काय वाचू? निकष काय?

Submitted by राज अज्ञानी on 12 April, 2026 - 03:18

(हे लिखाण ललित लेखनात ठेवलं आहे. हरकत असेल तर कारणासहीत कळवा)

चांगलं वाचायचंय पण कोणतं? एक गोंधळ आणि त्यातून सुचलेले काही निकष

हा माझा होणारा नेहमीचा गोंधळ आहे. अगदीच अनोळखी व्यक्तींच्या शिफारशीवरून मी एखादे पुस्तक सहज वाचण्याचा निर्णय घेऊ शकत नाही. कारण त्या व्यक्तीची आवड काय आहे याचा मला गंध नसतो. या गोंधळाला मीच जबाबदार आहे कि प्रत्येकाच्या मनात असा गोंधळ असतो हा प्रश्न पडतो. त्यातून लिहावंसं वाटलं.

बऱ्याच वेळा असं होतं, एखादं पुस्तक हातात घ्यायचं, दहा-पंधरा पानं वाचायची, आणि मग खाली ठेवायचं. काहीतरी आपलं नाही असं वाटत राहतं. पण नक्की काय कमी आहे हे सांगता येत नाही. आजूबाजूचे मात्र त्याच पुस्तकाचं कौतुक करत असतात. मग आपणच चुकतो आहोत असं वाटतं. अभिरुची सुमार आहे असं कुणी म्हणेल का अशी भीती वाटते. लेखकाबद्दल द्वेष आहे असे म्हणतील का असे वाटते. किंवा ती भाषा समजत नाही म्हणून हंसे होईल का असे वाटते.

हा अनुभव फक्त माझा नसावा / नसेल असं मला वाटतं. म्हणून हे लिहितोय.

एकच प्रश्न : हे माझ्यासाठी उपयुक्त आहे का? माझ्यासाठी कामाचे आहे का? किंवा काम करतं का?

साहित्याबद्दल बोलताना एक मोठी अडचण असते.
कोणतं साहित्य चांगलं आहे हे सांगणारी एक सत्ताकेंद्रं तयार झालेली असतात. पुरस्कार, माध्यमं, समीक्षक, प्रकाशक, हे सगळे मिळून ठरवतात की कोण "महान" आहे. पण या यंत्रणेत एक सामाजिक पक्षपात असतो. कोणाची भाषा, कोणाचे संदर्भ, कोणाचे जगणे हे "केंद्र" म्हणून मांडले जाते आणि बाकी सगळं परिघावर राहतं.

याचा अर्थ असा नाही की परिघावर ढकललेलं सगळं चांगलं आणि केंद्रात असलेलं सगळं वाईट. पण याचा अर्थ एवढाच आहे .... माध्यमांतील चर्चा (media coverage) हा साहित्याच्या दर्जाचा निकष नाही .... तो सामाजिक शक्तीचा पुरावा आहे.

मग चांगलं काय आणि टाकाऊ काय हे कसं ठरवायचं?

काही निकष - जे कोणालाही लागू होतात (असे मला वाटते, कदाचित तुम्हाला वाटेल, वाटणार नाही)

१. लेखकाचा अनुभव आतून आलेला आहे का?
लेखकाने जे लिहिलं ते त्याने जगलेलं आहे, की दुरून पाहिलेलं आहे? दोन्हींमधून साहित्य होऊ शकतं, पण दोन्हींची पोत (texture) वेगळी असते. जगलेल्या अनुभवात एक कच्चेपणा असू शकतो, असतं, पण एक ओलावा असतो जो कृत्रिम नसतो. थोडक्यात जे जिणं मांडलंय त्याच्या "जाणिवा" त्यात असतात. यावर फेसबुकवर मोठ्या चर्चा झालेल्या आहेत.

बाहेरून जाऊन त्या लोकांवर लिहिलेल्या साहित्यात अनेकदा एक आदर्शीकरण (romanticism) येतं , एक सुरक्षित अंतर राखतं. हे वाचकाला जाणवतं , जरी त्याला नेमकं काय म्हणावं , काय नाव देता आलं नाही तरी.

प्रश्न विचारणे : हे लेखक कुठून बोलतोय ? आतून की बाहेरून?

२. वाचल्यानंतर तुम्ही विस्तारता का संकुचित होता?

म्हणजे तुमचा अनुभव, कल्पनाविश्व, ज्ञानाच्या कक्षा, माहितीच्या कक्षा रूदावतात कि विचित्र जाणीव होते संकुचितपणाची? काही पुस्तकं वाचल्यानंतर जग मोठं होतं. नवे प्रश्न पडतात. एखादी गोष्ट वेगळ्या कोनातून दिसायला लागते.

काही पुस्तकं वाचल्यानंतर फक्त एका विशिष्ट जगाची, विशिष्ट वर्गाची, विशिष्ट संवेदनशीलतेची पुष्टी होते. ते चांगलं" वाटतं, पण त्यात नवीन काही नसतं. (वेळ वाया गेला असे वाटते. पुस्तक वाचण्यासाठी लागणारा वेळ बघता असा वेळ वाया गेल्याने होणारी चीडचीड दुर्लक्षणीय नाही. उगीच वाचत सुटायचे कि नेमकं वाचायचं हा प्रश्न पडत असेल तर असे टाकाऊ लिखाण केवळ हाईप्ड आहे म्हणून वाचायचे का?)

हे दोन्ही वाचताना जाणवत नाही. वाचून झाल्यावर एक आठवड्याने जाणवतं.

सवय लावायची : वाचून झाल्यावर विचारा, यातलं माझ्यासोबत काय राहिल? किंवा कोणती मूल्य माझ्यामधे अ‍ॅड झालीत. माझ्या कुठल्या जाणिवा विस्तारल्या?

३. लेखक प्रश्न विचारतो की उत्तरं देतो?
चांगलं साहित्य तुम्हाला प्रश्नांमध्ये सोडतं. वाईट साहित्य तुम्हाला उत्तरं देतं आणि उत्तरं ऐकणारा श्रोता बनवतं. जेव्हा लेखकाला आधीच माहीत असतं की जगाचं सत्य काय आहे, आणि तो ते फक्त "सांगतो" तेव्हा ते उपदेशात बदलतं. साहित्यात आणि उपदेशात हाच फरक आहे. याला काही संज्ञा असेल तर सांगा.

निकष: जे साहित्य तुम्हाला विचार करायला भाग पाडतं ते वाचा. जे फक्त मान डोलवायला लावतं ते सोडा.

४. जास्त हाईप असेल तर जास्त सावधानता बाळगणे ( हे मी अंमलात आणतो)

एखाद्या लेखकाच्या निधनावर वर्तमानपत्रांची पानं भरली जातात, दुसऱ्याच्या निधनाची बातमी छोटी येते. हे साहित्याचं मूल्यमान नाही. हे त्या लेखकाचं सामाजिक नेटवर्क (social network) आणि माध्यमकुशलता media reach दाखवतं. याचा अर्थ गाजावाजा (hype) असलेलं सगळं टाकाऊ असं नाही. निव्वळ या कारणासाठी चांगलं साहित्य दूर नाही करायचं. मुद्दा असा आहे कि हाईप आहे तेच चांगलं हा नियम नको.

एक उलटा नियम लागू करायचा: जितका जास्त गाजावाजा, तितकं जास्त स्वतंत्रपणे वाचावे.
स्वतःचा अनुभव काय आहे ते महत्त्वाचं, कोण काय म्हणतं ते नाही. तो दबावामुळे मांडायचा नाही असे नको. शेक्सपीअर आवडला नाही हे सुद्धा सांगता आले पाहीजे. (पुढे स्वतंत्र येईल).

५. आवडलं नाही हा डेटा आहे, दोष नाही.

हे महान आहे हे दुसऱ्याचं मत आहे. तुमचा अनुभव वेगळा असू शकतो आणि तो व्हॅलिड आहे. हे चित्रपट, संगीत, नाट्य अशा सर्व क्षेत्राला लागू होतं.

मला हे आवडलं नाही असं म्हणायची भीती वाटत असेल तर ती भीती स्वतःच एक प्रश्न उपस्थित करते. कोणाच्या अभिरुचीला मानक मानलं जातंय, आणि ते का? मग या मानकीकरणाचे निकष काय आणि ते कुणी बनवले हे पाहिले पाहीजेत. ते मान्य नसतील तर धाडसाने सांगता आले पाहीजे. तसे सांगता येत नसेल तर हा सक्तीचा प्रकार आहे. तुमच्या मताला हसण्यावारी नेलं जात असेल तर अशांशी संवाद वाढवण्यात अर्थ नसतो.

आवडलं नाही असं म्हणजे त्या लेखकाला किंवा त्याच्या समाजाला नाकारणं नाही. ते फक्त आपला प्रामाणिक अनुभव आहे. ( त्याच वेळी आपल्याला का आवडलं नाही याचं मूल्यमापन आपल्याला स्वत:ला करता आले पाहीजे. खरंच आवडलं नाही कि अढी आहे याचे उत्तर आपले आपल्याला मिळायला हवे. जर उत्तर मनासारखे नसेल तर आपली मानसिकता बदलण्यासाठी उपयुक्त वाचन केले पाहीजे.)

६. टाकाऊ कशाला म्हणायचं?

तीन प्रकारचं साहित्य सहज ओळखता येतं,

भूतकाळाची सजावट (Nostalgic decoration) - फक्त एका जगाची सजावट. कुठलाच प्रश्न नाही, कुठलाच संघर्ष नाही. सगळं सुंदर आणि भावपूर्ण पण रिकामं. नाना पाटेकरांच्या भाषणासारखं.

उपदेशकथन (Preaching) - लेखकाला उत्तर माहीत आहे आणि तो ते तुम्हाला सांगतो. वाचक फक्त श्रोता आहे.

बंदिस्त जग (Insular) - ज्याचं जग इतकं बंद आहे की बाहेरचं अस्तित्वच नाही. एका विशिष्ट वर्गाचे, एका विशिष्ट जीवनशैलीचे प्रश्न हेच विश्वाचे प्रश्न असा आव. ते वाचूच नये असे नाही. रिकामेपण घालवण्यासाठी, निरीक्षणासाठी वाचावे. पण ते टाकाऊ आहे याची खूणगाठ बांधावी.

हे तीनही प्रकार कुठल्याही प्रवाहात सापडतात. ब्राह्मणी, ग्रामीण, शहरी, दलित, आदिवासी, मुस्लीम, मराठी, इंग्रजी. सगळीकडे. टाकाऊपणाला जात किंवा वर्ग नसतो.

७. एकसुरी वाचन टाळणे

एकाच लेखकात, एकाच प्रवाहात, एकाच भाषेत अडकणे नको. एक मराठी ग्रामीण, एक दलित आत्मकथन, एक अनुवाद (translation). बंगाली, तमिळ, किंवा जागतिक..... असा तुलनात्मक फरक (contrast) वाचनाला धार देतो. आणि त्या contrast मधूनच तुमचा स्वतःचा निकष घडत जातो.

शेवटी

हे सगळे निकष कोणाला बरोबर किंवा चुकीचं ठरवण्यासाठी नाहीत. ते फक्त एक साधा प्रश्न विचारायला मदत करतात.
हे पुस्तक माझ्यासाठी महत्वाचं आहे का? ते माझ्यासाठी काय करतं? म्हणजे मला काय देतं?
जर उत्तर काहीच नाही असेल तर ते ठेवून द्या. वेळ मर्यादित आहे. आणखी एक वाचायचंय.

तुम्हालाही असे अनुभव आले असतील.
एखादे पुस्तक "महान" म्हणून वाचलं पण रिकाम्या हाताने परत आलात? किंवा कुठे एखाद्या दुय्यम लेखकाने जबरदस्त काहीतरी दिलं? शेअर करा.

कदाचित हे निकष सुद्धा व्यक्तीगणिक बदलतील. आपले निकष सांगा. कदाचित त्याचाही विचार करता येईल.
वाचनौदासीनता हा एक वेगळा प्रश्न आहे. तो इथे नको कृपया.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. लेखकाचा अनुभव आतून आलेला आहे का?
अमिताभ घोषच्या तीन पुस्तकांची मालिका Ibis Trilogy वाचली. लेखकाचा अनुभव आतून आहे. ऐतिहासिक बैठकीवर कादंबरीतील पात्र वावरतात. प्रत्येक पात्र वेगळ्या समाजाचा घटक आहे, बोलतो खातो वागतो वेगळा.

२.२. वाचल्यानंतर तुम्ही विस्तारता का संकुचित होता?
गीता, किंवा महाभारत आणि रामायण या कथांच्या विविध व्यक्तिवर केलेला विस्कोट वाचून यातलं काहीही होत नाही.

३. लेखक प्रश्न विचारतो की उत्तरं देतो?
गरीबी या विषयावरचे लेखन या प्रकारात मोडते. जगात ९०%लोक गरीब आहेत. त्यांच्या परिस्थितीची समीक्षा या प्रकारात येते.
निकष: जे साहित्य तुम्हाला विचार करायला भाग पाडतं ते वाचा. जे फक्त मान डोलवायला लावतं ते सोडा.

४. जास्त हाईप असेल तर जास्त सावधानता बाळगणे
'शाळा' हा विषयच फार वरच्या पातळीवर नेऊन ठेवला आहे उगाच. उदात्तीकरण केले आहे. त्यावरचे वाचन टाळतो.

७. एकसुरी वाचन टाळणे
मराठी वाचकांचे काही आवडते विषय आहेत. अध्यात्माचं स्मूदी आइस्क्रीम करून ठेवले आहे ते चाटत राहाणे.
इतिहासातील काही कालखंड, काही व्यक्तिंच्याच इतिहासावर आधारित कादंबऱ्या, लेख वाचणे.
मनोरुगणांचे विषय आणि उगाचच उहापोह वाचणे.

तुमची निरीक्षणं पटली.

तुमची विचारप्रक्रिया आवडली. सविस्तर उलगडून दाखविली आहे.
बरेचसे मुद्दे पटले. विशेषतः २, ३, ५.
६ मला पटतो. पण तो सगळ्यांनाच पटेल वा त्यानुसार वाचता येईल असे नाही. आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहून वाचणे सोपे जाते, किंवा लेखनाशी झगडण्याची उर्जा, वेळ सर्वांकडेच असेल असे नाही.

सगळेच मुद्दे आवडले, विचार करण्यासारखे वाटले. निरीक्षणं पटली.

लेखकाचा अनुभव आणि व्यक्त करण्याची पद्धत पारदर्शक असलेली भावते, पोचते. वाचक आणि लेखकामधे आडपडदा राहात नाही. असे लेखन मनात उतरते.

नॉस्टॅल्जिया वरील चित्रपट व पुस्तकं मलाही रिक्त वाटतात. कल्पकतेतून सुटका आणि पटापट विकायची सोय आहे. बऱ्याचदा काहीही सापडतं नाही. भूतकाळात जास्त रमणं वय झाल्याचं लक्षण आहे, त्यात ताजं आणि नवीन काहीही सापडत नाही. बहुतेक वेळा असे लेखन आशयघन नसते, पाल्हाळीक असते.

उपदेशकथन आणि सेल्फ हेल्प अशा प्रकारचे लेखनही कंटाळवाणे आणि ट्रेंडी वाटते. ट्रेंडी म्हणजे ते अगदी त्याच काळात नवीन असतानाच वाचण्यासाठी लिहिल्यासारखे असते. ते लगेच जुनाट होते. पण मी टाकाऊ म्हणणार नाही. मला आवडत नाही इतकेच, कुणाला तरी उपयोग होतही असेल.

७ मुद्दा अगदी पटला. एकसुरी वाचनात "ग्रोथ" नाही. कुठल्याही प्रकारासाठी मनाने ओपन राहायला हवं.

मी जे वाचू वाटते ते वाचतो. थोडी पाने वाचून पाहतो, जर पुढे वाचू वाटले तर चालू ठेवतो.
बरीच प्रसिद्ध पुस्तके मीही वाचू शकलो नाही.
बऱ्याचदा एखादे पुस्तक विशिष्ट मूड मध्ये आवडत नाही. पण नंतर काही दिवसांनी पुन्हा प्रयत्न केल्यावर चांगले वाटते.
लिखाण सोपे आहे कि किल्ष्ट आहे हे माझ्यासाठी महत्वाचे असते. सोपे शब्द, छोटी वाक्ये, छोटे परिच्छेद, आटोपशीर वर्णन, ओघवती भाषा या गोष्टी मला आवडतात.
जड आणि फिलॉसॉफिकल पुस्तके मला वाचवत नाहीत. मी फिक्शन आणि सायन्स वाचतो. फिक्शनमध्ये थ्रिलर्स, व हलके फुलके. विज्ञानामध्ये उत्क्रांती आणि मानसशास्त्र हे आवडीचे विषय आहेत.

सर्वांचे आभार.
टवणे सर , कम्फर्ट झोनचा मुद्दा महत्वाचा आहे. पण त्याच्या बाहेर यायला जमायला हवं. अर्थात त्याविना काही अडत नाही हे खरेच.

अस्मिता, प्रतिसाद आवडला.
"वाचक आणि लेखकामधे आडपडदा राहात नाही. असे लेखन मनात उतरते." एका जुन्या लेखक मित्राने सांगितलं होतं कि माणसाचे कपडे म्हणजे त्याची जनामनात असलेली प्रतिमा. तिचा तो गुलाम असतो. लेखक व्हायचं तर अक्षरशः नागडे होऊन लिहावं लागतं. जे आपले मनोव्यापार दडवून ठेवू पाहतात त्यांचं लिखाण भिडत नाही. हे थोडक्यात आलंय या प्रतिसादात.

माबो वाचक, तुमच्या प्रतिसादात अनेक मुद्दे आहेत. विचार करण्यासारखे आहेत.
बऱ्याचदा एखादे पुस्तक विशिष्ट मूड मध्ये आवडत नाही. पण नंतर काही दिवसांनी पुन्हा प्रयत्न केल्यावर चांगले वाटते. >> बरोबर आहे. नोंद घेतली या मुद्द्याची.

जड आणि फिलॉसॉफिकल पुस्तके मला वाचवत नाहीत. मी फिक्शन आणि सायन्स वाचतो. फिक्शनमध्ये थ्रिलर्स, व हलके फुलके. विज्ञानामध्ये उत्क्रांती आणि मानसशास्त्र हे आवडीचे विषय आहेत. >> साहीत्य हे बहुतेक करून फिक्शनच असतं. बाकीच्या ज्ञानशाखा आहेत. ज्ञानशाखेत कंटाळवाणं लिखाण वाचावंच लागतं. ज्याला ओढ आहे तो सर्व दोष पत्करून वाचतो. तिथे साहित्याचे निकष लागू होतील असे वाटत नाही.

मानसशास्त्र किंवा फिलॉसॉफी मधे हल्ली जुन्या संकल्पना नवीन कपडे घालून आलेल्या आहेत. जसे फ्री विलचा धागा. अडीच हजार वर्षांपूर्वी हा वाद निरस्त झाला आहे. महावीर आणि बुद्धाने फ्री विल नसणे ही संकल्पना किती घातक आहे हे सांगितले आहे. मात्र ती भारतीय जीवनातून कधीच नाहीशी झाली नाही. आजीवक म्हणून कल्ट होता आणि एका सम्राटाने या कल्टसाठी मंदीरही बांधले. इतकेच नाही ज्याला या तत्वज्ञानाचा गंधही नाही त्याच्याही मनात कधी न कधी हा विचार येतोच. ज्या लेखकाने दर्शनाचा उत्तम अभ्यास केला आहे त्याच्या लेखनात धार जाणवते.

अगदी कवींच्या कवितेतही ती जाणवते. श्रावणात घननिळा या कवितेच्या शेवटच्या ओळीत तत्वज्ञान आणि काव्य याचा सुरेख मेळ झाला आहे. ही कवीची प्रतिभा.

वाचन 'का' करता- यावरही अवलंबुन आहे ना. टण्या म्हणतो तसं 'लेखनाशी झगडण्याची ऊर्जा' हे फार महतवाचं आहे. हा 'वाचन का करता' याच्या फारच पुढचा प्रवास आहे. महाराष्ट्रातल्या हजारो शहरांमध्ये लायब्र्या असतात, आणि दर आठवड्याला पुस्तक न चुकता बदलुन घेणारा क्लास या सार्‍या शहरांत आहे. त्यांना विचारायला हवं, बोलायला हवं, कारण त्यांतले फारसे कुणी नाहीत / नसतात इथं.

खरं तर दर आठवड्याला मटका लाऊन, किंवा इतर कोण काय वाचतं ते बघून, किंवा इतरांनी नुकत्याच परत केलेल्या पुस्तकांची लिस्ट न्याहाळुन (सध्या काय चालुये?!), मित्राने सांगितलं म्हणून, य वर्षांपासून प्रसिद्ध आहे म्हणून पुस्तकं निवडणारे लोकच महत्वाचे आहेत. लायब्र्या इतर कुणाहीपेक्षा त्यांच्यासाठीच जास्त आहेत. माझी तक्रार असण्याचं काहीच कारण नाही. कारण त्यांच्यामुळे कुठच्या तरी लेव्हलला वाचनसंस्कृती चालु आहे, माझ्यासाठी वाचनालयं उघडी आहेत, आणि त्यामुळेच मला चॉईसही आहे. हे त्यांच्यामुळेच. हॅपी.

तुम्ही म्हणताय तो 'निकष' हा विषय असेल तर बहुत लंबी यात्रा है, बहस है, बहुत त्रास हय.

जे आवडते व शक्य आहे ते वाचायचे व जे आवडत नाही ते वाचायचे नाही हा एवढाच निकष लावला कि सगळे सोपे जाते. मला श्रीखंड आवडते याचे काय स्पष्टीकरण मी देणार? बस्स आवडते! ती माझी अनुभूती आहे. मला आनंद देणारी आहे.
आता माझी अभिरुची उथळ आहे, निकृष्ठ आहे, सवंग आहे, तर असू देत. टेढा है पर मेरा है।
बाकी लेख मात्र आवडलाच!

काहीतरी लिहायला घेतलेलं मघाशी इथं, पण मग पर्सनल सेक्रेटरीने (द वन, शुड नॉट बी नेम्ड) हे नीट लिहून दिलं. जास्त सेक्रेटरी असणार्‍यांनी दुर्लक्ष करा.
--
The phenomenon "epistemic curiosity" or "deprivation sensitivity".

While general curiosity can be a fleeting interest in something new, these terms describe a deeper, more specific drive:

Epistemic Curiosity: This is the desire for knowledge that motivates you to learn new ideas and bridge "information gaps". It is specifically aroused by complex ideas or conceptual ambiguities that make you want to read and explore until you understand the underlying mechanisms.

Deprivation Sensitivity: This is a specific dimension of curiosity where the "not knowing" feels like an itch or a state of tension. It describes the discomfort or mild anxiety triggered by a gap in your knowledge, which creates a powerful urge to acquire information to find relief.

Information Gap Theory: Proposed by psychologist George Loewenstein, this theory suggests that curiosity arises when we become aware of a gap between what we know and what we want to know. This awareness creates a "mental itch" that we can only scratch by obtaining the missing information.

In a more informal sense, someone with this constant drive to understand complex or unfamiliar things is often called intellectually voracious or an inquisitive mind.