#भारत का दिल देखो : बगारा मसूर

Submitted by मनिम्याऊ_मृण्मयी on 20 April, 2026 - 10:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

विदर्भातल्या चंद्रपूर / गडचिरोली आणि नॉर्थ तेलंगणामधील सहज सोपा पदार्थ.

मसूरीची डाळ : २ वाट्या
कांदा - १ बारीक चिरून
टोमॅटो - १ बारीक चिरून
आलेलसूण पेस्ट - १ चमचा
नेहमी वापरतो तो मसाला (गरम / गोडा / काळा ) - १ चमचा
तिखट , हळद, जिरेपूड , धणेपूड - प्रत्येकी १ चमचा
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी
तेल
हिंग

क्रमवार पाककृती: 

प्रथम मसुरीची डाळ कोमट पाण्यात १० मिनिटे भिजत ठेवावी. अगदी लगेचच मऊ होते आणि बोटाने चेपली जाते.
डाळ चाळणीत निथळून ठेवावी.

लोखंडी कढईत तेल गरम करावे. त्यात हिंग मोहरीची फोडणी घालावी.
त्यात कांदा घालून गुलाबी होईस्तोवर परतावा. आले लसणाची पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यावे.
त्यानंतर टोमॅटो घालावा, सर्व मसाले घालून तेल सुटेपर्यंत परतावे.

मिश्रणाला तेल सुटून खमंग वास सुटला कि निथळत ठेवलेली डाळ घालावी आणि दोन -तीन मिनिटे मोठ्या आचेवर शिजवावे.
आता यात कडकडीत गरम पाणी घालावे. नेहमी रस्सा जितका पातळ करता त्यापेक्षा जरा जास्त पाणी लागते. रस्सा फार लवकर आटतो.

झाकण न ठेवता उकळी येऊ दयावी आणि मग झाकण घालावे. २ मिनिटं ठेवून गॅस बंद करावा.

झटपट बगार मसूर तयार आहे. हा पदार्थ भाकरी / भातासोबत छान लागतो.

वाढणी/प्रमाण: 
२ - ३ माणसे
अधिक टिपा: 

१. ही फार पटकन होणारी पाककृती आहे. मसूर शिजताना एक विशिष्ट प्रकारचा घमघमाट येतो. तसा घमघमाट सुटला म्हणजे भाजी उत्तम शिजली.
२. विदर्भातल्या तेलंगणाला लागून असलेल्या प्रदेशात (चंद्रपूर / गडचिरोली भागात ) आणि नॉर्थ तेलंगणामध्ये अक्षयतृतीयेच्या आधी येणाऱ्या चैत्र अमावास्येला हा पदार्थ करतात
३. इतर भागात आपण पितृपक्षात मसूर वर्ज्य मानतो पण या विशिष्ट भागात मात्र आवर्जून पितरांसाठी नैवेद्य करताना मसुरीच्या पदार्थांचा समावेश केला जातो.

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान व सोपी.
असा लाल रंग येतो कसा? आमची करी नेहमी ब्राऊनच - गरम मसाल्यामुळे. Sad
टोमॅटोमुळे येत असेल. बरोबर.

असा लाल रंग येतो कसा? आमची करी नेहमी ब्राऊनच - गरम मसाल्यामुळे. Sad
टोमॅटोमुळे येत असेल. >>>>

काश्मिरी मिरची पावडर.. लाल रंग का राज.. Proud

वा ! रेसिपी सोपी दिसतेय आणि फोटो = 👌

याचे थोडे वेगळे वर्जन चणा डाळीचे - बगारी छोला दाल करीत असे आई. सोबत चौकोनी तवा पराठा. अर्थात भिजवायला आणि शिजवायला त्याला जास्त वेळ लागतो. घरात भाजी नसलेल्या दिवशी हा चमचमीत मेन्यू. Feeling Nostalgic.

मसूर मात्र आयुष्यात खूप नंतर आला. अख्खा मसूर वगैरे तर जेमतेम ७-८ वर्षांपूर्वी.

समहाऊ मसूर घरात कधीच येत नसे. गावात शेजार मुस्लिम होता, त्यांच्याकडे रोज मसूर असे जेवणात.

आता मसूर आणला तर तुमच्या रेसिपीने बगारा मसूर करून बघणार 👍

समहाऊ मसूर घरात कधीच येत नसे>>>

You are right अनिंद्यजी. बऱ्याच घरात विशेष करून मराठी ब्राह्मण घरांमध्ये मसूर वर्ज्य असे. मसूर हा तामसिक आहार मानल्या गेला आहे. शिवाय कोणत्या तरी पुराणानुसार मसूरीचा कामधेनू च्या रक्तासोबत काहीतरी संबंध आहे. त्यामुळे तर एकदमच बाद ठरलेलं धान्य आहे हे.

शिवाय पूर्वी विधवा स्त्रियांच्या आहारात मसूर व्यर्ज असे कारण मसुरीने libido वाढतो असा समज होता / आहे.

..मसूर हा तामसिक आहार…

होय. आपल्याकडे निरामिष खाण्यात जे काही थोडेफार ठीकठाक प्रोटीन असलेले घटक आहेत त्यांना अशी negativity चिकटवलेली असते. पनीर, छेना, चीज़, मसूर वाईट्ट 😀

… मसुरीने libido वाढतो असा समज…

हे मात्र नवीन आहे माझ्यासाठी

मी अख्ख्या मसुराची उसळही (रात्रभर भिजवून) साधारण अशीच करते.
मसुराबद्दलची माहिती इन्टरेस्टिंग!
'ये मुँह और मसूर की दाल?!' हिंदी म्हणही 'लहान तोंडी मोठा घास' या अर्थाने ऐकली आहे.

छान रेसिपी, फोटोही मस्त.

चातुर्मासात आमच्याकडे कांदा, लसणीबरोबर मसूर वर्ज्य होता. आई या गोष्टी आणतच नसे चार महिने. मी एवढं नाही काही करत, फक्त सणासुदीला नैवेद्यात नाही वापरत मसूर. कांदा लसूणही नसते आमच्याकडे नैवेद्यात.

मसूर मात्र आयुष्यात खूप नंतर आला,समहाऊ मसूर घरात कधीच येत नसे.>>> +१
लग्नानतर नवरा मसुर्,छोले,राजमा नेहमी करायचा त्यामुळे माहिती झाल..आइकडे छोले,राजमा पण फारसा कधी खाल्ला नाही.
हिन्दी मुव्हितला "ये मुह और मसुर की दाल " एकुन मी आइला विचारल होत ही कोणती डाळ? त्यावर आई म्हटली आपण नाही खात ती डाळ.. भैय्या लोक (सगळे हिन्दी बोलणारे भैय्या) खातात.

ये मुँह और मसूर की दाल?!' हिंदी म्हणही 'लहान तोंडी मोठा घास' या अर्थाने ऐकली आहे.>>>
हो ना.. मी पण.

फक्त सणासुदीला नैवेद्यात नाही वापरत मसूर . >> खरे आहे. सणासुदीच्या जेवणात नसतो मसूर.

लग्नानतर नवरा मसुर्,छोले,राजमा नेहमी करायचा त्यामुळे माहिती झाल..आइकडे छोले,राजमा पण फारसा कधी खाल्ला नाही.>>>
Same pinch. मी पण लग्नानंतर खाल्ला पहिल्यांदा मसूर. अमराठी नवऱ्याच्या हाताचा. Happy

माझ्या मुलीला मसूराची (आख्राचीउसळ फार आवडते. मलाही. ती मसालेदार उसळ, दह्यात घालून खाते मी.

व्वा, काय जबरदस्त रेसिपी आहे.
फोटो पाहून अगदी तोंडाला पाणी सुटले.
तुमच्या रेसिपी अगदी हटके असतात.
आमच्याकडे सोमवारी मसूर खात नाही.
सध्या सातारा कोल्हापूर हायवेवर "अख्खा मसूर" डिश सगळ्या हॉटेल, ढाब्यावर फेमस आहे.
आणि ते दालमोठ मध्ये मसूरच असतो की...

प्राजक्ता+१
मस्त रेसिपी मनिम्याऊ. तूर डाळ रात्रभर भिजवून डाळ कांदा करते ती अगदी अशीच कृती आहे. मसूर चटकन भिजते त्यामानाने, करून बघेन. Happy

मला मसुर डाळ आवडते. आता अशीही करुन पाहिन. मी मुगडाळीसारखी करायचे.

ये मुह और मसुर की दाल चा एक वेगळा अर्थही ऐकला होता. हिंदी पट्ट्यात मसुर डाल खाल्ली जायची व इतर डाळींच्या तुलनेत जरा महाग असायची. कोणी गरिब ‘मी आज मसुर की दाल खाल्ली‘ म्हणाला तर त्यावर अविश्वास दाखवला जात असे, तुला काय परवडतेय या अर्थाने.. म्हणुन ये मुह और मसुर की दाल???

जे करायचे कुवत नाही ते करायची वल्गना कोणी करु लागला की त्याला ये मुह् और मसुर की दाल?? असे म्हणुन हिणवले जात असे.