कर्वेतले दिवस ३: परीक्षेच्या पूर्वसंध्येला हॉस्टेलवरची तणावपूर्ण शांतता

Submitted by मार्गी on 7 August, 2026 - 23:11

✪ अवघड विषय- केस वर्क, रिसर्च मेथडोलॉजी आणि पब्लिक हेल्थ
✪ इतना अच्छा मौसम है और इन बीमारियों के अलावा...
✪ असे शिक्षक मिळायला नशीब पाहिजे!
✪ "हे लक्षात ठेवायचंय!"
✪ अर्ध्या- कच्च्या गुणांना मिळणारं उत्तेजन
✪ वस्तीमधलं फिल्ड वर्क, रिपोर्ट लिहीणं आणि फॅकल्टीजसोबतच्या कॉन्फरन्सेस
✪ परीक्षेच्या आधी नोटस आणि झेरॉक्सला असलेली मागणी!

कर्वे इन्स्टिट्युटच्या हॉस्टेलवर वरच्या मजल्यावरची दुसरी खोली- रूम नं. १५ माझं घर बनली! नगरचा संग्राम कदम आणि नागपूरचा प्रवीण चोखंद्रे माझे रूम मेटस झाले! संग्राम एकदम रांगडा तर प्रवीण सडपातळ आणि नागपूरचं हिंदीमिश्रित मराठी बोलणारा! हसवणारा आणि इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजीत बोलणारा! १५ ऑगस्टचं ध्वजवंदन करताना संग्रामने एनसीसी वेशात दिलेल्या "परेड सावधान विश्राम" सूचना अजून आठवतात.

पहिल्या वर्षी तीन विषय थोडे अवघड वाटले. पहिला सार्वजनिक आरोग्य. त्यातल्या संकल्पना व सामाजिक पैलू ठीक होते. पण ते डिप्थेरिया- मलेरिया- टिटॅनस आणि त्यांचं वर्णन व निकष वगैरे! इतना अच्छा मौसम है और हमें इन बीमारियों के अलावा कुछ सुझ नही रहा है, अशी स्थिती! अनुराधा पाटील मॅडम छान शिकवायच्या. त्यांचे सौम्य उच्चार- सांगण्याची शैली आणि हसतमुख चेहरा अजून आठवतो! तरी बरं नव्या मित्र- मैत्रिणींमुळे ग़ुलाम अली, काव्य मैफिल, कविता अशा अज्ञात प्रदेशात प्रवेश झाला होता! माझा ठरलेला दिनक्रमसुद्धा मोडला. त्यातच बीएमध्ये तीन वर्षं शिकलेलो फ्रेंच आणि जर्मनसुद्धा थांबलं. कॉलेज सुरू झाल्यावर पहिले वाटलं होतं कॉलेज करत करत मला माझं जर्मनसुद्धा पुढे शिकता येईल. सर्टिफिकेट व डिप्लोमा असं दोन वर्षं शिकलो होतो. पण अभ्यासक्रम, दिनक्रम आणि अपेक्षित अभ्यास बघून जर्मन पुढे शिकण्याचा विचार सोडून दिला.

(इथे सगळे लेख एकत्र वाचता येतील. विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, सायकलिंग, फिटनेसबद्दलचे लेख वाचता येतील.)
ह्या लेखाचा व्हिडिओ सारांश इथे बघता येईल.

रिसर्च मेथडोलॉजी हा विषय अनेकांना कठिण वाटला. एमएसडब्ल्यूमध्ये पुढे संशोधन प्रबंध लिहायचा असल्यामुळे तो विषय पहिल्या वर्षीपासून होता. माझ्या आवडत्या नागमणी राव मॅडम शिकवायच्या. शिवाय त्या माझ्याच स्पेशलायजेशनच्या. त्या अनेक उदाहरणं आणि घटना सांगून शिकवायच्या. त्यामुळे मला फार अवघड गेला नाही. तांत्रिक संकल्पना मात्र समजून घ्याव्या लागायच्या. सँपलिंग पद्धती, सँपलिंग युनिव्हर्स, डेटा सेटस, डेटा ऍनालिसिस अशा सगळ्या गोष्टी त्यात होत्या. रँडमला मराठीत यादृच्छिक म्हणतात हे कळालं! नागमणी राव मॅडम तशा दक्षिण भारतीय. पण त्यांनी TISS मध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर काही वर्षं सांगली व इतर ठिकाणी महिलांसोबत काम केलं. त्यामुळे त्या कष्टपूर्वक मराठी शिकल्या आणि नंतर मुलांनाही मराठीत शिकवायला लागल्या. थोडा दक्षिण भारतीय व इंग्रजी प्रभाव असलेलं त्यांचं मराठी! "तुमच्यामुळे मी मराठी शिकली आणि आता मराठीत शिकवली!” त्या खूप जास्त विद्यार्थीप्रिय होत्या. विद्यार्थ्यांसाठी कधीही उपलब्ध असायच्या. असे शिक्षक मिळायला खरंच नशीब पाहिजे! बोलता बोलता त्या सांगायच्या, "टिसमध्ये मी होती, तेव्हा माझे मित्र मला चष्मा काढ म्हणायचे, तुझे डोळे सुंदर आहेत म्हणायचे!” अशा वातावरणात राहून हळु हळु आमची पण प्रगती होत गेली! चहा न पिणार्‍या मैत्रिणीलाही गप्पांसाठी हॉटेलवर बोलवण्याची क्षमता आली! पुणे म्हणजे सुंदर मुलींची फॅक्टरी असं माझ्या भावाचं एक वाक्य होतं! अशा पुण्यातल्या कर्वेनगर- कमिन्स परिसरात जाण्याचं भाग्य मिळायचं! अशा वातावरणात अंतर्मुखतेच्या विरुद्ध दिशेने माझा प्रवास सुरू झाला!

केस वर्क हा विषयसुद्धा तसा तांत्रिक. संशोधन ही पण सामाजिक कामाची एक पद्धत आहे (a method of social work), तशीच केस वर्कसुद्धा. केस वर्क म्हणजे विशेष स्थितीतली उदाहरणं किंवा विशिष्ट व्यक्तिंसोबत केलेलं काम. एकाच व्यक्तीसोबत दीर्घ काळ केलेलं काउंसिलिंग किंवा थेरपी तशा प्रकारचं. गीता राव मॅडम हा विषय शिकवायच्या. ओरिएंटेशन लेक्चर्सच्या वेळी त्या अमेरिकेत होत्या. पण त्यांचा दरारा आणि कीर्ती आमच्यापर्यंत आलीच होती. गीता राव मॅडम! अतिशय अचूक, शिस्तप्रिय आणि करारी शिक्षिका! छोटे केस, टिकली आणि खंबीर मुद्रा! शिकवण्यासाठी अतिशय कटिबद्ध. छोटे छोटे मुद्दे घेऊन विषय सोपा करायच्या. विद्यार्थी त्यांना विनाकारण घाबरायचे! त्यात मुलांच्या हॉस्टेलवर त्या इन्स्पेक्शन करायच्या! पन्नाशीमध्ये कार चालवायला त्या कशा शिकल्या हे त्यांनी सांगितलं होतं. त्यांची स्किल लॅब खूप अनुभवण्यासारखी असायची. एक एक छोटा प्रसंग आणि त्या एका मिनिटाच्या प्रसंगाचं त्यांनी अनेक बाजूंनी केलेलं विस्तृत विश्लेषण! अहा हा! असे शिक्षक असतील तर त्यांच्यासाठी शिकवणं आणि आपल्यासाठी शिकणं सुंदर होणारच! मुलं तशी खूप कच्ची होती. पण तरी शिक्षक- शिक्षिका मुलांच्या गुणांचं कौतुक करायच्या. प्रोत्साहन द्यायच्या. हे कौतुकाचे शब्द- त्यांच्याच भाषेत "पॉझिटीव्ह स्ट्रोक" मुलांना आणखी पुढे जायला प्रेरणा द्यायचे.

हसतमुख महेश ठाकूर सरसुद्धा (आज जे तिथे डायरेक्टर आहेत) शिकवायचे आणि हसवायचे. विद्यार्थ्यांचे खूप लाडके! आमच्या स्पेशलायजेशनचे करूणा सरही शिकवायचे. ग्रामीण भागातल्या मुलांची आपुलकीने चौकशी करायचे. माझ्या फिल्ड वर्क गाईड रूमा बावीकर मॅडम मानसशास्त्र छान शिकवायच्या. त्यांची सांगण्याची पद्धत हळुवार होती. समाज कार्याचा एक पाया म्हणजे संवाद कौशल्य, मानसशास्त्र आणि व्यक्तिमत्वाची जडण घडण. शिवाय बाल मानसशास्त्र- व्यक्तीच्या विकासाचे टप्पे. हा विषय त्यांच्या शिकवण्यामुळे अजूनही आठवतो. माणूस नाही तर प्राणीच कसा सवयीने बांधला जातो हे त्या पाव्हलोव्हच्या कुत्र्याचं उदाहरण देऊन सांगायच्या! आणि म्हणायच्या की, लोकांना फक्त तो कुत्राच लक्षात राहतो, मूळ विषय नाही! पण "हे लक्षात ठेवायचंय" असं सांगून सांगून त्यांनी आम्हांलाही ते लक्षात ठेवायला शिकवलंच! फिल्ड वर्क गाईड म्हणूनही त्या छान होत्या.

पहिल्या वर्षीचं फिल्ड वर्क मला तसं नवखं होतं. वस्तीतले मुलं- शिक्षकांसोबत काम. त्याबरोबर गाईडने सांगितलेल्या गोष्टी करणं. पण प्रेझेंटेशन व लोकांसोबत सलग बोलण्याचा आत्मविश्वास नव्हता. एक पुस्तकी शैली होती. त्यामुळे फिल्ड वर्क तितकं छान झालं नाही. पण हे कसं करायला पाहिजे, कसं बोललं पाहिजे हे मॅडम छान सांगायच्या. प्रथम संस्थेतलं माझं फिल्ड वर्क तसं साधं होतं. पण माझी मैत्रीण- सईचं फिल्ड वर्क फार अवघड होतं. पॅलिएटीव्ह केअरवर काम करणार्‍या संस्थेत तिची प्लेसमेंट होती. शेवटच्या टप्प्यातल्या कँसर रुग्णांसोबतचं ते काम होतं! त्यांना भेटणं, बोलणं, त्यांची शेवटची इच्छा जाणून घेणं असं ते होतं. एक खूप वेगळं जग होतं ते. पॅलिएटिव्ह केअर म्हणजे केवळ परिहारात्मक शुश्रुषा. उपचार किंवा इलाज नव्हे. पहिले काही दिवस तिला खूप रडू यायचं. पण तिच्या गाईड गीता राव होत्या. त्यांनी तिला समजावलं. मग पुढे पुढे तिने छान काम केलं. ती सांगायची की, अशा शेवटच्या टप्प्यातल्या लोकांना आपण एक शब्द बोललो तरी खूप बरं वाटतं. आपण त्यांचा हात धरला तरी त्यांना बरं वाटतं. तेही आनंदी राहू शकतात. तिचे ते अनुभव खूप हृद्य होते. तिने ते रिपोर्टही छान लिहीले होते.

अनेक मित्र- मैत्रिणींचे फिल्ड वर्क असे आव्हानात्मक होते. कोणाला लांब लांब प्रवास करायला लागायचा. कुठे बालगृहातल्या मुलांसोबत काम होतं. त्यांचे प्रश्न वेगळेच असायचे. काही संस्था बौद्धिक अक्षम मुलांसोबत काम करणार्‍या होत्या. काही विद्यार्थी हे सामाजिक कामाचा अनुभव असलेलेसुद्धा होते. सोबतच राहात असल्यामुळे आणि सातत्याने भेटत असल्यामुळे त्यांच्याकडून त्यांचे अनुभव आणि विषय कळायचे. फिल्ड वर्क झाल्यावर दोन दिवसांमध्ये रिपोर्ट लिहून फाईल गाईडकडे ठेवायची. त्यांचे रिमार्क्स यायचे. नंतर एकल चर्चा (इंडिव्हिड्युअल कॉन्फरन्स) आणि त्या फिल्ड वर्क गाईडच्या सर्व मुलांची एकत्रित चर्चा (ग्रूप कॉन्फरन्स) व्हायची! रिपोर्ट लिहायला मला आवडायला लागलं. खूप व्यस्त दिनक्रम होता पण मजाही यायची. दुपारी तीनला लेक्चर्स झाल्यावर मग कॉन्फरन्सेस व्हायच्या. किंवा ग्रंथालयात इतर वाचन असायचं. तिथे छान पुस्तकं आणि अभ्यासाचं वातावरण! त्यात कधी‌ कधी संध्याकाळही व्हायची. संध्याकाळी उशीरा किंवा रात्री नागमणी मॅडम सगळ्यांना "हॅपी वर्किंग" म्हणत जाताना दिसायच्या!

महिला सक्षमीकरणावर एक छोटं प्रेझेंटेशन चार मुली व तीन मुलं असं मिळून केलं. शोषण होणार्‍या महिला ते सुपरवूमन अशी मिळून मांडणी केली होती. जे शिकतोय ते आत्मसात (इंटर्नलाईझ) करण्यासाठी अशा कृती उपयुक्त होत्या. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून हळु हळु जडण घडण होत होती. आत्मविश्वास येत होता. इतर विद्यार्थी व फॅकल्टीजकडून प्रेरणा मिळत होती.

दिवाळीच्या सुमारास प्रथम सत्र परीक्षा झाली! बाकी विषय तसे सोपे वाटले. पण तांत्रिक घटकांमुळे पब्लिक हेल्थ, केस वर्क आणि रिसर्चंचं अनेकांना दडपण होतं! पब्लिक हेल्थच्या पेपरमध्ये रोग- रोगकारक व्हेक्टर्स- इन्क्युबेशन पिरिएड असं न विचारता सार्वजनिक आरोग्याबद्दलच प्रश्न आले आणि कठीण मॅचमध्ये अगदी बॅटिंग पिच मिळाली. केस वर्क व रिसर्चच्या पेपरच्या आदल्या संध्याकाळी मात्र हॉस्टेलवर दुर्मिळ सन्नाटा होता! झेरॉक्स, नोटस, कात्रणं एकदम तेजीत होती! माझ्या नोटसलाही मागणी होती! प्रत्येकाला वाटायचं दुसर्‍याकडे काही विशेष नोटस आहेत! “भाऊ दे ना राव" म्हणत एकमेकांकडे मागायचे. प्रश्नांची उत्तरं इंग्रजी किंवा मराठीत देता येत होती. रेडिओवर "तू ही मेरी शब है सुबह है" सारखी तेव्हाची गाणी ऐकत मुलं अभ्यास करायची आणि जागायची! हॉस्टेलवरचे मामा लक्ष ठेवायचे. हे पेपरही नंतर सोपे गेले आणि पहिलं सत्र संपलं!

पुढचा भाग: कर्वेतले दिवस ४: एडव्हान्स्ड ओरिएंटेशन व्हिझिटस आणि इतर गमती

-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 8 ऑगस्ट 2026.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहाहा! मला प्रविण चोखांद्रे तुझा क्लासमेट होता? मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. मी आयआयपीएस मुंबईला बायोस्टॅटीस्टीक्स व एपीडेमीओलॉजी (जे तुम्हाला अवघड जात असल्याबद्दल ह्याच लेखात लिहीले आहे) मध्ये मास्टर्स व पीएचडी करत असतांना ते पॉप्युलेशन सायंसेस मध्ये पीएचडी करत होते. किंबहुना मी जेव्हा मास्टर्सच्या एंट्रसला गेलो असताना कँपसमध्ये पहिल्यांदा तेच भेटले होते. खरं तर आम्ही दोघेही नागपूरचे असलो तरी त्यांच्या बोलण्यात नागपूरी हेल, लहेजा व उच्चार जाणवायचे. त्यामुळे त्यांचे बोलणे ऐकले की नागपूर आठवत असे. But he is truly a gem of a person. ❤️ आता बर्याच वर्षांपासून संपर्क नसला तरी माझ्या माहीतीप्रमाणे PRC धारवाडला Asst Professor आहेत.

मग सुरेश जुंगारी, प्रियंका जनबंधु व भावना जाधव ह्यापैकी कुणाला ओळखत असालच?

@ राहुल बावणकुळे जी! ओहह!! ग्रेट! किती छान! प्रवीणला सांगितलं. तो ओळखतो तुम्हांला. तुम्ही बाकी नावं लिहीलीत, ती मला परिचित नाहीत. कदाचित मुंबईच्या कॉलेजातली असावीत. मी आणि प्रवीण पुण्यात कर्वेमध्ये दोन वर्षं सोबत होतो.

@ सुनिती जी Happy

सर्वांना धन्यवाद.

नवीन प्रतिसाद लिहा