसाम्मान्यांच्यात मला माहीत नाही हे उत्तर मूर्खांचे लक्षण ठरले असावे.

म्हणजे रामदास स्वामींचा काळ येईपर्यंत बर्‍यापैकी बदल झाला होता. पण त्यांना असे सांगावे लागत होते याचाच अर्थ माहिती नाही असे सांगणे शिष्टसंमत समजले जात नसावे. समर्थांनी ते मूर्खाचे लक्षण आहे असे सांगितले म्हणजे नवीन विचार पेरला.

जसे कि टवाळा आवडे विनोद हे समर्थांनी सांगितल्याने महाराष्ट्रात विनोद आणि हसणे हे असभ्य समजले गेले होते. नेमकी कुणी बंडखोरी केली याची कल्पना नाही. पण सभ्य समाजात अत्रे - गडकरींचे नाव घेतात. अत्रे स्वतः गडकरींना गुरू मानतात. पुन्हा विषयावर येऊयात.

विविध विचारवंतांचे आणि परंपरांचे म्हणणे

संजय बेलट्ठिपुत्त खरोखरच मूर्ख होते की त्यांचा विचार समजून घेण्यात इतिहास चूक करत होता? यावर विविध परंपरा आणि अभ्यासकांची मते पाहणे रंजक ठरते:

१. बौद्ध ग्रंथांचे (प्रतिस्पर्धी परंपरेचे) म्हणणे:
दीघ निकायातील सामञ्ञफल सुत्त आणि ब्रह्मजाल सुत्त मध्ये संजय यांच्या विचारसरणीला अमरविक्खेपिक असे नाव दिले गेले. अमर म्हणजे पाण्यातून निसटणारी मासोळी. ज्याप्रमाणे मासोळी हाताला लागत नाही, तशी संजय यांची उत्तरे निसटती असतात आणि ते वादापासून पळ काढतात, असा बौद्ध ग्रंथांचा अक्षेप होता. (ञ चा उच्चार काय आहे हे माहिती नाही. ञ्ञ चा उच्चार तर जास्त अशक्य वाटतो.)

२. श्रीलंकन विचारवंत के. एन. जयतिलके यांचे म्हणणे:
श्रीलंकेचे प्रसिद्ध बौद्ध विद्वान डॉ. के. एन. जयतिलके यांनी त्यांच्या 'Early Buddhist Theory of Knowledge' या ग्रंथात एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक तर्क मांडला आहे.

जयतिलके म्हणतात: "बौद्ध परंपरेनुसार, महात्मा बुद्धांचे सर्वात श्रेष्ठ आणि बुद्धिमान दोन शिष्य; सारिपुत्त (उपतिस्स) आणि मोग्गलान (कोलित) , हे बुद्ध धर्मात येण्यापूर्वी संजय बेलट्ठिपुत्त यांचेच मुख्य शिष्य होते. जर सारिपुत्तांसारखा अफाट प्रज्ञावंत आणि तार्किक बुद्धिमत्ता असलेला माणूस संजय यांचा शिष्य राहिला होता, आणि जर संजय यांच्यामागे २५० शिष्यांचा भलामोठा संघ उभा होता; तर संजय हे निश्चितपणे मूर्ख असू शकत नाहीत.

३. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानी पिरो (Pyrrho) आणि देकार्त (Descartes) यांचे म्हणणे:
पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा इतिहास पाहिला, तर ग्रीक दार्शनिक पिरो याने अगदी हीच भूमिका मांडली होती, ज्याला युरोपमध्ये 'संशयवाद' (Skepticism) म्हणून डोक्यावर घेतले गेले. पिरोचे म्हणणे होते की, "कोणत्याही गोष्टीवर अंतिम ठाम मत बनवू नका; जेव्हा तुम्ही मत बनवणे तहकूब करता , तेव्हाच तुमच्या मनाला खरी शांतता मिळते." (Suspension of Judgment).

पुढे १७ व्या शतकात रेने देकार्त यानेही सर्व गोष्टींवर संशय घेत घेत शेवटी "मी विचार करतो म्हणून मी आहे" या निष्कर्षापर्यंत पोहोचून आधुनिक तत्त्वज्ञानाची पायाभरणी केली. (Cogito, ergo sum) .

म्हणजेच, ज्या विचाराला पश्चिमेत महान तत्त्वज्ञान मानले गेले, त्याच विचाराला प्राचीन भारतातील प्रतिस्पर्धी परंपरांनी मूर्खपणा ठरवून बाजूला सारले!

अर्थात हे खबरगावचे म्हणणे झाले. त्या काळी ज्या प्रश्नांना उत्तरे असू शकतात त्याचे उत्तर न देता चतुष्कोटी पद्धतीचे उत्तर देणे हे सबगोलंकारी किंवा गुळमुळीत उत्तर वाटले असण्याची शक्यता आहे. राजे सुद्धा जसे रंगवले जातात तसे अचानक क्रुद्ध झाले आणि उडवले मुंडके असे सगळेच नसावेत. त्यांना प्रॉपर गुरूकुलात विविध दर्शने, तत्वज्ञान यांचे शिक्षण दिले जात असे. दरबारात वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या जात. विविध वादविवाद आयोजित केले जात. कलाप्रदर्शनी आयोजित केल्या जात. हे सर्व राजाचे व्यक्तिमत्व चतुरस्त्र व्हावे यासाठी असावे. राजा हा नेता असेल तर त्याला काय चूक काय बरोबर याची किमान समज असायला हवी.

मग संजय बेलट्ठिपुत्त उत्तर का देत नसत?
बौद्ध ग्रंथांच्याच पृथक्करणावरून असे दिसून येते की, संजय उत्तर न देण्यामागे तीन मुख्य कारणे (किंवा भीती) होती:

१. असत्य बोलण्याची भीती: जर मला एखाद्या गोष्टीचे पूर्ण आणि अंतिम सत्य माहितीच नसेल, आणि तरीही मी समाजमनाला खूश करण्यासाठी काहीतरी विधान केले; तर ते सत्य नसून माझा पूर्वग्रह ठरेल.
२. मताच्या पाशात अडकण्याची भीती: एकदा का माणसाने जाहीरपणे एखादी भूमिका घेतली (उदा. अमुक निवडणूक कोण जिंकणार किंवा मृत्यूनंतर काय होते), की माणूस सत्याचा शोध घेणे थांबवतो आणि केवळ 'स्वतःचे विधान खरे कसे' हे सिद्ध करण्याच्या संरक्षणात्मक पवित्र्यात (Defensive Posture) जगत राहतो. ( हे माझ्या बाबतीत होतंय आणि वय एक एक वर्षाने वाढतंय तसं जास्त होतंय. कुठेतरी (अल्प) अनुभवाचा अहंकार येतो. पण हे नैसर्गिक आहे असेही वाचले.
३. मानसिक अशांतीची भीती: न समजलेल्या गोष्टींवर वादविवाद केल्याने अहंकार वाढतो आणि मनाची शांतता भंग पावते.

आजच्या काळातील औचित्य: मला माहिती नाही चे मोल
आज आपण अशा काळात जगत आहोत जिथे अपुऱ्या माहितीवर मोठमोठे निष्कर्ष काढले जातात. राजकीय गणिते असोत, सामाजिक प्रश्न असोत की धार्मिक सिद्धांत, 'मला माहिती नाही' असे म्हणणे म्हणजे स्वतःचा कमकुवतपणा दाखवणे अशी एक चुकीची समजूत तयार झाली आहे.

पण संजय बेलट्ठिपुत्त यांचा २५०० वर्षांपूर्वीचा हा छुपा संदेश आजच्या युगासाठी अत्यंत आवश्यक ठरतो. मला माहिती नाही ही अज्ञानाची लाजीरवाणी कबुली नसून, ती बौद्धिक प्रामाणिकपणाची पहिली पायरी आहे.

इतिहासाने अजातशत्रूचे नाव एक यशस्वी राजा म्हणून नोंदवले असले, आणि संजय यांना मूर्ख ठरवले असले; तरी २५०० वर्षांनंतर जेव्हा मानवी बुद्धिमत्ता आणि तर्काचा कस लागतो, तेव्हा पूर्वग्रहमुक्त राहून अज्ञानाची शांत स्वीकारहर्ता दाखवणारा तो संजय बेलट्ठिपुत्तच अधिक खरा आणि कालजयी वाटू लागतो!

काही जण सांगतील कि बुद्धानेही मौन बाळगले होते. तर संदर्भासहीत हे बघावे लागते.
बौद्ध धर्मातील अव्याकृत' परंपरा. - (Silence/Unanswered questions)
बौद्ध परंपरेतही १० प्रश्नांवर उदा. मृत्यूनंतर काय होते? बुद्धांनी मौन बाळगले आहे. बुद्धांचे मौन हे संसारातील दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी म्हणजे व्यावहारिक हेतूने होते, तर संजय यांचे मौन हे अज्ञानाची प्रामाणिक कबुली व मानसिक शांतीसाठी होते. म्हणजे थंब रूल लावून याकडे बघू नये. अनेक गोष्टींचे अर्थ संदर्भ बदलले कि बदलतात हाच थंब रूल लक्षात ठेवला तर अनेक चर्चा निंयंत्रणात राहू शकतात.

पूर्वी झालेले इतरही वाद्दविवाद आता क्वांटमच्या नावाने पुन्हा जिवंत होत आहेत. इथे पूर्वीचे सगळे अस्सल हे सांगण्याचा बिल्कुल अट्टाहास नाही. अर्थात हे सांगणे न लगे. विशेषतः नियतीवाद. (मायबोलीकरांना जास्त सांगणे लागू नयी). पण नियतीवाद का धोकादायक आहे यावरही त्याच काळात बुद्ध, महावीरापासून अनेकांनी व्यावहारिक प्रवचने दिलेली आहेत. आता सायंटिफिक लेबल्स लावून अर्धवट वाद नव्याने चर्चेला आला आहे. गंमत आहे.

मला माहीत नाही म्हणून आपण "अज्ञानी" ठरलो तर चुटपुट लागू नये किंवा अपराधी वाटू नये.

कारण दासबोधात समर्थ रामदास स्वामींनी मूर्खांची लक्षणे या समासात या अर्थाची तीन लक्षणे सांगितलेली आहेत.

अल्पज्ञानी परी अहंता मोठी। बहु बोल बोलतो पोटीं।
कांहींच न समावे पोटीं। तो एक मूर्ख ॥
(अर्थ: ज्याच्याकडे अल्प ज्ञान आहे, पण अहंकार मोठा आहे; जो पोकळ गप्पा मारतो आणि ज्याच्या पोटात काहीच टिकत नाही किंवा अज्ञान झाकता येत नाही, तो मूर्ख होय.)

आपण कांहींच नेणे। आणि दुसन्यास शिकवूं पाहे शहाणे।
आपण बुडे अन्यास बुडवी। तो एक मूर्ख ॥
(अर्थ: ज्याला स्वतःला काही माहिती नाही, पण जो दुसऱ्याला शिकवायला जातो, तो स्वतःही बुडतो आणि दुसऱ्यालाही बुडवतो.)

न कळे तें पुसों नेणे। आपण सिकों न म्हणे।
अपणांस बहुत शाहाणा म्हणे। तो एक मूर्ख ॥
(अर्थ: ज्याला काही कळत नाही आणि जे कळत नाही ते विचारायची (मला माहिती नाही हे कबूल करायची) ज्याची तयारी नसते, उलट स्वतःला शहाणा समजतो, तो मूर्ख होय.)
रामदास स्वामी संजयना शहाणे ठरवतात.

हा लेख या तिन्ही लक्षणांनी युक्त आहे असे आताच वाटते आहे . Lol

संदर्भ
१. http://www.youtube.com/watch?v=au10yQ0tyPo
२. दीघ निकायातील सामञ्ञफल सुत्त (Sāmaññaphala Sutta)
३. विनय पिटक - बुद्ध धर्मातील सर्वात प्रमुख दोन शिष्य सारिपुत्त (उपतिस्स) आणि मोग्गलान (कोलित) हे आधी संजय यांचेच शिष्य होते.
४. अव्याकृत परंपरा - https://hindi.webdunia.com/buddhism-religion/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6...
५. दासबोध - मूर्खांची लक्षणे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राज, तुम्ही सांगोपांग लेख लिहीलेला आहे.वेगवेगळ्या अंगांनी विचार करणारी उदाहरणे दिलेली आहेत. लेख रोचक आहेच. आणि तुमच्यामुळे हे सारे लोक आणि त्यांचे तत्वज्ञान कळले.
.
'मला माहीत नाही' म्हटले की जबाबदारी टळते. इन्कॉम्पिटन्स दिसतो हे खरे आहे. पण जे सत्य आहे ते दिसणारच. घोंगडं घातलं म्हणुन कोंबडा आरवायचा रहात नाहीच. अजुन एक स्वतःचे अज्ञान - (व्हाय कान्ट वी एम्ब्रस ) मान्य करु नये?
.
संजय बेलटिपुत्त मला पहील्यांदा, सर्वाधिक बुद्धीमान वाटले. मग भगवान महावीरांचे दडपण आले Happy मग गोलाकार विचार करुन असे वाटले की जे अन्य श्रमण आचार्य त्यांच्या त्यांच्या तत्वाशी एकनिष्ठ होते, कदाचित तेही तितकेच बुद्धीमान असतील फक्त त्यांचे स्वतःच्या तत्वज्ञानाबद्दलचे कन्व्हिक्शन (खात्री) जबरदस्त असेल. तेव्हा संजय बेलटिपुत्त धरुन सर्वच जण अत्यंत बुद्धीमान आणि एनलायटनड असणार यात मला संशय नाही.

सामो
अडचण हीच आहे ना कि संजय यांचे स्वतःचे वक्तव्य, साहित्य उपलब्ध नाही. जे काही उपलब्ध आहे ते इतर दर्शनांच्या साहित्यावरूनच समजते.
त्या काळात मानवी स्वभाव खूप वेगळा असेल असं नाही. फक्त आजच्या इतके वेगवान आयुष्य नसल्याने वादविवाद, विविध तत्वज्ञानांचा अभ्यास, संशोधन यासाठी भरपूर वेळ मिळत असावा. त्या काळी अशांच्या पोटापाण्याच्या व्यवस्था आपोआप लागत होती. त्यांना आदर मिळत होता.

एक किसा असा आहे कि बुद्धाचा झंझावात सुरू होण्याआधी संजय बेलद्विपुत्त यांचेच सर्वात जास्त शिष्य होते. हळूहळू ते बुद्धाकडे जाऊ लागले. एका शिष्याने विचारले जर असेच चालू राहीले तर तुम्ही पुढे काय करणार?

तर ते म्हणाले कि जगात शहाणे जास्त असतात कि सामान्य ?
त्याने उत्तर दिले सामान्य.
तर मग ठीक आहे, माझ्याकडे सामान्य राहतील, शहाणे बुद्धाकडे जातील.
रिडिंग बिटविन लाईन्स - जर बुद्धाकडे जास्त लोक गेले तर ते सामान्य, माझ्याकडे कमी राहिले तर ते शहाणे.

कुठल्याही काळात एखादे तत्वज्ञान मागे पडते तेव्हां ते टाकाऊच असेल असे नाही. त्याला मान्यता पुढे वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या काळात मिळू शकते. जेव्हां त्याची अनुभूती लोकांना येऊ लागते. एखाद्या यशस्वी गोष्टीने झाकली गेलेली प्रत्येक गोष्ट टाकाऊ नाही, तसेच यशाने पुढे गेलेली गोष्ट पण उगीच चढवून ठेवलेली आहे असाही याचा अर्थ नाही.

>>>>>>रिडिंग बिटविन लाईन्स - जर बुद्धाकडे जास्त लोक गेले तर ते सामान्य, माझ्याकडे कमी राहिले तर ते शहाणे.
तुम्ही सांगीतलं नसतं, तर हा गूढार्थ कळलाच नसता. असे सटली बोलता बोलता फिरकी घेणारी व्यक्ती किती बुद्धीमान असेल. कमालच आहे.

१.समाजातील प्रत्येक घटकाला स्थैर्य हवे असते.
२. प्रत्येकालाच उत्थान हवे असते हे चूक आहे. काहींना फक्त समाधान हवे असते.
३. आपल्या कामाच्या जागी मला माहीत नाही हे म्हणणे चूक ठरते. काहीतरी गडबडगुंडा वेळ मारून नेणारे उत्तर वरिष्ठांना किंवा संबंधितांना हवे असते. पण इतर ठिकाणी ठोकपणे सांगावे की मला माहीत नाही. विचारणारा मिळवेल माहिती दुसरीकडून.
४. लेखात ज्या बौद्धकालीन घटनांची चर्चा आहे त्याबद्दल.... काहींना राजाश्रय होता आणि मोठ्या शिष्यगणांना पोसण्याची क्षमता( ती संन्यासाकडे कशी असणार? तर राजाकडूनच असणार.)तर आता हा मुख्य माणूस/ आचार्य/ गुरू सत्ताधीश राजाचे समाधान करू शकला नाही तर तो मूर्ख ठरतो ( राजा त्याला शिक्षा तर करू शकत नाही पण मूर्ख म्हणेल आणि निधी थांबवेल. मग आश्रीत शिष्यगण दुसरीकडे जाणारच.
५.पूर्वी ग्रहणाचं भाकित करू न शकणाऱ्या राजज्योतिषांना नोकरी गमवावी लागली होती. हे आपल्याला माहीत आहेच.
६. जन्म मृत्यूचं आणि सामाजिक असमता, सुखदुःख यांचं कारण कुणालाच माहीत नाही पण त्यावरून अनेक तत्त्वज्ञानांचा उदय झाला. कुणी कर्म आणि दैव मांडलं. कुणी पुनर्जन्म आणि कर्म याचा दबदबा निर्माण केला. पण माहीत नाही म्हणणे हे विघातक ठरू शकतं जर समोरचा बलाढ्य असेल.

srd तुमची उत्तर देण्याची पद्धत आवडली. ऑर्गेनिक विचार करता. हे छान आहे. काही गोष्टी मान्य आहेत.

३. आपल्या कामाच्या जागी मला माहीत नाही हे म्हणणे चूक ठरते. >> हे वरिष्ठांवर ठरते. मला नंतरच्या काळात एक बंगाली वरिष्ठ मिळाले. ते म्हणायचे कि जर नेमकी माहिती नसेल तर तसे सांगावे म्हणजे समोरचा विसंबून राहत नाही. माझ्या मते हे सर्वात योग्य आहे. अगदी सुरूवातीलाच आपले तेच खरे असे समजणारे वरिष्ठ मिळणे हे दुर्दैवी होते. ते वय शिकण्याचे असते. त्यात जगरहाटी पण येते.

काहींना राजाश्रय होता आणि मोठ्या शिष्यगणांना पोसण्याची क्षमता( ती संन्यासाकडे कशी असणार? तर राजाकडूनच असणार.) >> राजाश्रय म्हणजे नेपोटिजम नाही. ज्याच्याकडे वैचारीक शक्ती असेल त्यालाच राजाश्रय मिळतो. बुद्धाने अनेक गुरू केले. पण तो चिकित्सक फार होता. त्याने सर्व गुरूंकडचे ज्ञान प्राप्त केले. पण यामुळे मला काय मिळाले हा प्रश्न तो स्वतःला विचारत असे. त्याने हठयोग पण केला. शेवटी कॅन्सल आउट करताना त्याला त्याचे तत्वज्ञान प्राप्त झाले. या जोडीला त्याच्याकडे अमोघ वाणीचे शस्त्र होते. जे गरीब, श्रीमंत, लहान -वृद्ध, स्त्री पुरूष, राजा प्रजा सर्वांना समजण्यासारखे होते. त्यामुळे त्याचा शिष्यगण वाढत गेला. त्याने सुरूवात फक्त पाच शिष्यांपासून केली होती.

आपल्याला संजय बेलद्विपुत्त यांचे शिष्य का कमी झाले याची निश्चित माहिती नाही, त्यामुळे अंदाज करण्यात अर्थ नाही असे मला वाटते. करायचेच झाले तर इतर काही आचार्यांबद्दल माहिती मिळते कि ते विक्षिप्त वागत. त्रोटक उत्तरे देत. स्पष्टीकरणे देत नसत. गूढ वागत. बुद्धाला राजाश्रय जरी मिळाला तरी भिक्खू संघासाठी बनवलेल्या कडक अटी आणि श्तीचे नियम पाहता राजाश्रय मिळाला म्हणून कुणी तिकडे गेले असेल असे वाटत नाही.

लेख आवडला, रोचक माहिती आहे.

Srd यांनीही काही चांगले मुद्दे मांडले आहेत.

एक म्हणजे राजाला अथवा अशा मोठ्या पदावरील लोकांना माहित नाही उत्तर न आवडणे आणि दुसरे आपण सामान्य लोकांना मनात द्वंद्व नको असते आणि काही अनुत्तरित नको असते. काहीतरी समाधानकारक उत्तर हवे असते ते खरे असलेच पाहिजे असे नाही. अविश्वसनिय वाटत असेल तरी कुणीतरी गुरू, विद्वान, नावाजलेल्या व्यक्तीने तेच कन्फर्म केले की समाधान होते. तत्वज्ञानात यासाठी मग सगळी उत्तरे असतात वर srd यांनी लिहिले तसे आणि नसेल तेव्हा परमेश्वरी योजना आपल्याला कळत नाहीत, काहीतरी त्याचे नियोजन असेल, वेळ आली की कळेलच असा दिलासा चालतो. मग पुढे घटना घडायाच्या तशा घडतात त्याची सांगड घालुन हीच ती योजना होती असे समाधान होते. माहित नाही, कुणीच सांगु शकत नाही असे उत्तर मिळाल्यास बहुतेकांचे मन अशांत, चिंताग्रस्त राहते आणि व्यक्तीनुरूप त्याची तीव्रता मोठी असू शकते.
या कारणास्तव माहित नाही ऐवजी काहीतरी समाधानकारक सांगणे, मग त्यावर अजुन काहीतरी असे करत, कुठले लोकांना जास्त पटते आणि कुठल्याने मागे पहाता हे बरोबर, तर्कसंगत होते असे वाटण्याची शक्यता जास्त आहे अशा पद्धतीने काही सिद्धांत रचले गेले असावेत. यामुळे काही विचारवंतांचे उपयुक्त असे काही मागे पडले असावे, दुर्लक्षित झाले असावे.
सध्याच्या जमान्यात मात्र अशा केवळ समाधान करणाऱ्या तत्वज्ञानाचा आधार न घेता जगणे सोपे झाले आहे. माझ्याच बाबतीत का? अशा प्रश्नावर माहित नाही पेक्षाही रँडम योगायोग, हा प्रश्नच चुकीचा आहे याची जाणीव, स्विकार अधिक प्रमाणात होऊ शकतो/व्हायला हवा.

इंटरेस्टिंग, आणि माझा आवडता विषय, थँक्स. थोड्सं वाचलं ऐकलं आहे, पण सगळं माहिती नाही. इथं चर्चा झाली तर मस्त होईल.

अनेकांना माहितीच असेल, पण विषय निघाला आहे तर दस्तावेज म्हणून लिहून ठेवतो-
सॉक्रेटिसच्या मित्राने (नाव आठव्त नाही) जेव्हा ओरॅकलला विचारलं (ही बाई होती ना?- चेक करू नंतर) की सॉक्रेटिसपेक्षा जास्त माहिती असलेलं, जास्त शहाणीव असलेलं कुणी असेल का, तर ती नाही म्हणाली. सॉक्रेटिसला हे कळलं तेव्हा तो अस्वस्थ झाला. स्वतःपेक्षा बुद्धिमान, माहिती असलेला / ली कुणी सापडतं का या आशेने वणवण हिंडला, पण सगळ्यांना सगळीच माहिती होती, असं सगळ्यांनी सांगितलं. अज्ञानी किंवा कमी ज्ञानी असल्याचं कुणीच मान्य केलं नाही.

त्याला कळलं ते हे, की आपल्याला कमी ज्ञान असल्याचं माहिती आहे, पण इतर कुणाला माहितीच नाही. हे माहिती असणं हेच ज्ञानाचं लक्षण असल्याचं त्याला वाटलं. त्यानंतरचं त्याचं वचन फेमसच आहे- 'आय नो दॅट आय नो नथिंग!' किंवा 'मला काय माहिती आहे, हे मला माहिती आहे असं मला वाटत नाही'.

या 'एन्लायटन्ड इग्नोरंस'बद्दल मागे कुठेतरी लिहिलं होतं, कुठे ते आठव्त नाही.
---

Srd यांचे काही मुद्दे बरोबर वाटत असले तरी ते कामाच्या, व्यवहाराच्या ठिकाणचे आहेत, स्वतःला शोधण्याच्या आणि तसं शोधण्याचे रस्ते धुंडाळण्याचे नाहीत. कामाच्या ठिकाणी पोट भरण्यासाठी काम करावं लागतं. तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी पोट आधीच भरलेलं असावं लागतं.

कोणत्या ठिकाणी ( चौकटीत) आपल्याला प्रश्न पडला आहे किंवा विचारला आहे यावर उत्तर बदलतं.
आपल्याकडे पूर्वी गडगडाट होऊन पाऊस पडू लागला की लहान मुलास समजावण्यासाठी आजी सांगायची "म्हातारी दळतीय" . प्रश्न विचारणाऱ्याचं वय आणि समज महत्त्वाची.

“काम” आणि “पोट भरणं” याबद्दल बोललो मी. philosophy प्रश्न विचारणाऱ्याचं वय समज अक्कल वगैरे गृहीत धरत नाही.
तत्त्वज्ञान तुमच्याकडे येत नाही कधी. तुम्हाला त्याच्याकडे जावं लागतं.

काम, भुक, गरज, गरिबी अशा ठिकाणी कुठचीही फिलॉसॉफी नसते. असलीच तर ते हे सारं बाहेरून बघणार्‍यांच्या नजरेत असते.

पुन्हा एकदा: पोट भरलेलं (म्हणजे फंडामेंटल नीड्स पूर्ण झाल्यानंतर) असल्यानंतरच हा विषय बोलता येतो.

काम, भुक, गरज, गरिबी अशा ठिकाणी कुठचीही फिलॉसॉफी नसते. असलीच तर ते हे सारं बाहेरून बघणार्‍यांच्या नजरेत असते.

पुन्हा एकदा: पोट भरलेलं (म्हणजे फंडामेंटल नीड्स पूर्ण झाल्यानंतर) असल्यानंतरच हा विषय बोलता येतो. >>
+ इन्फिनिटी. Well said.

मला माहिती नाही, हे सांगणे चूक आहे का ?

नाही मला तसे वाटत नाही, वडीलधारे सांगून गेलेत "कुठलेही सोंग आणता येते दामाजीपंतांचे/ पैशाचे सोंग आणता येत नाही" ज्ञान अधिष्ठित नोकऱ्या करताना ही करन्सी ते स्पेसिफिक ज्ञान असते, जर ते आपल्यापाशी नसेल तर तसे सांगून मोकळे व्हावे आणि प्रसंगी ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. कारण शिकलेले कधी काही वाया जात नाही ही वडीलधाऱ्या मंडळींची दुसरी शिकवण.

मला तरी इतकेच सुचले. बाकी साजिरा ह्यांच्याशी सहमत आहे, भरल्यापोटी माणसे वेगळीच असतात तत्वज्ञान वेगळेच असते पण भुकेला, गरजेला अन् वेळेला काही वेगळेच असते.

साजिरा बरोबरच सांगताहेत.
मला माहीत नाही हे योग्य वेळी (पहिल्यांदा) सांगितलेले बरे. पण जर एकदाही सांगितले नाही, तर वेळ निघून जाते.

माझ्याबाबतीतला स्पेसिफ प्रसंग असा होता कि माझा सहकारी कुठे आहे हे माझी बॉस विचारत होती, मला माहितीच नव्हते, तर मग तेच उत्तर दिले. ते तिला आवडले नाही.

माझ्याबाबतीतला स्पेसिफ प्रसंग असा होता कि माझा सहकारी कुठे आहे हे माझी बॉस विचारत होती, मला माहितीच नव्हते, तर मग तेच उत्तर दिले. ते तिला आवडले नाही.

हे मला विचित्रच वाटले, अर्थात तुमच्या सहकाऱ्यांची खानेसुमारी ठेवणे अन् ते कितीवेळा मोकळे व्हायला किंवा विड्या काड्या मारायला गेले, फील्ड मध्ये गेले, क्लायंटकडे गेले इत्यादी मोजमाप तुमच्या कार्यकक्षेत असेल तर भाग वेगळा !

काम, भुक, गरज, गरिबी अशा ठिकाणी कुठचीही फिलॉसॉफी नसते. असलीच तर ते हे सारं बाहेरून बघणार्‍यांच्या नजरेत असते.>>> +१००

आपण कांहींच नेणे। आणि दुसन्यास शिकवूं पाहे शहाणे।
आपण बुडे अन्यास बुडवी। तो एक मूर्ख ॥
(अर्थ: ज्याला स्वतःला काही माहिती नाही, पण जो दुसऱ्याला शिकवायला जातो, तो स्वतःही बुडतो आणि दुसऱ्यालाही बुडवतो.)

शेअर बाजारात असे बुडणारे आणि बुडवणारे पैशाला पासरी मिळतात.
अशा बुडणार्यात मी पण एक आहेच.

(म्हणूनच मी कुणालाही काहीही बातमी किंवा टीप कधीही देत नाही. )