परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला...

Submitted by विशाल कुलकर्णी on 10 February, 2026 - 23:58

“परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला” हे नाट्यगीत निव्वळ एक गीत म्हणून न उरता, मराठी रंगभूमीच्या इतिहासात एका खोल, अस्वस्थ आणि विचारप्रवर्तक अनुभवाच्या रूपात ठामपणे पाय रोवून उभे आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार वीर वामनराव जोशी यांनी १९२७ साली लिहिलेल्या रणदुंदुभि या नाटकातील हे नाट्यगीत. त्या काळातील समाजमन, पारतंत्र्याची वेदना आणि मानवी विवशतेची जाणीव, असहाय्यतेची भावना अतिशय तीव्रपणे व्यक्त करणारे, मराठी नाट्यसंगीताच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेले हे अजरामर गाणे.

वीर वामनराव जोशींच्या शब्दांना पं. वझेबुवांच्या संगीताने आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या गायकीने जे काही दिव्य रूप दिले, त्यामुळे हे गीत आणि हे नाटक संगीत नाटकांच्या इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी नोंदले गेलेले आहे.

त्यांच्या या कवितेचा गाभा तसा अंतर्मुख आणि गंभीर आहे. “परवशता” हा शब्दच एका अश्या अवस्थेचे चित्र उभे करतो, जी केवळ बाह्य गुलामी नाही, तर आतून गुदमरवणारी असहायता आहे. “पाश” ही प्रतिमा गळ्याभोवती आवळलेल्या फासासारखी आहे. तो फास हळूहळू आवळला जातो. श्वास घेऊ देतो, पण मोकळा श्वास घेऊ देत नाही. “दैव” हा शब्द इथे नशिबापुरता मर्यादित राहत नाही; तो सहज सहजी बदलता न येणाऱ्या व्यवस्थेचे, अन्यायाचे आणि विवशतेचे प्रतीक बनतो. पण तरीही कवितेचा आत्मा शोकात्म नाहीये. कवी आक्रोश करत नाही. तो शांतपणे, पण ठामपणे ही अवस्था समोर ठेवतो. त्यामुळे या शब्दांमध्ये कारुण्य असले तरी शरण जाणे नाहीये, दुर्बलता नाहीये. त्या उलट या शब्दांमध्ये एक गंभीर, बोचरी शांतता आहे.

मागच्या आठवड्यात एका जुन्या मित्राशी फोनवर बोलताना सहजच १९२७ साली आलेल्या रणदुंदुभि या संगीत नाटकाबद्दल थोडी चर्चा झाली. अर्थात सुरुवात मास्टर दीनानाथांच्या गायकीपासूनच झालेली होती. मी स्वतः दीनानाथांच्या गाण्याचा, गायकीचा भक्त आहे. त्यामुळे चर्चेत "परवशता पाश दैवे ...." चा विषय निघणे साहजिकच होते. त्या निमित्ताने अर्थातच वीर वामनराव जोशी यांच्याबद्दलही थोडी चर्चा झाली. लोकमान्य टिळकांचे भक्त असलेले वामनराव जोशी मुळचे अमरावतीचे. मॅट्रिक झाल्यावर काही काळ त्यांनी नोकरीही केली. पण देशभक्ती रक्तात मुरलेली असल्यामुळे नंतर "राष्ट्रमत" ह्या दैनिकात देशभक्त गंगाधरराव देशपांडे ह्यांचे प्रमुख सहकारी म्हणून ते काम करू लागले. लोकमान्य टिळकांच्या जहाल राजकारणाचा ते पुरस्कार करत असल्यामुळे १९०८ मध्ये राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना दीड वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली. १९२० मध्ये टिळकांचे देहावसान झाल्यानंतर ते महात्मा गांधींच्या राजकारणात सहभागी झाले. असहकारितेच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल त्यांना अनुक्रमे दीड व दोन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षा झाल्या (१९२३ आणि १९३०). लोकजागृतीसाठी त्यांनी स्वतंत्र हिंदुस्थान हे साप्ताहिक चालविले होते. त्यांची वाणी आणि लेखणी ओजस्वी होती. ‘वीर वामनराव जोशी’ ह्या नावानेच त्यांना जनता ओळखत असे. त्यांनी काही नाटकेही लिहिली आहेत. त्यांपैकी राक्षसी महत्त्वाकांक्षा ( १९१४) व रणदुंदुभि (१९२७) ही नाटके प्रसिद्ध आहेत. त्यातल्याच रणदुंदुभि या नाटकातील हे अजरामर गीत.

परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला ।
सजिवपणी घडती सारे । मरण-भोग त्याला ॥

या गाण्याला पं. वझेबुवां यांनी संगीत दिलेले आहे. वझेबुवांचे संगीत नेहमीच शब्दप्रधान असते. जणू काही शब्दांच्या सेवेत वाहिलेले असते. वझेबुवांनी हे गाणे पिलू रागात बांधलेले आहे. पिलू हा राग मुळातच भावप्रधान, लवचिक आणि करुण आहे. शुद्ध आणि कोमल स्वरांची सरमिसळ, खमाज अंगाचा स्पर्श आणि लोकसंगीताशी असलेली जवळीक यामुळे मानवी वेदना व्यक्त करण्यासाठी तो अतिशय योग्य ठरतो. मात्र हे नाट्यसंगीत आहे, शास्त्रीय प्रदर्शनासाठी बांधलेले नाही. त्यामुळे राग इथे एक रंग बनून येतो. त्याला कसलीही चौकट नाहीये. तो शब्दांना व्यापून टाकतो, पण शब्दांवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करत नाही.

“परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला”
या ओळीतच संपूर्ण गाण्याचे सार आहे.

परवशता म्हणजे स्वातंत्र्य हरवलेली अवस्था. इथे “परवशता” हा शब्द केवळ असहाय्यता दर्शवत नाही; तो स्वत्व हरवण्याच्या, स्वतःच्या इच्छेवर, विचारांवर आणि कृतींवर दुसऱ्याची छाया पडण्याच्या अवस्थेचे प्रतीक म्हणून आलेला आहे. ज्या समाजाचे राजकीय स्वातंत्र्य हिरावले जाते, तो मृतवत व्हायला लागतो. त्या समाजाची मानसिकता हळूहळू परवशतेकडे झुकते. स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता असूनही ती वापरता येत नाही, हीच परवशतेच्या अवस्थेतली खरी वेदना आहे.

“पाश” म्हणजे बंधन. पण ते साधे बंधन नाही. ते गळफासासारखे आवळलेले, श्वास रोखणारे, सुटण्याचा मार्ग न देणारे बंधन आहे. या प्रतिमेत दडलेला कोंडमारा आणि घुसमट लक्षात घेतली तर गुलामगिरीची अनुभूती अधिक तीव्र होते. बाह्य बंधनापेक्षा अंतर्मनावर विळखा घालून बसलेले बंधन अधिक भयंकर असते. हा “पाश” म्हणजे फक्त सत्तेची पकड नाही, तो स्वाभिमानावर आलेला गळफास आहे.

“दैव” या शब्दाची व्याप्तीही येथे विशेष आहे. इथे दैव हा शब्द केवळ नशिब किंवा योगायोग या अर्थाने येत नाही. तर तो व्यक्ती किंवा समाजावर लादलया गेलेल्या, बदलता न येणाऱ्या, असह्य आणि अन्यायकारक अश्या व्यवस्थेचे रूप घेऊन येतो. ब्रिटिश सत्तेच्या अंमलाखालील भारतीय समाजासाठी तेच “दैव” होते. जणू काही नियतीने ठरवून दिलेली ही परवशता आहे, अशी भावना निर्माण व्हावी इतकी ती व्यवस्था कठोर होती. पण या शब्दांत दडलेला अर्थ असा की हे दैव स्वीकारायचे की त्याविरुद्ध उभे राहायचे, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात जागा होतो.

या शब्दसमूहातून उभे राहणारे चित्र स्पष्ट आहे. गुलामगिरीची वेदना, आत्मसन्मानाचा घात, आणि स्वातंत्र्याची तडफड. गाण्यातील आशय थेट राजकीय नसला तरी त्यातील प्रतीकात्मकता स्पष्ट होती. त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांना ते अप्रिय वाटणे स्वाभाविक होते. कारण शब्दांतून व्यक्त होणारी राष्ट्रप्रेमाची ज्वाला ही उघड बंडाइतकीच प्रभावी ठरू शकते. ब्रिटिश काळात अनेक गाणी आणि नाट्यप्रयोग हे स्वातंत्र्याच्या विचारांचे माध्यम बनले होते. थेट बंदी नसली तरी अशा आशयाचे गीत गायले जाणे धोक्याचे ठरू शकत होते. सार्वजनिकरीत्या राष्ट्रभावना जागवणे म्हणजे सत्तेविरुद्ध असंतोष पेटवणे, असा अर्थ घेतला जाई. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात अशा गाण्यांना एक प्रकारच्या गुप्त प्रतिकाराचे स्वरूप लाभले होते.

मास्टर दीनानाथांनी हा धोका जाणूनबुजून स्वीकारला होता. केवळ सुरेल आवाजाचा स्वामी, स्वराधीश एवढीच त्यांची ओळख नाहीये. त्यांच्या स्वभावातील बंडखोरी त्यांच्या आवाजातून, गायकीतून बाहेर पडली नसती तरच नवल. रंगभूमीवर उभे राहून त्यांनी या शब्दांना दिलेला आवेश आणि ताकद हे केवळ कलात्मक सादरीकरण नव्हते, तर एका जागृत नागरिकाने अन्यायाविरुद्ध घेतलेली एक प्रकारची बंडखोर भूमिका होती. त्या काळात त्यांनी घेतलेली, साकारलेली ही भूमिका धाडसीच म्हणावी लागेल. कारण कलावंत म्हणून ते लोकप्रिय होते, आणि लोकप्रियतेसोबत येणारी जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती.

म्हणूनच हे गीत केवळ संगीत किंवा काव्य म्हणून महत्त्वाचे राहिले नाही. ते काळाचा एका अत्यंत महत्वाचा दस्तऐवज बनून गेले. परवशतेच्या वेदनेतून स्वातंत्र्याची आस निर्माण करणारे, बंधनांच्या पाशातून मुक्त होण्याची प्रेरणा देणारे, आणि अन्यायाला दैव मानून न बसता त्याविरुद्ध उभे राहण्याची जाणीव देणारे असे हे शब्द होते. त्यामुळेच ते ब्रिटिशविरोधी भावनांचे प्रतीक ठरले आणि स्वातंत्र्यलढ्यातील सांस्कृतिक शस्त्र म्हणून स्मरणात राहिले.

कवी म्हणतात की ज्यांच्या गळ्यात परवशतेचा हा फास अडकलेला आहे, त्यांचे जीवन स्वप्नरहित होते. प्रयत्न करूनही वाट सुटत नाही. माणूस जिवंत असतो, पण निर्णयशक्ती, स्वाभिमान आणि आत्मविश्वास गमावलेला असतो. ही वेदना व्यक्तिगत असली तरी तिचा विस्तार समाजापर्यंत जातो. महत्त्वाचे म्हणजे, वर म्हणल्याप्रमाणे हे गीत शोकात्म नाही. यात आक्रोश आहे, पण तो संयमित आहे. हीच संयमित वेदना दीनानाथांच्या गायकीत प्रकर्षाने जाणवत राहते.

तसे तर आजवर हे गीत बऱ्याच जणांनी गायलेले आहे. शास्त्रीय संगीताचे वेड असणाऱ्या आणि गाता येणाऱ्या प्रत्येकांसाठी हे गीत एखाद्या आव्हानासारखे असते. अगदी अभिषेकीबुवा अर्थात पंडित जितेंद्र अभिषेकी यांना देखील हा मोह टाळता आलेला नाहीये. त्यांच्या आवाजातील हे गाणे हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण मूळ गाणे दीनानाथांचे आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी गायलेले या गीताचे संस्करण हे या वर दिलेल्या सगळ्या घटकांचे अत्यंत परिपक्व रूप आहे. दीनानाथांची गायकी मुळातच शब्दप्रधान आहे. त्यांच्या स्वरातून मास्टर दीनानाथ नाही तर गाण्याचा आशय ठळकपणे समोर येत राहतो. ते “परवशता” हा शब्द उच्चारताना, त्याला एक प्रकारचे जडत्व प्राप्त करून देतात. शब्दाला त्यांच्या स्वरांनी दिलेला तो हलकासा दाब आपल्याला त्या अवस्थेची घुसमट समर्थपणे जाणवून देतो. दीनानाथ स्वर उंचावून वेदना व्यक्त करत नाहीत. उलट अनेक ठिकाणी त्यांचे स्वर थोडे खाली झुकतात, जणू काही आवाजही त्या पाशाच्या ओझ्याखाली दबला, दडपला जातो आहे.

दीनानाथांची गायकी जरी मुक्त आणि वादळी असली तरी इथे ती अत्यंत संयमी आहे. पिलूसारखा मोकळा राग असूनही ते अनावश्यक ताना, मुरक्या किंवा आलाप टाळतात. सर्वसामान्यांनाच नव्हे तर शास्त्रीय संगीतातील दिग्गजांना देखील दुर्लभ अशी खोल शास्त्रीय जाण असूनही त्याचा दिखाऊ वापर ते करत नाहीत. रागाची पकड सूक्ष्मपणे जाणवत राहते. मध्यम आणि निषादाच्या हालचाली, खमाजच्या अंगाचा स्पर्श ऐकू येतो, जाणवतो, पण तो कधीही शब्दांवर, शब्दांच्या अर्थावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत नाही. "राग इथे ऐकू येतो, दाखवला जात नाही", ही दीनानाथांच्या गायकीची मोठी ताकद आहे.

“परवशता पाश…” गाताना दीनानाथ शब्दांवर भर देताना दिसून येतात, आधी शब्द आणि मग स्वर. प्रत्येक शब्द स्पष्ट, ठाशीव आणि अर्थासहित पोहोचतो. ‘परवशता’ हा शब्द जड आवाजात, किंचित दाब देऊन उच्चारलेला आहे. त्यामुळे तो केवळ शब्द न राहता एक अवस्था बनून जातो. यात त्यांचे स्वर सरळ, थोडे गंभीर आणि खोल ठेवलेले आहेत हे जाणवून येते. हा संयम गाण्यातील गंभीर आशयाचे, भावनेचे निदर्शक आहे.

दीनानाथांच्या आवाजात एक नैसर्गिक गांभीर्य आहे. त्यामुळे जेव्हा ते पारतंत्र्याची वेदना गातात, तेव्हा त्यांचे गाणे केवळ एका त्रयस्थ गायकाप्रमाणे न येता, ती वेदना जिवंत होऊन येते. नाट्यसंगीताची गरज लक्षात घेऊन दीनानाथांनी गायनात कुठल्याही प्रकारचा अतिरेकी अभिनिवेश टाळलेला आहे. ही सूक्ष्म अभिव्यक्ती त्यांच्या गायकीत सातत्याने दिसते. त्यांचा आवाज प्रत्यक्ष अनुभवातून आलेला आहे. तो आवाज प्रत्यक्ष संघर्ष पाहिलेला, वेदना सोसलेला आणि तरीही संयम राखणारा आहे. त्यामुळे ते हे गीत ऐकताना श्रोतेदेखील केवळ एक निरीक्षक राहत नाहीत, तर त्या विवशतेचे साक्षीदार बनून जातात. दीनानाथांनी आपल्या सुरांच्या साथीने शब्दांत अक्षरश: प्राण ओतले आहेत.

या गीतात संगीत, शब्द आणि गायकी यांच्यात विलक्षण संतुलन आहे. ताल साधा आहे, चाल सरळ आहे, पण त्या सरळपणातच एक अस्वस्थ ताण आहे. शास्त्रीय संगीत इथे उद्दिष्ट नाही; ते माध्यम आहे. त्यामुळेच हे गीत गाणाऱ्याला आजही आव्हान देते. कारण इथे फक्त स्वर अचूक लावणे पुरेसे नाहीये; तर त्या स्वरांत परिस्थितीची विवशता, तो संयम आणि ती आतली आग जपण्याचे, प्रज्वलित करण्याचे आव्हान आहे.

महत्वाचे म्हणजे आपणदेखील हे गाणे ऐकताना निव्वळ एक कलाकृती म्हणून त्याच्याकडे न पाहता; त्याकडे तत्कालीन परिस्थितीचा, समाजाचा गुदमरलेला श्वास समजून त्याचा अनुभव घेतो. आणि म्हणूनच, आज काळ बदललेला असला तरी या गीताची वेदना आजही तितकीच खरी वाटते, तितकीच प्रकर्षाने अस्वस्थ करून जाते.

नाटक: संगीत रणदुंदुभि
गीतकार: वीर वामनराव जोशी
संगीत: वझेबुवा
गायक: पंडित दीनानाथ मंगेशकर

©विशाल कुलकर्णी
*माहिती आणि प्रकाशचित्र सौजन्य: इंटरनेट

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महत्वाचे म्हणजे आपणदेखील हे गाणे ऐकताना निव्वळ एक कलाकृती म्हणून त्याच्याकडे न पाहता; त्याकडे तत्कालीन परिस्थितीचा, समाजाचा गुदमरलेला श्वास समजून त्याचा अनुभव घेतो. >>>अगदी खरं
छान लिहिलंय

किती काय काय माहित आहे तुला..
तुझे शब्द भंडार पण खूप विस्तृत आहे.
रिस्पेक्ट...
खूप छान लिहिले आहेस, परत परत वाचावे असे.

फार अभ्यासपूर्ण विश्लेषण !
गाणे नेहमी ऐकते, पण इतका विचार नव्हता केला.
मला पराधीन आहे जगती.... सारखा अर्थ वाटायचा.

सुंदर रसग्रहण.
किती काय काय माहित आहे> +१

छान लिहिलं आहे. (थोडी काही वाक्यांची पुनरावृत्ती झाली आहे का?)
ह्या गाण्याच्या प्रत्येक चरणातील पहिला अर्धा भाग इतरांना लागू आहे आणि शेवटचा ह्या दिव्य स्वातंत्र्यरवीला लागू आहे असं वाटतं. दिनानाथ मंगेशकरांच्या आवाजातील गंभीर आणि सहज नजाकतीत ते बरोबरच समजतं. त्यांच्या गाण्यात साथीला असलेला तबला ही साधा केरवा (हो ना?) वाजवतो आहे, उगा मुरक्या नाही की लग्गी लावलेली नाही.
पण तेच गाणं जे आशाच्या आवाजात आहे, त्याचं पार भावगीत झालेलं आहे. रॉ, तुटक तुटक गाण्याची जी मजा आहे ती गोड मुरक्या आणि गोळीबंद गाण्यात अगदीच बोथट झालेली आहे. बरोबर साथीच्या तबलजीने सुंदर लग्गी वाजवली आहे, दोघे समेवर एकदम छान येतात, पण ते सगळं इथे अगदीच अस्थानी वाटतं. आशाचं गाणं ऐकायला सुंदर आहे, फक्त शब्दांतील भाव तेवढा पोचत नाही असं काल परत परत ऐकुन माझं मत झालं.
इथे उजव्या बाजूला दिनानाथ मंगेशकर आणि आशा दोघांचं ऐकता येईल.
सौख्य भोग इतरां सारे - कष्ट मात्र याला असं दुप्पट्टीत ऐकुन खाड खाड परवशता वर एकदम बहारदार येते आशा. पण ते तसं कशाला हवं? किंवा का नको ते दिनानाथ मंगेशकरांच्या गाण्यात समजतं.
चुभुद्याघ्या!

सर तुम्ही आता रहस्यकथा लेखन का करत नाहीत ? पूर्वी तुमच्या आणि कौतुक शिरोडकर यांच्या रहस्यकथा मला खूप आवडायच्या.

विशालदादा, मस्त लिहिलंय.
फारच सुंदर रसग्रहण.
तुम्ही विद्यापीठात मराठी विषय खूप छान शिकवाल.
किती काय काय माहित आहे> +११

धन्यवाद, ॠतूराज _/|\_

@अमितव - शक्य आहे. ओघात लिहायचे झाले की असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाहतो पुन्हा एकदा तपासुन. बाकी आशाबाई आणि दीनानाथजींच्या गायकीतल्या फरकाबद्दल २००% सहमत.

प्रथमेश काटे, धन्यवाद. मध्ये बराच काळ लेखनच बंद होते. आता पुन्हा सुरूवात केली आहे. तर ते ही लिहू पून्हा. हाकानाका ? Happy

विशाल दादा मेरेको छोड के सबकु थँक्यू बोला आपने
का बरं?
Proud
खरंच नवीन कथा लिही तुम्ही
चांगले दिवस येतील आम्हा वाचकांना

@अमित, दिनानाथांचे गाणे बहुतेक विनाइल (४५ आरपीएम) तबकडीवर रेकॉर्ड केलेले आहे. तेव्हा गाण्याच्या लांबीला ३ मिनिटाची मर्यादा होती. जुन्या नाट्यसंगीताच्या तबकड्यात तुम्हाला गाणी थोडी वेगात (स्पीड) म्हटलेली ऐकू येतील. प्रत्यक्ष नाटकात ते गाणे तब्येतीत गायले जाई.
त्यामुळे हे गाणे तश्या शैलीत/स्टाइलमध्ये रेकॉर्ड झाले असावे. आशा भोसलेंचे वर्जन थोडे तब्येतीत सावकाश गायलेले वाटते. बहुतेक त्या वेळेपर्यंत रेकॉर्डीची ३ मिनिटाची मर्यादा राहिली नसावी.

@टवणे सर अगदी अगदी, माझ्या मनात हीच शक्यता डोकावली होती. यामागे तांत्रिक कारणच असण्याची शक्यताच जास्त भासते. धन्यवाद.

@किल्ली तू आम्हाला सोडून गायब झालेली आहेस ना सद्ध्या? (कुठून ते तूला माहिती आहेच). वर काही फोन नाही , मेसेज नाही. म्हणून रागावलो आहे असे समज. 19.gif

विशाल, काय लिहू या लेखावर असे झालेय. शब्दच नाहीत. मी हा लेख पुन्हा पुन्हा वाचला. किती सुरेख विश्लेषण केले आहेस. तुझे शब्दभांडार विस्तृत आहेच पण लिहिण्याचा आवाका खूप मोठा आहे.
गीतकार, वीर वामनराव जोशी यांनी लिहिलेले हे गीत ब्रिटीश अधिकाऱ्यांसमोरच गाऊन दाखवण्याचं धाडस मास्टर दिनानाथांनी केलं. दोघेही ग्रेट. या गाण्यावरून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला. पुन्हा बाहेर आल्यावर त्यांनी आपली लेखणी स्वातंत्र्याच्या संग्रामासाठी चालूच ठेवली.
यावरून कवी प्रदीप , 'आज हिमालय की चोटी पर फिर हमने ललकारा है' या गाण्यामुळे भूमिगत झाले होते ते आठवले.
हि नाट्यपदे बाबांना गुणगुणताना ऐकली होती पण खोलात जाऊन याचे शब्द शोधावे किंवा बाबांना विचारावे असे कधीच वाटले नाही. तुझ्या या लेखामुळे गाण्याच्या ओळी शोधून त्यांचा अर्थ समजावून घेतला. वीर वामनराव जोशी यांच्याबद्दल हि वाचले.
मनापासून धन्यवाद.

मध्ये बराच काळ लेखनच बंद होते. आता पुन्हा सुरूवात केली आहे.> यासाठीं सुद्धा धन्यवाद !

सुंदर रसग्रहण.

खरंच नवीन कथा लिहा तुम्ही
चांगले दिवस येतील आम्हा वाचकांना>> +1