आज बऱ्याच वर्षांनी कोकणात आले. गाव खूप बदललं आहे, सगळे रस्ते रुंद झालेत, चाळींचे कॉम्प्लेक्स झालेत, दुकानेही चकाचक झालीत. रस्त्याकडेला गाडी थांबली आणि माझे पाय आपसुकच ते दुकान शोधायला निघाले - राणे किराणा भांडार, असेल का अजून? काकी कश्या असतील? आणि बाकी सगळे?
चालता चालता गावातला पहिला दिवस आठवला. बदली झाल्यामुळे नव्या गावात राहायला नुकतेच आलो होतो. मे महिन्याची सुट्टी सुरू होती. आमचा गावातला पहिलाच दिवस होता. आईची स्वैपाकघर लावायची गडबड चालू होती. बाबांनी चहाचे फर्मान सोडले आणि आईला साखरेचा डबा सापडेना.
‘संपदा, जरा बाबांकडून पैसे घेऊन शेजारच्या दुकानातून अर्धा किलो साखर आण ग. वैभवलाही घेऊन जा बरोबर हवेतर‘
‘हो आई.'
‘आणि तुला रंग पेटी पण घे, हवी होती ना तुला सुट्टीत चित्र काढायला.‘
दोन मिनिटातच मी आणि धाकटा भाऊ दोघेही पोचलो पण दुकानात. अजूनही आठवतंय माझे डोकं जेमतेम दुकानाच्या फळीच्या वरती येत होते. भावाचे हातपण पोचत नव्हते काउंटरवर.
‘कुणी आहे का दुकानात’. मी आवाज दिला.
‘जयेश, जरा बघ रे बाहेर कोण आहे’. कुणी बाईंनी आतून सांगितले.
‘हा बघतो आई. '
माझ्यापेक्षा ५/६ वर्षाने मोठा एक मुलगा बाहेर आला. ‘बोला... ', त्याला ही नवी जोडगोळी बघून उत्सुकता वाटली असावी.
‘काय हवयं ग चिऊताई..’
‘ए, मी काही चिऊताई नाहीय.. माझे नाव संपदा आणि हा वैभव..’
‘अच्छा, आज आपल्याकडे धन-संपदा आलेत ग आई, साखर घ्यायला!’
त्या दिवसापासून आम्ही दोघे त्याच्यासाठी धन-संपदा झालो आणि तो आमचा जयदा.
‘…आणि कसलं चित्र काढणार आहेस ग तू? मला आणून दाखव मग एक रावळगाव देईन! ‘ त्या दिवशी मला माझ्या चित्रकलेचा पहिला चाहता भेटला. त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची मैत्री रावळगाव टॅाफी ते गोष्टीची पुस्तके व्हाया राणेकाकींचा चिवडा या टप्प्यावर पोचली.
सुट्टीचे दिवस असेच भरभर उडून गेले. सकाळी उठल्यावर राण्यांच्या दुकानातली हजेरी माझी नेहमीचीच झाली. एखादा दिवस मी चुकले
तर जयदाचा आवाज यायचा, ‘संपदा, तुझे पुस्तक झालं का वाचून? मी नवीन चित्र बघायला आलोय!’ किंवा काकी बोलवायच्या, ‘आज कशी आली नाहीस गो चिवडा खायला?’
शाळा सुरू झाली आणि माझी जयदाशी दुकानापलीकडे पण ओळख झाली.
मोठा जयेश आणि २-३ वर्षांनी लहान दुर्गेश. आई बरोबर राहायचे इटुकल्या चिरेबंदी दुकानाच्या मागे. बाबा मुंबईला असावेत. कधी गावी यायचे नाही. त्या कोणाला कधी त्यांची आठवणही काढताना ऐकलं नाही. आई दुकान चालवायची आणि जयदा तिला मदत करायचा. तो टॉपर.. आदर्श विद्यार्थी..व्हॉलीबॉल खेळायचा…भजनीमंडळाबरोबर गायला जायचा.. वगैरे वगैरे.. सगळ्यांच्या खूप अपेक्षा होत्या त्याच्याकडून. दुर्गेश खूप खोडकर भावाच्या अगदी विरुद्ध. काकींना खूप काळजी होती धाकट्याची. दिवसेंदिवस आमची मैत्री घट्ट होत गेली. आई म्हणायची, ‘राणे वहिनी दत्तक घेऊन टाका हिला तुम्ही, नाही तरी तुम्हाला मुलगी नाही.‘
पुस्तकविश्वाचीही ओळख ही करून दिली जयदाने मला. लायब्ररीतून त्याने आणलेले पुस्तक मी वाचल्याशिवाय परत जात नसे. एकदा तर माझ्या हातातले पुस्तक बघून मी काय वाचू नये याचा निर्णय त्याने आणि माझ्या बाबांनी परस्पर घेऊन टाकला, आणि मला तसा दमही भरला.
चित्रकलेबरोबर माझा लिखाणाचा समीक्षक ही झाला होता तो. ‘असा का शेवट केलायस या गोष्टीचा? नाही जमलाय हा निबंध, असं कधी होत का? लिहि परत.‘ त्याच्या या थेट बोलण्यामुळे कधी कधी खूप राग यायचा. पण झपाटून परत नव्याने लिहायची सवय लागली. आता कळतयं त्याचे असं निसंकोचपणे - ‘तू लिहि, मी वाचतो’ असं म्हणणं किती महत्त्वाचे होत, माझ्यासाठी.
बघताबघता वर्षे सरली, सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे जयदा बारावीला जिल्ह्यात पहिला आला. इंजिनिअरिंग की मेडिकल चर्चा सुरू असताना जयदाने बॉम्ब टाकला, मी नाही जाणार मेडिकलला, मी बीए करणार. नेहमी सगळ्यांचं ऐकणारा जयदा या वेळेला आपल्या मतावर ठाम होता. सगळ्यांनी सांगून झाले. राणे काकींनीही लेकाच्या हट्टापुढे हात टेकले. शाळेतली आणि घरातील चर्चा ऐकून मी संध्याकाळी दुकानात गेले. काकी म्हणाल्या, 'आता तूच विचार त्याला, इतकी चांगली संधी का सोडतोस.'
मी काही बोलायच्या आतच तो मला म्हणाला, ‘आता तूही सांग मला काय करू ते.. मला पत्रकार व्हायचे आहे, डॉक्टर नाही... जमलं तर पुढे मागे संपादक पण होईन.. तुझ्या गोष्टी छापायच्या आहेत मला की तू पण लिहायचे सोडून डॉक्टर होणार? संपदा, I want to do what I want, not what everyone else wants.’ त्याचे इंग्लिश माझ्या डोक्यावरून गेले. पण ते वाक्य बोलतानाचा त्याचा चेहरा माझ्या लक्षात राहिला, नेहमीसाठी! लवकरच त्याचे कॉलेज सुरू झाले आणि तो मुंबईला गेला. माझ्या दुकानाच्या चकरा आपोआप कमी झाल्या. काकी म्हणायच्या, ‘येत नाहीस गो संपदा पूर्वीसारखी.’ मग दुर्गेश चिडवायचा , ‘जयेशदादा नाहीयना, मग कशाला येईल ती!’. महिन्या-दोन महिन्यातून कधीतरी तो घरी यायचा. आता तो आला की मी दुकानात जायचे अगदीच बंद करून टाकले. कुठेतरी एक अवघडलेपण आला होता वागण्यात. जयदा नाही पण मीच बदलत होते बहुतेक. पुढच्या सुट्टीत आमची परत बदली झाली. शेवटच्या दिवशी मी सगळ्यांचा निरोप घ्यायला गेले. माझ्यावर नजर रोखत, रडणाया काकींना सावरत जयदा म्हणाला, ‘आई चिऊ आहे ना ती, चालली उडून.. ‘. घश्यात दाटलेल्या आंवढ्यामुळे मी त्याच्याकडे मान वर करून बघू पण शकले नाही, परत येईन असं सांगणं तर शक्यच नव्हतं. वयाच्या त्या वळणावर काहीच बोलता आलं नाही मला.
कोकण सुटलं आणि माझी चित्रकला पण सुटली, लिखाणही कमी झालं. लिहिलं तर वाचणार कोण? हळूहळू आठवणी धूसर होत गेल्या.
बारावी झाली आणि पुण्याला प्रवेश घेतला. एक दिवस बस पकडायला पळत असताना मागून हाक आली ‘संपदा!’
त्या हाकेने काळच थांबला माझ्यासाठी. श्वास रोखून मी मागे वळले तो तोच होता! डोळ्यात तीच चमक आणि ओठावर तेच खट्याळ हसू.
‘जयदा!’
तो हसला, ‘बापरे! किती वर्षांनी ऐकतोय हे जयदा. मग काय करते आमची चिऊ आता?’
‘आधी तू सांग, तू काय करतोस, झालास का संपादक?’
‘प्रयत्न सुरूच आहेत. मटाच्या कोकण आवृत्तीची तयारी करतोय सध्या. मी एक weekend feature सुरू करतोय -‘गावच्या गोष्टी’. तू कधी पाठवतेस? वाट बघतोय.’
‘माझ्या गोष्टी… मी तर लिहिणं सोडून दिलयं!’
‘मग सुरू कर परत, मी अजूनही तयार आहे वाचायला.’
त्या दिवशी गप्पांत वेळ कुठे गेला समजलंच नाही. निरोप घेताना मी म्हणाले, ‘परत कुठे? कधी? अरे, ही बस तर मी नेहमी... '
माझे वाक्य अर्ध्यात थांबवत तो म्हणाला, ‘.. नकोच सांगू. असेच कधीमधी कुठेतरी भेटू ग आपण. पण तू खूप उड, देश-परदेश बघ. मग कधी वाटलंच तर ये फिरून माघारी..मी आहेच.’
आणि बघता बघता तो दृष्टीआड झाला.
वर्षे मागे पडली, हट्टाने मीही मेडिकल सोडून इकानॅामिक्स घेतलं होतं, नंतर स्कॉलरशिप मिळाली, जिनिव्हाला गेले. तिथे नोकरी ही सुरू केली. कुठे तरी मनाच्या कप्प्यातून अधूनमधून जयदा डोकावायचा. कसा असेल, काय करत असेल तो. कधी मी आठवत असेन का त्याला? शेवटी आज इतक्या वर्षांनी भारतात परतलेय, गावी आलेय. किती तरी वर्षांपासून मी आजच्या दिवसाची तयारी करत होते मनात.
समोरच्या बिल्डिंगवरची पाटी वाचून पाय थबकले. ‘राणे सुपर मार्ट’. शेजारच्या टुमदार बंगल्याचा कंपाऊंडवर एक बोर्ड होता - ‘ श्री. दुर्गेश राणे, पत्रकार’. गेट उघडून आत शिरले, अंगणात झोपाळ्यावर राणेकाकी एकट्याच बसल्या होत्या. निस्तेज नजर, पिकलेले केस, अगदीच थकल्या होत्या. मला बघतच जवळ ठेवलेला चष्मा घालत घालत त्यांनी हाक मारली,
‘दुर्गेश-अंकिता, अरे कोण आलेय बघा.’
ते दोघेही बाहेर आले. चिवडा खाताना दुर्गेशची पत्नी अंकिता माझ्याशी जुनी ओळख असल्यासारखी बोलत होती. शेवटी मी न राहवून, इतका वेळ थोपवून ठेवलेला प्रश्न विचारला - ‘जयदा - त्याची फॅमिली कुठे असतात?’ माझ्याकडे बघत काकी म्हणाल्या, ‘चल, ये आत.’ काकी मला त्यांच्या खोलीत घेऊन आल्या. भिंतीवरच्या फोटोमधून जयदा हसून बघत होता.. श्वास अधांतरीच अडकला.. अख्खं जग भोवती फिरायला लागलं.. अश्रुंच्या पडद्यामागून कुठून तरी लांबून काकींचे हुंदके ऐकू आले, ‘खूप उशीर केलस गो चिऊ तू…खूप उशीर...’
© यशदा, २०२५, मुंबई
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
अगदी सहज, ओघवती शैली.
छान मांडणी अशी कथेची, आवडली
छान मांडणी अशी कथेची, आवडली कथा!
आवडली!
आवडली!
माझ्या चेहर्यावरचे
माझ्या चेहर्यावरचे प्रश्नचिन्ह वाचून त्यांनी हात केला. भिंतीवरच्या हार घातलेल्या फोटोमधून जयदा हसून मलाच बघत होता>>>>
काकू रॉक्स संपदा शॉक्स. काकू जामच फिल्मी स्टाईल निघाल्या. काकूंनी बरेच बॉलिवूड सिनिमे पाहिलेले दिसतात. दुःखाच्या गोष्टी कधी कोण असं ट्विस्ट देत फिल्मी स्टाईलमध्ये सांगतं काय ते पण शेवटी फुल्ल यायला उशीर केलास डायलॉग वैगरे मारून. कै च्या काय

छान!
छान!
खूप छान लिहिलंय
खूप छान लिहिलंय