
क्षितिज पटवर्धन लिखित , चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि सचिन खेडेकर यांची मुख्य भूमिका असलेले भूमिका हे नाटक आताच पाहून आलो.
टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करणार्या एका प्रथितयश अभिनेत्याला डॉ बाबासाहेब आंबेडकरांवरच्या मालिकेत डॉ. आंबेडकरांची भूमिका करायची संधी मिळते. ती करण्यासाठी तो वाचन करू लागतो, बाबासाहेबांचे विचार समजून घेऊ पाहतो, त्यानुसार त्याच्या आचरणातही फरक पडू लागतो. हे नाटकाचं निमित्त. त्यानिमित्ताने जात , धर्म, आरक्षण, डॉ. आंबेडकर त्यांचं विविधक्षेत्रातलं कार्य, त्यातल्या फक्त दलितांचा नेता यावर दिला जाणारा फोकस. कलावंतांनी भूमिका घ्यावी का? ते खरंच भूमिका घेतात का की तो प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न असतो , खाद्यसंस्कृतींतले फरक , वैचारिक कंपू - त्याला जोडून आलेली वैचारिक अस्पृश्यता असे अनेकानेक मुद्दे यानिमित्त चर्चेत येतात.
मायबोलीवर लिहिलेले, वाचलेलेच हे असे अनेक मुद्दे नाटकात आले. मायबोलीवर आले ते लोकांच्या मनातलेच. त्या दृष्टीने या विषयांबद्दलचे सगळे मतप्रवाह नाटकात आले. उलट सांगायचं तर मायबोलीवर न आलेल्या फार कमी गोष्टी नाटकात आल्या. (आल्या त्या महत्त्वाच्या आहेतच. त्या नीट समजून घेण्यासाठी नाटकाचं पुस्तक मागवलं आहे. ) आपल्या हाउसहेल्पना आपल्या घरातलं स्वच्छतागृह वापरायला देणं हाही मुद्दा आला तेव्हा लेखकाने मायबोली वाचूनच नाटक लिहिलंय की काय असं वाटलं.
अर्थात तो मुद्दा अन्य सोशल मीडियावरही आलेला आहे.
आता हे लिहिताना आठवलं की असंच अभिराम भडकमकरांची इन्शा अल्ला ही कादंबरी वाचतानाही काहीसं असं झालं होतं.
नाटक आताच्या काळात घडतं. ए आय जनरेटेड इमेज, व्हॉट्स अॅप ग्रुप्स, आय फोन, रील्स बनवणं , इन्स्टाग्राम आणि फेसबुक, त्यावरच्या प्रतिक्रिया , ट्रोलिंग , बहिष्कार घालणं, जेन झीची भाषा - डेलुलु, beau इ.
सोशल मीडियावर बहुतांशी चर्चा होत नाहीत, वादविवाद होतात. तिथे एक बाजू निवडलेली असते आणि तीच लावून धरली जाते. नाटकात अशा सगळ्या मतप्रवाहांना स्थान दिलं आहे. असं करताना माझ्यासाठी ते त्याच्या पुढेही गेलं आहे. भारतीयांच्या मनातला वर्णभेद , युरोप अमेरिकेचं कौतुक, आफ्रिका खंडाला कमी लेखणं हा मुद्दा तितकासा चर्चेत नसतो , तोही नाटकात आला.
नाटकात टाळ्या आणि हश्या कुठे आणि किती पडतात यातही समाज प्रवाहांचं प्रतिबिंब दिसतं.
या प्रयोगाला सगळ्यात जास्त टाळ्या "आंबेडकरांचे गांधींबद्दलचे विचार ऐकल्यावर त्यांच्याबद्दलचा आदर वाढला," या वाक्याला पडल्या.
क्रीमी लेयरवाल्यांनी आरक्षण घेण्याला आक्षेप आला , तेव्हा माझ्या शेजारच्या प्रेक्षकाने जोरात सहमतीने मान हलवली.
अभिनेत्याने डॉ आंबेडकरांच्या गेट अपमध्ये प्रवेश केल्यावर काही प्रेक्षकांकडून टाळ्या पडल्या. तर त्यांची हाउसहेल्प डॉ आंबेडकर म्हणून त्यांच्या पाया पडली तेव्हा काहींना हसूही आलं.
अभिनेत्याच्या पत्नीची घुसमट लहान लहान वाक्यांतून आणि प्रसंगांतून कळते. देव बाभळीतल्या आवली, रखमा आणि ही यांच्यातलं साम्य म्हणजे नवरा महान माणूस (देवालाही महान माणूस म्हणता येईल का?) होऊ लागला की संसाराची घडी विस्कटू लागते आणि ती विस्कटू नये म्हणून धडपडणार्या स्त्रीची ससेहोलपट होते, वर तिच्या वाट्याला वाईटपणाही येतो.
आता नाटकाबद्दलचं माझं मत. नाटक फक्त वेगवेगळे विचारप्रवाह मांडतं का? त्यातून ते कॅची बनवायचा प्रयत्न केला आहे का? असा प्रश्न मला शाहु पाटोळेंच्या पुस्तकाचा उल्लेख आला तेव्हा वाटलं. ही वेगवेगळ्या विचारांची भेळ केली आहे का? आणि काही सुटायला नको, सगळं आलं पाहिजे असा कटाक्ष होता की ते सहज झालं? कदाचित त्याबद्दलच नाटकात एक वाक्यही आलं आहे. डिकन्स्ट्रक्टेड वस्तू समोर येते, आपण तिची जुळणी करतो, ती झाली की त्यातून आपण काय घेतो? पुस्तक हाती आलं , की ते वाक्य इथे लिहेन.
अर्थात त्यातून अभिनेत्याचा आणि एका व्यक्तीचा एक प्रवास दिसला. नाटकाचा शेवट करायचा म्हणून शेवटच्या काही मिनिटांत कलाटणी देणारे प्रसंग आले. नाटक काही एक भूमिका नक्की घेतं.
पण प्रेक्षकांच्या मनात सुद्धा विचारांची घुसळण होईल का? दुसरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न होईल की हे फक्त दोन तासांचं मनोरंजन म्हणून
तो बाहेर पडेल, असा प्रश्नही पडला.
सचिन खेडेकरची संवादफेक ऐकताना कायम मला हा शुद्ध, स्पष्ट , स्वच्छ उच्चारांवर आणि त्यासाठी लागणार्या आवाजावर जरा जास्तच लक्ष देतो का असं वाटत आलंय. इथे भूमिकाच अभिनेत्याची म्हटल्यावर ते तसंच हवं असंही वाटलं. दुसर्या अंकाच्या सुरुवातीला चापूनचोपून इन केलेला शर्ट कामाच्या गडबडीत बाहेर यावा तशी काही वेळ संवादफेक सहज वाटली. त्या पात्राची त्या वेळची मन:स्थितीही तशीच होती.
अभिनेत्याच्या पत्नीच्या भूमिकेत समिधा गुरू हे नाव ऐकल्यावर टीव्ही मालिकांशी संबंधित एक नाव आठवून माझ्या मनातले पूर्वग्रह जागे झाले.
एक दीर्घ संवाद सोडला तर त्यांचा अभिनय मला जरा कमी वाटला. विशेषतः जिथे नुसत्या प्रतिक्रिया द्यायच्या होत्या , तिथे.
नाटकाला टिपिकल मराठी नाटकाप्रमाणे दिवाणखान्याचा सेट होता आणि त्यावर नाटकातच कमेंटही होती.
अर्ध्या एक मिनिटात विंगेत जाऊन कपडे बदलून येण्याचं कौतुक वाटलं.
--
नाट्यगृहात मी ज्या बाजूला बसलो होतो तिथे तापमान इतकं कमी ठेवलं होतं की कुडकुडायला होत होतं. सातला घरी आलो, तेव्हा खिडक्या दारं बंद करून गेल्याने घर भट्टीसारखं तापलं होतं
फार छान विचारमंथन मांडलेले
फार छान विचारमंथन मांडलेले आहे भरत. आणि नाट्यगृहातील प्रतिक्रियाही.
>>>>नाटकात टाळ्या आणि हश्या कुठे आणि किती पडतात यातही समाज प्रवाहांचं प्रतिबिंब दिसतं.
+१
छान!
छान!
पुढच्या खेपेला भारतात आलो की हे बघायच्या यादीत आहेच.
नाटकात टाळ्या/ हशा वरून समाजमन दिसतं याचा प्रत्यय लीना भागवत च्या 'आमने सामने'ला आला होता. त्यात ते फोर्थ वॉल तोडून प्रेक्षकांशी थेट संवाद करतात. ठाण्याला गडकरीला प्रयोग बघत होतो. आणि आपण अगदी घेटटो बुरसटलेल्या ममव जगात राहतो याचा वेळोवेळी प्रत्यय येत मन खजिल झालेली आठवण आहे. त्रासदायक आहेच पण दुसरं तरी काय अपेक्षित होतं मला!
परिचय आवडला. इन्शा अल्ला पण
परिचय आवडला. इन्शा अल्ला पण वाचायचं आहे. सचिन खेडेकर बद्दल अनुमोदन. त्यामुळे तो सगळीकडे सचिन खेडेकरच वाटतो. नाटका, पुस्तकांमुळे जी वैचारिक घुसळण (मंथन जास्त चांगला शब्द आहे) होते, ती बरेचदा तात्कालिक असते पण ती घेणं, रूजवणं सोडू नये. बीज टाकत राहिले की सुपीक जमिनीत बरोबर येतेच. त्यामुळे मी नवीन मंथनाबाबत नेहमी आशादायी चित्र रंगवते.
मायबोलीचे संदर्भ>>>
चांगले लिहा रे सगळे, कोण कोण वाचतेय कुणाला माहीत.
आपल्याला पूर्णपणे नाहीच मोडून काढता येत ते क्रीम लेयर, ममव कंडिशनिंग. आपला पण एक सेन्स ऑफ बिलॉंगिन्ग असतो तो आपल्याला "फिट ईन" साठी लागतो आणि कंडिशनिंग मोडून काढण्यासाठी लागणारा "हे विश्वची माझे घर" या दोन्हीचा सुवर्णमध्य कसा साधावा याचा मी खूप विचार करून झाला आहे. थोडी प्रगती झाली आहे पण ह्याला आयुष्यभर वाव आहे एकंदरीत. दुर्दैवाने हे कोठेही शिकवलं जात नाही, आपणच आपल्याला शिकवावं लागतं.
अमित, बघायच्या यादीतलं
अमित, बघायच्या यादीतलं पुढचं नाटक आमनेसामनेच आहे. त्यातले तिघेही अभिनेते आवडते आहेत. चौथीबद्दल काही माहीत नाही.
तू तिकडे माझे आभार मानलेले वाचले, त्यामुळे आठवलं की मी थेटरमध्ये जाऊन नाटक पहायला लागण्यात तुझ्या देवबाभळीवरच्या लेखाचा मोठा हात आहे , हे मी लिहिलं नाही. म्हणजे आधीही ही गोष्ट करायची मनात होतीच. एकट्याने नाटक पाहायला जाणं विचित्र वाटत होतं. ती भीड मोडली.
समाजमनाबद्दल - लेखक दिग्दर्शक अभिनेत्यांना प्रेक्षकांतून येणारी प्रतिक्रिया अपेक्षित अशी नसण्याची सवय करून घ्यावी लागते बहुधा. तो त्यांच्या कामाचाच भाग. (आपण नाही का इथे एकमेकांनी लिहिलेल्या गोष्टींचा विपर्यास करत
)
बॅरिस्टरमध्ये सुहास जोशींना एका प्रसंगातल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेचा फार त्रास व्हायचा असं त्यांनी लिहिलं आहे.
<बीज टाकत राहिले की सुपीक
<बीज टाकत राहिले की सुपीक जमिनीत बरोबर येतेच> याबाबत नाटकात एक संवाद होता - अपरिचित, दुसर्या बाजूच्या, समोरच्या, त्या तिकडच्या गोष्टी समजून घेण्यापेक्षा रिजेक्ट करण्याकडेच आपला कल असतो किंवा तसं कंडिशनिंग झालेलं असतं. हे मला माझ्याही बाबत पटलं.
या नाटकाचं पुस्तक वाचणंही मला त्यासाठी गरजेचं आहे.
परिचय वाचला.
परिचय वाचला.
आता नाटक, चित्रपट कमीच बघतो. परिचयावरून नाटक बॅलन्स्ड ठेवले आहे असे वाटते. असा बॅलन्स साधताना कुठलीच भूमिका नीट मांडली जात नाही असा अनुभव आहे. सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना सांभाळणे ही कसरत करायची म्हटली कि लेखकाला भूमिका घेता येत नाही. भूमिकेत स्पष्टपणा हवा. तिच्या विरोधात भूमिका घ्यायला वाव राहतो. एका मोठ्या पटावरची तारेवरची कसरत ती ही दीड दोन तासात हा रेड फ्लॅग आहे. तसंही नसतोच गेलो, पण आता शक्यता कमी झाली.
अशा प्रकारच्या कलाकृतींमधे अभिनय, नेपथ्य वगैरेंना दुय्यम मानावे असे वाटते. आशय किती भक्कम आणि प्रभावी आहे यावर अभिनयातलं डावं उजवं करता येऊ शकतं. चांगला असेल तर उत्तमच.
राज अज्ञानी, नाटकात सगळ्या
राज अज्ञानी, नाटकात सगळ्या विचारप्रवाहांना स्थान दिलंय, झोडलंय असं नाही, पण चिमटे काढलेत, आरसा दाखवलाय. पण शेवटी एक स्पष्ट भूमिका घेतली आहे.
अभिनय चांगला नसेल, तर आशय पोचणार नाही, मग प्रयोग वाया जाईल असं वाटतं. शेवटी नाटक हे performing art आहे यात अभिनय एकंदर चांगलाच वाटला.
नेपथ्य खटकलं नाही.
नाटक पहा, असंच मी म्हणेन.
मी नाटकाचं पुस्तक मागवलं आहे, तेही ते नाटक मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन आवडल्यामुळे.
अर्थात एखादी मांडणी आपल्याला किती रुचेल, आपल्या अपेक्षांना उतरैल, ते आपण कुठून आलो, यावरही अवलंबून असतंच.
नाटकातल्या आणखी काही गोष्टी आठवल्या, त्या नंतर वर लिहितो.
रेड ब्रेन - ब्लू ब्रेन हा
रेड ब्रेन - ब्लू ब्रेन हा हिडन ब्रेनचा एपिसोड जरूर ऐका.
तुम्ही कुठल्याही बाजूला असा सगळ्यांना दुसरी बाजू अशीच वाटते.
स्पष्ट भूमिका घेणंच अपेक्षित.
स्पष्ट भूमिका घेणंच अपेक्षित.
मी काही वर्षे सगळ्यांच्या भूमिका समजून घेऊन संतुलित भूमिका घेण्यापासून एक ठाम भूमिका घेण्याचा प्रवास केलेला आहे. त्यातला फोलपणा समजला आहे. सगळे विचारप्रवाह ठाऊक आहेत. अगदी संतुलित भूमिका सुद्धा अतिरेकी असतात. स्पष्ट आणि ठाम तरीही विवेकी भूमिका घेण्यात कचरू नये. पण त्यासाठी त्या ठामपणामागे अभ्यासू भूमिका असावी लागते. संतुलित भूमिका असूच नये असं नाही, सबगोलंकारी होऊन न्याय्य भूमिकेवर अन्याय होऊ नये इतकंच. अशी भूमिका घेणे म्हणजे एकाच बाजूला असणे हा प्राथमिक विचार आहे. अजून बराच प्रवास बाकी आहे.
छान परिचय करून दिलात.
छान परिचय करून दिलात.
खूप छान लिहिलंय.
खूप छान लिहिलंय.
>>> त्यातून अभिनेत्याचा आणि एका व्यक्तीचा एक प्रवास दिसला. ... नाटक काही एक भूमिका नक्की घेतं.
हे वाचून हायसंच वाटलं. परिणाम होतो, घुसळण होते. एका दमात नाही होत, झालेली अनेक दिवस वरपांगी दिसतही नाही, पण असे घाव पडत राहायला हवेत.
मला हे आणि देवबाभळी बघायची आहेत भारतवारीत!
खूप छान लिहिल आहे भरत.
खूप छान लिहिल आहे भरत.
आवडलं.
या नाटकाबद्दल तुम्ही किंवा आणखी कुणी मायबोलीवर लिहिल आहे का? वाचण्यासारखं वाटतंय
सगळ्यांचे आभार.
सगळ्यांचे आभार.
सामो, तुम्ही नेहमी अगदी मनापासून प्रतिसाद देता.
ऋतुराज , या नाटकाबद्दल मायबोलीवर आधी लिहिलं गेलेलं दिसलं नाही. पण हे नाटक बर्यापैकी चर्चेत आहे. थिंक बँकवरच्या या दोन मुलाखती कदाचित पाहिल्या असशील.
पहिला भाग
दुसरा भाग
साधना साप्ताहिकाने या नाटकावर एक अंक काढला होता.
स्वाती, दोन्ही नाटकांचे प्रयोग कमी संख्येने आहेत आणि हाउसफुल असतात. तेव्हा तिकिट लवकर काढून ठेव. बुक माय शो वर करता येतील.
>>>>>सामो, तुम्ही नेहमी अगदी
>>>>>सामो, तुम्ही नेहमी अगदी मनापासून प्रतिसाद देता.
_/\_ तुम्हीही भरत.
भूमिका नाटकाची संहिता असलेलं
भूमिका नाटकाची संहिता असलेलं पुस्तक मागवलं होतं , ते आलं.
लेखक क्षितिज पटवर्धन यांनी त्यात धाडसाचा कबुलीजबाब या शीर्षकाचा लेख लिहिला आहे. त्यातला शेवटचा परिच्छेद.
मी हे नाटक लिहून दुसरं धाडस करतो आहे.
मी मनाने नव्या जागी पोचतो आहे.
मी अस्मितेच्या बेटावरून फक्त माणूस असण्याच्या काठाकडे येतो आहे.
या भागात माणसं मोजकी आहेत , पण मोकळी आहेत हे जाणवतं आहे.
इथे टीका आणि कौतुक दोन्ही आपल्या अंगाला लागत नाही. इथे चिकित्सा केल्याची आणि झाल्याची भीती वाटत नाही. इथे नजरेमध्ये तुच्छता नाही.
इथे वागण्यामध्ये भेदभाव नाही. या जागेत माझं मन पूर्वग्रहाच्या पारतंत्र्यातून सुटून हळूहळू स्वतंत्र होत आहे.
बाबासाहेबांनी हातात संविधान घेऊन ज्याकडे बोट दाखवलंय , ती जागा हीच असावी यावर माझा विश्वास आहे.
अतिशय सुंदर आहे ही भावना, हे
अतिशय सुंदर आहे ही भावना, हे व्यक्त. फार फार हृद्य वाटलं. असू देत मोजकीच माणसं. माणूस म्हणून मोठं होणं खूप कठीण आहे, अशा दुर्मिळ ठिकाणी पोचता, पोचता वाटा निर्जन होत जात असतील. किती, किती समाधान आणि शांतता असेल येथे.
मी पाहिलं आज.
मी पाहिलं आज.
संवाद, अभिनय सगळं आवडलं पण हातात काही लागलं असं वाटलं नाही.
नाटक पाहतांना वर
नाटक पाहतांना वर म्हंटल्याप्रमाणेच अगदी तशीच दाद येत होती. परंतु लेखकाला नक्की काय सांगायचंय हे कळलं नाही कदाचित माझी तेवढी कुवत नसेल पण मग माझ्यासारखे प्रेक्षक जास्त असतील तर त्यांनाही कळलं नसणारच.
त्या नटाच्या घरातलं वातावरण आणि तो करत असलेली भूमिका यात जर खूप मोठा सामाजिक वैचारिक आणि धार्मिक फरक असेल तर एका संवेदनशील कलाकाराची होणारी घुसमट दाखवण्याचा प्रयत्न, सवर्णांनी दलितांवर केलेले अत्याचार, आरक्षणाच समर्थन हे सगळं वेगवेगळ्या प्रसंगातून सतत समोर येत राहतं.
गरीब कामवालय बाईची मुलगी आणि उच्च मध्यमवर्गीय असलेल्या कलाकाराची मुलगी यांच्या तुलनेत त्यांची जात हा मुद्दा जेंव्हा आला तेंव्हा दोन्ही बाजूंनी विचार मांडणं गरजेचं होतं असं वाटत जे शेवटी अगदीच निसटत एक वाक्यात गुंड्या मामांकडून मांडलं जातं. इथे लेखकांनी हे गृहीतच धरलाय की सगळे सवर्णी हे श्रीमंत आणि सगळे दलित हे गरीब. परंतु आता अस राहील नाहीये आणि परत एकदा आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला हवं हा ही मुद्दा फक्त एकाच वाक्यात आला.
त्यामुळे कॉमि म्हणाले तस हाती काहीच लागलं नाही असाच वाटलं.
क्षितिज पटवर्धन यांनी मुलाखतीत सांगितलं की बाबासाहेबांच्या वर लिहिलेली पुस्तक वाचून ते खूप प्रभावित झाले पण नाटकातून त्यांच्या विषयी अस काहीच कळत नाही जे आधी माहीत नव्हतं. आणि डोक्याला खाद्य वगैरे काहीही मिळालं नाही.
चर्चानाट्ये भयानक बोअरिंग
चर्चानाट्ये भयानक बोअरिंग होतात म्हणून चान्स असून देखील हे नाटक मी पाहिले नाही. रिव्यु वाचून बरं वाटलं.
< आर्थिक निकषावर आरक्षण
< आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला हवं हा ही मुद्दा फक्त एकाच वाक्यात आला > हा मुद्दा नाटकात आलेला नाही. क्रीमी लेयरचा आला आहे.
गुडनेस!
गुडनेस!
आर्थिक आरक्षण हा महाभंपक विचार आहे. कुणाकडे पैसे नाहीत/ कमी आहेत म्हणून त्यांना जागा राखीव ठेवा हा एक अजब तर्क आहे. हा विचार कुणी मांडला तरी तिकडून मी काढता पाय घेतो. पैसे नाही तर शिष्यवृत्ती द्या, फ्री शिप द्या, पैसे द्या. जागा का म्हणून? पैसे नसणे हा काही अन्याय नाही, ती वस्तुस्थिती आहे. असलं काही नाटकात नाही ते समजल्याने जरा हायसे वाटले.
भूमिका हे नाटक मुंबई
भूमिका हे नाटक मुंबई विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्याची बातमी मी लोकसत्तेत वाचली. घरी पेपरात वाचली, ऑनलाईन लिंक असेल तर शोधते.
https://www.loksatta.com/mumbai/mumbai-university-syllabus-bhumika-marat...
प्रज्ञा, बातमीच्या लिंकबद्दल
प्रज्ञा, बातमीच्या लिंकबद्दल धन्यवाद. सुखद धक्कादायक बातमी.
विविध प्रकारच्या अस्मिता टोकदारपणे जपणार्या अराजकसदृश समकालीन पर्यावरणात मानवतेचे, विवेकाचे आणि प्रामाणिकपणाचे मूल्य ठसठशीतपणे अधोरेखित करणार्या या नाटकात प्रबोधनाची अफाट क्षमता आहे आणि म्हणूनच या नाटकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय मराठी अभ्यास मंडळाने घेतला आहे असे विद्यापीठाच्या अभ्यास समितीने नमूद केले आहे.
अवांतर - लोकसत्तेने त्यांच्या साइटवरून मजकूर कॉपी पेस्ट करणे आणखी कठीण केले आहे. आतापर्यंत प्रिंट स्क्रीन ही कळ दाबली की मजकूर कॉपी करता यायचा. आता प्रिंट स्क्रीन दाबले तर Reading Mode is not supported on this site असा मेसेज येतो आहे.
वरचा मज कूर मला टाइप करावा लागला.
फार छान विचारमंथन मांडलेले
फार छान विचारमंथन मांडलेले आहे भरत. आणि नाट्यगृहातील प्रतिक्रियाही. >> + १.
ईकडे केव्हा येईल कोण जाणे, ओटीटी वर आलं की बघेन.
तोवर पुस्तक घेऊन वाचता येईल.
तोवर पुस्तक घेऊन वाचता येईल.
हो, किंडलवर आहे.
हो, किंडलवर आहे.