पुण्यात आयोजित केलेली बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६ स्पर्धा (पुणे ग्रॅण्ड टूर) - स्पर्धा एक प्रश्न अनेक

Submitted by रानभुली on 21 January, 2026 - 09:26

पुण्यात १९ जानेवारीपासून भरवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे वेळापत्रक. ( अधिकृत वेबसाईटनुसार)

तारीख / टप्पा / स्पर्धा भाग / खेळाचा (उपक्रम) प्रकार / कालावधी

19 जानेवारी / Prologue (8 किमी) / Time Trial व्यक्तीगत 8 किमी स्पर्धा / दुपारी 1:25 ते 5:05 pm
20 जानेवारी / Stage 1 (91.8 किमी) / Countryside व रोड स्पर्धा / दुपारी 1:30 ते 4:15 pm
21 जानेवारी / Stage 2 (109.15 किमी)/ Pune - Purandar - Haveli / दुपारी 12:30 ते 3:55 pm
22 जानेवारी / Stage 3 (137.07 किमी) / Purandar - Baramati / दुपारी 12:30 ते 4:35 pm
23 जानेवारी/ Stage 4 (99.15 किमी) / Pune - Haveli - PCMC / दुपारी 1:30 ते 4:30 pm

१७ जानेवारीला पुण्याचे उपायुक्त मनोज पाटील यांनी जाहीर केले कि १९ तारखेला जंगली महाराज रस्ता, फर्गसन कॉलेज रस्ता आणि गणेशखिंड रस्ता सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत बंद राहतील. एव्हढ्या अल्प मुदतीच्या सूचनेवर प्रमुख रस्ते बंद केल्याने गोंधळ उडालाच. पर्यायी रस्ते म्हणजे काय हे नीट समजले नाही.
https://www.thebridgechronicle.com/pune/pune-traffic-alert-shivajinagar-...

पुण्यातली ही आंतरराष्ट्रीय सायकल रेस कागदावर पाहिली तर तिचे उद्दीष्ट चांगले आहे असेच वाटते.पर्यावरण, फिटनेस, सायकल संस्कृती याबद्दल बोलणं आवश्यकच आहे. पण या स्पर्धेच्या आयोजनामुळे पुणेकरांना जो प्रत्यक्ष त्रास सहन करावा लागला, तो दुर्लक्षित करता येणार नाही.

१९ तारखेला जंगली महाराज रस्ता, फर्गसन कॉलेज रस्ता, गणेशखिंड रस्ता अशा अतिशय वर्दळीच्या रस्त्यांवर वाहतूक बंद होती. २० तारखेलाही स्पर्धेच्या पुढील टप्प्यांसाठी शहरातील आणि शहराबाहेरील काही प्रमुख मार्गांवर निर्बंध होते. अडचण रस्ते बंद ठेवण्यात नाही; अडचण आहे ती या निर्णयांची माहिती अगदी शेवटच्या क्षणी देण्यात आली, यात.

याचा थेट परिणाम शाळा, कॉलेजेस आणि विद्यार्थ्यांवर झाला. अनेक खासगी शाळा बंद ठेवाव्या लागल्या. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रिलीम परीक्षा चालू असताना आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची JEEसारखी देशपातळीवरील प्रवेश परीक्षा (२१ जानेवारी - दुपारी एक वाजता ) असताना अशी परिस्थिती निर्माण होणं खरोखर दुर्दैवी आहे. हडपसर, सिंहगड रोडसारख्या भागांत काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणंच कठीण झालं.
https://www.freepressjournal.in/pune/pune-traffic-diversions-on-january-...

इथे एक मूलभूत प्रश्न उभा राहतो. जर एखादा विद्यार्थी रस्तेबंदीमुळे परीक्षा केंद्रावर पोहोचू शकला नाही, तर त्याची जबाबदारी कोणाची? त्या विद्यार्थ्यासाठी JEE पुन्हा घेतली जाणार नाही. मग या नुकसानाची भरपाई कोण करणार?

आयोजकांना आणि पुणे शहर–जिल्हा प्रशासनाला जानेवारी महिना हा परीक्षांचा असतो, हे माहीत नाही का? परीक्षा, व्यवसाय, प्रवास यांचं नियोजन लोक आठवड्यांपूर्वी करतात. अचानक दोन-तीन दिवसांच्या नोटिसवर सगळं बदलणं सगळ्यांना शक्य नसतं. गणपती-दहीहंडी सारखे कार्यक्रम कॅलेंडर पाहून ठरतात; मग अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आधीपासून स्पष्ट नियोजन का केलं गेलं नाही?
https://timesofindia.indiatimes.com/city/pune/schools-colleges-in-camp-c...

सायकलिंगला चालना देण्याचा उद्देश असेल, तर वर्दळीच्या शहररस्त्यांवर स्पर्धा घेणं हाच एकमेव मार्ग आहे का? बालेवाडी किंवा पुण्याच्या आसपासच्या मोकळ्या भागात ट्रॅक तयार करणं अशक्य होतं का? स्पर्धेनंतर आज बंद केलेले रस्ते सायकलिस्टसाठी सुरक्षित राहणार आहेत का, हा प्रश्नही उरतोच.

सायकलिंगचा प्रसार व्हावा, हे पुणेकरांनाही हवं आहे. पण तो प्रसार नागरिकांना अडचणीत टाकून नव्हे, तर त्यांना विश्वासात घेऊन व्हायला हवा. या स्पर्धेने सायकलिंगपेक्षा नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाची असंवेदनशीलता अधिक ठळकपणे समोर आणली, अशी भावना अनेक पुणेकरांची आहे.

एखादा कायदेतज्ञ कोर्टात जाणार असेल तर माझा पूर्ण पाठिंबा राहील. कुणा तरी लहरी मुहम्मदाच्या लहरीनुसार महाराष्ट्रातले क्रमांक दोनचे शहर अचानक बंद करण्याची ही कल्पना कुणाची हे समजले पाहीजे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Jee mains च्या विद्यार्थ्यांना भयंकर त्रास सहन करावा लागला .
बरीच मुले रस्त्यावरून चालत जाताना दिसली . त्यांना कल्पना होती का की तासभर आधी निघावं लागेल याची ?
इव्हेंट स्पॉन्सर्सची बॅनरबाजी .
किती तास बंद राहील याची कल्पना व्यवस्थित दिली गेली नाही .

मनात आले की रस्त्याचे सुशोभीकरण झटपट होते एवढे दिसले . बाकी रस्त्याला कितीही नावे ठेवा तो काही वेळेत रिपेअर होत नाही .
पण सायकलिंग पाहायला मजाच आली . ट्रॅकचं प्लॅनिंग पुणेकरांना धरून केला असता तर बरं झालं असतं .

लेखातील विचारांशी सहमत.
इतकी मोठी स्पर्धा म्हणजे किमान दोन महिने आधीपासून त्यांचे प्लॅनिंग सुरू झाले असेल. आणि तरी हे मुख्य रस्ते बंद असतील ही माहिती आयोजकांनी किमान एक आठवडा आधी का देऊ नये???
JEE चे टेन्शन एक पालक म्हणून गेल्या वर्षीच अनुभवले आहे.
यंदा या घोळामुळे या मुलांची काय अवस्था होत असेल याची कल्पना येतेय. एका मित्राच्या मुलीला तर पॅनिक अटॅक आला या गोंधळात.

उद्या अजून मजा आहे .
नळ स्टॉप काय औंध काय
पर्यायी रस्त्यांचा रूट मॅप सुद्धा आधीच शेअर करायला पाहिजे होता. विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते.
एक दिवस घरातलं कोणीतरी कॉलेजला गेले नाही
एक दिवस आम्ही घरातून बाहेर पडू शकलो नाही
एक दिवस मिस्टर ऑफिसला जाऊ शकणार नाही असा काहीसा कार्यक्रम आहे
बाकी फिनिश लोकेशनला रातोरात फुलांचे ताटवे येतात अन
तेवढ्याच वेगात परत जातात
लग्ना पुरतच एखाद्या मुलीला नटवून गोरं वगैरे करायचं.

या गोष्टीचे राहून राहून आश्चर्य वाटत आहे की ज्या रस्त्यावर चांगल्या चारचाकीत पण रस्त्यावरचे खड्डे, समतोल काँक्रीटचे जोड जाणवतात, त्यारस्त्यावर असा आंतरराष्ट्रीय इव्हेंट करणे म्हणजे धाडसाचे काम आहे. सिंहगड रस्त्यावर अचानक रस्ता लहान झाल्यामुळे काही सायकलिस्टना वेग कमी करावा लागल्यामुळे मागून येणारे इतर सायकलिस्ट धडकून या[अपघात झाला. रूट ठरवला त्यावेळी हे लक्षात आले नाही का?

या अडचणी आणि रडगाणी पुणेकर गातील त्यात काही नवे नाही. पण पुणे हे दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे हे असे अचानक ठरवून लेखक महोदय मोकळे कसे काय होऊ शकतात? हे दुसऱ्या क्रमांकाचे आहे याची पूर्व कल्पना कधी दिली होती? माझा निषेधच झाला ते वाचून!

एस एन एन, एस आर डी, धनवन्ती, नरेन जी धन्यवाद.
शेवटचा प्रतिसाद कुणी दिलाय समजत नाही. कदाचित या लेखक महाशयांच्या मुलाला जे ई ई ला जाता आले नसते तर ते आनंदाने म्हणाले असते कि जेईई काय पुन्हा पुढच्या वर्षी देता येईल. रेस महत्वाची. अडचणी आणि रडगाणी गायची त्यांना सवय नाही तर Lol
पुणे हे महाराष्ट्रातले शेवटचे शहर असेल कदाचित म्हणून इथे रेस ठेवली असेल. माहीतीत भर घातल्याबद्दल आणि सौहार्दपूर्ण प्रतिसादाबद्दल या महाशयांचे आभार. Happy

आताच आमचे ॲडमिन हेड भेटले. जाम वैतागले होते. बस रूट, शिफ्टस, कॅन्टीनमध्ये येणारं खाणे, सगळे विस्कळीत झाले आहे असे सांगत होते. एरवी वारीमुळे आणि गणपती विसर्जनामुळे पण बरेच रस्ते बंद असतात पण ती माहिती त्यांना दोन आठवडे आधी मिळते असे म्हणाले. ते खूप सिनिअर आहेत आणि खूप कॉन्टॅक्टस आहेत तरी म्हणाले की इंडस्ट्री मध्ये कोणालाच ही माहिती नव्हती मिळाली. अनपेक्षित रोड ब्लॉकिंग मुळे खूप घोळ झाले आहेत.

पुण्यातील वेगवेगळ्या भागात दर तिमाहीत अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत (पूर्वनियोजित आणि आगाऊ माहिती देऊन)

रस्त्यांची परिस्थिती एका आठवड्यात सुधारली जी वर्षानुवर्षे खूपच वाईट होती.

काय हे गुळगुळीत रस्ते!
काय हे फुलांचे ताटवे!
काही दिसणारी स्वच्छता!
नयन रम्य सर्वकाही
आजचा दिवस पुणे एक नंबरच की हाय वो.
Anyways Best wishes to all cyclist,
And all fresher, experienced (social media)influencers. Who will achieve more than than they ever thought!

आजच्या स्पर्धेची तपशीलवार माहिती थोड्याच वेळापूर्वी पोलीसांनी दिली आहे. नागरिकांनी त्याप्रमाणे नियोजन करावे. गैरसोय होणार नाही.
https://www.facebook.com/share/v/17ti1hFdsC/

उगाच छडीने काहीतरी दाखवत आहेत असे भासवत होते. >> Lol

लोक घराबाहेर पडल्यानंतर हे ऑनलाईन आले. हे म्हणजे आमच्या मुलीच्या लग्नाला यायचं हं , १५ मिनिटात लग्न लागतंय लवकर या सारखं ! Proud
तरी आजही रस्ते जाम असतील याची पूर्वकल्पना आली होती.
Gru >> ८३२ कोटी रूपये खर्च झालेत. ते ही सिमेंटच्या रस्त्यावर डांबर ओतलंय. ते कितीसं टिकणार ?

संध्याकाळी सव्वा पाच वाजता जंगली महाराज रस्ता बंद होता म्हणून तिथे सायकलचं काम केलं. ते झाल्यावर नदीपात्रातून येताना एव्हढा जॅम झालेला रस्ता कि बस. एव्हाना जे एम रोड चालू झाला होता तरीही. कुणा तरी मुलाचे पालक कोर्टात जाणार आहेत असं ऐकलं, बघूयात.

पुण्यातील खासदार आमदार नगरसेवक पालक्मंत्री ह्यांना कोणी जाब विचारणार की नाही. ? की आता मारुतीच्या बेंबीत बोट घालुन गार गार वाटतंय म्हणणार ?

नगर रोडवरून जाणार आहे का या टूरचा मार्ग, खूप गरज आहे त्या रस्त्याला सलग सपाट करण्याची, इतकी ठिगळे लावली आहेत त्या काँक्रिटच्या रस्त्याला की विचारच करू शकत नाही. त्यात हल्ली नवीन स्पीड ब्रेकर बनवले, गाडी आदळते स्पीड ब्रेकर वर चढताना आणि उतरताना.

मुंबईत सुद्धा एखाद्या रविवारी मॅरेथॉन असते..
मी उठायच्या आधी संपून गेलेली असते
उठल्याबरोबर मोबाईल हातात घेतो तेव्हा व्हाट्सअप वर मॅरेथॉन पूर्ण केलेल्या मित्रांचे स्टेटस दिसतात Happy

पुण्यात सुद्धा असेच करता येईल.
दुपारी एक ते चार या वेळेत स्पर्धा घ्यावी.

भाग घेणारे भाग घेतील. बाकीचे छान झोप घेतील Happy

माझाही पूर्ण पाठींबा असेल जर कोणी PIL टाकणार असेल तर. आणि जर का असे प्रॉब्लेम मांडले तर सपोर्ट करणारे असा सूर आळवतात कि आमचा सायकलिंग रेसलाच विरोध आहे. कुठेतरी वाचलं होतं कि या लेव्हल च्या रेस ची प्लॅनिंग करायला २ वर्षे लागतात ती आपण सहा महिन्यात केली. ते दिसलंच म्हणा. घ्याय्ची होती २ वर्ष २०२६ ऐवजी २०२८ ला झाली असती रेस. पूर्ण शहर दिवस्भर बंद ठेवण्याऐवजी रेस रूट टप्प्या टप्प्याने बंद करता आला असता. नाही तरी वी आय पी आल्यावर आयत्या वेळी करतात बंद. शहरात रेस घेण्या ऐवजी शहराबाहेर हाय्वेला एक लेन बंद ठेवून घेता आली असती. शहरातच घ्यायची होती तर रात्री ११ ते सकाळी ६ घेता आली असती... अजून किती तरी गोष्टी करता आल्या असत्या पण आयोजक समितितल्या एकालाही यातली एकही गोष्ट सुचू नये याचं आश्चर्य वाटतय.

ती स्पर्धा स्थानिक लोकांनीही पहावी हाही उद्देश असेल ना? F1 बघायला कशी गर्दी असते, तसं.
आधीपासून नियोजन, पर्यायी मार्गांची सोय आणि भरपूर पूर्वप्रसिद्धी करायला हवेत

उपलब्ध माहितीनुसार ( फायनान्सियल एक्सप्रेस , इंडियन एक्सप्रेस, इतर रिपोर्ट्स ) पुणे ग्रँड टूर वर झालेला खर्च ३०० ते ५०० कोटी रुपयांच्या घरात आहे.
बजाज आणि इतर स्पॉन्सर्स नी ३५ कोटी दिले..
तुलना करायची झाली तर ही रक्कम पूर्ण वर्षाच्या PMC च्या बजेटच्या जवळ जवळ ५ % आहे..
हा खर्च सरकार, PMC / PCMC इत्यादींच्या मूळ २०२५ च्या बजेट मध्ये नव्हता.
आयत्यावेळी करण्यात आला. दुसरीकडची बजेट यासाठी वळवण्यात आली.
२०२५ च्या मध्य ते शेवट ह्या कालावधीत ह्या खर्चाला मान्यता देण्यात आली . स्पर्धा जानेवारी २६ मध्ये झाली...
नेहेमीचे रस्ते सुधारणाच बजेट ह्या स्पर्धेसाठीच्या रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी वापरण्यात आले..
जिना है तो पुणेकर का जिंदगी जियो... शान से..

प्रविणपा , बुल्स आय.
हल्ली जर कुणाचा प्रॉब्लेम झाला तर "एव्हढं काय त्यात ? देशापुढे हे काहीच नाही" किंवा "एव्हढा मोठा इव्हेंट झाला हे बघा. थिंक पॉझिटिव्ह, छोट्या मोठ्या गोष्टी कुरवाळत बसलं तर असे इव्हेंटस कसे होणार ?" असे सल्ले देणार्‍यांचा बुजबुजाट झालेला आहे. ही मंडळी स्वतःवर आलं तर बिल्कुल सहन करत नाहीत.

बरं जेईई / प्रीलिमच्या परीक्षा या काही छोट्या मोठ्या गोष्टी नाहीत. वर्ष वाया जातं. त्यातल्या त्यात प्रिलिमची परीक्षा बुडाली तरी स्थानिक सरकार तारखा पुढे मागे करून देऊ शकेल. जेईईचं काय ? अडीच अडीच लाख रूपये फीस भरून दोन वर्षे मेहनत केलेली असते. आणि अशा बिनडोक लोकांच्या प्लॅनिंगमुळे एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेला जाता आलं नाही तर काय हे त्याला आणि त्याच्या घरच्यांनाच माहीती. लोकांना अजिबात संवेदनशीलतेने बघता येत नाही.

सिंपल गोष्ट आहे. प्रशासनातल्या मंडळींना भान असतं. जेईई ची परीक्षा कधी आहे याची माहिती घेणं अशक्य होतं का ? तारखा पुढे मागे केल्या असत्या तर चाललं नसतं का ?

स्पर्धा कशी होती, ती व्हावी कि नाही हा विषयच नाही.
अगदी धुरंधर सिनेमा कसा होता हा विषयच नाही. तो उत्तमच आहे, पण... तसंच.

काकाच्या मुलाची परीक्षा होती. हांडेवाडीला केंद्र होतं. अचानक तिकडचे रस्ते बंद आहेत असा मेसेज आला. त्यातच सिंहगड रस्ताही बंद होणार, रस्त्यावर गेलात तर दंड आहे असे रिक्षावाले सांगत होते. ट्रॅफिक पोलिसांना फोन केले तर एकानेही उचलला नाही. नंतर बिझी येत राहिला. एक वाजता पेपर होता. शेवटी त्याचे मित्र आणि तो सकाळी नऊ वाजता एकत्र सायकलवरूनच गेले. सोडायला येऊ नका नाहीतर गाड्या अडकतील असं म्हणाले. केव्हडी समज आहे.

पण सर्वांना ही माहीती नव्हती. कुणाचा तरी पेपर बुडाला म्हणाला. वाईट वाटतं त्याचं. त्याच्या घरी काय परिस्थिती असेल ?
रेस ला विरोध नाही. ही समस्या छोटी आहे असे समजून ताशेरे मारण्यापेक्षा थोडी तरी संवेदनशीलता दाखवा. प्लीज.

Is there anything positive about this event? माबोवर फक्त नकारात्मकच लिहीलय. मे बी माबुदो

जेईई परीक्षा बुडाली हे सकारात्मक नाही ?
त्या मुलाच्या घरच्यांची मुलाखत घ्या आणि सकारात्मक काय काय होतं विचारा. कदाचित तुमच्या बाबत असे घडले असते तर तुम्ही फक्त सकारात्मक बोलला असता. इतरांना ते जमत नाही, शिकवा त्यांना.

https://www.youtube.com/watch?v=tSvrPI4pCeg

पुणे ग्रॅण्ड टूरचे व्हिडीओज पाहिले. विलोभनीय दृश्ये आहेत. स्पर्धेची दृश्ये पाहताना आपण पुण्याची नाही तर एखाद्या परदेशातली दृश्ये बघतोय असा भास होत होता. एव्हढ्या मोठ्या स्केलची स्पर्धा पार पाडण्यासाठी प्रशासन झटले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. इच्छाशक्ती असली तर काय होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण. पण एकदा वरचा व्हिडीओ पहा. स्पर्धा संपल्याबरोबर ही इच्छाशक्ती नाहीशी झाली.
बघायला आलेला मुलगा गेल्याबरोबर मुलीने लिपस्टीक, लाली पावडर धुवून टाकलं आणि ती मूळ स्वरूपात आली.

समजा ही स्पर्धा मुंबईत घेतली असती तर ?
मुंबई आणि पुण्यातले रस्ते आता कोमात गेलेले आहेत. त्यांची वाहने वाहून नेण्याची क्षमता संपून आता काळ लोटला तरी वाहनांच्या संख्येत भर पडली आहे. परदेशातले रस्ते चकाचक आणि सुंदर वाटतात याचे कारण गर्दीच्या वेळातही तिथे एव्हढी वाहने नसतात. मोकळे रस्ते दिसायला सुंदर दिसतात. तिथेच गर्दी झाली कि ते नकोसे वाटतात. अशा ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी शहर बंद करणे, कचरा हटवण्याऐवजी तो झाकून टाकणे, झोपडपट्ट्या झाकणे ही लाली पावडर केल्याने जास्त प्रश्न उभे राहतात.

या सोयी सुविधा ३६५ दिवस नागरिकांना का मिळू शकत नाहीत ? फक्त बघायला मुलगा येणार आहे म्हणून मुलीला सजवायची का ?

रस्त्यावर बांधलेल्या पट्ट्या आयोजकांनी काढल्या नाहीत म्हणून आपण आपली लायकी दाखवली वगैरे अती आहे वरच्या व्हिडिओत.