#भारत का दिल देखो : वांग्याच्या खुलाची भाजी

Submitted by मनिम्याऊ on 21 March, 2026 - 04:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वांग्याच्या खुला / खुल्ला हा उन्हाळी वाळवणाचा प्रकार आहे. आता बारा महिने सगळ्या भाज्या मिळतात पण पूर्वी असे नसे. त्यामुळे भाज्यांच्या मोसमात हिरव्या भाज्या वाळवून साठवणीत भरून ठेवत . त्यांना खुला म्हणत असत आणि मग जेव्हा उन्हाळ्यात भाज्यांची कमतरता होत असे त्यावेळी या खुलांची भाजी करून खात असत. वांगी, भेंडी , गवारशेंग, टोमॅटो, अश्या अनेक भाज्यांच्या खुला करून ठेवता येतात, तर मेथी, कोथिंबीर, चाकवत इत्यादी पालेभाज्यांच्या वाळवणाला कुसरी / कोरवा म्हणत.

खुला बनवण्यासाठी काही वांगी झाडावर राहू दिली जातात. वांगी पूर्ण पिकून पिवळी झाली कि त्याच्या फोडी करून कडकडीत उन्हात वाळवून ठेवतात. आणि नंतर भाजीसाठी वापरतात.

लागणारे जिन्नस:
वांग्याच्या खुला : मूठभर
टोमॅटोच्या खुला : मूठभर (ताजे टोमॅटो असल्यास एक बारीक चिरून)
कोथिंबीरीची कुसरी / ताजी कोथिंबीर
कांदा : बारीक चिरलेला
वाळवलेल्या लाल मिरच्या : २
आलं लसूण पेस्ट
जिरेपूड, धणेपूड, गरम मसाला : प्रत्येकी एक लहान चमचा.
मीठ : चवीनुसार
फोडणीपुरते तेल, हिंग, मोहरी

क्रमवार पाककृती: 

वांग्याच्या खुला आणि टोमॅटोच्या खुला वेगवेगळ्या भांड्यात पाण्यानं पूर्ण बुडतील अशा घेऊन उकडायला ठेवायच्या. कुकर मध्ये जरा कमी पाण्यावर पण वाफवता येतात.
उकडून पूर्ण मऊ झाल्या कि पाणी काढून टाकायचे. (हे पाणी नंतर वापरायचे नाही )
कढईत तेल गरम करून हिंग मोहरीची फोडणी घालायची. त्यात लाल मिरच्यांचे तुकडे आणि आलं लसणाची पेस्ट घालून मग चिरलेला बारीक कांदा घालायचा.
कांदा परतला किती उकडलेल्या टोमॅटोच्या खुला / चिरलेला बारीक टोमॅटो घालायचा. यात जिरेपूड, धणेपूड, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचे . हा मसाला चांगला परतून घेतला कि तेल सुटायला लागते.
आता उकडलेल्या वांग्याच्या खुला घालायच्या. नीट परतायचे आणि थोडेसे पाणी घालून झाकण ठेवून वाफ काढायची.

वरून कुसरीची कोथिंबीर / ताजी चिरलेली कोथिंबीर घातली कि भाजी तयार
Picture2.jpg
या जेवायला!
Picture1_1.jpg

वाढणी/प्रमाण: 
२-३
अधिक टिपा: 

१. अधिक टीपा काही नाहीत. नेहमीप्रमाणेच मध्य भारतीय पाककृती. भंडारा - गोंदिया भागातल्या पद्धतीने.
२. त्या भागात लहान वांग्यांना भटई वांगी म्हणतात. त्यामुळे रेसीपीचे नाव भटईच्या खुला असायला हवे Proud
३. माझी वैयक्तिक आठवण म्हणजे ही भाजी लहानपणी बऱ्याचदा खायला मिळायची. पौनी - भिवापूर भागात आमचे नातेवाईक राहायचे त्यांच्या कडून दरवर्षी तऱ्हेतऱ्हेच्या खुलांचा वानवळा यायचा. साधारण ३-४ वेळा भाजी होईल इतका. पौनीचे माधवराव पाटील माझ्या बाबांचे मित्र होते. त्यांच्या शेतातल्या ताज्या मालाबरोबर अनेक गंमत जंमतीचा खाऊ / रानमेवा यायचा. माधवराव, मारुती (चितमपल्ली) काका आणि माझे बाबा मग अश्या लुप्त होत चाललेल्या खाद्यपदार्थांबद्दल (चवीने) चर्चा करायचे.
यावर्षी त्यांची आठवण काढत बाबांनी स्वतः खुला बनवल्या आणि मी माहेरी आल्यावर शेतावरून घेऊन आले. "मनू , खुलांची भाजी कर गं . बऱ्याच दिवसांत खाल्ली नाही" . म्हणून हे documentation .

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! किती मस्त लिहिलं आहेस. वांगी सुकवून वापरतात हे माहीत नव्हतं. कुसर शब्द माहित आहे पण खुला हा शब्द पहिल्यांदाच ऐकला. माझी आई उन्हाळ्यात लाल भोपळ्याच्या साली, गवार असं काय काय कापून सुकवायची आणि नंतर तळून खायचो. त्याला आम्ही कुसरी म्हणत असू.

माधवराव पाटिल हे नाव वाचताच मारुती चितमपल्लींची आठवण झाली आणि मग त्यांचा उल्लेख आलाच. सध्या मी 'शब्द निरंतर' नावाचं युट्युब चॅनेल आहे त्यावर मारुती चितमपल्लींच्या कथा ऐकते. कथाकथन करणार्‍या गार्गीताई फार सुरेख वाचन करतात आणि चितमपल्लींच्या कथा तर निव्वळ आनंदाचा ठेवा आहेत.

धन्यवाद मामी. मारुती चितमपल्ली यांच्या बऱ्याच आठवणी आहेत माझ्या. बरचसं बालपण आणि Teenage त्यांच्या सहवासात गेलं आहे.

खूप छान डॉक्युमेंट्शन करते आहेस.
खूप लिही..
^^माधवराव पाटिल हे नाव वाचताच मारुती चितमपल्लींची आठवण झाली आणि मग त्यांचा उल्लेख आलाच^^
अगदी अगदी..

मारुती चितमपल्ली यांच्या बऱ्याच आठवणी आहेत माझ्या. बरचसं बालपण आणि Teenage त्यांच्या सहवासात गेलं आहे. >>> या आठवणीदेखिल लिही ना.

हटके रेसिपी. 👍

खुला, कुसरी = नवीन माहिती.

वांग्यांना काही भागात भटई/ भटे म्हणतात हे माहिती होते.

छान माहितीसह रेसिपी. फोटोही मस्त.

खूप वर्षांपूर्वी नवऱ्याच्या साऊथ इंडियन मित्राने अशा मिक्स वाळवलेल्या भाज्या दिलेल्या. वांगी, गवार अजून काय आठवत नाही पण फोडणीत भाज्या घालून पाण्याचा हबका मारून, झाकण ठेवून परतून केलेली, टेस्टी झालेली.

छान रेसिपी आणि माहिती.चविष्ट लागत असणार ही भाजी.
भाज्या वाळवून करतात त्या भाज्यांबद्दल ऐकलंय.खुला कुसरी/कोरवा ही नावं पहिल्यांदाच ऐकली.

मारुती चितमपल्ली यांच्या बऱ्याच आठवणी आहेत माझ्या.या आठवणीदेखिल लिही ना .>>+१.

भाज्या सुकवून वापरायच्या. याबद्दल अजिबात माहिती नव्हतं.
केव्हढी महत्वाची माहिती आहे. फ्रीज ची गरजच नाही. धन्यवाद या माहितीसाठी.

रेसिपीच्या बाबतीत ढ असल्याने उगीचच काही चुकीचे लिहीण्यापेक्षा गप्प बसतो.

तर मेथी, कोथिंबीर, चाकवत इत्यादी पालेभाज्यांच्या वाळवणाला कुसरी / कोरवा म्हणत

हल्ली सर्रास वापरली जाणारी 'कसुरी मेथी ' म्हणजे या कुसरी मेथीचाच अपभ्रंश असेल का?

एकदम वेगळा प्रकार! खुला , कुसरी हे शब्दही माहित नव्हते. इथे आम्ही टोमॅटो, पुदिना, बेसील, शेपू, पर्सली वाळवून ठेवतो. देशातले शेजारी गवार वाळवून ठेवायचे पण वांगी वाळवून ठेवतात माहित नव्हते.
तुमच्या लेखनामुळे खूप वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळ्या पद्धती माहीत होतात.

छान लेख आणि लेखमाला आहे.

आज मारुती चितमपल्ली आणि माधवराव यांच्या उल्लेखामुळे मुद्दाम प्रतिक्रिया द्यावीशी वाटली.
या योग्यांचा तुम्हाला सहवास लाभला हे भाग्यच आहे.
त्यांच्याशी नुसत्या बोलण्यातून देखील किती माहिती मिळत असेल.
त्यांच्या आठवणीची एक लेख मालिका नक्की लिहून काढा.
त्यांचे विचार आणि लिखाण हे कोणत्याही जंगल वाचकासाठी महत्वाचा वारसा आहे.

मस्त रेसिपी.
आज मारुती चितमपल्ली आणि माधवराव यांचा तुम्हाला सहवास लाभला हे भाग्यच आहे.
त्यांच्याशी नुसत्या बोलण्यातून देखील किती माहिती मिळत असेल. सावली शी सहमत.
कुसरी ह्या शब्दाच कसुरी ह्या शब्दाशी साधर्म्य वाटलं. वाळवलेली मेथी, कोथिंबीर ...'कसुरी' मेथीला कसुरी ती मुळची पाकिस्तानमधील 'कसूर' भागातील आहे म्हणून म्हणतात असे ही वाचले असले तरी.

मस्तच प्रकार आहे. ही मालिकाच आवडते. भटईच्या खुला हे नाव वर कंसात देऊ शकतेस मनू ! Happy
सर्वांना मम. आठवणी लिहून काढ. एका राजस्थानी मैत्रिणीने उन्हात वाळवलेल्या वेगळ्याच शेंगा - केरसांगरीची भाजी खाऊ घातली होती. भारतातून घेऊन आली होती. ती आठवली. फारच आवडली होती. ती आठवली.

नवीन माहिती मिळाली. मला खुला फक्त कैरीच्या वाळवलेल्या फोडींना म्हणतात हे माहित होते.
गवारीच्या वाळवलेल्या शेंगा तळून, तिखटमीठ घालून खिचडीबरोबर खायच्या. मस्त लागतात.

सगळ्यांना धन्यवाद. मारुती चितमपल्ली यांच्या आठवणी लिहून काढेल पण त्या काही खूप फॅन्सी नाहीत. एक लहान मुलगी आणि तिचे काका यांची गोष्ट होईल ती. मी मुळात शांत स्वभावाची होते. त्यामुळे त्यांच्या बरोबर पुस्तकांच्या विश्वात रमायचे आणि त्यांना माझ्या वाचनाचे फार फार कौतुक होते. बरेचदा संध्याकाळी मला सोबत घेऊन बाहेर फिरायला जायचे. चल ग मनू, जरा फिरून येऊ. जास्त लांबवर नाही. शहरातच. जवळच कुठेतरी. पार्क मध्ये किंवा अंबाझरी तलावावर.

हळूहळू मोठे होताना काका-काकूंबरोबर attachment वाढत गेली. छायाताई पण मस्त होती.
जमलं तर लिहून काढतेच.
पण डायरी style होईल ते लिखाण.