पुस्तक परिचय- महाराष्ट्राची धारातीर्थे (किल्ले). लेखक - पं. महादेवशास्त्री जोशी

Submitted by वावे on 7 June, 2026 - 13:53

भारदस्त, तरीही जड नसलेली, सौष्ठवसंपन्न, तरीही शब्दांचे फुलोरे नसलेली, अभिमानाने ओतप्रोत, तरीही तोल न ढळलेली अशी भाषा, ज्ञानी, व्यासंगी लेखक आणि महाराष्ट्रातील किल्ले हा विषय. मला पुस्तक न आवडण्याचा काही प्रश्नच नाही. Happy पुस्तकाची पहिली आवृत्ती १९७५ ची आहे आणि ही दुसरी आवृत्ती २०१० ची आहे.
या पुस्तकाच्या प्रस्तावनेतला एक परिच्छेद वाचला, तरी पुस्तकातल्या भाषेची झलक मिळेल. ’महाराष्ट्रात अशी धारातीर्थे अगणित आहेत. जळांत तशी स्थळांत, डोंगरांत तशी मैदानांत, घाटांत तशी खिंडींत, शहरांत तशी जंगलांत. किंबहुना शिवछत्रपतींच्या काळी उभा महाराष्ट्रच एक अफाट, विराट असे धारातीर्थ बनला होता. त्या काळात इथे सर्वत्र असिधारा, रक्तधारा, दानधारा, उपदेशधारा अशा अनेक धारा खळाळत वाहिल्या आहेत. या सगळ्या धारातीर्थांची वाखाणणी करू म्हणेल, तर सहस्रमुखांचा शेषही शिणेल!’

पं. महादेवशास्त्री जोशींनी या पुस्तकात एकूण सोळा किल्ल्यांचा अंतर्भाव केला आहे. यापैकी अनेक किल्ले त्यांनी गो. नी. दांडेकरांच्या बरोबर पाहिले. याचा उल्लेख गोनीदांच्या ’दुर्गभ्रमणगाथा’मध्ये वाचला होताच. ते पुस्तक असंख्य वेळा वाचलेलं असूनही शिवाय हे पुस्तक विकत घेऊन वाचलं, कारण ही दोन्ही पुस्तकं म्हणजे काही प्रवासी गाईड्स नव्हेत. हे लेखन म्हणजे नुसतं त्या त्या किल्ल्यांचं वर्णनही नव्हे. या दोन्ही जाणकार व्यक्तींनी कुतूहलाने, जिज्ञासेने आपल्या इतिहासातल्या या महत्त्वाच्या वास्तूंना भेटी देऊन, त्या त्या किल्ल्याचा इतिहास समजून घेऊन त्याबद्दलचे त्यांचे विचार मांडलेले आहेत.
या पुस्तकातले किल्ले दोन भागांत विभागलेले आहेत. पहिल्या भागात पुणे-सातारा-कोल्हापूर या भागातले, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले राजगड, तोरणा, प्रतापगड, पन्हाळा इत्यादी किल्ले आहेत. दुसर्‍या भागात कोकणातले रायगड, सिंधुदुर्ग आणि इतर जलदुर्ग आहेत. अर्थातच, लेखकाने म्हटल्याप्रमाणे हे फक्त एक दशांश काम पूर्ण झाले आहे. उरलेले काम तरुण लेखकांनी पूर्ण करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. किल्ले आता झपाट्याने स्मृतिशेष (हा शब्द लेखकाचाच) होत चालले आहेत. त्यांचे प्रत्यक्ष संरक्षण करणे आपल्या हाती नाही, पण निदान ते वाङ्मयात तरी चिरंजीव व्हावेत ही लेखकाची आकांक्षा आहे.
या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे लेखकाने शक्य तितक्या किल्ल्यांचा मोठा इतिहास नमूद केला आहे, शिवपूर्वकाळापासून (काही किल्ल्यांच्या बाबतीत हा काळ काही शतकांचा असू शकतो) ते पेशवाईच्या अस्तापर्यंतचा. चौल-रेवदंडा परिसरातल्या लहानमोठ्या किल्ल्यांचा इतिहास अतिशय रोचक आणि काही वेळा ’अद्भुत’ म्हणावा असा आहे. एकंदरीतच या भागाचा असा सविस्तर इतिहास मला अजिबातच माहिती नव्हता. जलदुर्गांचा इतिहास वाचताना जाणवते ती एकीकडे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि दुसरीकडे पेशव्यांनी दाखवलेली अप्रगल्भता. त्याचबरोबर पोर्तुगिजांनी केलेले अत्याचार आणि चिमाजीअप्पांनी वसईचा किल्ला जिंकताना केलेली शर्थ.
इतिहासाबरोबरच किल्ल्याच्या आणि किल्ल्याच्या परिसराच्या भूगोलाचंही सविस्तर वर्णन लेखकाने केलेलं आहे. किल्ल्यांवरून दिसणार्‍या निसर्गशोभेचं वर्णनही अप्रतिम आहे. उदाहरणादाखल हे राजगडाचं वर्णन पहा- ’या गडाचा परिसर समृद्ध आहे, दर्शनीय आहे. अंगठीत खडा बसवावा, गोपाळांच्या मेळ्यात सावळा वनमाळी उभा राहावा तसा राजगड हिरव्या पर्वतराजीच्या मध्यभागी मांडलेला आहे. सिंहगड, तोरणा, कांगोरी अन रोहिडा ही त्याची चौकट आहे.’
किल्ल्यांबद्दल वाचताना शेवटी एक प्रकारची विषण्णता येतेच. ’दुर्गभ्रमणगाथा’ वाचताना आणि ’महाराष्ट्राची धारातीर्थे’ वाचतानाही कुठल्याही किल्ल्याचा इतिहास १८१८ च्या आसपास आला की जाणवतं की आता अभिमानास्पद इतिहास संपला. यापुढे या किल्ल्यांची परवडच. पण याला आपला नाईलाज असतो. या किल्ल्यांवर जात राहणं आणि डोळसपणाने ते पाहणं हेच आपल्या हातात असतं.
या पुस्तकातली खटकलेली म्हणावी अशी एक गोष्ट म्हणजे स्त्रियांना जरा कमी लेखण्याचा दृष्टिकोन दोन-तीन ठिकाणी जाणवला. पण एवढं वगळता हे पुस्तक पानोपानी माझी दाद घेऊन गेलं!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आढावा घेतला आहेस.
हे पुस्तक पूर्वी वाचलेलं आहे असं वाटतं. पण आता परत वाचून बघितलं पाहिजे.

छान पुस्तक परिचय.

किल्ले आता झपाट्याने स्मृतिशेष (हा शब्द लेखकाचाच) होत चालले आहेत. >> नुकतेच कोरलाई फोर्ट ला गेलो होतो. कुठेही माहितीचा कुठलाही फलक लावलेला नाहीय.