
तेलुगु भाषेत या भाताला चित्रान्नम्, पुलिहोरा, लेमन राइस, किंवा टॅमरिंड् राइस असे म्हणतात. मराठीत त्याला साधारणपणे फोडणीचा भात किंवा आंबट भात असं म्हणता येईल.
पुलिहोरा हा सर्वसामान्य शब्दप्रयोग आहे. तेलुगु भाषेत पुलि म्हणजे वाघ 🐯, म्हणून काही जण त्याला गमतीनं टाइगर राइस असंही म्हणतात! पुलिहोरा एखाद्या धार्मिक कार्यप्रसंगी केला तर त्याला पारंपारिकपणे चित्रान्नम् असं म्हटलं जातं.
चित्रान्नम् या नावातच किती सौंदर्य आहे पहा. भाताच्या पिवळ्या पार्श्वभूमीवर उठून दिसणाऱ्या हिरव्या मिरच्या, मध्येच डोकावणारी हिरवी कढीपत्त्याची पाने, खमंग तळलेले चणाडाळ-उडीदडाळीचे दाणे, तडतडलेल्या फोडणीतील मोहरी, जिरे, लाल मिरच्या यांच्या एकत्रित असण्यामुळे ते अन्न खरंच चित्रासारखं भासतं. त्यामुळे चित्रान्नम् हे नाव अगदी समर्पक वाटतं.
चित्रान्नम् हा पदार्थ देव-देवतांना नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. अनेक देवळांमध्ये याचा प्रसाद दिला जातो. तिरुपती बालाजी मंदिरातील चित्रान्नम् तर विशेष प्रसिद्ध आहे. तेलंगणात व आंध्रप्रदेशात घरोघरीही चार-आठ दिवसांत एकदा तरी चित्रान्नम् केले जाते.
चित्रान्नम् किंवा पुलिहोरा प्रामुख्याने दोन प्रकारे केले जाते - चिंचेचे आणि लिंबाचे. तेलुगु भाषेत चिंचेच्या प्रकाराला चिंतपंडु पुलिहोरा, तर लिंबाच्या प्रकाराला निमकाया पुलिहोरा असे म्हणतात. इथे आपण चिंचेचे चित्रान्नम् पाहणार आहोत.
चला तर मग, सुरु करूया.
साहित्य:
चिंचेच्या अर्कासाठी:
- चिंच: एका मोठ्या लिंबाएवढी
- गूळ: भिजवून फुगलेल्या एका काबुली चण्याएवढा 😜
- तेल: एक चमचा
- मीठ: अर्धा चमचा / चवीनुसार
- हळद: पाव चमचा
भातासाठी:
- तांदूळ दोन वाट्या (सुमारे २०० ग्राम)
- तेल: एक चमचा
- मीठ: अर्धा-एक चमचा / चवीनुसार
- हळद: पाव चमचा
फोडणीसाठी:
- तेल: दोन चमचे
- मोहरी: अर्धा चमचा
- जिरे: अर्धा चमचा
- आलं: अर्धा-एक इंच बारीक ठेचून
- चणाडाळ: एक चमचा
- उडीदडाळ: एक चमचा
- काजू: दहा-बारा / आवडीनुसार, दोन भागांत तुकडे करून
- शेंगदाणे: दोन चमचे / आवडीनुसार
- दाळवं: दोन चमचे / आवडीनुसार
- वाळलेल्या लाल मिरच्या: चार-पाच, तुकडे करून
- हिरव्या मिरच्या: चार-पाच, लांब चिरून
- कढीपत्ता: एक-दोन काड्या
- हिंग: पाव चमचा
- मीठ: अर्धा चमचा / चवीनुसार
- हळद: अर्धा चमचा
- (ऐच्छिक) कोथिंबीर: थोडीशी, बारीक चिरून
भाग एक:
मोठ्या लिंबाएवढी चिंच एक वाटी गरम पाण्यात दहा मिनिटे भिजू घाला. कढईत एक चमचा तेल घाला. तेल गरम होईपर्यंत चाळणीवर घासून चिंचेचा अर्क काढून घ्या. गरम तेलात हा चिंचेचा अर्क, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद व थोडासा गूळ घालून मंद गॅसवर परता. तेल सुटू लागले की गॅस बंद करून थंड होऊ द्या.
भाग दोन:
तांदूळ दोन-तीनदा स्वच्छ धुवून घ्या. त्यात चार वाट्या पाणी, पाव चमचा हळद, पाव चमचा मीठ, पाव चमचा तेल घालून शिजवून घ्या. भात शिजून मोकळा व्हायला हवा. अस्सट होऊ नये. शिजून थोडासा थंड झाल्यानंतर मोकळा करून घ्या. हवे तर एका मोठ्या ताटात काढून पसरून ठेवा.
भाग तीन:
कढईत दीड-दोन चमचे तेल घाला. गरम झाल्यावर शेंगदाणे, चणाडाळ, उडीदडाळ व आवडत असल्यास चमचाभर दाळवं घालून परता. अर्धा चमचा मोहरी घालून थोडे परता. बारीक ठेचलेलं आलं, लांब चिरलेल्या पाच-सहा हिरव्या मिरच्या, तुकडे केलेल्या दोन-तीन लाल मिरच्या, कढीपत्ता, दहा-बारा काजू घालून परता. सर्व खमंग परतल्यानंतर पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हिंग घालून नीट कालवून गॅस बंद करा.
आधी केलेला चिंचेचा अर्क, थंड झालेली फोडणी, बारीक चिरलेली हिरवी ताजी कोथिंबीर भातात घालून हळुवार हाताने सर्व व्यवस्थित एकत्र करा व झाकून ठेवा.
केळीच्या पानावर सुबक सजावट करून वाढा. तोंडीलावणी म्हणून अंबाडीचा ठेचा वाढा.
पाकृ आवडली तर नक्की करून पहा व इथे फोटो टाका. काही सूचना, सल्ला, प्रश्न असतील तर प्रतिसादांत अवश्य लिहा.
- भाग एक मधील चिंचेचा अर्क आदल्या दिवशी किंवा आठवडाभर आधीपर्यंतही करून फ्रिजमध्ये ठेवता येईल. सकाळचा वेळ वाचेल.
- पाकृच्या तिन्ही भागांत मिठाचा वापर केलेला आहे. त्यानुसार मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवावे.
- भातात शिजवताना हळद घालणे ऐच्छिक आहे पण घातली तर तिने चांगला रंग येतो.
- चिंचेचा अर्क, फोडणीतील घटक व शिजवलेला भात हे नीट एकजीव व्हावेत म्हणून सर्व कालविल्यानंतर तासभर झाकून ठेवावे.
- या पाकृ व्यतिरिक्त, चित्रान्नम् करण्याच्या आंध्र-तेलंगाणा-रायलसीमा भागांत वेगवेगळ्या पद्धती आहेत.
- याच चित्रान्नात चिंचेऐवजी एका लिंबाचा रस घालून थोड्याफार वेगळ्या पद्धतीने लेमन राइस करता येईल.
.
या खालच्या, पूर्वी एकदा काढलेल्या फोटोत डावीकडे लिंबूभात व उजवीकडे चिंचभात वाढला आहे.
व्वा व्वा व्वा जबरदस्त रेसिपी
व्वा व्वा व्वा जबरदस्त रेसिपी आणि फोटो.
चित्रान्नम् आवडतो. आता तुमच्या पद्धतीने करून बघून.
फोटो पाहूनच तोंडाला पाणी सुटले.
नेहमीप्रमाणे फोटो, लिखाण नीटनेटके.
नेहमीप्रमाणे जबरदस्त
नेहमीप्रमाणे जबरदस्त प्रेझेंटेशन! चित्रान्न आमच्याकडे बरेचदा करतात.
सचित्र सुंदर रेसिपी. पाककृती
सचित्र सुंदर रेसिपी. पाककृती कशी लिहावी याचा वस्तुपाठच असतात तुमच्या रेसिपीज.
चिंतपंडु पुलिहोरा बेहद्द पसंत आहे. 🤤
तेलुगु शेजार असल्याने भर मुंबईतही authentic पुलीहारा वरचेवर चाखायला मिळतो; सौभाग्यशाली असल्याचा फील येतो. यात लसूण नसल्याने ज़रा जास्तच आवडता प्रकार.
मंदिरात प्रसाद म्हणून केला तर चव अजूनच जमून येते असे निरीक्षण आहे.
छान दिसतोय.
छान दिसतोय.
एमटीआरचा पुलिहोरे मसाला हा पावडर स्वरुपात नसुन घट्ट पेस्ट का असतो त्याचं रहस्य समजलं. तो आता असा वापरुन बघेन. तो संपला की तुमच्या पद्धतीने घरी चिंचेचा कोळ करेन. धन्यवाद!
>>> पाककृती कशी लिहावी याचा
>>> पाककृती कशी लिहावी याचा वस्तुपाठच असतात तुमच्या रेसिपीज.
अगदी!!
इथे व्यंकटेशाच्या देवळात मिळतो तो टॅमरिंड राइस भारी आवडतो मला, पण घरी माझ्या हातून इतकं आंबट केलं जात नाही समहाऊ!
पण घरी माझ्या हातून इतकं आंबट
पण घरी माझ्या हातून इतकं आंबट केलं जात नाही समहाऊ
>>>
काही ठिकाणी केला जाणारा पुलिहोरा (विशेषतः चिंच भात) थोडा जास्तच आंबट लागतो, मी तेवढा आंबट नाही खाऊ शकत, दात आंबतात.
एमटीआरचा पुलिहोरे मसाला...
एमटीआरचा पुलिहोरे मसाला...
आमच्या घरी कधी वापरला नाही पण एम टी आर ची सांबर पावडर नेहमी वापरतो.
पुलीओहरा राईस खाल्ला आहे एकदा
पुलीओहरा राईस खाल्ला आहे एकदा. पण पावडर वगैरे आणून कधी केला नाही. कैरीचे चित्रान्न खाल्ले आहे. आता हा राईस एकदा करून पाहीन.
अतिशय सुंदर, नेत्रसुखद! करून
अतिशय सुंदर, नेत्रसुखद! करून बघायला हवा असा घरी.
आमच्याकडे (कर्नाटकात) याला पुलियोगरे म्हणतात. मला फार आवडतो. एमटीआरची पावडर आणून केलाय पूर्वी, पण आता बाहेरचाच जास्त खाल्ला जातो कारण तो पावडर घालून केलेला तितका चांगला जमत/होत नाही. मी आधीही लिहिलंय बहुतेक, आधी जिथे रहायचो तिथे वरती एक आजी होत्या ८४ वर्षांच्या, त्यांनी घरी केलेलं हे मिश्रण दिलं होतं. अप्रतिम होतं ते. त्यांच्या हातचाच हा भात पहिल्यांदा चाखला होता.
माझी मामी हा भात फार चविष्ट
माझी मामी हा भात फार चविष्ट करायची. इथला फोटो बघून तोंडाला पाणी सुटलं. नक्की करून बघेन. कैरी मिळायला लागली, की चिंचेऐवजी कैरी घालायची का / ना?
कैरी मिळायला लागली, की
कैरी मिळायला लागली, की चिंचेऐवजी कैरी घालायची का / ना?
नक्की करता येईल, इथे एक साधी सोपी पाकृ आहे पहा (निवेदन तेलुगु आहे पण पाहून कळेल) -
https://youtu.be/QSoO0j5qDGo?si=31TohQXre6qvjw9b
वा मस्त रेसिपी आणि
वा मस्त रेसिपी आणि प्रेझेंटेशनही. करुन बघणार नक्कीच.
मैत्रीण ऑफिसमध्ये आणायची
मैत्रीण ऑफिसमध्ये आणायची कैरीचे चित्रान्न. तिची आई करायची. बेळगावची होती.
घरी करून पाहिले होते.
आता पुलिहोरा करून बघेन. पण इतकी चिंच घालणार नाही.
मस्तच!
मस्तच!
@ अनिंद्य,
>>>"यात लसूण नसल्याने ज़रा जास्तच आवडता प्रकार. "
खोबरे आणि तुप तुम्हाला आवडत नाही हे माहित आहे पण लसूण पण??? 😀
घरी सगळ्यांना आवडणार पदार्थ
घरी सगळ्यांना आवडणार पदार्थ आहे हा. मुलं डब्यात पण आनंदाने नेत असत. पुलिहोरा, आवाकाई, पापड हे कंफर्ट फूड आहे मंडळींचे.
माझी एक जाऊ भात शिजवतानाच मूठभर चणाडाळ पण घालते. अशी भाताबरोबर शिजलेली डाळ मस्त लागते.
मार्चच्या सुरुवातीस चिंचेला फुलोरा येतो तेंव्हा चिंचेचा कोवळा पाला / फुले घालून चिंतचिगुरु ( चिगुरु = पालवी) पुलिहोरा करतात. तो पण एकदम भारी लागतो.
आमच्या इथल्या तेलुगु असोसियेशन च्या कार्यक्रमाच्या जेवणात २-३ प्रकारचे पुलिहोरा नक्कीच असतात
सुंदर, सचित्र वर्णन आणि
सुंदर, सचित्र वर्णन आणि पाककृती!
त्यासोबत पुन्हा आंबट चटणी?
खूपच आंबटशौकीन आहेत बुआ साऊथ चे लोक !!
आणि गार च खायचा न? पुन्हा गरम नाही करता येत, राईट ?
मार्चच्या सुरुवातीस चिंचेला
मार्चच्या सुरुवातीस चिंचेला फुलोरा येतो तेंव्हा चिंचेचा कोवळा पाला / फुले घालून चिंतचिगुरु ( चिगुरु = पालवी) पुलिहोरा करतात. तो पण एकदम भारी लागतो.
>>>
चिंचेचा चिगोर! हा शब्द कानावर जरी पडला तरी तोंडाला पाणी सुटतं!
चिंतचिगुरु पुलिहोरा करायला हवा आता.
माझी एक जाऊ भात शिजवतानाच मूठभर चणाडाळ पण घालते. अशी भाताबरोबर शिजलेली डाळ मस्त लागते.
>>>
या variation ची नोंद घेतली आहे.
आणि गार च खायचा न? पुन्हा गरम
खूपच आंबटशौकीन आहेत बुआ साऊथ चे लोक !!
>>>
हं, हे मात्र खरं आहे. तेलुगु प्रांतांत चिंचेचा खप खूप जास्त असतो.
आणि गार च खायचा न? पुन्हा गरम नाही करता येत, राईट ?
पुन्हा गरम कोणी नाही करत; पांढरा भात सांबर वगैरे गरम असतातच की.
माझ्या माहितीप्रमाणे पुलिओगरे
माझ्या माहितीप्रमाणे पुलिओगरे आणि चित्रान्ना वेगवेगळे आहेत. चित्रान्ना कर्नाटकात तर पुलिओगरे तामिळ अणि तेलगु. चित्रान्नामध्ये कैरी, कैरी नसेल तर लिंबू. पुलिओगरेमध्ये चिंच. दोन्ही प्रकार आवडतात विशेषतः उन्हाळ्यात.
छान रेसिपी आणि सुंदर फोटोज्
छान रेसिपी आणि सुंदर फोटोज्
सहीच. नेहेमीप्रमाणे देखणी आणि
सहीच. नेहेमीप्रमाणे देखणी आणि चविष्ट पाककृती.
सादरीकरण उत्तम.
सादरीकरण उत्तम.
या भारतातच तूरडाळ आणि वांगी घातल्याने कर्नाटकातला बिसी बेळी अन्ना होतो का?
मस्त रेसिपी आणि फोटोज,
मस्त रेसिपी आणि फोटोज,
प्रेझेंटेशन भारी असतं तुमच्या रेसिपीज चं.
एवढे व्हेरिएशन्स आहेत या
एवढे व्हेरिएशन्स आहेत या भातात आणि त्यात लोक अगदी डिटेलवार माहिती सांगत आहेत... पण खायला कुणी बोलवेना
चिंचेचा चिगुर...मस्त आठवण.
सुंदर, सचित्र वर्णन आणि
सुंदर, सचित्र वर्णन आणि पाककृती!>> +१
या भारतातच तूरडाळ आणि वांगी
या भा
रतातच तूरडाळ आणि वांगी घातल्याने कर्नाटकातला बिसी बेळी अन्ना होतो का?>>> नाही, ते वायलं हे वायलं.
पुलिहोरा ~~ फोडणीचा भात
बिसिबेळि भात ~~ फोडणीची खिचडी
पण खायला कुणी बोलवेना +१
फार फार आवडली रेसिपी. जेवून
फार फार आवडली रेसिपी. जेवून बसले आहे तरिही तोन्डाला पाणी सुटलं.
मस्त सचित्र रेसिपी !! फोटो
मस्त सचित्र रेसिपी !! फोटो बघूनच तोंडाला पाणी सुटले. मी कैरी घालून चित्रान्न उन्हाळ्यात करते बऱ्याच वेळा .
मस्त रेसिपी आणि फोटोज. पण
मस्त रेसिपी आणि फोटोज. पण खायला कुणी बोलवेना +१
@ मेधा,
@ मेधा,
चिंतचिगुरु ! माझ्यासाठी नवीन माहिती. याच्या चवीत निश्चित फरक असणार.
फक्त असा कोवळा चिंचपाला शहरात कुठे मिळायचा ? Very curious to try.
इंशागोविंदा मिळेलही संधी. कुणी सांगावे.
Pages