बिप, दि क्लाउन : मार्सेल मार्सो

Submitted by विशाल कुलकर्णी on 21 February, 2026 - 14:13

मौनातून बोलणारा एक असामान्य कलावंत !

काही माणसं रंगमंचावर उभी राहून टाळ्या मिळवतात. काही माणसं मात्र आयुष्याच्या रंगमंचावर उभी राहून इतिहासाला दिशा देतात. मार्सेल मार्सो हा दुसऱ्या प्रकारातील होता. त्याच्या चेहऱ्यावरचा पांढरा रंग, लाल फूल खोचलेली डोक्यावरची जुनाट टोपी असा जगभर बिप क्लाउन म्हणून ओळखला जाणारा मार्सेल. चालता चालता अदृश्य भिंतीला धडकून पडणारा, हवेतल्या अदृश्य पायऱ्यांवर चढणारा, कदाचित त्या अदृश्य नियतीशी अबोल, मौन झुंज देणारा बिप हा विदूषक सगळ्या जगाला माहीत आहे. पण त्या पांढऱ्या रंगाखाली एक जखमी मुलगा, एक धैर्यवान तरुण, एक संवेदनशील कलाकार आणि अतिशय दयाळू मनुष्य दडलेला होता. हे फार कमी जणांना माहिती असते.

बालपणातील स्वप्नं आणि अचानक आलेला अंधार

१९२३ साली फ्रान्समधील स्ट्रासबर्ग येथे त्याचा जन्म झाला. त्याचे मूळ नाव मार्सेल मॅंगल. वडील चार्ल्स मॅंगल हे साधे कसाई होते. आई अ‍ॅन ही मूळची युक्रेनियन. युद्ध सुरू झाल्यानंतर चार्ल्स आणि अ‍ॅन यांनी फ्रान्समध्ये आश्रय घेतला. अ‍ॅनने त्याच्या मनात कलेची बीजं पेरली. लहानपणी चार्ली चॅप्लिनचे निःशब्द, मूक चित्रपट पाहून हरखून जाणारा मार्सेल, चार्लीच्या त्या मुकपटामुळे हळूहळू त्याच्यातला माइम आर्टिस्ट घडत होता. शब्दांशिवाय डोळ्यांतून आणि देहबोलीतून कथा सांगता येते, हे त्याने अगदी लहान वयात पाहिलेले आणि ते त्याच्या मनात पक्के घर करून बसलेले होते.

पण १९४० साली नाझी सैन्याने फ्रान्सवर आक्रमण केले आणि त्याच्या आयुष्यातील निरागसता संपली. ज्यू कुटुंब असल्यामुळे त्यांना पळ काढावा लागला. त्यांनी लिमोज येथे आश्रय घेतला. त्या काळात त्याने आपले आडनाव बदलून मार्सो केले. हे नाव पुढे जगभर प्रसिद्ध झाले, पण सुरुवातीला ते फक्त जिवंत राहण्यासाठी घेतलेले कवच होते. पण हो, त्याने घेतलेले मार्सो हे आडनाव फक्त लपण्यासाठी नव्हते. त्यामागे एक अर्थ होता.

मार्सेल मॅंगलने जेव्हा आपली ओळख बदलली, तेव्हा त्याने मार्सो हे नाव फ्रेंच राज्यक्रांतीतील जनरल फ्राँस्वा सेव्हेरिन मार्सो देग्राव्हिये यांच्या स्मरणार्थ निवडले. फ्रेंच राज्यक्रांती स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांसाठी लढली गेली. त्या क्रांतीतील एक तरुण आणि धाडसी सेनापती म्हणजे मार्सो देग्राव्हिये.

युद्धाच्या काळात आपली ओळख जपताना त्याने अशा व्यक्तीचे नाव धारण केले ज्याने स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता. हे केवळ सुरक्षिततेचे आवरण नव्हते. ती एक भूमिका होती. ज्यू तरुण म्हणून नाझींच्या छायेत जगताना त्याने एका क्रांतिकारी सेनापतीचे नाव स्वीकारले. जणू स्वतःलाच आठवण करून देण्यासाठी की लढा द्यायचा आहे. या नावात प्रतिकाराची भावना होती. स्वाभिमान होता. फ्रान्सच्या इतिहासाशी नाळ जोडण्याची एक जाणीव होती.

पुढे हेच नाव जगभर गाजले. पण त्याच्या मुळाशी एक लपलेली कहाणी होती. भीतीतून जन्मलेले नाव पुढे धैर्याचे प्रतीक बनले.

१९४४ साली गेस्टापोने त्याच्या वडिलांना अटक केली आणि त्यांना ऑश्वित्झ छळछावणीत पाठवले. तिथे त्यांचा मृत्यू झाला. आई मात्र वाचली. वडिलांच्या अनुपस्थितीची वेदना, न बोललेले निरोप, अपूर्ण राहिलेली वाक्यं, हे सगळं त्याच्या मनात कायमचं घर करून राहिलं. कदाचित म्हणूनच त्याच्या कलेत एक गूढ हळवेपण दिसत राहिले.

फ्रेंच रेझिस्टन्समधील धाडस

युद्धकाळात तो आणि त्याचा भाऊ अ‍ॅलन फ्रेंच रेझिस्टन्समध्ये सहभागी झाले. इथे त्याची कला शस्त्र ठरली. तो ज्यू मुलांसाठी खोटी ओळखपत्रे तयार करत असे. पण मार्सेलने बंडखोरीसाठी प्रतिकाराचे वेगळे स्वरूप वापरले. जर्मन सैनिकांवर हल्ले करून त्यांना मारण्यापेक्षा जास्तीत जास्त ज्युइश बालकांना जर्मन नाझींच्या अखत्यारीत असलेल्या फ्रान्सच्या सीमेतून सुटका करून स्वित्झर्लंडच्या तटस्थ भूमीवर पोहचवण्याचे, त्यांचे प्राण वाचवण्याचे महत्कार्य करताना आपल्या प्रतिकाराला त्याने एक वेगळेच, अतिशय उच्च असे स्वरूप प्राप्त करून दिले.

Screenshot_2026-02-21-23-58-38-83_96b26121e545231a3c569311a54cda96.jpg

अनेक वेळा तो मुलांच्या गटांना फ्रान्समधून, आल्प्समार्गे स्वित्झर्लंडच्या सीमेपर्यंत सुरक्षितपणे घेऊन गेला. त्या प्रवासात प्रत्येक क्षण धोक्याचा असे. जंगलातून, डोंगरातून, थंडीत आणि भीतीत चालताना मुलांना शांत ठेवणे गरजेचे होते. तो त्यांना माइम करून दाखवत असे. कधी पक्षी उडताना, कधी अदृश्य चेंडू पकडताना. मुलं हसत. त्या हसण्यात त्यांना थोडी सुरक्षितता सापडत असे. शेकडो ज्यू मुलांचे प्राण त्याने अशा प्रकारे वाचवले.

विशेष म्हणजे त्याने कधी या कामाचा गाजावाजा केला नाही. त्याच्यात दिखावा नव्हता. तो अंतर्मुख होता, पण कमकुवत नव्हता. त्याच्यात करुणा होती, पण भीतीवर मात करणारे धैर्यही होते.

जनरल पॅटन यांच्या हाताखालील सेवा

फ्रान्सची मुक्तता झाल्यानंतर त्याने फ्री फ्रेंच आर्मीमध्ये प्रवेश केला. त्याला इंग्रजी चांगले येत असल्यामुळे तो अमेरिकन सैन्याशी दुवा अधिकारी म्हणून काम करू लागला. जनरल जॉर्ज पॅटन यांच्या सैन्याबरोबर तो भाषांतर आणि संवाद साधण्याचे (अनुवादक) काम करत असे.

हा अनुभव त्याच्यासाठी वेगळा होता. युद्ध संपत आले होते, पण जखमा ताज्याच होत्या. तो दोन भाषांमध्ये, दोन सैन्यांमध्ये पूल बांधत होता. एकीकडे त्याने मौनातून मुलांचे प्राण वाचवले होते, तर आता तो शब्दांतून संवाद घडवत होता. या दोन्ही भूमिका त्याच्या व्यक्तिमत्त्वातील संतुलीत वृत्तीचे प्रतीक होत्या.

बिपचा जन्म आणि कलेचे आयुष्य

ऑगस्ट १९४४. पॅरिसची मुक्तता नुकतीच झाली होती. शहर अजूनही जखमी होते. रस्त्यांवर धूळ, भिंतींवर गोळ्यांचे ठसे, आणि लोकांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि थकवा एकत्र दिसत होता. अशा वेळी मार्सेल मार्सोने सुमारे तीन हजार सैनिकांसमोर आपला पहिला मोठा कार्यक्रम सादर केला.

Screenshot_2026-02-21-23-59-51-72_96b26121e545231a3c569311a54cda96.jpg
(हे या प्रसंगाचे रजिस्टन्स या चित्रपटातील कलाकाराचे चित्र आहे. मूळ फोटो न मिळाल्यामुळे मी हे चित्र वापरलेले आहे)

हे केवळ एक सादरीकरण नव्हते. तो क्षण प्रतीकात्मक होता. युद्धाच्या गोंधळानंतर शांततेची एक झुळूक. शब्दांनी भरलेल्या घोषणांनंतर निःशब्द अभिनय. त्या सैनिकांनी मृत्यू, भीती आणि हानी जवळून पाहिली होती. आणि त्यांच्या समोर एक तरुण उभा राहिला जो काही न बोलता त्यांना माणुसकीची आठवण करून देत होता. त्या संध्याकाळी त्याने केवळ कला सादर केली नाही, तर जिवंत राहण्याचा अर्थ साजरा केला.

१९४५ मध्ये युद्ध संपले. जग पुन्हा उभे राहत होते. मार्सोने ठरवले की आता आपली कला गंभीरपणे घडवायची. त्याने पॅरिसमधील सारा बर्नहार्ट थिएटरमध्ये चार्ल्स ड्युलिन यांच्या नाट्यशाळेत प्रवेश घेतला. तिथे त्याने शिस्त, देहबोली आणि रंगमंचावरील उपस्थिती यांचे शिक्षण घेतले.

त्याच्या गुरूंमध्ये जोशुआ स्मिथ, एतिएन डेकू आणि जाँ लुई बारो यांसारखी मोठी नावे होती. एतिएन डेकू यांनी देहाच्या हालचालीतून भावना व्यक्त करण्याची सूक्ष्म कला शिकवली. जाँ लुई बारो यांनी रंगमंचावरची संवेदनशीलता आणि अंतर्मुखता वाढवली. या शिक्षणाने त्याच्या कलेला दिशा मिळाली.

युद्धाने त्याला वेदना दिल्या होत्या. या शिक्षणाने त्याला त्या वेदनांना आकार देण्याची भाषा दिली. शब्द नव्हते, पण अभिव्यक्ती होती. शरीर, चेहरा आणि शांतता हेच त्याचे शब्द बनले.

Screenshot_2026-02-21-23-58-17-48_96b26121e545231a3c569311a54cda96.jpg

याच काळात त्याच्या आतला कलाकार पूर्णत्वाकडे जाऊ लागला. एक तरुण ज्याने युद्धात जीव वाचवले होते, तो आता रंगमंचावर मानवी अनुभव जिवंत करू लागला. त्याच्या कलेत संघर्ष होता, पण कटुता नव्हती. वेदना होती, पण आशाही होती.

पॅरिसच्या मुक्ततेनंतर तीन हजार सैनिकांसमोर उभा राहिलेला तो तरुण पुढे जगभरातील लाखो प्रेक्षकांसमोर उभा राहणार होता. पण त्या पहिल्या मोठ्या प्रयोगातच त्याने आपली ओळख निश्चित केली होती. शांततेतून बोलणारा कलाकार. आणि त्या शांततेत एक संपूर्ण शतक दडलेले होते.

१९४७ साली बिप या व्यक्तिरेखेचा जन्म झाला. बिप हा फक्त विदूषक नव्हता. तो सामान्य माणसाचे प्रतीक होता. अदृश्य भिंतीवर धडकणारा बिप म्हणजे परिस्थितीशी झुंज देणारा माणूस. वाऱ्याच्या विरुद्ध चालणारा बिप म्हणजे अडचणींवर मात करणारी जिद्द. पिंजऱ्यात अडकलेला बिप म्हणजे समाजाच्या बंधनात अडकलेली माणसं.

Screenshot_2026-02-21-23-57-50-90_96b26121e545231a3c569311a54cda96.jpg

मार्सो रंगमंचावर अत्यंत शिस्तबद्ध असे. प्रत्येक हालचालीमागे सराव, संयम आणि विचार असे. तो प्रेक्षकांना हसवत असे, पण त्या हसण्यात जीवनाचा अर्थ दडलेला असे. त्याची कला केवळ करमणूक नव्हती. ती अनुभव होती.

त्याने जगभर दौरे केले. अमेरिकेत, युरोपात, आशियात त्याने हजारो प्रयोग केले. पॅरिसमध्ये त्याने माइमचे विद्यालय सुरू केले. पुढील पिढीला ही कला देणे हे त्याला तितकेच महत्त्वाचे वाटत होते जितके स्वतः सादर करणे.

चित्रपट आणि त्याच्या जीवनावर आधारित कथा

मेल ब्रुक्स यांच्या सायलेंट मूव्हीमध्ये त्याने छोटेखानी भूमिका केली. गंमत म्हणजे त्या चित्रपटात उच्चारलेला एकमेव शब्द त्याच्याकडून आला आणि तो होता "नो".

जणू त्याने जगाला आठवण करून दिली की तो बोलू शकतो, प्रतिकार त्याच्या रक्तात आहे. पण हिंसात्मक प्रतिकारापेक्षा त्याने मौन निषेधाची, शांततेची निवड केली आहे.

२०२० साली त्याच्या जीवनावर आधारित रेसिस्टन्स हा चित्रपट प्रदर्शित झाला. जेसी आयझेनबर्गने तरुण मार्सेलची भूमिका साकारली. एड हॅरिसने नाझी अधिकारी क्लाउस बार्बीची भूमिका केली. क्लेमाँस पोएसी रेझिस्टन्समधील सहकारी म्हणून दिसते.

Screenshot_2026-02-21-23-59-36-67_96b26121e545231a3c569311a54cda96.jpg

या चित्रपटात युद्धकाळातील त्याच्या कार्यावर भर देण्यात आला आहे. ज्यू अनाथ मुलांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचा संघर्ष, भीती, पाठलाग आणि अंतर्गत ताण याचे चित्रण आहे. काही प्रसंग नाट्यमय केलेले असले तरी त्याच्या धैर्याचा आत्मा जपण्याचा प्रयत्न चित्रपटात दिसतो.

सन्मान आणि आयुष्याचा उत्तरार्ध

मार्सेल मार्सोच्या कलेचा सन्मान केवळ रंगमंचावरच्या टाळ्यांत झाला नाही, तर जगभरातील संस्थांनी आणि सरकारांनीही त्याच्या कार्याची दखल घेतली. पण हे सारे गौरव त्याच्यासाठी केवळ पदके नव्हती. ती त्याच्या आयुष्याच्या प्रवासाची साक्ष होती.

फ्रान्स सरकारने त्याला Ordre des Arts et des Lettres या प्रतिष्ठित सन्मानाचा कमांडर म्हणून गौरवले. कला आणि साहित्य क्षेत्रातील मोठ्या योगदानासाठी दिला जाणारा हा सन्मान अत्यंत मानाचा मानला जातो. त्याचप्रमाणे त्याला लिजन द ऑनरचा (Légion d'honneur) अधिकारी म्हणूनही मान्यता मिळाली. फ्रान्समधील हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. १९७८ साली पॅरिस शहराने त्याला
Médaille Vermeil de la Ville de Paris हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला.

पॅरिस शहराने त्याला आर्थिक मदतही दिली, ज्यामुळे त्याने आपली इंटरनॅशनल स्कूल पुन्हा सुरू केली. या शाळेत तीन वर्षांचा अभ्यासक्रम होता. त्याच्यासाठी ही शाळा फक्त संस्था नव्हती. ती त्याच्या कलेचा वारसा पुढे नेण्याचे माध्यम होती. विद्यार्थ्यांना तो केवळ तंत्र शिकवत नसे, तर शरीर, श्वास आणि शांततेतून भावना कशा व्यक्त करायच्या हे शिकवत असे.
नोव्हेंबर १९९८ मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जाक शिराक यांनी त्याला Ordre national du Mérite चा ग्रँड ऑफिसर हा किताब दिला. हा सन्मान त्याच्या राष्ट्रीय योगदानाची औपचारिक कबुली होती.

१९७७ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर, त्यांची पत्नी रोझलिन कार्टर आणि मुलगी एमी कार्टर यांच्यासोबत त्याची भेट झाली. अमेरिकेतही त्याच्या कलेचा आणि व्यक्तिमत्त्वाचा सन्मान झाला. त्याला फक्त कलाकार नव्हे, तर मानवी मूल्यांचा प्रतिनिधी म्हणून गौरवले गेले.

तो बर्लिन अकादमी ऑफ फाइन आर्ट्स, म्युनिक अकादमी ऑफ फाइन आर्ट्स आणि फ्रान्सच्या इन्स्टिट्यू द फ्रान्समधील अकादेमी दे बो आर्ट्सचा निवडलेला सदस्य होता. ही सदस्यता म्हणजे त्याच्या कलेला मिळालेली बौद्धिक मान्यता होती.

ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी, लिनफिल्ड कॉलेज, प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन यांनी त्याला मानद डॉक्टरेट प्रदान केल्या. एप्रिल २००१ मध्ये मिशिगन विद्यापीठाने त्याला वॉलेनबर्ग मेडल दिले. दुसऱ्या महायुद्धात ज्यू लोकांना आणि निर्वासितांना मदत केल्याबद्दल त्याच्या मानवतावादी कार्याची ही मोठी दखल होती. हा सन्मान केवळ कलाकाराला नव्हे, तर त्याच्यातल्या संवेदनशील आणि धैर्यवान मनुष्याला दिला गेला होता.

१९९९ साली न्यूयॉर्क शहराने १८ मार्च हा दिवस मार्सेल मार्सो डे म्हणून घोषित केला. एका कलाकारासाठी एखाद्या महानगराने दिवस जाहीर करणे ही मोठी गोष्ट आहे. पण त्याच्या कलेने लोकांच्या मनात इतकी जागा निर्माण केली होती की हा सन्मान स्वाभाविक वाटतो.

एप्रिल २००२ मध्ये माद्रिद येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सेकंड वर्ल्ड असेंब्ली ऑन एजिंगसाठी त्याने गुडविल अम्बेसेडर म्हणून जबाबदारी स्वीकारली. वृद्धत्व, मानवी सन्मान आणि जागतिक सहानुभूती या विषयांवर तो बोलत असे. शांततेतून अभिनय करणारा कलाकार इथे मानवतेचा दूत बनला होता.

इतके सन्मान मिळूनही त्याच्यात अहंकार नव्हता. तो मितभाषी, नम्र आणि कामात गुंतलेला राहिला. त्याला माहीत होते की पदके चमकतात, पण माणसाला जिवंत ठेवते ती संवेदना.

मार्सेल मार्सोच्या आयुष्याचा विचार केला तर दिसते की त्याला मिळालेला प्रत्येक सन्मान दोन गोष्टींसाठी होता. एक म्हणजे त्याची अद्वितीय कला. आणि दुसरे म्हणजे संकटाच्या काळात त्याने दाखवलेले धैर्य आणि करुणा. म्हणूनच तो केवळ महान कलाकार नव्हता. तो एक मोठा माणूस होता.

अनेक विद्यापीठांनी त्याला मानद पदव्या दिल्या. पण त्याच्यासाठी त्याची खरी कमाई, त्याचा खरा पुरस्कार म्हणजे त्याच्या प्रयोगानंतर प्रेक्षकात निर्माण होणारी विलक्षण शांतता होती. जेव्हा प्रेक्षक काही क्षण बोलू शकत नसत, सुन्न पाने मौन होऊन जात, तेव्हा त्याला कळत असे की त्याने त्यांच्या मनाला स्पर्श केला आहे.

माणूस म्हणून मार्सेल

मार्सेल मार्सो अंतर्मुख होता. त्याच्यात नम्रता होती. त्याने कीर्तीचा वापर स्वतःच्या प्रतिमेसाठी केला नाही. युद्धातील अनुभवांनी त्याला कठोर केले नाही, उलट अधिक संवेदनशील केले. त्याच्या कलेतून माणसाच्या वेदना, आशा आणि संघर्ष दिसत राहिले.

तो शांततेवर विश्वास ठेवणारा माणूस होता. पण ती शांतता पळवाट नव्हती. ती ठाम विचारांची मानसिकता होती. त्याने निवडलेली संवादाची वेगळी पद्धत होती.

२००७ साली त्याचे निधन झाले. पण त्याने मागे ठेवलेली परंपरा आजही जिवंत आहे. बिप अजूनही अदृश्य भिंतीवर धडकतो, वाऱ्याविरुद्ध चालतो, आणि आपल्याला आठवण करून देतो की माणूस जरी नाजूक असला तरी त्याची जिद्द अदृश्य नसते.

Screenshot_2026-02-21-23-58-59-80_96b26121e545231a3c569311a54cda96.jpg

मार्सेल मार्सोने आयुष्यभर फारसे न बोलता मौन स्वीकारले.. पण आपल्या मौनात त्याने जगाला खूप काही सांगितले. शांततेतून. मनापासून. आणि कायमस्वरुपी समाजाच्या मनावर ठासून गेलेले असे काही....

माहिती संदर्भ आणि सौजन्य : आंतरजालीय लेख व माहिती

©विशाल कुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परिचय.
मौन ही संभाषणाची उत्तम कला आहे म्हणतात ते पटले.

अगदी नेटके.

एक आवडते वाक्य आहे - “मौन समझोगे तभी मन समझोगे“ …

हा माणूस ते जगलेला दिसतोय.