संवाद: बीएमएम २०२६ संयोजक (Convener) श्री. मोहित चिटणीस यांच्याशी

Submitted by Ashwini Kshirsagar on 10 July, 2026 - 05:12

नमस्कार, बीएमएम २०२६ चे संयोजकपद स्वीकारण्याची प्रेरणा तुम्हाला कशातून मिळाली?
बीएमएमसाठी मी २०१३ ते २०२४ बीएमएमच्या कार्यकारी समितीवर (EC) आणि विश्वस्त समितीवर (Board Of Trustees) मी काम केलं. २०१३ ते २०१७ मी बीएमएमचा कोषाध्यक्ष (Treasurer) होतो आणि २०१७ ते २०२४ मी बीएमएम विश्वस्त समितीचा सदस्य होतो. आणि त्यातले २०१९ ते २०२४ हे जवळजवळ साडेचार वर्ष मी विश्वस्त समितीचा प्रमुख (Chairperson) होतो. ह्या पाच टर्म्समधल्या चार टर्म्समध्ये मला बीएमएमकडून अधिवेशन समितीवर काम करायला मिळालं. त्यावेळी मला बीएमएमची अधिवेशनं खूप जवळून बघायला मिळाली . संयोजकाची (Convenor) भूमिका आणि जबाबदाऱ्या काय असतात , त्यांना काय काम करायला लागतं, हे मला खूप चांगलं समजलं. आणि त्यामुळे जेव्हा सिॲटलला बीएमएम अधिवेशन आलं, तेव्हा मी सिॲटल महाराष्ट्र मंडळाकडे माझा ह्या कामातला रस व्यक्त केला आणि सांगितलं की मला ह्या आपल्याकडच्या २२ व्या बीएमएमअधिवेशनाचं संयोजक म्हणून काम करायला खूप आवडेल.

याआधीच्या संमेलनांच्या तुलनेत बीएमएम २०२६ वेगळे कशामुळे ठरणार आहे?
ह्या अधिवेशनामध्ये आपल्याला उत्तर अमेरिकेचे भरपूर कार्यक्रम बघायला मिळतील. सर्वसाधारणपणे बीएमएमच्या अधिवेशनामध्ये भारतातील कर्यक्रमांवर खूप जोर असतो. ह्यावेळेस भारतातले काही दर्जेदार कार्यक्रम येत आहेत, बाकी सगळे उत्तर अमेरिकेचे कार्यक्रम आहेत. स्थानिक कलाकारांचे तोडीस तोड कार्यक्रम असणं हे एक नावीन्य राहील. उत्तर अमेरिकेच्या कार्यक्रमासाठी सुद्धा आम्हाला १४० प्रवेशिका (proposals) आल्या होत्या. त्यामुळे खूप चांगले उत्कृष्ट कार्यक्रम निवडून, ते आम्ही बीएमएम २०२६ मध्ये सादर करणार आहोत. हा खूप वेगळा उपक्रम आहे की, भारतातल्या कार्यक्रमापेक्षा जवळजवळ पाच-सहा पट जास्त उत्तर अमेरिकेतले कार्यक्रम होतील. उत्तर अमेरिकेतील स्थानिक कलाकारांना प्राधान्य हा त्यातील मुख्य हेतू. अजून एक वेगळेपण सांगायचं तर ह्या अधिवेशनामध्ये आम्ही भारतातल्या सहा आणि उत्तर अमेरिकेतल्या सहा स्त्रियांचा त्यांच्या असामान्य कारकिर्दीसाठी, त्यांनी केलेल्या विशेष समाजसेवेसाठी सत्कार करत आहोत. यातील भारतातील स्त्रियांचा आम्ही भारतात त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करून आलो. उत्तर अमेरिकेतील ६ निवड झालेल्या स्त्रियांचा सत्कार आम्ही अधिवेशनामध्ये करू. याद्वारे आपल्या मराठी समाजालाही कळेल की अमेरिकेत रहात असताना आपल्याकडच्या या मराठी स्त्रियांनी त्यांच्या क्षेत्रात कशी भरारी घेतली आहे आणि कशी छान समाजसेवा अमेरिकेत राहून केलेली आहे.

संयोजक म्हणून या प्रवासाने तुम्हाला स्वतःबद्दल/ वैयक्तिक पातळीवर कोणती नवी जाणीव करून दिली?
मला एक जाणीव सगळ्यात प्रकर्षाने झाली, ध्येयाप्रती पोहोचताना दुरून सोपा दिसत असलेला मार्ग ही अनेक खाच खळग्यांनी भरलेला असू शकतो. अधिवेशनाच्या तयारीला सुरूवात केल्यावर एकामागे एक अनपेक्षित आणि आपल्या आवाक्याबाहेरच्या अडचणी येत गेल्या. टॅरिफचे नवे नियम, त्यामुळे वाढलेली महागाई, त्यात अचानक युद्धही सुरू झालं. एचवन व्हिसाच्या समस्या आणि त्यामुळे उद्भवलेली लोकांच्या नोकरीची अनिश्चितता अशी एकामागून एक गोष्टी घडत गेल्या. याचा परिणाम व्यक्तिगत देणग्या, स्पॉन्सरशिप्स आणि तिकीट नोंदणी या तिन्ही गोष्टींवर झाला आमच्यासमोर अधिवेशन यशस्वी पार पाडण्यासाठी मोठे आव्हान उभे राहिले. त्यातुन आम्ही मार्ग काढतो आहोत. पण मला सगळ्यात मोठी हीच जाणीव झाली की, तुम्ही खूप गोष्टी प्लॅन करतात, पण प्रत्येक वेळेस त्या तुम्हाला हव्या तशा होतीलच असं नाही.

संमेलन संपल्यानंतर उपस्थितांच्या मनात कोणती भावना घेऊन ते परतावेत, अशी तुमची इच्छा आहे?
बीएमएमला आलेल्या सर्व मराठी बांधवांनी घरी परतताना आनंददायी अनुभव आणि सुंदर स्मृती घेऊन जाव्यात, अशी आमची मनापासून इच्छा आहे. या अधिवेशनात दर्जेदार कार्यक्रम सादर केले जात आहेत. भारतातून आलेले निवडक, उच्च दर्जाचे कार्यक्रम तसेच उत्तर अमेरिकेतील नावीन्यपूर्ण आणि वेगळेपण जपणारे कार्यक्रम यांना आम्ही प्राधान्य दिलं आहे. सगळ्यांनी येथे छान अनुभव घ्यावा, हसत-खेळत परत जावं आणि आपल्या गावात जाऊन सिॲटलमधील उत्तम व्यवस्थापन, स्वयंसेवकांची मदत आणि आदरातिथ्य याबद्दल आवर्जून सांगावं, जेणेकरून जे यावेळी येऊ शकले नाहीत ते पुढच्या वेळी नक्की सहभागी होतील.
तसेच या अधिवेशनाच्या निमित्ताने पुढच्या पिढीला मराठी संस्कृती आणि भाषेची अधिक जवळून ओळख व्हावी, ती त्यांच्यात रुजावी आणि फुलावी, ही आमची अपेक्षा आहे.

तुमच्या नेतृत्वशैलीत परंपरा आणि नावीन्य यांचा समतोल तुम्ही कसा साधता?
“द फोक आख्यान” हा सुमारे ३३ कलाकारांचा भव्य कार्यक्रम आम्ही सादर करत आहोत. परंपरा आणि नावीन्य यांचा सुंदर संगम साधणारा हा कार्यक्रम मराठी लोकसंगीतावर आधारित असून यात तरुण कलाकारांचाही सक्रिय सहभाग आहे. तसेच भारतातून येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पहिल्यांदाच युवा कलाकाराचा सहभाग असलेली स्वतंत्र कॉन्सर्ट संकल्पना राबवली जात आहे.
अधिवेशनाच्या नियोजनात आम्ही तंत्रज्ञानाचा, विशेषतः AI चा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. अधिवेशनाची वेबसाइटही अत्यंत व्यावसायिक आणि प्रभावीपणे विकसित करण्यात आली असून ती संपूर्ण नियोजनाचा आधुनिक दृष्टिकोन दर्शवते. तसेच B-Connect हा एक महत्त्वाचा व्यावसायिक उपक्रम आहे, ज्याद्वारे मराठी उद्योजक, व्यावसायिक आणि युवा पिढीला नेटवर्किंग, ज्ञानवाटप आणि सहकार्याची संधी मिळते.
आर्थिक नियोजनासाठी आम्ही पहिल्या दिवसापासूनच प्रोजेक्टेड P&L तयार केला, ज्यामुळे प्रत्येक टप्प्यावर आर्थिक स्थितीचा स्पष्ट अंदाज घेता आला आणि योग्य निर्णय घेणे सुलभ झाले. नोंदणीच्या आकडेवारीतूनही एक महत्त्वाचा बदल दिसून येतो, पूर्वीच्या अधिवेशनांमध्ये साठीच्या पुढील लोकांचा सहभाग अधिक दिसत असे, मात्र यंदा ३५ ते ५५ वयोगटातील सहभागींचे प्रमाण लक्षणीय वाढलेले दिसत आहे.
या सर्व उपक्रमांमधून आम्ही परंपरा जपत असताना बदल स्वीकारण्याची आणि नवीन पिढीला जोडण्याची आमची भूमिका स्पष्टपणे अधोरेखित केली आहे.

या संपूर्ण प्रवासात तुम्हाला सर्वात जास्त समाधान कशातून मिळालं?
दहा वर्षे सिॲटल महाराष्ट्र मंडळासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. आता सिॲटलमध्ये बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (BMM) अधिवेशन आयोजित करण्याची संधी मिळणं, ही माझ्या मंडळातील प्रवासातली सर्वात मोठी समाधानाची गोष्ट आहे. त्याहूनही मोठा सन्मान म्हणजे सिॲटल महाराष्ट्र मंडळ (SMM) ने माझ्यावर विश्वास ठेवून या अधिवेशनाच्या संयोजकपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. SMM ही माझ्यासाठी केवळ एक संस्था नाही, तर माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. १९९३ मध्ये SMM ची स्थापना करणाऱ्या १४–१५ जणांमध्ये मीही एक होतो. त्यामुळे या संस्थेशी माझं अतूट नातं आहे आणि ही जबाबदारी स्वीकारताना मला प्रचंड अभिमान आणि समाधान वाटतं.

अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्यांनी सिॲटल शहराचा कोणता विशेष अनुभव आवर्जून घ्यावा असे तुम्हाला वाटते?
अधिवेशनाचा अनुभव तर सर्वजण नक्कीच घेणार आहेतच, पण सिॲटलचा अनुभवही तेवढाच खास आहे. ऑगस्ट महिन्यात सिॲटलचं हवामान अतिशय आल्हाददायक असतं, त्यामुळे बाहेर फिरण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. सिॲटल हे अलास्का क्रूझचं प्रवेशद्वार मानलं जातं. त्यामुळे वेळ असेल तर एक आठवड्याचा अलास्का क्रूझ नक्की अनुभवावा. अधिवेशनानंतर संध्याकाळीही अनेक क्रूझ उपलब्ध असतात, त्यामुळे ही एक उत्तम संधी आहे.
सिॲटलचं वैशिष्ट्य म्हणजे चारही दिशांना दिसणाऱ्या बर्फाच्छादित पर्वतरांगा. दक्षिणेला माउंट रेनिअर आणि माउंट सेंट हेलन्स, उत्तरेला माउंट बेकर, पूर्वेला कॅस्केड रेंज आणि पश्चिमेला ऑलिम्पिक रेंज. हे निसर्गसौंदर्य खरोखरच अद्वितीय आहे. अमेरिकेमध्ये काही कोलोरॅडो आणि अलास्का अशी काही राज्ये सोडली तर इतर ठिकाणी हिमाच्छादित डोंगर वर्षभर पाहायला मिळत नाहीत. याशिवाय रॉस लेक, डायब्लो लेक, सुंदर ट्रेक्स, सिॲटल डाउनटाउन, चिहुली ग्लास गार्डन अशी अनेक ठिकाणं अनुभवण्यासारखी आहेत.
अधिवेशनाचा आनंद तर तुम्ही घेणारच आहात, पण सिॲटलच्या निसर्गाचा आणि आसपासच्या अनुभवांचा आस्वाद घेण्यासाठी थोडा अधिक वेळ नक्की ठेवा.

तुमच्या नजरेत बीएमएम २०२६ म्हणजे नेमके काय? एका वाक्यात सांगाल का?
बीएमएम2026 हे सिॲटलला होणारे बीएमएमचे दुसरे अधिवेशन. त्या दृष्टीने मी म्हणेन
बीएमएम २०२६ म्हणजे २००७ च्या यशस्वी अधिवेशानानंतर पुन्हा एकदा सिॲटलमध्ये मराठी समाजाला एकत्र आणून, संस्कृती, नाती आणि आनंदाचा अविस्मरणीय उत्सव साकारण्याची आमच्यासाठी लाभलेली मोठी संधी.
जपूया संस्कृती विणूया नाती!!

वेबसाईट: https://bmmseattle2026.org/
मुलाखतकार आणि शब्दांकन: अश्विनी क्षीरसागर
बीएमएम २०२६ समिती

Group content visibility: 
Public - accessible to all site users