राजा शिवाजी चित्रपटावर चर्चा करायला हा धागा.
बघून या मस्त आहे.
मी सुरू करतो
सर्वात पहिले मी कबूल करतो की स्टारकास्ट बघून मी आधीच नकारात्मक मत बनवून ठेवले होते. त्याच वेळी चित्रपट शिवाजी महाराजांवर आहे तर चुकवायचा कसा याही द्विधा मनस्थितीत होतो. पण चित्रपट प्रदर्शित होताच कुठलाही किंतु परंतु मनात शिल्लक राहिला नाही. जर "छावा" संभाजी महाराजांना चित्रपटगृहात बघून आलो तर "शेर" शिवाजी महाराजांना बघायला जायचेच होते.
शिवाजी महाराजांवर आतापर्यंतचा बिगबजेट भव्य दिव्य चित्रपट म्हणजे चर्चा तर होणारच होती. ती नावापासूनच सुरू झाली. काहींना नावात छत्रपती हवे होते तर काहींना "राजा शिवाजी" हा एकेरी उल्लेख खटकून "राजे शिवाजी" असे नाव हवे होते. पण आमच्या शाळेचेच नाव "राजा शिवाजी विद्यालय" असल्याने आणि ते आम्ही महाराजांच्या नावाईतकेच अभिमानाने अन आदराने घेत असल्याने मी या वादावर मनातल्या मनात फक्त 'बर्रं' म्हटले.
दुसरा वाद चित्रपटातील कास्टींगवर होता. इतरांबद्दल पुढे लिहितोच पण शिवाजी महाराजांची भुमिका रितेश देशमुखने स्वतः करणे हा मोठा वादाचा विषय होता. त्याने आधी ईतर चित्रपटात साकारलेल्या खट्याळ भुमिका हा माझ्यामते कलाकारांसाठी गैरलागू मुद्दा होता. पण त्याचे व्यक्तीमत्व महाराजांची भुमिका साकारू शकेल का ही शंका मलाही होती. अन्यथा त्याचा अभिनय मला आवडतोच. पण त्याने भुमिकेची लाज राखली. हा माझ्यासाठी या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट ठरला अन्यथा चित्रपट डब्यात होता.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याएवढाच मोठा ईतिहास असलेल्या महाराजांवरचा चित्रपट तीन तासात बसवायचा म्हणजे जिथे कसोटी खेळवायला हवी तिथे ट्वेंटी-ट्वेंटीचा सामना खेळवावे असे झाले. म्हणून चित्रपटात शिवशाहीचा पुर्ण ईतिहास न दाखवता तो अफझलखानाच्या वधापर्यंत दाखवला आहे आणि कथा देखील त्याभोवतीच बांधली आहे. पण त्याआधी रयतेवरील अन्याय आणि स्वराज्याची गरज ही पार्श्वभूमी दाखवली आहे.
चित्रपट देखील ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटच्या इनिंगप्रमाणेच मला तीन तुकड्यात वाटला. सुरुवातीचा भाग हा पॉवरप्लेप्रमाणेच रोचक होता. मुघल, निजामशाही, आदीलशाही यांच्या जुलमी सत्त्तासंघर्षात भरडली जाणारी रयत आणि त्यांचा तारणहार म्हणून राजा शिवाजींचे जन्माला येणे हा भाग छान जमला आहे. महाराजांच्या लहानपणीचे किस्से, छोटेमोठे भावनिक प्रसंग, बालकलाकारांचा अभिनय, फारसे चर्चेत नसलेले त्यांचे मोठे बंधू संभाजी यांच्याशी असलेले त्यांचे भावनिक नाते हे बघायला छान वाटत होते. सचिन खेडेकर हे जणू शहाजीराजेच झाले होते आणि नेहमीप्रमाणेच अभिनय म्हणजे त्यांचे रोजचेच काम आहे असे वाटत होते. जिजाऊ माता यांच्या भुमिकेत भाग्यश्री अनपेक्षितपणे सुखद धक्का देत होती तरी अजून कणखरपणा आवडला असता कारण शिवाजी महाराजांमधील धाडसाचे स्त्रोत त्या होत्या. पण सुरुवातीपासूनच सर्वांचेच संवाद छान लिहिले होते. ऐकायलाही मजा येत होती आणि त्यामुळेच आपण चित्रपटाशी जोडले जात होतो.
गंमत म्हणजे महाराजांच्या लहानपणीच्या भुमिकेत रितेश देशमुखच्याच दोन्ही मुलांनी काम केले आहे. थोडक्यात पुर्ण देशमुख कुटुंबीयच पडद्यावर भोसले कुटुंबीय साकारायला उतरले होते. हे मला घरी आल्यावर समजले. जे एका अर्थी चांगले झाले. अन्यथा उगाच त्या मुलांची कामे नेपोकिड म्हणून बघितली गेली असती. जी प्रत्यक्षात छान झाली आहेत. एकूणच पहिल्या पाऊणेक तासात चित्रपट जणू रितेश देशमुखच्या धमाकेदार एंट्रीसाठी सेट झाला होता.
पण निदान माझ्यामते तरी उलट झाले. रितेश देशमुख आणि महाराजांचे भाऊ संभाजी राजे यांच्या भुमिकेत असलेला अभिषेक बच्चन या दोघांची एंट्री झाल्यापासून थोडा कंटाळा यायला लागला. म्हणजे अध्येमध्ये काही सीन चांगले होते पण नावीन्य नसलेले होते आणि त्यातून कथा पुढे सरकतेय असे वाटत नव्हते. अभिषेक बच्चनचे मराठी उच्चार फार सदोष वाटले. त्याच्या अभिनयात किंवा वेशभुषेत सुद्धा काही विशेष वाटले नाही. जेनेलियाबाबत सुद्धा ती आताची देशमुख असली तरी मराठीची बोंब आहेच. ईतर भुमिकात चालले असते पण या भुमिकेत बिलकुल नाही. बाकी ती दिसली नेहमीप्रमाणेच सुंदर आणि खरोखरच्या नवर्यासोबत केमिस्ट्री जुळवायचे काम तेवढे चोख बजावले आहे.
त्याचवेळी दुश्मन पार्टीचे कास्टींग मात्र जमून आले आहे. कारण त्यांचे संवाद हिंदीतच आहेत. त्यामुळे कानाला कुठले अत्याचार नाहीयेत. (अरे हो, चित्रपटाच्या मराठी वर्जनमध्ये सुद्धा ते हिंदीच बोलत होते. तेव्हा तिकीट बूक करताना आपण चित्रपट मराठीतच बघायचा आहे हे लक्षात ठेवा. हिंदी वर्जन ज्यांना मराठी कळत नाही त्यांच्यासाठीच आहे.)
बिजापूरचा आदिलशहा म्हटले की आता अमोल गुप्तेच आठवतील असा त्यांचा गेटअप जमून आलाय. त्यांची पत्नी म्हणून विद्या बालन सुद्धा परफेक्ट कास्ट आहे. फरदीन खान यारी दोस्तीत आला आहे असे वाटले होते, पण शहाजहान म्हणून त्याला मोजून चार संवाद आहेत. ज्यातले तीन तो तोंडातल्या तोंडात पुटपुटतो आणि अर्धा मिनिटभर सुद्धा स्क्रीनवर दिसत नाही. आणि महत्वाचे म्हणजे त्यातही तो काही वाईट दिसत नाही. जेवढे त्याला संवाद नाहीत त्यापेक्षा जास्त शब्द मी त्यावर खर्च केलेत. आणि या न्यायाने मग अफझलखानावर स्वतंत्र लेख हवा. कारण हा चित्रपट म्हणजे महाराजांचा पुर्ण ईतिहास नसून त्यातील अफझलखानाचा वध हे प्रकरण केंद्रस्थानी आहे. जसे दर दुसर्या ब्लॉकबस्टर चित्रपटात हिरोईन म्हणून रश्मिका मंदाना दिसते तसे प्रत्येक अतरंगी निगेटीव्ह भुमिकेत हल्ली संजय दत्त दिसतो. पण यात तो धिप्पाड अफजलखान आणि त्याच ताकदीचा क्रिंज अभिनेता म्हणून परफेक्ट बसला आहे.
चित्रपटाच्या मधल्या टप्यात आलेली मरगळ शेवटच्या पाऊणेक तासात झटकली जाते. वर म्हटले तसे ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमधील स्लॉग ओव्हर सुरू होतात. अफझलखानाने तो फेमस विडा उचलल्यानंतर शेवटपर्यंत मी चित्रपट खुर्चीच्या कडेवर बसून पाहिला. अफझलखान त्याच्या बलाढ्य सैन्यासह चाल करून येतो तेव्हा प्रत्येक प्रसंगागणिक वातावरणातील वाढता तणाव छान दाखवला आहे. या भागात जितेंद्र जोशी एंट्री मारतो आणि मोजक्याच द्रुश्यात अलगद आपली छाप टाकतो. न टाकल्यास नवल अश्या ताकदीचा अभिनेता तो आहेच, पण तसेच कॅरेक्टर सुद्धा मिळावे लागते. सलमान खान सुद्धा मोजून दोन संवादात शिट्ट्या खेचतो. अफझलखान वधाच्या प्रसंगात जे पहिले नाव आजही आपल्या तोंडी येते त्याची भुमिका त्याला मिळाली आहे. रितेश देशमुख जे आधी इमोशनल संवादात चांगला वाटत होता ते चित्रपट शेवटाकडे जाताना त्याचीही भुमिका दमदार होते. एकूणच खानाच्या वधाचा क्लायमॅक्स वेगळ्या उंचीवर गेल्यासारखा वाटतो त्यामागचे कारण दमदार परफॉर्मन्स, संवाद आणि बॅकग्राऊंड म्युजिक हे तर आहेच. पण ज्या मुत्सदीपणा आणि गनिमी कावा युद्धपद्धतीसाठी शिवाजी महाराज आणि मावळे ओळखले जायचे त्याची झलक आपल्याला यात दिसते.
चित्रपट संपताना पुन्हा राजा शिवाजी अँथम म्हणून प्रसिद्द झालेले गाणे लागते. त्याची हूक लाईन आधीच फार आवडलेली, जेव्हा जेव्हा बॅकग्राऊंड म्युजिकमध्ये येते तेव्हा छानच वाटते. पण शेवटी चित्रपट संपल्यावर जेव्हा ते गाणे पुन्हा लागले तेव्हा पुर्ण गाणे आवडले. कारण तोपर्यंत खानाच्या वधाने स्फुरण चढले होते. त्यामुळे संगीतच नाही तर शब्द देखील मनाला भिडले. ए आर रेहमान यांनी जी छावामध्ये अरेबिक संगीताची शॉक ट्रीटमेंट दिली होती त्यातून आपल्याला अजय-अतुल इथे बाहेर काढतात.
रितेश देशमुखने माझी टीम तर मीच कॅप्टन असे केले असले तरी माझी बॅट तर माझीच बॅटींग असे केले नाही. सगळ्यांना व्यवस्थित फूटेज होते. स्वतःची एंट्री लवकर करायची घाई नव्हती. स्वत:वरच फोकस राहावा असा हट्ट कुठे दिसला नाही. संजय दत्तचा अफझलखान तर पुर्ण चित्रपटभर व्यापला होता. अभिषेक बच्चनचे फूटेज कमी करून स्वतला घेतले असते तरी चालले असते. पण ते थोरले बंधू संभाजी राजेंना दिलेले महत्व होते.
गेल्या काही काळात आलेल्या ऐतिहासिक चित्रपटांच्या लाटेत हा चित्रपट मला उजवा वाटला. तसेच कुठलाही छुपा अजेंडा, प्रोपगंडा न जपता, ईतिहासाची तोडमोड न करता प्रामाणिक प्रयत्नांनी बनवलेला वाटला. तर मुलांनाही जरुर दाखवा. ईतिहास काही चित्रपटातून शिकायची गोष्ट नाही वगैरे पाट्या न नाचवता ईतिहासाची गोडी लागायचे एक माध्यम म्हणून दाखवा. आम्हाला तर शिवाजी महाराजांचे जुनेच चित्रपट छान वाटतात असे आपण कितीही नॉस्टेल्जिक होत म्हटले तरीही तसे चित्रपट बनवल्यास ते थिएटरमध्ये बघायला किती जण जातील हा प्रश्नच आहे. त्याचवेळी नव्या तंत्रज्ञानाचा भडीमार असलेले कृत्रिम भासणारे ऐतिहासिक चित्रपट बघणे नकोसे वाटते हे सुद्धा तितकेच खरे आहे. पण मला हा चित्रपट या दोन्हीतील दरी थोडी कमी करणारा वाटला.
एकूणच महाराजांवरचा चित्रपट आणि जितका जमला आहे ते पाहता मराठी चित्रपटांत बॉक्स ऑफिसवर एखादा नवीन विक्रम होण्याची शक्यता आहे. याचा दुसरा भाग येणार असेल तर माझी आताच अॅडवान्स बूकिंग आहे. मला काही आतली खबर वगैरे नाही, पण तो येईलच याची खात्री आहे.
कारण आता केवळ खानाचा वध (१६५९) झाला आहे. अजून बाजीप्रभूंची पावनखिंड (१६६०) शाईस्तेखानाची फजिती (१६६३), सूरतेची लूट (१६६४), आग्राहून सुटका (१६६६), आधी लगीन कोंढाण्याचे (१६७०) आणि अखेरीस क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक (१६७४) होणे शिल्लक आहे!
- तुमचा अभिषेक
चांगला लिहिलायस रिव्ह्यू. मी
चांगला लिहिलायस रिव्ह्यू. मी अजून द्विधा मनःस्थितीत आहे, पण संधी मिळाली तर बघितला जाईल हा सिनेमा.
लेख चांगला लिहिला आहे. छावा
लेख चांगला लिहिला आहे. छावा अगोदर बघितला होता. ह्या चित्रपटाचा ट्रेलर बघितला... छावा सिनेमामध्ये जे वेगळेपण - युद्धाचे प्रसंग, गाण्याचे - होते तेच इकडे पुर्नचित्रित झाल्या सारखे वाटते.. विकी कौशल संभाजी महाराजाच्या भूमिकेत ओळखू येत नव्हता.. आणि इकडे पदोपदी रितेश देशमुखच दिसतो, शिवाजी महाराज नाही.. ओटिटीवर आला तर बघेन..
चांगला रिव्ह्यु दिला आहेस.
चांगला रिव्ह्यु दिला आहेस. बघ्णार नाही.
आवडला रिव्ह्यू.
आवडला रिव्ह्यू.
छान रिव्यू लिहिला आहेस . मी
छान रिव्यू लिहिला आहेस . मी बघणार न्हवते पण तुझा रिव्यू वाचून बघावासा वाटतोय
तसेच कुठलाही छुपा अजेंडा,
तसेच कुठलाही छुपा अजेंडा, प्रोपगंडा न जपता, ईतिहासाची तोडमोड न करता प्रामाणिक प्रयत्नांनी बनवलेला वाटला. तर मुलांनाही जरुर दाखवा. ईतिहास काही चित्रपटातून शिकायची गोष्ट नाही वगैरे पाट्या न नाचवता ईतिहासाची गोडी लागायचे एक माध्यम म्हणून दाखवा. आम्हाला तर शिवाजी महाराजांचे जुनेच चित्रपट छान वाटतात असे आपण कितीही नॉस्टेल्जिक होत म्हटले तरीही तसे चित्रपट बनवल्यास ते थिएटरमध्ये बघायला किती जण जातील हा प्रश्नच आहे.>>>हे काहीच समजले नाही.
सर्वांचे धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
@ राजू,
विकी कौशल आणि रितेश देशमुख वन टू वन तुलना का करावी. एक कलाकार म्हणजे पूर्ण चित्रपट नसतो. विकीने नक्कीच भारी काम केले आहे तरी चित्रपट म्हणून मला छावा माझ्या अपेक्षांना तितके उतरला नाही आहे वाटलेले. याउलट इथे स्टारकास्ट बघून कमी अपेक्षा ठेवून गेलेलो तर चित्रपट संपता संपता छान वाटले.
चित्रपटगृहात नक्कीच जास्त मजा आहे पण तुम्ही ओटीटीवर बघणार असाल तरी हरकत नाही. पण ट्रेलरवर जाऊ नका. अफजलखानाच्या एकूणच घडामोडीत जे डिटेलिंग आहे किंवा टेन्शन डेव्हलप केले आहे ते ट्रेलर बघून कुठेच जाणवणार नाही. तरी तुम्ही ओटीटीवर बघितल्यावर त्या भागाबद्दल तरी आपले मत नक्की लिहा इथे.
@ राज अ.
@ राज अ.
काय नाही समजले?
वेगवेगळे मुद्दे आहेत.
यातील एखादा मुद्दा कुठेतरी वाचून किंवा तसेच चुकीचे मत बनवून मराठी चित्रपटप्रेमींनी या चित्रपटाकडे पाठ फिरवू नये असे वाटते म्हणून लिहिले आहे.
चित्रपट साधारण असता तर लेखच लिहायच्या भानगडीत पडलो नसतो. उलट महाराजांचा विषय घेऊन त्याची अशी माती करत जगासमोर आणला म्हणून शिव्या हासडल्या असत्या.
कुणाचे मत चुकीचे आहे हे कसे
कुणाचे मत चुकीचे आहे हे कसे ठरवायचे?
चित्रपट बघून
चित्रपट बघून
आणि तेच करायला सांगत आहे
धुरंधर पहायला गेलो होतो
धुरंधर पहायला गेलो होतो तेव्हा चित्रपटाचा ट्रेलर बघितला होता.
तो सुद्धा irritate झाला, कधी एकदा संपतोय असे वाटले होते.
पण चित्रपटाबद्दल अनेक जण कौतुक करत आहेत. ते ऐकून पहायचा मोह होत आहे.
छान लिहिलं आहेस.
छान लिहिलं आहेस.
एकुण स्टारकास्ट आणि ऐतिहासिक चित्रपटांचा जो आपण बोर्या वाजवतो ते बघता बघणार न्हवतो. इथे मराठी येणार नाही, पण हिंदी आला तर नक्की बघेन. शिवाजीवर चांगला सिनेमा असेल तर आणि रितेश देशमुख आणि जेनिलिया मला ऑफ स्क्रीन दोघेही आवडतात त्यांचा चित्रपट म्हणून पण.
. ईतिहास काही चित्रपटातून
. ईतिहास काही चित्रपटातून शिकायची गोष्ट नाही वगै >> यात काय चूक आहे? जे लोक आपल्या मुलांना इतिहासाची गोडी लावू शकतात त्यांनी सिनेमातून का शिकवायचा मुलांना?
ज्यांनी पुस्तकातून शिकवले आहे
ज्यांनी पुस्तकातून शिकवले आहे किंवा शिकवतात त्यांचा प्रश्नच नाही. ते तर सर्वात बेस्ट. आपण असेच शिकलो आहोत. पण आजच्या काळात ज्यांच्या मुलांना वाचनाची आवड नाही किंवा असल्यास इतिहास विषय रुक्ष वाटत असेल तर त्यांनी इतिहासाची गोडी लावायचे माध्यम म्हणून चित्रपटाकडे बघता येईल असे म्हणायचे होते. काही वेगळा अर्थ जात असेल तर दुरुस्त करतो.
पण सध्या काही चित्रपटात इतिहासाची मोडतोड केलेली असते. त्यामुळे मुलांना गोडी लावायच्या नादात काही चुकीचा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचायला नको अशीही आपली इच्छा असते. या चित्रपटात तसे काही नसल्याने निश्चिंत राहू शकतो असेही म्हटले आहे.
वादासाठी वाद घालत असाल तर थांबूया किंवा वेगळा धागा काढुया.
किंवा काही दिवसांनी यावर बोलूया... ते योग्य राहील. तूर्तास या विषयावर ब्रेक घेतो. तुम्ही आपले मुद्दे मांडून ठेवा.
वादासाठी वाद घालत असाल तर >>
वादासाठी वाद घालत असाल तर >> या वाक्यानंतर या धाग्यावर काही लिहायची इच्छा राहिली नाही. ज्या घट्ट समजुती आहेत त्यात सुखी रहा.
ओके
ओके
@ अतरंगी,
<<<<<<<<<<<
तेव्हा चित्रपटाचा ट्रेलर बघितला होता. तो सुद्धा irritate झाला..
पण चित्रपटाबद्दल अनेक जण कौतुक करत आहेत. ते ऐकून पहायचा मोह होत आहे.
>>>>
हो बरेच जण कौतुक करत आहेत. त्यामुळे सगळेच चुकू शकत नाहीत.
मागे एकदा ऑफिसमध्ये कोणीतरी म्हणाले होते की अरे शिवाजी महाराजांवर पिक्चर येतोय ना. तेव्हा मी नुकताच ट्रेलर पाहिला होता आणि लगेच त्यांना म्हणालो होतो की हो येतोय खरा पण रितेश, जेनेलिया, अभिषेक, फरदीन खान, संजय दत्त वगैरे धमाल सारख्या चित्रपटात असते तशी स्टारकास्ट बघूनच इच्छा मेली आहे..
पण आता मीच पहिल्या आठवड्यात चित्रपट बघितला आणि उद्या ऑफिसला गेलो की पहिले त्यांना सांगायचे आहे की बघू शकता चित्रपट
छान लिहिले आहे. आधी समज झाला
छान लिहिले आहे. आधी समज झाला तसा नाही, तोडमोड, प्रोपोंगडा नाही किंवा आजकालच्या लुटुपुटू vfx ऍक्शन इतिहासपटा सारखा नाहीय तर चांगलीच जमेची बाजू आहे. मग केवळ मेक, अभिनय संवाद, पकड अशा बाबी उरतात. त्यात पिरियड आणि संवाद जमले असतील तर छानच.
रिव्यू चांगला लिहीला आहे.
रिव्यू चांगला लिहीला आहे. पिक्चर बघायचा आहेच पण गेल्या काही वर्षांत जसे पिक्चर्स आले होते, ट्रेलरवरून तसा वाटत आहे.
पण ट्रेलरवर जाऊ नका. >>> अरे पण ट्रेलरचा लिटरली तोच हेतू असतो की तो बघून लोकांनी पिक्चरला जावे
इतर रिव्यूज वाचून वाटले की एक व्यक्ती, एक राजा म्हणून शिवाजी महाराजांचे चित्रण यात चांगले आहे व रितेशने ते चांगले केले आहे. तसे असेल तर आवडेल बघायला. नाहीतर ट्रेलरमधे रजनीकांत सारखी पायाने तलवार फ्लिप करून हातात घेउन बाजूला वळून न पाहता तेथील व्यक्तीची गर्दन उडवणे असले प्रकार आहेत. शिवाजी महाराज उभे करायला असल्या गिमिक्सची गरज नाही.
कास्टिंग, तोडकेमोडके मराठी याबद्दलही मला काही प्रॉब्लेम नाही. प्रभातच्या चित्रपटांतले मोंगल जे बोलत ते ही अस्सल नसावे
मुळात तेव्हाचे लोक सध्याचे मराठी असेच बोलत नसतीलच. तेव्हा हे सगळेच मेक बिलिव्ह आहे भाषेच्या बाबतीत. मुख्य रोल मधे रितेशचाही काही प्रॉब्लेम नाही. सुबोध भावे चालला तर रितेशही चालेल. पण त्याने एण्ट्री मारताना रॅम्प वॉक करत आल्यासारखे आलेले खटकते (ट्रेलर).
तरी शिवाजी महाराजांवरचा पिक्चर म्हणजे पाहणारच. ट्रेलरसारखे प्रकार जास्त नसतील तर नक्कीच.
रितेश अज्जिबात म्हणजे अजिबातच
रितेश अज्जिबात म्हणजे अजिबातच आवडत नाही.
अॅक्टर म्हणून, त्याची पर्स्नॅलिटी आणि लेटेस्ट बिगबॉसचा होस्ट म्हणून सगळ्याच आघाड्यांवर त्याचे स्क्रिन प्रेझेन्स इतके रिपल्सिव आहे, त्यामुळे पूर्वग्रह बाजुला ठेवणे अशक्यच.. भरीत भर म्हणून अजयतुल चे संगीत पण फार डिसपॉइन्टिंग वाटले, त्यामुळे माझ्यासाठी बिग नो !
तेव्हा चित्रपटाचा ट्रेलर
तेव्हा चित्रपटाचा ट्रेलर बघितला होता. तो सुद्धा irritate झाला..>> मला ही
मला मिळालेले दोन्ही फिडबॅक सिनेमा बन्डल आहे असेच आहेत...सगळे पुस्तकी मराठी बोलतात, अॅक्तिन्ग आणी व्हिएफएस दोन्हीची बोन्ब आहे.. रितेशने माझी बॅट मग माझिच बॅटिन्ग मग मीच शिवाजी, मीच डायरेक्टर असा अट्टाहास केल्याने असाव.
पुढे ओटीटी वर आल्यावर बघु!
रितेश देशमुख आणि जेनिलिया मला ऑफ स्क्रीन दोघेही आवडतात >>> +१ पण अभिनय आणी डायलॉग बाबत दोघ खुपच अॅव्हरेज आहेत.
ट्रेलर मधे जेनेलिया दिसलीय मात्र फार गोड.
अगदी प्रामाणिकपणे मला वाटतं
अगदी प्रामाणिकपणे मला वाटतं शिवाजी महाराजांची भूमिका करण्यासाठी जी शरीरयष्टी हवी ती कमीतकमी पण नाहीये रितेश कडे. त्याने आपल्या ज्यांना नाजुक नाजुक गर्लफ्रेंड असतात अशा बॉयफ्रेंडच्या भूमिका कराव्यात.
अरे पण ट्रेलरचा लिटरली तोच
<<<अरे पण ट्रेलरचा लिटरली तोच हेतू असतो की तो बघून लोकांनी पिक्चरला जावे Happy
>>>>>
हो, खरे तर हेतू तोच असतो
पण त्यासाठी नेमके काय दाखवावे यात बरेचदा फसतात..
मला वाटते बिगबजेट चित्रपट आहे तर केलेला खर्चा ऍक्शन VFX वगैरे ट्रेलरमध्ये दाखवायचा मोह आवरत नसेल. किंवा ते बघून प्रभावित होणारी जनता सुद्धा असेलच.
चित्रपटाचा सुरुवातीचा इमोशनल भाग ज्यात अभिनय आणि संवाद सुद्धा साजेसे आहेत आणि शेवटचा टेन्शन बिल्ट करणारा पाऊणेक तासाचा अफझलखान वधाचा प्लॉट हे जे चित्रपटाचे हाय पॉईंट आहेत ते ट्रेलरमध्ये कुठेच नाहीत किंवा जाणवत नाहीत.
अफझलखान म्हणजे काही एखादा छोटा मोठा गुंडा सरदार नव्हता जे महाराज त्याला वन टू वन भेटले आणि थोडीशी अक्कल हुशारी दाखवत मारले. त्याने वेढा घातला होता म्हणजे तितकेच सैन्यबळ घेऊन तो आला होता. वाटेत येताना सारे उध्वस्त करत आलेला. तो तितकाच मोठा दैत्य होता आणि शिवाजी महाराज त्याला सुपरहिरो सारखे नाही तर डावपेचांनी मात देतात हे चित्रपटातून बरोबर पोहोचते.
जितेंद्र जोशीच्या भूमिकेचे महत्त्व सुद्धा त्यामुळेच आहे. तिथे त्यासारखा कसलेला अभिनेता घेतला हे उत्तम केले.
मला तो पद्मावत चित्रपट आठवत होता ज्यात तो शाहीद कपूर मुत्सद्दीपणा न दाखवता राजपूत म्हणजे काय हे सांगत बसतो आणि त्या नादात मरतो.
बाकी एन्ट्री सीनमध्ये ते हातात तलवार घेत निधड्या छातीने सर्वात पुढे जीवाची पर्वा न करता सुपरहिरोगिरी केली आहे जे ट्रेलरमध्ये दिसते त्या सीन नंतर असेच बघावे लागते का याची भीती मलाही वाटलेली. कारण महाराजांनी असे कधी केले नसणार. लाखांचा पोशिंदा म्हणून स्वतःच्या जीवाची किंमत केलीच असणार. पुढे तेच दिसले म्हणून आवडला.
बहुतेक रिव्ह्यूज मधे
बहुतेक रिव्ह्यूज मधे व्हिएफेक्स वाईट क्वालिटी आहेत असे म्हटले जातेय. बर्याच रीव्ह्यूज मधे अजय अतुल चे संगीत फार उत्तम असेही म्हटले गेलेय अजय अतुल आणि शिवरायांवरचा सिनेमा त्यामुळे अपेक्षा फार जास्त होत्या पण आतापर्यन्त जे ऐकले ते सुमार वाटले त्या मानाने. त्या सो कॉल्ड अॅन्थम चे तर लिरिक्स पण र ला ट वाटले मला तरी.
सिनेमात एखादा तरी पोवाडा आहे का नाही? अजून तरी रिलीज झालेल्या गाण्यांमधे एकही पोवाडा दिसला नाही याचेच मला सर्वात जास्त आश्चर्य वाटते आहे! मोडके तोडके मराठी माझ्यासाठी डील ब्रेकर आहे. म्हणजे आधुनिक मराठी तरी चालवून घेऊ पण जे बोलता ते तरी नीट स्पष्ट बोला. ळ म्हणता न येणे, चमच्यातल्या च च्या जागी चिमट्यातल्या च म्हणणे इ. नाही ऐकवत.
>>म्हणून चित्रपटात शिवशाहीचा
>>म्हणून चित्रपटात शिवशाहीचा पुर्ण ईतिहास न दाखवता तो अफझलखानाच्या वधापर्यंत दाखवला आहे आणि कथा देखील त्याभोवतीच बांधली आहे.<<
कुठेतरी वाचलंय किंवा ऐकलंय् कि रितेशला महाराजांवर ट्रिलजी बनवायची आहे. पण पुढ्चे दोन भाग या चित्रपटाच्या यशा/गल्ल्यावर अवलंबुन आहे. चित्रपट चांगला चालतोय, पुढेहि चालेल अशी चिन्हं दिसतायत. नेफि पार्टनर असल्याने ओटिटिची वाट बघ्णार्यांना जास्त वाट बघावी लागणार नाहि..
मस्त आहे चित्रपट. मला एकसुद्धा ग्लेरिंग इशु आढळला नाहि. विकेंडला मी अॅटमवर चुकुन हिंदी शोची तिकिटं काढ्ली पण दुसर्याच दिवशी मराठी शो बघुन आलो. अर्थात हिंदीपेक्षा मराठी जास्त इंपॅक्टफुल आहे. रितेश शोभलाय महाराजांच्या भूमिकेत. सगळ्यांची कामं उठावदार झालेली आहेत. वर ऋन्म्याने लिहिल्या प्रमाणे रितेश्+जेनेलियाची केमिस्ट्री अफलातुन आहे. आपण नेहेमी मराठी-मराठी करत असतो. हा चित्रपट मराठी माणसांनी तरी थिएटरला जाउन बघावा असं मला तरी मनोमन वाटतंय...
मागे मांजरेकर म्हणाले होते कि
मागे मांजरेकर म्हणाले होते कि महाराजांची कारकिर्द इतकि अवाढव्य आहे कि प्रत्येक प्रसंगांवर चित्रपट निघु शकतो, अट केवळ एकच. कमीत कमी १०० कोटिंचं बजेट असावं. अन्यथा हे शिवधनुष्य पेलायचा प्रयत्नहि करु नये..
मला वाटतं कि रितेश किंवा माजरेकरांनी या प्रसंगांवर स्वतंत्र चित्रपट निर्मिती करावी -
१. कोल्हापूर स्वारी १६५९ - आदिलशाहिवर निर्णायक विजय
२. पावनखिंड १६६० - बाजी प्रभु
३. लालमहाल; शाहिस्तेखान १६६३
४. सुरत लूट १६६४
५. पुरंदरचा वेढा १६६५ - मिर्झाराजे जयसिंग - मुत्सद्दीपणा
६. गड आला पण सिंह गेला १६७० - सुरतेवर स्वारी २
७. साल्हेरची लाढाई १६७२ - मुघलांना मैदानी लढाईत पाणी पाजलं
८. राज्याभिषेक १६७४
९. दक्षिण-दिग्विजय १६७७-७८ - जिंजीवर स्वारी
त्या लांजेकरांनी ९ सिनेमे
त्या लांजेकरांनी ९ सिनेमे काढले होते ना? त्यात नेमकं काय काय कव्हर केलं होतं मग?
राज धन्यवाद
राज धन्यवाद
चित्रपट बघून आलात आणि छान सकारात्मक प्रतिसाद दिलात.
बहुतांश जनता ट्रेलर आणि स्टारकास्ट बघून आधीच नकारात्मक मत बनवून आहेत. ती खोडली जाण्यासाठी हे गरजेचे.
आज मी वर्क फ्रॉम होम करतोय आणि घरच्यांना पिक्चर बघायला पाठवत आहे. मुलांनी बघितल्यावर त्यांच्याशी इतिहासाची चर्चा करायला मजा येईल.
या चित्रपटांची मालिका जोरदार व्हावी आणि जसे यात अफजलखानाचा वध हे प्रकरण दाखवले त्याच ताकदीने इतर घटना सुद्धा विस्तृतपणे दाखवल्या जाव्यात.
आणि हो, जर चित्रपटांची मालिका होणार असेल तर रितेश देशमुख स्वतः शिवाजी महाराज झाला हे चांगले झाले आहे. जेणेकरून त्याची इच्छाशक्ती कायम राहील.
आधी मलाही चमकोगिरी करायला चित्रपट बनवला आहे असे वाटत होते. पण आता चित्रपट जसा बनवला आहे ते पाहता मला त्याचे कौतुक वाटतं आहे की त्याने आपला पैसा वेळ परिश्रम हे महाराजांवर मराठी चित्रपट बनवण्यात खर्ची घातले.
उद्या जर एखाद्या हिंदी व्यावसायिकाने महाराजांवर चित्रपट किंवा वेबसिरीज काढुया म्हणत यात उतरला असता तर त्याने या प्रोजेक्टकडे फक्त बिजनेस म्हणून बघितले असते. रितेश देशमुख मराठी माणसांची फौज घेऊन उतरला आहे तर त्यांना ठाऊक आहे शिवाजी महाराज म्हणजे काय आहेत आपल्यासाठी.. पुढेही तो आपले हिंदीतले कॉन्टॅक्टस वापरेल, पण हा प्रोजेक्ट एका मराठी माणसाचा आणि प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीचा राहील.
'खालिद का शिवाजी'ची देश
काढून टाकला.
थँक्यू ऋ! चांगला लिहिला आहेस
थँक्यू ऋ! चांगला लिहिला आहेस रिव्ह्यू. आमच्या इकडे लागला पिक्चर तर नक्की बघेन.
रितेश शोभलाय महाराजांच्या भूमिकेत >>> हे ट्रेलर्स मधेच जाणवलं होतं. बाकी कास्टिंग पण चांगलं वाटत आहे.
चांगल परीक्षण लिहिलं आहे.
चांगल परीक्षण लिहिलं आहे. ट्रेलर पाहून नाही पाहणार असे ठरवले होते.
पण आता हे वाचून बघीन.
Pages