पुणे तळजाई तत्काल गटग

Submitted by भरत. on 9 March, 2026 - 11:57

sajira1.jpgsajira2.jpg

Watch this space for तळजाई तत्काल गटग वृत्तान्त

गटगला आलेल्या मायबोलीकरांसाठी सूचना

मराठी टीव्ही मालिकांचं एकमेव ध्येय एपिसोड्सची संख्या वाढवणं . बघणारे सुज्ञ प्रेक्षक असल्याने, पुढे काय होणार हे माहीत असूनही ,काहीतरी वेगळं होईल ; कधीतरी संपेल या आशेने बघतात . तोच फंडा आपल्याला वृत्तान्त लिहिताना वापरायचा आहे. प्रतिसादांची मालिका लावायची. प्रत्येक प्रतिसादाचा शेवट उत्कंठावर्धक करायचा.
टीव्ही मालिकांपेक्षा मायबोली आणि त्यातही गटग हे अधिक अ‍ॅडिक्टिव्ह आहे , याची पुन्हा एकवार जाणीव करून द्यायची आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा!
लिहा लिहा!

गेल्या वेळच्या चर्चेनुसार, हुसेनची चित्रे कोणाला मिळाली? त्यांची (म्हणजे हुसेनची नाही, ज्यांना मिळाली त्यांची) पूर्वपरवानगी साजिर्‍याने घेतली होती का असा उगाचच प्रश्न पडला. Proud
आहे का पुरेसा उत्कंठावर्धक शेवट? Proud

त्यांनी जी आणलीत तीच चित्रे पटकन घेऊन टाकायची
फर्माईश करण्याइतके लाड नसतात होत
(महा गटग ला मला चिमणीचं design दिसलेलं, ते दिलं त्यांनी, मनाने चांगले आहेत )

अय किल्ले ते 'बर्ड अँड फिशेस' असावं जामिनी रॉयचं.
अमित, ते पुर्वपर्वानगी वगैरे हे तुझं खुनशी नाटक आहे असं मयेकरांनी सांगून टाकलं. सस्पेंस ओपन झाला आता काय. Proud
धनवन्ती, अजयला साक्षात राजा रवि वर्माची राधा दिलेली. मी ठरवेन कुणाला काय द्यायचं ते. Proud

अरे बापरे आता रिपोर्ट लिहावा लागणार. क्या स्टाईल है मयेकर, धागा काढणेकी

गटग ते झाले तात्काळ
नाही पाहिली काळवेळ
आम्हा आता वाटे हळहळ
तुम्हास काय त्याचे ll

ठिकाण ठरवले तळजाई
कोणास ही कळवले नाही
प्रकार सगळा हा आतताई
आम्हास काही कळेना ll

आता वर म्हणे लिहा वृतांत
आम्हाला आता वाटते खंत
अरेरे अरेरे हाय हन्त हन्त
अजिबात नाही लिहिणार ll

Light 1

टोले शोध तू.
इतक्या प्रेमाने मायबोलीकर भेटले. गळ्यामिठ्या झाल्या. अंदरकी बाता झाल्या. गॉसिप झाले. आणखी भेटण्याचे वादे झाले. आणि तू टोले शोध हा Proud

ऋतुराज, धमाल. ही काही CIA agent ची मिटींग होती का तत्काळ आणि गुप्त पद्धतीने उरकून नंतर सांगितले. मी आले नसते का Proud लबाड गटग आहे!

दिव्याची गरज नाही, बरेच जण माबोवर ख्रिसमस ट्री सारखी माळ घालूनच येतात आपापली. Happy

भारीच ऋतुराज!

तू होतास की नव्हतास तेच कळेना आता!

पोस्ट टाकुनी देतला दिवा
टेकडी लंघुनी घेतला मेवा
परी आता दिव्याचे कारण
सांगा की! का टोलवा?

भरत ही तुम्हाला चमत्कारिक म्हणतेय.

प्र, मी ह्यांना सज्जनपणे विचारलेलं, की तुम्हाला कोणाला भेटायला आवडेल, त्यांना उचलून आणतो. तर म्हणे असा उचलून आणलेले प्रचारसभेतले लोक नको मला. मग मी काय करू?

तरी एक-दोन आणले उचलुन. ते नशिबाने त्यांचे आवडते निघाले.

फा Lol हे गाणं अनेक अंगांनी आयुष्यभराची आठव्ण होऊन बसलंय हे खरं.

रविवारी संध्याकाळी अचानक साजिर्‍याचा फोन आला. म्हणाला मायबोलीकर 'भरत' ला भेटायला आवडेल का? हा प्रश्न मेंदूत उतरायला पाचेक सेकंद लागली. साजिर्‍याने तेवढ्यात २-३ निरनिराळ्या तर्‍हेनी तोच प्रश्न विचारल्यावर मी म्हटलं "अर्थातच आवडेल की. कधी? कुठे?" यावर मात्र त्याचं उत्तर "अभी... यहीं... चलो..." ऐकून माझं खरंच "हाय राम!" झालं!
एकतर मनुष्यांना प्रत्यक्ष भेटण्या-बोलण्याच्या बाबतीत माझे जिन्स फारसे प्रगत झालेले नाहीत. तरिही कुठून उत्साह आला कोण जाणे! मी चक्क १० मिनिटांत निघालेसुद्धा! मायबोलीच्या अगदी फारच कमी गटगंना मी हजेरी लावली आहे आजवर. काहींना तर अगदी ठरवूनही ऐनवेळी जायचे रद्द केलेय. पण यावेळी अजिबात काहीही न ठरवता घडलेले रविवारचे छोटेखानी गटग मस्त होते! साजिरा, सिम्बा आणि भरत या तिघांनाही भेटून छान वाटले. मायबोलीच्या जुन्या आठवणी, सद्ध्याच्या चर्चा, लिखाण... अजून खूप गप्पा कराव्या वाटत होत्या. पुढच्या वेळेस ठरवून भरपूर वेळ काढून भेटू.

थॅंक्यू साजिरा ही भेट घडवून आणल्याबद्दल! आणि थॅंक्यू सिम्बा आणि भरत माझी रविवार संध्याकाळ अनपेक्षितपणे स्पेशल केल्याबद्दल!

प्र, मी ह्यांना सज्जनपणे विचारलेलं, की तुम्हाला कोणाला भेटायला आवडेल, त्यांना उचलून आणतो. तर म्हणे असा उचलून आणलेले प्रचारसभेतले लोक नको मला. मग मी काय करू?>>> एका वाक्यातून किती किती बाण सुटू शकतात याचं उदाहरण म्हणून हे हेडरमधे घालायला सांग आधी. Lol
एका वाक्यासाठी अगदी ज्ञानपीठ नाही तरी मायबोलीभूषण/ मायबोलीवाचस्पती असं काहीतरी देऊ आपण यासाठी या ठिकाणी Proud

परवा गट गमध्ये हसून हसून माझे गाल दुखायला लागले. इथले प्रतिसाद वाचून हसताना पोट दुखायला लागायच्या आधी माझा वृत्तान्त लिहितो. प्रतिसादांची दखलही नंतर घेतो (हे धमकीच्या सुरात आहे)

तर फ्लॅशबॅक. १२-२४ वर्षे मागे. मायबोली गणेशोत्सवाच्या कोणत्यातरी स्पर्धेत विजेत्यांना बक्षीस म्हणून पुस्तकं ठेवली होती आणि ती साजिर्‍याकडून घ्यायची होती. मला पारितोषिक मिळालं हे असं अप्रत्यक्षपणे सांगून घेतोय.
तर पारितोषिक वितरण समारंभ ठेवून गटग करायची आयडिया काही तेव्हा कोणाला सुचली नसावी. आणि २-३-४ माबो वय असलेल्या मला अशा गटगला जायची हिंमतही झाली नसती. तोवर मयुरेशशी (माबो आयडी ट्यागो) फोन नंबरची देवाणघेवाण होण्यापर्यंत ओळख झाली होती. तो सतत फिरत असेच. तो पुण्याला जातोय असं कळल्यावर साजिर्‍याकडून माझी पुस्तकं घेशील का असं त्याला विचारलं. तो साजिर्‍याकडे गेल्यावर साजिराने मला फोन करून ओटीपीची तेव्हाची जी काय प्रोसेस असेल ती केली. मयुरेशला पुस्तकं दिलं. बहुतेक समकालीन प्रकाशनची सोशल इश्युजवरची पुस्तकं होती. मयुरेश आणि माझ्यात पुस्तकांचं आदानप्रदान झालं तरी ती पुस्तकं अजून मला मिळालेली नाहीत आणि आता ती मयुरेशकडूनही फिरायला गेली.
तर तोच मयुरेश सध्या पुण्यात - नीट सांगायचं झालं तर हिंजवडीत आहे आणि त्याच्या आग्रहावरून आणि तिथे यायची व्यवस्था करूनच मला बोलवलं.. खरं तर मुंबईतून उचलून नेलं. पुण्यातल्या मायबोलीकरांना भेटणं ही याची corollay. त्यात साजिरा आणि सिंबा यांची नावं आपसूक आली.
तर असं हे साजिरा , मी आणि मयुरेश कनेक्शन. तरी अजून साजिर्‍याचं मयुरेशला भेटणं राहिलंच आहे.

रशिया अमेरिकेचे गुप्तहेर देखील इतक्या सिक्रेटली भेटत नसतील Happy

प्रतिसादातून अंधुक कल्पना आली फक्त
तळजाई खाली राहणारे नेहमीचे माबोकर देखील नव्हते की.
भरत भेटायला आवडेल
पुढच्या वेळी।येईन मी

भरतभेटीचं चित्र द्यायला हवं होतं साजीरा.

ऋतुराज Lol

यात विशेष गटगमध्ये मुग्धमानसी होत्या हे सुद्धा विशेष.

मुम्बईत असुन आणि आमच्या मधे केवळ दोन स्टेशन्स असूनही भरतभेटीचा योग अजुन आलेला नाहीये. त्यामुळे जाई. गोरेगावकरणीला पडलेला प्रश्न मलाही पडलेला आहे ह्याची नोंद घेण्यात यावी.

हाय राम ! >> Lol
अहो राम नाही, भरत, भरत!! Proud

खूप मंडळी जमू शकली असती हे खरंच आहे. पण हे घडलंच मुळात तास दोन तास आधी ठरवून. तेही जमतंय की नाही अशी स्थिती.

तेव्हा ते रशिया अनेरिका गुप्तहेर खारिज करा बरं

बरं
खारीज खारीज
सोबत चहा हवा का ?

भरत - मयुरेश पुस्तकांचे आदान प्रदान होऊनही पुस्तके मिळाली नाहीत यात आता पहिली पुस्तके ही दुसरी पुस्तके नाहीत, आदानप्रदानचा अर्थ हल्ली काही बदलेला आहे का काय कोण जाणे.
मयुरेशने साजिर्‍याकडून पुस्तके घेतली तरी अजुन साजिरा मयुरेश भेट व्हायचीच आहे. यातही आता पहिला मयुरेश आणि दुसरा मयुरेश भिन्नषड्ज काही वेगळेच आहेत. का पूर्वीचा मयुरेश राहिला नाही, तो बदलला आहे हे सांगण्याचा भरतचा हा अंदाज आहे या सगळ्याचा मी अंदाज ही बांधू शकत नाही.
आता अंदाज बिल्डिंग सारखा बांधतात का गॅस लावतात तसा अंदाज लावतात?

आता माझा पेशन्स संपतोय. तेव्हा पुढचा वृत्तान्त लिहून ठेवलाय तो एकदम पेस्ट करतो.

"एकतर मनुष्यांना प्रत्यक्ष भेटण्या-बोलण्याच्या बाबतीत माझे जिन्स फारसे प्रगत झालेले नाहीत." - मुग्धमानसीचं हे वाक्य मी चोरू शकेन. त्यापुढच्या वाक्यांतला आशय गेल्या वर्षीच्या ( दहा महिने झाले सुद्धा) अमितव गटगला अनुभवला होता. त्यामुळे पुण्याला आल्यावर इथल्या काही मायबोलीकरांना भेटावंसं वाटलं. पण असा उत्साह अनेक बाबतींत वाटतो. खायचं काहीतरी छान करूया म्हणून आलेला उत्साह त्यासाठी लागणारे जिन्नस मागवण्यापुरता टिकतो. ते आले की फ्रीजमध्ये नाहीतर त्यांच्या ठरलेल्या डब्याबाटल्यांत घालून दृष्टीआड केलं की उत्साह सुद्धा त्यातच बंद होतो. तसं होऊ नये म्हणून गुरुवारी पुण्यात आल्यावर त्याच्या दुसर्‍याच दिवशी साजिरा आणि सिम्बा दोघांनाही मेसेज करून टाकले. पण सिम्बाला वीकेंडला वेळ नव्हता म्हणून सोमवारी सकाळची वेळ ठरली. साजिर्‍यानेही लगेच हो म्हटलंच. पण अंदाज घ्यायला शुक्रवार, शनिवार घेतला. रविवार सकाळ सरता सरता त्याच्या अंगात गटग आयोजकाने प्रवेश केला.
रविवारी संध्याकाळी आता पुणेवासी झालेल्या एका ex colleague ला भेटायचा माझा प्लान नक्की होता. - स्थळ शनिवारपेठ. त्यांचं घर. मयुरेशने सांगितलं की साजिराही तिथून जवळच असेल. तर "मी तिथून तुमच्या जवळच्या / सोयीच्या भागात येऊ शकेन " असं त्याला = साजिर्‍याला कळवलं. आता गटग आयोजक शक्तीने त्याचा पूर्ण ताबा घेतला होता. आणखी काही लोकांना गोळा करून एकत्र भेटूया असा त्याचा विचार होता.
याचा अर्थ तुम्ही साजिरा मला एकट्याने भेटायला घाबरत होता असाही लावू शकाल. नाहीतरी मायबोलीकरांनी माझ्याबोवती आदरयुक्त भीतीचा ऑरा तयार केलाच आहे.
मग साजिर्‍याने वर लिहिलेला प्रश्न मला विचारला. चिनूक्सच्या फेसबुक पोस्टवरून तो आदल्या दिवशी दिल्लीत आहे हे दिसलं होतं. तसा तो ब्रेकफास्ट इन पुणे, लंच इन देल्ही आणि डिनर इन गौहाटी करू शकतो. तरीपण त्याचं नाव सांगण्यात धोका कमी होता. तर ते नाव सांगितलं. वर मला चिनूक्सला भेटायला आवडेल , पण त्याला मला भेटायला आवडेल की नाही हे माहीत नाही ; असं लिहिलं. तर साजिर्‍याने त्या मेसेजचा स्क्रीनशॉट काढून चिनूक्सलाच पाठवला. त्याच्या उत्तराचाही मला पाठवला. तेव्हा मंडळी , पुढील घोषणेची वाट पाहा. ती गटगच्या आधी होईल की आतासारखी नंतर याचे आडाखे बांधा .
सिम्बा सोमवारी सकाळी मला भेटणार आहे, हे साजिर्‍याला माहीत होतंच.

किल्लीताईंनी मायबोलीवर गटगची साथ पसरवायची तयारी २०१९ पासून केली होती. त्यासाठी लॅबमध्ये एक्स्परिमेंट सुरू केले होते म्हणाना.. तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल? त्यात चारपाच लोकांनी माझं नाव घेतलं होतं. मुळात मीच मला लेखक समजत नाही. त्यामुळे हे नवलच होतं. त्यातल्या ज्या मायबोलीकराची खरी ओळख माहीत आहे किंवा नंतर माहीत झाली अशी मुग्धमानसी एकच होती. त्यामुळे तिचे नाव लक्षात राहिले होते.

गटग आयोजनाला वेळ थोडका होता, हे खरंच. पण साजिर्‍याने तेवढ्यातही बशी भरून माणसं आणली असती. पण पुणेकर गटगच्या उत्सवमूर्तीची "मी कोण आहे? हे लोक कोण आहेत? मी इथे काय करतोय ?" अशी अवस्था करतात हे अमित गटगच्या फोटोत पाहिल्याने मला तसं गटग नको होतं. शिवाय शाळेचे नाही , तरी शिकवणीचे वर्ग हाकायचा अनुभव अंगात भिनलाय. मुलांच्या माझ्यापेक्षा आपापसातल्या गप्पा वाढल्या की प्रतिक्षिप्त क्रियेसारखं टेबलावर डस्टरचं तालवाद्य सुरू होई. पुणेरी मायबोलीकरांचं जंबो गटग झालं तर , २२ मार्च २०२० ला अख्ख्या भारतात जे झालं ते मी एक दोघा संयोजकांच्या साथीने गटगच्या जागी करेन , असं चित्र मला दिसू लागले. एवढ्या संख्येने पुणेरी मायबोलीकर मला भेटायला येतील असा माझा गैरसमज मुळीच नव्हता. पीनेवालों को पीने का बहाना चाहिए, तसं पुणेरी मायबोलीकर माझं निमित्त करतील हे माहीत होतं.

Pages