मंडपेश्वर शैव लेणी - हेरिटेज वॉक

Submitted by सामी on 10 February, 2026 - 13:37
मंडपेश्वर शैव लेणी

भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत, बोरिवली भागआरंभ हेरिटेज यांनी 'मंडपेश्वर शैव लेणी हेरिटेज वॉक' आयोजित केला आहे हे कळल्यावर, काहीही करून हा वॉक चुकवायचा नाही हे आधीच ठरवून झाले होते. या वॉक ची वेळ सकाळी आठ ते अकरा अशी असल्यामुळे अतिशय उत्साहात सकाळी साडेसहा वाजताच घरातून निघाले. रविवार त्यामुळे मेगाब्लॉक ठरलेला, उशिर होऊ नये म्हणून वेळेत निघाले.

बरोबर आठ वाजता मंडपेश्वर च्या आवारात पोहोचले. पूर्वी दहिसर ला राहत असल्यामुळे लहानपणी खूप वेळा तिथे जाणे झाले होते शक्यतो त्रिपुरी पौर्णिमेला दिव्यांची आरास बघायला. या मंदिरात लहानपणी जायला आवडायचे पण मग नंतर आवारात टायर दुरुस्तीचे काम वैगरे चाले, आवारात जुन्या गाड्या, दारुडे-रिकामटेकडे लोक दिसायचे प्रमाण वाढले तसे इकडे फिरकणारे सामान्य लोक कमी झाले.

आठ फेब्रुवारी ला या आवाराचे बदललेले रूप बघितले आणि खूप आनंद झाला. हे जर आधीच झाले असते तर असेही मनात आले पण म्हणतात ना देर आये दुरुस्त आये. त्यामुळे आपल्या आवडत्या मंडपेश्वर मंदिराचे बदललेले रूप पाहून उत्साह दुणावला. मंडपेश्वर येथील लेण्यांची माहिती, इतिहास अभ्यासक नवीन म्हात्रे यांच्याकडून घेत असताना या बदललेल्या रूपाच्या मागे भारतीय इतिहास संकलन समिती बोरिवली भाग व मंडपेश्वर गुंफा सेवा ट्रस्ट यांचा मोठा सहभाग आहे हे कळले आणि या संस्थांबद्दल चा आदर अजूनच दुणावला. वॉक सुरु करायच्या आधी गरमागरम चविष्ट उपमा आणि चहा सोबत सगळ्यांच्या ओळखी करून घेतल्या.

नवीन म्हात्रे यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत लेण्यांचा इतिहास, मुंबईत आढळणाऱ्या लेण्या यांचा आढावा घेतला आणि आम्ही सगळेच त्यात गुंतून गेलो . मुंबईत कान्हेरी, मंडपेश्वर , मागाठाणे , महाकाली आणि जोगेश्वरी इथे लेण्या आहेत. कान्हेरी आणि महाकाली लेणी या बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध आहेत तर मंडपेश्वरची लेणी शिवलेणी म्हणून प्रसिद्ध आहे.

मंडपेश्वर मंदिरा च्या बाहेर मोठे पटांगण आहे. मंदिराच्या दिशेने चालत गेल्यास समोर दगडात कोरलेल्या पायऱ्या आणि वर चढून गेल्यावर नंदी आहे. पूर्वी पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सिंह किंवा तत्सम प्राण्याचे शिल्प होते कारण आता फक्त धारधार नखे असलेला पंजा शिल्ल्क आहे आणि वर भग्न अवस्थेतील शिल्प. प्रत्येक ठिकाणी भग्न अवशेष आहेत जे बघून वाईट वाटते. लेण्याच्या दर्शनी भागात चार खांब आहेत, मागे सभामंडप आणि दोन बाजूला वऱ्हांडे आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी शिवमंदिर आणि दोन बाजूस दोन लहान गुंफा आहेत. या गुफांना जोडून मोठ्या आकाराच्या खोल्या आहेत. या खोल्यांचा वापर सामान ठेवण्यासाठी केला जात असे.

गर्भगृहातील शिवलिंग अलीकडच्या काळात स्थापन केलेले आहे. डावीकडच्या गुंफेत शिवतांडवाचे भव्य शिल्प आहे, भग्न अवस्थेतील शिल्प पाहून वाईट वाटले. नवीन म्हात्रे यांनी बारकाईने आम्हाला ते शिल्प दाखवले. या शिल्पातील शिवाला आठ भुजा आहेत. शिवतांडव पहाण्यासाठी आकाशात यक्ष, गंधर्व आलेले आहेत तसेच ब्रह्मदेव , विष्णू आणि गणेश हे हि आपल्याला दिसतात. बाजूच्या भिंतीवर लकुलीश चे शिल्प आहे.

लकुलीश बद्दल मला काहीच माहिती न्हवती. असे म्हटले जाते कि शिवाच्या अठरा अवतारांपैकी लकुलीश हा पहिला अवतार आहे. शिल्पात त्यांच्या हातात दंड (लकुल) धारण केलेले दिसते . पोर्तुगीजांनी या मंदिराचे रूपांतर चॅपल मध्ये करताना नटेश्वराची मूर्ती पूर्णपणे भग्न न करता आल्यामुळे त्यावर लाकडाच्या फळ्या ठोकल्या होत्या त्यामुळे वरच्या भागात चौकोनी खोबण्या दिसतात. उंबरठ्याचे दोन खांब तोडण्यात आले आहेत त्यामुळे त्या भागाचे स्वरूप एका स्टेज सारखे करण्यात आले. बाहेरच्या डाव्या भागातल्या एका मूर्तीचे रूपांतर क्रॉस मध्ये करण्यात आले आहे. पण उजव्या बाजूची मूर्ती तशीच आहे. काही शिल्पांपुढे भिंती बांधण्यात आल्यामुळे ती शिल्पे सुरक्षित राहिली आहेत.

सभामंडपात नंदीच्या वर छतावर एक वर्तुळ कोरलेले आहे . काही खांबांवरही सुरेख नक्षीकाम दिसते जे बघून पूर्वीच्या काळात किती सुरेख नक्षीकाम केले असेल याची प्रचिती येते. पेशव्यांनी पोर्तुगिजांकडून वसई ताब्यात घेतल्यावर मंडपेश्वर हि ताब्यात घेतले. या लेण्यांमध्ये शिवलिंग असल्यामुळे अनेक भाविक दर्शनाला येतात तरीही काही प्रमाणात हि लेणी दुर्लक्षित राहिली आहेत. गुंफांच्या वरच्या भागात पोर्तुगीज कालखंडातील चर्च चे अवशेष अजूनही आहेत. लेण्यांच्या आवारातून हे अवशेष पाहण्यासाठी वर चढून जाता येते .

या लेण्या रस्त्याला लागूनच आहेत तरी फारसे तिकडे कुणी जात नसे. पण मंदिराचे आवार संरक्षित केल्यामुळे आता वर्दळ वाढली आहे. इतिहास अभ्यासक नवीन म्हात्रे यांची माहिती सांगण्याची पद्धत खूप छान आहे. त्यांच्या सोबत या शिल्पांमधील बारकावे पाहण्याची नवीन दृष्टी मिळाली.

बोरिवली रेल्वे स्थानकावरून रिक्षाने येथे सहज पोहोचता येते. शक्य असल्यास या लेण्या बघून या कारण या प्राचीन ऐतिहासिक लेण्यांपैकी एक असून, मुंबईच्या इतिहासातील महत्वाच्या साक्षीदार आहेत .

काही फोटो
mandapeshwar00.jpeg

खांबावरचे नक्षीकाम
mandapeshwar02.jpegmandapeshwar03.jpegmandapeshwar04_0.jpeg

शिवतांडव
shivtandav.jpeg

शिल्पाचा फोटो दाखवताना इतिहास अभ्यासक नवीन म्हात्रे
navin-mhatre.jpegtrimurti.jpeg

फरशीवर कोरलेले फासे टाकून खेळायचे खेळ. वाघ बकरी हे एका खेळाचे नाव आहे.
vaghbakari.jpeg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलं आहेस सामी.
बऱ्यापैकी दुर्लक्षित असलेली ही लेणी आहेत. भग्नावशेष पाहून फार वाईट वाटते. तिथे एक शिलालेख पण आहे. बहुतेक वसई जिंकल्याचा उल्लेख आहे. पाण्याचे व्यवस्थापन पण पहाण्याजोगे आहे.

छान लिहिलं आहे. अनुभव भारी असणार हा.
हल्ली हे असे 'हेरिटेज वॉक' खूप ठिकाणी असतात. ही एक अतिशय चांगली पद्धत सुरू झाली आहे. विशेष म्हणजे अनेक वेळा माहिती सांगणारे तरुण असतात आणि चांगला सखोल अभ्यास असतो त्यांचा!

छान लेख.
आम्ही बोरिवलीत १९७४ साली राहायला आलो. त्यावर्षी भाऊबिजेला सगळे मामा मावश्या आमच्याकडे आले होते तेव्हा आम्ही या गुंफा बघायला गेलो होतो, हे आठवतं. आत अंधारात काही दिसलं होतं का आठवत नाही. आताच्या फोटोतली स्वच्छता आणि उजेड पाहून छान वाटलं.
नंतर तिथे झोपडपट्टी आणि अस्वच्छता वाढत गेली, त्यामुळे जावंसं वाटूनही कधी गेलो नाही. आता पुन्हा एकदा मावस - मामेभावंडांसोबत जायला हवं.
अनेक वर्षांपासून त्रिपुरी पौर्णिमा इथे मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्यासाठी आमच्या कॉलनीत तेल मागायला संयोजक यायचे.
आता प्रायोजक मिळाल्याने गरज भासत नसावी.

गुंफांच्याच मागच्याच बाजूला आय सी चर्च आहे. त्याचाही इतिहास इंटरेस्टिंग आहे.
https://icchurchborivali.org/about-history.html

हो ऋतुराज , शिलालेखाचा उल्लेख राहून गेला. मंडपेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर त्याच अनुषंगाने एका भिंतीवर देवनागरी स्क्रिप्ट मधील शिलालेख आहे. वाचायचा प्रयत्न केला पण जमले नाही. क्रॉस मध्ये रूपांतरित केलेल्या मूर्तीच्या खाली पाण्याचे एक टाकं आहे.
आम्हाला लहानपणी कुणीतरी सांगितले होते कि या लेण्यांच्या आवारात एक भुयार आहे आणि ते वसईच्या किल्ल्यातून बाहेर निघते . त्यामुळे जेव्हा तिथे जात असू तेव्हा आपण भुयार शोधून काढूच असे कायम वाटायचे. नवीन ला विचारल्यावर त्यांनी असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले.

छान लिहिलं आहे. अनुभव भारी असणार हा.> वावे खरंच छान अनुभव होता म्हणूनच इथे लिहावेसे वाटले

आता पुन्हा एकदा मावस - मामेभावंडांसोबत जायला हवं.> नक्कीच जा भरत. या लेण्यांचे बदललेले रूप आणि स्वच्छ परिसर पाहून तुम्हाला छान वाटेल.

लेण्यांचे बदललेले रूप आणि स्वच्छ परिसर…

वाचून छान वाटले. मुंबईत उपनगरात दुर्मीळ.

एकदा फार उत्साहाने महाकाली गुंफा बघायला गेलो होतो. अस्वच्छता, गर्दुले वगैरे बघून परत कधी गेलो नाही.

तुमचा अनुभव वाचून मंडपेश्वर बघायला पाहिजे एकदा असे वाटतेय.

इंशागोविंदा, बघणार.

छान माहितीपूर्ण लेख. शिवाच्या त्या मुर्तीचा (शिवतांडव शिल्प) फोटो घेतला नाहीयेस का? असेल तर टाक ना.
पुण्यात पाताळेश्वराच्या परिसरात देखील २००१-२००२ च्या काळात असाच गर्दूल्ले, नशेडी नाहीतर युगुलांचा गोंधळ सुरू असायचा. आता तिथेही असेच प्रसन्न वातावरण असते.

छान वृतांत. असे हेरिटेज वॉक हल्ली बऱ्याचदा असतात. मी पुण्यात ७ हेरिटेज वॉक केले. वर नमूद केल्याप्रमाणे तरुण पिढीचा पुढाकार आशादायी आहे. मुंबईच्या वारसा स्थळांची सुंदर मालिका लोकसत्ताने केली आहे. हे सर्व बघायचे आहे पण कसे जमेल कळत नाही.

तुमचा अनुभव वाचून मंडपेश्वर बघायला पाहिजे एकदा असे वाटतेय.> धन्यवाद अनिंद्य. नक्कीच जा बघायला. आता खूप प्रसन्न आणि छान वाटतं तिथे. महाकाली गुंफा बघण्यासाठी लवकरच जाणार आहोत. तारीख ठरली कि इथे अपडेट करेन

धन्यवाद मृणाली, विशाल कुलकर्णी, आबा, तिता आणि धनवन्ती

शिवाच्या त्या मुर्तीचा (शिवतांडव शिल्प) फोटो घेतला नाहीयेस का? असेल तर टाक ना.> विशाल फोटो लेखात ऍड करते .
अजून फोटो हवे होते असं वाटलं. > आबा, अजून काही फोटो ऍड करते.

हे सर्व बघायचे आहे पण कसे जमेल कळत नाही.> तिता , त्यासाठी निदान एक/दोन आठवडे तरी इकडे येऊन राहावे लागेल Happy

छान लिहिले आहे.
८९-९१ साली महाकाली जवळ नातेवाईकांकडे अनेकदा जाणे झाले पण गुंफा बघण्याचे कुणी सुचवले नव्हते.

सामी सुंदर लिहिलं आहेस , तुझ्या निमित्ताने आमची पण सफर झाली . फोटो सुद्धा अगदी सुरेख .
बाकी वाघ बकरी चहा माहिती होता Happy खेळ आहे हे नव्याने समजले .

एकदा कलत्या संध्याकाळी तिकडे चक्कर मारली होती तर ड्रगी दिसले परिसरात. मग नाहीच गेले कधी. हेरिटेज वॉक सुरु झाला असेल तर नक्की जाईन आता.
आरंभ हेरिटेज शोधते आता.

पुन्हा बोरिवलीत आलीस की सांग आपण मिनी गटग करू बोरिवली दहिसरवाल्यांचं

माझेमन, तिथे सकाळी किंवा दुपारी जा.
उजेडात चांगली पाहता येतात शिल्पे.
संध्याकाळनंतर तिथे आत फारसा उजेड नसतो.
मिनी गटग करू बोरिवली दहिसरवाल्यांचं>>>>>मला आपलं म्हणा...

धन्यवाद मानव, दक्षिणा, Srd, जाई, माझेमन

बाकी वाघ बकरी चहा माहिती होता Happy खेळ आहे हे नव्याने समजले .> दक्षिणा सेम हिअर

हा बघ खेळाचं विडिओ

एकदा जमवायला हवे > जाई एकत्रच जाऊया

पुन्हा बोरिवलीत आलीस की सांग आपण मिनी गटग करू बोरिवली दहिसरवाल्यांचं> नक्की करू

मिनी गटग करू बोरिवली दहिसरवाल्यांचं>>>>>मला आपलं म्हणा...> आपलं Happy

विशाल आणि आबा धन्यवाद

वाचायचे म्हणून ठरवलेला लेख आज वाचला. छान वर्णन लिहिले आहेस सामी. डोळ्यासमोर चित्रं उभे राहिले. बऱ्याच वर्षांपूर्वी एलिफंटा गुंफा पाहतानाही तेथील भग्न अवस्थेतील शिल्प पाहून असेच उदास वाटले होते. पण नंतर ईजिप्शियन फॅरोंच्या इतिहासाबाबत वाचताना संस्कृत्यांची आक्रमणे जगाच्या पाठीवर जिथे जिथे झालीयेत तिथे तिथे हे दुर्दैवी प्रकार घडले आहेत असे लक्षात आले. ईजिप्तमध्ये आक्रमणांनंतर आधीच्या राजांनी (फॅरों) निर्माण केलेल्या पुतळ्यांची नाकं तोडली जात असंत.

असो! पण अशा स्थळांविषयी मध्यंतरीच्या काळात झालेले दुर्लक्ष आणि आलेली मरगळ झटकून तिथे आता असे रिनोव्हशन होत आहे हे खूप छान वाटले. सुंदर लेख सामी.

छान सचित्र लेख
आवडला
असेच वेगवेगळे walk करून लेख लिहीत राहा
Happy