ती (मृण्मयी गोडबोले) परक्या शहरात, परक्या देशात आहे, आणि तिला अचानक रस्त्यात तो (ललित प्रभाकर) दिसतो. तिच्या नजरेत त्याच्या बद्दल काही आहे. ती काही काळ त्याचा पाठलाग करते, त्याला भेटून ओळख द्यावी न द्यावी हा संभ्रम तिच्या डोळ्यात दिसतो आणि तो रस्ता ओलांडायला उभा असताना त्याच्या बाजुला ती उभी रहाते. त्याला ती दिसते, त्याच्या आणि तिच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडुन वहात असताना ते एकमेकांना आलिंगन देतात. ती संध्याकाळ दोघे एकत्र घालवतात. त्यातून त्यांच्यात काहीतरी जुने बंध, ओळखच न्हवे तर घट्ट मैत्री, बहुतेक त्याहुन जास्त अजुन काही आहे याची आपल्याला खात्री पटते. इथवर ते जपान मध्ये टोकियोत आहेत इतपत आपल्याला अंदाज आलेला असतो. एकत्र जेवण झाल्यावर ते रस्त्यातून भटकत असताना रस्त्यातून स्ट्रीट कार/ ट्राम धडधडत जाते आणि तो तिला आलिंगन देऊन चुंबन घेतो. दीर्घ चुंबन. स्ट्रीट कार जाते आणि ती त्याला दूर करते एकदा त्याच्या डोळ्यात बघते आणि तडक माघारी वळते आणि निघुन जाते.
तो तिच्या पाठमोर्या गर्दीत विरुन जाणार्या आकृतीकडे बघत रहातो, आणि वळून चालू लागतो. थोड्याच वेळात त्याला कुणाचा तरी फोन येतो आणि लगेच ये, आत्ता?, हो आलोच अशी देवाणघेवाण होऊन पुढच्या शॉटला तो तिच्या घरी आलेला असतो. काही जुजबी संवाद होतात का काय लक्षात नाही, पण ती त्याला एका बेडरुम मध्ये नेते. तिकडे पलंगावर एक ६-७ वर्षांचा मुलगा गाढ झोपलेला असतो. दुसर्याच क्षणी तो तरातरा तिच्या घरातून बाहेर निघुन जातो.
इथवर बघितल्यावर ह्या दोघांचे पूर्वी संबंध होते त्या संबंधातून हे अपत्य जन्माला आले असणार, काही कारणांनी दोघांत दुरावा आला असणार. हा पहिला विचार मनात आला. पण तो तर तरातरा निघुन जातो म्हणजे हे मुल कदाचित त्यांचे नसेल का? किंवा त्याचे आहे हे त्याला माहित नसेल का? फारच बॉलिवुडी होतंय हे... कदाचित तिने दुसरे लग्न केले असावे, आणि आता ती सेटल झाली असावी आणि म्हणुनच कदाचित ती मगाशी चुंबन घेतल्यावर अनकंफर्टेबल होऊन निघुन गेली असावी का? आणि त्याला सत्य परिस्थितीची कल्पना द्यायला बोलावले आणि मुलाला दाखवले असावे का? याहुन जास्त काही वेगळं मला सुचलं नाही. सुचायची गरज ही नाही. हा रहस्य त्याची उकल वगैरे चित्रपट नाही. नात्यांचा नक्कीच आहे, पण रुढार्थाने त्याकडे बघणारा अजिबात नाही. सुरुवातीला रोम-कॉम वाटणारा आणि शेवटाला या नात्याला सेकंड चांस दिला, दोघांना आपपल्या चुका समजल्या आणि ते सुखाने नांदू लागले, 'नांदा सौख्यभरे' वगैरे वगैरे वगैरे तर अजिबातच नाही. पूर्वी काय घडलं आहे, त्यांच्यात काय नातं आहे, काय गुंता आहे आणि पुढे काय होणार? याची उकल होतेच पण ... उत्तरे मिळत नाहीत. ती नकोच असतात. हवेहवेसे प्रश्न तितके झोळीत पडतात. त्यातच तर गंमत!
****************** सिनेमा बघणार असाल तर यापुढे वाचू नका. मी स्पॉयलर न देता लिहिले आहे. तरीही *******************************
आता पुढचा सगळा चित्रपट दोन टाईम लाईन वर दिसतो. आजची जपान मध्ये घडणारी, उलगडत जाणारी गोष्ट आणि भूतकाळात ते एकमेकांना कसे भेटले वेगळे झाले असतील तर का आणि कसे झाले, मुलाचं रहस्य काय इ. इ. ठराविक वळणे असली तरी तपशील ताजा आणि मराठीत तरी न मांडलेला पण अगदी खराच घडेल असा आहे.
मनमर्जिया मधला विकी कौशल, तापसी आणि अभिषेक काहीसे आठवले. काहीशी गेहेराईया मधली दीपिका आठवली. दोघांतले टॉक्सिक प्रेम आहेच, पण ते कबीर सिंग सारखं एकतर्फी टॉक्सिक नाही. अशाच धर्तीवर ललितचाच एक चित्रपट हल्लीच आलेला ना? मला नाव नाही आठवत, पण तो काही इतका आवडला न्हवता. तर दोघांना काहीतरी दुखरी नस आहे, राग अनावर दोघांना होतो, प्रेम ही दोघे करतात म्हणजे 'सांगितल्याविण ओळख तू रे' वगैरे लेव्हलचं नाही, व्यवस्थित दिसेल असे शारीर प्रेम दोघे करतात, अँगर इश्युज आहेत, व्हल्नरेबिलेटी दोघांना आहेत, ताठमानेने जगणारे तर दोघे आहेतच, आहेत ना? का कक्विनियंट आहेत? पण असे सोयिस्कर निर्णय ही दोघांनी घेतले आहेत. दुसर्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपलं मुसळ दिसत नाही ही तर आदीम मानवी भावनाच! हे असं टॉक्सिक प्रेम! कुणालाही फक्त चांगलं किंवा फक्त वाईट न दाखवता त्यांच्या मुद्रा, वाचिक, कायिक अभिनयातून दिसत रहातं. ते दाखवताना काळानुरुप प्रसंगांची सरमिसळ होते पण त्यातील तीव्रता कमी न होता ती छान सहज जमून आली आहे.
'त्या'ची मोठी स्वप्नं आहेत पण त्यांची जबाबदारी घेणे त्याला जमत नाही आहे. तो गर्भश्रीमंत कुटुंबातून आलेला पण आई वडिलांचा मनस्वी तिरस्कार करणारा आहे. अगदी एकाच मिनिटभराचा तो आणि ती त्याच्या आई वडिलांकडे जेवायला गेलेले असतानाचा प्रसंग. त्यांच्यातील परस्पर संबंध, ताण दाखवणारा, कमीत कमी संवादात घडतो. तो फार सुंदर जमलेला बोलका प्रसंग आहे, अगदी माझ्या मनात घर करुन गेला. साधे संवाद आहेत, पण जादू घडते त्यात.
मुलाची आणि त्याची भेट होते, त्यांची केमिस्ट्री घडू लागते तेव्हाचे ही काही प्रसंग असेच तुटक तीन चार वाक्यांचे आहेत. ती एका प्रसंगात नुडल सूप खाते आहे, पण एका मागोमाग एक घास नूडल्स वर नूडल्सच खात सुटते. त्यात तर एकही शब्द न बोलता या हृद्यीचे त्या हृद्यी समजते. 'ती' ची आई अंथरुणाला खिळलेली आहे, आई नंतर तिला कुणीच नाही आणि आजारपणात कर्ज झालेलं आहे. ती आपल्या पायावर उभी आणि आजची तरुणी आहे. लेव्हल हेडेड आणि परिस्थितीचे भान असणारी, ध्येय साध्य करण्यात काही तडजोडी स्वीकारण्यात काही कमी पणा न वाटणारी, पण स्वतःची मूल्ये तरीही जपणारी.
आता शेवटचा टायटल मधला फुजी. त्या दोघांना असा सहज दर्शन न देणारा धुक्याच्या पडद्या आड लपलेला माऊंट फुजी दिसतो का? ते दर्शन झालं तरी ते लाटांवरील तरंगांसारखेच क्षणभंगुर असेल ना? तसं असलं तरी त्यातुन काय मिळेल? मग दर्शन तरी घ्यावं का? कोण जाणे!
मृण्मयी आणि ललित दोघांचा अभिनय मला आवडला. डोळे आणि चेहरा बोलतो. मोहित टाकळकर आणि इरावती कर्णिक यांची कथा पटकथा आहे. दिग्दर्शन मोहितचे आहे. संपूर्ण सिनेमा दोघांची नावे कुठेच येत नाहीत. त्यांना नावेच नाहीत.
आत्ता आणखी लिहित नाही. आणखी लोकांनी बघितला, आवडला तर बोलूच.
हे सगळं सिरीयसली लिहिलेलं आहे
हे सगळं खरच सिरीयसली लिहिलेलं आहे की सार्कास्टिक विनोदी आहे आणि तो विनोद मला कळत नाहीये ???
सारकॅझम का वाटलं तुला? तरल
सारकॅझम का वाटलं तुला? तरल आहे ते तरल!
विनोद नाही त्यात काही! बघ तू आणि मग सांग.
छान लिहिलेयस. खालचे परिच्छेद
मी काल ती बेडरिडन बाई पाण्याचा ग्लास पाडते तिथपर्यंत पाहिला आहे. लेखातल्या *** आलेल्या परिच्छेदापर्यंत. मला आधी ते दोघेही लहरी व ती मनस्वी वाटली होती खरेतर. लक्षात आले की तो त्यांचाच मुलगा आहे, ते पाहून तो दम्याचा अटॅक आल्यासारखा घाबरून पळाला. कमिटमेंट इश्यू! त्यामुळे मनमर्जियां अगदी चपखल. बाकीचे पाहून झाल्यावर लिहेन.
तरल आहे ते तरल! >>>
तरल आहे ते तरल! >>>

बरं बरं. बघतो..
अरे तू कुठल्या टोनमध्ये लिहिलं आहेस हे खरच कळलं नाही..
ह्यात फुजीचा काय संबंध.?
ह्यात फुजीचा काय संबंध.? मुलाचे नाव फुजी आहे का?
ते जपान मध्ये असतात, मुलाला
ते जपान मध्ये असतात, मुलाला फुजी आवडत असतो जणू तो त्याचा मित्रच असतो. फुजी त्याच्या ( फुजीच्या ) मनात असेल तरच दर्शन देतो. बाकी हवामान किती चांगलं असेल तरी फुजीवर धुक्याची झालर, पाऊस काहीही असू शकतं पण फुजीने दर्शन दिलंच तर त्या नागाधिराजाचे पूर्ण प्रतिबिंब पाण्यात नयनरम्य दिसते. पण ते तुमच्या नशिबात असेल तरच.
ओके. व्वा छान रूपक आहे.
ओके. व्वा छान रूपक आहे.
झाला, झाला पाहून.
झाला, झाला पाहून.
दोघांचाही अभिनय जबरदस्त आहे. तरीही ललित प्रभाकरचा जास्त आवडला कारण त्याचं कॅरेक्टर नालायक वाटायला हवे तसेच वाटले. त्याचा राग आला, थोडी घृणाही वाटली. दोघांनीही डोळ्यांनी नजरेने जो कायिक वाचिक अभिनय केला आहे, तो फारच सुंदर आहे. संवाद फारसे नाहीतच. ती पोकळी हेच भरून काढते.
थोडे स्पॉयलर्स असतील किंवा सगळेच असतील. उत्स्फूर्तच लिहिले जाते. मृण्मयी एक कष्टाळू, ट्रान्स्लेटरचा जॉब करणारी, आजारी- झोपून आईचं केअरगिव्हिंग करणारी, आईच्या बिलांपायी कर्जात अडकलेली तरीही ड्रिव्हन आणि हसरी मुलगी असते. ललित हा बड्या बापाचा, विस्कळीत आणि दुरावलेली नाती असणारा, बेजबाबदार व आळशी - बराचसा आत्मकेंद्री आणि नार्सिसिस्ट वाटावा असा तरूण असतो. ते एकत्र येऊन बिनलग्नाचा दुःखाचा संसार करतात. सेक्स लाईफ मात्र एकदम उत्तम. बाकी सगळे मातीत गेलेले. एकंदरीत abusive वाटावे असे नाते. सगळ्याच जबाबदाऱ्या मृण्मयी सांभाळतेय हा आपल्या करिअरची पोकळ स्वप्न कुरवाळत काहीही करत नाही. थोडे दोष दाखवले, थोडी तडजोड करायला सांगितली की ह्याचा कांगावा आणि रडारड सुरू.
चक्क ॲडल्ट किड सांभाळावे लागते. रागाच्या भरात भांडणं करून हात तोडून घेतो तेव्हा ह्याला आंघोळ घाला, सेवा करा , समजून घ्या. फारच घृणा वाटली तेव्हा त्याची. जबरदस्त दृष्य आहेत सगळी. त्यांचं नातं हळूहळू कसं लयाला जातं. एक ॲबॉर्शन आणि एक मूल होतं. मित्रामुळे ती ह्या तळातून कशी बाहेर पडते, जपानला येते. तेथे अर्थार्जन सुरू करते.बाळाला मोठं करते. प्रेमळ जपानी आजी आजोबा सुद्धा मिळवते. पुन्हा जपानला भेटून आधीचा गाळ स्वच्छ होऊन सगळं नितळ होते. नाते नितळ झाल्यानं फुजीही दिसतो. अर्थात ते एकत्र आले नाहीत पण क्लॅरिटी आली याचं प्रतीक वाटलं.
कोणतीही शहाणी मुलगी अशा मित्राला कधीही माफ करू शकणार नाही खरेतर. पण हिने लगेच मिठीच मारली. हाकानाका. अजूनही नात्यात स्फुल्लिंग आहे ते फक्त गतकाळातील चांगल्या सेक्समुळे की काय असा प्रश्न माझ्या बालमनाला पडला आहे. भरपूर इन्टिमेट सीन्स आहेत, ललितने भरपूर अंगप्रदर्शन केले आहे. पण काहीही पुणे ५२ सारखे ओंगळवाणे नाही. पिक्चर सिरियस आहे, इंटेन्स आहे. काळात मागे पुढे गेले की प्रसंगांची तीव्रता कमी होते व लिंक तुटते पण इथे तसे काहीही जाणवले नाही. सांधा बरोबर जुळतो. करमणूक प्रधान, हलकाफुलका अजिबात नाही. कथानक, संवाद आणि अभिनय मात्र जबरदस्त!
भारतात कुठे बघता येईल हा
भारतात कुठे बघता येईल हा चित्रपट ?
Sony Liv वर. कालच बघातला..
Sony Liv वर.
कालच बघातला..
दोघांचाही अभिनय छान असला तरी मृण्मयी बक्षिस घेऊन जाईल.
तिच्यावर अशा प्रसंगात Close-Ups जास्त आहेत. आणि मेकअप सह आणि मेकअप विना (किंवा तशा Non Meck-Up मेकअप सह) बरेचसे प्रसंग आहेत.
अर्थात जाणकार परीक्षक हे ही जाणतातच, पण तसे नेमले नाहीत तर कदाचित...
मला बघायचा आहे हा.
मला बघायचा आहे हा.
बघून झाल्यावर इथे सविस्तर वाचायला येते.
स्पॉयलर्स आहेत वाचू नका.
स्पॉयलर्स आहेत वाचू नका. इथपर्यंत वाचले. मोठे प्रतिसाद वाचले नाहीत.
या दोघांचा चि व चि सौ का पाहिला होता. आवडला होता.
हा वेगळाच वाटतोय.
इन्स्टाग्रामवर जाहिराती दिसताहेत. एवढ्यासाठी सोनि लिव्ह अॅप का असा प्रश्न पडला होता. आता घ्यावं लागेल, असं दिसतं
ललितचा सुपर डुपर नावाचा सिनेमा आताच चित्रपटगृहांत आलाय आणि चांगला चाललाय.
आरपार ओटीटीवर पाहायचा प्रयत्न केला ललित कितीही आवडता असला तरी कॉलेज स्टुडंट म्हणून बघवेना , म्हणून अर्धवट सोडलाय.
छान लिहिलं आहे, बघावासा
छान लिहिलं आहे, बघावासा वाटतोय खूप. सोनी liv app नाहीये पण. Prime वर यायला हवा.
पण फुजीने दर्शन दिलंच तर त्या नागाधिराजाचे पूर्ण प्रतिबिंब पाण्यात नयनरम्य दिसते.
टायपो च आहे आणि आता दुरुस्त ही होणार नाही. पण खूपच अर्थ बदल होतो आहे. असो.
मी पण अर्धा पाहून सोडून दिला.
मी पण अर्धा पाहून सोडून दिला. बहुतेक क्लिअर प्रिंट नसल्याने संवाद नीट कळत नव्हते.
बघेन पण आता.
कथेला जपानची काडीचीही गरज
कथेला जपानची काडीचीही गरज वाटत नाही.
जरा या चित्रपटाच्या फायनान्स कडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे कुणाच्या पैशावर कोण जपान मधे चैन करून येते आहे जरा नीट कळेल. माझा हंच आहे युरोपियन संस्था वगैरे गुंतल्या असाव्यात. जो दिखता है वैसा होता नही है.
मग सगळी संगती लागेल.
छान लिहिलं आहेस.
छान लिहिलं आहेस.
चित्रपट बघेन नक्कीच
कथेला जपानची काडीचीही गरज
कथेला जपानची काडीचीही गरज वाटत नाही.+१
मला वाटलं की इंडोजॅपनीज निर्मिती असावी. भारतात ते दोघे फुजीसान नावाच्या हाटेलात च भेटायचे ठरवत असतात.
चित्रपटासाठी आर्थिक मदत जपानी कंपनीने केली असेल.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! बघितलात तर कसा वाटला जरूर लिहा.
अंजली, आयपी वर चांगल्या प्रिंट मध्ये आला आहे.
तो, ती आणि गगनबावडा किंवा तो ती आणि चतुःश्रृंगी नाव देताच आलं असतं.
फक्त ती ट्रान्सलेटर होती आणि आधीच पुण्यात रहात होती आणि टॉक्सिक रिलेशन मधून बाहेर दूर जायचं होतं आणि भारतात काही पाश न्हवते आणि मॉडर्न मुलगी होती त्यामुळे जपान कथेत सहज फिट बसलं. आता जपानला जाऊ नये म्हणून तिचे प्रोफेशन ही बदलता आलेच असते.
आणखी काय काय करू नये म्हणून आणि अनेक गोष्टी कथेत बदलत्या आल्याच असत्या. जसे तिला कथेत नाव आडनाव नाही पण मूळ व्यक्तीचे नाव गोडबोले आहे ते ही जरा खटकणारे नाव आहे. ते ही बदलून मागूच शकतो. फक्त हे असं बदलून न मागता ही सिनेमा चांगला बनवला आहे, बदलून बदलून सगळे उंचवटे मोडून आणखी सर्वसमावेशक सपाट सरधोपट बनवू शकतोच.
आता जपानला जाऊ नये म्हणून
आता जपानला जाऊ नये म्हणून तिचे प्रोफेशन ही बदलता आलेच असते.>> किंवा जपानला जाता यावे म्हणून प्रोफेशन सिलेक्ट केले असावे.
ती तो व एवरेस्ट हे नाव कसे वाटते?
तो ती आणि राजापूर ची गंगा
तो ती आणि राजापूर ची गंगा ठेवायचं नाव
म्हणजे क्वचित कधीतरी दर्शन देण्याचा फॅक्टर पण रिटेन करता आला असता
ग्रामीण भागातली कथा ठेऊन मंजुळेच्या होम ग्राउंड अडवांटेज ला ही कन्टीन्यू करता आलं असतं
नवखे कलाकार पण घेता आले असते
बजेट पण कमी लागलं असतं
एवरेस्ट रिव्हर्स इंजिनिअर
एवरेस्ट रिव्हर्स इंजिनिअर करायला ही माझी काहीच हरकत नाही. पुण्यात प्रस्तरारोहण प्रशिक्षण केंद असेलच. नसेल तर उघडू. हाय अल्टिट्यूड सराव करायला सिंहगड कसा वाटतो? यावर नेपाळ सरकारचा फंडिंग प्रोजेक्ट असणार! ला उत्तर द्यायला मात्र तयार राहायला हवे.
फुजी किंवा जपान एवढं
फुजी किंवा जपान एवढं महत्त्वाचं नाहीये कथेत. कथेचा छोटासा भाग आहे, त्यांनी पण त्याला एका रिप्रेझेंटेशनपेक्षा जास्त महत्त्व दिले नाही, उलट जे काही जपानी आजी आजोबा रेस्टॉरंट वगैरे दाखवलेय ते फारच गोड आहे. टूरिझमची जाहिरात म्हणून नाही. त्यांचं नातं, तिचा संघर्ष आणि तिचं नंतरचं healing यावरच सगळा फोकस आहे. फुजी ऐवजी काहीही चाललं असतं, पण मग त्याचाही "गंगाराम आणि गाढव" केला नसता कशावरून. सिनेमा जपान पाहायला किंवा फुजी पाहायला बघायचा नाहीच्चे हे त्यांनाही माहीत आहे. प्रोफेशनचा उल्लेख संघर्षाच्या काळातला आहे, जपानमधे फारसा नाही. पै पै जमवून घर चालवणं किती कठीण आहे हे अधोरेखित व्हावं म्हणून. कुठलीही गोष्ट मुद्दाम किंवा ओढूनताणून वाटली नाही, सहज आणि कन्व्हिन्सिंग वाटली आहे.
मराठी चित्रपटांना लंडन मधे सबसिडी मिळते म्हणून मी लंडनचा "सबसिडाईज्ड रजनीकांत" यायची वाट पाहत आहे.
यात लंडन नाही, जपान आहे.
निरू, हो. विनामेकपची आहे कुठं कुठं. पटलं,!
ललित प्रभाकर व मृण्मयी गोडबोलेचा चि व सौ का मलाही आवडला होता. धमाल आहे.
>> फक्त हे असं बदलून न मागता
>> फक्त हे असं बदलून न मागता ही सिनेमा चांगला बनवला आहे, बदलून बदलून सगळे उंचवटे मोडून आणखी सर्वसमावेशक सपाट सरधोपट बनवू शकतोच. <<
अलीकडे मी एक ट्रेंड पाहिला आहे. जर्मनी किंवा तत्सम देशात शिक्षण स्वस्त झाल्यापासून सोशल सायन्सेस मधे MS करायला देखील मुले येतात भारतातून. एक दोन अतिशय चाणाक्ष मुलं मी पाहिली. घरचे सगळे संघी वाटावेत असे उजवे, क्लब हाऊस सारख्या app वर त्यांचे मोदीप्रेमी खायचे दात देखील दिसले, मात्र बेटे जर्मन विद्यापीठात दलित प्रश्नांवर वर पीएचडी करतात!! त्यांची स्वतःची जात गेस करू शकता. म्हणजे कोणाचे हेतू कसे असतात याला काही नेम नसतो.
फ्रान्स सारख्या देशातल्या सरकारी संस्था आवर्जून वेगळ्या स्क्रिप्ट ना फंडिंग वगैरे देतात. पुण्यातून अशा संस्था गाठणे अशक्य नाही. सुदर्शन रंगमंचावर जे घडू शकते ते फिल्म मधे घडवायचे!! त्यात काय विशेष? वाचिक अभिनय आणि संवाद!! मग नाटक का करू नये? फिल्म का करावी? काय असे दृश्य माध्यम वापरले आहे? जपानवरच सिनेमा बनवायचा तर विम वेंडर्सच्या 'परफेक्ट डेज' सारख्या दोन फ्रेम्स घेऊन दाखवाव्यात! ती खरे दृश माध्यमाची ताकद! संवाद नाही, अभिनय अभिनय नाही. मात्र एंगेजमेंट १५० टक्के.
एकीकडे तो गहिरे. (गजेंद्र अहिरे) आणि एकीकडे ही अशी मंडळी. ध्येय एकच. दुसऱ्याच्या पैशावर मजा करून घेणे.
>> ती तो व एवरेस्ट <<
>> ती तो व एवरेस्ट <<
केकू, बरोबर धरलेत!
ती तो व किलीमांजारो किंवा गेलाबाजार ती तो व कळसूबाई तरी का नको?
नावापासूनच गंडॅक्स वाटते आहे मला.
फुजीसानुल्या फुला, अभिनय
फुजीसानुल्या फुला, अभिनय अभिनय करणाऱ्या दमलेल्या आईची कहाणी तुला..
Oh boy, oh boy!
Oh boy, oh boy!
हे घ्या किलीमांजारो.
आमच्या दुकानात सगळंच मिळतं.
मला ही कात्गा आठवली होती पण
मला ही कथा आठवली होती पण मी मुद्दाहून लिहिले नाही. very tragic.
तरी देखील वाचायची असेल तर
The Snows of Kilimanjaro
by Ernest Hemingway
https://americanliterature.com/author/ernest-hemingway/short-story/the-s...
बघितला. पण कुछ मजा नही आया.
बघितला. पण कुछ मजा नही आया. तरीही अमलताशच बेस्ट होता हे म्हणून घेते (उगीच) आता इतकी रँडम चर्चा चालूच आहे म्हणून

तिचं काम जास्त आवडलं. वर्सटाईल आहे. भाडिपाच्या जुई नंतर यातच बघितलं . चि सौ का पाहिलाय का आठवत नाही.
जपान बघायला छान वाटलं मला तरी. सारखं सारखं लंडन काय?
बाकी ललितचा मेल चाईल्ड रोल त्याला सुट झालाय. नक्की बॉडी स्कल्प्टींग चा बिजनेस सुरू करतो का मग तो नंतर? सॉरी ते काही कळलं नाही मला नंतर.
नाही करत. नंतर अक्कल आली
नाही करत. नंतर अक्कल आली सांगतो तिला. तो सध्या काय करतो ते मात्र लक्षात नाहीं. मंडेनच काहीतरी बहुतेक.
छान लिहिलंय अमितव.
छान लिहिलंय अमितव.
Pages