न्यूझीलंड डायरी ७."जीवनास अर्थ असता..अर्थाला अर्थ येतो!!

Submitted by हेमंत नाईक. on 12 January, 2026 - 02:06

७."जीवनास अर्थ येता ..
अर्थाला अर्थ येतो!!

...हेमंत नाईक

प्रवास जसा सुरु असला की आनंद देतो तसच लिखाणही प्रवाही असावं लागत नाहीतर तेही कंटाळवाण वाटत. त्यात विविधताही हवी.

न्यूझीलंडमध्ये अगदी कोणत्याही बाजूला कॅमेरा वळवला की तो सुंदर वॉलपेपरच वाटतो...इथं आल्यावर सर्वात बिझी असतो तो आपला कॅमेरा !! आज त्यास थोडी विश्राती देऊ या.

आता तिन दिवस येणाऱ्या सुटीचा फायदा घेऊन नॉर्थ आयलन्डवरचे प्रेक्षणीय व सुंदर शहर रोटोरूआ या ठिकाणी जाण्याचे आमचे नियोजन आहे. तेव्हा परत या देशाच्या सुंदरतेकडे आपण वळणार आहोच.

आधीच्या दोन व्हिजिट मध्ये बरेच न्यूझीलंड फिरून झालं असल्याने या वेळेस फक्त्त आमचं इतरत्र फिरणं..भटकण जरा कमी असणार आहे. तरी त्या वेळी विविध प्रेक्षणीय स्थळास भेट दिली असतानाचे अनुभवांचे लिखाण नक्की करेन.

येथील अर्थात समावलेला अर्थ जाणून घेण्यासाठी आज थोडा वेगळा विषय घेतोय लिहिण्यासाठी.

सुंदरता आणि व्यवहार याचा अन्वयार्थाने काहीही संबंध नाही.व्यवहार हा मात्र नेहमी चोख असावा लागतो. अगदी अचूक आणि बरोब्बर.

आज येथील अर्थकारणावर लिहितो आहे... म्हणून आजच सकाळी फिरताना अर्थावरच एक अर्थपूर्ण रचना समुद्रकिनारी बसून लिहीली आहे.

जीवनास अर्थ येता
अर्थाला अर्थ येतो
अर्थ नसता तयाला
अर्थही व्यर्थ वाटतो

अर्थ शोधाण्यासाठी_
वण वण सर्वं फिरतो
अखेरचे ते जाताना
अर्थ इथेच राहतो

कुणा अर्थ तो पैसा
आनंद मनाला तर अर्थ
तब्येत ती बिघडता
सर्वच वाटे ते व्यर्थ

मराठीची जादूई जादू
शब्दास अनेक अर्थ.
मागे पुढे शब्द होता
वाक्याचे होता अनर्थ..

अर्थपूर्ण जीवन मिळावे
जो वाटे तो असावा अर्थ..
अर्थातली अनेक कोडी
सॊडवे जीवनाचे कार्य ..

आज न्यूझीलंडच्या आर्थिक व्यवहारबाबत लिहीतो आहे. NZD म्हणजे न्यूझीलंड डॉलर हे चलन या देशाचे असून १ न्युझीलंड डॉलर हा सुमारे ५० रुपयास मिळतो.जगात प्रगत देशात याची गणना होते.

आजच भारतीय पंजाबी कुटुंबाचे क्वालिटी मार्केट या इंडियन मॉलला खरेदीसाठी भेट दिली. इथे एखादी वस्तू काय किमतीस मिळते याची जिज्ञासा खूप जणांना असते. मी मार्केटचे सहा सात फोटो टाकले आहेत झूम केले की डॉलरचे भाव आणि त्याला पन्नासने गुणले की भारतीय रुपायातील भाव कळतील.

माझ्या भारतीय मानसिकतेला खूपच महागडे वाटत असल्याने मी ते दर बघणे सोडून दिले आहे.

वस्तूचे मूल्य किती असावे हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार असल्याने शेतीत थोडाफार उगवणारा भाजीपालाही खूप मूल्यवान आहे. कोल्ड स्टोरेज आदीची मुबलक सुविधा असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होतो. इथे शेतकरी खूप श्रीमंत आहेत. शेती बरोबरच पशुपालन,दूधदुभत्याचा धंदा केला जातो.एक माणसामागे सात मेंढ्या या देशात आहे.

काउन्टडाउन, पॅक अँड सेव्ह ही येथील लोकांसाठी प्रमुख शॉपिंग मॉल असली तरी इंडियन पदार्थ घेण्यासाठी इंडियन शॉप्स येथे आहेत. येथील डेअरी म्हणजे छोटे शॉपिंगचे दुकान हे बहुतेक गुजराती मंडळी सांभाळतात. मात्र लिकरच्या व्यवसायात बरेच पंजाबी मंडळी आहेत. इंडियन ओरिजिनची सुमारे पाच टक्के लोक इथे आहे बहात्तर टक्के युरोपीअन ,१५ टक्के मूळ रहिवासी माओरी बाकी चायनीज व इतर असे आहेत.
शॉपिंग एरिया इथे वेगळे डिफाईन्ड आहे रहिवासी क्षेत्रात व्यवसाय करता येत नाही.

येथे टपरी, लोटगाडी हा प्रकार नसला तरी अंगणात लहान मुलांना व्यवहार शिकवण्यासाठी छोटया टेबलावर घरातल्या अंगणातच आलेली सफरचंद एका किलोस तिन डॉलर प्रमाणे विकताना, त्यासारखेच लालबुंद गाल असलेली ती शाळेतली गोड निरागस आठ नऊ वर्षाची मुलं पाहून त्याच्याकडून ती विकत घेण्याचा मोह मला आवरता आला नाही.

पेट्रोल डिझेल यांचे दर रोज बदलतात,आज इथं सुमारे १५० रुपये लिटर पेट्रोल आहे.दूर एक कोपऱ्यात हा देश असल्याने बाहेरून येणाऱ्या बहुतेक सर्वं गोष्टी महाग वाटतात.

इथं कमावलेल्या प्रत्येक रुपयावर टँक्स द्यावा लागतो. शंभर डॉलरचे चलन हे येथील सर्वात मोठं असुन त्यावर या देशात नेलसन इथं राहणाऱ्या अरनेस्ट रूदरफोर्ड या ऍटमचा शोध लावणाऱ्या नोबेल प्राईझ विजेत्या शास्त्रज्ञाचे चित्र आहे यावरून या देशाची मानसिकताही कळते. पण येथे बहुतेक अर्थ व्यवहार कार्ड द्वारेच होतात.

माईट्रा टेन हा बांधकाम वस्तू , हार्डवेअर, मशीनरी,चा खूप मोठा मॉल असून या वस्तूंची स्वतंत्र अशी दुकानें आढळून आली नाही. वन व टु डॉलर ही डॉलर शॉपी कमी किंमतीच्या वस्तुसाठी शॉपिंगची दुकानेही खूप होती.

एका डेअरीत गुजराती मालकाशी गप्पा मारताना त्या गुजराती माणसाने त्याच्या वयाच्या पन्नाशीत, मुलाच्या एम. एस.च्या शिक्षणाच्या वेळा आपली ओ. एन. जी. सी. मधील अभियंताची नोकरी अहमदाबाद येथील गॅस एजेन्सी, इस्टेट आदी सर्वं विकून तो पूर्ण फॅमिली सकट दहावर्षांपूर्वी इथं शिफ्ट झाला,आता दोन तिन शॉप्स व्यवस्थित रन करून चांगलाच स्थिरावला आहे.

मुलांच्या भविष्यासाठी आपल्या कडे पालक खूप त्याग करतात पण घरदार विकून नोकरी सोडुंन असे साहसी निर्णय घेणारा असा वीर मी प्रथमच पाहिला. येथे आल्या आल्या त्यांनाही खूप पापड लाटावे लागले होते. अहमदाबादचे सुखकर जीवन सोडून मुलाच्या भवितव्यासाठी सर्वंस्व त्यानीं पणास लावले होते.मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या पोटास चिमटे काढणारे आईबाबा भारतात खूप आहेत.

त्या मानाने इकडे जेमतेम स्कुलिंग वा पदवी मिळाली की जॉबला लागले की मुलं स्वतंत्र आयुष्य सुरु करतात. त्याचे घरटे नविन होते आईबाबा आणि मुलं वेगवेगळी राहतात.भेटी गाठी अडचणी सोडवण्यासाठी व सणापुरत्या मर्यादित राहतात. प्रत्येकाला त्याची स्वतंत्र स्पेस हवी असते.

आता जग छोटं होत असल्याने संस्कृती देखील मिसळते आहेत. आपल्याकडचे जेष्ठासाठीचे पुण्यातील फाईव्हस्टार अथश्री आणि इथे असणारे ओल्डेज होम हे दोन्हीही सारखेच.. दोन्ही ठिकाणी अखेर जीवनाची इतिश्रीच होते." असो.

ज्याच्या नशिबात जसे वार्धक्य असेल ते आनंदात भोगण्याशिवाय सुटका नाही.

निवृत्ती आली असली तरी खऱ्या अर्थाने ती म्हणजे मुलांची जबाबदारी संपली की येते. पुढची पिढी त्याच्या परिपूर्ण कुटुंबासहीत त्याच्या पंखाने उंच झेप घेऊन आसमंती आनंदात विहारताना बघितले की जीवन सार्थक झाल्याचे समाधान येते आणि मग नकळत पैसा संपत्ती या बद्दल हळूहळू विरक्ती यायला लागते.

"आरोग्य हीच खरी संपत्ती याचीही प्रकर्षाने जाणीवही होते."

या प्रसंगी भरपूर पैसा असला तरी त्याचा आनंद उपभोगयाला शरीर साथ देईलंच याची खात्री देता येत नाही.

आज न्यूझीलंड सर्वं प्रकारच्या मार्केटचे फोटो टाकत आहे.
कुणास काही माहिती हवी असल्यास कोणताही प्रश्न विचारावा.
०१.०४.२४

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users