नाट्यसृजन एकांकिका स्पर्धा - BMM Convention Seattle २०२६

Submitted by sukhada.deodhar on 8 June, 2026 - 13:48

बीएमएम अधिवेशन २०२६ अजून रंगतदार होण्यासाठी इतर कार्यक्रमांसोबतच काही स्पर्धाही आयोजित केल्या आहेत. त्यातली एक महत्वाची नाट्यसृजन ही एकांकिका स्पर्धा आहे.

आधीच आपण मराठी लोक नाट्यवेडे!! नाटकाचा कुठलाही प्रकार आपल्याला वर्ज्य नाही. त्यामुळे संगीत नाटक ते पथनाट्य सगळ्यासाठी गुणी कलावंत आणि रसिक प्रेक्षक तयार असतात. त्यातलाच

एकांकिका हा अत्यंत महत्त्वाचा प्रकार. गेली कितीतरी वर्ष पुण्यात पुरुषोत्तम आणि मुंबईत आय एन टी ह्यासारख्या एकांकिका स्पर्धा अगदी उत्साहाने आयोजित केल्या जातात आणि अटीतटीने रंगतात. रंगभूमीला अनेक नामवंत कलाकार त्यातून सापडतात.

एकांकिका हे मूर्ती लहान पण कीर्ती महान असंच म्हणावं लागेल. कारण मोजक्या वेळात कसदार लेखन, अभिनय आणि अत्यावश्यक तेच किंवा अगदी कमी नेपथ्य आणि रंगभूषा ह्याच्या साथीने एक उत्तम कलाकृती सादर करायची असते. त्यामुळे ते सर्वांसाठीच एक आव्हान ठरत.

नाट्यसृजन स्पर्धा जाहीर झाल्यावर अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. म्हणजे त्यात सहभागी होण्यासाठी किती कलाकार उत्सुक आहेत ह्याचीच ती पावती होती. २५ पेक्षा अधिक प्रवेशिका आल्या. अमेरिकेतल्या विविध राज्यातून आल्या. क्वचित कुणी दोन सुद्धा पाठवल्या.

प्रवेशिका भरण्यापासून ते व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवण्यापर्यंत शक्यतो कुणाला काही अडचण येऊ नये ह्याकडे आमचा कटाक्ष होता. त्यासाठी सर्व संचांसोबत फ़ोन कॉल्स सुद्धा केले. सर्व गोष्टी वेळेवर पूर्ण व्हाव्यात जेणेकरून कुठेच घिसाडघाई होणार नाही अशीही काळजी घेतली.

प्रथम फेरीमध्ये २० एकांकिका आमच्याकडे आल्या. सर्वांनी व्हिडिओ रेकॉर्डिंगच पाठवायचे होते.

त्यानंतर त्या २० मधून उपांत्य फेरीसाठी ८ ची निवड झाली. त्या निवडीचे निकष निश्चित ठरवले होते.

अगदी कौतुकाची गोष्ट म्हणजे सगळे विषय वैविध्यपूर्ण होते. काही अपवाद वगळता लेखक सुद्धा स्थानिक होते.

चाकोरीबद्ध विषय न निवडता सगळ्यांनी सादरीकरणाचे पैलू फार चित्तवेधकपणे साकारले. आता अंतिम फेरीसाठी सर्वांना उत्सुकता आहे. अंतिम फेरीत निवडलेल्या पाच एकांकिका प्रत्यक्ष सादर होणार आहेत. आपल्या उत्तर अमेरिकेतल्या गुणी कलाकारांना बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

उत्तम लेखन, अभिनय, दिग्दर्शन, सादरीकरण ह्या सगळ्याची चुरस आहे. त्यासाठी बीएमएम २०२६ सिएटल इथे नक्की हजेरी लावा.

अंतिम फेरीतील ५ एकांकिका:

1. The Conscience, California Arts Association, San Jose, California

2. ⁠प्रतिबिंब, अभिव्यक्ती, Los Angeles, California

3. ⁠स्टॉकहोमच्या भातुकलीचे हॉस्पिटल, Basement Theatre of Chicago, Chicago, Illinois

4. ⁠जगप्रवास, नाट्यरंग, Boston, Massachusetts

5. ⁠ईमान, अमृत निर्मिती, Washington DC

उपांत्य फेरीसाठी आम्हाला परीक्षक म्हणून श्री विजय केंकरे आणि श्री अरुण नलावडे ह्यांच्यासारखे ज्येष्ठ आणि अनुभवी रंगकर्मी मिळाले.

श्री. अरूण नलावडे हयांचे मनोगत:

‘बीएमएम कन्व्हेन्शन सिअ‍ॅटल’च्या (BMM Convention Seattle)निमित्ताने भरवलेल्या नाट्यसृजन एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी पाहण्याचा योग आला. दोन्ही गोष्टींचा आनंद आहे, एक तर कन्व्हेन्शन सिअ‍ॅटलमध्ये होतंय आणि दुसरी गोष्ट एकांकिका स्पर्धांचं आयोजन होतं आहे... म्हणजे आपण आपलं मूळ कधी विसरत नाही, ते तुम्ही जपून ठेवलंय म्हणून तुमचं खरं तर कौतुक.

तर अशा सात ते आठ एकांकिका पाहण्याचा, विजय केंकरे आणि मी याचे दोन परीक्षक होतो आणि दोघांनी चर्चा करून पुढे एकांकिका कुठल्या पाठवायच्या अंतिम फेरीत, त्या ठरल्या. एकांकिका चांगल्या दर्जाच्या होत्या. प्रत्यक्ष रंगमंचावर तो तुम्ही सादर करताना त्याचा परिणाम अधिक येणार आहे. अर्थात यासाठी तुम्हाला तालीमीची अधिक गरज लागणार आहे, ती तुम्ही करालच.

मुळात मला कौतुक एका गोष्टीचं वाटतं की, या सगळ्या तुमच्या कामाच्या गर्दीतून तुम्ही हा वेळ कसा काढता? आपण सगळ्यांनी तो वेळ त्याला दिला, त्याला महत्त्व दिलं, याबद्दलही कौतुक. जी कोणी मंडळी आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतायत, ते यशस्वी करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांनी नुसतं 'मम' म्हणायला हात तरी लावा, हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. भरपूर लोकांनी यावं असं अपेक्षित आहे खरं तर. आळस झटका प्रत्येकाने आणि या संमेलनाला उपस्थित राहा."

श्री. विजय केंकरे ह्यांचे मनोगतः

“'नाट्यसृजन एकांकिका स्पर्धा २०२६'. मी त्याच्या प्राथमिक फेरीचा परीक्षक होतो. मुळात अमेरिकेमध्ये किंवा भारत देशाच्या बाहेर अशा प्रकारचा उपक्रम होतोय, हीच गोष्ट मुळात स्तुती करण्यासारखी आहे. आणि नुसता उपक्रम नाही, तर मला आश्चर्य वाटलं की, इतके वेगवेगळे विषय आणि त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीचं सादरीकरण. परीक्षण करताना मला खूप मजा आली. माझ्याबरोबर अरुण नलावडे होता. अरुणलाही खूप मजा आली असणार.

अगदी प्रोफेशनल असावं, इतकं काही लोकांनी त्याच्यात चांगलं काम केलं होतं आणि या अशा प्रकारच्या एकांकिका स्पर्धा अमेरिकेमध्ये काय, युरोपमध्ये काय, भारताच्या बाहेर सातत्याने होत राहिला पाहिजे. कारण प्रत्येकाला आपलं म्हणणं नाटकाच्या माध्यमातून मांडायची ही संधी आहे आणि असं म्हणणं प्रत्येकाने मांडलंय आणि तशाच एकांकिका अंतिम फेरीसाठी आम्ही निवडल्या आहेत, त्या सगळ्यांना शुभेच्छा.

मला एक जाणवलेली गोष्ट महत्त्वाची अशी की, तिथे मंडळी लिहितायत. प्रत्येक राज्यामध्ये, जिथून-जिथून एकांकिकेच्या प्रवेशिका आल्या आहेत, तिथे लोकांनी एकांकिका लिहिल्या होत्या. मला असं वाटतं की, एका बाजूला आपण म्हणतो मराठी भाषा, भाषेचं संवर्धन करायला पाहिजे, तर आज आपल्या देशाबाहेर, बीएमएम कन्व्हेन्शन इतकी वर्ष अमेरिकेत होतंय, युरोपमध्ये कन्व्हेन्शन होतंय, आता युरोपमध्ये एकांकिका स्पर्धा झाली, तशीच आताही अमेरिकेत एकांकिका स्पर्धा होतेय, खूप-खूप आनंद होतोय, मजा येतेय हे सगळं बघायला.

काही लोकांचं काम किंवा लेखनाचं तंत्र बघून मला असं वाटलं, की कदाचित ही मंडळी इथे असती, तर आम्ही व्यवसायात उतरवू शकलो असतो की नाही माहीत नाही. देशापासून दूर राहूनसुद्धा ही मंडळी चांगलं इतकं काम करतायत. कदाचित त्यामुळेच ते जास्त प्रेमाने हे काम करत असावेत. मला ही स्पर्धा बघायला खूप-खूप मजा आली. "

ह्या सगळ्या एकांकिका तसेच उत्तर अमेरिकेतील कलाकारांचे उत्तामोत्तम कार्यक्रम बघण्यासाठी अधिवेशनाला नक्की उपस्थित रहा.

------
वेबसाईट: https://bmmseattle2026.org/
इंस्टाग्रामः https://www.instagram.com/bmm2026seattle/
फेसबूक: https://www.facebook.com/bmm2026seattle

Group content visibility: 
Public - accessible to all site users